होमिओपथी : वैयक्तिक अनुभव

२००० मध्ये अपघातामुळे माझ्या उजव्या हाताची दोन्ही हाडे मोडली. ऑपरेशन करून त्यात दोन रॊड घातले. एक महिन्यानंतर एक्स-रे काढल्यावर हाडे जिथे तुटली होती तिथे फट असल्याचे दिसले. याचा अर्थ हाडे जुळून येत नव्हती. डॉक्टरांच्या मतानुसार परत ऑपरेशन करून ग्राफ्टिंग करावे लागेल. आधीच हाताला ३२ टाके पडलेले, ते उघडून परत ऑपरेशन हा उपाय शारिरिक/मानसिक क्लेश, खर्च, मनस्ताप यापैकी कुठल्याच तर्‍हेने फायदेशीर नव्हता. पण याखेरीज डॉक्टरांकडे दुसरा उपाय नव्हता. सुदैवाने मला होमिओपथी घेण्याची बुद्धी सुचली. औषधे सुरू केल्यानंतर एका महिन्यात हाडे जुळून आली. औषधांचा खर्च २०० रूपयांपेक्षाही कमी असेल.

कॉलेजमध्ये असल्यापासून मला किडनी स्टोनचा वारंवार त्रास होत असे. यासाठी दर २-३ वर्षांनी लिथोट्रिप्सी करून अल्ट्रासोनिक तरंगाच्या सहाय्याने खडे फोडावे लागत असत. हे खर्चिक होतेच, शिवाय हा उपाय मलमपट्टी होता. हे होऊ नये म्हणून काय करावे यासाठी डॊक्टरांकडे उत्तर नव्हते. कॅल्शियम खाऊ नका, पालक/टोमाटो वगळा, पाणी भरपूर प्या, ही जेनेटीक टेन्डन्सी आहे याला उपाय नाही अशी उत्तरे मिळायची. हाताचे दुखणे बरे झाल्यानंतर मी यासाठीही औषधे घेतली. त्यावेळेसही किडनीमध्ये ६-७ मि.मि. लांबीचे तीन खडे होते. औषधे सुरू केल्यानंतर आठ महिन्यांनी सोनोग्राफी केली त्यात एकही खडा आढळला नाही. तेव्हापासून मी नियमित ही औषधे घेत आहे आणि परत मला हा त्रास झालेला नाही.

हे टंकण्याचा उद्देश होमिओपथी शास्त्र आहे हे पटवून देण्याचा नाही. किंबहुना होमिओअपथी काय आहे यात मला फारसा रस नाही. तिला तुम्ही व्हूडू म्याजिक म्हटले तरी चालेल. या दोन्ही बाबतीत प्लासिबो इफेक्ट झाला असल्यास याचा अर्थ माझ्या शरीरात स्वत:ला बरे करण्याची केवढी ताकद आहे! ही ताकद ट्रिगर करण्यासाठी होमिओपथी उपयोगी पडत असेल तर त्याला माझी अजिबात हरकत नाही.

डॉकिन्स महान शास्त्रज्ञ आहेत पण या बाबतील त्यांचे ऐकून होमिओपथी घेतली नसती तर ते मला केवढ्यात पडले असते?

आपले आरोग्य, आजार आणि त्यावरी उपचारपद्धती यांच्या संदर्भात आपली मते परत तपासून पहाण्याची गरज आहे. या बाबतीत नॉर्मन कझिन्स सारख्या लोकांचे अनुभव मार्गदर्शक ठरावेत. (न्यू इंग्लंड जर्नल ऒफ मेडिसीन या मासिकात आजपर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइअतक्या वैद्यकिय व्यावसायिकेतर व्यक्तींचे लेख प्रकाशित झाले आहेत. नॉर्मन त्यापैकी एक आहेत.)

डॉ. आनंद नाडकर्णी त्यांच्या "आरोग्याचा अर्थ" या पुस्तकात म्हणतात,

"भारतीय वैद्यकशास्त्रात मन व शरीर या दोहोंकडे अत्यंत प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहिलेले आहे... चरक म्हणतो, "प्रकृती इति शरीरम । प्रकृती इति स्वभावम॥" त्रिदोष संकल्पनाही तन-मानसिक आहे.. आज सर्वमान्य झालेली प्रतिबंधक आजाराची संकल्पना "स्वस्थानाम स्वास्थ्यरक्षणम । व्याधितानाम परिमोक्षणमच॥" या शब्दांनी मांडली आहे."

आपल्याकडे काय चांगले आहे तेच आपल्याला माहीत नाही. योगशास्त्रासारखी सोपी, शास्त्रशुद्ध आणि फायदेशीर पद्धत सगळ्या जगाने आपल्याकडून घेतली पण बहुतेक भारतीयांना त्यात रस असल्याचे दिसत नाही. आधुनिक जेवढे ते सर्व चांगले या तत्वानुसार चालून आपण या अमूल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करत आहोत हे आपले दुर्दैव.

Comments

हम्म!

होमियोपॅथीचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही परंतु इतर काही लोकांचा विश्वास असल्याचे ऐकले आहे. होमियोपॅथी संबंधात मी काही बोलणार नाही कारण पुरेशी माहिती नाही. परंतु लेखातील

या दोन्ही बाबतीत प्लासिबो इफेक्ट झाला असल्यास याचा अर्थ माझ्या शरीरात स्वत:ला बरे करण्याची केवढी ताकद आहे! ही ताकद ट्रिगर करण्यासाठी होमिओपथी उपयोगी पडत असेल तर त्याला माझी अजिबात हरकत नाही.

हे वाक्य महत्त्वाचे वाटले आणि ते इतरत्रही वापरता येईल असे वाटते. उदा. "भगवंत दयाळू आहे" या वाक्याचा प्रचार करावा की नाही याबाबत मी साशंक आहे परंतु हे वाक्य जर कोणाला स्वतःपुरते खरे वाटत असेल तर माझी त्याला अजिबात हरकत नाही.

देवावरती विश्वास ठेवून सुखी आयुष्य जगणारे लोक मी पाहिलेले आहेत. :-)

श्रद्धा

उदा. "भगवंत दयाळू आहे" या वाक्याचा प्रचार करावा की नाही याबाबत मी साशंक आहे परंतु हे वाक्य जर कोणाला स्वतःपुरते खरे वाटत असेल तर माझी त्याला अजिबात हरकत नाही.

