रत्ने, मणी, खडे - एक संकलन - भाग दोन

या आधीच्या संकलनात उद्दिष्ट लिहीलेच आहे... अशा रत्नांचे/खड्यांचे उल्लेख वरील उल्लेखाप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये आले असावे. म्हणून असे मनात आले की रत्न/खडे यांच्याविषयी असलेल्या रोचक माहितीचे थोडेफार संकलन करून मराठी विकीवर चढवावे. मला जमेल तशी येथे भर घालत राहीन, पण वाचकांनीही येथे प्रतिसादांमधून असलेली माहिती दिल्यास अधिक उत्तम होईल. धन्यवाद... आधीचा संदर्भः http://mr.upakram.org/node/2516

येथे सध्या मोती, पुष्कराज आणि राजावर्त (lapis lazuli) यावरून माहिती यावी असे वाटते आहे. मोत्यांविषयी खालील काही माहिती मी आधीच विकिवर टाकली आहे. पण काही सूचना/ चुका असल्यास सांगाव्या; तसेच भाषिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ किंवा म्हणी, हे या संकलनातून मिळावे अशी अपेक्षा आहे.
------------------------------------------------------

इराकी "बसरा" मोत्यास पूर्वी भारतातील बाजारपेठेत खूप मागणी असे. हा मोती पिवळट आणि चमकदार असतो असे सांगितले जाते. अलिकडे व्हेनेझुएला येथील मोत्यांना चांगली मागणी आहे. व्हेनेझुएला येथील मार्गेरिटा बेट हे मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे मोती सप्टेंबर ते मे या महिन्यांमध्ये काढतात, मोत्यांच्या एका शिंपल्यात एकाहून अधिक मोती असू शकतात परंतु गोलाकार असा मोती एकाहून अधिक आढळत नाही असे काही जुन्या नोंदी वरून समजते. त्याचप्रमाणे चायनीज किंवा कल्चर्ड मोती यांनादेखील बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. कल्चर्ड मोती तयार करण्याची पद्धत जपानमध्ये सुरू झाली असे सांगितले जाते. ह्या पद्धतीत काही विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या जीवांचे तंतू टाकले जातात आणि यामुळे शिंपल्यातील प्राणी या तंतूंभोवती गोलाकार आवरण तयार करतो असे सांगितले जाते. या पद्धतीवर मानवी नियंत्रण करता असल्याने मोठ्या प्रमाणावर मोत्यांचे उत्पादन करता येते. कृत्रिम मोती हे काच, प्लास्टिक किंवा इतर द्रव्यांपासून बनवले जातात.

काही सांस्कृतिक/भाषिक संदर्भ: "असतील स्वाती तर पडतील मोती" ( अशी मराठी म्हण आहे. अर्थ साधारण असा की स्वाती नक्षत्र हे शुभ समजले जाते. या नक्षत्रावर पाऊस पडला की शिंपल्यात मोतीही तयार होतात/होतील असा काही अर्थ आहे. अवांतर - याउलट पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा अशी दुर्दैवी म्हण असल्याने लहानपणी मला माझ्या नावाचे अगदी वाईट वाटत असे :(
संदर्भः

http://query.nytimes.com/mem/archive-free/pdf?_r=1&res=9501E5DC1339EF3AB...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=35406840
मोत्यांवरील एक इंग्रजी पुस्तक the book of the pearl by G. Kunz http://www.farlang.com/gemstones/kunz_book_of_the_pearl/page_001

