होमिओपथी : वैयक्तिक अनुभव

२००० मध्ये अपघातामुळे माझ्या उजव्या हाताची दोन्ही हाडे मोडली. ऑपरेशन करून त्यात दोन रॊड घातले. एक महिन्यानंतर एक्स-रे काढल्यावर हाडे जिथे तुटली होती तिथे फट असल्याचे दिसले. याचा अर्थ हाडे जुळून येत नव्हती. डॉक्टरांच्या मतानुसार परत ऑपरेशन करून ग्राफ्टिंग करावे लागेल. आधीच हाताला ३२ टाके पडलेले, ते उघडून परत ऑपरेशन हा उपाय शारिरिक/मानसिक क्लेश, खर्च, मनस्ताप यापैकी कुठल्याच तर्‍हेने फायदेशीर नव्हता. पण याखेरीज डॉक्टरांकडे दुसरा उपाय नव्हता. सुदैवाने मला होमिओपथी घेण्याची बुद्धी सुचली. औषधे सुरू केल्यानंतर एका महिन्यात हाडे जुळून आली. औषधांचा खर्च २०० रूपयांपेक्षाही कमी असेल.

कॉलेजमध्ये असल्यापासून मला किडनी स्टोनचा वारंवार त्रास होत असे. यासाठी दर २-३ वर्षांनी लिथोट्रिप्सी करून अल्ट्रासोनिक तरंगाच्या सहाय्याने खडे फोडावे लागत असत. हे खर्चिक होतेच, शिवाय हा उपाय मलमपट्टी होता. हे होऊ नये म्हणून काय करावे यासाठी डॊक्टरांकडे उत्तर नव्हते. कॅल्शियम खाऊ नका, पालक/टोमाटो वगळा, पाणी भरपूर प्या, ही जेनेटीक टेन्डन्सी आहे याला उपाय नाही अशी उत्तरे मिळायची. हाताचे दुखणे बरे झाल्यानंतर मी यासाठीही औषधे घेतली. त्यावेळेसही किडनीमध्ये ६-७ मि.मि. लांबीचे तीन खडे होते. औषधे सुरू केल्यानंतर आठ महिन्यांनी सोनोग्राफी केली त्यात एकही खडा आढळला नाही. तेव्हापासून मी नियमित ही औषधे घेत आहे आणि परत मला हा त्रास झालेला नाही.

हे टंकण्याचा उद्देश होमिओपथी शास्त्र आहे हे पटवून देण्याचा नाही. किंबहुना होमिओअपथी काय आहे यात मला फारसा रस नाही. तिला तुम्ही व्हूडू म्याजिक म्हटले तरी चालेल. या दोन्ही बाबतीत प्लासिबो इफेक्ट झाला असल्यास याचा अर्थ माझ्या शरीरात स्वत:ला बरे करण्याची केवढी ताकद आहे! ही ताकद ट्रिगर करण्यासाठी होमिओपथी उपयोगी पडत असेल तर त्याला माझी अजिबात हरकत नाही.

डॉकिन्स महान शास्त्रज्ञ आहेत पण या बाबतील त्यांचे ऐकून होमिओपथी घेतली नसती तर ते मला केवढ्यात पडले असते?

आपले आरोग्य, आजार आणि त्यावरी उपचारपद्धती यांच्या संदर्भात आपली मते परत तपासून पहाण्याची गरज आहे. या बाबतीत नॉर्मन कझिन्स सारख्या लोकांचे अनुभव मार्गदर्शक ठरावेत. (न्यू इंग्लंड जर्नल ऒफ मेडिसीन या मासिकात आजपर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइअतक्या वैद्यकिय व्यावसायिकेतर व्यक्तींचे लेख प्रकाशित झाले आहेत. नॉर्मन त्यापैकी एक आहेत.)

डॉ. आनंद नाडकर्णी त्यांच्या "आरोग्याचा अर्थ" या पुस्तकात म्हणतात,

"भारतीय वैद्यकशास्त्रात मन व शरीर या दोहोंकडे अत्यंत प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहिलेले आहे... चरक म्हणतो, "प्रकृती इति शरीरम । प्रकृती इति स्वभावम॥" त्रिदोष संकल्पनाही तन-मानसिक आहे.. आज सर्वमान्य झालेली प्रतिबंधक आजाराची संकल्पना "स्वस्थानाम स्वास्थ्यरक्षणम । व्याधितानाम परिमोक्षणमच॥" या शब्दांनी मांडली आहे."

