रत्ने, मणी, खडे - एक संकलन

अलिकडेच झालेल्या रामायण काळातील चर्चेमध्ये जनकाने सीतेच्या लग्नानंतर तिला सासरी जाताना दासी दिल्या असे वाचले. म्हणून अधिक शोध घेतला तेव्हा त्यात जनकाने लग्नानंतर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी (रामाला) सोने, चांदी, मोती आणि पोवळी (वैद्रुम - corals - आपण ज्याला पोवळी म्हणतो ते) दिली असे वाचले (वाल्मिकी रामायण -
बालकांड सर्ग ७४ -प्रमाणे). तसेच मनात प्रश्न आला की समुद्रापासून म्हटले तर दूरच असलेल्या जनकाच्या मिथिलेला पोवळी मिळत असतील का? असली तर जनकाने ती कोठून आणली असतील? याचे उत्तर विकीपीडीयावर मिळाले असे वाटते. इंग्रजी विकीपीडीयावर वाचले की साधारण ख्रिस्ती कालगणनेच्या आरंभीच्या काळात भारतात प्रवाळाला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली होती आणि त्यामुळे मध्यपूर्वेतील पोवळी भारतात विक्रीसाठी येऊ लागली होती. अशा रत्नांचे/खड्यांचे उल्लेख वरील उल्लेखाप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये आले असावे. म्हणून असे मनात आले की रत्न/खडे यांच्याविषयी असलेल्या रोचक माहितीचे थोडेफार संकलन करून मराठी विकीवर चढवावे. मला जमेल तशी येथे भर घालत राहीन, पण वाचकांनीही येथे प्रतिसादांमधून असलेली माहिती दिल्यास अधिक उत्तम होईल. धन्यवाद.
-------------------------------------

प्रवाळ - किंवा पोवळ्यांना जगभर दागिन्यांसाठी मागणी असते. भारतीय प्रचलित समजांमध्ये प्रवाळाचे मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी महत्त्व सांगितले जाते. पण ही समजूत प्राचीन नसून अलिकडच्या शतकांमधली असावी असा अंदाज आहे. दागिन्यांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ किंवा पोवळी ही साधारणपणे लाल रंगाची असतात. असे प्रवाळ मिळवण्यासाठी समुद्रात १०-३०० मीटर खोल जावे लागते असे म्हणतात. प्रवाळाचे दागिन्यांमध्ये वापरताना असलेले आकार आखीवरेखीव असले तरी मूळ प्रवाळ हे शाखायुक्त असते. प्रवाळाचा एक अर्थ शाखा - फांद्या असलेला असाही आहे असे दिसले. फांद्या असलेली पोवळी अशी दिसतात. दागिन्यांमध्ये वापर करण्यासाठी असे प्रवाळ पॉलिश करतात आणि त्याचे हवे त्या आकारात कापून तुकडे केले जातात. समुद्राच्या तळाशी असलेल्या दगडांवर अशा प्रवाळाची वाढ होते. आपण वापरतो ते प्रवाळ म्हणजे समुद्रात दगडांना चिकटून वाढणार्‍या सूक्ष्म समुद्री जीवांची मृत कॉलनी असते. इटलीमधील एका समुद्री गुहेतील चित्रफितीमध्ये असे समुद्रात खोलवर असलेले प्रवाळ आपण पाहू शकतो. असे उत्तम प्रवाळ मध्यपूर्वेतून भारतात येई असे समजते. अर्थात असे पोवळे काढणे जिकीरीचे काम असल्याने आणि सहज उपलब्ध नसल्याने रामायण-काळी त्याला महत्त्व प्राप्त झाले असावे. ज्याप्रमाणे बालकांडात रामाला जनकाने लग्नानंतर पोवळी भेट दिली त्याचप्रमाणे युद्धकांडात बिभिषणाने रावणाच्या अंतिम संस्कारांच्या वेळी पोवळी मागवून घेतली असाही उल्लेख आहे. या पोवळ्यांचे नंतर काय केले ह्याची माहिती मिळाली नाही. तसेच अजून एक सूक्ष्म फरक म्हणजे बालकांडात पोवळ्यांसाठी वैद्रुम असा शब्द वापरला आहे, आणि युद्धकांडात प्रवाळ असा शब्द आहे. यात काही फरक आहेत का यावरही प्रकाश पडल्यास उत्तम होईल.