----------------------------------
राजावर्त (lapis lazuli) -
अजंठ्यातील भित्तीचित्रांमध्ये वापरलेला निळा आणि हिरवा रंग या राजावर्ताच्या कुटापासून बनवलेला आहे असे समजते. हा दगड प्राचीन अफगाणिस्तानमध्ये मिळत असे आणि बडाखशान हा अफगाणिस्तानाचा उत्तरेकडील प्रांत या दगडांच्या खाणी म्हणून प्रसिद्ध होता. हा दगड काढण्यासाठी ज्या खाणी असत त्या खोल दर्‍यांमध्ये असल्याने केवळ उन्हाळ्यातील बर्फ वितळल्यानंतर ते नवीन बर्फ पडण्यापूर्वी अशा तीन महिन्यांत हा दगड काढावा लागे. याखेरीज हा खडा दागिन्यात वापरण्यासाठी तो मूळ दगडाच्या लादीपासूनआअणि इतर खनिजद्रव्यांपासून वेगळा करण्यासाठी श्रम घ्यावे लागत, असे काम जेथे होत असे अशापैकी शहर-ए- सोख्ता म्हणून अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेवरील एक शहर प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील मेहरगढ, जालिपूर आणि रेहमान डेहरी येथे राजावर्ताचे घडवलेले मणी, तसेच दागिन्यात न वापरता येण्याजोगे दगडही सापडले आहेत.
संदर्भः
http://asi.nic.in/images/wh_ajanta/pages/021.html
The Afghan connection: Indo-Afghan relations in the Pre-Buddhist Era P. V. Pathak
Ancient mesopotamian materials and industries: the archaeological evidence By Peter Roger Stuart Moorey

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

मोती हे सिंहलद्वीपात (श्रीलंका) आणि अरबी आखाताच्या प्रदेशात पूर्वी मिळत, असे वाचले आहे.

लाप्स लाझुलि बद्दल एवढेच माहीत होते, की पूर्वीच्या काळी टिकाऊ निळा रंग असा हा एकच उपलब्ध असे. अजिंठ्यातील भित्तिचित्रांबाबत चित्रा यांनी लिहिलेलेच आहे. "राजावर्त" हे नाव लक्षात ठेवायला पाहिजे. (व्युत्पत्ती सहज ओळखू येत नाही, शोधून बघितली पाहिजे.)

"मोत्यांसारखी अक्षरे" हा वाक्प्रचार आठवतो. मात्र मराठीमधल्या सुवाच्य अक्षरापेक्षा कन्नडातल्या किंवा तेलुगुमधल्या सुवाच्य अक्षरांना मोत्यांची उपमा अधिक समर्पक वाटते :-)

राजावर्त

राजावर्त बहुतेक हिंदी भाषेत अधिक प्रचलित असावे.
लाजवर्द असे एक दुसरे नाव वाचक्नवी यांनी सुचवले होते.
हिंदीमधील एक पुस्तकाचा दुवा दिसला - "पटोलिका" (पटोळा?) या वस्त्राचा (?) स्त्रियांच्या आकर्षक दिसण्यासाठी उपयोग? अजंठ्यातील भित्तीचित्रांमध्ये असे आडवे पट्टे असलेली वस्त्रे नेसलेल्या स्त्रियांची चित्रे दिसतात. यावर हे "श्यामवर्णक" (राजावर्त?) वापरले जात असावे असे दिसते.

कन्नडातल्या किंवा तेलुगुमधल्या सुवाच्य अक्षरांना मोत्यांची उपमा अधिक समर्पक वाटते
खरे आहे, असतात खरी गोल अक्षरे.

चिकाटी

माहिती रोचक आहे. व्हेनेझुएलाची मोती विषयक माहिती नव्हती.
(किंवा होती ती पॅपिलॉन या कादंबरीमुळे जी काही होती ती.)

खरे आणि खोटे मोती कसे ओळखले जातात, या विषयी उत्सुकता आहे.

पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांच्या विषयी खुप दिवसांनी चांगले काही तरी वाचल्याने बरे वाटले.

आपली चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.
आपल्या लिखाणातले ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ आवडतात.
पुढील भागाची प्रतिक्षा आहेच!
आपला
गुंडोपंत

चिकाटी?

नाही हो, चिकाटी नाही. मला हे असे संदर्भ गोळा करायला आवडते. नाहीतर नुसते "वा, वा, चित्रातले रंग काय छान आहेत", एवढेच म्हणून कसे चालेल? माहिती गोळा केली तर बघताना वेगळे काहीतरी दिसते.

