कॉटिंग्ली पर्‍यांचे प्रकरण

आजवरच्या देशी-विदेशी साहित्यातील सर्वोत्कृष्ट सत्यान्वेशी कोण - याचे उत्तर साहित्य रसिकांकडून वेगवेगळे आले तरी बहुमताचा मान शेरलॉक होम्सला मिळेल असे वाटते. गेल्या एका शतकाहून अधिक काळापर्यंत वाचकांना मोहवून ठेवण्यात शेरलॉक होम्सला घवघवीत यश मिळाले आहे. थोडासा तिरसट, सामाजिक शिष्टाचारांपासून चार हात दूर पण चलाख आणि धूर्त अशा शेरलॉक होम्सच्या यशाचा खरा धनी मात्र त्याचा जनक आर्थर कॉनन डॉयल मानायला हवा. हुशार, धूर्त आणि प्रचंड निरीक्षण दृष्टी असणारा चिकित्सक शेरलॉक होम्स, पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉयलच्या वैद्यकीय ज्ञानातून उभा राहिला असावा असे म्हटले जाते. शेरलॉक होम्सच्या कथांना प्रसिद्धी मिळाली 'द स्ट्रँड मॅगझिन' या मासिकातून. डॉयलच्या कथांनी गुन्हेगारी-सत्यान्वेशी आणि चातुर्य कथांना फार मोठी प्रसिद्धी आणि वाचकवर्ग दिला. आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.

ही घटना आहे सुमारे पहिल्या महायुद्धाच्या नंतरची. कॉटींग्ली या इंग्लंडमधील एका गावात दोघा मुलींना काहीतरी अविस्मरणीय दिसून येण्याची. १६ वर्षीय एल्सी राइट आणि तिच्याकडे राहायला आलेली तिची एक १० वर्षीय बहीण फ्रान्सीस ग्रिफिथ्स यांना घरामागील एका ओढ्यावर खेळताना पऱ्या दिसल्या. नाजूक, पंखधारी, चिमुकल्या पऱ्यांना या बहिणींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि एका अविस्मरणीय कहाणीचा जन्म झाला.

एल्सी राईट ही एका सुशिक्षित घरातील मुलगी. तिचे वडील पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. एकदा वडलांचा कॅमेरा घेऊन तिने आणि फ्रान्सीसने घरामागील ओढ्यावर काही छायाचित्रे काढली. ही चित्रे डेवलप करताना एल्सीच्या वडलांना त्यात पऱ्या दिसल्या. प्रथमतः त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि त्यांनी एल्सीला कॅमेरा वापरण्यास बंदी घातली. तिच्या आईला मात्र ही छायाचित्रे पाहता क्षणीच त्यांच्या खरेपणाविषयी विश्वास वाटला. याचे कारण असे की एल्सीची आई गूढ-आध्यात्मवादावर विश्वास ठेवणारी होती. पऱ्या, देवदूत, जादू आणि इतर गोष्टींवर तिचा विश्वास होता त्यामुळे आपल्या मुलीने यात कोणताही बनाव केलेला नाही अशी तिची खात्री झाली. "थिऑसॉफिकल सोसायटीच्या" एका सभेत तिने या प्रकरणाची वाच्यता केली आणि दोन लहान मुलींनी पऱ्या पाहिल्या. एवढेच नाही तर त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली.

परीसमवेत फ्रान्सीस
परीसमवेत फ्रान्सीस

थिऑसॉफिकल सोसायटीच्या एका सदस्याने ही छायाचित्रे तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवली असता या तज्ज्ञाने छायाचित्रांच्या छायाप्रती (निगेटिव्हज) विश्वसनीय असल्याची ग्वाही दिली. ही माहिती फिरत फिरत सर आर्थर कॉनन डॉयल यांच्यापर्यंत पोहोचली. स्ट्रँड मासिकाने आपल्या ख्रिसमसच्या अंकात या पऱ्यांवर लेख लिहिण्याचे आवाहन डॉयल यांना केले. डॉयल यांनी या प्रकरणाला प्रसिद्धी देणाऱ्या थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य एडवर्ड गार्डनर यांच्याशी आणि एल्सिच्या वडलांशी संपर्क साधला. तोपर्यंत या प्रकरणाबाबत साशंक असणारे एल्सीचे वडील सर आर्थर कॉनन डॉयल छायाचित्रांच्या प्रकाशनाची परवानगी मागत आहेत या मागणीने सुखावले आणि त्यांनी छायाचित्रे वापरण्याची परवानगी डॉयल यांना दिली. यानंतर गार्डनर आणि डॉयल यांनी हे फोटो छाननीसाठी कोडॅक आणि इलफोर्ड या छायाचित्रीकरणासाठी प्रसिद्ध कंपन्यांकडे पाठवले. पैकी कोडॅक कंपनीतील अनेक तज्ज्ञांना ही छायाचित्रे विश्वसनीय वाटल्याचे सांगितले जाते. इलफोर्डला या छायाचित्रांत बनाव असल्याचे वाटले. दोन्ही कंपन्यांनी जाहीरपणे या छायाचित्रांना विश्वसनीय करार देण्यास नकार दिला पण डॉयल यांनी हार मानली नाही.