आपल्याकडे काय चांगले आहे तेच आपल्याला माहीत नाही. योगशास्त्रासारखी सोपी, शास्त्रशुद्ध आणि फायदेशीर पद्धत सगळ्या जगाने आपल्याकडून घेतली पण बहुतेक भारतीयांना त्यात रस असल्याचे दिसत नाही. आधुनिक जेवढे ते सर्व चांगले या तत्वानुसार चालून आपण या अमूल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करत आहोत हे आपले दुर्दैव.

Comments

वितरण

भोंदूगिरीचे अंडरलायिंग डिस्ट्रिब्युशन सगळ्या व्यवसायत सारखेच असेल ह्यातुन काय सुचवायचे होते ते समजले नाही. सगळ्याच व्यव्यसायात भोंदूगिरी असते हेच सुचवायचे होते का? तसे असेल तर त्यासाठी सांख्यिकीची क्लिष्ट भाषा कशाल?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

होय

ठकसेन हे प्रत्येक व्यवसायात आढळतात तसेच त्यांचे त्याच व्यावसायातील इतर लोकांच्या तुलनेत प्रमाण सारखेच असावे असे स्पेक्युलेटिव (ठामपणे दावा केलेला नव्हता) विधान होते. तुम्हाला क्लिष्ट वाटले का? खरडवहीतून वेगळी चर्चा करता येईल.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

चालेल

ठकसेन हे प्रत्येक व्यवसायात आढळतात

इथं पर्यंत सहमत आहे

तसेच त्यांचे त्याच व्यावसायातील इतर लोकांच्या तुलनेत प्रमाण सारखेच असावे

ह्या मता विषयी साशंक आहे.

खरडवहीतून वेगळी चर्चा करता येईल.

हरकत नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

नेहेमी

नेहेमीप्रमाणे मसावरील चर्चा योग्य मार्गाने हात आहे हे पाहून संतोष झाला. :)
इथे येणे का मिस होत नाही ते ही कळाले. :)

विरोधकांचे काम सोपे करण्यासाठी काही मुद्दे.
होमिओपथी शास्त्र आहे असा कुठेही दावा केलेला नाही. किंबहुना मला गुण कसा आला हेही माहीत नाही. विरोधकांना कळाल्यास मला कळवावे. मात्र मला गुण आला असल्याने मी होमिओपथी वापरत रहाणार, तिला शास्त्राची मान्यता आहे किंवा नाही याचा विचार न करता.

त्याचप्रमाणे योग, प्राणायाम हे ही चालू ठेवणार. त्यांनाही शास्त्राची मान्यता आहे किंवा नाही माहित नाही पण माझ्या कार्डिओलॉजिस्टनेच रक्तदाब कमी करण्यासाठी योगासने करायला सांगितली त्यामुळे केवळ आपल्या पूर्वजांचे म्हणून त्याज्य असे करणार नाही.

हा माझा अनुभव आहे. यातून ज्यांना जे घ्यायचे ते त्यांनी घ्यावे. ही जाहिरात नव्हे, जाहिरात करून मला काय मिळणार? पण काही लोकांना यातून फायदा झाला तर चांगलेच आहे.

दुर्दैवाने चर्चेतील मुख्य मुद्दे म्हणजेच आजार आणि मानसिकता यातील संबंध (कझिन्स आणि नाडकर्णी यांचे संदर्भ त्यासाठीच दिले होते) यावर सोईस्करपणे दुर्लक्ष केले असे दिसते. तरीही कझिन्स यांचे भाषण वाचावे असे आग्रहाने सांगावेसे वाटते. त्यांचा लेख न्यू इंग्लंड जर्नल ऒफ मेडिसीन मध्ये प्रकाशित झाल्याने (दुर्दैवाने) त्यांना भोंदू बाबा म्हणता येणार नाही.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

भाषण वाचले

श्री आरागॉर्न, कझिन्स यांचे भाषण वाचले. सहज वाचता येण्यासारखे आहे. तुमचा अनुभव तुम्ही मांडला यात काही गैर आढळले नाही. तुम्ही होमिओपथीचा पुरस्कार केला आहे असे मलातरी भासले नाही.