Comments

फाटे

समुद्रापासून दूर असल्यामुळेच कदाचित प्रवाळ एवढे मौल्यवान झाले असेल.
द्रुम म्हणजे झाड, त्यामुळे वैद्रुम या शब्दाचाही संबंध फांद्यांशीच असेल का?
संस्कृतमध्ये ळ् हे व्यंजन नसते असे शाळेत शिकविले होते.

नक्कीच

समुद्रापासून दूर असल्यामुळेच कदाचित प्रवाळ एवढे मौल्यवान झाले असेल.
हे तर नक्कीच.

द्रुम म्हणजे झाड, त्यामुळे वैद्रुम या शब्दाचाही संबंध फांद्यांशीच असेल का?
खरेच की.
वै चा एक अर्थ इथे दिसतो आहे की to be deprived of /to become languid, exhausted. वैगुण्यप्रमाणे.


याचा अर्थ फांद्या कापून म्हणजे समुद्रात जे शाखायुक्त प्रवाळ मिळते त्यावर संस्करण करून जे दागिन्यांयोग्य बनवले जाते असा अर्थ होतो का? तसे असल्यास वैद्रुम आणि प्रवाळ यांच्यातील अर्थाचे ज्ञान व्हावे.


संस्कृतमध्ये ळ् हे व्यंजन नसते असे शाळेत शिकविले होते.

संस्कृतात नसते असे ऐकले आहे परंतु द्राविडी आणि इतर स्थानिक भाषांचे प्रभाव पडले असेही म्हटले आहे. कदाचित "ळ" अशा भाषांमधून आले असण्याची शक्यता असेल.

धन्यवाद.

प्रवाळ म्हणजे पालवी.

प्रवाळाचा एक अर्थ शाखा - फांद्या असलेला असाही आहे असे दिसले.

मोलिनर-मोलिनर-विल्यम्ज़ मध्ये प्रवाल(वि)चा शाखा-फांद्या असलेला असा जो अर्थ दिला आहे, तो धर्मसंग्रह या ग्रंथापुरता सीमित आहे; म्हणजे फक्त धर्मशास्त्रासाठी वापरता येईल असे ते विशेषण असावे.
प्रवाल(नाम)चे इतर अर्थ : पालवी, अंकुर, वीणेचा दांडा, वगैरे. हिंदीत प्रवाळाला मूंगा (मू वर चंद्रबिंदू काढायला पाहिजे, पण तसे टंकन इथे शक्य दिसत नाही आहे.) म्हणतात.
वीणादण्डः प्रवालः स्यात्‌ ।--अमरकोश १.७.७
विद्रुमः पुंसि प्रवालं पुन्नपुंसकम्‌ ।-- अमरकोश २.९.९३
प्रवालमङ्कुरेप्यsस्त्री ।--अमरकोश ३.३.२०५
--वाचक्‍नवी

प्रवाल

>>प्रवाळाचा एक अर्थ शाखा - फांद्या असलेला असाही आहे असे दिसले.
गीतेच्या १५व्या अध्यायात
अधश्चोर्ध्वम् प्रसृतास्तस्य शाखा: गुणप्रवृद्धा विषयप्रवाला: असे अश्वत्थ वृक्षाचे वर्णन आहे तेथे प्रवाला: असा शब्द शाखा या अर्थाने आला आहे. त्यात ळ नाही.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

नसावा.

तेथे प्रवाला: असा शब्द शाखा या अर्थाने आला आहे.

त्या ओळीत शाखा: हा शब्द अगोदरच आहे. त्यामुळे प्रवाला: चा अर्थ अंकुर असू शकतो. पूर्ण ओळीचा अर्थ असा असावा :
(सत्व, रज तम या प्रकृतीच्या तीन गुणांनी पोसलेल्या) गुणप्रवृद्धा (या संसाररूपी पिंपळवृक्षाच्या) तस्य शाखा अधः च ऊर्ध्वः च (वरखाली) प्रसृताः (पसरलेल्या आहेत) (त्यांना शब्द, रूप, गंध रस या विषय़ांचे)विषयप्रवालाः (धुमारे फुटले आहेत). --वाचक्‍नवी

विद्रुम - विचित्र द्रुम, त्यातून मिळवलेले ते वैद्रुम

विद्रुम - विचित्र द्रुम, (विचित्र झाड, विशेष अर्थ प्रवाळ) त्यातून मिळवलेले ते वैद्रुम.