परीसह एल्सी
परीसह एल्सी

एडवर्ड गार्डनर यांनी एल्सीच्या घरी जाऊन पऱ्यांची आणखी चित्रे मिळवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही मुलींनी खूप लोक गोळा झाले तर पऱ्या संपर्कात येणार नाहीत असे कारण दिल्याने गार्डनर यांनी चांगले कॅमेरे या मुलींच्या हाती देऊन स्वच्छ सूर्यप्रकाशात त्यांना छायाचित्रे घेण्याचे सुचवले. त्यानुसार या मुलींनी घेतलेल्या अनेक छायाचित्रांतून केवळ दोन छायाचित्रांत पऱ्यांचे दर्शन झाले. गार्डनर यांनी ही बातमी ताबडतोब डॉयल यांना कळवली. त्या वेळेस डॉयल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. बातमी कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. या लेखाच्या निमित्ताने अतींद्रिय शक्तींवर लोकांचा विश्वास बसेल असा त्यांचा ग्रह झाला.

१९२० सालच्या डिसेंबर महिन्यात सर आर्थर कॉनन डॉयल यांनी आपला लेख स्ट्रँड मासिकात प्रसिद्ध केला. गोपनीयता राखण्यासाठी लेखातील नावे बदलून टाकण्यात आली. मासिकाच्या प्रती रातोरात खपल्या. डॉयल हे प्रसिद्ध लेखक असल्याने सुरुवातीला संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण नंतर लेखावर उलट-सुलट प्रतिक्रियांना उधाण आले. या लेखाचे खंडन करणाऱ्यांनी आपापल्या लेखांतून डॉयल यांची आणि या प्रकरणाची खिल्ली उडवली तर डॉयल यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्यावर विश्वासही दाखवला. १९२२ साली डॉयल यांनी या प्रकरणावर "द कमिंग ऑफ द फेअरिज" नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. काही काळानंतर या प्रकरणाने उडालेला धुरळा खाली बसला.

पुढील अनेक वर्षे आपल्याला पऱ्या दिसल्या होत्या या विधानावर या दोन्ही मुली ठाम राहिल्या. या छायाचित्रांत पऱ्यांची कात्रणे वापरली होती हे त्यांनी कबूल करण्यास १९८३ साल उजाडले.

आज या छायाचित्रांवर नजर टाकली तर चित्रातील पऱ्या मानवांप्रमाणे त्रिमित नाहीत हे सहज ध्यानात येते. या मुलींनी लहान मुलांच्या पुस्तकातून कापून त्या छायाचित्रांसाठी उभ्या केल्या असाव्यात आणि पिन किंवा पातळ धाग्याने लटकवल्या असा अंदाज सहज बांधता येतो. एल्सीच्या वडिलांनी स्वतःही असे म्हटले होते की ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना ही ठकबाजी वाटली आणि त्यांनी मुलींच्या खोल्यांची झडती घेतली होती परंतु त्यांना कुठलीही कात्रणे, चित्रे मिळाली नाहीत. तरीही, छायाचित्रांकडे निरखून पाहिले तर ही ठकबाजी आहे हे सहज लक्षात येते. १९२० साली छायाचित्रण ही कला नवी असली तरीदेखील ही ठकबाजी आहे असे अनेकांच्या लक्षात आले होतेच परंतु अशी ठकबाजी इतक्या लहान निष्पाप मुली करतील हा विचार अनेकांना रुचला नसावा. सर आर्थर कॉनन डॉयल हे त्यापैकीच एक.

आपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला. "द घोस्ट क्लब" नावाच्या अतींद्रिय शक्तींचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे ते सदस्यही होते. त्यांच्या या वेडापायी हॅरी हुडिनी या प्रसिद्ध जादुगाराशी त्यांची घनिष्ठ मैत्री फाटली होती कारण हुडिनीच्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचा त्यांना विश्वास होता आणि हुडिनीचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता; तो अशा फसवणुकीचा पर्दाफाश करण्यास उत्सुक असे. डॉयल यांच्या काही मित्रांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष आयुष्यात डॉयल हे अतिशय सरळ आणि साधे गृहस्थ होते. गूढ गोष्टींवरील विश्वास आणि लहान वयाच्या निष्पाप मुली अशी फसवणूक करूच शकत नाहीत अशी त्यांची धारणा यामुळे त्यांची फसवणूक झाली असावी.

कारणे काहीही असतील, आपल्या लेखनातून बारीकसारीक निरीक्षणांवर भर देणारा चिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.

पूरक माहिती आणि अन्य छायाचित्रे:

विकीवर कॉटिंग्ली पर्‍या
कॉटिंग्ली. नेट
द कमिंग ऑफ फेअरीज - आर्थर कॉनन डॉयल

लेखातील सर्व चित्रे विकीपिडीयावरून साभार.

लेखनविषय: दुवे:

Comments

माणूस बदलतो

आपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला.
हेच असावे. माणूस कसा व केवढा बदलेल काही सांगता येत नाही. अगदी कट्टर नास्तिकाचा खासगी जीवनातील दुर्दैवी घटनांमुळे आस्तिक होताना आणि अगदी संघाच्या कट्टर प्रचारकालाही मार्क्सवादी पक्षाच्या कार्यासाठी झोकून देताना मी बघितले आहे. असो. चांगली माहिती व लेख. ह्यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विश्वसनीय करार देण्यास

लेख आवडला.
'विश्वसनीय करार देना' हिंदी, 'विश्वसनीय ठरवण्यास' मराठी - चुभूद्याघ्या.

मान्य

'विश्वसनीय करार देना' हिंदी,

गडबड झाली. :-) चूक कबूल.

छान लेखन

छान लेखन
माणसाची "मती" कधी तर्क सोडेल सांगता येत नाहि हेच खर

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

व्वा ! लेख आवडला.

माणसाची "मती" कधी तर्क सोडेल सांगता येत नाहि हेच खर

सहमत आहे....!

-दिलीप बिरुटे

आभार.....

लेख उत्तम झाला आहे. नवीनच माहिती कळाली. डॉयलच्या मनातल्या प्रतिमेवर थोडाफार परिणाम नक्कीच झाला.

==================

+

छान लेख

इतिहासातल्या या घटना विस्मरणात जाऊ नयेत. शिकवण म्हणून ही आधारसामग्री उपलब्ध असावी.

माहितीपूर्ण तसाच वाचनीय लेख. धन्यवाद.

छान

लेख आवडला. या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती.

---

फार सुंदर

पर्‍या फारच सुंदर आहेत, आणि एल्सी आणि फ्रान्सिसही. छायाचित्रासाठी आपण पर्‍यांची कात्रणे वापरली होती हे रहस्य त्यांनी जेव्हा प्रकट केले तेव्हा एल्सीचे वय ऐंशीच्या आसपास असणार. तेव्हा कॉनन डॉयल नसणार की मुलींचे वडील. इतकी वर्षे स्त्रियांनी एखादी गोष्ट गुप्त ठेवणे हे केवढे आश्चर्य?--वाचक्‍नवी

जनुके गंडली

चिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.

बहुतेक डॉयल स्वयंप्रज्ञ नसावेत आणि त्यांची जनुके गंडली असावीत.. (ह. घ्या.)

लेख विचार करायला लावणारा आहे. डॉयल यांना नैराश्य आल्यामुळे अतींद्रिय शक्त्तींवर विश्वास बसला आणि फसवणूक झाली. पण "फसवणूक" होण्याआधी बर्‍याचदा लोकांची दयाबुद्धी, कधी मित्रभावना वरचढ होतात, तर कधी फसवणूक होईल असे समजण्याइतके पुरावे आणि माहिती मिळालेली नसते. त्यात फसल्याचे दु:ख तेव्हाच होते, जेव्हा अपेक्षा अमाप वाढलेल्या असतात.