जो जे वांछील तो ते लाहो.. जोपर्यंत कुणाची श्रद्धा लोकांना/समाजाला अपायकारक ठरत नाही तोपर्यंत त्याला/तिला कुठलीही श्रद्धा बाळगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. (असे माझे मत आहे. :) )

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

होमिओपथी

माझ्या एका नातेवाईकाच्या दोन्ही किडन्या नादुरुस्त व निकामी झाल्या आहेत. आठवड्यातून तीन वेळा डायलिसीस करावे लागते. आतापर्यंत तीन वेळा डायलिसीस चालू असताना रक्तदाब व तत्सम कॉम्प्लिकेशन निर्माण होऊन तीन तीन दिवसांसाठी आयसीयू मध्ये दाखल करावे लागले होते. मात्र गेले सहा महिने होमिओपथी उपचारांमुळे डायलिसीसची वारंवारिता तीनवरुन दोनवर आली आहे, शरीरातील ताकद वाढली आहे.

दुस-या एका नातेवाईकाला जुनाट मूळव्याधाचा त्रास होता. अतिरिक्त रक्तस्रावामुळे अशक्तपणा, व व्याधीच्या स्वरुपामुळे मानसिक त्रास व कुचंबणा होत असे. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले. त्यांनी कोणाचेही न ऐकता होमिओपथी औषधे सुरु केली व चार महिन्यात हा त्रास समूळ नाहीसा झाला.

माझा स्वतःचा होमिओपथीवर काडीचाही विश्वास नाही मात्र जे पाहिले त्यामागे काय कारण असावे ??

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

होमिओपथी

बाराक्षार व पुष्पौषधी जे बरेचदा होमिओपथीच्या पांढर्‍या गोळ्यांप्रमाणेच असते. आता (बाराक्षार व पुष्पौषधी ) व (होमिओपाथी) हे पार वेगवेगळे असल्यास कल्पना नाही. :-) पण त्याबाबत वैयक्तिक अनुभव चांगला आहे विशेषता लहान मुलांच्या काही आजाराबाबत. आता लहान मुले व प्लासिबो इफेक्ट अजुन जास्त निकटचा संबध आहे असे कोणी म्हणाले तर माझ्याकडे उत्तर नाही. हे नक्की की हे औषध घेतलेस तर लवकर बरे वाटेल असे सांगुन औषध दिले नाही आहे. पण अक्षरशा ३ महिन्यात एलर्जी एकदम कमी झाल्या हे नक्की. असे सांगीतले गेले आहे की पूर्णता बरे वाटेल पक्षी ऍलर्जीज निघून जातील. बघूया. लहान मुलात एलर्जी कॉमन आहेत सध्या पण अलोपाथीचे डॉक्टर एन्टी एलर्जी औषध देउन बघु, होईल बरे अमुक पदार्थ देउ नका म्हणतात. या उलट एलर्जी उत्पन्न करणारे पदार्थ आहारात जरुर द्या तरीही एलर्जी हळुहळू संपेल अशी औषधे बाराक्षार व पुष्पौषधी ने दिली आहेत. व त्याचा नक्की फायदा डोळ्यासमोर आहे.

पुन्हा एकदा हेच नमुद करावेसे वाटते, एकंदर होमिओपथी पुर्णता त्याज्य, कुचकामी नक्कीच नसावे. काही विशिष्ट व्याधीमधे असेलही प्रभावशाली. पण जसे अलोपाथी पद्धतीने अजुन पर्यंत तरी सर्व रोगांवर रामबाण इलाज निघाला नाही तसे होमिओपथीचे कदाचित त्यामानाने अजुन मडके कच्चे असावे. फार तर असे म्हणता येईल अलोपाथी जरा हुशार व जास्त रिसोर्सेस असलेला विद्यार्थी आहे त्यामानाने होमिओपथी कमी गुणांक मिळवणारा असावा. :-)

येथेच आजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक संपतो!

झकास!

आणि येथेच आजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक संपतो!
पण ते अजुनही 'होमिओपॅथी ही अंधश्रद्धा' यावर शाईच्या गोळ्या चघळत बसले आहेत!
आशा आहे की त्यांनाही कधी तरी 'अनुभव' येईल आणि असले सर्व्हे करून
भलतेच निष्कर्ष काढत बसणे संपेल!

आपला
गुंडोपंत

अनुभव

ज्वालायुद्धासाठी गळ टाकू नका.
स्वानुभवाविषयी 'आमच्या' लोकांचे मत पुढील प्रकारचे आहे.
बेन स्टाइन: What इफ आफ्टर यू डाइड यू रॅन इन्टू गॉड, and ही सेज, what हॅव यू बीन डूइंग, रिचर्ड? आय मीन what हॅव यू बीन डूइंग? I've बीन ट्राइंग टु बी नाईस टू यू. आय gave यू अ मल्टी-मिलिअन डॉलर पेचेक, over and over अगेन विथ your बुक, and लुक what यू डिड.
रिचर्ड डॉकिन्स: Bertrand Russell हॅड दॅट पॉइंट पुट टू हिम, and ही सेड समथिंग लाइक: सर, why डिड यू टेक सच पेन्स टु हाइड yourself?

क्षमा करा पण काहीच कळले नाही बॉ!

क्षमा करा पण तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय ते काहीच कळले नाही बॉ!
मुळात मला इंग्रजी येत नाही, त्यात हे मरांग्रजी त्याहून कळले नाही त्यामुळे तुमची बेन स्टाइन वगरे मित्र मंडळी काय म्हणतात हे काही कळले नाही.

बाकी युद्धासाठी गळ वगैरे काय म्हणताय?

सुधारकाचा तसा अंकच आहे. आणि येथे अतिशय विद्वान आणि अभ्यासू मंडळींनी त्यातल्या काही विषयावर आणि त्यातल्या निष्कर्षावर भरपूर मंथनही केले आहे.

(त्यातले बरेचसे माझ्या टकलावरून पार झाल्याने तेथे माझ्यासारखा अल्पमति फिरकणेच शक्य नव्हते, फक्त होम्योप्याथी आणि आयुर्वेद म्हणजे अंधश्रद्धा या विचारानेच मी थंडच झालो. विक्री आणि प्रसिद्धी साठी काय वाटेल त्याचा 'अंक काढता येतो' हेच खरे!)

आपला
गुंडोपंत

प्रति: क्षमा करा पण काहीच कळले नाही बॉ!

त्या संवादाचा संदेश असा की विज्ञान वैयक्तिक अनुभवापेक्षा श्रेष्ठ आहे.

विक्री आणि प्रसिद्धी साठी काय वाटेल त्याचा 'अंक काढता येतो' हेच खरे!