वर चित्रा यांनी शब्दकोशाचा दुवा देलेलाच आहे. त्यातील पान १०२३ - वैद्रुम आणि पान ९५१? - विद्रुम, बघावे.

त्यापेक्षा इथेच बघा ना - (मुक्त दुवा)
पान १०२३ - वैद्रुम आणि पान ९५१ - विद्रुम

रामायणातील संस्कृतामध्ये "ळ" प्रचलित नाही. इथे (वाल्मिकिरामायण.नेट वर) टंकनदोष असावा.

प्रवाळानि !

युद्धकांडातली ती(६.१११.१०७) ओळ अशी आहे.:
माणिकमुक्ताप्रवाळानि निर्यापयति राक्षसः ।
वेदांप्रमाणे रामायणातही ळ आहे असे दिसते आहे. हे यापूर्वी माहीत नव्हते.--वाचक्‍नवी

किती श्लोक आहेत?

अन्य दुव्यावरतीच एका पाठ्यात ६.१११ मध्ये केवळ ३१ श्लोक दिसत आहेत, तर दुसर्‍या पाठ्यात ६.१११ मध्ये १२८ श्लोक दिसत आहेत.

ऋग्वेदातला "ळ" हा "ड"चे रूप होता. आगे मागे स्वर असल्यास ड्->ळ् . उदहरणार्थ : ईडे->ईळे (अ॒ग्निमी॑ळे... ऋ १.१.१) पालीमध्येही "ळ" असल्यास त्याचा संबंध मूर्धन्यांशीच होतो : धम्मपद ५.६१ : एकचरियं दळ्हं -> संस्कृत दृढम्

"प्रवाल-प्रवाळ" या ठिकाणचा "ळ" हा "ल"साठी पर्याय आहे. हा ल-ळ वर्णसंबंध फार अर्वाचीन - मराठी, तेलुगु वगैरे भाषांमध्ये ल-ळ संबंध दिसतो. कमल-कमळ वगैरे. मात्र ड-ळ संबंध अर्वाचीन भाषांमध्ये दिसत नाही. हिंदीमधे ड-ड़ संबंध दिसतो, खरा - पण ड़ हा ळ-पेक्षा थोडा वेगळा उच्चारतात.

श्लोकाच्या किंवा "प्रवाळ"पाठ्याच्या प्राचीनतेबाबत शंका वाटते.

गोंधळ/प्रश्न

युद्धकांडातील सर्ग १११ दोन्ही पाठात वेगळेच दिसत आहेत.

अनुज्ञातं तु रामेण तद्विमानमनुत्तमम् |
उत्पपात महामेघः श्वसनेनोद्धतो यथा || १|| अशी सुरूवात http://sanskritdocuments.org/mirrors/ramayana/valmiki.htm येथे दिसते आहे.

http://www.valmikiramayan.net/yuddha/sarga111/yuddha_111_frame.htm
येथे मंदोदरीच्या विलापाने सुरूवात होते आहे -
माझा पाहण्यात काही गोंधळ होतो आहे का?
रामायणाची अधिकृत प्रत कोणती समजली जाते?
तेव्हा आता कोणाकडे अशी रामायणाची प्रत असल्यास ती पाहून नक्की वरील श्लोक बाल आणि युद्धकांडात आहेत का हे सांगावे ही विनंती.
------------
बाकी प्रवाळ हे कोणीतरी नंतर घुसडून दिलेले असू शकते हे ठीक आहे. तसे असल्यास हा काळ बराच नंतरचा असू शकतो. :(
जरी अशा प्रक्षिप्त माहितीमुळे विश्वास कमी झाला तरी संकलन करीत राहण्यास हरकत नसावी. जर का रामायण महाभारताखेरीज इतर कुठच्याही ग्रंथांमध्ये/बौद्ध/जैन साहित्य अशांत असे उल्लेख आले असले तर तशी माहितीही द्यावी ही विनंती.
------------------------
धन्यवाद.

काही गोंधळ नाही.