उत्तम लेख

एका नवीन विषयावरचा अतिशय वाचनीय लेख. धन्यवाद प्रियाली.
चन्द्रशेखर

+१

हेच म्हणतो. वाचनीय लेख :-)

आधी

मला वाटले एखादी प्रसिद्ध न झालेली होम्सकथा आहे की काय? :)

लेखावरून थोडा गैरसमज होण्याची शक्यता आहे. डॉयल परीप्रकरणात गंडले असले तरी त्यांनी इतर प्रकरणांमध्ये गुन्हे सोडवण्यासाठी पोलिसांची मदतही केली होती.

--
What other people think about you is none of your business because it really isn't about you, it is about them. -- Sean Stephenson
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लेख- उत्सुकता

लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. शेवटी त्या पर्‍या खर्‍या नव्हत्या हे कळल्यावर काही अंशी हिरमोड झाला :(
नवीन माहिती कळाली, वाचतांना मौज वाटली !!

हम्म...

>>>लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. शेवटी त्या पर्‍या खर्‍या नव्हत्या हे कळल्यावर काही अंशी हिरमोड झाला :(

माझाही जरा हिरमोडच झाला. :(

-दिलीप बिरुटे

कॉनन डॉयल

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
" सायन्सः गुड,बॅड & बोगस" हे मार्टिन गार्डनर (प्रियाली यांच्या लेखातील गार्डनर वेगळे.ते एडवर्ड) यांचे पुस्तक आहे. त्यात "इर्रिलेव्हन्स ऑफ् कॉनन डॉयल" हा आठपानी लेख आहे. त्यात लिहिले आहे:
"..द फॉलॉइंग व्हॉल्युमस् ऑफ् स्पिरिच्युऍलिस्ट अपोलोजेटिक्स फ्लोड फ्रॉम हिज(दॅट ऑफ् डॉयल) पेनः
द व्हायटल मेसेज, द वाँडरिंग ऑफ् अ स्पिरिच्युऍलिस्ट, अवर् अमेरिकन ऍड्व्हेंचर,अवर् सेकंड अमेरिकन ऍडव्हेंचर ,द केस् ऑफ् स्पिरिट फोटोग्राफि, सायकिक एक्सपिरियन्सेस,द मिस्टरी ऑफ् स्पिरिच्युऍलिझम,द लँड ओफ् मिस्ट,दि एज ऑफ् दि अन्नोन,अँड, नॉट लीस्ट,अ मॉन्युमेंटल टु व्हॉल्युम हिस्टरी ऑफ् स्पिरिच्युऍलिसम्
...इट इज नो गुड टु से दॅट डॉयल हॅड बिकम सेनाईल. क्लीयर्ली हि हॅड नॉट.हिज फायनल इयर्स वेअर रिमार्केब्ली व्हिगरस अँड प्रॉडक्टिव.हिज लास्ट बुक दि एज(इ-डी-जी-ई) ऑफ् दि अन्नोन, पब्लिशड इन् १९३०,द इयर दॅट ही डाईड ऍट ७२, इज मॉडेल ऑफ् ल्यूसिड,ब्यूटिफुली स्ट्रक्चर्ड प्रोज....

आता

कॉनन डॉयल हेट क्लब निघणार बहुतेक :)

--

जनुके, हेट क्लब, स्रिया आणि गुप्त गोष्टी

सर्वप्रथम, प्रतिसादांसाठी धन्यवाद.

@ चित्रा -

बहुतेक डॉयल स्वयंप्रज्ञ नसावेत आणि त्यांची जनुके गंडली असावीत..

हल्ली जनुके आणि स्वयंप्रज्ञ हे शब्द नाईटमेअर्स ठरू पाहत आहेत तेव्हा त्यांना लांबच ठेवू. ;-)

"फसवणूक" होण्याआधी बर्‍याचदा लोकांची दयाबुद्धी, कधी मित्रभावना वरचढ होतात, तर कधी फसवणूक होईल असे समजण्याइतके पुरावे आणि माहिती मिळालेली नसते. त्यात फसल्याचे दु:ख तेव्हाच होते, जेव्हा अपेक्षा अमाप वाढलेल्या असतात.

