द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग 1
डिस्क्लेमर
या कवितेत कवीने काहीसे भडक लैंगिक शब्द वापरले आहेत. अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वगैरेंसारख्यांच्या बाबतीत परिचित रामकथेत नसलेली काही विधानं केलेली आहेत. ती नावं ही रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये.
द्रोण
या कवितेविषयी लिहिताना कुठून आणि कशी सुरूवात करायची हा प्रश्न आहे. मुळात हिला कविता म्हणायचं, की दीर्घकाव्य म्हणायचं - नव्वद पानांत आणि पाच सर्गांमध्ये ती पसरलेली आहे - ते कळत नाही. छंद व गेयतेची बंधनं झुगारून देणारी, एकामागोमाग एक ठेवलेली वाक्यवजा तीन ओळींची कडवी, अशी तिची काहीशी ढोबळ रचना आहे.
एवढा मोठा विजय मिळाला युद्धात,
रावणाला मारलं,
राक्षसांचा पराभव केला
...
म्हणून रामानं ठरवलं
विजयोत्सव साजरा करायचा.
आणि एक मोठ्ठी पार्टी दिली,
अशा ओळी वाचायला सुरूवात करतो तेव्हा तर कोणत्या आधारावर कविता म्हणायचं असा प्रश्न पडतो. एखादा गद्य परिच्छेद कडवीवजा वाक्यांमध्ये तोडल्याप्रमाणे पहिली काही पानं वाचायला मिळतात. केवळ कोलटकरांनी लिहिलंय म्हणून तिला कविता म्हणायची का? असाही प्रश्न पडतो. पहिल्या सर्गात काही कंटाळवाणी वाटणारी वर्णनं आहेत. जवळपास संपूर्ण पहिला ललपहिलासर्ग हा दोन पानांचं गद्य पातळ करून पंधरा पानं केल्याचा भास होतो. प्रस्तावनेत सूतोवाच केलेलं नसतं तर मी कदाचित तिथेच ही कविता सोडली असती - आणि अर्थातच उत्तम काव्याच्या आनंदाला मुकलो असतो. पहिल्या सर्गाच्या शेवटी शेवटी कवितेतल्या रूपकाची तोंडओळख होते तेव्हा काहीतरी वेगळं वाचतोय याची जाणीव होते. दुसऱ्या सर्गात त्या रूपकाचा काहीसा अपेक्षित विस्तार होतो. पण त्या कल्पनेच्या वृक्षाला हळुहळू फांद्या फुटताना दिसतात, रूपकाचे नवीन पदर उलगडायला लागतात ते तिसऱ्या सर्गापासून. तिथून हीकविता आपली शक्ती दाखवायला लागते. एका अर्थाने पहिले दोन सर्ग हे मांडणीसाठी वापरलेले आहेत, तिथे बांधलेल्या भक्कम पायावरूनच ती पुढच्या भराऱ्या घेऊ शकते. इथपासूनच ती आपली गद्य भाषासुद्धा सोडते. गद्य भासणाऱ्या वाक्यांची जागा अर्थगर्भ, ओल्याकंच काव्यपंक्ती घेतात.
(तो गोष्टी सांगू लागला...)
अमंथित समुद्रांच्या,
अनाघ्रात आकाशांच्या,
कुंवार किनाऱ्यांच्या.
पाचूच्या चेटूकबेटांच्या.
वादळं वश असलेल्या मत्स्यकन्यांच्या.
देवमाशांच्या सुरतक्रीडेच्या.
