प्रकाशनातील मनोविकार

दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आवृत्ती २००१ मधे स्वत:च आत्मविश्वासाने काढली. पुस्तक फलज्योतिष चिकित्सेवरील होते.जेष्ठ फलज्योतिष चिकित्सक श्री माधव रिसबुड यांच्या हस्ते प्रकाशित केले. प्रकाशन समारंभ केला. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॊ. नरेंद्र दाभोलकर व ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांचा जाहीर वादसंवाद ठेवला.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची दै.सकाळ ने दि २४/५/२००१ रोजी दखल घेतली. आता प्रश्न पुस्तक विक्रीचा आला. रसिक साहित्य मधे ४० टक्के कमिशननी विक्रिस ठेवले. तसेच बहुतेक प्रती अंनिस च्या शिबिरातच ठोक खपल्या. कारण पुस्तक चिकित्सेचे असल्याने व अंनिसत कार्यकर्ता असल्याने ते सहज शक्य झाले. आवृत्ती संपली.पुस्तक निर्मितीचे पैसे केव्हाच वसुल झाले होते. पुस्तक अनेक दिग्गजांना सदिच्छा भेट दिले होते. डॊ जयंत नारळीकरांनाही दिले होते. त्यांनी पुस्तकाची दखल घेतली. पुढे काही भर व सुधारणा करुन द्वितीय आवृत्ती सन २००३ मधे काढली. १३ एप्रिल २००३ मधे लोकसत्ता मधे डॊ जयंत नारळीकरांनी लक्षणीय पुस्तक सदरात त्याचे परिक्षण लिहिले. दिग्गजांनी लिहिलेल्या पुस्तकपरिक्षणाचा खपावर होणारा परिणाम हा चमत्कारासारखा असतो याची अनुभुती या निमित्तानी मिळाली.बाहेरगावातील पुस्तक विक्रेत्यांचे फोन आले. माझ्याकडे वितरण व्यवस्था नसल्याने मी नकार दिला. पण त्यांनी घरी येउन पुस्तक गोळा केले व रोख पैसे दिले.निम्मी आवृत्ती तर इथेच खपली. याही वेळी ४० टक्के कमिशननी रसिक साहित्य व साधना मिडिया सेंटर मधे पुस्तक विक्रिला ठेवले होतेच. एखाद दुसरा अपवाद वगळता पैसे वेळच्या वेळी सहज मिळत होते. पुस्तकाला रोखीने ६०% कमिशननी बाजारात मागणी होती. व्यावहारिक हिशोबाने मला ते किफायतशीर होते. मी ठोक विक्री करुन मोकळा झालो. या वेळी पुस्तक निर्मितीत काही प्रतीत बाइंडिंग चा दोष निर्माण झाला होता. परफेक्ट बाइंडिंग मधे चिकट द्रव्याचा गुणवत्ता चांगली नव्हती. बडोद्याहुन पुस्तक आवडल्याचा परंतु बाईंडिंग खराब प्रत मिळाल्याचे एका वाचकाचे पत्र मिळाले. ताबडतोब दिलगिरी व्यक्त करुन दुसरी प्रत स्वखर्चाने पाठवली. वाचकाला आवडल्याचा आनंद हा खर्चापेक्षा कितीतरी अधिक होता.
पुस्तकाची किंमत ही निर्मीती खर्चाच्या किमान ४ ते ५ पट ठेवावी लागते हा हिशोब मला माहित होता. अनेक जेष्ठांकडुन मला तो शिकायला मिळाला होता.मी प्रकाशक शोधत बसण्याऐवजी स्वत:च ते प्रकाशित करायचे ठरविले ते या मुळेच. प्रकाशक म्हणुन बायकोनेच ते स्वत:च्या ’संज्ञा सर्विसेस” या प्रोप्रायटरी फर्म द्वारा प्रकाशित केले. मुद्रक व प्रकाशकाने शासनाला पाठवण्याच्या प्रती मुंबई दिल्ली कलकत्ता व मद्रास अशा शासकीय ग्रंथालयाच्या ठिकाणी प्रत्येक आवृत्तीची स्व खर्चाने पाठवायच्या असतात. ते बंधनकारक आहे. प्रकाशन विश्व या डायरीचा या कामी उपयोग झाला. प्रकाशन वर्तुळात नारळीकरांना कस काय ’म्यानेज’ केल अशी विचारणा झाली. एकतर विषय फलज्योतिष त्यावर परिक्षण नारळीकरांचे अशा प्राथमिक माहितीवर काहींच्या भुवया उंचावायच्या. हरिभाउ लिमयेंच्या वास्तुशास्त्र पुस्तकाला एक प्रास्ताविक पर चार शब्द नारळीकरांनी लिहिले होते. त्यानिमित्त झालेल्या वादंगात महाराष्ट्र टाईम्स मधे नारळीकरांनी दिलगीरी व्यक्त केली होती. तेव्हापासुन ते ’अशा’ विषयावर जाहीर लिहित नसत. फक्त आपली भुमिका मांडत. अशा पार्श्वभुमीवर पुस्तकाचे सकारात्मक परिक्षण लिहिणे ही बाब मोठीच होती.
त्यानंतर २००५ मधे माझ्या जाहीर कार्यक्रमात प्रा मिलिंद जोशी यांनी एका व्यासपीठावर मुलाखत घेतली. त्यावेळी कार्यक्रमाला मनोविकास प्रकाशनचे श्री अरविंद पाटकर आले होते. त्यावेळी परिचय झाला.प्रतिथयश पुरोगामी प्रकाशक अशी त्यांची समाजात प्रतिमा आहे. मी तिसरी आवृत्ती काढण्याच्या तयारीत होतो. "आम्ही काढली तर चालेल का?" अशी विचारणा त्यांनी केली.व्यावसायिक प्रकाशकाने तिसरी आवृत्ती काढल्यावर आपल्याला त्यात अजिबात लक्ष घालण्याची गरज नाही असा विचार करुन मी 'हो' म्हणुन टाकले.त्यांनी करार, १० टक्के मानधन वगैरे गोष्टी तोंडी सांगितल्या.परंतु पुढे करारही झाला नाही व मानधनही अद्यापपर्यंत मिळाले नाही. त्यांनी आवृत्ती काढली. मला प्रतीही दिल्या. पण त्यावर 'प्रथम आवृत्ती' लिहिले होते. या बद्दल विचारले तर, "हो हो ती मनोविकासची पहिली अशा अर्थाने आहे". सार्वजनिक कार्यक्रमात ते अधुन मधुन भेटत असत. 