हा खोडसाळपणा आहे.

प्लॅसिबो

रुग्णावर होणारे उपचार हे केवळ प्लॅसिबो असल्याची माहिती रुग्णाला मिळाली किंवा शंकाही आली की प्लॅसिबो परिणाम बंद पडतो. हे देवयानीने कचाला दिलेल्या शापासारखे आहे.

चांगला विषय

  • होमिओपथीने आमच्या एका नातेवाईकाचे टॉन्सिल्स चे ऑपरेशन टाळले होते.
  • वडीलांच्या गुढघ्याच्या वाटीत झालेले पाणी पुण्याच्या खडीवाले वैद्य यांनी कसल्याश्या लेप व चुर्णाच्या मदतीने कोणत्याहि ऑपरेशन शिवाय बरे केले होते (नामांकित हॉस्पिटलने २.५ तासांचे ऑपरेशन व ४ महिने सक्तीची रजा टाकून ऍडमिट होण्यास सांगितले होते)
  • ब्रह्मविद्येने (नियमित तास-दिडतास केवळ विविध श्वसनप्रकार, पुजा-अर्चा नव्हे) व नियमित आहाराने थायरॉईडचा आजार माझ्या माहितीत दोघांचा इतर कोणत्याहि औषधाशिवाय बरा झालेला आहे.
  • माझी स्वत:ची सर्दी घालवण्याचा हमखास उपाय म्हणजे पाणी १/८ उकळून घेणे व नंतर पांघरूण घेऊन झोपणे

तात्पर्यः ज्याचा परिणाम "त्याच्या त्याच्या" निष्कर्षाच्या कसोटीवर पुनःपुन्हा घेता येतो व केवळ योगायोग यापलिकडे त्याचा अनुभव विषद करता येतो, तसेच आरागॉर्न म्हणता त्याप्रमाणे त्यावर कोणीही फसवत नसेल त्या बाबतीत "या दोन्ही बाबतीत प्लासिबो इफेक्ट झाला असल्यास याचा अर्थ माझ्या शरीरात स्वत:ला बरे करण्याची केवढी ताकद आहे! ही ताकद ट्रिगर करण्यासाठी होमिओपथी उपयोगी पडत असेल तर त्याला माझी अजिबात हरकत नाही." वगैरे वाक्यं वैध ठरावीत.

अवांतरः आरागॉर्न यांचे लेखनात पुनरागमन बघुन आनंद झाला :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

प्लॅसिबो

रुग्णावर होणारे उपचार हे केवळ प्लॅसिबो असल्याची माहिती रुग्णाला मिळाली की प्लॅसिबो परिणाम बंद पडतो.

खरंच?

असे वाटत नाहि. आरागॉर्न यांना अनुभव आला तेव्हा हा प्लासिबो आहे हे माहित होते असा अंदाज आहे. काय आरागॉर्न बरोबर ना?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

व्याख्या

मग त्या अनुभवाला प्लॅसिबो म्हणता येणार नाही.

हो

तेव्हाही मला हे माहित होते. शिवाय होमिओपथीच्या विरोधातील मुद्देही माहीत होते.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

अनुभव

आपण लिहिल्यासारखे अनुभव बाबा/बुवा लोकांच्या भक्तांनी चालवलेल्या मासिकांमधूनही वाचायला मिळतात. असेच काही अनुभव माझेही आहेत. उदा एका डायबेटिस झालेल्या बाईंची चालू असलेली आधुनिक औषधे बंद करवून आयुर्वेदिक औषधे चालू केली त्या बाई नंतर कोमात गेल्या. (यात दोष आयुर्वेदाचा नसून औषधे बंद करवून घेणार्‍या बाईंचाच आहे). असाच अनुभव एका एपिलेप्सी रुग्णाविषयी पण आहे.

होमिओपाथीवरील मुख्य आक्षेप हा तात्त्विक आहे; विशिष्ट औषधाच्या परिणामकारकतेविषयी नाही. होमिओपाथीमध्ये औषधाचे डायल्यूशन करायला सांगितलेले असते त्या डायल्यूशनला त्या औषधाचा एक रेणूदेखील दिलेल्या मात्रेत असण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. यावरचे उत्तर मिळायला हवे. होमिओपाथ देतात ते उत्तर 'जेव्हा औषध संहत स्वरूपात असते तेव्हा त्याच्या गुणधर्माची मेमरी डायल्यूट केलेल्या औषधात राहिलेली असते' असे आहे.

आज जर या तत्त्वाला फाट्यावर मारून बर्‍याच जास्त कोन्सन्ट्रेशनचे औषध होमिओपाथ देत असतील तर हरकत नाही. म्हणजे औषधाचे रेणू औषधात आहेत त्यामुळे परिणाम झाला आणि रोग बरा झाला असे असेल तर हरकत नाही. निदान आयुर्वेदाप्रमाणे कार्य-कारणभाव तरी सांभाळला जात आहे.

दुसरीकडे औषध वापरात आणण्यासाठी सरकारदरबारी काही चाचण्यांचा डेटा पुरवलेला असतो का?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

काहीसा सहमत

तुमच्या विचारांशी काहीसा सहमत आहे.
दोष बाईंचा आहे हे वाक्य मात्र पटले नाही कारण व्याधींने व्यथीत माणूस काय वाटेल तो उपचार करून घ्यायला तयार असतो हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.

शिवाय वैद्य कोणता आहे हे ही जाणून मगच त्याकडे वळणे हीताचे असु शकते. 'कुणी तरी सांगितले' म्हणून लोक रेफरन्सवर जातात औषधे घ्यायला.

असो,

बेल्स पाल्सी (पाहा विकि) वगैरे सारख्या प्रकारांवर काहीच औषध नाही तेंव्हा
होमियो तर होमियो असे म्हणून तेच चालवले जाते ना?

असो, मला होमियोपाथीचा चांगला आणि काहीच गुण न आल्याचा अनुभव आहे यात मला आर्थिक दृष्ट्या कापले गेले नही हे मात्र नक्की! पण इतर एम बी बी एस वाल्या डॉक्टरांनी प्रत्येकच वेळी खिसा कापल्याचा अनुभव जबरा आणि दाहक आहे.
आता त्यातले अजून काही किस्से ऐकल्यावर तर तिकडे वळणे नकोसेच वाटते आहे.

