मी म्हणजे माझा मेंदू!

मी म्हणजे माझा मेंदू!

कारच्या एका भयंकर अपघातातून सोनाली मरता मरता वाचली. तिच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला होता. डोळे, हात, पाय, बरगड्या, चेहरा ..... इत्यादी सर्व अवयवांचा अक्षरशः भुगा झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तिच्या कुठल्याही अवयवाला ते पूर्वपदावर आणू शकले नाहीत. गंमत म्हणजे सोनालीचा मेंदू मात्र शाबूत होता. डॉक्टर काय करत आहेत, काय सांगत आहेत, इत्यादींची तिला पूर्ण जाणीव होत होती. प्रमुख डॉक्टर "तिच्या जवळ येऊन तुझ्या मेंदूला आपण दुसऱ्या एखाद्या धडधाकट शरीरावर रोपण करून तुला जिवंत ठेऊ" असे म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. आपण पुन्हा चारचौघीसारखे वावरणार ही कल्पनाच तिच्या मनाला उभारी देणारी होती. याच काळात आकस्मिकपणे तिच्या बहिणीचा एका गुंतागुंतीच्या मेंदूच्या आजारामुळे मृत्यु झाला. डॉक्टरांनी रूपालीच्या शरीरात सोनालीच्या मेंदूचे रोपण करता येईल याची खात्री करून घेतली.
सर्व चाचण्या झाल्या. ऑपरेशनचे सर्व सोपस्कार झाले. मेंदूचे रोपण करतानाही विशेष असे कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. मेंदूचे रोपण ही एक अत्यंत अवघड शस्त्रक्रिया असते याची सोनालीला पूर्ण कल्पना होती. प्रत्यक्ष रोपण करण्यापूर्वीच्या कालावधीत तिचा मेंदू कवटीच्या बाहेर काढून एका काचपात्रेत ठेवला होता. त्या काळात कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर, प्रोब्स, टच सेन्सॉर्स, संगणक या गोष्टी तिच्या ज्ञानेंद्रियासारखे काम करत आहेत..... इत्यादी सर्व गोष्टींची तिला जाणीव होती. आपल्या या फाटक्या-तुटक्या, लक्तरं झालेल्या अपघातग्रस्त शरीरात राहण्यापेक्षा काचेच्या भांड्यातच उरलेले आयुष्य काढणे शतपटीने बरे, असाही एक विचार तिच्या मनात येऊन गेला. उसने घेतलेल्या, कुणीतरी वापरून फेकून दिलेल्या शरीरात आपण शेवटपर्यंत जिवंत राहणार, ही कल्पनाच तिला अस्वस्थ करत होती. स्वत:च्या या अवस्थेविषयी तिला पुनर्विचार करावेसे वाटत होते.
याच गोष्टींचा पुन: पुन्हा विचार करत असताना मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त माझा मेंदू या निष्कर्षापर्यंत ती पोचली होती. जेव्हा तिच्या मूळ शरीरातील बहुतेक महत्वाचे अवयव अपघातामुळे निकामी ठरल्या तेव्हाच डॉक्टरांनी तिचा मेंदू एका दुसऱ्या - मेंदू निकामी झालेल्या परंतु धडधाकट असलेल्या - शरीरात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेनंतर नव्या शरीरासकट ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडताना आपण अपघात होण्यापूर्वी जसे होतो तसेच आता आहोत अशी तिची ठाम समजूत होती. मी अजूनही तीच सोनाली आहे हेच परत परत स्वतःला पटवून घेण्याच्या प्रयत्नात ती होती.
परंतु इतरांना मी रूपाली नसून सोनाली आहे हे पटवणे जवळ जवळ अशक्यप्राय वाटू लागले. काही दिवसातच सोनालीला (की रूपालीला!) या पुनर्जीवनाचाच कंटाळा येऊ लागला. काही सुचेनासे झाले.
याचाच अर्थ असा की सोनाली म्हणजे तिचे शरीर नसून फक्त तिचा मेंदू असे यानंतर म्हणावे लागेल!