सारख्या ओळी वाचताना आपणही तीबरोबर भरारी घेतो. आपण आधी शंका घेतली याबाबत आपण मनोमन कोलटकरांची क्षमा मागतो. कविता जशी पुढे सरकते, तशी ती अधिक भव्यदिव्य होते. जणूकाही हाडाच्या सांगाड्यापासून सुरूवात होऊन त्यात रक्तमांस, हृदय, मेंदू भरला जातो, तिला चेहेरा मिळतो, एक धूसर शरीर मिळतं आणि त्या शरीराचं तांडव नृत्यही दिसायला लागतं. हा बदल होत असताना कवितेचे शब्दही जिवंत व्हायला लागतात. बोलेरो जर तुम्ही ऐकलं असेल तर त्याची लय या कवितेला आहे. बोलेरोची सुरूवात लांबून विस्मृतीच्या गर्तेतून ऐकू येणाऱ्या सुरावटीने होते. नंतर तीच धुन एखादा बॅंड पुढे सरकत आल्याप्रमाणे वाढत जाते, अंगात भिनत जाते. शेवटी संपूर्ण ऑर्केस्ट्राच्या ताकदीने ती आपल्याला घुसळून सोडते. तसंच काहीसं.
पहिल्या प्रस्तावनावजा पाच कडव्यात म्हटल्याप्रमाणे हे सर्ग वाल्मिकी रामायणात आढळत नाहीत, वानरांत आधीपासून प्रचलित असलेली ही रामकथा आहे - कदाचित वाल्मिकीपूर्वीचीही. इथेच कुणकुण लागते की ही कविता रामायणाविषयी नसून इतिहास, जेत्य तत्यांची संस्कृतीव जीतांची संस्कृतीयांविषयी आहे. किमान ते तिचं एक अंग आहे. यातली वानरं, राम, लक्ष्मण, सीता हे प्रतीक म्हणून येणार आहेत. ही प्रतीकं कविताभर उलगडत राहातात. काहीवेळा ती समजली आहेत, त्यांचा अर्थ हातात गवसला आहे असं वाटत असतानाच नवीन पैलू दिसतात. कधी कधी कवीने जाणूनबुजून एकच रूपक वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी वापरलं आहे. कोलटकरांचा खवचटपणा संपूर्ण कविताभर ठासून भरलेला असला तरी तो पहिल्या दुसऱ्या सर्गात प्रकर्षाने जाणवतो. सीतामाई अग्निने सर्टिफाय करून मिळाली म्हणणं काय किंवा एकंदरीतच विचारवंत वानरांची चर्चा काय...
पहिल्या सर्गात रामाच्या पार्टीचं, किंबहुना पार्टीत काय काय असणार याचं वर्णन आहे. काहीशी लांबलचक जंत्री आहे. पण मध्येच काही लक्ष वेधून घेणाऱ्या ओळी येतात.
लंकेच्या कोषागारातून
बाहेर आलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या
मौल्यवान वस्तू
(यादी...)
याप्रसंगी
विजेत्यांना पारितोषिक म्हणून
देण्यात येणार होते.
प्रत्यक्ष सागराने नजराणा म्हणून दिलेले मासे, रावणाच्या व लंकेतल्या धनिकाच्या तळघरातून आलेली दारू हेही असणार होते या पार्टीत. आणि ती दारू उसळणार, कारंज्याप्रमाणे, मयासुराने बनवलेल्या स्फटिक-अप्सरांच्या कुंभांतून व स्तनांतून. इथे जेते आणि जीतांचं नातं स्पष्ट व्हायला लागतं. एका संस्कृतीचा विजयोत्सव हा दुसऱ्या संस्कृतीच्या अवशेषांवर, तिला लुटून होतो.
पण खरी मेख येते ती त्यापुढे. वानर व मानव यांचं त्या पार्टीपुरतंतरी पटावं, त्यांच्यात समता नांदावी यासाठी दोन तळी बांधलेली असतात. वानराने एका तळ्यात बुडी मारली की तात्पुरतं त्याला मानवाचं शरीर मिळतं. पार्टी संपल्यावर दुसऱ्या तळ्यात बुडी मारून पुन्हा वानर शरीर मिळणार असतं. पहिल्या तळ्यात बुडी मारून वानर मानवाचा देह प्राप्त करून घेतात. इतर मानवांना जोक्स सांगतात, त्यांच्याबरोबर व राक्षसांसोबत दारू पितात, राक्षसिणींच्या प्रेमाचे अधिकारी होतात. बीभिषणाने व मंदोदिरीने जातीने खपून आयोजित केलेली ही पार्टी नऊ दिवस सतत चालते.
या तळ्यांच्या रचनेतच कोलटकरांनी वर्णव्यवस्थेवर खवचट आणि खमंग टिप्पणी केलेली आहे. युद्ध जिंकण्यासाठी वानरांची मदत रामाला अर्थातच हवी होती. पण त्यांना आपल्या बरोबरीचं मानण्याची या कथेतल्या रामाची तयारी नव्हती. हा राम व्यवस्थेचा पालनकर्ता, आणि म्हणूनच व्यवस्थेच्या आतल्यांच्या (जेत्यांच्या) मते आदर्श राजा. पण ही कथा लिहिली आहे वानरांनी. त्या राजाने अत्यंत उदार होऊन या पार्टीपुरतं त्यांना मनुष्यत्व बहाल केलेलं होतं. पण तितक्यापुरतंच.
माकडाचा माणूस तर झाला. आता पुढे काय?
अर्थातच कवितावस्तूने निर्माण केलेल्या अपेक्षेप्रमाणे माणूस झालेल्या वानरांना विशेषत: त्यांच्यातल्या तरुणांना, माणूसच बनून राहावंसं वाटतं. हे आयुष्य छान आहे असं वाटायला लागतं.
काही ज्येष्ठ वानरांना
निदान जे विचारवंत होते त्यांच्यातले
किंवा नुसतेच भित्रे म्हणा
त्यांना हा शुद्ध वेडेपणा वाटत होता
चार दिवस गंमत
म्हणून हे ठीकाय असं त्यांचं मत होतं.
मग त्यांच्यातले एकेक जण उपदेश करतात. बदल किंवा कुठचंही स्थित्यंतर वाईट असं म्हणण्यासाठी जे युक्तिवाद केले जातात ते सर्व केले जातात. काही थोडेसे पटण्यासारखे, तर काही उघडउघड कोत्या दृष्टीकोनातले.
कोणी म्हणतो शेपटी हे आपल्या जातीचं वैभव आहे, तीच तुम्ही टाकून देणार? थुत् तुमची. कोणी म्हणतो मनुष्यसंस्कृतीचे नियम पाळणं आपल्याला झेपायचं नाही. तुम्ही जिन्यावरनं उतरण्याऐवजी पाचव्या मजल्यावरून चुकून उडी माराल आणि मराल. कोणी म्हणतं गुळगुळीत कातडीचा माणूस म्हणजे केवळ माकडाचा अपभ्रंश. कोणी म्हणतं, ही माणसं म्हणजे फडतूस, कोणी पर्वत उचलेल का हातावर? (द्रोण शब्द न वापरता त्या कवितेच्या शीर्षकाचा एक अर्थ इथे हलकेच उलगडून दाखवला आहे. हा सुसंस्कृततेचा पर्वत पेलेल का या माकडांना?) कोणी म्हणतं की माणूस कल्पक आहे पण त्याची कल्पकता ही भ्याडपणातून आलेली आहे. नौका, धनुष्यबाण वगैरे शोध हे निसर्गापासून, इतरांपासून दूर राहाण्यासाठी लावलेले आहेत. कोणी म्हणतं माणसाच्या जगात प्रत्येक झाड कोणाच्या मालकीचं असतं...
प्रत्येक बागेभोवती एक कुंपण असतं
आणि प्रत्येक कुंपणाबाहेर
कुणीतरी एक राखणदार उभा असतो.
एक वृद्ध कपी सांगतो की 'तुम्ही त्यांचं अंधानुकरण करता आहात,... पण वात्सल्यभाव हा आपल्या मूल्यव्यवस्थेचा गाभा आहे, माणसांचं तसं नाही.' हे वाक्य लिहिताना कवीची टंग त्याच्या चीक ला भोक पडेल की काय इतकी इन आहे असं वाटतं.