पाहण्यात काही गोंधळ होत नाही आहे, आम्हालाही तसेच दिसते आहे.
रामायणाच्या संस्थळावर आलेला ळ, टंकनदोष असावा हे पटायला हरकत नाही. रामायणाची एक प्रत आमच्या गांवातल्या एका छोट्या ग्रंथालयात आहे, वेळ मिळाल्यास जाऊन पाहीन.
मागे एकदा,
अपि स्वर्णमयी लङ्‌का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

या श्लोकासाठी तिथे जायचा योग आला होता. श्लोक सापडला नाही. पुढे समजले की, हा श्लोक रामायणाच्या कुठल्यातरी अप्राप्त प्रतीमधला आहे. रामायणाच्या अधिकृत आणि प्रक्षिप्त अशा किती प्रती आहेत याचा एकदा मागोवा घ्यायला हवा.
--वाचक्‍नवी

ड-ळ अवांतर/योगायोग

योगायोगाने आजच एक मित्राशी याबद्दल बोलणे झाले. विषय : पंजाबी भाषेत ळ असतो किंवा नाही?

दलेर मेहंदीचे बल्ले बल्ले हे गाणे ऐकल्यावर माझी अशी कल्पना झाली होती की पंजाबीतही ळ असतो. मित्राचे म्हणणे तो ळ नसून ड आहे. याची नेटिव्हाकडून खात्री करून घेतली.

--
Знати један језик није довољно / Znati jedan jezik nije dovoljno / One language is never enough.

खरेच की

खरेच की. "अग्निमीळे पुरोहितम" प्रमाणे रामायणातही ळ आहे. पण याचा इतिहासाच्या दृष्टीने अर्थ काय असू शकतो?

असे संकलन अधिक लोकांच्या मदतीने करण्याचे कारणच हे आहे की प्रत्येकाला काहीतरी वेगळे दिसते आणि माहितीत अधिक भर पडते. धन्यवाद.

उत्तम

असे मनात आले की रत्न/खडे यांच्याविषयी असलेल्या रोचक माहितीचे थोडेफार संकलन करून मराठी विकीवर चढवावे.

हा विचार उत्तम आहे, आवडला!
दुवे देणे आवडले.

मात्र त्याच वेळी ऐतिहासिक संदर्भा सोबत,

  • प्रवाळाची रचना
  • प्रवाळाचे प्रकार
  • प्रजाती माहिती व नावे
  • प्रवाळ कसे वाढते
  • प्रवाळाची वैशिष्ट्ये
  • त्याचे रासायनिक गुणधर्म
  • नैसर्गिक इतिहास
  • प्रवाळाचे निसर्गचक्रातील महत्त्व
  • आधुनिक काळात असलेली स्थिती व धोके

प्रवाळ असा शोध दिला असता,
लोकसत्तावर अनेक लेख असल्याचे स्पष्ट झाले.
या लेखातील माहितीचे संकलनही करायला हरकत नाही शिवाय अधिक माहिती म्हणून त्यांचे दुवे देता येतीलच.

अशी सर्व माहिती पूर्ण होउन विकिवर मस्त लेख यावा हीच सदिच्छा!

आपला
गुंडोपंत

कल्पना आवडली

पण आधी साध्या रत्न-खड्यांपासून सुरूवात केलेली बरी. कोरल रीफवर इंग्रजी विकीपीडियावर खूप माहिती आहे आणि इतरही अनेक दुवे मिळतात. एक प्रश्न असा आहे, की जीवशास्त्रातील शब्दांचे कसे मराठीकरण करायचे.. उदा. polyps.

पण मोठा प्रकल्प म्हणून लक्षात घेण्यास हरकत नाही.

विश्वकोशात

विश्वकोशात संज्ञांची एक १३८ पानांची पुरवणी आहे.
ती जालावर 'कुठेतरी' पीडी एफ स्वरूपात उपलब्ध आहे.
यात तर्कतीर्थांनी व इतरांनी अतिशय मेहेनतीने अनेक शब्द दिले आहेत.

मराठी अभ्यासक्रमातील जीवशास्त्राच्या पुस्तकाचा यासाठी चांगलाच उपयोग होईल असे वाटते.
(इयत्ता ७वी ते १०वी)

बिरुटे सरही यासाठी काही पुस्तके नक्की सुचवू शकतील.

तसेच उपक्रमावर मराठीतून चपखल शब्द सुचवणारे, वाचक्नवी, धनंजय या सारखे अनेक सदस्य आहेत, ते नक्की मदत करतील.
मी मला शक्य त्या मदतीला तयार आहेच!

आपला
गुंडोपंत

जीवशास्त्राचे पुस्तक

जीवशास्त्राचे पुस्तक सध्या माझ्याकडे नाही :)
जोवर मोठे संकलन होत नाही तोवर सध्या लोकसत्तेतील लेखांचे दुवे हे थोड्या माहितीसह मराठी विकीवर ठेवता येऊ शकतील असे वाटते.