माझ्या कुटूंबाला कर्जात टाकून
कोणत्यातरी एम बी बी एस किंवा एम एस डॉक्टरचे,
त्याने घेतलेल्या कोणत्यातरी मशिनचे/ लोनच्या हप्त्याचे पैसे,
सो कॉल्ड उपचाराच्या नावाखाली आपण भरण्यापेक्षा
पांढर्‍या गोळ्या खाऊन,
'आपण हळू हळू बरे होऊ' अशा उत्तम समजात मेलेले बरे,
असेच मी समजतो.

काही डॉक्टर लोक कसले धंदे करत आहेत हे पाहिलेत,
तर त्या होमियोपॅथीच्या गोळ्या अतिशय चांगल्या आणि गुणकारी वाटू लागतात यात संशय नाही.

या क्षेत्रातल्या 'कट प्रॅक्टीसवर' डॉ. श्याम आष्टेकरांनी मागे म.टा.ला लेखही लिहिला होता,
काय उपयोग झाला? पण काहीही फरक नाही.

आपला
गुंडोपंत

पर्याय

>>'आपण हळू हळू बरे होऊ' अशा उत्तम समजात मेलेले बरे, असेच मी समजतो.

हे ठीक आहे. कोणते उपचार घ्यावेत हे आपल्यावर अवलंबून आहे. उपचार घ्यावेत की तसेच मरून जावे हे ही आपल्यावरच अवलंबून आहे.

माझा पॉईंट- चांगले अनुभव सांगितले जातात- वाईट सांगितले जात नाहीत हा आहे. तसेच असले अनुभव आधुनिक वैद्यकाला अवघड वाटणार्‍या रोगांविषयीच असतात.

ऍलोपथीचा वापर न करता टायफॉईड, मलेरिया, कॉलरा बरा झाला असे अनुभव तुम्हाला बहुधा ऐकायला मिळणार नाही.
(शर्तिया इलाज करणारे सुद्धा 'त्या' आजारांखेरीज मुळव्याध वगैरेवरच उपचाराचा दावा करतात).

आता प्रश्न खर्चाविषयी.
उपचारपद्धतीत जशा सुधारणा होतात तसा खर्चिकपणा वाढत जातो. माझ्या लहानपणी डॉक्टर टायफॉईड झाला हे लक्षणांवरून अंदाजाने ठरवीत असत. आणि उपचार करीत असत. आज रक्ततपासणी करून नक्की* टायफॉईड झाला आहे असे ठरवता येते. त्या रक्ततपासणीचा वाढीव खर्च आजच्या उपचारात येतो.

*नक्की टायफॉईड झाला आहे हे रक्ततपासणीतून कळते की नाही याविषयी साशंक.

औषधांच्या बाबतीत म्हटले तर रोगावरचे लेटेस्ट औषध सहसा महाग असते तर जुने औषध तुलनेने स्वस्त असते. उदाहरणार्थ क्षयरोगावरचे लेटेस्ट औषध प्रचंड महाग असते. पण जुनी औषधे (उदा रीफॅम्पिसिन्) महाग नसतात. एक औषध कार्बामॅझेपाईन जे एपिलेप्सीवर दिले जाते ते तीस वर्षांपूर्वी नवीन होते आणि ८० पैशाला एक गोळी (त्या काळी खूपच महाग) मिळत असल्याचे आठवते. तीच गोळी आजही २ रु ला मिळते. कारण आता ती जुनी झाली आहे. लेटेस्ट औषध प्रिस्क्राईब करायचे की जुने हे 'फॅमिली' डॉक्टर बहुधा रुग्णाच्या ऐपतीवर ठरवत असावेत (असा माझा अनुभव आहे).

पूर्वीच्या काळी हृदयविकाराचा झटका आल्यावर डॉक्टर रुग्णाला "खर्चात न पाडता" नातेवाईकांना बोलवा असे सांगत असतील. आज बायपासचा "खर्चिक" पर्याय त्याच्यापुढे ठेवत असतील. पर्याय निवडणे (म्हणजे अधिक जगणे की मरून जाणे की जरा सुखात जगणे की वेदना सहन करीत जगणे वगैरे) आपल्या हातात असते.

पूर्वी दात किडल्यावर चांदी भरणे आणि दात काढणे एवढेच पर्याय असत. आज रूट कॅनॉल, क्राऊन बसवणे वगैरे खर्चिक उपचार आहेत. (क्राऊन मध्येही चकचकीत दिसणारा स्वस्त क्राऊन आणि दातासारखाच दिसणारा खर्चिक सिरॅमिक क्राऊन असे पर्याय असतात).
खर्चिक पर्याय निवडण्यामागे काढलेल्या दातामुळे नीट खाता न येण्याचा प्रॉब्लेम सुटतो हे कारण असते.

प्रश्न येतो कारण डॉक्टर खर्चिक पर्याय ठेवतातच आणि आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या बाबत तो पर्याय न स्वीकारण्याचे मानसिक आणि नैतिक धाडस (आपल्याकडे पैसे असतील तर) आपल्याच्याने होऊ शकत नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सुंदर प्रतिसाद...

महाग का होईना पर्याय आहेत व ते परवडू शकतील असे लोकही वाढत आहेत हे पटतं...
सरासरी आयुर्मान वाढण्यामागे होमिओपाथीचा हातभार किती आहे?

टोकाची उदाहरणं (आउटलायर्स) बघण्यापेक्षा सरासरी पहावी...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ऍम्जिओप्लास्टी

पूर्वीच्या काळी हृदयविकाराचा झटका आल्यावर डॉक्टर रुग्णाला "खर्चात न पाडता" नातेवाईकांना बोलवा असे सांगत असतील. आज बायपासचा "खर्चिक" पर्याय त्याच्यापुढे ठेवत असतील. पर्याय निवडणे (म्हणजे अधिक जगणे की मरून जाणे की जरा सुखात जगणे की वेदना सहन करीत जगणे वगैरे) आपल्या हातात असते.

दुर्दैवाने बरेच प्रथितयश कार्डिओलॉजिस्ट गरज नसताना व पेशंटची ऐपत नसताना अँजिओप्लास्टी करायला भाग पाडतात अशा बर्‍याच कथा ऐकल्या आहेत.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

आधुनिक औषधे

आधुनिक औषधे चालू असतानाही डायबेटिसचे रुग्ण कोमात जाण्याचे प्रमाण किती याची कल्पना आहे का? म्हणजे असावे असे मला वाटते. अशी उदाहरणे पाहण्यात आहेत. अर्थातच, त्याचे नेमके कारण माहित नाही (जसे औषधे सुरु असतानाही पथ्य न पाळणे, वेळेवर औषधे न घेणे वगैरे वगैरे). आयुर्वेदीक औषधांचा प्रभाव पडण्यास काही काळ लागतो असे काहीजण म्हणतात. त्यामुळे येथे दोष बाईंचाच म्हणावा लागेल. शास्त्राचा नाही.