मला होमिओपथीचा अनुभव नाही पण त्या उपचारपद्धतीत काही तथ्य आढळत नाही. मानसिक स्वास्थ्य हे आरोग्याचाच भाग असल्याने त्याकडे लक्ष दिले जावे. व्यक्तिगत जीवनात मी काही गोष्टी करतो ज्यांच्यात काहीच सुधरवण्याचा दम नाही पण मला बरे वाटते. हे फक्त छोट्या दुखण्यांबाबतच घडते.

तुमच्या अनुभवात मात्र किडनीस्टोनचा त्रास नष्ट होणे, हाडे जुळून येणे असे मोठे बदल घडले आहेत. चिकित्सकपणे शोध घेतल्यास होमिओपथी सोडून इतर स्पष्टीकरण कदाचित सापडू शकेल. या इतर स्पष्टीकरणाच्या शक्यतेचा उल्लेखही (होमिओपथी ट्रिगर ठरण्याची शक्यता ही इतर शक्यतांमधली नाही.) लेखात असता तर कदाचित तुमचा अनुभव काही लोकांना प्रचारकी थाटाचा भासला नसता.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

कारणे दाखवा नोटीस

श्री. आरागॉर्न

आपल्याला "भ्रमसेन" आणि आपल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना "ठकसेन" पदवी का देण्यात येऊ नये याची कारणे द्यावीत. एक तर स्वतः अशास्त्रीय पद्धतीचा वापर करता. वर गुण आल्याचे जाहीर सांगता. अशाने समाजात अंधश्रद्धा , अवैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागणार नाही का? डॉकिन्स यांनी "ऍब्सोल्यूट" पातळीवर हा युक्तिवाद असिद्ध केला आहेच. त्यामुळे याने गुण येणे शक्यच नाही. शास्त्रीय पद्धतीच्या औषधाच्या साईड इफेक्टसने मरण आले तर बेहत्तर पण अशास्त्रीय पद्धतीचा वापर करणार नाही अशी वि़ज्ञानावर जाज्वल्य निष्ठा हवी तरच समाजाची प्रगती शक्य आहे.

आपला
(वि़ज्ञाननिष्ठ) विनायक

तसली

तसली निष्ठा सॉक्रेटीस रावांकडे होती. आपल्याला ते जमायच न्हाई बॉ. सर सलामत तो पगडी पचास. :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

डब्ल्यू टी एफ

कोणत्याही पराभूत सिद्धांताचा विक्रेता 'प्रस्थापितांच्या दडपशाहीविरुद्ध' गळे काढू शकतो. उपहासाने लिहिण्याची स्टाईलसुद्धा खूप जुनी आहे.

पराभूत सिद्धांताचा विक्रेता

"पराभूत सिद्धांताचा विक्रेता" हे फारच आवडले. बाकी होमीपदीवर आमचा विश्वास नाहीच. आजकाल हाडाचे डॉक्टरही (आर्थोपेडिक सर्जन) कॅल्शियमच्या गोळ्यांसोबत, क्विकफ्रॅक व आर्निका देतात. ह्या लोकांमुळेच अंधश्रद्धा फोफावते. पण कुणाला बरे वाटत असल्यास, कुणाची हाडे जुळून आल्यास कुणाची हरकत कशाला? पण हा लेख थेट नाही पण सूक्ष्मपणे होमीपदीवर विश्वास ठेवून बघाच असे म्हणतोय असे वाटते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

.

माझा काका आर्मी मध्ये अलोपथी डॉक्टर आहे. (कर्नल आर आर जोशी) त्याने हैदराबाद मधील डी आर डी ओ मधील २५०० लोकांवर मधुमेहाचा त्याचा अभ्यास बराच गाजला आहे... पण किडनी स्टोन साठी तो होमिओपॅथी चाच सल्ला घ्या असे सुचवतो (त्याचा स्वत:चा अनुभव)...

माझी मावशी औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात Surgery Dept. मध्ये HOD आहे. पण ती सुद्धा स्वत: कधीच अलोपथी औषधे घेत नाही आणि शक्यतो घरगुतीच उपाय सांगते...