खरे मोती कसे ओळखायचे?

मी मधे मीना प्रभुंच चिनी माती हे पुस्तक वाचल होत. त्यात खरे मोती ओळखण्याबद्दल एक संदर्भ आला आहे.

मोती एका फरशीच्या तुकडयावर खडूसारखे घासले तर खडूसारखीच पांढरट पूड(चूर्ण) बाहेर पडते. खर्‍या मोत्यांच अस चूर्ण पडतं, आणि तरीही मोत्याला चरे न पडता तो तसाच चमकदार आणि गुळगुळीत रहातो म्हणे. नकली मोत्यांवर हा प्रयोग केल्यास त्यांना चरे पडतात आणि वरचं प्लास्टिक निघून आतली काच दिसते.
(चिनमधे मोत्यांचे कारखाने आहेत तिथे त्यांना हा खरे मोती ओळखण्याचा प्रयोग करून दाखवल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.)

आणखी एक

खरे मोती कसे ओळखायचे?

चांगली माहिती आहे. आणखी एक नुस्खा आहे. होमीपदीची गोळी म्हणून मोती गिळून बघावी. बरे वाटले तर समजावे मोती खरे नव्हते. आता नंतर मोती कसे गोळा करावे ह्याचे उत्तर मात्र नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

धन्यवाद, केशवी.

केशवी थँक्स...

शंभर रुपयात वरीजनल मोती घेतला होता. मोती घासून पाहतो. :)
च्यायला, वरीजनल वरीजनल म्हणून ओळखीचा व्यापारी 'मोती'च्या नावाखाली काय विकतो त्याची एकदा मुलाखत घ्यावी लागते.

बाय द वे,वरीजनल मोती केवढ्याला येतो हो ?

-दिलीप बिरुटे

कशाला?!

मोती घासून पाहतो. :)

कशाला ते? चांगला, खराच मोती असला तर खराब व्हायचा :)

मोती

मराठीत किंवा मुलांच्या पुस्तकांत (आता नसेल पण पूर्वी नक्कीच होते) कुत्र्याचे नाव सर्रास "मोती" का बरे असते असा प्रश्न मला पडत असे. ;-)

मोत्यांची शेती किंवा कल्चर्ड पर्ल फार्मिंगचा उद्योग आताशा चांगला फोफावला आहे.

मोत्यांच्या एका शिंपल्यात एकाहून अधिक मोती असू शकतात परंतु गोलाकार असा मोती एकाहून अधिक आढळत नाही असे काही जुन्या नोंदी वरून समजते.

माझ्या घरात काही खरे मोती होते/ आहेत. त्यांचा आकार उकडीच्या तांदळाच्या दाण्याप्रमाणे आहे.

हो, तेही

बहुदा राईस पर्ल्स म्हणूनच ओळखले जात असावेत.

वाघनखे

रत्न, खडे, मणी वगैरेंपैकी नसल्याने हा प्रतिसाद चर्चेशी अवांतर होतो अशी शंका वाटते.

परंतु वाघनखांना चांगल्या रत्नांचीच किंमत आहे. पूर्वी वाघांच्या शिकारी होत (बंदी नसल्याने *) तेव्हा वाघनखे दागिन्यांमधून वापरण्याची पद्धत होती. वाघनखे अंगावर बाळगणे हे शौर्याचे प्रतिक मानले जाई. विशेषतः, रत्नेजडित वाघनखाचे पेंडंट पुरुषांनी गळ्यात घालण्याची पद्धत होती. बविक्टोरियन काळात वाघनखांचे दागिने वापरण्याची पद्धत इंग्लंडातही प्रसिद्ध झाली होती. वाघनखांचे नेमके गुणधर्म (जसे टिकाऊपणा, काठिण्य वगैरे) मला माहित नाहीत [कोणाला माहित असल्यास अवश्य माहिती द्यावी.] परंतु पिवळसर, मोतिया रंगातल्या या नखांना एक विलक्षण चमक असते. नेटावर शोध घेतला असता एके ठिकाणी वाघनखांचा हार, कानातले आणि ब्रूच यांची किंमत सुमारे $१०,००० केल्याचे वाचले.

