नही होंगे जुदा!

नही होंगे जुदा!

मानसीचे उदयवर व उदयचे मानसीवर नि:सीम प्रेम होते. एकमेकाना काया-वाचा-मनसा स्वीकार केलेल्या या प्रेमी युगुलाचे एकदाचे लग्न झाले. सत्यशोधकी पद्धतीने विवाह केल्यामुळे शुद्ध मराठीतूनच जीवनाच्या अखेरपर्यंत मी तुला साथ देईन ही शपथ घेतली. आणा भाका झाल्या. उदय व मानसी या दोघावरही विवेकी जीवनपद्धतीचा पगडा असल्यामुळे आपण विवाहाप्रसंगी घेतलेल्या शपथा आयुष्यभर पाळले पाहिजेत असेच त्यांना वाटत होते. दोन जिवांचे (मनो) मिलन झाले. त्यामुळे आपापल्या वैयक्तिक हितापेक्षा दुसर्‍यांच्या हिताला अग्रक्रम द्यायचे हे त्यांनी परस्पर ठरवून टाकले. असे केल्यास यापुढील वैवाहिक जीवन अत्यंत सुखकर होईल याची त्यांना खात्री होती.
परंतु भोवतालची परिस्थिती अगदीच उलट होती. त्यांचे काही विवाहित मित्र-मैत्रिणी क्षुल्लक कारणासाठी हमरी-तुमरीवर येत होते. पती-पत्नी एकमेकांची उणे-दुणे काढत होते. भांडण विकोपाला जाऊन घटस्फोटाची भाषा बोलली जात होती. कुणीही पाऊल मागे घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. कोर्ट कचेर्‍या करत होते. तरुण जोडप्यामध्ये सहनशीलतेचा मागमूसही नव्हता. ताळ मेळ नव्हता. उदयच्या मते यातील प्रत्येक जण आपापला स्वार्थ जपत असल्यामुळे व स्वार्थ पूरित हेतूनेच एकमेकाचे दोष काढत असल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुरळितपणे चालत नाही.
उदय पण याच दिशेने विचार करू लागला. मी जरी माझे वैयक्तिक हित बाजूला ठेऊन वागत असलो तरी मानसी स्वत:चे स्वार्थ जपत असल्यास वैवाहिक जीवनाचा जास्तीत जास्त फायदा तिलाच मिळणार. असे हिशोबी विचार त्याच्याही डोक्यात येऊ लागले. जर मी निस्वार्थपणे असाच वागत राहिलो तर मानसीच्या (व तिच्या नातेवाईकांच्या!) दृष्टीने मी बावळटच ठरणार. आम्हा दोघामधील अतूट प्रेम (जनम जनमसे बंधा हुआ प्यार) मला वाचवेल की नाही याबद्दल मी साशंक आहे असे त्याला वाटू लागले.
मानसीच्या मनातही नेमके असलेच विचार थैमान घालत होते. उदय माझा (गैर!)फायदा घेत असेल तर.... लग्नापूर्वी याबद्दल भरपूर चर्चा केली होती. (आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत) आपापला स्वार्थ बाजूला सारून जीवन जगण्याचे ठरवले होते. परंतु जीवनाच्या या वाटेवरून जाताना दुसरी बाजू उलटली तर... त्यामुळे संशयग्रस्त जीवन जगण्यापेक्षा इतराप्रमाणे आपणही आपापला स्वार्थ जपत (व दुसर्‍याचा पुरेपूर फायदा घेत!) जीवन जगणे योग्य ठरेल, असे दोघांच्याही मनात विचार येऊ लागले. अशा प्रकारे वागल्यामुळे फार फार तर वैवाहिक जीवन सुरळित राहणार नाही. परंतु आत्मवंचना तरी त्यात नसणार. तर्कशुद्ध विचार करू लागल्यास आपापले हित जपण्याचा मार्गच योग्य या निर्णयापर्यंत दोघेही येऊन पोचले.

..... ........ .......