फसल्याचे दु:ख अपेक्षाभंगाने होते हे खरे आहे.
@ वाचक्नवी

इतकी वर्षे स्त्रियांनी एखादी गोष्ट गुप्त ठेवणे हे केवढे आश्चर्य?

मीही हेच म्हणते. संकेतस्थळावर काही ओळखींविषयी लोकांना संदेह असतो. त्यांना हेच सांगत असते की स्त्री नसावी, असती तर गुपीत उघड झाले असते. ;-) ह. घ्या.

मला वाटते की १९६६ च्या मुलाखतीनंतर एल्सीने आपले विधान थोडेसे बदलले. आपल्या कल्पनाशक्तीने फोटोंद्वारे मूर्त स्वरूप घेतले म्हणून फोटोंत पर्‍या दिसू लागल्या असे तिने म्हटल्याचे दिसते. फ्रान्सीसच्या बाबतीत मात्र गोष्ट थोडी वेगळी असू शकेल. नकळत्या वयी एखादी गोष्ट मनावर ठसली तर तेच सत्य आहे अशी आठवण राहणे शक्य वाटते.

@ राजेंद्र

कॉनन डॉयल हेट क्लब निघणार बहुतेक :)

डॉयल यांची "पुण्याई" त्या हेट क्लबला गप्प बसवेल असे वाटते. ;-) पुढील चर्चा - पापपुण्य की बुद्धीप्रामाण्य?

पुण्याई?

म्हणजे तुम्ही आस्तिक? मग उत्क्रांतीचे काय? त्यावर तर विश्वास आहे ना? आणि एकविसाव्या शतकात पुण्याई* वगैरे.. चक चक.. :)

*ह. घ्या. हे. वे. सा. न.
सध्या पुण्याई, श्रद्धा, धर्म, आयुर्वेद असे शब्द वाचले की आमचे भान हरपते आणि आम्ही दिसेल त्याच्या अंगावर धावून जातो. :प्

--

क्षमस्व

माझ्या गंमत म्हणून लिहीलेल्या प्रतिसादातील एका शब्दावरून परत वाद सूरू होईल असे वाटले नव्हते. आता टिप्पणी खरोखरच 'सिरियसली' घ्यायची वेळ आली आहे की काय असे वाटते. धागा डिरेल करण्यासाठी कारणीभूत झाल्याबद्दल क्षमस्व.
--
What other people think about you is none of your business because it really isn't about you, it is about them. -- Sean Stephenson
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

विनाकारण संपादन

This comment has been moved here.

विषयाशी संबंधित नसणारे सर्व प्रतिसाद श्री. रिकामटेकडा यांच्या चर्चेत हलवले आहेत. उपक्रमाच्या धोरणात न बसणारे प्रतिसाद वेळोवेळी संपादित होतील याची नोंद संबंधितांनी घ्यावी.

कोपर्निकसचा रेव्होल्यूशनरी सिद्धान्त

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"हल्ली जनुके आणि स्वयंप्रज्ञ हे शब्द नाईटमेअर्स ठरू पाहत आहेत तेव्हा त्यांना लांबच ठेवू. ;-)"


"पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते म्हणून सूर्य,चंद्र तसेच सर्व नक्षत्रे पूर्वेकडे उगवून पश्चिमेकडे मावळतात असे दिसते." अशी थियरी जेव्हा कोपर्निकसने मांडली तेव्हा,
"असं होय! मला तर बाबा हे ऐकल्यापासून गरगरल्यासारखे वाटते आहे. ;)" अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली. कालांतराने माणसांचे गरगरणे थांबले.पृथ्वीचे अजून चालूच आहे.

लांब ठेवणे योग्य

हा विषय लांब ठेवणे हे ठीक. :)

ह्.ने.

ह्.ने. (हसण्यावारी नेले!)--वाचक्‍नवी

लेख आवडला

वेगळ्याच विषयावर माहिती मिळाली. लेख आवडला.