* दुर्दैवाने, आताही होत असाव्यात :-(.

हे माहिती नव्हते

हे माहिती नव्हते. वाघनखे शिवाजीमहाराजांची प्रसिद्ध आहेतच. याला नवीन एक वेगळा विकिवर लेख सुरू करते.

अवांतर -सध्या वाचक्नवी कोठे आहेत?

माझ्याकडे चेन आहे

वाघनखे नावाचा लेख विकीवर आहे. त्यात शिवाजी महाराजांच्या वाघनखांविषयी लिहिले आहे. खरे म्हणजे, ती वाघनखे खरी नाहीत. तो बिचवा असून आणि त्याला धातूच्या नख्या असाव्या असे वाटते. परंतु त्याच लेखात ही भरती करता येईल.

माझ्याकडे वाघनखाची चेन आहे.(पूर्वजांनी वाघ मारले होते :-)) मी चांगलासा फोटो काढून लावते.

वाघनखे

अशीच एक वाघनखांचा "पुरुषी" हार वडिलोपार्जित डब्यात बघितला होता. पिवळट तुकतुकीत, अशीच दोन नखे आठवतात.

अस्वलाच्या केसांचे तसेच नखाचे ताईत अस्वल नाचवणारे डोंबारी विकत, ते लहानपणी बघितलेले आहे. पण ते ताईत साध्या पत्र्याचे होते.

सस्तन प्राण्यांची नखे केरॅटिन प्रथिनाची असतात, त्यामुळे काळजी न घेतल्यास बुरसत असावीत असे वाटते. कदाचित आभूषणामधली नखे पॉलिश करून त्यावर पातळ "लॅकर" चढवत असले पाहिजेत. (हस्तिदंताला असे काही करत नाहीत, कारण दात हे खूप टिकाऊ असतात.) कोणाला बरे विचारता येईल?

"वाघनखे" नावाचे शस्त्र (चित्रा यांच्या प्रतिसादातले) मात्र पोलादी असते. तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन गोल या शस्त्रात असत, आणि त्याला नखे. राजा केळकर संग्रहालयात बघितले होते. त्यात रत्ने नव्हती - पण राजाच्या शस्त्रांमध्ये जडजवाहीर असतीलही.

वाघनखे पॉलिश

आभूषणामधली नखे पॉलिश करून त्यावर पातळ "लॅकर" चढवत असले पाहिजेत. (हस्तिदंताला असे काही करत नाहीत, कारण दात हे खूप टिकाऊ असतात.) कोणाला बरे विचारता येईल?

वाघनखांना पॉलिश केले जाते का याची माहिती नाही पण कल्पना रोचक वाटली. माझ्या घरात गेली ४०+ वर्षे तरी वाघनखे होती आणि ती बुरसली नाहीत. जशी माझ्या लहानपणी दिसत तशीच (ढोबळमानाने) आजही दिसतात. परंतु, याचे कारण ती वापरात नव्हती आणि डबीत बंद होती हे असू शकते. काही महिन्यांपूर्वी ती सोनेजडीत केली. काल निरखून पाहिली असता नखावर चरे दिसले (ते पूर्वीपासूनच होते का नाही हे सांगता येणार नाही कारण आधी निरखून पाहिले नव्हते.) परंतु, रंग आणि चमकेत फरक दिसला नाही.

गूगलला विचारले!

कोरडे ठेवले तर केराटिन दशके-शतके टिकते, अशी वर्णने वाचली.

(पाण्यात ठेवले, तर खराब होऊ शकते, हे आधी माहीत होते. पण बहुतेक लोक आभूषणांच्या बाबतीत असा निष्काळजीपणा करणार नाहीत.)

ही आभूषणे खूप टिकू शकतील तर.

 
^ वर