काका आणि मौशी

हैदराबाद मधील डी आर डी ओ मधील २५०० लोकांवर मधुमेहाचा त्याचा अभ्यास बराच गाजला आहे... पण किडनी स्टोन साठी तो होमिओपॅथी चाच सल्ला घ्या असे सुचवतो

मधुमेहाचा आणि किडनी स्टोनचा काय संबंध समजले नाही. तुमच्या काकाने २५०० किडनी स्टोनवाल्या लोकांवरही अभ्यास करावा. मगच त्यावर बोला. तसेच तुमच्या मावशीला सांगा सर्जरी डिपार्टमेंटचा राजीनामा दे आणि घरगुती औषधांचा तंबू ठोक.

कझिन्सचे भाषण आवडले. लेखातील अनुभवही चांगला

कझिन्सचे भाषण आवडले. लेखातील अनुभवही चांगला. त्यांचा वैयक्तिक अनुभव मान्य करणे तर क्रम प्राप्तच आहे. तो मान्य न केला तर माझे वैयक्तिक अनुभव कोणी काय म्हणून मान्य करतील? अनुभवकथनाची शैलीसुद्धा उत्तम.

लेखक एका प्रतिसादात म्हणतात की येथे सामान्यीकरण करण्याचा हेतू नाही. माझ्या मते संवादात सामान्यीकरणाचा हेतू काही प्रमाणात तरी असला तर बरे असते. "मला नाटक आवडले" मध्ये "(तुम्ही बघितले तर तुम्हालाही आवडेल)" असे अध्याहृत असले, तर संवादात मजा येते.

इतकेच काय लेखातील अनुभवकथनाच्या नंतरचे परिच्छेद सामान्यीकरण करणारे आहेत, असेदेखील वाटले. पण लेखकाचा सामान्यीकरणाचा उद्देश नाही म्हणून त्यावर काही प्रतिसाद देता येत नाही.

- - -
कझिन्स यांचा लेख चांगलाच आहे. मनुष्याच्या विचारांमध्ये त्याच्या दुखण्यांवर परिणाम करण्याची शक्ती असते, याची आठवण करून देणे योग्यच.

कझिन्स यांच्या लेखातील एक वाक्य जरा जास्त खटकले. प्रसंग : एका माणसाच्या कातडीमध्ये खिळे रुतले तरी त्याला वेदना झाल्या नाहीत, आणि जखमेमधून रक्तस्राव झाला नाही. हे त्यांनी १६ डॉक्टरांच्या समवेत चक्षुर्वै बघितले.

त्याचा सारांश सांगताना कझिन्स म्हणतात :

Here were 16 physicians who lived in the world of cause and effect, who were now witnessing the abrupt separation between the two!
येथे कारण-कार्याच्या विश्वात राहाणारे १६ वैद्य होते. ते कार्य आणि कारणामध्ये अकस्मात ताटातूट झालेले चक्षुर्वै बघत होते.

कार्य आणि कारणामध्ये ताटातूट झाली म्हणजे काय झाले? ते मला समजले नाही.

शिवाय बारीकसारीक खटकले की "प्लॅसीबो म्हणजे बोगस पिल" असे प्रमेय ते खंडन करण्यासाठी घेतात. मला हे प्रमेय पूर्णतः स्पष्ट वाटत नाही.
त्यापुढे "प्लॅसीबो घेतल्यानंतरही बरे वाटते" याने ते प्रमेयाचे खंडन करतात. मात्र खंडन झाले आहे, ते फक्त "प्लॅसीबो काम करत नाही" अशा प्रमेयाचे.

रँडमाइझ्ड कंट्रोल ट्रायल करण्यातले गृहीतकच असे असते, की प्लॅसीबो कधीकधी काम करते. (ज्या टक्केवारीत काम करते, ती टक्केवारी कमी किंवा जास्त काहीही असू शकेल. एखाद्या बाबतीत काम करण्याची टक्केवारी १००% असू शकेल!)

कुठलेही औषध जो गुण देते, त्या गुणाचे दोन घटक असतात. "प्लॅसीबो परिणाम" आणि औषध-बनवणार्‍याच्या शास्त्रातला "सिद्धांत-भाकित परिणाम". गुणात या दोघांची बेरीज असते. जर सिद्धांत-भाकिताची चाचणी करायची असेल, तर बेरजेतून प्लॅसीबो परिणाम वजा करावा लागतो.