'या कि एकदा' मी सुद्धा 'एकदा तुमच्याकडे यायचय' अस म्हणत पाच वर्षे गेली.मधल्या काळात मी पोलिस बिनतारी विभागातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली. मला पहायच होत कि प्रकाशक स्वत:हुन मानधन देतायत का? माझी थांबायची तयारी होत म्हणुन मी पाच वर्षे थांबलो. मानधन हे प्रकाशकाने लेखकाला मानाचे प्रतिक म्हणून स्वत:हुन देण्याचे धन आहे. करार हा कायदेशीर तांत्रिक बाब आहे. मानधन या शब्दात धना पेक्षा मान ही बाब अधिक महत्वाची.लेखकाने आपल्या मानधनाविषयी प्रकाशकाकडे तगादा लावावा लागणे ही बाब अपमानास्पद आहे. पाटकरांनी स्वत:हुन मानधनाचा विषय कधी काढला नाही. लेखकच तो विषय काढत नाही म्हटल्यावर आपण स्वत:हुन कशाला काढा. शेवटी मी इमेल द्वारे प्रकाशकांना आवृत्तीचा पारदर्शी पणा, मानधन, वस्तुस्थिती या बद्दल विचारणा केली. त्याचे उत्तर नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात मेल मिळाली एवढाच उल्लेख केला. मी त्यांना फेब्रुवारी २०१० मधे भेटायला गेलो. सध्या प्रकाशन व्यवसाय माझा मुलगा आशिष सांभाळतो मी फक्त मार्गदर्शन करतो. तुमची १००० ची आवृत्ती संपली आहे. पुस्तक अपेक्षेसारख चालल नाही अशी पुस्ती जोडली. देउ तुमच १० टक्के मानधन. कधी त्या बद्दल भाष्य नाही. आता ही बाब मला अपमानास्पद वाटायला लागली. मी त्यांना तसे स्पष्टपणे पत्राद्वारे कळवले. त्यावर त्यांचा भावना दुखावल्याचा फोन आला. मी त्यांना भावना दुखावल्या बद्दल क्षमस्व पण माझ्या विचारांवर मी ठाम आहे असे सांगितले.नंतर आशिष पाटकर यांचा फोन आला कि २००७ मधे आवृत्ती संपली असुन मार्च अखेर आमचे हिशोब झाले कि एप्रिल मे मध्ये वगैरे पैसे देउ. थोडक्यात या तीन महिन्याचा कालावधीत तुमचे मानधन आम्ही देणार नाही असा त्याचा अर्थ.मानधनाची हक्काची मागणी करणार्‍या लोकांना हाडतुड केल जात असे ऐकून होतोच.
पुस्तक म्हणजे 'माल'. तो खपणारा 'माल' आहे का हा विचार करुन प्रकाशक त्या मालाची निर्मिती करतो. वाचक म्हणजे 'गिर्‍हाईक' लेखक म्हणजे कच्चा माल पुरवणारा 'पुरवठादार' या तत्वावर ही 'साहित्य सेवा' चालते. १०० रुपयांच पुस्तकात २० रुपये तांत्रिक निर्मिती मुल्य असते. उरलेल्या ८० रुपयात वितरण कमिशन, मानधन, जाहिरात, कार्यालयीन खर्च, नफा वगैरे बाबी समाविष्ट असतात. जेव्हा संस्थात्मक गिर्‍हाईक म्हणजे ग्रंथालय असतात त्यावेळी व्यवहार ’ठोक’ होतो. शासकीय ग्रंथ खरेदी हा तर पुन्हा वेगळाच प्रांत इथे सगळे एमआर पी च्या खरेदीवर २० टक्क्यांपर्यंत सुट घेउन अगदी नियमात बसवुन खरेदी.सुमार पुस्तकांच्या किंमती सुद्धा अवाढव्य का असतात याचे रहस्य वाचकांना माहित हवे.
ज्या लेखकांशी प्रकाशकाने करार केलेले असतात ते सुद्धा पाळले जातात कि नाही यात साशंकताच. किती आवृत्त्या काढल्या, एका आवृत्तीत किती प्रती प्रत्यक्ष छापल्या हे प्रकाशकालाच ठावे! मराठी पुस्तके खपत नाही ही ओरड हिशोबाला कामी येते. अक्षरधारा हे ग्रंथप्रदर्शन चालवणारे रमेश राठिवडेकर म्हणतात कि मराठी पुस्तक खपत नाही हे खरे नाही. आपण वाचकांपर्यंत पोचण्यास कमी पडतो.त्यांच्या ग्रंथप्रदर्शनात मराठी पुस्तकांचा खप भरपुर होतो.
प्रकाशन व्यवसायात अनेक अपप्रवृत्ती शिरल्यात. कुठल्याही व्यवसायात त्या शिरतात. गंमत म्हणजे प्रथितयश व्यावसायिकांकडे सत व असत प्रवृत्तींच व्यावहारिक मिश्रण असत.काळ वेळ पाहुन ती अस्त्रे ते बाहेर काढीत असतात. मराठी वाचकाला भावनिक आवाहने करुन आपली प्रतिमा उंचावत ठेवायची व साहित्य सेवा करीत असल्याचा आव आणायचा. वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत. पुस्तकातील आशय संपन्नेतेपेक्षा पुस्तकाचे मार्केटिंग पुस्तकाला यशस्वी करते. बौद्धीक संपदा कायदा अजुन भारतात बाल्या वस्थेत आहे. पायरसी,कॊपीराईट या बाबतीत लेखक वाचकात जागरुकता नाही. कोर्टात बौद्धिक संपदा कायद्याच्या केसेस प्रलंबित असतात.कोर्टाच्या वाट्याला जाणे म्हणजे वेळ पैसा व श्रम यांचा अपव्यय हे गणित पक्के रुजलेले आहे.ते खोटेही नाही.
जोपर्यंत जातक आणि ज्योतिषी आहेत तो पर्यंत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद चालूच रहाणार आहे. पुस्तक रुपाने त्याचे भवितव्य काय हे भाकित मात्र जागरुक व सुजाण वाचकच ठरवणार आहेत.
(सदर लेख अन्य संकेतस्थळावर तसेच ईसकाळ वर प्रकाशित आहे)

Comments

उपक्रम

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद हे फक्त उपक्रमावर उपलब्ध आहे.
प्रकाश घाटपांडे

अशाने कसे होईल?

