आजच्या सुधारकला पत्र

आजचा सुधारक ऑक्टोबर २००७
या आजच्या सुधारक च्या मुखपृष्ठावरील मजकूरावर माझी बायको मंजिरीने "आजचा सुधारक नोव्हेंबर २००७" मध्ये लिहिलेले पृष्ठ क्रं ३८३ वरिल पत्र

तिच्या वतीने मी चर्चेच्या प्रस्तावासाठी जसेच्या तसे उधृत करत आहे.
अवांतर - यातील मजकूराचा माझ्याशी अवाक्षर ही संबंध नाही.

प्रतिक्रिया (२)
मंजिरी घाटपांडे डी २०२, कपिल अभिजात, डहाणुकर कॊलनी, कोथरुड पुणे ४११०३८ फोन: ९४२२३०२२८७

ऑक्टोबर ०७ च्या मुखपृष्ठावर ज्या शहाणपणाचा आदिवासी आणि रानटी टोळयांच्या संदर्भात उल्लेख आलेला आहे, ते शहाणपण आजकालची सामान्या माणसे तर सोडाच, पण मोठमोठया डॉक्टर्सकडेही आहे की नाही, याची शंका घ्यावी, अशी परिस्थिती सभोवार दिसते. नाहीतर पंच्याहत्तराव्या वर्षी बायपास ऑपरेशन्स आणि ऐंशीव्या वर्षी ऑक्सिजनवर कोम्यात जगणारे दम्याचे पेशंटस् दिसलेच नसते.

त्याच लेखात आपल्याकडच्या `देह ठेवण्याच्या` परंपरेचा उल्लेख आहे. ही परंपरा का व कधी खंडीत झाली असावी यावर आता जाणकारांली प्रकाश टाकण्याची व चर्चा करण्याची वेळ आली आहे. 'इच्छामरण` कायद्यासाठी एक व्यापक वैचारिक अभिसरण सुरू होण्याची वेळ खरे तर टळून चालली
आहे. त्याऐवजी वृध्दत्वशास्त्र आणि वृध्दांच्या मानसिक समस्या यांवरच चर्चासत्रे झडताना दिसतात.

प््राश्न घरातले वडील माणूस निरूपयोगी झाले की त्याच्या उशाशी दिवा लावून ठेवण्याचा नाही - हे आजच्या, निदान मध्यमवयीन पिढीने तरी लक्षात घेतले पाहिजे. प्रश्न `आपण` निरूपयोगी झाल्यावर काय करायचे, याचा आहे. आणि हे निरूपयोगी होणे हे स्वत:च्याच दृष्टीकोणातून असणार आहे, हे आणखी महत्वाचे!

निरूपयोगी आणि निरूद्देश या पुन्हा दोन वेगळया गोष्टी आहेत. निरूद्देश होणे हे आणखीच भयानक आहे. लहानपणी माणसाला मोठे व्हायचे असते.

जगातले अनेक अनुभव घ्यायचे असतात, अनेक सुखे भोगायची असतात, तरूणपणी काहीतरी नवनिर्माण करायची जिद्द असते, त्यानंतर थोडा काळ शांतपणे आयुष्या घालवायची, समाधान उपभोगायची इच्छा असते, तसे म्हातारपणी काय? तेव्हा प्रत्येकाला शांतपणे, वेदना न होता मरायची इच्छा असते. मात्र या इच्छेच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्याची वैधानिक मुभा नसते. हीच खरी शोकांतिका आहे! त्यामुळेच आध्यात्मिक व्यक्ती, जेवढे भोग असतील ते भोगल्याशिवाय सुटका नाही या वाटेकडे वळतात आणि काही थोड्या नास्तिक व्यक्ती जगण्याबद्दलची नसलेली / न उरलेली असोशी दाखवण्याच्या निष्फळ प्रयत्नांना लागतात. वास्तविक माणसाच्या इतर सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जशी आधुनिक विज्ञानाने कंबर कसली आहे, तशी इच्छामरणाच्या बाबतीतही निकराने प्रयत्न करण्याची जरूरी आहे.