प्लॅसीबो हे "बोगस" नसते. तर औषध देणार्‍याच्या सिद्धांताप्रमाणे प्लॅसीबोचा रोगाशी संबंध नसतो. इतकेच. चाचणी प्लॅसीबोची नसते. वैद्याच्या शास्त्रातील भाकिताची असते.

"प्लॅसीबो परिणामा"सारखाच "लक्षपूर्वक सेवा परिणाम" (अटेन्शन इफेक्ट) हासुद्धा असतो. रुग्णाला पुन्हा-पुन्हा बोलावले, आदरपूर्वक चौकशी केली, चाचण्या केल्या, तर रुग्णाला बरे वाटते. कित्येक वैद्यकीय चाचण्यांमध्ये "प्लॅसीबो कंट्रोल"बरोबर "अटेन्शन कंट्रोल" हासुद्धा करावा लागतो. प्लॅसीबो आणि अटेन्शन कंट्रोल यांचे परिणाम कधीकधी खूप मोठे असतात हे ज्ञान बर्‍याचशा वैद्यकीय संशोधनाचे गृहीतक असते. त्यामुळे "प्लॅसीबो बोगस=अकार्यक्षम असतो"चे खंडन असंदर्भ वाटते.

- - -

प्लॅसीबोसह वैद्यकीय चाचण्या करायचे प्रयोजन हे निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून असते. जर शास्त्राच्या भाकिताविना रोगाचा उपाय होत असेल, तर त्या शास्त्रातून भाकीते बघण्यातून फायदा नसतो. निर्णय घेताना त्या शास्त्राकडे दुर्लक्ष केले तरी चालते.

याचा संबंध खर्च/फायद्याशी सुद्धा होतो. "प्लॅसीबो कंट्रोल" साधारणपणे किमतीला कमी असते. काही लोक मानतात की ते किमतीला नगण्य असते. औषधामधून प्लॅसीबोपेक्षा अधिक फायदा झाला असल्यास, त्या औषधाला किती खर्च आला? असे विचारतात. त्या खर्चात साइड इफेक्ट वगैरे मोजायचे. त्या खर्चाच्या बदल्यात फायदा पुरेसा आहे का?

वस्तुतः "प्लॅसीबो"चा खर्च नगण्य नव्हे. "अटेन्शन कंट्रोल"चा खर्च तर खूपच असू शकतो. (डॉक्टर-नर्सांशी वारंवार भेटी, चाचण्या...)

असो चर्चा कदाचित भरकटते आहे. परंतु "प्लॅसीबो"बद्दल काही गैरसमज असावेत असे वाटते. म्हणून हे पाल्हाळ. पूर्णपणे अवांतर नाही अशी आशा आहे.

आभार

प्रतिसादाबद्दल आभार.

माझ्या मते कार्यकारण-भावामध्ये तूट म्हणजे खिळे इतके अणकुचीदार होते की तो मनुष्य वाचणे शक्य नव्हते. शिवाय भरपूर रक्तस्त्रावही व्हायला हवा होता. हे काहीच झाले नाही आणि तो पुन्हा उठून बसला. शिवाय एका जागी येत असलेले रक्त त्याने लगेच बंद केले. हे सर्व कॉमन सेन्सच्या विरूद्ध वाटते.

माला लेखामधील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे आजारी मनुष्याचे मन आणि शरीर यांना सारखे महत्व दिले गेले आहे. वैयक्तिक रीत्या मला हा भाग अत्यंत महत्वाचा वाटतो. शेवटी कझिन्स म्हणतात त्याप्रमाणे शरीराला मोटारीप्रमाणे वागवून चालणार नाही. एक भाग नादुरूस्त झाला तर तो बदलला की संपले असे नाही. त्यात मनाचाही महत्वाचा वाटा आहे. माझ्या मते हा मुद्दा प्लासिबोशी निगडीत आहे.

लेखाचे सामान्यीकरण करायचे असल्यास माझी हरकत नाही. मात्र असे म्हटले तर तमाम विज्ञानवादी चवताळून उठतात. :)
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

प्लासिबो

तुमच्या प्रतिसादावरून नेहेमीच्या औषधोपचार पद्धतीमध्ये प्लासिबो काम करत असेल का आणि असल्यास किती असा विचार आला. लहानपणी काही डॉक्टरांच्या "हाताला गुण" असल्याचे आजूबाजूचे सांगत आणि साहजिकच त्या डॉक्टरांकडे भरपूर गर्दी असे. आता असे वाटते की यात डॉक्टरांची हातोटी/कौशल्याचा भाग किती असावा आणि बेडसाइड म्यानरचा भाग किती.