Source: The View From Nowhere - Thomas Nagel (OUP) 1986

मानवी जाणीवा, त्यांच्यातील विविधता, संवेदना, भावना, इत्यादीवद्दलचे अनेक उलट सुलट मतप्रवाह जाणकारांमध्ये असले तरी विचार करण्याची क्षमता निरोगी व कार्यक्षम अशा मेंदूवर पूर्णपणे अवलंबून आहे, याविषयी मात्र दुमत असण्याचे कारण नाही. हे एक वैज्ञानिक सत्य असून मादक द्रव्यपदार्थ, मेंदूवर झालेले आघात, किंवा मेंदूचे आजार इत्यादी माणसांच्या जाणीवावर, त्याच्या समजून घेण्याच्या क्षमतेवर, निर्णय शक्तीवर गंभीर परिणाम करू शकतात, हे एक वैज्ञानिक जगतातील अत्यंत चिरपरिचित विधान आहे.
मेंदूवरील आघातातून मन कधीच सावरू शकणार नाही, या विधानाच्या विरोधातही काही दावे केले जात आहेत. परंतु त्या फारच क्षीण आहेत व त्या वैज्ञानिक कसोटीला उतरू शकत नाहीत. मृतांचे आत्मे सूचना घेऊ/देऊ शकतात हे विधान कितीही रोमांचक वा आकर्षक वाटत असले तरी त्यासंबंधीचा ठोस पुरावा (अजूनपर्यंत तरी!) सापडला नाही. म्हणूनच आपण एक व्यक्ती म्हणून जगासमोर उभे असताना आपले विचार, भावना, संवेदना, गतकालीन स्मृती, अनुभवांचा प्रचंड साठा, या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरणारा मेंदूच असल्यास आपण म्हणजे आपला मेंदू असे म्हणण्यास का हरकत असावी? जेथे जेथे आपला मेंदू जातो (वा आपल्याला नेतो!) तेथे तेथे (विनातक्रार, मुकाट्याने! ) आपण जातो. माझ्या मेंदूचे रोपण तुमच्या शरीरात व तुमच्या मेंदूचे रोपण माझ्या शरीरात असे अदलाबदल झाल्यास आपल्या व्यक्तीमत्वात फरक पडेल का? आद्य शंकराचार्य वादविवाद जिंकण्यासाठी म्हणून परकाय प्रवेश करून मंडनमिश्राचे विचार जाणून घेतले व पुन्हा स्वतःच्या शरीरात येऊन वाद जिंकले. परंतु मंडनमिश्राच्या शरीरात जाऊनसुद्धा शंकराचार्यांचे व्यक्तीमत्व आहे तसेच होते. त्यात बदल झाला नाही.
मुळातच मी म्हणजे माझा मेंदू असा निष्कर्ष इतक्या घाईघाईत काढणे योग्य ठरणार नाही. आपल्या मेंदूमुळेच आपले अस्तित्व आहे, हे कितीही खरे असले तरी आपण म्हणजे आपला मेंदू हे तितकेसे खरे नाही. पाटी-पुस्तक, संगणक, इंटरनेट, शिक्षकांकडून मिळणारे धडे इत्यादीमधून आपण शिकत जातो, आपल्या ज्ञानात भर पडत जाते. परंतु पाटी-पुस्तक म्हणजेच शिक्षण असे म्हणता येत नाही. कागद वा संगणकावर लिहिलेली स्वरलिपी म्हणजे संगीत नव्हे. गायक - गायिकेच्या डोक्यात स्वररचना असली तरी संगीताच्या दृ्ष्टीने या गोष्टी निर्जीव ठरतात. फार फार तर त्यामधून संगीताची थोडी-फार कल्पना येईल. परंतु स्वरलिपीच्या सहाय्याने रागविस्तार व सादरीकरण केल्यानंतरच त्याला संगीत असे म्हणता येईल. त्याला अभिव्यक्तीच्या स्वरूपात सादर केल्यानंतरच ते खरेखुरे संगीत होऊ शकेल, तोपर्यंत नाही. म्हणूनच स्वरलिपी वा स्वरलिपी उमटलेला कागद संगीत होऊ शकत नाही. असाच काहीसा प्रकार मेंदूबद्दल घडत असावा. वेगवेगळे विचार, आठवणी, अनुभव, गुणविशेष इत्यादीतून आपले व्यक्तीमत्व साकार होत असते. व त्यांना कुठेतरी व्यवस्थितपणे जपून ठेवाव्या लागतात. गरज भासल्यानंतर त्यांना बाहेर काढाव्या लागतात. हवे तेव्हा retrieve करण्याची सोय करावी लागते. म्हणूनच उत्क्रांतीने आपल्याला मेंदूची सोय करून दिली आहे. याचा अर्थ मेंदू म्हणजेच आपण असे होत नाही.
हे मान्य असल्यास सोनालीच्या अस्वस्थपणाविषयीची कल्पना आपल्याला नक्कीच येऊ शकेल. स्वरलिपी कागदावर असून चालत नाही. एखादी मैफल गाजविल्याविना त्या स्वरलिपीला काही अर्थ नाही. तशाच प्रकारे शरीराची साथ न मिळालेल्या मेंदूचा काही उपयोग नाही. रोपण केलेल्या मेंदूच्या दृष्टीने ते शरीर नसून ती शरीराची फक्त सावली असते.
तरीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेल्या मृत शरीरात बंदिस्त झालेले मेंदू आपण नेहमी पाहत असतो. काही कृत्रिम उपायामुळे त्या मेंदू 'जिवंत' आहेत. परंतु त्यांना व्यक्तीमत्व बहाल करणे अतिशयोक्तीचे ठरेल!

Comments

योग्य

आपल्या मताशी सहमत. काही प्रश्न :
१. (स्व.) मायकेल जाक्सन चा मेंदू कुणा दुसर्‍याच्या डोक्यात घातला तर त्याला तसे नाचता येयील का ?
२. लता मंगेशकर चा मेंदू कुणा दुसर्‍या पोरीच्या शरीरात वापरला तर ती लता मंगेशकर होइल का ?
३. वृद्धाचा मेंदू नुकत्याच जन्मलेल्या बालकाला वापरला तर त्याच्या शरीराची वाढ होईल का ? की तो मेंदू ती वाढ
थांबवेन कारण त्या मेंदूच्या सेटींग मधे आता वाढ व्हायची थांबली आहे? (मेंदूचा शरीराच्या वाढीसाठी कितपत उपयोग होत असावा ?)

शरीराची साथ

शरीराची साथ न मिळालेल्या मेंदूचा काही उपयोग नाही.

केवळ मेंदूरोपणातून लता मंगेशकर वा मायकेल जाक्सन होतील का? याबद्दल शंका आहे. कारण तसे होण्यासाठी शरीराची साथ हवी. शरीराच्या वाढीचे नियंत्रण मेंदूप्रमाणे अवयवांचे जनुकं, त्यांच्या पेशी व पोषक आहार इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. (चू.भू.दे. घे.)

समजला नाही

या पूर्वीचे लेख खूप चांगले होते. भरपूर माहिती मिळाली.

हा लेख मात्र नीट समजला नाही. मी असे ऐकले होते की मेंदूचा काही भाग मणक्यात असतो व तो भाग शरीरावर नियंत्रण ठेवत असतो. हा जो (काल्पनिकरित्या) मेंदू बदलला तो नेमका काय असावा?

विचार करणे, इतर ज्ञान यापेक्षा मेंदू कितीतरी महत्वाची कामे करीत असतो म्हणजे श्वास, पचन, हृदय (याशिवाय अनेक काही) यांना चालू राखणे. मेंदूरोपणानंतर एका शरीरातील या क्रियांना आज्ञा देऊ शकणारा मेंदू नेमका गाणे या क्रियेसाठी आज्ञा देऊ शकत नाही असे का वाटते?

हे मान्य असल्यास सोनालीच्या अस्वस्थपणाविषयीची कल्पना आपल्याला नक्कीच येऊ शकेल. स्वरलिपी कागदावर असून चालत नाही. एखादी मैफल गाजविल्याविना त्या स्वरलिपीला काही अर्थ नाही. तशाच प्रकारे शरीराची साथ न मिळालेल्या मेंदूचा काही उपयोग नाही. रोपण केलेल्या मेंदूच्या दृष्टीने ते शरीर नसून ती शरीराची फक्त सावली असते.
तरीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेल्या मृत शरीरात बंदिस्त झालेले मेंदू आपण नेहमी पाहत असतो. काही कृत्रिम उपायामुळे त्या मेंदू 'जिवंत' आहेत. परंतु त्यांना व्यक्तीमत्व बहाल करणे अतिशयोक्तीचे ठरेल!

हे काय म्हणणे आहे ते कळले नाही. 'कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेले शरीर' यात भावना मेंदूबाहेर शर्रीरात असते असे सूचित केले आहे. असे असते का शरीरात मेंदूतील भावनेचे प्रतिसाद उमटलेले असतात? (लालबुंद होणे, लाजणे, कावरा बावरा होणे वगैरे).

काही लोक असे आहेत की जे मेल्यावर त्यांचे शरीर (मेंदूसोबत) सुरक्षित ठेवण्याची तरतूद करून ठेवतात. काही कंपन्या त्यांचे शरीर शीतपेटीत बंद करून ठेवतात. अशा लोकांना असे वाटते की भविष्यकाळी त्यांना पुनर्जिवीत करण्याचा मार्ग सापडेल. आणि मग ते पुन्हा आयुष्य जगू शकतील.

अशा लोकांचा कयास पूर्ण चुकीचा आहे असे लेखकाला म्हणायचे आहे का? आणि ते कोणत्या आधारावर?

प्रमोद

ब्रेन डेड की हार्ट डेड

हे काय म्हणणे आहे ते कळले नाही. 'कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेले शरीर' यात भावना मेंदूबाहेर शर्रीरात असते असे सूचित केले आहे. असे असते का शरीरात मेंदूतील भावनेचे प्रतिसाद उमटलेले असतात? (लालबुंद होणे, लाजणे, कावरा बावरा होणे वगैरे).

मला हार्ट डेड असलेल्या शरीरातील क्रुत्रिमरित्या 'जिवंत ठेवलेल्या मेंदू'बद्दल हे विधान करावेसे वाटले.

काही लोक असे आहेत की जे मेल्यावर त्यांचे शरीर (मेंदूसोबत) सुरक्षित ठेवण्याची तरतूद करून ठेवतात. काही कंपन्या त्यांचे शरीर शीतपेटीत बंद करून ठेवतात. अशा लोकांना असे वाटते की भविष्यकाळी त्यांना पुनर्जिवीत करण्याचा मार्ग सापडेल. आणि मग ते पुन्हा आयुष्य जगू शकतील.
अशा लोकांचा कयास पूर्ण चुकीचा आहे असे लेखकाला म्हणायचे आहे का? आणि ते कोणत्या आधारावर?

यांचा कयास चुकीचा आहे असे मला सूचित्त करायचे नाही.यासंबंधीचा ब्रेन डेड की हार्ट डेड या लेखातील उतारा:
या सर्व संभाव्यतेमुळे एखाद्याला 'मेंदू मृत' म्हणून घोषित करणे कठिण ठरत आहे. मेंदूंच्या काही दुखापतीवर कितीही संशोधन झाले तरी त्यांना पुनर्जिवित करणे कदापि शक्य होणार नाही. काहींना व्हेजिटेटिव्ह अवस्था नको असली तरी काही अती उत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना मेंदूंच्या संशोधनात प्रगती होईपर्यंत स्वत:ला शीतनिष्क्रियतावस्थेत (hibernation) ठेवावे, असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व गोष्टीमुळे तिढा वाढतच जाणार आहे. यामुळे आपल्याला अनेक सामाजिक व भावनिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. बेशुध्दावस्थेत किंवा शीतनिष्क्रियतावस्थेत ठेवणे अती खर्चिक बाब आहे. यासाठीचा वैद्यकीय खर्च पूर्ण कुटुंबाच्या खर्चाच्या अनेक पट जाण्याची शक्यता आहे. सामाजिकद्रृष्टया या गोष्टी अत्यंत निरुपयुक्त ठरू शकतील. शिवाय मृत मेंदूची काळजी घेणाऱ्यांनासुध्दा काही तरी चमत्कार घडेल या आशेवर किती दिवस काळजीत रहायचे याचाही विचार करावा लागेल.

काल्पनिकेवरील काल्पनिका

सहस्रबुद्ध्यांशी सहमत. मेंदूवरील लेख खूपच छान होते. एकत्रित मिळतील काय?
मला असे वाटते की या लेखाचा पहिला भाग हीच एक काल्पनिका आहे. त्यात मी म्हणजे माझा मेंदू असा निष्कर्ष् काढला आहे.
शंकराचार्यांच्या उदाहरणापर्यंत हा निष्कर्ष खरा मानणारा लेखक नंतर प्रतिवाद करतो पण नेमक्या या गुंतागुंतीच्या उदाहरणाचे अधिक विवेचनकिंवा प्रतिवाद करीत नाही. त्याने मजा आली असती. तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे काय काय असू शकते यावर तुम्ही चर्चेचा धागा अवश्य टाकू शकाल.
नैधृव कश्यप

 
^ वर