बौद्धीक संपदा कायदा अजुन भारतात बाल्या वस्थेत आहे. पायरसी,कॊपीराईट या बाबतीत लेखक वाचकात जागरुकता नाही. कोर्टात बौद्धिक संपदा कायद्याच्या केसेस प्रलंबित असतात.कोर्टाच्या वाट्याला जाणे म्हणजे वेळ पैसा व श्रम यांचा अपव्यय हे गणित पक्के रुजलेले आहे.ते खोटेही नाही.

सगळे ठीक आहे. पण अशाने कसे होईल? कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी. अशा प्रकाशकांना धाक बसवायला हवा.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

तत्वत॑:

तत्वतः हे जरी मान्य असले तरी व्यावाहिरिक दृष्ट्या विचार केला तर कॉपी राईट रजिस्टर करणे कामी येणारा खर्च, वकीलाची फी हे गणित जमत नाही. उदा. मनोविकासच्या आवृत्तीची किंमत ७५ रु आहे. आता हजार च्या आवृत्तीचे ७५०००/- त्याचे १० टक्के म्हणजे ७५००/- मिळणार कायदेशीर कारवाई करायची झाल्यास वेळ, श्रम व मुख्य पैसा याचा विचार तर करावाच लागतो. आपले उपक्रमी मनीष तथा ऍड मनीष साठे यांच्याशी मी बोललो ते बौद्धिक संपदा कायद्यावरच काम करतात. ते व हैयोहैयय्यो यावर अधिक भाष्य करु शकतील
१) आवृत्ती चा लेखक प्रकाशक करार केलेला नाही
२) कॉपी राईट रजिस्टर केलेला नाही
३) प्रकाशन होउन ५ वर्षे झालीत
सामाजिक दबाव हाच यावर प्रभावी उपाय आहे
प्रकाश घाटपांडे

कॉपीराईट

कॉपीराईट (स्वामित्वहक्क) हा रजिस्टर करावा लागत नाही. ज्याक्षणी गोष्टीची निर्मिती होते त्याक्षणी तो त्याच्या कर्त्याला मिळतो.

हा अधिकार लेखक/कवी वगैरेंना त्याने वहीत, संगणकावर त्याने पहिल्यांदा लिहिले तेंव्हापासून असतो. (त्यासाठी पुस्तक छापण्याची गरज नाही.) अगदी आपण जे उपक्रमवर लिहितो ते देखील याच कायद्यात बद्ध आहे.

तुमच्या माहितीतले ह.अ.भावे आहेत ते या विषयावरील तज्ञ आहेत. (असे त्यांनी मला कधी एकदा सांगितले होते.)

http://copyright.gov.in/Documents/CopyrightRules1957.pdf

वरील दुव्यात यातील माहिती मिळेल. अमेरिकन कायद्यात यापेक्षा जास्त स्पष्ट लिहिले आहे.
हा हक्क लेखकाला तहहयात व त्यानंतर ६० वर्षे त्याच्या वारसांना मिळतो. हा हक्क विकता येतो पण तसा करार व्हावा लागतो.
तुमच्या पुस्तकाचा स्वामित्व हक्क मिळविण्याची गरज तुम्हाला नाही.

तुम्ही प्रकाशकाबरोबर केलेल्या कराराचे पैसे मिळवण्यास याची अडचण नाही.

मला असेही वाटते की तुम्ही करार केला नाही म्हणून तुम्हाला मानधनाचा हक्क नाही. तुमचा तोंडी करार हा देखील कायद्याला बंधनकारक आहे. हा करार अमान्य करण्याचा हक्क दुसर्‍या पक्षास असतो. पण याबाबतीत त्यांची सुटका नाही. कारण (तोंडी) करार न करता त्यांनी पुस्तक छापले तर तो स्वामित्व हक्काचा भंग होईल.

माझ्यामते तुम्हाला कायदेशीर लढाई करण्यास काहीच अडचण नाही.

प्रमोद

रोचक मुद्दा

रोचक मुद्दा
म्हंजे ही लढाई पैसे दिले नाहित अशी न लढता, पुस्तक न विचारता छापले अशी लढावी असेच म्हणाचे आहे ना? तशी लढल्यास आम्ही विचारून छापले होते असे प्रकाशक म्हणेल मग तसा करार कुठे आहे असे कोर्ट विचारेल... तेव्हा तुम्ही जर करार असेल तर मला अजूनही एकही पैसा मिळालेला नाहि तेव्हा एकतर नुकसान भरपाई द्यावी किंवा स्वामित्त्व हक्कांअंतर्गत करार करून पैसे द्यावेत.. वगैरे वगैरे..

