पुन्हा एकदा सुखांत!

पुन्हा एकदा सुखांत!

"डॉक्टर, तुम्ही काहीही करा, पण मला या जीवघेण्या दुखण्यातून मुक्त करा. या असह्य यातना मला सहन होत नाहीत. मला माहित आहे की मी माझी शेवटची घटका मोजत आहे. निदान मला सुखाने तरी मरू दे." अगदी काकुळतीला येवून ती तरुणी विनवत होती.
"मुली, तुला असे म्हणायचे आहे का की मी तुला 20 मिलिग्रॅम मॉर्फाइन सल्फेटच्या गोळ्या द्याव्यात व त्यामुळे तुझी शुद्ध हरपून जाईल. त्या काळात तुला यातनांची जाणीव होणार नाही. व त्याच अवस्थेत तुझा जीव जाईल. "
"अगदी बरोबर. डॉक्टर, काहीही करा पण मला सुखाने मरू दे."
"सॉरी, extremely सॉरी, असलं काहीही मी करू शकणार नाही. फार फार तर या मरणयातनेतून तुझी सुटका होण्यासाठी तुला 20 मिलिग्रॅम मॉर्फाइन सल्फेटच्या गोळ्या देईन. त्यामुळे तू बेशुद्ध होशील. व त्यानंतर तुला कुठलीही यातना जाणवणार नाही. हे तुला मान्य आहे का?"
"डॉक्टर, हे ठीक आहे. परंतु तुमच्या पहिल्या व दुसऱ्या विधानात मला तसा कुठलाही फरक जाणवत नाही. " आश्चर्यचकित होऊन तिने विचारले.
"तसे नाही. माझ्या या दोन विधानामध्ये फार मोठा फरक आहे. माझ्या पहिल्या विधानानुसार मी तुला मरण यावे यासाठी गोळ्या देणार होतो. परंतु दुसऱ्या विधानाप्रमाणे मी तुझी या असह्य वेदनेपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी डॉक्टर आहे. रुग्णाला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहण्याचा वसा मी घेतला आहे. त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे डॉक्टराचे आद्य कर्तव्य आहे. मी कसाई नाही. शिवाय या देशात इच्छामरण व दयामरण यांना कायद्याने बंदी आहे. "
"डॉक्टर तुम्ही त्याला काहीही म्हणा वा नाव द्या ...मला यातनेतून सुटका हवी आहे." तरुणीचे उत्तर.

