द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग 3 (अंतिम)
डिस्क्लेमर
या कवितेत कवीने काहीसे भडक लैंगिक शब्द वापरले आहेत. अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वगैरेंसारख्यांच्या बाबतीत परिचित रामकथेत नसलेली काही विधानं केलेली आहेत. ती नावं ही रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये.
द्रोण
या सगळ्याचा अर्थ काय? कवीला नक्की काय सांगायचं आहे?
त्यासाठी पुन्हा एकदा या साहित्यप्रकाराला काय म्हणावं असा विचार करावा लागतो. म्हटलं तर हा वैचारिक लेख आहे. एक विषय घेऊन त्याबद्दल टिप्पणी करणारा. म्हटलं तर ही एक रूपककथा आहे. म्हटलं तर छंदबंधनं झुगारून देणारी दीर्घ कविता आहे. मी हिला कविताच म्हणेन कारण तीत आलेली रूपकांची रेलचेल, एक अज्ञात, बोट न ठेवता येणारी लय यामुळे. कुठल्या बरणीत भरून ठेवावं व तीवर लेबल काय लावावं हे तितकंसं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की या रचनेतून काय प्रकारचा आकारबंध डोळ्यासमोर येतो? मला तरी असं वाटतं की या कवितेला एखाद्या विचारप्रवाहाचं रूप आहे. एखाद्या साध्या कवितेत किंवा वैचारिक लेखात बऱ्याच वेळा एक सरळसोट धारा असते. द्रोण मध्ये त्या धारेचं स्वरूप एखाद्या नदीसारखं आहे. अनेक उपनद्या तिला मिळतात, काही कालवे झरे वेगळ्या वाटांनी जातात, आणि प्रवाह पुढे जातो. महाकाव्यात काही आख्यानं येऊन जावीत तशा काही टिप्पणी येऊन जातात.
कवितेचा विषय आहे संस्कृती म्हणजे काय, व ती पसरते कशी? कोलटकरांची प्रतिभा अशी की ते संस्कृती हा शब्द एकदाही वापरत नाहीत. केवळ रूपकांतच बोलतात. हेच त्यांनी तक्ता मध्ये केलेलं आहे. वर्णव्यवस्थेबाबत बोलताना ते तक्त्याचं (वर्णमालेचं) रूपक वापरतात, व चौकटींविषयी बोलतात. त्या रूपकाचा अर्थ वाचकाने लावायचा असतो. मला कोलटकरांची कविता आवडते ती याच कारणामुळे. कवीला जे सांगायचं आहे त्यासाठी वाच्यार्थ वापरला तरी सुंदर कविता करता येते. पण रूपकांचा वापर हा कवितेला एक गहिराई प्राप्त करून देतो. रूपकांच्या वापरातून निर्माण होणारी आशयघनता हे कवितेचं शक्तीस्थान आहे.
तेव्हा प्रथम आपण रूपकांकडे बघू. कथा रामायणाची आहे, तेव्हा राम हे प्रमुख रूपक असावं हे उघड आहे. पण राम केवळ उल्लेखानेच या कथेत येतो. काहीसा पार्श्वभूमीला उभा असणारा - पार्श्वभूमी घडवणारा. राम हा आदर्श राजा आहे. पण आदर्श राजा म्हणजे नक्की काय? तर प्रजेला आदर्श वाटेल असा. आदर्श असणं आणि वाटणं यात फरक आहे. प्रजेसाठी निष्कलंक चारित्र्याची प्रतिमा ठेवली की राज्यकारभार, शत्रूंशी लढाया करून त्यांच्यावर विजय प्राप्त करणं यातही त्याच्या प्रजेसाठी आदर्श राहाणं म्हणजे लंकेवर विजय मिळवला की तिची संपत्ती हरण करून ती अयोध्येला बहाल करणं आलंच. हे करण्यासाठी, अयोध्यावासी ज्यांचं तोंडदेखील पहाणार नाहीत अशा वानरांशी मैत्री करणं (वालीचा कपटाने वध करूनही) हे त्याचं कर्तव्यच आहे. पण हे करतानाही वानरांना त्यांच्या जागीच ठेवणं हेही कर्तव्यच आहे. वर्णव्यवस्था वापरून घेणं आणि त्याचबरोबर ती जपणं ही रेषा चालायला सोपी नाही. कवितेतल्या रामाने त्यावर तात्पुरता तोडगा काढलेला आहे. वानरांना माणसांचं रूप काही काळपर्यंत, लंकेसारख्या दूरच्या भूमीत दिलं तर सगळेच खूष. ही व्यवस्था कोणी मोडू नये म्हणून लक्ष्मणाच्या कोपाचा बडगा तो बाळगून आहेच. प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.