यात फार मोठी घोडचूक दोघेही करत आहेत असे कित्येकांना वाटेल! दोन समंजस व्यक्ती तर्कशुद्ध विचार करून आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी वैवाहिक बंधनसुद्धा तोडून टाकण्याची भाषा करत आहेत, हे समजण्यापलिकडे आहे. एका विशिष्ट पद्धतीने मर्यादा संभाळून वागण्याचे ठरविल्यास त्यात दोघांचेही हित आहे. परंतु त्यातील एकाने जरी वाकडी वाट धरण्याचे ठरविल्यास दुसर्‍याला मात्र ते अत्यंत तापदायक ठरणार. हे असे घडू नये म्हणून आपापला स्वार्थाकडे पहाण्याचे ठरविल्यास दोघांचेही नुकसान होणार, हे मात्र नक्की.
हा पेचप्रसंग विवेकी विचारांच्या मर्यादा अधोरेखित करणारा आहे. आपल्यातील प्रत्येक जण दुसर्‍यांच्याबद्दल थोडासुद्धा विचार न करता फक्त स्वत:पुरतेच बघण्याचे ठरविल्यास आताच्या परस्पर सहकार-संबंधावर आधारलेली समाजव्यवस्था, जीवन जगण्याची रीत, कोसळून पडेल. आहे त्यापेक्षा वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल. हा स्वार्थाचा भस्मासूर केवळ पती-पत्नीतच नव्हे तर आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी, नातलग, इतर सहकारी यांच्यातही वितुष्ट माजवेल. एका निसटत्या क्षणी सर्व व्यवहार ठप्प होतील. कारण यानंतर येथे स्वार्थ जपण्यापायी एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न होत राहतील व त्यातून यादवी पेटेल. समर्पण, त्याग ही मूल्ये तडीपार होतील.
परंतु केवळ विवाह टिकावा यासाठी आयुष्यभर आत्मवंचना करत, मन मारून जगण्यातही हशील नाही. दुसर्‍यानी आपले शोषण करत रहावे व आपण मूग गिळून गप्प बसावे हा कुठला न्याय? असेही वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदय व मानसी आपल्या नातेसंबंधांचा पुनर्विचार करत असल्यास कुणाची हरकत नसावी. आधुनिक वैवाहिक जीवन हे एकमेकांनी आपल्या जोडीदाराबद्दल केलेल्या मूल्यमापनावर आधारलेली आहे. त्यात इतर गोष्टी गौण ठरतात. कसोटीला न उतरल्यास काडीमोड घेवून मोकळे होणे हाच एकमेव पर्याय त्यांना दिसत असतो. येथे प्रश्न कुणी कितपत एकमेकावर विश्वास ठेवावा याचा आहे. कारण अवतीभोवती सगळीकडे अविश्वासाचे, स्वार्थांधतेचे, उदाहरणं पदोपदी सापडत आहेत. नातेसंबंधांला, परस्परातील व्यवहाराला बाजारी स्वरूप आलेला आहे. संवेदना बधीर झालेल्या आहेत. ओलावा संपून फक्त व्यवहार राहिला आहे. त्यामुळे उदय व मानसी यांच्या मनात संभ्रम असल्यास त्याना दोष देता येणार नाही. विश्वास नसल्यास दोघांच्यातील नातेसंबंधाला काही अर्थ उरणार नाही.
मग विभक्त होऊन नवीन संबंधाच्या शोधात जायचे? की आहे तशीच परिस्थिती पुढे पुढे ढकलत रहायचे? हा आता त्यांच्या समोरील प्रश्न आहे.

Comments

बहुदा

ऍल आणि टिपर गोर हे का विभक्त झाले याचे उत्तर मिभोंना मिळावे :)

आपापला स्वार्थाकडे पहाण्याचे ठरविल्यास दोघांचेही नुकसान होणार, हे मात्र नक्की.

नुकसान कसे होणार? जर स्वार्थ सांभाळणे म्हणजे आत्मवंचना टाळणे असे असले आणि आत्मवंचना टाळणे हे महत्त्वाचे असले तर अशा व्यक्तीपासून वेगळे राहणे हे फायद्याचेच आहे. असो.
समाजाचे नुकसान कदाचित आहे, मुले असल्यास मुलांचे आहे, पण व्यक्तीगत हिताचा मार्ग प्रत्येक व्यक्त्तीला मोकळा असलाच पाहिजे.

समाजाचे व मुलांचे नुकसान कसे काय?

उदय व मानसी यांनी स्वार्थाकडे पाहून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यास त्यामध्ये समाजाचे व उदय-मानसी यांना असलेल्या मुलांचे नुकसान कसे काय होईल हे बराच वेळ विचार करुनही कळाले नाही. किंबहुना उदय-मानसी यांचे पटणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर परस्परांशी वागणे कसे राहते व स्वार्थ किती पराकोटीला जाऊ शकतो याची कल्पना करु शकतो. अशा घरातील बिघडलेल्या वातावरणात मुलांवर कोणत्या प्रकारचे संस्कार होतील याचाही विचार आवश्यक आहे.

बाकी यात समाजाचे नुकसान कसे काय? उलट घटस्फोटानंतर एक अनुभवी नवरा व अनुभवी बायको पुनर्विवाहासाठी समाजात उपलब्ध होतील हा समाजाचा फायदाच नाही काय?