---------- ------------ -----------

डॉक्टराची शाब्दिक कसरत व कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची धडपड एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असतीलच. कायद्याच्या कक्षेत राहूनच रुग्णाला जे हवे ते देण्याचे धोरण डॉक्टर राबवित आहेत. भारतासकट अनेक विकसित - विकसनशील - अविकसित अशा बहुतांश राष्ट्रामध्ये इच्छामरण वा दयामरण यांना अजूनही कायदेशीर मान्यता नाही. कुठल्याही रुग्णाचे जाणून बुजून आयुष्य कमी वा आयुष्याचा शेवट करण्याचा अधिकार डॉक्टरांना नाही. मग तो रुग्ण मरणासन्न अवस्थेत (कित्येक वर्षे पडलेला) असू दे, असह्य मरण यातना भोगत असू दे, वेजिटेटिव्ह अवस्थेत असू दे, किंवा त्यासाठी त्यानी (वा त्याच्या अगदी जवळच्या नातलगांनी ) कितीही गयावया करू दे! मात्र डॉक्टरांना रुग्णाच्या यातना कमी करण्यासाठी औषधोपचार करण्यास पूर्ण परवानगी आहे. अशा औषधोपचारामुळे कदाचित रुग्ण मरून जाण्याची शक्यता असली तरी तेवढा धोका डॉक्टर पत्करू शकतात. कारण डॉक्टरांचे उपचार रुग्णाला बरे करण्यासाठी, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी असतात. त्याच्या जिवाला धोका पोचवण्यासाठी नव्हे. मारून टाकण्यासाठी नव्हे. जर मारण्याचा उद्देश असल्यास तो दखलपात्र गुन्हा ठरेल. डॉक्टरावर अशा वेळी सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवता येईल. म्हणूनच जे काही करायचे ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करायचे हे बंधन बहुतेक सर्व डॉक्टर्स कसोशीने पाळत असतात.
कायदा किती विचित्र ( वा गाढव!) आहे हे पटवून देण्याचा येथे उद्देश नाही. या कायद्यामागची भूमिका काय असू शकेल याचा विचार केल्यास या कायद्याला (सामाजिक) नैतिकतेची व धर्मांच्या शिकवणींची पार्श्वभूमी आहे, हे लक्षात येईल. तुमचा मूळ हेतू दुसऱ्याचे भले करण्याचा असल्यास तुम्हाला त्यासाठी काहीही करण्याची मुभा आहे. अशा प्रकारे चांगले कृत्य करत असताना चुकून काही वाईट घडले, इजा पोचली तरी मूळ उद्देश चांगला असल्यामुळे कृत्य करू पाहणाऱ्या व्यक्तीला चुकीसाठी जवाबदार धरता येत नाही. एखादी कृती केल्यामुळे भविष्यात काय घडू शकेल याचा अंदाज व त्यामागील हेतू यांच्यामधील फरक ढोबळपणे ओळखता येते. व यात हेतू महत्वाचे ठरते. काही कारणामुळे रुग्णाचे काही बरे-वाईट झाल्यास ती घटना बातमी बनते. व संपूर्ण डॉक्टरी व्यवसायालाच वेठीला धरले जाते व काही वेळा संबंधितावर हात उगारले जातात, तोडफोड केली जाते. अशा वेळी डॉक्टराचा हलगर्जीपणा की त्याची प्रामाणिक चूक हा विचारच बाजूला पडतो.
परंतु अनेक वेळा प्रसार माध्यमं अशा बातम्यांना विकृत स्वरूप देवून वाचकांची/टीव्ही-वीक्षकांची दिशाभूल करतात. कृतीच्या मूळ हेतूला पूर्णपणे दुर्लक्ष करत कृतीच्या परिणामावरच लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या मते नैतिकतेची ढाल पुढे करणे हे लंगडे समर्थन ठरते. डॉक्टर खरोखरच रुग्णाच्या यातना दूर करण्यासाठी गोळ्या देत असला तरी वा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असला तरी डॉक्टर रुग्णाचा जीव घेण्यासाठीच गोळ्या देत आहे, असे प्रसार माध्यमं बिनदिक्कतपणे आरोप करू लागतात. डॉक्टराच्या निर्हेतुकतेवर, त्याच्या प्रामाणिक प्रयत्नावर अजिबात विश्वास ठेवला जात नाही. डॉक्टर पेशंटला मारणार नाही हा विचार आपण गंभीरपणे घेतल्यास डॉक्टराची चूक नव्हती असे ठामपणे म्हणू शकतो. डॉक्टर खरोखरच रुग्णाच्या वेदनेची काळजी घेत आहे, हे पटू लागते. कृतीच्या अंतिम परिणामाचा अंदाज व कृतीचा उद्देश यातील फरक धूसर आहे हे मान्य. म्हणूनच डॉक्टरांच्या मनात नेमके काय आहे याचा नीटसा अंदाज येत नसल्यामुळे ही गुंतागुंत आणखी वाढतच जाते.
आपण केलेले अंदाज व आपला उद्देश यांच्यात गल्लत केल्यामुळे अपराधीपणाची भावना रेंगाळत राहते. जंगलातील एखादा शिकारी अंदाधुंद गोळाबार करू लागल्यास एखाद्या वाटसरूला गोळी लागू शकते. व तो मरूही शकतो. त्यावेळी शिकार करणारा त्याला मारून टाकण्याचा माझा उद्देश नव्हता असे समर्थन केल्यास त्याचा बचाव ग्राह्य धरला जाणार नाही. शिकाऱ्याला माणसाच्या मृत्युच्या जवाबदारीपासून दूर पळता येत नाही. अंदाधुंद गोळीबार का केला, तेंव्हा तो माणूस कुठे होता, शिकारीसाठी कुणाची परवानगी घेतली, इतरांच्या संरक्षणाची पुरेशी व्यवस्था का केली नाही अशा अनेक प्रश्नांची (तार्किक) उत्तर देण्यास त्याला भाग पाडले जाते. उद्देश कोणताही असो, प्रत्यक्ष कृती त्याला अपराधी बनवते.
ज्या समाजाने उघड उघड धर्म व नीतीचे निमित्त करून सती पद्धतीचा पुरस्कार करत स्त्रीला स्वत:ला जाळून घेण्यास भाग पाडत होते त्या समाजाच्या हाती इच्छामरणाचे वा दयामरणाचे हत्यार दिल्यास हा समाज कुठल्या थराला जाईल याची कल्पना न केलेली बरी. काहीना हा लांछनास्पद इतिहास उकरून काढण्याची गरज नाही असे वाटेल. परंतु माणूस स्वार्थासाठी किती क्रूर होवू शकतो याची शेकडो उदाहरणं आपण रोज वाचतच असतो. मालमत्ता हडप करण्यासाठी, भाऊबंदकीतील सूड उगवण्यासाठी, नको असलेल्यांचा काटा काढण्यासाठी किंवा अशाच एखाद्या क्षुल्लक कारणासाठी इच्छामरण व दयामरणाच्या कायद्याच्या तरतुदीचा वापर करून सर्व काही कायद्याच्या चौकटीतच आहे असे बतावणी करत खून करण्यासाठीसुद्धा हितसंबंधीय मागे पुढे पाहणार नाहीत. डॉक्टर व नातेवाईक संगनमताने इच्छामरण वा दयामरणाच्या कायद्याच्या आधारे एखाद्याचा खून करणार नाहीत याची खात्री देण्याइतका समाज प्रगल्भ झालेला नाही. तत्व म्हणून इच्छामरण वा दयामरण यांना मान्यता देता येईल. परंतु त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सामाजिक, आर्थिक, व कौटुंबिक समस्यांच्या जंजाळात अडकून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही वा कायद्यातील पळवाटांच्या आधारे त्याचा दुरुपयोग केला जाईल ही भीती प्रत्येक नवीन कायद्याच्या वेळी हमखास उपस्थित केला जातच असतो. म्हणून कायदाच करू नये वा समाज प्रगल्भ होण्याची (दीर्घकाळ) वाट पहावी हे न पटणारे मुद्दे वाटतात.
म्हणूनच याविषयी जरा जपूनच पुढचे पाऊल टाकावे लागेल.