काही वानर स्त्रिया या माद्यांच्या इतक्या मोठ्या आम्यांमुळे मुलं गुदमरून कशी जात नाहीत असा प्रश्न विचारते. तर कोणी म्हणतं मानवपुत्रांना गुरुगृही पाठवल्यामुळे मातृप्रेम मिळत नाही, त्यामुळे ते कोरडे, हिंस्र होतात...या सर्व साधकबाधक ऊहापोहात एका संस्कृतीची दुसरीकडे बघण्याची कोती नजर कोलटकरांनी अधोरेखित केलेली आहे. एक गट दुसऱ्याकडे बघताना आपण व ते अशा रेषा आखण्याकडेच कल असतो. साम्य बघण्याऐवजी परस्परांमधले बारीकसे फरकदेखील उचलून धरून 'ते' कसे वेगळे (व म्हणून कमी दर्जाचे) आहेत हे विचार खूप वेळा पुढे येताना दिसतात. आपणदेखील पाश्चिमात्य संस्कृतीकडे अर्धवट माहितीवरून निष्कर्ष काढतो. व पाश्चिमात्य देखील तशाच अर्धकच्च्या कल्पना बाळगून परतफेड करताना दिसतात. व्हिएटनाम युद्धाच्या काळात व्हिएटनामींना आप्तांच्या मृत्यूने तितकं दु:ख होत नाही अशी सोयीस्कर समजूत अमेरिकनांमध्ये पसरली होती (किमान ती तशी पसरवण्याचे प्रयत्न तरी झाले होते). एकंदरीतच कोलटकरांनी अत्यंत गंभीर रिपोर्टरी तटस्थतेच्या मिषाने एका बाजूने पूर्वग्रहदूषित विचारसरणीवर, कोत्या अनुमानपद्धतीवर तर दुसऱ्या बाजूने मानवी संस्कृतीच्या नावाखाली दडलेल्या स्वार्थावर सणसणीत कोरडे ओढलेले आहेत.
या सर्व उपदेशाला अर्थातच तरुण पिढी खास वानरी शैलीत पाठमोऱ्याने वाकून नमस्कार करून दाखवते. प्रश्न उपस्थित करून व त्यावरच्या साधकबाधक, कोरड्या, कर्कश ऊहापोहाची गंमत दाखवून हाही सर्ग संपतो .
Comments
अमुर्त
अरुण कोलटकर पचायला जड आहेत. सोप्या भाषेत रसग्रहण केल्यामुळे वाचल तरी. आपल्या चिकाटीमुळे यातील सौंदर्य आम्हाला पहाता तरी आले.
ही कल्पना जाम आवडली. नाटकात नटाने राजा होण व नंतर परत तो सर्वसामान्य आयुष्यातला माणुस होण. बैलपोळ्याला बैलाला एकदम देवत्व बहाल केल्यावर दुसर्या दिवशी परत नांगराला जुंपताना त्याला काय वाटत असेल् असे बरेच दिवस माझ्या मनात यायचं.
आता वरील दृष्टांतात जर वानराने परत दुसर्या तळ्यात बुडीच नाही मारली तर?
प्रकाश घाटपांडे
उत्तम
उत्तम सुरुवात. वाचतो आहे, पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच.
उत्तम सुरुवात. वाचतो आहे, पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
असेच. पहिला भाग मस्त जमून आला आहे.
(पण सध्या मी अमरावतीत आहे.)
असेच
असेच म्हणतो.
मीदेखील
सहमत आहे.
(काही ठिकाणी शब्द दोनदा उमटले आहेत वा दोन शब्द जोडले गेले आहेत यामुळे किंचित रसभंग होतो.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हेच म्हणतो
सहमत
प्रमोद
रसग्रहण आवडले
कोलटकरांच्या कवितेचे रसग्रहण आवडले. (पुढचे भाग लवकर यावेत.)
कवितेबद्दल आकर्षण वाटते.
ही कविता कोणत्या पुस्तकात आहे? जालावर उपलब्ध आहे का?
द्रोण
द्रोण याच नावाचं पुस्तक आहे. एकच दीर्घकविता असलेलं. जालावर उपलब्ध आहे की नाही हे माहीत नाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
आणखी
आणखी वाचायला आवडेल.
(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !