स्पेस स्टेशनवरील जीवन!

स्पेस स्टेशनवरील जीवन!

आपल्याला यानंतर आपले संपूर्ण जीवन एखाद्या बंदिस्त जागेत वा बंदिस्त अशा एखाद्या सदनिकेत काढावे लागणार आहे अशी कल्पना करा. आपल्याला तेथून बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येणार नाही, फोन नाही, मोबाइल नाही, टीव्ही नाही, पुस्तकं नाहीत, इंटरनेटसुद्धा नाही. एकमेकाशी चर्चा नाही.... मुळात बाहेर एखादं दुसरं जग आहे वा असू शकते याची कल्पनाही नाही. आपण स्वत:च ठरवलेल्या चाकोरीतून आयुष्य ढकलत रहायचे व जीवनाचा अंत होण्याची वाट पहात रहायचे. मरेस्तोपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्यांचे तुरुंगातील आयुष्य कदाचित असे असू शकेल. (परंतु आजकाल तुरुंगातही सर्व संपर्क सुविधा पुरविल्या जातात म्हणे!) सुनीता विलियम्स जेव्हा स्पेस स्टेशनवर अडकून पडली होती तेव्हा तिची मनस्थिती कशी झाली असेल, तिच्या मनात कुठले विचार आले असतील, तिला कसला अनुभव आला असेल याची कल्पना न केलेली बरी. तिच्याजवळ संपर्क साधनं होती, उच्च तंत्रज्ञानाची साथ होती, व तिच्यामागे उधो उधो करणारा जनसमुदाय होता. म्हणूनच कदाचित अशा अनुभवांचे टोक तिला गाठता आला नसेल.
आपल्याला आता अशाच दोन स्पेस स्टेशनवर प्रयोग करायचे आहेत. या स्पेस स्टेशनवर पुढील किमान ८-१० पिढ्या राहणार आहेत. यासाठीच्या सर्व सुविधा या स्टेशनवर आहेत. स्पेस स्टेशन ’अ’ च्या रचनेत काही किरकोळ बदल करून त्यात आकाशी निळा रंगाचा मागमूस नसेल याची काळजी घेतली आहे. दुसरे स्पेस स्टेशन ’ब ’ मध्ये निळ्या रंगांच्या सर्व छटांची हकालपट्टी केली आहे. निळ्या रंगाचे डोळे असणार्‍यांनासुद्धा या स्पेस स्टेशनवर येण्यास मज्जाव आहे. कदाचित त्यांच्यातील निळ्या रंगाच्या डोळ्याला कारणीभूत ठरणा जनुकांचा अडथळा येऊन आपला प्रयोग बिघडेल. येथे केलेल्या प्रकाश योजनेमुळे या स्टेशनवर शरीरातील शिरा (veins)सुद्धा निळ्या रंगाचे न वाटता काळे वाटू लागतील.
दोन चार पिढ्या या स्पेस स्टेशनवर राहिल्यानंतर पाचव्या वा सहाव्या पिढीतल्यांना ’अ’ व ’ब ’ स्पेस स्टेशनबर अनुक्रमे आकाशी निळा वा निळा रंग म्हणजे नेमके काय याची अजिबात कल्पना येणार नाही. स्पेस स्टेशन ’अ’ मधील सातव्या-आठव्या पिढीतल्यांना आकाशी निळा रंग वगळून निळ्या रंगाच्या इतर सर्व छटा दाखवत यात कुठली छटा नाही असा प्रश्न विचारल्यास त्यांना काहीही सांगता येणार नाही. त्यानी कितीही कल्पना शक्ती लढवली तरी अपेक्षित उत्तर कधी मिळणार नाही. आकाशी निळा रंग त्यांच्या दृष्टीपटलावर उमटणार नाही. आकाशी निळ्या रंगाची एखादी वस्तू दाखवली तरी त्यांच्या आकलनात तसूभरही फरक पडणार नाही.
तशाच प्रकारे स्पेस स्टेशन ’ब ’ मधील तरुण - तरुणींना पिवळ्या रंगात कुठला रंग मिसळल्यास हिरव्या रंगा़च्या छटा मिळतात असे विचारल्यास त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही. प्रत्यक्षात निळा रंग दाखवूनही त्यांना काहीही अर्थबोध होणार नाही.
स्पेस स्टेशन ’अ’ व ’ब ’ वर वाढलेल्यांच्या जाणीवेतील हा उणेपणा आपल्याला नक्कीच बुचकळ्यात टाकणारा आहे, एवढे मात्र खरे!

Source: An Essay Concerning Human Understanding - David Hume (1748)

ज्ञानप्राप्तीमध्ये अनुभवाला खरोखर महत्व आहे का? हा प्रश्न गेली अनेक वर्ष विचारला जात आहे. ग्रीक तत्वज्ञ प्लेटोलासुद्धा आपण जे काही शिकत असतो ते सर्व आपल्याला अगोदरच माहित असते, असे वाटत होते. आपल्याच कालखंडातील नोअम चॉम्स्की या भाषातज्ञाच्या मते आपण भाषा नव्याने शिकत नसून फक्त शब्दांचा संग्रह वाढवत असतो. भाषेचे व्याकरण, वाक्यरचना इत्यादी बारकावे, अर्थपूर्ण बोलण्याची खुबी या उपजतच आपल्याकडे असतात. सतराव्या शतकातील जॉन लॉक या तत्वज्ञाला मात्र उपजत वा जन्मत: असे काही नसते - आपण कोरी पाटी घेवूनच जन्माला येतो व नंतर हळू हळू सर्व काही शिकत शिकत आपल्या ज्ञानात भर घालतो, असे वाटत होते. नेचर की नर्चर - जनुक की परिस्थिती - हा वाद अजूनही मिटला नाही ( व मिटण्याचे चिन्हही दिसत नाही!).
काही कल्पना आपल्या अनुभवकक्षाच्या पलिकडच्या असतात, हे नाकारण्यात तथ्य नाही. केवळ अनुभवाच्या भांडवलाच्या जोरावर कल्पनांची भरारी केली जात असल्यास जगात कुणालाही नवीन शोध सुचले नसते. लिओनार्दो दा विंचीला हेलिकॉप्टरची कल्पना सुचली नसती. नेल कटरपासून स्पेस शटलपर्यंतच्या विविध तेत्रज्ञानाच्या इतिहासाला मानवाच्या डोक्यातील सुपीक कल्पनांनाच श्रेय द्यावे लागेल. एक मात्र खरे की ज्याला आपण अगदी नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणत असतो तिचा जन्मसुद्धा दोन - चार कल्पनांच्या सरमिसळीतूनच होत असतो. त्यांचे मूळ कुठल्यातरी अनुभवाचेच अपत्य असते. वेगवेगळ्या कल्पनांची जुळणी करत सर्वस्वी वेगळ्या प्रकारच्या कल्पनेला जन्म देणे हेसुद्धा अत्यंत सर्जनशील व्यक्तीनाच जमते; ते येरा गबाळाचे काम नाही. तरीसुद्धा आपल्या अनुभवाच्या पलिकडच्या गोष्टींची आपण कशी काय कल्पना करू शकतो याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. (ईश्वर ही संकल्पनासुद्धा कदाचित याच सदरात मोडत असावी!)
आपल्यासारख्या प्राण्यांकडे पाच ज्ञानेंद्रिय आहेत. या अफाट विश्वात पाचापेक्षा जास्त ज्ञानेंद्रिय असलेले प्राणी नाहीतच असे खात्रीपूर्वक सांगता येईल का? आपल्या अनुभवांना न जमणार्‍या गोष्टींची पाचापेक्षा जास्त ज्ञानेंद्रिय असलेले प्राणी अनुभवत असावेत. काही प्राण्यांचे ज्ञानेंद्रिय मानवी ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा ओलांडल्या असतील. कदाचित आपण कल्पनाही न करू शकलेल्या रंगछटा त्या बघत असतील. ध्वनी ऐकत असतील. आपल्या डोळ्यांना दिसणार्‍या वर्णपटलाला काही मर्यादा आहेत. संगणकावरील 256 वर्णांच्याबाबतीत अजूनही आपल्या मनात शंका आहेत. तुलनेने त्या प्राण्यांची पोच आपल्यापेक्षा वेगळी असू शकेल.