पूर्वी यासाठी 'जन्म` ही काही आपल्या हातातली गोष्ट नाही असा युक्तिवाद असायचा. पण आता कुटुंबनियोजनाच्या काळात जन्म ही निदान आपल्या माता-पित्यांच्या हातातलीच म्हणजे मानवी इच्छेनुरूपच घडणारी गोष्ट आहे हे तरी सर्वमान्य होण्यास हरकत नसावी. अशा आधुनिक काळात, खरे तर कुटुंब नियोजनाचीच व्याख्या अधिक व्यापक करून, त्यात 'इच्छामरणाचा` अंतर्भाव केला पाहिजे. प्रचलित आहे ते 'जन्माचे नियोजन` आणि मी मांडते ते 'मृत्यूचे नियोजन`! पण शेवटी नियोजनच. आणि कोणत्याही प्रगत शहाण्या माणसाने नियोजनास विरोध करण्याचे कारण नाही. नियोजनाविना प्रगती असाध्य आहे.

हॉस्पिटलात जन्मलेली आमची आजची पिढी मरण्यासाठी हॉस्पिटलातच जाईल याला खरेतर कोणाचाच विराध असता कामा नये. उलट जन्मताना, जन्म सुकर करण्यासाठी ज्या त-हेने डॉक्टर्स मदतीला तत्पर असतात, त्याच पध्दतीने शेवटही शांत होण्यासाठी मदत करण्याची तत्परता दाखवण्याची कायदेशीर मुभा त्यांना असलीच पाहिजे.

शेवटी आजचा सुधारक कारांना एकच विनंती आहे की प्रगत महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तृळात तरी त्यांनी हा विषय नेटाने लावून धरावा.

Comments

दुधारी तलवार

घाटपांडे साहेब,

आपण आज खूपच संवेदनशील विषयाला हात घातला बुवा. मला सुद्धा इच्छामरण कायदेशीर असावे असे वाटते. पण आपल्याकडे कायद्यांचे पालन व्यवस्थित होत नसल्याने या कायद्याचा दुरुपयोग होण्याची खूप जास्त शक्यता आहे. नव्हे तो एक खूप मोठा धोका आहे. पोराने बापाचा काटा काढण्याची एखादी तरी घटना महिन्याला एकदा तरी वाचायला मिळते. विचार करा इच्छामरणाचा कायदा झाला तर किती दुबळ्यांना अनिच्छेने मरावे लागेल अन कागदोपत्री त्यांचे इच्छामरण दाखवले जाईल. ज्या देशात पाच हजारात राष्ट्रपतीच्या अटकेचे वॉरंट काढता येऊ शकते तेथे हे असे होणे आवघड निश्चितच नाही.

काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती. एका पस्तीस वर्षीय रुग्णाच्या आईची तिच्या मुलासाठीच्या इच्छामरणाची विनंती हैद्राबादेत न्यायालयाने फेटाळली होती. तो रुण म्हणजे एक जिवंत प्रेत आहे हे सत्य लक्षात घेऊन त्याच्या इच्छामरणाला परवाणगी द्यायला गवी होती असे वाटते.

आपला,
(इच्छामरणवादि) भास्कर
आम्ही येथे वसतो.
http://bhaskarkende.blogspot.com

उत्तम विषय

इच्छामरणाचा हा मोठा विषय आहे.
विचार करण्यालायक!

पण आपण एकुण प्रतिसाद पाहताच आहात. :(

माझ्या अल्प माहितीनुसार युरोपातले काही देश यात सामील आहेत.
इच्छामरणाचा मात्र तेथेही वाद अजून सुरू आहेतच.

आपला
गुंडोपंत

अवघड

अवघड विषय आहे. अशा बाबतीत हो किंवा नाही या दोन्ही बाबतीत जवळजवळ सारखेच प्रभावी मुद्दे असतात. किंबहुना म्हणूनच यावर निर्णय कठीण असतो. लेखातील विचार प्रभावी आहेत. प्रश्न असा येतो की इच्छामरण कायदेशीर केले तर ते द्यायचे की नाही हे ठरवायचे कुणी आणि कसे?आणि कुण्या एका माणसाच्या निर्णयावर हे अवलंबून असेल तर तिथे गैरप्रकाराची शक्यता फार मोठी होते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कायदा आणि वापर

हा विषय मह्तवाचा आहे पण तितकाच अवघडही आहे. कायद्याचे पालन साधे रहदारीचे नियम पाळताना होत नाही... इच्छामरणाच्या बाबतीत तर एकाच्या इच्छेने दुसर्‍याचे मरण होईल की काय अशी भिती वाटते...

बाकी प्रायोपवेशनाने मृत्यूला सामोरे जाणारे तीन महान विभूती महाराष्ट्रात नजीकच्या भूतकाळात होऊन गेल्या आहेत: विनायक दामोदर सावरकर, विनायक नरहरी (विनोबा) भावे आणि विनायक (त्यांचे पूर्ण नाव विसरलो, पण त्यांनी पण कुष्ठरोग्यांसाठी अथक काम केले होते).

विनोबांच्या बाबतीत ही आत्महत्या असल्याने त्यांना थांबवा अशी याचीका न्यायलयात केल्याचे पुसटसे आठवते आहे.

विकास

प्रकाश समाधी

स्वामी विज्ञानानंद न्यु वे आश्रम लोणावळा यांनी मुंबईच्या प्रशासकीय इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन सकाळी केलेली आत्महत्येला त्यांच्या शिष्यगणांनी " प्रकाशसमाधी" हे नाव दिले आहे. आपल्याकडे आत्महत्या हा भेकड मार्ग समजला जातो. अध्यात्मात त्याला अधिष्ठान नाही.त्यामुळे त्याला समाजात प्रतिष्ठा नाही. ज्ञानेश्वरांच्या समाधीला, तुकारामाच्या सदेह वैकुंठगमनाला अध्यात्मिक प्रतिष्ठा आहे. साने गुरुजींच्या आत्महत्येचा उल्लेख मात्र कटाक्षाने टाळला जातो.
प्रकाश घाटपांडे

खुलासा

विनोबांच्या प्रायोपवेशनास आत्महत्या म्हणणे मला योग्य वाटत नाही, पण तसा युक्तीवाद कोणीतरी केला इतकेच म्हणायचे होते. कदाचीत तसे इतरांच्या बाबतीतही झाले असेल पण माहीत नाही.

बाकी आत्महत्या आणि प्रायोपवेशन, समाधी यात फरक आहे असे मला वाटते. त्या अनुषंगाने दोन माहीत असलेल्या गोष्टः

रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना ज्ञानप्राप्ती करून दिल्यावर सांगीतले की तुला आता सर्व विश्वाचे ज्ञान आहे पण तरी मी तुझ्या भोवती एक मायेचे वेष्ठन घालतो. नाहीतर तुझा जीवनातील रस जाईल आणि इप्सित कार्य् होण्या आधीच तू प्राण त्याग करशील.

दुसरी गोष्ट रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरूजींची: एक तर त्यांना त्यांच्या गुरूने (विवेकानंदाच्या शिष्याने) परत प्रपंचात/समाजात जाऊन काम करायची आज्ञा दिली. शेवटच्या आजारात ते कॅन्सरने आजारी असताना एके दिवशी शेवटचा निरोप म्हणून तुकारामाचा अभंग लिहीला, हातात बाहेर गावी जातानाचा गडू घेतला, लोकांना नमस्कार करून खुर्चीत ध्यानस्थ बसले आणि तसेच प्राण त्यागले.

असे कदचीत अजून अनेक असतील ज्ञानेश्वर-तुकारामाबद्दल तर आपण कायमच ऐकत आलो आहोत.