Divorce is very difficult. Especially on a kid. Of course, I'm the result of my parents having stayed together, so you never know. - George Costanza

:)

उलट घटस्फोटानंतर एक अनुभवी नवरा व अनुभवी बायको पुनर्विवाहासाठी समाजात उपलब्ध होतील हा समाजाचा फायदाच नाही काय?
Divorce is very difficult. Especially on a kid. Of course, I'm the result of my parents having stayed together, so you never know. - George Costanza

खरेच की :) घेऊन टाका बघू सगळेजण पटापट घटस्फोट! आणि पहिले लग्न अनुभवासाठी करा. :) दुसरे तो अनुभव लोकांमध्ये वाटण्यासाठी! ह. घ्या.

असो.

अशा घरातील बिघडलेल्या वातावरणात मुलांवर कोणत्या प्रकारचे संस्कार होतील याचाही विचार आवश्यक आहे.

वातावरण तेवढे बिघडलेले असले तर तुम्ही म्हणता ते योग्य आहे. पण बरेचदा कुरबुरी, आणि न पटणे हे इतक्या टोकाचे नसते असे पाहते. जेव्हा ते तसे असते तेव्हा घटस्फोट चांगला असेच माझेही मत आहे.

समाजस्वास्थ्य

बाकी यात समाजाचे नुकसान कसे काय?

कदाचित आजच्या सकाळ दैनिकाच्या संपादकीयात याचे उत्तर सापडण्याची शक्यता आहे.

शक्यता?

तुमचे उत्तर काय आहे?

संपादकीयात उत्तर सापडले नाही

समाजस्वास्थ्य व समाजाचे नुकसान या संदर्भात दैनिक सकाळच्या संपादकीयात उत्तर सापडले नाही.

मुळात त्या संपादकीयात नक्की काय सांगायचे आहे हेच समजले नाही. मोडणारे विवाह, घटस्फोट यांना नेहमीप्रमाणेच पुरुषी गंड आणि मध्ययुगीन मानसिकता याला जबाबदार धरून जमेल तितके खापर मुलांच्या बाजूवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

उदा.

परंतु एकीकडे हे आर्थिक वास्तव बदलत असताना, विचार करण्याची पारंपरिक चौकट जुनीच आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चविद्याविभूषित मुलांची सामाजिक मते आणि मूल्ये मात्र मागच्याच शतकात घोटाळताना दिसतात, हे वास्तव आज अनुभवाला येते.

नंतर नेहमीचीच क्लिशे झालेली वाक्ये वापरुन शेवटी काहीतरी गोंधळल्यासारखे लिहिले आहे.

म्हणूनच निकोप विवाह संस्था तयार होण्यासाठी सामाजिक-सांस्कृतिक इथॉसच बदलण्याची गरज आहे. योग्य शिक्षणाने, सामाजिक प्रबोधनानेच तो बदलू शकेल. अर्थात त्याचा हेतू निकोप समाजरचना निर्माण करणे, हा आहे. प्रश्‍न विवाह संस्था टिकविण्याचा नसून, चांगले जगण्याचा आहे, हे मात्र विसरता कामा नये.

त्यामुळे हे संपादकीय समजावून सांगितले तर अधिक बरे होईल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सकाळ मधील संपादकीय

दैनिक सकाळ मधील संपादकीय वाचत असताना त्यात काही दम नाही हे जाणवत होते. कदाचित माझी आकलन शक्ती कमी पडत असावी म्हणून इतराना यातून काही अर्थबोध होतो का या उद्देशाने दुवा दिला. परंतु केवळ वरवरच्या समुपदेशातून काही साध्य होत नाही हे कळले. (हजारो घरात वाचणाऱ्या (वा केवळ चाळणाऱ्या!) दैनिकाची ही केविलवाणी स्थिती असल्यास प्रबोधनाची सुरुवात कुठून करावी हा प्रश्न विचारावासा वाटतो.)

प्रबोधनाची सुरुवात सकाळपासून करावी.

दैनिकाची ही केविलवाणी स्थिती असल्यास प्रबोधनाची सुरुवात कुठून करावी हा प्रश्न विचारावासा वाटतो.

प्रबोधनाची सुरुवात सकाळपासून करावी असे उत्तर द्यावेसे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

समाजाचे नुकसान

पती-पत्नीमध्ये जेव्हा स्वार्थांधतेतून विभक्त होण्याचे वारे वाहू लागतात तेव्हा अपत्यांना संभाळणाऱ्या पालकांना सर्व कष्ट, तोशीस सोसावे लागतात. भोग भोगावे लागतात. यात बहुतेक वेळा स्त्रियाच भरडले जातात. तिला अनेक पातळ्यावर समाजाशी झुंजावे लागते. केवळ संबंधित कुटुंबाचेच नव्हे तर सर्व समाजाचेच यात काही प्रमाणात उत्तरदायित्व आहे हे समजून घेतले पाहिजे. विभक्त आई - वडीलांच्या अपत्यांना अनेक प्रकारच्या भावनिक, मानसिक, सामाजिक ताण - तणावांना सामोरे जावे लागते. त्याचे दूरगामी परिणाम अपत्यांच्या व्यक्तिमत्वावर होऊ शकतात. असमंजस व बालपण कोमेजलेल्या व्यक्ती तरुणपणी वा प्रौढावस्थेत समाजास घातक ठरू शकतात.