ह्म्म्म्म्

दोष बाईंचाच हे पटले.
मात्र तुलना थेट बाबा/बुवा लोकांच्या भक्तांच्या अनुभवांशी जोडणे थोडे घाईचे वाटते. १. हे भक्त कोणत्याही गोष्टीचा संबंध प्रस्तुत बाबा/बुवा/बाईंच्या शक्तीशी जोडतात. २. हे अनुभव पुनःपुन्हा येणे कठीण (जवळ -जवळ अशक्य) असते. ३. यातील भत्क हे विशिष्ट बाबा/बुवा/बाईंच्या भक्तीशी एकनिष्ठ असतात त्याप्रमाणे मी यापैकी कोणत्याही उपचार पद्धतीचा "भक्त" नाहि. मात्र मला पुनःपुन्हा सारखाच (रिपीटेबल) अनुभव आला आहे इतकेच.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अनुभव आवडला

श्री. आरागॉर्न

अनुभव आवडला.

- आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पर्याय नव्हे

इथे होमिओपथी अल्युपथीला पर्याय ठरू शकेल असा कुठेही दावा नाही. मी अल्युपथिही वापरतो. मागच्याच वर्षी रूट कॅनॉल करून घेतले. दोन्ही (किंवा अधिक) पद्धतींमध्ये जी जेव्हा योग्य असेल/वाटेल तेव्हा ती वापरायला हरकत नसावी. एकाला दुसरा पर्याय असे कुठेच म्हटलेले नाही.

परत आरोग्याचा अर्थ कडे वळतो. अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण अँटीबायोटीक्स/पेनकिलर इचा वापर प्रमाणाबाहेर करत आहोत. अशाने जेव्हा खरी गरज असते तेव्हा अँटीबायोटीक्स प्रभावी ठरत नाहीत. तसेच जरा कुठे दुखले तर लगेच पेनकिलर हा उपायसुद्धा चांगला नाही.

होमिओपथी कशी काम करते हे सांगता येत नाही म्हणून ती वापरू नये हा दुराग्रह वाटतो. मला गुण येत असेल तर शास्त्रज्ञांना काय होते आहे हे कळेपर्यंत मी का थांबू? प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत सिद्ध होतेच असे नाही. फ्रॉइडचा एकही सिद्धांत शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येत नाही. सायकोऍनालिसीसला सुरूवात केल्यावर पेशंट किती वर्षात बरा होईल हे कुठलाही मानसोपचारतज्ञ सांगू शकत नाही. तरीही कोर्टात त्याची साक्ष ग्राह्य धरतात. इनसॅनिटी प्ली ठरवून आरोपीची शिक्षा कमी होऊ शकते.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

बायस

ऍलोपॅथीच्या नावे शास्त्रीय वैद्यकावर टीका होते. ते दोन्ही समान नाहीत. ज्या ज्या उपचारांच्या उपयुक्ततेविषयी पुरावा सापडतो ते सर्व स्वीकारणे म्हणजे शास्त्रीय वैद्यक होय.

होमिओपथी कशी काम करते हे सांगता येत नाही म्हणून ती वापरू नये हा दुराग्रह वाटतो.

'होमिओपॅथी काम करते' हा दावाच निराधार आहे.

मला गुण येत असेल तर शास्त्रज्ञांना काय होते आहे हे कळेपर्यंत मी का थांबू?

हे स्वातंत्र्य मला मान्य आहे. पण कायहो, देवीला बोकड कापून 'गुण' येणार्‍यांना तुम्ही कमी समजत नाही का?
दुसरा मुद्दा असा की 'मला गुण येतो' असे स्वतःशी बोलून तुम्ही गप्प बसत नाही. तुम्ही 'करून बघा' हा सल्ला वाटत फिरता. यदृच्छेच्या नियमांमुळे त्यांपैकी काहींची प्रकृती सुधारते. त्यांपैकी काहीजण तुमच्यासारखे प्रचारक होतात. (ज्यांची प्रकृती सुधारत नाही त्यांना गप्प करण्यासाठी काही ना काही कारणे तयारच असतात.) शास्त्रीय चाचण्यांना फाटा दिल्यामुळे होमिओपॅथीचे दुकान असे चालू राहते.

योगशास्त्रासारखी सोपी, शास्त्रशुद्ध आणि फायदेशीर पद्धत सगळ्या जगाने आपल्याकडून घेतली

शास्त्रशुद्ध? मुळीच नाही.

सल्ला

मी करून पहा असा सल्ला दिल्याचे स्मरत नाही. मी माझा अनुभव सांगीतला.
कझिन्सचा लेख वाचला का? :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

होमिओपथी

लेखातले पहिले दोन परिच्छेद हे पेपरात ज्या बारीक टायपातल्या जाहीराती येतात त्यासारखे वाटले. वैयक्तिक अनुभव हा काही उपयुक्तता सिद्ध करणारा निकष नाही हे अश्या जाहिरातींमधून दिसून येते.

इथे होमिओपथी अल्युपथीला पर्याय ठरू शकेल असा कुठेही दावा नाही. मी अल्युपथिही वापरतो. मागच्याच वर्षी रूट कॅनॉल करून घेतले. दोन्ही (किंवा अधिक) पद्धतींमध्ये जी जेव्हा योग्य असेल/वाटेल तेव्हा ती वापरायला हरकत नसावी. एकाला दुसरा पर्याय असे कुठेच म्हटलेले नाही.

हो, पण तुमचा रोख हा काहीसा सगळ्या पद्धती एकाच पारड्यात तोलण्याचा आहे. जो मला आक्षेपार्ह वाटतो. (तसे नसल्यास क्षमस्व!) त्रुटी आणि फायदे हे प्रत्येक रोग निवारण पद्धतीतून दाखवता येतील. ऍलोपथीमधे असल्या गोंधळांची यादी करायची झाल्यास त्यावर एक प्रबंध लिहून होईल. पण आजच्या उपलब्ध उपचार पद्धतींमधे ऍलोपथी हा निर्विवाद सर्वात जास्त प्रमाणित आणि शास्त्रिय पुराव्यांच्या पायावर उभा असलेला पर्याय आहे. ह्याबाबत आपले दुमत असल्यास कळावे.

राहता राहिला होमिओपथीने तुम्हाला गुण येण्याचा प्रश्न. तसा तो साखरेच्या पाण्याने/ व्हिटामीन सीच्या गोळ्यांनीही येऊ शकतो. आमचे एक ऍलोपथीची प्रॅक्टिस करणारे स्नेही पेशंटसना सर्जरी नंतर काही रंगीबेरंगी व्हिटामीनच्या गोळ्या देतात. सर्जरीशी तसा त्याचा थेट संबंध नसला तरी रोग्याल डॉक्टरांनी येऊन विचारपुस केली आणि औषध दिले केवळ ह्या भावनेने सर्जरीतून रिकव्हर होण्यास बळ मिळते. मग ते वापरावे का? तर अवश्य वापरावे. होमिओपथीच का चायनीज मेडिसीन, तलिस्मा, रेकी, जडी बुटी, सत्यनारायणाची पुजा कसलेही उपाय करावेत. रोग्याला आराम पडणे हे महत्वाचे.

तेव्हा जोपर्यंत निव्वळ एक सप्लिमेंटरी उपाय म्हणून बाकीचे पर्याय जोखून बघीतले जातात त्यात काही हरकत नाही, पण लगेच त्यावरुन ऍलोपथीशी त्यांची तुलना करणे हे अयोग्य आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

भारतीय वैद्यकशास्त्रात

"भारतीय वैद्यकशास्त्रात मन व शरीर या दोहोंकडे अत्यंत प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहिलेले आहे... चरक म्हणतो, "प्रकृती इति शरीरम । प्रकृती इति स्वभावम॥" त्रिदोष संकल्पनाही तन-मानसिक आहे.. आज सर्वमान्य झालेली प्रतिबंधक आजाराची संकल्पना "स्वस्थानाम स्वास्थ्यरक्षणम । व्याधितानाम परिमोक्षणमच॥" या शब्दांनी मांडली आहे."

पाश्चिमात्य वैद्यकशास्त्रातही ह्याहून काही वेगळे सांगीतले आहे असे वाटत नाही. रक्तदाबासारख्या दुखण्यांचे निदान झाल्यास सर्वप्रथम आयुषपद्धती बदलणे (लाईफ स्टाईल मॉडिफिकेशन) हा उपाय आधुनिक वैद्यकशास्त्रातही सुचवला जातो. खाण्यावर नियंत्रण ठेवा, मानसिक तणाव कमी करा, व्यायाम करा हा सगळ्यात पहिल्यांदा अवलंबायचा उपचार आहे. त्यानेही रक्तदाब नियंत्रणात न आल्यास औषधे सुरू करावीत असे ऍलोपथीत सांगीतले जाते.

ह्यात नविन काहीच नाही. पण हेच विचार पुरातन ग्रंथातुन संस्कृतमधे लिहिलेले दिसले की मात्र आपला दृष्टिकोन लगेच बदलतो. काहीतरी सखोल ज्ञान असल्याचा भास होतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

व्यत्यास

पाश्चिमात्य वैद्यकशास्त्रातही ह्याहून काही वेगळे सांगीतले आहे असे वाटत नाही. रक्तदाबासारख्या दुखण्यांचे निदान झाल्यास सर्वप्रथम आयुषपद्धती बदलणे (लाईफ स्टाईल मॉडिफिकेशन) हा उपाय आधुनिक वैद्यकशास्त्रातही सुचवला जातो. खाण्यावर नियंत्रण ठेवा, मानसिक तणाव कमी करा, व्यायाम करा हा सगळ्यात पहिल्यांदा अवलंबायचा उपचार आहे. त्यानेही रक्तदाब नियंत्रणात न आल्यास औषधे सुरू करावीत असे ऍलोपथीत सांगीतले जाते.

ह्यात नविन काहीच नाही. पण हेच विचार पुरातन ग्रंथातुन संस्कृतमधे लिहिलेले दिसले की मात्र आपला दृष्टिकोन लगेच बदलतो. काहीतरी सखोल ज्ञान असल्याचा भास होतो.

याचा व्यत्यासही करता येईल. आपल्याकडे जे पूर्वापार आहे त्याकडे दुर्लक्ष पण तेच तिकडून आले तर वा! वा! :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पाहिला प्रतिसाद?

हो, पण तुमचा रोख हा काहीसा सगळ्या पद्धती एकाच पारड्यात तोलण्याचा आहे. जो मला आक्षेपार्ह वाटतो. (तसे नसल्यास क्षमस्व!) त्रुटी आणि फायदे हे प्रत्येक रोग निवारण पद्धतीतून दाखवता येतील. ऍलोपथीमधे असल्या गोंधळांची यादी करायची झाल्यास त्यावर एक प्रबंध लिहून होईल. पण आजच्या उपलब्ध उपचार पद्धतींमधे ऍलोपथी हा निर्विवाद सर्वात जास्त प्रमाणित आणि शास्त्रिय पुराव्यांच्या पायावर उभा असलेला पर्याय आहे. ह्याबाबत आपले दुमत असल्यास कळावे.

आधी ह्यावरचे तुमचे मत समजल्यास आभारी राहीन.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

इतरत्र

मी इतरत्र म्हटलेच आहे की हा अल्युपथीला पर्याय आहे असा दावा नाही. मी अल्युपथीही वापरतो.
मात्र ज्या बाबतीत अल्युपथीमुळे मला अधिक खर्च आणि शारिरिक मनस्ताप सोसावा लागला असता तिथे मला होमिओपथीने गुण आला. हा अनुभव मी मांडला. इतकेच.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

स्पष्ट नाही

तुमचा रोख हा काहीसा सगळ्या पद्धती एकाच पारड्यात तोलण्याचा आहे का? आजच्या उपलब्ध उपचार पद्धतींमधे ऍलोपथी हा निर्विवाद सर्वात जास्त प्रमाणित आणि शास्त्रिय पुराव्यांच्या पायावर उभा असलेला पर्याय असे तुम्ही मानता का?

ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अजून स्पष्ट झालेली नाहीत.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

नाही

तुमचा रोख हा काहीसा सगळ्या पद्धती एकाच पारड्यात तोलण्याचा आहे का?
नाही.

आजच्या उपलब्ध उपचार पद्धतींमधे ऍलोपथी हा निर्विवाद सर्वात जास्त प्रमाणित आणि शास्त्रिय पुराव्यांच्या पायावर उभा असलेला पर्याय असे तुम्ही मानता का?
मानत होतो पण हे अनुभव आल्यापासून हे प्रत्येक वेळी खरे असेलच असे नाही हे मानायला जागा आहे असे माझे मत आहे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

धन्यवाद

थेट उत्तरांबद्दला आभारी आहे.