पॉलिप्स

पॉलिप्स नावाच्या रोगाला मराठीत मोड म्हणतात, आणि पॉलिप नावाच्या जीवजंतूंना बहुशुंडिका. पण हे शब्द कशाला हवेत? कोरलसाठी मराठी शब्द प्रवाळजीव. आणि प्रवाळांकरिता मध्यपूर्वेत जायला नको. मॉरिशसच्या समुद्रात प्रवाळ आहेत. जे प्रवासी तिथे जाऊन पाण्याखालची सफर करून येतात त्यांना दाखवतात.
ज्याअर्थी आपल्याकडे प्रवाळयुक्त गुलकंद किंवा च्यवनप्राश मिळत आलेला आहे, त्याअर्थी प्रवाळभस्म पुराणकाळापासून सहज उपलब्ध होत असले पाहिजे.
आयुर्वेदीय शब्दकोशांत प्रवा(बा)ल:/प्रवा(बा)लम्‌ आणि त्याच अर्थाचा विद्रुमः हा शब्द दिला आहे. वैद्रुम(विशेषण) म्हणजे विद्रुमासंबंधी. उदाहरणार्थ, वैद्रुमचूर्ण म्हणजे प्रवाळभस्म.
त्रिकाण्डशेषकोशात
XXXXX रक्तकन्दलो विद्रुमश्च सः । लतामणि: प्रवालः स्यात्‌ XXXX XXXX ||
अशी ओळ आहे. खाली शील-अखंड महाथेर यांची टीका आहे. तिच्यात रक्तकंद: हाही शब्द दिला आहे. त्यांच्या मते विद्रुमः म्हणजे विशिष्टो द्रुमः. साध्या कोशातही पोवळे या अर्थाचे हे सर्व शब्द मिळाले.--वाचक्‍नवी

भारतातल्या भारतात

प्रवाळदर्शनासाठी परदेशातही (मॉरिशस वगैरे) जायची देखील गरज नाहि भारतातील अंदमानमधे मॉरिशसपेक्षाही (किंबहूना आशियातील सर्वोत्तम स्थळांपैकी काहि) सुंदर व विस्तिर्ण स्थळे आहेत. या शिवाय आपल्याकडे कोकणात तारकर्लीला, गुजरात मधे द्वारकेजवळ, लक्षद्वीपला देखिल ही सोय आहे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

मॉरिशस नाही तर मालवण

प्रवाळांसाठी मॉरिशसला जायला पाहिजे हे मी चुकून लिहिले होते, मला मालवण म्हणायचे होते. लखदीव-मालदीव आणि तारकर्ली(मालवण) येथले प्रवाळाचे खडक प्रसिद्ध आहेत. द्वारकेजवळ असे प्रवाळ मिळतात हे मात्र माहीत नव्हते.--वाचक्‍नवी

उपयोग

कॅलशिअमचा स्रोत म्हणून प्रवाळ अधिक चांगले असे ऐकले होते. म्हणजे इनऑर्गॅनिक कॅलशिअम कार्बोनेट पेक्षा प्रवाळाचे शरीरात शोषण चांगले होते असे ऐकले होते.
ते खरे का? याचाही खुलासा झाला तर बरा.
(याच न्यायाने हाडाची भुकटी असलेली टूथपेस्ट जास्त चांगली असे म्हणावे का?)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

उपयोग

काही औषधकंपन्या असा दावा करतात हे खरे आहे; संदर्भ शोधावे लागतील. पण शेवटी कॅल्शियम क्लोराईड होऊनच शोषण होणार असेल तर स्त्रोताला महत्व उरणार नाही असे वाटते. ('लोह हे हीम (रक्तप्रथिन) प्रकारचे असले तर चांगले' हे मत बर्‍यापैकी मान्यताप्राप्त आहे.)
टूथपेस्ट म्हणजे अन्न नव्हे. 'टूथपेस्ट खाणारी मुलगी' दाखविणार्‍या एका जाहिरातीवर बंदी आली होती असे अंधुकसे स्मरते.

संकलनाची कल्पना आवडली

जिवंत प्रवाळ-पोवळी फारच सुंदर असतात.
संकलनाची कल्पना आवडली.

शुभेच्छा

प्रवाळ रत्न म्हणून माहिती संकलीत करणे ही कल्पना उत्तम आहे. शुभेच्छा!