स्पेस स्टेशन ’अ ’ वरील प्रयोगामधून आपल्याला काही गोष्टी शिकता येण्यासारखे आहेत. आकाशी निळ्या रंगाचे ज्ञान नसलेल्यांनासुद्धा थोड्याशा विचारानंतर कल्पनेला ताण देऊन असा एखादा रंग असू शकेल याची जाणीव होण्याची शक्यता आहे. गडद निळा वा फिकट निळा यांच्यामधील छटांची कल्पना करणे तितकेसे जड जाणार नाही. अनुभवातून ज्ञान असे याला आपण कदाचित म्हणू शकतो. मानवी देहाचीच अतिशयोक्ती करत देव, देवदूत, पर्‍या, गंधर्व, किन्नर, राक्षस, दैत्य, भूत, पिशाच्च, इ.इ. कल्पना आपण नेहमीच लढवत असतोच की. आपल्यापैकी प्रत्यक्षपणे कुणीही आपल्या डोळ्यांनी त्यांना कधीच पाहिले नसले तरी ’मनातल्या डोळ्यांनी’ बघून आपण नेहमीच पहात आल्यासारखे त्यांचे हुबेहूब वर्णन करतच असतो.
या उलट स्पेस स्टेशन ’ब ’ मधील व्यक्तींना निळ्या रंगाची कल्पना करणे तुलनेने जड जाईल. आपल्यालाच आपल्या लहानपणी पिवळ्या रंगात निळा रंग मिसळल्यास वेगळा रंग होतो याचेच आश्चर्य वाटले होते. एका रंगामध्ये दुसरा रंग मिसळल्यास भलताच कुठला तरी रंग तयार होतो हे आपले बाल मन स्वीकारायला तयार नव्हते. कदाचित अशा अनुभवांच्या धक्क्यातून सावरत सावरतच, शिकत शिकतच अशा हजारो गोष्टींचा आपण स्वीकार करू लागलो. Entropy, quantum physics, black hole इ.इ. संकल्पना स्वीकारणे आता जड जात नाही. अनुभवातून शिकणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे.
निळ्या रंगाचा मागमूसही नसलेल्या स्पेस स्टेशनवर अपवादाने का होईना, कुणाला तरी निळ्या रंगाची कल्पना (कधी तरी!) सुचू शकेल. खरोखरच हे मान्य असल्यास आपल्याला अजून काही प्रश्नांचा शोध घ्यावा लागेल.
आपल्या जनुकांमध्येच हार्ड वायर केल्यासारखे निळ्या रंगाची माहिती साठवली असेल का?
ज्या दृष्य रंगपटलांचा अनुभव आपण घेत असतो, ते सीमित असले तरी आपली कल्पना भरारी अशा अनुभवांच्या पलिकडे जावू शकते का?
अनुभवातून मिळत गेलेल्या ज्ञानांप्रमाणे आपल्या जनुकात बदल होत जातील का?

Comments

विचारप्रवर्तक प्राचीन प्रयोग

हा विचारप्रवर्तक आणि प्राचीन कल्पनाप्रयोग आहे. लेख आवडला.

प्लेटोने स्पेशस्टेशन ऐवजी "अंधार्‍या तळघरातील कैदी" असा प्रयोग सांगितलेला आहे.