होमिओपथी तुमच्या वैयक्तित अनुभवात तुम्हाला अधिक गुणकारी वाटली त्यावरुन होमिओपथी हे अधिक प्रमाणित आणि शास्त्रिय पुराव्यावंर आधारित आहे ह्या मतावर कसे काय आलात समजले नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मुद्दा पटण्यासारखा....

होमिओपथी तुमच्या वैयक्तित अनुभवात तुम्हाला अधिक गुणकारी वाटली त्यावरुन होमिओपथी हे अधिक प्रमाणित आणि शास्त्रिय पुराव्यावंर आधारित आहे ह्या मतावर कसे काय आलात समजले नाही.

मुद्दा पटण्यासारखा असला तरी तो केवळ एका व्यक्तीचा अनुभव आहे. वरील अनुभवाला काही वैज्ञानिक आधार दिसत नाही. आणि केवळ अशा अनुभवावरुन लोक होमिओपथीकडे वळतील वगैरे असे मला वाटत नाही आणि तसे समजण्याचेही कारण नाही. लेखक स्वतः ज्या 'व्हूडू म्याजिक' 'प्लासिबो इफेक्ट' आणि असेच बोलून आपल्या मताबद्दलही काही ठाम दिसत नाही. मात्र आजार बरे करण्यासाठीचे आधार 'होमिओपथी' आहे, असु शकते असे ते सुचवित आहेत. आणि असे अनेक चमत्कार, अनुभव,मत,चर्चा, आपल्या आजूबाजूला वाचायला मिळतात, आपण वाचकांनी डोळस असावे इतका बोध घ्यावा आणि सोडून द्यावे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मी

लेखक स्वतः ज्या 'व्हूडू म्याजिक' 'प्लासिबो इफेक्ट' आणि असेच बोलून आपल्या मताबद्दलही काही ठाम दिसत नाही. मात्र आजार बरे करण्यासाठीचे आधार 'होमिओपथी' आहे, असु शकते असे ते सुचवित आहेत.

मला गुण आला हे माझ्यापुरते १००% सत्य आहे. तो कसा आला हे मला माहित नाही आणि त्यावर चर्चा करण्याचीही इच्छा नाही. याचा अर्थ मी माझ्या मताबद्दल* ठाम नाही असा काढायचा असेल तर बी माय गेस्ट. :)

*कुठल्या मताबद्दल? : मी बरा झालो हे मत नाही, वस्तुस्थिती आहे. कसा झालो माहित नाही, इच्छुकांनी शोधून काढावे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

आधी

म्हटल्याप्रमाणे होमिओपथी शास्त्र आहे हे सिद्ध करण्याचा हेतू इथे नव्हता. होमिओपथीमुळे मला फायदा झाला आहे इतकेच सांगायचे होते जो निर्विवादपणे झाला आहे.

नॉर्मन कझिन्सचे भाषण कुणी वाचलेले दिसत नाही. :)
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

मुळे?

कोरिलेशन डझ नॉट इम्प्लाय कॉझेशन असे एक मत आहे. ते मला पटत नसले तरी तुम्ही कोरिलेशनसाठीही केवळ दोन बिंदू घेतले. शास्त्रीय डॉक्टरांची (शस्त्रक्रिया आवश्यक आहे असे ठरविण्याची) अचूकता ९५% असेल तरी चारशेत एकजण 'मला शस्त्रक्रियेची गरज नव्हती' असा जप करीत फिरेल.

मी करून पहा असा सल्ला दिल्याचे स्मरत नाही. मी माझा अनुभव सांगीतला.

"आपले आरोग्य, आजार आणि त्यावरी उपचारपद्धती यांच्या संदर्भात आपली मते परत तपासून पहाण्याची गरज आहे. या बाबतीत नॉर्मन कझिन्स सारख्या लोकांचे अनुभव मार्गदर्शक ठरावेत."
गरज, मार्गदर्शन, हे काय होते?

याचा व्यत्यासही करता येईल. आपल्याकडे जे पूर्वापार आहे त्याकडे दुर्लक्ष पण तेच तिकडून आले तर वा! वा! :)

पूर्वापार सांगितले ते कधीकधी यदृच्छेने बरोबर निघते. त्यांना ना कोलेस्ट्रॉल माहिती होते ना त्यांनी केस-कंट्रोल प्रकारचे अभ्यास केले.

जाहिरात करून मला काय मिळणार?

लोकांना शहाणपणा शिकविण्यास मिळाल्याचा आनंद मलाही होतो.

तरीही कझिन्स यांचे भाषण वाचावे असे आग्रहाने सांगावेसे वाटते. त्यांचा लेख न्यू इंग्लंड जर्नल ऒफ मेडिसीन मध्ये प्रकाशित झाल्याने (दुर्दैवाने) त्यांना भोंदू बाबा म्हणता येणार नाही.

येईल.

भोंदू

त्यांचा लेख न्यू इंग्लंड जर्नल ऒफ मेडिसीन मध्ये प्रकाशित झाल्याने (दुर्दैवाने) त्यांना भोंदू बाबा म्हणता येणार नाही.

'न्यू इंग्लंड जर्नल ऒफ मेडिसीन'मध्ये प्रसिद्ध झालेले आहे म्हणून ते चुकीचे नाही अशी समजूत करून घेणे चूक आहे. कोरियन शास्त्रज्ञाने क्लोनिंगबद्दल तर जॅन हेंड्रीक शोन यांनी भौतिकशास्त्रात केलेले संशोधन खोटे असल्याचे नंतर सिद्ध झाले. शोन यांचे 'सायन्स' व 'नेचर' सारख्या जर्नल्समधील संशोधन मागे घ्यावे लागले होते. भोंदुपणाचे संख्याशास्त्रीय वितरण सर्व व्यवसायांत सारखेच असू शकेल.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

शॉन

शॉन - कझिन्स तुलना थोडी अप्रस्तुत वाटते.

कझिन्स स्वतः आजारी असताना नेहेमीच्या औषधांचा उपयोग होत नाही म्हणून त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटामिन सी, अस्कॉर्बिक ऍसिड आणि दुर्दम्य आशावाद यांच्या सहाय्याने डॉक्टरांनी ५०० मधील १ रूग्ण वाचतो असे सांगितलेले असताना यावर मात करून दाखवली. नंतर यावर त्यांनी अनाटॉमी ऑफ ऍन इलनेस नावाचे पुस्तकही लिहीले. त्यांचे लिखाण स्वानुभवावर आधारित आहे. अर्थात या सायटीवर स्वानुभवाला शून्य किंमत आहे ते सोडा.