अर्थातच मी तज्ञ नाहि.. मात्र वरील प्रतिसाद वाचून तर्क समजला तो लिहिला

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

करार केलेला नाही

करार केलेला नाही. लेखक व प्रकाशक यातील कराराचा एक स्टँडर्ड फॉरमॅट असतो.त्यातील मुद्दे हे परस्परातील सहमतीने ठरवुन तो करार करायचा असतो.
कोर्टात लढायचे झाल्यास मानधना पेक्षा अवमान मूल्य हा मुद्दा महत्वाचा मानता येईल कारण मानधन हे फक्त १० टक्के म्हणजे साडेसात हजार असेल. कोर्टाची वकीलाची फी, केसचा खर्च हा विचार करता कोर्टात जाणे हे अव्यावहारिक आहे. कोर्टाचे प्रकरणात वेळ श्रम पैसा खर्च करण्याची ताकद माझ्यात नाही. त्यातुन लाभ काय मिळणार? तर मानधन.
मानधन जर साडे सात हजाराऐवजी अवमान मूल्य हे साडेसात लाख असते (दंड) तरी कोर्टाच्या प्राथमिक खर्चाची गुंतवणूक करणे खरच व्यवहार्य आहे का? हा प्रश्न उरतोच.
कोर्टाने कशाच्या आधारे हे पुस्तक काढले असे प्रकाशकाला विचारले तरी फक्त लेखकाची तोंडी सहमती एवढेच उत्तर आहे. ज्याच्याशी मी सहमत आहे. मला फसवुन तर काढले नाही. तसे असते तर पायरसी म्हणता आली असती.
आता फारतर बेकायदेशीर म्हणता येईल.
खरा मुद्दा तत्वाचा व व्यावसायिक नीतीचा आहे
प्रकाश घाटपांडे

प्रयत्न सोडू नका

मला असे वाटते की प्रयत्न सोडू नये.
न्यायालयीन कारवाई सुरु करण्यापूर्वीची प्रक्रिया म्हणजे वकिलामार्फत नोटीस पाठवणे. यासाठी फार खर्च येऊ नये.
ही पाठवलीत की सहसा विरुद्ध पक्षाला काहीतरी भूमिका घ्यावी लागते. (उत्तर म्हणून.) निदान त्यांचे काय म्हणणे आहे हे अधिकृत रित्या कळते. यानंतर न्यायालयात जायचे की नाही ते तुम्ही ठरवू शकता.

व्यावसायिक नीतित असा एक भाग असतो की वसूली करावी भले वसूलीच्या रकमेपेक्षा जास्त खर्च आला तरी. नाहीतर ऋणको माजतात. व एकंदर वसूली कमी होते.
तुम्ही व्यावसायिक लेखक नाही आहात तेव्हा तुम्ही या नीतिचा अंगिकार करावा असे नाही. तुम्ही लेख लिहून या प्रश्नाला वाचा फोडली आहे हे मात्र फार छान झाले. पुढची पायरी गाठलीत तर इतर अनेक लेखकांना पथदर्शी होऊ शकेल.

प्रमोद

हा तर भामटेपणा

हा तर भामटेपणा आहे.

अशा प्रकारचा अनुभव श्री. यनावाला यांना एका पुस्तकाबद्दल आला, असे त्यांनी सांगितल्याचे स्मरते.

"आपले हक्क बजावण्यास (१) लेखकाला भीड वाटेल, (२) लेखकाला उपद्वाप नकोसा वाटेल, (३) लेखकाला फिर्याद करायचा खर्च झेपणार नाही."
अशा प्रकारचा पाताळयंत्री हिशोब जुळवून या प्रकाशनसंस्था व्यवहार करत असतील काय? अशी शंका येते.

तुम्ही

तुम्ही निरनिराळ्याप्रकारे या व्यवसायातील
अप-प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठे प्रयत्न करत आहात हे स्तूत्य आहे.

मात्र सामाजिक दबाव आणावा म्हणजे काय काय करावे बरे?
सामान्य माणूस, 'लेखकाचे पैसे दिले आहेत का?' असे विचारून थोडेच पुस्तक विकत घेणार आहे?
का प्रकाशकांनी पुस्तकावर लेखकाचे मानधन विषयक व्यवहार पूर्ण झाले आहेत असा स्क्लेमर टाकतील? (एकुण अनुभव पाहता हे फायद्याचे असेल तरच ते टाकतील)

असो. मला वाटते की हा व्यवसाय रेग्युलेट करण्यासाठी योग्य त्या नियमावलीची गरज आहे.
सरकार अथवा प्रकाशकांची संघटना (असल्यास) किंवा लेखकांची संघटना (असल्यास) ते अशी कार्यवाही करू शकतील.
प्रकाशकांना लेखकाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ठरावीक कालावधीच द्यावा.

मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न व्हायला हवेत. तुम्ही जे प्रबोधन करत आहात हे त्याचा भाग म्हणून नाक्की कामास येईल.
आता काही प्रकाशकांनाच हाताशी धरून त्यांच्या कडून पुस्तकावर - 'लेखकाचे मानधन विषयक व्यवहार पूर्ण झाले आहेत' असे लिहवून घेणे तसेच याचे मोठे बॅनर्स बनवून ते पुस्तक प्रदर्शनाबाहेर लावणे. जसे, 'लेखकाचे मानधन विषयक व्यवहार पूर्ण झाले आहेत का? नसल्यास पुस्तके घेऊ नका!' सारखे.
असा सामाजिक दबाव आणता येऊ शकतो.

मराठी लेखकांना कायदेशीर मदतीसाठी आणि प्रकाशनाच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र संकेतस्थळ काढू या का?
मी मदत करायला तयार आहे.

आपला
गुंडोपंत

सुटे अनुभव

असंख्यांचे असे सुटे सुटे अनुभव आहे.अनेक लेखक या विषयी बोलत नाहीत.
अरविंद गुप्तांची पुस्तके मनोविकासने प्रकाशित केली आहेत ती ही अशीच. अरविंद गुप्तांनाही त्याविषयी फारसे स्वारस्य नाही.( हे मी त्यांच्याशी बोललो आहे) करताहेत तर करु देत प्रकाशित. आपले उपक्रमी प्रभाकर नानावटींचे ही एक पुस्तक मनोविकासने 'असेच' प्रकाशित केले आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रकाशक बाजारू आणि पोटभरू

काही मोठ्या आणि प्रथितयश प्रकाशन संस्थांचा काय अनुभव आहे? हे पाहायला हवे. पण एकंदरीत असे लक्षात येते की बरेच प्रकाशक हे बाजारू आणि पोटभरू असावेत. तेव्हा त्यांच्या नादाला लागण्यापेक्षा अलीकडे आलेले व्हर्चुअल मीडिया, (ब्लॉग, सोशल वेबसाईटस्‌, फोरम) हे नव्या काळातील व्यक्त होण्याचे चांगले माध्यम आहे. भविष्यात असेही घडेल की मोबाईल, इंटरनेटचा किंवा अन्य आधुनिक माध्यमांचा प्रभाव वाढेल, त्यातून कागदी किंवा छपाईची संस्कृती मागे पडेल. (मूळात आताच बदलत्या माध्यमांची झळ या प्रकाशन व्यवसायाला बसू लागली आहे) त्यामुळे नव्या साययबर पिढीचा प्रतिनिधी म्हणून मला असे वाटते की पुढचा काळ कागदी प्रकाशकांचा नाही.( कागदी हा शब्द अगदी चपखल आहे.)

अवांतर : ही प्रतिक्रिया लिहित असतानाच माझी एक वरिष्ठ पत्रकार महिला सहकारी म्हणाल्या की त्यांनाही एका प्रसिद्ध प्रकाशनाने असेच फसवले. माझ्या एका मैत्रीणीने एका प्रकाशकाचे (गल्लीबोळवाल्या) प्रुफरिडींगचे काम करून दिले. मात्र तिची कित्येक तासांची मेहनत वाया गेली. कारण त्या महिला प्रकाशकाने पैशांचे नावच काढले नाही. मुद्दा हा की केवळ लेखकांचीच फसवणूक होत नाही, तर अन्य कर्मचाऱ्यांचीही फसवणूक होते. आणि ग्रंथालये वगैरे संस्थांना पुस्तकविक्री करताना जे काही बरबटलेले व्यवहार चालतात, त्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे.

भामटे प्रकाशक का आतूर लेखक ?

मला वाटते, प्रकाशक जसे भामटे असतात तसे लेखकही अति अति आतुर् असतात.
लेखकांनी एकत्र येऊन यावर उठाव केला आणि योग्य मानधनाशिवाय लिहायला नकार दिला तरच काही तरी शक्य आहे.
पण फक्त आपले नाव छापून यावे म्हणून अनेक लेखक मानधनाची अपेक्षाच ठेवत नाहीत.
विशेषतः दिवाळी अंकात हा अनुभव हमखास येतो..

तेव्हा लेखकांनी जागे व्हा ! एकत्र व्हा ! आणि आत्मविश्वास बाळगा !

काही बाबतीत

काही बाबतीत आपण म्हणता तशी परिस्थिती आहे. असे ही प्रकाशक आहेत कि मानधन सोडा लेखकाकडुनच प्रकाशनाचा खर्च वसूल करुन त्याला लेखकराव बनवतात व प्रति खपवण्यासाठी लेखकालाच सांगतात.
या ठिकाणी लेखक प्रकाशकाकडे गेलेला असतो. त्याच्या उतावळेपणाचा फायदा प्रकाशक घेतो.
प्रकाश घाटपांडे

प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव


प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत.

विविध प्रकाशकांच्या कहाण्या व लेखकांची व्यथा वाचून मी खरोखर सुदैवी असे म्हणायला हवे. कारण मला भेटलेले प्रकाशक व वितरक खरोखर सचोटीची वागणून देणारे मिळाले आहेत.
नाडीग्रंथांवरील पहिले पुस्तक सप्टेंबर १९९४ ला पुण्यात दै.सकाळच्या छापखान्यात मी माझ्या हिमतीवर छापले नंतर पुण्यातील संदेश एजन्सीचे खरे यांच्या सौजन्याने कोणताही लेखी वा तोंडी करार न होता त्याच्या कडून ४५०० (साडेचार हजार)प्रतींचे वितरण झाले. उरलेल्या ५०० प्रती मी तांबरम मद्रासला नेल्या होत्या. त्याही कालांतराने आपला वार्ताहरवाल्या श्री. मुरलीधर शिंगोट्यांच्या तर्फे विकल्या गेल्या. त्याचे पैसे त्यांनी काही महिन्यात देऊन सौदा पुर्ण केला.
नवल असे की श्री. खरे नियतकालिकाचे वितरण करतात. पुस्तकाचे वितरण करत नाहीत. नाडीग्रंथ हा विषय पुर्णपणे अनोळखी. मी लेखक म्हणून शून्य माहितीचा. मराठीवाचक पुस्तके दुकानात विकत घ्यायला वाटवाकडी करून जात नाहीत. किंमतीकडे पाहून हात आखडता घेतला जातो. अशा परिस्थितीत ते पुस्तक अत्यंत माफक किंमतीचे असणे व सहज जाताजाता हाती यावे यासाठी नियतकालिकाच्या आकारात तयार करून वाचकांनी प्रवासात वा फावल्य़ावेळात वाचायला मिळावे असा विचार करून १२ रुपयांचे, साप्ताहिकाच्या आकाराचे बनवले होते. ते तसे बनावे असा मला आभासही झाला होता त्याची कहाणी मी पुर्वीच लिहिली आहे.
नाडी ग्रंथांचे वैशिष्ठ्य असे की ज्याला ते पहायची प्रेरणा होते तो जातोच अन्यथा कितीही ठरवले वा मनवले तरी जाणे होणार नाही वा पट्टी सापडणार नाही. असो.
नंतर माझे हिंदीतील पुस्तक ९६च्या नवीदिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात सहज फिरता फिरता डायमंड पॉकेट बुक्सच्या नरेंद्र वर्मांनी 'चायकी चुस्की लेते लेते' सहज हो म्हटले व त्या नंतर मी श्रीनगरहून स्र्किप्ट पाठवून ते पुस्तक तयार झाले. त्यानंतर त्या पुस्तकाच्या पुढील आवृत्यांचे मानधनाचे पैसै मी न मागता वेळेवर मिळत गेले. नंतर त्यांच्या विचारणेवरून इंग्रजीतील पुस्तक तयार झाले. त्यात नवी ७० पानांची भर घालून नवी आवृत्ती त्यांनी ऑक्टोबर २००९ ला दिमाखात प्रसिद्ध केली.
तमिळमधील नाडीवरील पुस्तकाचे वितरण चेन्नईच्या मे. गिरी ट्रेडींग एजन्सीने केले. त्यावेळी काही कामाने मी हवाईदलाच्या युनिफॉर्म मधे होतो. श्री. गिरी मला त्या वेषात पाहून म्हणाले, 'मीही पुर्वी हवाईदलात होतो याचा मला अभिमान आहे. तुमच्यासारख्या हवाईदलातील अधिकारी गैरतमिळाने तमिळ भाषेत पुस्तक काढले आहे याचा मला आनंद आहे. तुमचे तमिळ मधील पुस्तक वितरित करायलाच नव्हे तर यापुढे आणखी काही तमिळमधे लिहाल तर मी जरूर माझ्या प्रकाशनातर्फे व्यवस्था करीन.'
या पुस्तकाचे तमिळ रुपांतर करणाऱ्या श्री.गोपाळरावांनी एक ही पैसा न घेता महर्षींची सेवा म्हणून सुंदर भाषांतर अत्यंत अल्पकाळात करून दिले.
कन्नड भाषेत बंगलोरच्या संयुक्त कर्नाटक पेपरग्रुपतर्फे कर्मवीरा नावाच्या साप्ताहिकात माझे १७ लेख २००४मधे छापुन आले होते. त्यांना रुपांतराची परवानगी देऊन मी खरेतर विसरून गेलो होतो. गेल्या वर्षी काही जुनी कागदपत्रे चाळता सर्व आठवले. त्या नंतर बंगलोरला प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांच्या बदललेल्या मॅनेजमेंटने क्षमा मागून मला हातोहात मानधनाचा चेक दिला.
एक फोन आला. "मी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन आले आहे. त्यानंतर मला आपले मराठी पुस्तक वाचायला मिळाले. आपली परवानगी असेल तर आपल्या पुस्तकाचे गुजराथीत भाषांतर करायला मला आवडेल." त्या होत्या अहमदाबादेच्या सौ मेधा दिवेकर. मी आनंदाने होकार होताच महर्षींच्या कामाला लागल्या. रुपांतराच्या मानधनाचे त्यांनी नावच काढू दिले नाही. बडोद्याचे निलेशभाईं त्रिवेदीनी प्रकाशनाचा खर्च उचलला. पुस्तक ऑक्टोबरच्या १४ तारखेला नाडी ग्रंथावरील दुसऱ्या अधिवेशनात प्रकाशित झाले. मात्र त्याआधी सौ. मेधाताई दिवेकर न्युझीलंडला नातलगांकडे गेल्या त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट अद्याप झालेली नाही. पण तेथील वास्तव्यात माझ्या हिंदी पुस्तकाचे गुजराथीत भाषांतराचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
माझ्या अंधार छाया कादंबरीची तर फारच मजा. रेल्वेच्या प्रवासात एकांनी मनोकामना प्रकाशकांचे नाव सुचवले. मी पत्रांनी संपर्क करता, 'दहा हजार व हस्तलिखित पाठवावे लागेल. छापल्यावर १० प्रती देऊ' असा आदेश दिला. मी हस्तलिखित पाठवले पण दहा हजार पाठवायला असमर्थता दर्शवली. काय झाले कोणास ठाऊक त्यांनी ती कादंबरी विना पैसे घेता छापली. 'कोण हे मनोकामनाचे प्रकाशक आनंद हांडे?' पहायला मी आवर्जून इस्लामपुरला गेलो होतो. तेंव्हा भेट झाली नाही. पण १० प्रतींचे बंडल मिळाले. त्यानंतर २५ वर्षे झाली तरी प्रकाशक आनंद हाडे यांची प्रत्यक्ष भेट अद्याप झालेली नाही!
आणि सध्याचे माझे प्रकाशक नितीन प्रकाशनचे श्री. नितीन गोगटे यांची सचोटी व व्यवसायिकता अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. लेखी करार करून प्रत्येक आवृत्तीचे मानधनाचे पैसे चेकने देणे, पुस्तक विक्रीचा चोख हिशोब दाखवणे आदि ते करतातच पण त्यांची लेखकांशी सन्मानपुर्वक वागणूक डोळ्यात भरते. त्यांचे श्री काळे व अन्य सहकारी तितक्याच आस्थेने व सन्मानाने वागवतात.
आज माझ्या पुस्तकांच्या शेकडो प्रती खपतात. दिल्लीकडे हिंदीत माझ्या पुस्तकाची चोरी करून पुस्तके छापली गेली. पण अजूनही महर्षींच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत पार पडले आहे.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.

उडदामाजी काळे गोरे

खरे तर एखाद्या लेखकाला एखाद्या प्रकाशकाचा वाईट अनुभव आला म्हणून प्रकाशक ही जातच वाईट किंवा प्रकाशन व्यवसाय भामट्यांचा असे म्हणणे बरोबर नाही. सगळ्याच लेखकांना वारंवार असा अनुभव येत गेला असता तर एव्हाना हा व्यवसाय कधीच बंद पडायला हवा होता. तसे दिसत नाही त्याअर्थी अजुनही येथे नैतिकता किंवा प्रामाणिक व्यवहार यांचे पालन होते आहे, असे म्हणायला जागा आहे. प्रकाशन व्यवसायात साहित्यसेवा म्हणून पडणार्‍यांचे हात पोळल्याची अनेक उदाहरणे आहेत.
पु. ल. नी एका विनोदी लेखात गरीब कोकरासारखा लेखक आणि माजोरडा प्रकाशक (तळपायावर कुरुपे असलेला) अशी खिल्ली उडवली आहे. तेव्हापासूनच प्रकाशकांविषयी अनेक गैरसमज वाचकांच्या मनावर अद्याप पगडा जमवून आहेत, हे जाणवते.
प्रकाशजींचा अनुभव अस्वस्थ करणारा आहे, हे निश्चित. त्यांना यापुढील काळात चांगला प्रकाशक मिळो, ही प्रारंभीच भावना व्यक्त करतो. सकाळमध्ये असाच एक अनुभव प्रसिद्ध झाला आहे आणि अन्य दोन संकेतस्थळांवरही असेच अनुभव आहेत. त्यावरुन एकदम प्रकाशक हा कुणीतरी खलपुरुष किंवा बनेल आहे आणि त्याला धडा शिकवायलाच हवा, असा आवेश बर्‍याच प्रतिक्रियांतून दिसत आहे.
लेखक आणि प्रकाशक यांच्यातील व्यवहार हे शिस्तीनेच व्हायला हवेत. तोंडी आश्वासने, परस्पर विश्वास याला काहीही अर्थ नाही. म्हणूनच आपली फसवणूक होऊ नये, असे वाटत असेल तर लेखकांनी एक काळजी घ्यावी. ती म्हणजे त्यांच्यात आणि प्रकाशकांतील चर्चा लेखी/पत्राद्वारे होईल, हे पाहावे. म्हणजेच लेखकाचे लेखन पुस्तक रुपाने प्रसिद्ध करायचे आहे, असे पहिले पत्र प्रकाशकाकडून यावे. त्याला संमती देतानाच्या उत्तरात लेखकाने कराराचा मसुदा मागवून घ्यावा. व्यवहार ठरल्यानंतर दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी झालेली कराराची प्रत जतन करावी. यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार/पावत्याही जपून ठेवाव्यात. कारण प्रकरण न्यायालयात गेल्यास हाच पत्रव्यवहार महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. करारात मानधन किती व कसे देणार, लेखकाच्या हक्काच्या प्रतींची संख्या याचा स्पष्ट उल्लेख असलाच पाहिजे.
दुर्दैवाने भारतात अजुनही प्रकाशन व्यवसाय परदेशाप्रमाणे भरभराटीत नाही (बड्या प्रकाशन संस्थांची बात और) एखादे पुस्तक काढले तर त्याच्या हजार प्रती संपवतानाच अननुभवी प्रकाशकाच्या नाकी नऊ येतात. निदान वर्षभरात आवृत्ती संपणे म्हणजे सेलिब्रेशनच. विकायला नेलेल्या प्रतींचे पैसेही विक्रेते वेळेवर देत नाहीत. (पुस्तक विक्रेत्यांकडून थकबाकी वसूल करायला प्रकाशक रगेल व खमकाच पाहिजे.) पुस्तक काढताना प्रकाशक स्वतःच्या पदरचे लाख दीड लाख रुपये भांडवल घालतो. त्याचे रिटर्न दोन तीन वर्षांनी मिळतात. (मिळतातच असे नाही. पुस्तक न खपल्यास गठ्ठे परत येतात. ते एकतर लॉफ्टवर रचून ठेवायचे, वाचनालयांना सप्रेम भेट म्हणून द्यायचे, रद्दीत कवडीमोलाने विकायचे किंवा काहीच न जमल्यास लेखक आणि प्रकाशकाच्या बायकांनी संक्रांतीला वाण म्हणून लुटायचे) या क्षेत्रात हवशे, नवशे, गवशे, बनचुके, भोळसट, शोषण करणारे असे लोक आढळतात तसे ते लेखकांमध्येही आढळतात. फरक इतकाच आहे की लेखक नुकसान झाल्यास दहा हजार रुपयांसाठी रडतो तर प्रकाशक लाखभर रुपयांसाठी. नवोदित लेखकांची पुस्तके काढणे म्हणजे गंगाजळीतील पैसे समोर घेऊन 'अग्नये स्वाहा. इदं न मम' म्हणणे. पुस्तक प्रकाशन आणि चित्रपट काढणे हे एकाच कॅटॅगरीतले जुगार. पहिला लॉटरी असेल तर दुसरा रेस इतकेच.
जाऊदे. उडदामाजी काळे गोरे असणारच. तरीही प्रकाशकांवर विश्वास नसेल् तर लेखकांना एक करता येण्यासारखे आहे. आपणच आपल्या पुस्तकाचे प्रकाशक होणे आणि त्या सगळ्या सोपस्कारातून जाण्यापेक्षा स्वतःच व्यवहारातील फायदा-तोटा सोसणे. त्यायोगे त्यांना प्रकाशन व्यवसायातील बारकावे पण शिकता येतील. करके देखो. (हा उपरोध नाही हं)
जाता जाता. वर एकांनी 'आता काळ कागदी प्रकाशकांचा नाही. आगामी काळ इंटरनेटचाच' असे शुभवर्तमान प्रकट केले आहे. तसे होवो. नाहीतरी 'गेले ते दिन गेले' ही हळहळ आणि 'जुने जाऊद्या मरणालागुनी' हा आवेश या दोनच भावनांच्या गुंत्यात जग सापडले आहे. पण मग काही प्रश्नांची उत्तरे मिळत् नाहीत. पुस्तक/वाचन संस्कृतीचा अस्त क्षितिजावर दिसू लागला आहे तर साहित्य संमेलनात चार दिवसांत तीन कोटी रुपयांची पुस्तके कशी काय खपतात? असो. प्रत्येक घर इंटरनेटमय होईपर्यंत मरणासन्न प्रकाशकांना आणि पुस्तक प्रेमींना तेवढेच चार क्षण मिळतील ब्रीदिंग स्पेस म्हणून. हेही नसे थोडके.

दीड लाख!

दुर्दैवाने भारतात अजुनही प्रकाशन व्यवसाय परदेशाप्रमाणे भरभराटीत नाही (बड्या प्रकाशन संस्थांची बात और) एखादे पुस्तक काढले तर त्याच्या हजार प्रती संपवतानाच अननुभवी प्रकाशकाच्या नाकी नऊ येतात. निदान वर्षभरात आवृत्ती संपणे म्हणजे सेलिब्रेशनच. विकायला नेलेल्या प्रतींचे पैसेही विक्रेते वेळेवर देत नाहीत. (पुस्तक विक्रेत्यांकडून थकबाकी वसूल करायला प्रकाशक रगेल व खमकाच पाहिजे.) पुस्तक काढताना प्रकाशक स्वतःच्या पदरचे लाख दीड लाख रुपये भांडवल घालतो. त्याचे रिटर्न दोन तीन वर्षांनी मिळतात. (मिळतातच असे नाही. पुस्तक न खपल्यास गठ्ठे परत येतात. ते एकतर लॉफ्टवर रचून ठेवायचे, वाचनालयांना सप्रेम भेट म्हणून द्यायचे, रद्दीत कवडीमोलाने विकायचे किंवा काहीच न जमल्यास लेखक आणि प्रकाशकाच्या बायकांनी संक्रांतीला वाण म्हणून लुटायचे) या क्षेत्रात हवशे, नवशे, गवशे, बनचुके, भोळसट, शोषण करणारे असे लोक आढळतात तसे ते लेखकांमध्येही आढळतात. फरक इतकाच आहे की लेखक नुकसान झाल्यास दहा हजार रुपयांसाठी रडतो तर प्रकाशक लाखभर रुपयांसाठी. नवोदित लेखकांची पुस्तके काढणे म्हणजे गंगाजळीतील पैसे समोर घेऊन 'अग्नये स्वाहा. इदं न मम' म्हणणे. पुस्तक प्रकाशन आणि चित्रपट काढणे हे एकाच कॅटॅगरीतले जुगार. पहिला लॉटरी असेल तर दुसरा रेस इतकेच.

दीड लाखात कुठला कुठला खर्च गृहीत धरला आहे? हे दीड लाख रूपये फक्त हजार प्रतींसाठी? १२८ पानांच्या डेमी आकाराच्या पुस्तकाच्या हजार प्रती छापण्यासाठी किती खर्च येईल बरे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

होय. लाख ते दीड लाख

धम्मकलाडूजी,
मी एका पुस्तकासाठी प्रकाशकाला करावी लागणारी गुंतवणूक लाख ते दीड लाख रुपये असते, असे लिहिले आहे ते सर्व खर्च गृहित धरुनच म्हटले आहे. यात पुस्तकाचा निर्मितीखर्च + विपणन व पाठवणी खर्च + प्रसिद्धी व जाहिरात असा खर्च समाविष्ट असतो.

आपण विचारले आहे, की १२८ पानाच्या डेमी आकाराच्या पुस्तकाच्या हजार प्रती काढण्यासाठी किती खर्च येईल? कृपया लक्षात् घ्या की पुस्तकाचा खर्च हा कागदाचा दर्जा, मुखपृष्ठ कसे आहे, त्यात चित्रे/रेखाटने आहेत का, डीटीपी, प्रूफरीडिंग, बायंडिंगचा प्रकार, लेखकाचे मानधन, पुस्तक विक्रेत्यांना देणार असलेल्या कमिशनचे प्रमाण, विपणन व प्रसिद्धीचा खर्च, जाहिरातीचा खर्च या घटकानुसार कमी-जास्त होत असतो. आपण असे गृहित धरुया, की लेखकाने केवळ हस्तलिखित किंवा टाईप्ड मजकुराचे बाड प्रकाशकाकडे दिले आहे आणि प्रकाशकाला ते पुस्तक दर्जाशी तडजोड न करता उत्तम काढायचे आहे तर ढोबळ आकडेवारी अशी :

केवळ निर्मितीखर्च ( १२८ पाने, डेमी, १००० प्रती, कागद खर्च + कव्हर करुन घेणे + ४ कलर कव्हर प्रिंटिंग, परफेक्ट बायंडिंग, डीटीपी, प्रूफरीडिंग, प्लेट्स् इ.) = ४१००० रुपये म्हणजेच प्रत्येक प्रतीसाठी ४१ रुपये.

जर निर्मितीखर्चच ४१००० रुपये असेल तर पुढे ४० टक्के विक्रेत्यांचे कमिशन, विपणन व प्रसिद्धीचा खर्च आणि लेखकाचे १० टक्के मानधन हा खर्च गृहित धरुन लाख ते दीड लाख रुपये एवढी गुंतवणूक करण्याची तयारी ठेवावीच लागते. गंमत् म्हणजे प्रकाशकाला एक पुस्तक काढून पुढची दोन वर्षे पैसे सुटायची वाट बघत गप्प बसून चालत नाही. नवनवीन पुस्तके सातत्याने आणावीच लागतात. शो मस्ट गो ऑन, हे तत्त्व पाळले तरच तो व्यवसायात टिकतो. म्हणजे त्याला निरंतर गुंतवणूक करावीच लागते आणि ती अडकली की श्रद्धा और सबुरी हे वाक्य आठवत बसावे लागते.

जर लेखकालाच पुढच्या सर्व प्रक्रियेचा अनुभव आणि फायदा-तोटा सहन करण्याची जिद्द असेल तर तो १००० प्रतींच्या मागे न लागता 'प्रिंट ऑन डिमांड' या पर्यायाचा वापर करु शकतो. सकाळच्या मुक्तपीठ पुरवणीत एकाने आपल्या प्रतिसादात याचा दरासहित उल्लेख केला आहे. त्यानुसार १०० पानांच्या १०० प्रतींना ७००० रुपये खर्च येतो असे म्हटले आहे. हे करुन देणार्‍याचे नाव व संपर्क दिला आहे.

असो, मला वाटते की आपण मूळ विषयापासून विचलित नको व्हायला. प्रकाशजींना जसा अनुभव आला तसा खरे तर नवोदित किंवा प्रस्थापित कुणाही लेखकांना येऊ नये. पण सर्वच व्यवसायांत प्रामाणिक तसेच लबाड लोक असतातच. आपल्या हातात काय राहाते तर 'चांगला अनुभव आल्यास माणूस जपून ठेवा. वाईट अनुभव आल्यास पुन्हा त्या व्यक्तीकडे चुकून फिरकू नका' एवढेच. मला स्वतःला एक वाक्य पटते. 'एक माणूस एका माणसाला एकावेळी फसवू शकतो. एक माणूस अनेकांना एकावेळी फसवू शकतो, पण एक माणूस एकाला किंवा अनेकांना अनेक वेळा फसवू शकत नाही.'

 
^ वर