रंग-आंधळेपणाबद्दल प्रयोग मात्र आजही आपल्याला करता येतात. हिरवा-लाल रंग स्पष्ट ओळखू येत नाही असे लोक बरेच असतात. (माझ्या कुटुंबातही आहेत.) रंगांबद्दल त्यांची जाणीव, वगैरे विषयांवर प्रयोगशाळांतली निरीक्षणेही झालेली आहेत.

परंतु अशी व्यक्ती आपण खुद्द असल्यास, किंवा अशी व्यक्ती ओळखीची असल्यास संवाद जरूर साधावा. कल्पनाप्रयोगाऐवजी अनुभव-प्रयोग होईल! म्हणजे काय? लेखात म्हटले आहे :

आकाशी निळ्या रंगाचे ज्ञान नसलेल्यांनासुद्धा थोड्याशा विचारानंतर कल्पनेला ताण देऊन असा एखादा रंग असू शकेल याची जाणीव होण्याची शक्यता आहे. गडद निळा वा फिकट निळा यांच्यामधील छटांची कल्पना करणे तितकेसे जड जाणार नाही.

अशा व्यक्तीच्या कल्पनांची कल्पना हा लेख वाचताना आपण करत आहोत, ते असेच नाही का?

पण हिरवा-लाल रंग न-समजणारा आपल्याला प्रत्यक्षात भेटला, किंवा आपण खुद्द तसे असू, तर कल्पनेची कल्पना करावी लागत नाहीत. उदाहरणार्थ "वाहातुक नियंत्रणाचे लाल-हिरवे दिवे बघताना तुमची काय कल्पना असते? तुम्हाला दिव्यांचा संकेत कसा कळतो? रंगांधळे-नसलेल्या लोकांच्या लोकांच्या संवेदनांबद्दल तुमचे काय अनुमान असते?" असे प्रश्न मी या नातेवाइकांना आणि मित्रांना विचारलेले आहेत.

येथे "द माइंड्स आय" पुसतकातले "व्हॉट इज इट लाइक टु बी ए बॅट" प्रकरणाचा दुवा बघावा. वाघळाला "ध्वनिपडसाद (एकोलोकेशन)" हे ज्ञानेंद्रिय असते, आपल्याला मात्र नसते. मग आपण त्याबद्दल ज्ञान कसे मिळवतो, कसे साठवतो?

रंगांबद्दल बरीचशी माहिती जनुकांमध्ये हार्डवायर असते, हे वर मी सांगितलेल्या रंगांधळेपणाच्या उदाहरणात आहेच.

पुनश्च : विचारप्रवर्तक लेख आवडला.

विचारप्रवर्तक

विचारप्रवर्तक लेख आवडला.

हेच म्हणतो.

माझे जनुक उत्क्रांती शरीररचना वगैरे विषयातील अज्ञान अगाध आहे. त्यामुळे माझे प्रश्न सामान्य पातळीवरचे असतील तर आधीच माफ करा.

नेचर की नर्चर - जनुक की परिस्थिती - हा वाद अजूनही मिटला नाही ( व मिटण्याचे चिन्हही दिसत नाही!).

मला नेचर की नर्चर (हे पुस्तक मी बघितलेपण नाही) जनुक की परिस्थिती हे वाद का आहेत? नेचर आणि नर्चर किंवा जनुक आणि परिस्थिती असे संयोजन का मानले जात नाही?

ज्या दृष्य रंगपटलांचा अनुभव आपण घेत असतो, ते सीमित असले तरी आपली कल्पना भरारी अशा अनुभवांच्या पलिकडे जावू शकते का?

आता अनुभवविश्वाबद्दल.
आज आपण अनेक उपकरणे अशी बनवली आहेत की ज्यात पंचेंद्रियांना न जाणवणारे टिपले जाते. (हे अनुमान आहे असे कोणी म्हटल्यास मी प्रतिवाद करणार नाही.)
कित्येक प्राण्यांना माणसापेक्षा जास्त अनुभवता येते हे आपण जाणतो. जसे वटवाघळाचे अल्ट्रा सॉनिक रिसेप्शन, कुत्र्याचे वास ज्ञान घेणे, कीटकांचे सूक्ष्मावलोकन, पक्षांची दूर दृष्टी.
यातील कित्येकांची कल्पना (उदा. सोनोग्राफी) आपण केली व त्याची उपकरणे पण बनवली. 'तेंव्हा कल्पनांची भरारी अशा अनुभवांच्या पलिकडे जावू शकते का?' याचे प्रयोजन काय. हे तर घडलेलेच आहे.

अर्थात लेखकानेही वरती तसेच म्हटले आहे. काही कल्पना आपल्या अनुभवकक्षाच्या पलिकडच्या असतात, हे नाकारण्यात तथ्य नाही.

अनुभवातून मिळत गेलेल्या ज्ञानांप्रमाणे आपल्या जनुकात बदल होत जातील का?

हा प्रश्न मला अनेकदा पडतो. या चर्चेतून त्यावर प्रकाश पडेल असे मला वाटते.

माझा असा एक बाळबोध समज आहे की पुढच्या पिढीत अपघाताने बदल होतात आणि जो बदल जीवन संघर्षात वरचढ॑ ठरतो त्यांची पिढी उरते.

या समजातून तरी अनुभवातील मिळत गेलेल्या ज्ञानाचा जनुकावर (वरील समजातील अपघात) बदल होणे नाही. पण अनेक चर्चांद्वारे मी असे वाचतो की माववाचा मेंदू तो जास्त वापर करत असल्याने मोठा झाला. म्हणजे भरपूर व्यायाम करून शरीर सौष्ठव मिळवलेल्यांची पुढची पिढी आपसूक सुदृढ होते. हे खरे नसावे असे वाटते. पण अनेक अधिकारी जनांकडून मी हे ऐकले आहे, कि ज्यांना उलटून प्रश्न करण्याची माझी प्राज्ञा नव्हती. तर माझा बाळबोध समज चुकीचा आहे हे मी धरू का?

प्रमोद

दिसणे आणि ओळखता येणे

मी जनुकांचा अभ्यास केलेला नाही, पण माझ्या सामान्य निरीक्षणावरून दिसणे आणि ओळखणे या वेगळ्या गोष्टी आहेतअसे मला वाटते. कोणत्याही ओपेक वस्तूवरून परावर्तित होऊन निघालेले प्रकाशकिरण डोळ्यातील भिंगामधून कॉर्नियावर जाऊन पोचताच त्याची संवेदना मेंदूला मिळते. त्यामधून आपल्याला त्या वस्तूचा रंग व आकार याचे ज्ञान होते. असेच ज्ञान पूर्वीच्या अनुभवातून स्मरणात साठवलेले असेल तर आपण ती वस्तू त्यानुसार ओळखतो, नसेल तर त्याची नव्याने नोंद करतो. निळा रंग किंवा त्याच्या छटा याबद्दल असेच व्हायला हवे. त्या लहरी व्हिज्युअल स्पेक्ट्रममध्ये येत असतील तर पूर्वी कधीही पाहिलेल्या नसल्या तरीही दिसायला हव्यातच, ओळखता येणार नाहीत.
एकदा मी एका मित्राच्या घरी गेलो असतांना त्याचा ३-४ वर्षे वयाचा मुलगा टेबलावरील प्लेबॉयचा अंक चाळत बसलेला दिसला. मी सहज त्याला विचरले, "तुला यात काय दिसते आहे?" तो म्हणाला, 'या सगळ्या आँट्या अंघोळ करायच्या तयारीत आहेत." त्याच्या अनुभवविश्वात नग्नतेचा संबंध आंघोळ करण्याशीच होता.

 
^ वर