रोचक माहिती

नवीनच माहिती मिळाली. रसायनांमधला रस, अफुचे व्यसन वगैरेंतूनही होम्सही थोडा अतिमानवीच चितारल्यासारखा वाटतो.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

अतिमानवी

रॉबर्ट डाउनी ज्यु. चा शेरलॉक होम्स पाहिलात का? पाहिल्यास शेरलॉक होम्स अतिमानवीच होता हे "लॉक" करता येईल. ;-)

कॉनन डॉयल आणि परामानसशास्त्र

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. आरागॉर्न लिहितातः
"आता कॉनन डॉयल हेट क्लब निघणार बहुतेक :)"

तर तसे नाही.प्रियाली यांच्या लेखातील:"आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.
या विचारांशी मे पूर्ण सहमत आहे. तसेच मार्टिन गार्डनर यांच्या पुस्तकातील अवतरण लेखातील विचारांना पुष्टी देणारे आहे.सत्याला सामोरे जायला हवे.
त्याच पुस्तकात गार्डनर लिहितातः"पुत्राच्या अकाली निधनामुळे डॉयल अध्यात्माकडे(स्पिरिच्युऍलिझम्) वळला हे म्हणणे खरे नाही. तो जेव्हा तरुण आयरिश कॅथॉलिक होता तेव्हापासूनच त्याला परामानस विषयाचे विलक्षण आकर्षण होते.या विषयाच्या प्रसाराचा आरंभ त्याने १९१६ मधे ,म्हणजे पुत्रनिधनाच्या पूर्वी दोन वर्षे, केला.या विषयावर त्याने अनेक व्याख्याने दिली.अनेक वादविवाद सत्रांत भाग घेऊन आपल्या विषयाचे हिरीरीने समर्थन केले. नियतकालिकांतून लेख,या विषयावरील पुस्तकांसाठी प्रस्तावनालेखन, पुस्तकपरिचय, हस्तपत्रके, अनेकानेक लिहिली.तसेच या विषयावर विपुल ग्रंथनिर्मिती केली."

डॉयलचे हे सर्व लेखन उपलब्ध आहे. मार्टिन गार्डनरची सर्व विधाने पुराव्यावर आधारित आहेत. ती तुम्ही नाकारणार का? मार्टिनने कॉनन डॉयल हेटक्लब सुरू केला असे म्हणणार का?

हेट क्लब

बुद्धिप्रामाण्य हेट क्लब मात्र नक्कीच सुरू आहे.

माणूस

कलावंत आणि त्या कलावंतामागील माणूस यांच्यात बरेचदा विसंगती असते. त्यामुळे डॉयलच्या या स्वभावाचे विशेष आश्चर्य वाटले नाही. प्रत्यक्ष आयुष्यात बेकायदा शस्त्रे बाळगणारा संजय दत्त पडद्यावर गांधीगिरी करतो हे उथळ उदाहरण झाले. साहित्य अकादमी विजेते रंगनाथ पाठारे आपल्या सुनेचा छळ करतात. ऍलिस इन वंडरलँडचा लेखक चार्ल्स डॉजसन याच्यावर पेडोफाइल असल्याचा गंभीर आरोप होता.

हेच इतर क्षेत्रांमधील व्यक्तींबाबतही दिसते.

स्टार्क इफेक्टचा शोध लावणारा योहान्स ष्टार्क हा नाझी समर्थक होता. किंवा त्याहूनही गंभीर म्हणजे प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ मार्टिन हायडेगर हा ही नाझी समर्थक होता. गंभीर यासाठी की त्याचे तत्वज्ञान आणि त्याची वागणूक यात जमीन अस्मानाचा फरक होता. अशी उदाहरणे अनेक आहेत.

यापुढे डॉयलचे उदाहरण फारच किरकोळ वाटते. इथे सत्यापासून दूर जाण्याचा प्रश्न येतो असे वाटत नाही.

माझा प्रतिसाद टंग०इन्०चीक असला तरी सध्या उपक्रमावर जी एककलमी मोहीम चालली आहे त्याला उद्देशून होता. सर्वांना आपापल्या मतांचा अधिकार असतो. एखाद्याचे मत वेगळे असले तर जिथे सापडेल तिथे त्याला/तिला खिंडीत गाठून, झुंडीने आपली मते लादणे ही पद्धत तालिबानकडे झुकणारी वाटते.

उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची उपशाखा झाले आहे की काय असा हल्ली संशय येऊ लागला आहे.

--
What other people think about you is none of your business because it really isn't about you, it is about them. -- Sean Stephenson

बिन लादेन?

एखाद्याचे मत वेगळे असले तर जिथे सापडेल तिथे त्याला/तिला खिंडीत गाठून, झुंडीने आपली मते लादणे ही पद्धत तालिबानकडे झुकणारी वाटते.

'लादणे' म्हणजे? नुसती टीका केली की मुस्कटदाबी होते का?