प्लासिबो फक्त औषधाशी संबंधितच असायला हवा का? जगण्याची, बरे होण्याची जिद्द ही सुद्धा एका तर्‍हेने प्लासिबो म्हणून काम करत असेल का? आरोग्याचा अर्थमध्ये नाडकर्णी अशी बरीच उदाहरणे देतात जिथे केवळ इच्छाशक्तीच्या बळावर रूग्णाने आजारावर मात केली.

--
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

बहुधा त्या ठिकाणी नको

"माणूस येनकेनप्रकारेण जगतो, मरेपर्यंत जगत राहातो" हे तत्त्व सामान्य अनुभवातले आहे. म्हणजे माझा प्रत्येक श्वास मला जगवतो आहे, माझ्या प्रत्येक जागत्या/स्वप्नातील क्षणात जगण्याची इच्छा[शक्ती] आहे. [इच्छेतून कृती होते, श्वास विश्वासाने घेतला जातो, अन्नप्राशन केले जाते, म्हणून इच्छा"शक्ती".] हे सार्वत्रिक ज्ञान आहे, अनुभव आहे.

या जीवितेच्छेच्या मात्रेत काही कमीजास्त असते - काही लोक (चांगल्या अर्थाने) चिवट असतात, काही (चांगल्या अर्थाने) जीवनवासनेचा त्याग करतात... हेसुद्धा सार्वत्रिक ज्ञान आहे, अनुभव आहे. नाहीतर सर्व लोक एकाच कुठल्या वयात खेळण्यातली चावी संपून बंद ना पडते?

त्याला आणखी "प्लासीबो" हे नाव देण्यात काय हशील आहे, हे ठाऊक नाही.

"निर्णयास मदत महणून एखाद्या शास्त्राचे भाकीत वापरावे का?" हा प्रश्न यापेक्षा मर्यादित आहे, पण तरी महत्त्वाचा आहे. "शास्त्राचे भाकीत नसलेल्या सर्व कृती सारख्या ठेवणे" असे केल्यासच त्या स्थितीशी शास्त्राचे भाकीत पडताळता येते. अशा तुलनेला "कंट्रोल" हा शब्द आधीच आहे. (म्हणजे "नवे इंधन आतापेक्षा अधिक कार्यक्षम" असे कुठल्यातरी शास्त्राचे भाकीत सिद्ध करण्यासाठी तशाच यंत्रात त्याच यंत्रचालकाकडून जुने इंधन कसे चालते, हे कंट्रोल केले पाहिजे... कारण यंत्राची कार्यक्षमता ही वंगण, पेच-चक्रांची कारागिरी, वगैरे या सर्वांवर अवलंबून असते. त्यांच्याबद्दल इंधन-विज्ञानाचे काहीच भाकीत नसते, म्हणून चाचणीत त्या गोष्टी समसमान कराव्या लागतात.)

त्या "कंट्रोल"चा औषध-विज्ञानातील खास उपयोग म्हणजे "प्लासीबो". (यात औषध देणार्‍याची बेडसाईड मॅनर, हातगुण, औषधाच्या गोळीचा रंग, वास या गोष्टींबद्दल कित्येकदा बायोकेमिस्ट्रीच्या विज्ञानाचे कुठलेच भाकीत नसते, म्हणून चाचणीत त्या गोष्टी समसमान कराव्या लागतात.)

जर तुलना नसतानाही "हातगुण" वगैरेंकरिता "प्लासीबो" शब्द घेतला, तर काय होईल? "तुलनेसाठी काय हवे?" असे वाक्यप्रयोग करताना "प्लासीबो" हा शब्द अतिसंदिग्ध होईल, अनुपलब्ध होईल. तिथे नवीन शब्द निर्माण करावा लागेल. समजा त्याकरिता "ढँटडँ" असा नवीन शब्द निर्माण केला. तर उद्या कोणी "ढँटडँ" शब्दाच्या अर्थात "तुलनेच्या-बाहेरचा हातगुण" जोडू लागेल. शब्दकोशातील व्याख्या पत्त्यांसारख्या पिसण्यावेगळे काही होत नाही, आणि ज्ञानात भर पडत नाही.