मात्र एक वैधानिक सुचना: प्रवाळ हे खनिज / दगड नसून वनस्पती /जीव आहेत व त्यांच्या अश्या अति उपयोगाने काहि प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी अन्नसाखळीला धोका हे लक्षात घेऊन पोवळे/प्रवाळ खरेदी करावीत/करू नयेत (ज्याचा त्याचा निर्णय). काहि कंपन्या मृत प्रवाळ वापरण्याचा दावा करतात मात्र प्रवाळ हे केवळ अन्नसाखळीत नसून अनेक जीवांचे घरही असते.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

उत्तम

संकल्पना उत्तम आहे. चर्चा प्रवाळावरच राहिलेली दिसते.

नवरत्नांचा उल्लेख आणि ग्रहांशी घातलेली त्यांची सांगड प्रसिद्ध आहे.

खालील पंक्ती वराहमिहिराच्या बृहत् जातकातील आहेत असे विकीवर म्हटले आहे. काळ सुमारे सहावे शतक.

माणिक्यं तरणेः सुजात्यममलं मुक्ताफलं शीतगोः
माहेयस्य च विद्रुमं मरकतं सौम्यस्य गारुत्मतम
देवेज्यस्य च पुष्पराजमसुराचार्यस्य वज्रं शनेः
नीलं निर्मलमन्ययोश्च गदिते गोमेदवैदूर्यके

आणखी पंक्ती

सुवर्णं रजतं मुक्ता राजावर्तं प्रवालकम्‌ ।
रत्‍नपञ्चकमाख्यातं शेषं वस्तु प्रचक्षते ॥१॥

कनकं कुलिशं* नीलं पद्मरागं च मौक्तिकम्‌ ।
एतानि पञ्चरत्‍नानि रत्‍नशास्त्रविदो विदुः ॥१॥

हीरकं मौक्तिकं स्वर्णं रजतं चन्दनानि च ।
शङ्खचर्मं च वस्त्रं चेत्यष्टौ रत्‍नस्य जातयः ॥१॥

मुक्ताफलं हिरण्यं च वैडूर्यं पद्मरागकम्‌ ।
पुष्परागं च गोमेदं नीलं गारुत्मतं* तथा ॥
प्रवालयुक्तान्युक्तानि महारत्‍नानि वै नव ॥१॥

*कुलिश=वज्र=हिरा. मरकत=गारुत्मत=पाचू(हिंदीत पन्‍ना). वैडूर्य=वैदूर्य=सूर्यकांत=लसण्या. पुष्पराग=पुखराज. पद्मराग=लाल=माणिक. राजावर्त=लाजवर्द=एक हलक्याप्रतीचा हिरा=Lapis lazuli=Stone of Azure.
--वाचक्‍नवी

चांगला उपक्रम...!

संकलन उत्तम व्हावे. मराठी विकिपिडियावर नवरत्नावर काहीच माहिती नाही. :(

-दिलीप बिरुटे

तुम्ही

सर तुम्ही विकीवर मस्तच लेख लिहिता ते आवडते आहे.!
आपला
गुंडोपंत

धन्यवाद

वेळेअभावी चर्चेत अधिक लिहीता आले नाही, पण उद्या अधिक लिहीते..

तोवर माहितीबद्दल आभार.

धन्यवाद

सर्वांचे सहकार्यासाठी मनापासून आभार.
मराठी विकिवर नवरत्ने या लेखात संपादन करून वरीलपैकी काही माहितीची भर घातली आहे. पुढेही या धाग्यांमध्ये आलेली माहिती थोडी थोडी करून विकिवर चढवण्याची इच्छा आहे. विकिवरची माहिती मुक्त स्त्रोत म्हणून असते, तेव्हा आपण दिलेली माहिती विकिवर येऊ नये/काढून टाकावी अशी इच्छा असल्यास मला याच धाग्यात आणि लवकर कळवावे ही विनंती.
तसेच विकिसंबंधी काही सूचना असल्यास त्याही येथेच कळवाव्या.

प्रवाळ बेटांचा वेगळा लेख विकिवर गुंडोपंतांनी घातलेला दिसतो आहे. तेव्हा प्रवाळ बेटांवर मी दिलेली माहितीही जमल्यास तेथेच घालावी. नाहीतर मी एकदोन दिवसांत देईनच.