रामाचं आणि वानरांचं रूपक तसं समजायला सोपं आहे. सगळ्यात गूढ गहन रूपक आहे ते सीतामाईचं. राम हा पार्श्वभूमीला असतो तर सीतामाई प्रत्यक्ष सहभाग घेते. कोलटकरांच्या चिरीमिरीमधल्या काही कवितांतही विठ्ठल- रखुमाई अशी रूपकाची जोडी येते. तिथे विठ्ठल हा कधी प्रस्थापित व्यवस्थेचा धारक म्हणून येतो, तर इतर (बऱ्याच) वेळा तो जीवनाच्या वारीचं अंतिम ध्येय म्हणून येतो. रखुमाई मात्र विठ्ठलाच्या पुरुषाची जोडीदार प्रकृती बनून येते. इथे सीतामाईची देखील तीच भूमिका आहे. सीतामाई ही धरतीची कन्या असल्यामुळे इथे हे रूपक अधिक चपखल बसतं. नुकत्याच शिकून सवरून शहाण्या झालेल्या वानरांनी आसपास बघितलं तर त्यांना ही परिस्थिती दिसते. आसपासच्या निसर्गात, माणसांत, जमिनीत अमाप वैभव (untapped potential) असतं. अज्ञानामुळे आत्तापर्यंत ते वापरलेलं नसतं इतकंच. त्या झाडाच्या पानांपासून, नवनिर्माणाच्या प्रतीकांपासूनच हे द्रोण बनतात. हे द्रोण म्हणजे शक्ती, सामर्थ्य... पहिल्या द्रोणाचं जहाज बनल्यावर वानरांचा प्रमुख डोकं ताळ्यावर ठेवून अठरा जहाजांच्या आरमाराचा हिशोब करतो. पण सगळी तयारी व्हायच्या आतच तो शंख फुंकला जातो. आणि क्षुल्लक ठिणगी पडून पूर्ण तयारी आधीच विस्फोट व्हावा, क्रांतीसाठी सशस्त्र चळवळ व्हावी, 1857 सारखा उठाव व्हावा तशी ती शक्ती आपसूकच उद्रेक होऊन बाहेर पडते.
हा शंख हे कवीचं सर्वात जिव्हाळ्याचं रूपक आहे असं वाटतं. ही आंतरिक साद भल्याभल्यांना भुरळ पाडते. तिचा आवाज साजणगहिरा आहे. कानांना ऐकू येणाऱ्या आवाजाच्या अलिकडल्या व पलिकडल्या वलयांचा, सरळ मनालाच भिडणारा. नाविकांना झपाटून टाकणाऱ्या सागरकन्यांचा - सायरेन्सचा. हा आवाज कानांवर पडला की चेटूक होतं. जुनं, शिळं फेकून देऊन नवीन, कोवळं, ताजं शोधण्याच्या मानवाच्या ओढीचा हा आवाज आहे. गतानुगतिकांच्या वाटेने जायचं तर या शंखाचा, सायरेन्सचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून कानात उपदेशांचे बोळे भरण्याचा समाज प्रयत्न करतो. शेवटी प्रस्थापितांचा जाच, हा आतला आवाज आणि समाजातल्या व परिस्थितीच्या शक्तीची जाणीव झाली की संस्कृती नवीन माती शोधते, पसरते, फळते, फुलते...
इंग जिथे गेला तिथे नवीन संस्कृती वसवून जुन्या संस्कृतीला दडपण्याचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर त्याच मुळांचा शोध घेण्यासाठी जॉन येतो. हा इंगचा वंशज. त्याला इथेच राहाणाऱ्या, आपली आदीम ओळख जपलेल्या वानराचा वंशज भेटतो आणि खरा इतिहास सांगतो. शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात. कायमच्या जुळण्यासाठी अर्थातच नाही. संस्कृतीच्या गाण्यातली एक सुंदर सम साधण्यासाठी फक्त.
Comments
अनुक्रमणिका
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग 1
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग 2
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग 3
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
रसग्रहण आवडले
कविता समर्थ आहे. रूपके रसग्रहणात सांगितली आहेत, ती दिलेल्या अवतरणांशी सुसंगत आणि गहिरी आहेत.
पहिला जंत्रीवजा सर्गसुद्धा असाच अर्थगर्भ असेल काय?
अवघी कविता वाचायची उत्सूकता आणि जिज्ञासा चाळवली आहे.
(कोलटकर आश्चर्यकारक रीतीने संस्कृत शब्द वापरतात. "असूर्यंपश्या" हा शब्द साधारणपणे व्याकरणाच्या पुस्तकातल्या एका कोनाड्यात सापडतो - कुठल्यातरी नियमाचा अपवाद म्हणून. कुठल्या कवितेत मी तो वाचलेला नाही. "बहुव्रीही" शब्द शब्दार्थाने (तांत्रिक संज्ञा म्हणून नव्हे) वापरलेलाही मी क्वचितच ऐकलेला आहे. गंमत वाटली. दोन्ही शब्द भाग २ मधील उद्धरणात आहेत.)
सहमत/असूर्यपश्या
धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. हे भाग वाचून मूळ कविता वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
असूर्यपश्या हा कुठल्यातरी कथेत घनदाट जंगलांच्या संदर्भात (इतकी घनदाट झाडी की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत कधीच पोचत नाही) वाचलेला अंधुकसा आठवतो. ह्या शब्दशः अर्थासोबतच त्याला एक सांस्कृतिक संदर्भ/लाक्षणिक अर्थही आहे - जो अलीकडे विद्या बाळ यांच्या एका लेखात वाचला होता (पहिल्या परिच्छेदाच्या अखेरच्या ओळीत). कवितेत तो बहुधा या अर्थाने वापरला गेला असावा. (अवांतर - 'सूर्य पाहिलेला माणूस' ची या संदर्भात आठवण झाली - एक कॉन्ट्रास्ट म्हणून)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
रसग्रहण आवडले.
हे भाग वाचून मूळ कविता वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
शंखाचा उल्लेख 'एक तुतारी..' मधल्या तुतारीसारखा दिसतो. नाही का?
ते प्रतिक या कवितेत कसे वापरले आहे ते वाचायला हवे.
छान
हेच म्हणतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आवडले
रसग्रहण आवडले.
कलाकृतींच्या बाबतीत हा अनुभव मागेही आला होता. जर कुणीतरी संदर्भासहित कलाकृतीचे पदर उलगडून दाखवले तर तिचा व्यापक अर्थ लक्षात येतो. बीबीसीवर जगप्रसिद्ध चित्रांच्या बाबतीत असाच कार्यक्रम झाला होता. तेव्हाही सेझान किंवा गोया यांच्या एकेका चित्रावर तासभराचे विवेचन ऐकल्यावर त्यामागचे विविध पैलू लक्षात आले.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
सहमत
जर कुणीतरी संदर्भासहित कलाकृतीचे पदर उलगडून दाखवले तर तिचा व्यापक अर्थ लक्षात येतो.
सहमत आहे!
आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते! कारण प्रत्येक गोष्ट दोन अधिक दोन चार अशी(च) मोजावी(च) असा आग्रह धरल्यावर ती तीन किंवा पाच धरून मजा घेण्याचा आनंदही न
सुरेख
राजेश यांनी सुरेख उलगडा केला आहे.
लिखाणा विषयी काय म्हणावे? सरस्वतीचा वरद हस्त आहे!
अर्थप्रवाही आणि साध्या सोप्यारीतीने सांगणे फार आवडले.
मला तरी असं वाटतं की या कवितेला एखाद्या विचारप्रवाहाचं रूप आहे. एखाद्या साध्या कवितेत किंवा वैचारिक लेखात बऱ्याच वेळा एक सरळसोट धारा असते. द्रोण मध्ये त्या धारेचं स्वरूप एखाद्या नदीसारखं आहे. अनेक उपनद्या तिला मिळतात, काही कालवे झरे वेगळ्या वाटांनी जातात, आणि प्रवाह पुढे जातो. महाकाव्यात काही आख्यानं येऊन जावीत तशा काही टिप्पणी येऊन जातात.
हे रूपकही खुप आवडले.
जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.
अगदी खरे आहे! अजूनही घडते आहे.
आपली आदीम ओळख जपलेल्या वानराचा वंशज भेटतो आणि खरा इतिहास सांगतो. शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात. कायमच्या जुळण्यासाठी अर्थातच नाही.
इथे मात्र मी 'जरासा' अडखळलो आहे.
पण एकुणच सुंदर उपक्रम. अजूनही असे वाचायला आवडेल.
आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते! कारण प्रत्येक गोष्ट दोन अधिक दोन चार अशी(च) मोजावी(च) असा आग्रह धरल्यावर ती तीन किंवा पाच धरून मजा घेण्याचा आनंदही न
छान !
रसग्रहण आवडले.
'वाचायला हवे' च्या यादीत 'द्रोण'ची भर पडली.
रोचक
मूळ कविता समोर आली असती तरी मी ती वाचली नसती परंतु रसग्रहण फारच रोचक झालेले आहे. कविता वाचावीशी वाटली.
रामायण-महाभारत काव्यांचा आधार घेऊन त्यावर तत्कालीन समाजाला अनुसरून आधारित रचना करण्याचीही आपली "संस्कृतीच" आहे. :-) अन्यथा, लक्ष्मणाने आखलेली लक्ष्मणरेषाही वाल्मिकी रामायणात नाही. कधीतरी शतका-दीडशतकामागे ही पद्धत विलयास गेली असावी. कोलटकरांनी कवितेद्वारे पुन्हा अशी रोचक रचना केल्याचे वाचून आनंद झाला.
याच्यापुढे असेही म्हणता येईल की वानरांकडून पूल बांधण्याची कला शिकून रामाने एखाद्या अयोध्यावाश्याला पूल बांधण्याचे पेटंटही देऊ केले असते. :-)
असो.
यावरून आठवले:-
संस्कृती हा शब्द प्राचीन संस्कृत वाङमयातही येत नाही असे वाचले आहे कारण आपल्याकडे संस्कृती हा शब्दच नाही. ब्रिटिशांच्या काळात कल्चर आणि सिविलायझेशनशी साधर्म्य साधणारा शब्द हवा होता तेव्हा संस्कृत भाषेवरून हा शब्द निर्माण करण्यात आला असे वाचले. चू. भू. दे. घे. या कारणावरून कोलटकरांनी संस्कृती हा शब्द वापरला नाही असे सांगण्याचा हेतू नाही. सहजच आठवले म्हणून लिहिले.