अनुभवी पुरुष व स्त्रिया

उलट घटस्फोटानंतर एक अनुभवी नवरा व अनुभवी बायको पुनर्विवाहासाठी समाजात उपलब्ध होतील हा समाजाचा फायदाच नाही काय?

हा प्रतिसाद माझ्या दृष्टीने असमर्पक वाटतो. आपल्या देशातील उपलब्ध आकडेवारीनुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या पुनर्विवाहाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही मूल संभाळण्याची जवाबदारी असलेल्या स्त्रिया लग्नाच्या बाजारात निरुपयोगी ठरतात. अपत्य असलेल्या वा नसलेल्या घटस्फोटित स्त्रियांच्या बाबतीतही हाच अनुभव असावा. त्यामुळे काही कारणास्तव विच्छेदन घेतलेल्या स्त्रियांना फार मोठ्या हिकमतीने समाजाला तोंड द्यावे लागते. व्यक्ती - कुटुंब - समाज अशा चढत्या श्रेणीतील रचनेत पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी असल्यामुळे नजीकच्या काळात तरी समाजव्यवस्थेत फार मोठा फरक जाणवणार नाही.

थोड्याश्या शंका

आपल्या देशातील उपलब्ध आकडेवारीनुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या पुनर्विवाहाचे प्रमाण अत्यल्प आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्याही अल्प आहे. अनेक राज्यांमध्ये ती धोकादायक पातळीवर (म्हणजे पातळीखाली) पोचली आहे. लग्नाची गरज स्त्री व पुरुष दोघांनाही असते असे मानले तर पुरुषांचे पुनर्विवाह (स्त्रियांची संख्या कमी असूनही) सहजशक्य होतात मात्र स्त्रियांचे पुनर्विवाह (मागणी-पुरवठा गुणोत्तरात ऍडवान्टेज असूनही) शक्य होत नाहीत हे विधान ऍनेक्डोटल पुराव्यांवर आधारित वाटले. माझ्या मते आपण सांगता तशी परिस्थिती सध्या राहिलेली नसावी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आकडेवारी

Home Truths: Stories of Single Mothers (Penguin Indiia, 2003) या पुस्तकात मांडलेली आकडेवारी हे स्पष्ट करते. घटस्फोटिता किंवा विभक्त स्त्रियांची संख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे. एकट्या मातांची एकंदर संख्या, प्रौढ स्त्री लोकसंख्येच्या साधारण 10 टक्के भरेल. या 7-8 वर्षात आकडेवारीत फार फरक पडला नसावा.
यासंदर्भात सकाळ मधील एका बातमीनुसार 25-30 वयोगटातील पती - पत्नींचे परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल करणाऱ्या अर्जांच्या संख्यातही लक्षणीय प्रमाणात वाढ (सुमारे 70-78 टक्के) होत आहे हेही लक्षात घ्यावे.

जनम जनमसे प्यार(?)

सत्यशोधकी पद्धतीने विवाह केल्यामुळे शुद्ध मराठीतूनच जीवनाच्या अखेरपर्यंत मी तुला साथ देईन ही शपथ घेतली.

सत्यशोधकी पद्धत म्हणजे काय ते मला नेमके माहित नाही परंतु शास्त्रोक्त पद्धतीशी फारकत घेणारी पद्धत असावी असे वाटते. खुलासा व्हावा. सत्यशोधकी पद्धतीत शुद्ध मराठीत शपथा घ्याव्या लागतात काय? तसे असल्यास मराठी न जाणणार्‍यांचे काय होते?

आम्हा दोघामधील अतूट प्रेम (जनम जनमसे बंधा हुआ प्यार) मला वाचवेल की नाही याबद्दल मी साशंक आहे असे त्याला वाटू लागले.

जनम जनमसे बंधा हुआ प्यार या सत्यशोधकीशी कसा संबंधित आहे?

विश्वास नसल्यास दोघांच्यातील नातेसंबंधाला काही अर्थ उरणार नाही.

विश्वास म्हणजे काय? दूरान्वयाने तो श्रद्धेशी निगडित तर नाही?