जगण्यात देखिल

मरणाच सोडा जगण्यात देखील "उपयुक्तता मूल्य" व " उपद्रवमूल्य" या वर तुमची मैत्री किंवा शैत्रि अवलंबून रहाते. एखाद्या मित्राचे उपयुक्तता मूल्य आपल्या दृष्टीने कमी होत गेले कि हळू हळू तो अद्खलपात्र होण्य़ास सुरुवात होते. तसेच एखाद्या शत्रुचे उपद्रवमूल्य वाढत गेले कि तो हळू हळू दखलपात्र व्हायला लागतो.
प्रकाश घाटपांडे

पण असफल झाल्या तर

अणि समाधी ह्या तिन्ही आत्महत्याच आहेत ! (सफल झाल्यात तर.)

पण असफल झाल्या तर गुन्हा दाखल होतो.
प्रकाश घाटपांडे

ऐकिवात नाही

याला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती पुन्हा गुन्हा करेल हे शासनयंत्रणेला माहीत असते. कोठडीतल्या मृत्युला पोलिस घाबरतात. भारतात "जगण्यापेक्षा " "मरणे" स्वस्त आहे. ससून मधल्या शवागारात अनेक बेवारशी प्रेते विल्हेवाटीसाठी नंबर लाउन असतात. शवागारातल्या डॉक्टरला इतर डॉक्टर आपल्यात घेत नाहीत. प्रत्यक्षात पोस्टमॉर्टेम हा त्या डॉक्टरचा सहाय्यकच करत असतो. म्हणजे कंपाउंडर. त्याला थोडीशी "टाकल्या" शिवाय हे काम करताच येत नाही. ती त्याची अपरिहार्यता आहे. शवागारात लागणारी निलगिरी तेल कधीच पुरेशी नसते.कधी कधी पोलीसच स्वतःच्या खिशातले पैसे त्याला देतात. ( शेवटी ते लोकांच्याच खिशातले असतात हा भाग वेगळा)
प्रकाश घाटपांडे

मग?

भिष्माचार्य "इच्छामरणी" होते म्हणजे नेमके काय होते? ते शरपंजरी झाले तेव्हा त्यांनी प्रायोपवेशन केले का?
आजच्या स्थितीत "दयामरण" प्रथम येउ द्यात मग' इच्छामरण' असे आपल्याला वाटते का? प्रत्येक कायद्यात पळवाटा असतात म्हणुन कायदे करूनच नये का?
( प्रश्नांकित)
प्रकाश घाटपांडे

काही प्रश्न

काही प्रश्न
१) 'खुन करणे' आणि 'एखाद्याला इच्छामरण म्हणून मारणे' यात फरक कसा ओळखावा?
२) स्वेच्छामरण योग्य का पर-इच्छामरण? जर पर-इच्छामरण हवे असेल (कारण मृतवत व्यक्ती स्वेच्छामरण कसं मागेल?) तर याला मान्यता कोण देणार? एक व्यक्ती की व्यक्ती समुह ?
३) आत्महत्या आणि स्वेच्छामरण हे सारखंच नाही का?
४) जसं देहदान/नेत्रदान याचा निर्णय आपण जिवंत आणि सुजाण असताना घेऊ शकतो तसं स्वेच्छामरणाचं करता येइल का? (म्हणजे 'अ', 'ब' आणि 'क' या तिनही व्यक्तींनी परवानगी दिल्यास मला तुम्ही ठार करू शकता!?!)

-(प्रश्नचिन्हांकीत) ऋषिकेश

मंजिरी घाटपांडे यांचे पत्र

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"आजचा सुधारक " यांना लिहिलेले हे पत्र अगदी बिंदुगामी (मुद्देसूद) असून त्यातील युक्तिवाद तर्कशुद्ध आहे. तो कोणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावा.त्यातील काही वाक्ये पाहा:
...."ते शहाणपण मोठमोठ्या डॉक्टरांकडेही आहे की नाही याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. नाहीतर पंचाहत्तराव्यावर्षी बायपास करून घेणारे आणि ऐशीव्या वर्षी ऑक्सीजनवर कोम्यात जगणारे पेशंट दिसलेच नसते."
पत्रलेखिकेच्या या मताशी मी सहमत आहे. (इथे डॉ.चे शहाणपण पैसे मिळवण्यात दिसते.)
....."हॉस्पिटलात जन्मलेली आमची आजची पिढी मरण्यासाठी हॉस्पिटलातच जाईल याला खरेतर कोणाचाच विरोध असता कामा नये. उलट जन्मताना, जन्म सुकर करण्यासाठी ज्या त-हेने डॉक्टर्स मदतीला तत्पर असतात, त्याच पध्दतीने शेवटही शांत होण्यासाठी मदत करण्याची तत्परता दाखवण्याची कायदेशीर मुभा त्यांना असलीच पाहिजे. "
वा ! काय लिहिले आहे!! मला हे सगळे पटतेच. पत्रलेखिकेचे मनःपूर्वक अभिनंदन!
"इच्छामरण कायद्याचा दुरुपयोग होईल " असे काही प्रतिसादांत म्हटले आहे. त्यात थोडे तथ्य असले तरी कायदा योग्य शब्दांत (विधानांत) लिहून दुरुपयोग टाळणे शक्य आहे.

असेच म्हणतो.


आम्हाला येथे भेट द्या.

यनावालांशी सहमत प्रतिक्रिया

यनावालांशी पुर्णतः सहमत असणारी मते पत्र लेखिकेला दूरध्वनीवरून कळविलेले
१) डॉ. नरेंद्र दाभोलकर
२) ग.प्र. प्रधान उर्फ प्रधानमास्तर्
३) अहमदनगर वरुन श्री गांधी. सदर गृहस्थांनी झेरॉक्स प्रत सामाजिक संस्थांना वाटण्याचा उपक्रम करत असल्याचे सांगितले.
( उपक्रम व लेखिका यांच्यातला फक्त दुवा)
अवांतर- नाही तर माझा पंकज दातार व्हायचा
प्रकाश घाटपांडे

उपयुक्त विषय व समंजस हाताळणी

केली आहे ह्या चर्चेत.

'वॉर्ड नं. ५, के. ई. एम' हे लेखक डॉ. रवि बापट ह्यांनीही ह्या आत्मकथनपर पुस्तकात नमूद केले आहे की त्यांच्या आईने (जी स्वतः डॉक्टर होती) प्रायोपवेशन करून इहलोकीची यात्रा संपवली.

विद्या बाळ यांचे मत

विद्या बाळ यांचे मत असे कि "जीवन नकोसे झाले आहे म्हणून नव्हे तर जीवन पुरेसे झाले आहे म्हणून स्वेच्छामरण " ही कल्पना यायला हवी. हे मी त्यांच्या लेखात किंवा भाषणात ऐकले आहे.
प्रकाश घाटपांडे

इच्छामरण कायद्याविषयी उपयुक्त आकडेवारी

अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात १९९८ मध्ये इच्छामरण कायदा लागू झाला (राज्य सरकारचा दुवा). आजतगायत २९२ व्यक्ती या कायद्याची मदत घेऊन मृत्यू पावली आहेत.

याबाबतीत आपले जे भय आहे - अमुक प्रकारचा दुरुपयोग होईल, त्यासाठी एक "चाचणी प्रयोग" म्हणून ही आकडेवारी उपयोगी ठरावी. शिवाय त्यांच्या कायद्यात चुका झाल्या असतील तर आपण त्यातून धडा घ्यावा.

या चित्रात एक गोष्ट चटकन लक्षात आली की या कायद्याखाली ज्या रुग्णांनी डॉक्टराकडून "घातक औषध" मिळवले (२००६ मध्ये ~६५), त्या सर्वांनी मरण अंगीकारले नाही (२००६ मध्ये ~४७ ने मरण पत्करले). त्यामुळे अनेक रुग्ण "आपले मरण आपल्या हातात" असे दिव्य अस्त्र आपल्या मुठीत बाळगून लढत राहातात. यामुळे त्यांना मृत्यूपुढचा लाचारपणा जाऊन स्वाभिमानाचे बळ प्राप्त होत असेल का - असा प्रश्न माझ्या मनात चमकून जातो.

हे एक पत्र

हे एका "सुधारक" लेखकाचे मनोगत व्यक्त करणारे पत्रलेखिकेला पत्र
Picture 148
प्रकाश घाटपांडे

 
^ वर