माझा प्रतिसाद संपादित केला नसता तर ही वेळच आली नसती.

मुद्दा सोडून गुद्दा

माझा प्रतिसाद टंग०इन्०चीक असला तरी सध्या उपक्रमावर जी एककलमी मोहीम चालली आहे त्याला उद्देशून होता. सर्वांना आपापल्या मतांचा अधिकार असतो. एखाद्याचे मत वेगळे असले तर जिथे सापडेल तिथे त्याला/तिला खिंडीत गाठून, झुंडीने आपली मते लादणे ही पद्धत तालिबानकडे झुकणारी वाटते.

उपक्रमावर असे कुणी करत नाही, असे मला वाटते. कुणी फुलटॉस दिला तर नटराज पुन्हा च्याम्पियन बनणारच. 'खिंडीत गाठून, झुंडीने' मधला अनुप्रास चांगला आहे, पण' एखादा मत कसे काय लादू शकतो हेच कळत नाही. तेवढ्याच जोरकसपणे आपण 'मला मत मान्य नाही' असे सांगू शकतो ना. ह्याबाबतीत आदरणीय गुंडोपंतांचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवावे. ते कधीही हार मानीत नाहीत. आणि उपक्रमाबाबत तक्रार करतानाही दिसत नाहीत.

काही जणांची टीका करण्याची किंवा खंडन करण्याची पद्धत बोचरी असल्यामुळे काही जण दुखावू शकतात आणि लोक मुद्दा सोडून गुद्दाच लक्षात ठेवतात हे खरे आहे.

उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची उपशाखा झाले आहे की काय असा हल्ली संशय येऊ लागला आहे.

उपक्रमावरचे बहुतेक सदस्य डोळस आहेत. त्यामुळे असा संशय येणे अगदी साहजिकच आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

परामानसशास्त्र

पुत्राच्या अकाली निधनामुळे डॉयल अध्यात्माकडे(स्पिरिच्युऍलिझम्) वळला हे म्हणणे खरे नाही. तो जेव्हा तरुण आयरिश कॅथॉलिक होता तेव्हापासूनच त्याला परामानस विषयाचे विलक्षण आकर्षण होते.या विषयाच्या प्रसाराचा आरंभ त्याने १९१६ मधे ,म्हणजे पुत्रनिधनाच्या पूर्वी दोन वर्षे, केला.

मला वाटते की आर्थर कॉनन डॉयल यांचा परामानसशास्त्रावर विश्वास पूर्वीपासूनच असावा. त्याचा प्रचार मात्र आयुष्यातील एक एक व्यक्ती गमावल्याने वाढत गेला असावा. १९०६ मध्ये पत्नीचा मृत्यू, नंतर भावाचा मृत्यू, मुलाचा आणि इतर जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू त्यांना या गर्तेत खेचत गेला असावा. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात माध्यमांद्वारे मृत व्यक्तिंशी संपर्क साधण्याचे फ्याड प्रसिद्ध होतेच पण तत्कालीन तंत्रज्ञानाचा आतासारखा विकास न झाल्याने त्याचा दुरुपयोग करणारे लोकांच्या भावनांशी खेळत होते.

हॅरी हुडिनी आणि डॉयल यांची मैत्री ही एका प्रचाराचाच भाग होता असे म्हटले जाते (म्हणजे दोन विरुद्धधर्मी व्यक्ती मित्र आहेत वगैरे) परंतु जेव्हा हुडिनीच्या मृत आईचाच संपर्क साधण्यासाठी वापर केला गेला तेव्हा भयंकर चिडला आणि त्याच्यात आणि डॉयल यांच्यात जाहीर वादावादी झाली.

असे झाले तरी डॉयल हे शेरलॉक होम्सचा जनक म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांत ओळखले गेले आहेत. त्यांच्या प्रसिद्धीवर आणि लोकप्रियतेवर असे सावट पडणार नाही असे वाटते. संजय दत्तही मुन्नाभाई म्हणूनच भविष्यात ओळखला जाईल असे भाकित आहे. ;-)

याखेरीज

भुतांच्या कथा लिहीणार्‍या काही लेखकांचा प्रत्यक्षात भुतांवर विश्वास नसल्याचेही कळते :)

--

सुन्दर्

प्रियालितै, सुन्दर् लिहिता

 
^ वर