सत्यशोधक विवाह पद्धत

अर्थहीन कर्मकांड नाकारणाऱ्या म. फुले यांनी 1890च्या सुमारास ही विवाह पद्धत सुरु केली. व पुढील अनेक वर्षे महाराष्ट्रातील बहुजन समाजात ही पद्धत रुळली होती. परंतु हाही समाज चंगळवादाला बळी पडल्यामुळे काही तुरळक अपवाद वगळता या विवाह पद्धतीचा विसर या समाजाला पडला आहे. मुळात या पद्धतीत, भटजी, मुहुर्त, सर्व सामान्याला न कळणाऱ्या संस्कृत भाषेतील विवाहविधी, मान - पान, देणे - घेणे इत्यांदींना फाटा दिला आहे. लग्न विधी अत्यंत सोपी व अर्थपूर्ण असल्यामुळे ही पद्धत लोकप्रिय व्हायला हवी होती.
सर्व विधी व त्याचा अर्थ स्थानिक मराठी भाषेत असल्यामुळे विवाह समारंभात सहभागी झालेल्यांना आपण नेमके काय करत आहोत याची जाणीव होते. या पद्धतीत कमीत कमी वेळ व पैसा खर्च होतो. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास पूर्ण अनुमती यात आहे. जमलेल्यापैकी एखादी अनुभवी व्यक्तीच पुढाकार घेवून लग्नविधी संपवू शकते.
नोंदणी पद्धतीच्या विवाहासारखा कोरडेपणा यात नाही. नातलग, मित्र परिवार, व इतर यांच्या शुभाशिर्वादाने वातावरण आनंदमयी ठरू शकते. या पद्धतीत कुठल्याही भाषेचे, प्रदेशाचे बंधन नाही. सर्वांना समजू शकेल या मराठीतील संहितेचे इतर भाषेत भाषांतर करू शकल्यास अडचण येणार नाही.
उदय व मानसींचा विवाह या पद्धतीने झाला याचा अर्थ ते rational आहेत असा होत नाही.

खोडसाळपणा?

विश्वास म्हणजे काय? दूरान्वयाने तो श्रद्धेशी निगडित तर नाही?

मीही याच फाट्याच्या अनुषंगाने एक प्रतिसाद (कंपू या शीर्षकाखाली) लिहिला होता. तो का उडविला?

विवेक आणि स्वार्थ

विवेकी असणे म्हणजे आत्मकेंद्रित असणे नव्हे.

त्यामुळे आपापल्या वैयक्तिक हितापेक्षा दुसर्‍यांच्या हिताला अग्रक्रम द्यायचे हे त्यांनी परस्पर ठरवून टाकले. असे केल्यास यापुढील वैवाहिक जीवन अत्यंत सुखकर होईल याची त्यांना खात्री होती.

आणि,

प्रत्येक जण आपापला स्वार्थ जपत असल्यामुळे व स्वार्थ पूरित हेतूनेच एकमेकाचे दोष काढत असल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुरळितपणे चालत नाही.

ही दोन्ही सरधोपट विधाने वाटली. लग्न टिकण्याची किंवा संपुष्टात येण्याची कारणे इतकी वरवरची नसतात.(नसावीत!) घटस्फोट हा नक्कीच यापेक्षा गुंतागुंतीचा विषय आहे, असे वाटते.

स्वार्थी-जागरूक

विवेकी असल्याने दुसरा आपला गैरफायदा घेत नाही ना? याबाबत जागरूक असणे योग्यच. पण् आत्मकेंद्रित असणे आवश्यक नाही. आपले तेवढे पहावे असे न करताही जागरूक राहता येते. म्हणून दोघांचाही स्वार्थी होण्याचा विचार अविवेकी आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

'विन्-विन्' हाच उपाय.

जिथे दोघांमधे मतैक्य असेल तिथे प्रश्नच नाही. पण जिथे मतभेद असेल अशा परिस्थितीत प्रत्येकानी फक्त आपली जीत व दुसर्‍याची हार कशी होईल याचा विचार न करता ज्यात दोघांची जीत असेल असा एखादा तिसरा विन्-विन् पर्याय शोधून काढल्यास दोघानाही समाधान लाभेल. ही क्षमता दोघांपैकी एकात जरी असली तरी कालांतरानी ती दुसर्‍यातही येते. तिसरा विन्-विन् पर्याय एखादा त्रयस्थ निरीक्षक किंवा समुपदेशकही सुचवू शकतो. कधी कधी हा तिसरा पर्याय अगदी हाताशी असतो पण आपल्याच बाजूला चिकटून राहण्याच्या आडमुठेपणामुळे तो दोन्ही पक्षाना दिसत नाही. पण त्रयस्थानी सुचवल्यावर इतकी साधी गोष्ट आपल्या लक्षात कशी आली नाही याचं दोन्ही पक्षाना आश्चर्य वाटतं.

लेखकाने आपली भूमिका स्पष्ट करावी.

विवेकी विचारांच्या मर्यादा काय/किती असाव्यात याबद्दल लेखकाची भूमिका काय आहे?

शीर्षकावरून गैरसमज

सामायिक मेंदू कापून वेगळ्या केलेल्या सयामी जुळ्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीची 'नैतिक प्रश्न' काल्पनिका असेल, असे मला आधी वाटले होते.