Comments

चांगली चर्चा

मागे श्रीमती मंजिरी घाटपांडे यांनी लिहिलेला लेख वाचला होता, त्या चर्चेची आठवण झाली.

दयामरण बहुधा दिले जाणार नाही

इच्छामरणाचा किंवा दयामरणाचा कायदा नाही याला फक्त नैतिकता किंवा दुरुपयोगाची भीती एवढीच कारणे असतीलही. तरी तसा कायदा झालाच तरी फार फार क्वचितच त्याची अंमलबजावणी डॉक्टर करतील.

कोणत्याही केसमध्ये डॉक्टर हा रुग्णाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. याचे कारणः
१. या रोगावर आज उपाय नसला तरी नंतर केव्हातरी उपाय मिळण्याची शक्यता नाही हे ठामपणे कोणी म्हणू शकत नाही.
२. पण एकदा माणूस मेला की पुन्हा जिवंत होत नाही हे निश्चितपणे म्हणू शकतो.

त्यामुळे रुग्णाला मरू दिले तर नंतर उपाय सापडल्यावर रुग्णाला बरे करण्याचा ऑप्शन गेलेला असतो.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

जॅक केवॉर्कियन

यांची आठवण आली.

हे आयुष्य कुणाचे?

ह्या नाटकाची सुद्धा आठवण झाली.

गौरी

 
^ वर