द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग 2

डिस्क्लेमर
या कवितेत कवीने काहीसे भडक लैंगिक शब्द वापरले आहेत. अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वगैरेंसारख्यांच्या बाबतीत परिचित रामकथेत नसलेली काही विधानं केलेली आहेत. ती नावं ही रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये.

द्रोण

मानव तर झालो. प्रस्थापित संस्कृतीचं सार तात्पुरतं का होईना, पण काबीज तर केलं. पण पुढे काय? ते टिकवून कसं ठेवायचं? त्यासाठी लढा कुठच्या बळावर द्यायचा? जळात राहून माशाशी वैर तर धरायचं नाही, मग जायचं कुठे, करायचं काय? म्हणून ते सल्ल्यासाठी सीतामाईकडे जातात. या सीतामाईचं रूप आदिमायेप्रमाणे जादूई आहे. निसर्गावर सत्ता असलेलं आहे. सीतामाई द्रोण बनवण्याचं काम करत झाडाखाली बसलेली आहे. यामुळे अशोकवाटिकेतली सीताच डोळ्यासमोर येते. रावणापासून मुक्त झाली तरी, रामाच्या सहवासात आली तरी ... दोन पानं आपोआप झाडावरून गळून तिच्या डाव्या हातात येतात, उजव्या हातात त्याचवेळी जादूप्रमाणे एक चोय येते, व क्षणार्धात द्रोण तयार होत असतो. तो झाला की दुसरा, हे चक्र अव्याहतपणे चालू राहातं. हे चक्र एकाच वेळी नैसर्गिक आहे, व त्याचबरोबर मानवी प्रतिभेने नवीन रचनांच्या निर्मितीचं - तंत्रज्ञानाचंही आहे . ती त्यांना सांगते मानवच बनून राहा. इथून पळून जा. पण ते तितकं सोपं नसतं. लक्ष्मण (रेषा आखणारा, बंधनं घालणारा) रागीट होता, त्याने या वानरांचा कुठेही पाठलाग करून नायनाट केला असता - नियम मोडल्याबद्दल. रामही वर्णव्यवस्थेचा पुरस्कर्ताच होता. पण माझा राम मला वानरांमुळेच भेटला ना? तेव्हा त्यांना मदत केलीच पाहिजे, असं म्हणून ती त्यांच्या म्होरक्याला एक द्रोणांची चळत देते. आणि म्हणते, वेळ आली की त्यांचं काय करायचं हे तुम्हाला कळेलच.

प्रत्यक्ष सीतामाईने बनवलेले असले तरी ते क्षुल्लक द्रोणच. ते पाहून इतर वानर अचंब्यात पडतात. त्यातला एक जण संतापतो, व त्या अतीव संतापाच्या भरात त्याची शेपटी परत येते. तो पुन्हा वानरत्व प्राप्त करतो. त्याचवेळी चमत्कारासारखा एक द्रोण वाऱ्याने गिरक्या घेत उडतो, जसजसा वर जातो तसतसा मोठा होतो. समुद्रात पडतो तोपर्यंत एका प्रचंड गलबताएवढा होऊन समुद्रात संथ तरंगायला लागतो. हेच सीतामाईचं देणं. स्वातंत्र्य, शक्ती, लक्ष्मणापासून दूरवर जाऊ शकण्याची. नवसुसंस्कृतांसाठी अढळपद. जणू कर्णाला क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी मिळालेलं, सूतपुत्रत्वाचा इतिहास माहीत नसलेल्या देशाचं राज्य.

सगळे वानर आश्चर्याने बघत असताना इंग, सीतामाईकडून द्रोण स्वीकारणारा वानरांचा म्होरक्या, डोकं ताळ्यावर ठेवून उरलेले द्रोण पुरून ठेवतो. व त्यावर एक मोठा दगड ठेवतो. त्याच्याकडे आता एकूण अठरा गलबतांचं आरमार असतं. या जोरावर अनेक गोष्टी करता येणार असतात. या जाणीवेसोबतच त्याला एक शंख सापडतो. आकाशाचा अंतर्भाव करणारा, आकाशाला स्वत:पासून लपायला जागा देणारा...

त्या शंखाची घुमटी
घोटीव
आणि कठोर होती

स्वप्नसुरत क्षणी
अश्मीभूत झालेल्या एखाद्या
यक्षिणीच्या स्तनाप्रमाणे

तो शंख आतून
लुसलुशीत होता एखाद्या
अप्सरेच्या योनीप्रमाणे

या शंखाला लैंगिक आकर्षणाइतकं तीव्र आकर्षण आहे. तो हाती आला की कामुकतेने व्हावा तसाच जीव वेडा होतो, हे इथे कवीला सुचवायचं आहे. तो शंख कानाजवळ आणल्याबरोबर सुरस आणि चमत्कारिक कथा सांगू लागला.

सर्वांग चितारून घ्यायचे डोहाळे लागलेल्या
असूर्यपश्या
चित्रलोलुप गुहांच्या

....

किंवा टकरा देऊन दाही दिशा
दणाणून टाकणाऱ्या
वज्रकपाळ एडके झुंजवण्यात आपला

वेळ वाया घालवणाऱ्या
व अजून गर्भाधान न झालेल्या
बहुव्रीही दऱ्याखोऱ्यांच्या

कुंपणात जीवाला रमू न देणारे, दुरून साजरे निळे डोंगर प्रत्यक्ष पायाखाली तुडवायला लावणारे शंखाचे ते शब्द. मानवाला आत्तापर्यंत कैक वेळा त्यांनी मोहिनी घातलेली आहे. अरे चला, इथे काय ठेवलंय, आपल्या वस्तीच्या वेशीपलिकडचा डोंगर ओलांडला की तिथे सर्व नवीन कोरं आहे. प्रस्थापित व्यवस्थेत पुरेसा मान न मिळणाऱ्या घटकांना तर तसं वाटणं सहाजिकच आहे.

आणि पुढे तो शंख
असंही म्हणाला
की अरे यार,

सीतामैयाचे आशीर्वाद
संगती असल्यावर
दुसरं काय पायजेलाय तुम्हाला?

जिथे जाल ते तुमचं आजोळच असेल कारण शेवटी कुठचीही भूमी म्हणजे सीतेची माईच नाही का? ती तुम्हाला कसं काही कमी पडू देईल? माणसाची अनोळखी कुंवार रसरशीत किनाऱ्यांना आलिंगन देण्याची इच्छा ही अशीच आशावादी असते. तिचाच सतत डोक्यात घोंघावणारा, प्रस्थापित चाकोरीला तोडून नव्या मोकळ्या कुरणांची साद घालणारा हा आवाज. ही साद लोकांना ऐकवण्यासाठी तो शंख फुंकतो. ज्या दगडाखाली ते द्रोण पुरले होते त्याच दगडावर उभा राहून. जणू काही त्या द्रोणांत असलेल्या शक्तीच्या जोरावर उभं राहून.

आज्ञार्थी वलयं होती
कानांना ऐकू येण्यापलिकडली
व अलिकडली

जी ऐकणाऱ्यांना कळत न कळत
आपोआप
बंधनकारक ठरत होती.

व ऐकणारा प्रत्येक जण त्या
शंखाला अभिप्रेत असणाऱ्या भविष्यपुराणात
सामील होत होता.

कवीने म्हटलेलं नाही, पण शंखाचा अधिकारी स्वर त्या द्रोणांनादेखील ऐकू गेला कदाचित. कारण त्याच क्षणी जमीन हादरली, व ते सर्व द्रोण उसळी फोडून वर आले. इंग जो आकाशात उडाला तो नवीन भूमीवर जाऊन पडला. तीच इंग्लंड झाली हे आता कोणाला फारसं माहीत नाही. पुन्हा संस्कृतीचा विस्तार, जेते व जित यांचं चक्र याकडे कोलटकर निर्देश करतात.

जो पूर्ववत वानर झाला होता तो या नवीन वानरांच्या प्रवासाच्या तयारीकडे तटस्थपणे पाहात होतो. त्याला

तू आमच्याबरोबर येऊ नकोस
असं त्याला कुणीच म्हणालं नव्हतं
पण ये असंही.

तो नवखंड पृथ्वी वसवण्यासाठी जाणारा तांडा पाहात तसाच बसून राहिला.

त्यांचीच वंशवेल विस्तारून
पुढे त्यांच्या शाखा
अमेरिकन, इंग्रज, फ्रेंच, जर्मन

इटालियन, रशियन,
हबशी, शिद्दी, अरब, तुर्की, चिनी, जपानी
वगैरे नावांनी प्रसिद्ध होणार होत्या

आणि पृथ्वीचा पचका करणार होत्या,
हे त्याला कसं माहीत असणार?
विनाकारण हळहळत

तो तसाच बसून राहिला तिथे वाळूत.
आपण किती भाग्यवान आहोत
हे त्याला समजलेलंच नव्हतं

शेपटीचं गतवैभव
त्याला परत मिळालेलं होतं
निरुपयोगी नाकाच्या बदल्यात.

इथे पाचवं सर्ग व कविता संपते. कवीचं मत पहिल्यांदाच व्यक्त करत. नंतर राहातो तो उपोद्घात.

जॉन नावाचा कोणीतरी पाश्चिमात्य शास्त्रज्ञ म्हैसूरला रामायणाचं भाषांतर करण्यासाठी आला असतो. लायब्ररीत बसलेला असताना एक हुप्प्या त्याचं लक्ष वेधून घेतो, व खिडकीपाशी केळीच्या पानात गुंडाळलेलं ताडपत्री हस्तलिखित ठेवतो. जॉन ते उघडून बघतो, तर पपईमुख नावाच्या कुणीतरी लंगूरी भाषेतून संस्कृतमध्ये केलेलं ते समश्लोकी भाषांतर असतं. आफ्रिकेतल्या एका टोळीने उत्तरेकडे सरकत सरकत पृथ्वी व्यापली या इतिहासाला व एकंदरीत मानवाच्या उत्क्रांतीच्या कल्पनांना तडा देणारं. जॉन झराझरा टिपणं काढतो, पण लवकरच ते हस्तलिखित नाहीसं होतं. त्याची टिपणं व आठवणी यांच्या सहाय्याने शक्य तितकं तो लिहून काढतो... त्याचं लेखन म्हणजेच ही मूळ कविता हे गर्भित आहे.

या सगळ्याचा अर्थ काय? कवीला नक्की काय सांगायचं आहे?
-क्रमशः

Comments

अनुक्रमणिका

 
^ वर