लसण्या : लै भारी

आपण टाकलेली लसण्या ची इमेज खूप आवडली.

माहितीपुर्ण लेख. अभिनंदन.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

वैद्रुम नाहीतर, विद्रुम

आपला आनंद व्यक्त करण्यासाठी (रामाला) सोने, चांदी, मोती आणि पोवळी (वैद्रुम - corals - आपण ज्याला पोवळी म्हणतो ते) दिली असे वाचले. इति चित्रा.
बालकाण्डातल्या ’त्या’ ७४ व्या सर्गात विद्रुम शब्द आहे, वैद्रुम नाही. वैद्रुम हे विशेषण असावे, ते सोन्या-चांदीबरोबर देता येणार नाही. मूळ श्लोक असा :
ददौ कन्या शतं तासां दासी दासं अनुत्तमम्‌ ।
हिरण्यस्य सुवर्णस्य मुक्तानां‌ विद्रुमस्य च ॥
वाल्मिकिरामायण १.७४.५
--वाचक्‍नवी

नामही आहे

संस्कृतात प्रातिपदिके (म्हणजे धातु-क्रियापदे नव्हेत तसे शब्द) कधी विशेषण तरी कधी विशेष्य म्हणून वापरतात. संस्कृतात "नाम" "नामविशेषण" असे भेद करण्याची प्रथा नाही.

(एखाद्या शब्दाला कधी विशेषण, तर कधी नाम म्हणून वापरायची लकब मराठीतही दिसते.
"भला माणूस आहे." येथे "भला" हे नाम-विशेषण म्हणून वापरलेले दिसते.
चोराला लाठी आणि भल्याला लंगोटी.
अशी एक म्हण ऐकली आहे - काही पाठभेद असावेत. येथे "भला" नाम म्हणून वापरलेले दिसते.)

वैद्रुम म्हणजे "विद्रुमाशी संबंधित". नाम म्हणून वापरल्यास "विद्रुमाशी संबंधित (वस्तू)"

पोवळ्याच्या एखाद्या तुकड्यात (गोल आकार दिलेल्या मण्यात) चित्रविचित्र फांद्या दिसणार नाहीत. अशा तुकड्याला "वैद्रुम" म्हणजे सयुक्तिक - विचित्र झाडाशी संबंधित (वस्तू)
स्वतःहून तो तुकडा विचित्र झाडासारखा दिसत नाही, म्हणून त्याला विद्रुम = विचित्र झाड म्हटले, तर अर्थ दुप्पट लाक्षणिक होतो. (रूढीने कसाही अर्थ असला, तर तो चालतो.)

रामायणात "वैद्रुम" किंवा "विद्रुम" वापरले असले, तरी ठीकच.

नामाऐवजी विशेषण

रामायणात "वैद्रुम" किंवा "विद्रुम" वापरले असले, तरी ठीकच.

नामाऐवजी विशेषण वापरता येते हे सर्वश्रुतच आहे; पण इथे रामायणात विद्रुम वापरला असताना आपण (हेतुपुरस्सर किंवा चुकून) सीतेबरोबर वैद्रुम दिले होते असे विधान करणे अप्रयोजक आहे, एवढेच माझे म्हणणे. --वाचक्‍नवी

सहमत

मूलपाठ्य "विद्रुम" असल्यास (आणि "वैद्रुम" असा जुना पाठभेद उपलब्ध नसल्यास) त्या श्लोकात "विद्रुम" असेच वापरावे.

ठीक!

चूक आहे तर दुरूस्त करते!

धन्यवाद.
@धक्का: लसण्याचा फोटो मी टाकलेला नाही (किंबहुना लसण्या नावाचे काही रत्न असू शकते हेच मला माहिती नव्हते :) )

लसण्या

मराठी शब्दकोशात लसण्याचा ’दुध्या काचमणी’ असा अर्थ दिला आहे. हिंदी कोशात लहसुनियां किंवा लसुना हे वैडूर्यला प्रतिशब्द म्हणून दिले आहेत. फोटोतला लसण्या जर वैडूर्यमणी असेल, तर प्रश्नच मिटला.
मी वैदूर्यला लसण्या म्हटले होते, ते केवळ स्मरणशक्तीवर भरंवसा ठेवून. ते चुकीचे नसावे. संस्कृतमध्ये बालवायजम्‌(=बालसूर्य?) असाही याच अर्थाचा एक शब्द सापडला.--वाचक्‍नवी

 
^ वर