स्वार्थ, शोषण, न्याय, इ. प्रश्नांची विवेकी उत्तरे, 'प्रिझनर्स डायलेमा' आणि 'इटरेटेड प्रिझनर्स डायलेमा' यांच्या अभ्यासातून सापडतात.

शंका कशामुळे उद्भवली, हे कळले नाही

कथानकात अशी पूर्वस्थिती मान्य करण्यासाठी दिलेली आहे :

त्यामुळे आपापल्या वैयक्तिक हितापेक्षा दुसर्‍यांच्या हिताला अग्रक्रम द्यायचे हे त्यांनी परस्पर ठरवून टाकले.

मात्र पुढे उदय आणि मानसी दोघे एकमेकांबद्दल असा विचार करू लागतात :

मानसी स्वत:चे स्वार्थ जपत असल्यास...
आणि
उदय माझा (गैर!)फायदा घेत असेल तर...

तर्कशुद्ध विचार पूर्ण करण्यासाठी सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो.

मानसी स्वत:चे स्वार्थ जपत नसल्यास...
आणि
उदय माझा (गैर!)फायदा घेत नसेल तर...

आणि संभवनीयतेचे गणित करावे लागते. जर एक शक्यता अतिशय असंभवनीय असेल, तरच त्या शक्यतेचे पूर्ण गणित केले नाही तर चालते.

कथानकात सांगितलेल्या पूर्वस्थितीवरून मानसी-उदय यांनी केलेल्या अर्ध्या गणिताची संभवनीयता कमी, आणि त्यांनी न-केलेल्या शक्यतेची संभवनीयता अधिक असे दिसून येते. कथानकात बदल झाला असल्यास ते आपल्याला नीट सांगितलेले नाही. मानसी आणि उदय एकमेकांना सांगितल्यासारखे न वागता ओळखीच्या अन्य दांपत्यांसारखे वागतील असे काही ध्वनित केले आहे. म्हणून दुसरी तार्किक शक्यता गणित करण्यालायक नाही असा भ्रम कथाकथनात आला आहे. पण ते तसे वागत नव्हते ना? कारण ते अन्य दांपत्यासारखे वचनभंग करू लागले, तर वचनभंग=विवाहभंग झालेलाच आहे. उगाच नसत्या तर्कांचे कष्ट कशाला घ्यावे?

- - -

पूर्ण तर्क न करता आलेला निष्कर्ष तार्किक आहे, अशी लेखकाची टिप्पणी आहे :

तर्कशुद्ध विचार करू लागल्यास आपापले हित जपण्याचा मार्गच योग्य या निर्णयापर्यंत दोघेही येऊन पोचले.

यातून लेखक भरकटत कुठल्या कुठे जातात. ओलावा नाही, अविश्वास आहे, यांचे खापर तर्कनिष्ठतेवर फोडले जाते. मुळात तर्कशुद्ध विचारात ओलावा-स्नेह वगैरेंचे गणित होत असले पाहिजे, हे लेखक विसरतात. किंवा "फोर्थ-डायमेन्शन"-वैचित्र्यासाठी बळेच उल्लेख टाळतात.
- - -
कथानकाचा सामाजिक उपयोग :
अशा कथानकांचा तार्किक उपयोग नसेल तरी सामाजिक उपयोग असू शकतो.
आपल्या आप्त मित्र-मैत्रिणींचा विवाह मोडला असा अनुभव आपणापैकी काही लोकांना आला असेल. हा अतिशय दु:खदायक प्रसंग असतो. "काय करू शकतो, काय करावे, सगळे व्यर्थ" अशी निराश कळवळ वाटू लागते. अशा परिस्थितीत स्वतःचे सांत्वन कसे करावे? आपल्या मित्रमैत्रिणींशी आपला व्यवहार काय असावा? हे सर्व सामाजिक-मानसिक प्रश्न खरेखरचे आहेत. महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने हे कथानक विश्लेषित केले असते, तर किती चांगले झाले असते, नाही का?
मात्र लेखकाने तसे काही केलेले नाही. तर्कनिष्ठतेबद्दल प्रामादिक विचार-प्रयोग केलेला आहे, आणि फाजिल निष्कर्ष काढलेले आहेत.

- - -
अतिशय भ्रामक, अर्धवट आणि विसविशीत विचारांना काळजीपूर्वक विचारांचे सोंग लेखकाने चढवलेले आहे. त्यांच्या लेखन-इतिहासाच्या अर्ध्याअधिक काळजीपूर्वक लेखांमध्ये हा लेख शोभत नाही. उरलेल्या काही निष्काळजी लेखांमध्ये हा लेख वर्णी लावतो. प्रस्तुत लेखकाकडून आदल्या प्रकारचे लेख अधिक येवोत, आणि पुढल्या प्रकारचे लेख कमी येवोत अशी मनोमन सदिच्छा आहे.