म्हणून तुलना चालू नसताना "वैद्याचा हातगुण", "जगण्याची जिद्द" यांना "प्लासीबो" म्हणण्यात काही हशील नाही असे माझे मत आहे. "हातगुण", "जगण्याची जिद्द" वगैरे जे काही हल्लीचे शब्द आहेत, तेच उत्तम वर्णन करणारे आहेत. कसलीही तुलना चालू नसताना तेच वापरत राहावे.

पटला

तुमचा मुद्दा पटला. प्लासिबोच्या व्याख्येत आणखी गोंधळ न केलेला बरा.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

अर्थकारण

होमिओपथी आयुर्वेद पुष्पौषधी, निसर्गोपचार,चुंबकचिकित्सा, अक्युपंक्चर,अक्युप्रेशर,युनानी इ. गोष्टी या पर्यायी उपचार पद्धती आहेत. त्या शास्त्रीय की अशास्त्रीय हा भाग वादग्रस्त आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे कि ऍलोपॅथी ही राजमान्य पद्धत ही सर्वसामान्य रुग्णाला सहज उपलब्ध, परवडणारी आहे का?
रुग्णाला इलाज हा उपायकारक आहे कि अपायकारक हे जास्त महत्वाचे. मला एका डॉक्टर मित्राने विचारले एखादा रुग्ण येतो त्याला तपासुन झाल्यावर आम्ही सांगतो कि तुला बायपास करावी लागेल. त्याला परवडत नाही. मग तो बाबा बुवाकडे जातो तो एखादी जडीबुटी देतो. रुग्ण ती घेउन खूप वर्षे जगतो. याठिकाणी बायपास सांगणारा डॉक्टर हा आधुनिक वैद्यकीय ज्ञानानुसार वैज्ञानिक दृष्टी ठेउनच सांगत असतो. ते चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. तो वाचतो ते जडीबुटीमुळे नसेल ही शरीरात बायपासेस नैसर्गिक रित्या तयार होत असतात. त्याला जर बायपासचा खर्च परवडत नाही त्याला तुम्ही काय पर्याय देता? तो त्याचे पर्याय शोधुन जडीबुटी घेतो व वाचतो. समजा नाही वाचला तो म्हणत असतो नशीब! त्याने एक चान्स घेतलेला असतो. जगलो तर जगलो.
तु अंधश्रद्ध आहेस, अशास्त्रीय उपचार घेतोस. तुम्ही अज्ञानी लोक असेच मरणार असे म्हणुन हिणवणे हे कितपत उचित आहे?
प्रकाश घाटपांडे

एक लाखाची चुंबकीय गादी

महत्वाचा मुद्दा असा आहे कि ऍलोपॅथी ही राजमान्य पद्धत ही सर्वसामान्य रुग्णाला सहज उपलब्ध, परवडणारी आहे का?

सरासरी आयुष्यमान ३५ वरून ६५ झाले की!

वैज्ञानिक वैद्यकात बाजारभावाचाही विचार करतात. औषधाचा फायदा औषधाच्या किमतीपेक्षा अधिक (cost effective) असेल तरच त्याला मान्यता मिळते.
"शरीरात बायपासेस नैसर्गिक रित्या तयार होत असतात." हे सत्य असले तरी त्याला वेळ लागतो. तेवढा वेळ रुग्ण जिवंतच राहणार नाही असे वाटल्यास शस्त्रक्रिया सांगतात.

तो त्याचे पर्याय शोधुन जडीबुटी घेतो व वाचतो.

जडीबुटीचा फायदा सिद्ध झाल्यास वैज्ञानिक वैद्यकात समावेश होईल.

समजा नाही वाचला तो म्हणत असतो नशीब!

हेहेहे.

त्याला जर बायपासचा खर्च परवडत नाही त्याला तुम्ही काय पर्याय देता?

अशा रुग्णाला फोटो (हार घालण्यासाठी लागेल म्हणून) काढून ठेवण्याचा सल्ला एक सेलेब्रिटी डॉक्टर देत अशी वदंता आहे. त्या डॉक्टरांच्या फोटोलाच आता हार आहे.

जसे

अडुळसा - ग्लाय्कोडीन

 
^ वर