शॉन लई भारी मानूस. ह्या टायमाला सुपरकंडक्टिव्हीटी, पुढच्या टायमाला क्वांटम हॉल इफेक्ट, त्यापुढच्या टायमाला ट्रान्झिष्टर. जे दनादना सायन्स, नेचर छापल बगा, समद पब्लिक येड झाल म्हना ना. नंतर सापडल तावडीत, मंग समदे सायन्स-नेचरवाले बसले शॉनचे पेपर हुडकत. सापडला शॉनचा पेपर की घे मागं आन छाप अपोलोजी.
आन मंग त्याच्या कोलॅबोरेटरला झाली पळता भुई थोडी. मंग म्हनायला लागल, मला त्यान दावलाच नव्हता पेपर. आसं कस ब्वॉ? सायन्स, नेचर छापून येतं तवा ग्वाड लागत, मंग नंतर अंगाशी आलं तर निस्तराया नगं?

असो. :)
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

तुलना नाही

शॉन व कझिन्स यांच्यात तुलना केलेली नाही. निव्वळ प्रथम दर्जाच्या जर्नल्समध्ये एखादी गोष्ट प्रसिद्ध झाल्यास ती भोंदूपणा विरहीत असेल असे गृहीत धरता येत नाही. एवढाच मर्यादीत हेतू होता. स्वानुभवाला अर्थातच किंमत आहे. प्रतिसाद देणारे लोकच हा लेख वाच त आहेत असा समज तितकासा बरोबर नाही.

तुमच्या पुनरागमानामुळे आनंद झाला.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

ऍन्क स्पॉन्ड

व्हिटामिन सी म्हणजेच अस्कॉर्बिक ऍसिड
दोनवेळा नोबेल पुरस्कार जिंकणार्‍या लायनस पॉलिंग यांनीही उतारवयात व्हिटामिन सी चे खूळ पसरविले.
कझिन्स यांचा रोग फारच कमी वेळा जीवघेणा असतो. त्यांच्या डॉक्टरांचे ज्ञान चुकीचे असण्याच्या शक्यतेपेक्षा कझिन्स जाणूनबुजून खोटे बोलत असल्याची शक्यता अधिक आहे.

टाळ्या

त्यांच्या डॉक्टरांचे ज्ञान चुकीचे असण्याच्या शक्यतेपेक्षा कझिन्स जाणूनबुजून खोटे बोलत असल्याची शक्यता अधिक आहे.

टाळ्या. असे विधान करताना पुरावा वगैरे सारख्या तुच्छ गोष्टींची गरज भासत नसावी.
असो. चालू द्या. :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

जे एफ जी आय

विकीपिडीयाची माहिती पुरावा म्हणून पुरेल का?

ए बी सी डी

त्यांच्या डॉक्टरांचे ज्ञान चुकीचे असण्याच्या शक्यतेपेक्षा कझिन्स जाणूनबुजून खोटे बोलत असल्याची शक्यता अधिक आहे.

याला पुरावा कुठे आहे?
-
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पुरावा

"AS is not really deadly"
ही माहिती आजची नाही. त्या काळातही डॉक्टरांना हे ज्ञान असे.
कझिन्स यांनी डॉक्टरांवर चुकीचे निदान केल्याचा दावा ठोकला का? म्हणजे त्यांना डॉक्टरांनी १:५०० हा आकडा सांगितल्याचा पुरावा नाही.

आपण

मसावरील जुनेजाणते सदस्य आहात याचा मात्र पुरावा मिळाला. :)

यापुढील "चर्चेत" मला रस नाही. याला चर्चा म्हणणे म्हणजे दाउदला नोबेल पीस प्राईझ देण्यासारखे आहे. असो.
यापुढे आपण कुठलेही विधान करावे, माझी त्याला हरकत नाही.
साईनफेल्डमधील एक वाक्य आठवले, "लाइफ इज टू शॉर्ट टू वेस्ट ऑन यू." :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

काथ्याकूट?

मसा म्हणजे काय तेही मला माहिती नाही.

:)

डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटामिन सी, अस्कॉर्बिक ऍसिड आणि दुर्दम्य आशावाद
व्हिटामिन सी म्हणजेच अस्कॉर्बिक ऍसिड

:)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

नियम

कोरियन शास्त्रज्ञाने क्लोनिंगबद्दल तर जॅन हेंड्रीक शोन यांनी भौतिकशास्त्रात केलेले संशोधन खोटे असल्याचे नंतर सिद्ध झाले.

हा अपवाद झाला. पण म्हणून मूळ नियम खोटा ठरत नाही. न्यू इंग्लंड जर्नल मधील बहुसंख्य शोध निबंध वाचल्यास हे लक्षात येईल.

भोंदुपणाचे संख्याशास्त्रीय वितरण सर्व व्यवसायांत सारखेच असू शकेल.

ह्याचा अर्थ काय? न्यू इंग्लंड जर्नल आणि सनातन प्रभात दोन्हीकडे सारख्याच सांख्यिक पातळीवर भोंदूपणा आहे का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अर्थ

ह्याचा अर्थ काय? न्यू इंग्लंड जर्नल आणि सनातन प्रभात दोन्हीकडे सारख्याच सांख्यिक पातळीवर भोंदूपणा आहे का?

सनातन प्रभात आणि न्यु इंग्लंड जर्नल दोन्हीकडे सारख्याच पातळीवर भोंदूपणा नाही. वितरण (समजा नॉर्मल) सारखे असले तरी सरासरी (म्यु) आणि वेरियन्स (सिग्मा) असे पॅरामिटर्स वेगळे असू शकतील. न्यु इंग्लंड जर्नलमधील भोंदू संशोधकांची सरासरी सनातन प्रभात पेक्षा खूपच कमी असू शकेल. या जर्नल्सना सरसकट खोटे ठरवण्यासारखे विधान प्रतिसादात आढळले नाही. कुठेतरी सातातील एक शोधनिबंधांतील विदा चुकीचा असतो असे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. (दुवा) तेव्हा कोरियन शास्त्रज्ञ अपवाद म्हणता येणार नाही. तसेच सर्वच संशोधन चुकीचे असते असेही म्हणता येणार नाही.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

 
^ वर