- - -

विवेकी विचार

लेखाचा मतितार्थ नीटसा कळत नाही.

म्हणजे लेख पूर्वी पुरोगामी (सत्यशोधकी विवाह) असलेले जोडपे तर्कशुद्ध (लेखकाचा शब्द) स्वार्थी विचार करून घटस्फोटाच्या मार्गी लागले. यात सभोवतालची भांडण करणारी अनेकजोडपी होती त्यांचा हातभार लागला.

यात घडले ते वाईट घडले (होऊ घातलेला घटस्फोट) आणि त्यासाठी तर्कशुद्ध विचार व सभोवतालची स्थिती हे कारणीभूत आहेत. सभोवतालची स्थिती बदलणे इतके सहजी शक्य नसते, म्हणून तर्कशुद्ध स्वार्थी विचार त्यागले तर असे वाईट घडणार नाही. असे काहीसे लेखकाला सांगायचे आहे का नाही हे कळले नाही.

तर्कशुद्ध स्वार्थी विचार आणि विवेक (र्‍याशनल) यात लेखकाच्या मते काय फरक आहे हे कळले नाही.

प्रत्येकाला प्रेम(दुसर्‍याच्या सुखात आपले सुख बघणे), दया (दुसर्‍याचे दु:ख न बघवणे) , आवड (एकमेकाची) या (आणि इतर अनुल्लेखित) भावना असतात. याशिवाय सहकारातील (कॉम्प्लिमेंटरी नीडस्आअणि अबिलिटी) फायदा देखील माहित असतो. म्हणून समाज, कुटुंब आणि इतर संघटना यशस्वी होतात.

या सर्वांशी विवेकी वा तर्कशुद्ध स्वार्थी विचारांचे काहीच वाकडे नाही. लेखकाला काय म्हणायचे ते समजले तर बरे होईल.

प्रमोद

विचार प्रयोगाच्या मर्यादा

मुळात लेख विचारप्रयोगाशी निगडित असल्यामुळे सर्व गोष्टी सुस्पष्ट, बंदिस्त, करून (व त्याचबरोबर लिहिणार्‍यांच्या बाजूसकट) लेख लिहिलेला नाही, हे लक्षात घ्यावे. इतर वाचकांच्या उत्स्फूर्त सहभागाची, विश्लेषणाची, मतमतांतराची अपेक्षा अशा प्रयोगात असते. म्हणून काही वेळा टोकाची (असंबद्ध तर्काची) मतं मांडून वाचकांना प्रतिवाद - प्रतिसाद देण्यास उद्युक्त करण्याकडे लेखाचा कल असतो. दोन्ही बाजूची मांडणी न करता फक्त लेखकाला काय वाटते हेच लिहित गेल्यास प्रयोगाला काही अर्थ रहात नाही.
लेखकाच्या काही मूलभूत मर्यादेमुळे कदाचित लेख विस्कळित व फाजिल निष्कर्ष काढल्यासारखे वाटत असेल, हे मान्य आहे. परंतु अशा प्रकारच्या समस्याविषयी वाचकांनी काही आडाखे बांधावीत, दुसरी बाजूही असू शकते याचे भान ठेवावे एवढाच लेख लिहिण्यामागे उद्धेश होता.
अशाप्रकारच्या विषयाचे अनेक कंगोरे असू शकतात. स्वार्थ म्हणजे काय, आत्मवंचना म्हणजे काय, टोकाची भूमिका नेमकी काय असू शकते, संशयग्रस्त म्हणजे किती संशय .... या सर्व गोष्टीविषयी विस्तृतपणे लिहिणे शब्द मर्यादेत शक्य होत नसते. व शब्दांची संख्या वाढल्यास वाचकांची सहनशक्ती (attention span) संपून जाते. अशा वेळी लेखक कुठल्या कँपचा आहे हेसुद्धा गौण ठरते.
पती - पत्नी मधील विसंवाद हाच विषय घेतल्यास त्याची अनेक कारणं असू शकतील. उदाहरणार्थ एकमेकाच्या नित्याच्या सवयी न आवडणे, आवडीनिवडीतील विरोध, प्राधान्यक्रम वेगळे असणे, एकमेकांना सतत गृहित धरणे, खर्चाच्या सवयी, उधळपट्टी, व शेवटी परस्पर संशय इ.इ... यापैकी केवळ परस्पर संशय व अविश्वास यावरच लेखात भर दिल्यामुळे कदाचित लेख अपूर्ण वाटण्याची शक्यता आहे. अस्टेरिक्स कार्टून मालिकेतील व्हायटलिस्टिक्स प्रमाणे माझ्याच डोक्यावर आकाश कोसळून पडणार म्हणून वागणे असल्यास पती - पत्नीमधील दुरावा वाढत जातो व त्याचे पर्यावसान विवाहविच्छेदनात होऊ शकते. या सर्व शक्याशक्यतांची, संभव्यतांची चर्चा येथे नसल्यामुळे लेख अर्थहीन, असंबद्ध वाटत असल्यास नवल नाही.
तर्कशुद्ध विचार व विवेकी विचार या दोन वेवेगळ्या गोष्टी आहेत हे नमूद करावेसे वाटते. याचबरोबर माणसं काही वेळा irrational trustचा आधारही घेत असतात. कदाचित विवाह बंधन हा त्याचाच प्रकार असू शकेल.
शेवटी सहजीवन हे नेहमी convenience, compromises and adjustmentशी निगडित आहेत असे मला वाटते.
अल व टिप्पर गोर या पती - पत्नीप्रमाणे सर्व जण समंजसपणा दाखवत नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. एकदा आपल्याला काहीही करण्यास मुभा मिळाल्यास लैंगिक सुखासाठी एक जोडीदार, त्यानंतर त्याला सोडून अपत्यांना संभाळ करण्याच्यावेळी सुरक्षिततेची हमी घेणारा प्रौढ जोडीदार व शेवटी सर्व काही नीटनेटके झाल्यानंतर वैयक्तिक आशा आकांक्षासाठी वृद्धपणी आणखी एक जोडीदार असे बदलत राहिल्यास समाजाची स्थिती काय होईल याचाही विचार होणे गरजेचे आहे.
व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे निरंकुश अनिर्बंध स्वातंत्र्य असा अर्थ तर आपण घेत नाही ना?

समाजाची स्थिती काय होईल?

एकदा आपल्याला काहीही करण्यास मुभा मिळाल्यास लैंगिक सुखासाठी एक जोडीदार, त्यानंतर त्याला सोडून अपत्यांना संभाळ करण्याच्यावेळी सुरक्षिततेची हमी घेणारा प्रौढ जोडीदार व शेवटी सर्व काही नीटनेटके झाल्यानंतर वैयक्तिक आशा आकांक्षासाठी वृद्धपणी आणखी एक जोडीदार असे बदलत राहिल्यास समाजाची स्थिती काय होईल याचाही विचार होणे गरजेचे आहे.

- काय होईल ती स्थिती? जिथे अशी परिस्थिती आधीच झालेली आहे तिथे लोकांना त्याचे काय वाटते? मुळात समाजाला 'स्थिती' अशी काही नसतेच! त्यामुळे एकतर आपणही समाजाबरोबर मते बदलावीत (आणि स्वतःला 'सरडा' म्हणवावे) अथवा समाजातील बदलाकडे आणि त्यामुळे आपल्या जवळपासच्या लोकांवर पडणार्‍या प्रभावाकडे त्रयस्थपणे पहावे (आणि स्वतःला 'कुंपणावरचा शहाणा' म्हणवावे). त्या संस्थेच्या नफ्यातोट्याचे गणित जीवनात तोट्याचे ठरते आहे असे लक्षात आल्यास तो 'व्यवहार' समाज आपोआपच बंद करेल किंवा फायद्याचे ठरते आहे असे लक्षात आल्यास आणखी जोराने चालवेल.
शेवटी कोणत्याही संकल्पनेचे (मानवनिर्मित संकल्पना -पिवळे पितांबर) अस्तित्त्व हे या नफा-तोट्याच्या गणितावरच आधारलेले असते - ज्यांना तिचा (मानसिक/आर्थिक इ.) फायदा होतो ते त्या संकल्पनेला धरून राहतात (आणि कोणी जोरदार पुरस्कार करतात) तर ज्यांना त्याचा तोटा होतो ते त्यजतात (आणि कोणी जोरदार विरोध करतात). अशा वादी आणि प्रतिवादी लोकांच्या समुच्चयांपैकी जो गट समाजात बहुसंख्येने असेल त्यांचे मत सामाजिक परिस्थिती म्हणून स्विकारावे लागते. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाचे लोक ९०%हून अधिक होतात तेव्हा विरोधी पक्षाच्या मताला आवाज रहात नाही.
माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत अमुकवाद विरुद्ध तमुकवाद असे काळे पांढरे नसते. जी मते मला सोयीची आहेत ती मी स्विकारतो. ती कालमानपरत्वे बदलू शकतात. :) ;)

सहमत

प्रतिसादाशी सहमत. हेच लिहिणार होतो पण तुम्ही अधिक नेमक्या शब्दात लिहिले. समाजाला काही फरक पडणार नाही. समाजाची एक नवी व्याख्या तयार होईल व जे सद्यस्थितीला चिकटून राहतील त्यांना पुराणमतवादी म्हणून हिणवले जाईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विसुनानांच्या मुद्द्याला पुष्टी देणारा एक लेख

विवाहसंस्थेसंदर्भात काही रोचक विचार चतुरंग पुरवणीत आले आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर