अप्सरा

प्रस्तावना: हिंदू पुराणांत वारंवार येणाऱ्या अप्सरांबद्दल माहिती गोळा करावी असे काही दिवसांपूर्वी डोक्यात आले परंतु ही माहिती आपल्या पुराणांत संकलित नसून सर्वत्र विखुरलेली आहे. ती एकत्र करणे हे माझ्या दृष्टीने कठीण कार्य होते कारण अमेरिकेत बसून महाजालाव्यतिरिक्त इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नसणे आणि संस्कृताच्या अत्यंत अल्प ज्ञानाचा उपयोग लेख लिहिण्यासाठी करणे हे महादिव्यच होते. मूळ लेख मराठी विकिपीडियासाठी लिहिला होता. तो अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे, त्यात थोडेफार बदल केले गेले ते मी केलेले नसल्याने येथे दिलेले नाहीत. सगळे संदर्भ शोधणे, त्यांचा पाठपुरावा करणे हे मला एकटीला संगणकासमोर बसून शक्य नाही तरी जितके शक्य झाले ते पुढे मांडले आहे. मला अधिक माहितीची गरज आहे, हा लेख वाचून यासंबंधित अधिक माहिती असल्यास कृपया येथे प्रतिसादात लिहावी किंवा विकिपीडियावर चढवावी.

अप्सरा

हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबाराला नृत्यगायनाने रिझवणार्‍या स्वर्गीय सुंदर्‍या होत्या असे सांगितले जाते. ऋग्वेदानुसार अप्सरा या गंधर्वांच्या पत्नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांच्या नीतीमत्ता व तत्त्वे अप्सरांना लागू नव्हत्या असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वत:पेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्देशापासून दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात.

भागवत पुराणानुसार कश्यप ऋषींच्या बारा पत्नींपैकी मुनी ही पत्नी या अप्सरांची माता असल्याचे दाखले दिले जातात. काही कथांमध्ये स्वत: ब्रह्मदेवांने अप्सरांची निर्मिती केल्याचे वाचायला मिळते. याशिवाय, मेरू पर्वताच्या समुद्रमंथनाच्या कथेतून अप्सरा हे रत्न निघाल्याचा उल्लेखही सापडतो.

हिंदू पुराणकथा, वेद, महाकाव्ये व नाट्यशास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत -

अद्रिका, अल्मविशा, अंबिका, अन्वद्या, अनुचना, अरूणा, असिता, बुदबुदा, देवी, घृताची, गुणमुख्या, गुणवरा, काम्या, कर्णिका, केशिनी, क्षेमा, चित्रलेखा, लता, लक्ष्मणा, मनोरमा, मरिची, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, पूर्वचित्ती, रक्षिता, रंभा, रितुशाला, सहजन्या, समिची, सौदामिनी, सौरभेदी, शरद्वती, शुचिका, सोमा, सुवाहू, सुगंधा, सुप्रिया, सुरजा, सुरसा, सुरता, सुलोचना, तिलोत्तमा, उमलोचा, उर्वशी, वपु, वर्गा, विद्युत्पर्णा आणि विश्वची. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो.

इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी उर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.

इंद्राच्या दरबारात स्थान न दिलेल्या काही अप्सरा वनदेवी, जलकन्यांच्या स्वरूपांत पुराण कथेत स्थान मिळवतात. उदा. रामायणातील किष्किंधा कांडात 'हेमा' नावाच्या वनातील अप्सरेचा संदर्भ सापडतो. रामायण, महाभारत, भागवत् पुराण, वेद या सर्वांत अप्सरांचे उल्लेख व अनेक कथा आढळतात. कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका उर्वशी आहे.

भारताबाहेर आग्नेय आशियातील अनेक कथांमध्ये व विशेषत: आंग्कोर वाट मंदिराच्या कलाकुसरीत व कोरीव कामात या अप्सरा आढळतात. हिंदू पुराणकथांव्यतिरिक्त बौद्ध, ग्रीक, रोमन आणि नॉर्डिक पुराणांतही अप्सरांचा उल्लेख आढळतो. त्याकथांनुसारही मर्त्य मानवांना किंवा देवांना वश करण्याचे कार्य अप्सरा करत.

आंग्कोर वाट मंदिराच्या भिंतींवरील अप्सरा
आंग्कोर वाट मंदिराच्या भिंतींवरील अप्सरा

रामायणातील अप्सरांचे संदर्भ

रामायणात बर्‍याच ठिकाणी अप्सरांचे उल्लेख आढळतात. त्यापैकी काही श्लोक खाली दिले आहेत.

अप्सु निमर्थनात् एव रसात् तस्मात् वर स्त्रिय:।
उत्पेतु: मनुज श्रेष्ठ तस्मात् अप्सरसो अभवन् ॥ १-४५-३३

हा श्लोक बालकांडात येतो. राम-लक्ष्मणांना विश्वामित्र सम्रुद्रमंथनाची कथा सांगत असताना समुद्र मंथनातून अप्सरा हे रत्न निघाल्याचे सांगतात. यानंतर येणार्‍या श्लोकांतून अप्सरांच्या सौंदर्याचे वर्णन येते. तसेच विश्वामित्रांच्या कथेनुसार अप्सरांना आपला प्रियकर म्हणून देव, दानव, मानव यासर्वांची निवड करण्याची मुभा होती. लग्नबंधनाच्या नीतिनियमांपासून त्या मुक्त होत्या या अर्थांचे श्लोकही बालकांडात येतात.

घृताचीम् अथ विश्वाचीम् मिश्र केशीम् अलम्बुसाम् ।
नागदन्तां च हेमा च हिमामद्रिकृतस्थलाम् ॥ २-९१-१७

अयोध्याकांडातील या श्लोकांत भारद्वाज मुनीनी केलेल्या भरताच्या आदर सत्कारात घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुसा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो. या सर्व नृत्य, गायन व वादन कलांत निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला रिझवण्यासाठी नृत्य-गायन केल्याचा उल्लेखही नंतरच्या श्लोकांतून येतो.

महाभारतातील अप्सरांचे संदर्भ

महाभारतात वनपर्वात अर्जुन व उर्वशीमधील संवाद येतो. उर्वशी ही कुरूवंशातील राजा पुरुरव्याची पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरुरव्याचा वंशज असल्याने, कामातुर उर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर उर्वशी सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरूष निवडतात. यामुळे मी जरी कुरूकुलातील तुझी पूर्वज असले तरी पुरूरव्याची मुले-नातवंडे जी कालांतराने येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर."

अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो आणि संतप्त होऊन उर्वशी त्याला शाप देते, जो पुढे बृहन्नडेच्या रुपाने खरा ठरतो.

याप्रमाणे अनुशासनपर्वात पंचचुडा या अप्सरेची व शांतीपर्वात घृताची या अप्सरेची कथा येते. घृताचीच्या कथेत अप्सरांना आपले रूप पालटण्याची विद्या अवगत असल्याचे दिसते.

इतर संस्कृतीतील अप्सरांचे संदर्भ

कंबोडियातील अप्सरा

कंबोडियाच्या संस्कृतीवर हिंदू आणि बौद्ध धर्माचा पगडा असल्याने हिंदू देव-देवता तसेच गंधर्व, अप्सरा यांना कंबोडियाच्या संस्कृतीत एक वेगळे स्थान मिळाले आहे.

आंग्कोर वाट अप्सरा : आंग्कोर वाटच्या मंदिराच्या भींतींवर अनेक अप्सरा नृत्य व वादन करताना कोरलेल्या आढळतात. मंदिरातील देव देवतांना प्रसन्न राखण्यासाठी अप्सरांचे कोरीव काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

अप्सरा नृत्य: ख्मेर राज्यकाळापासून कंबोडियात अप्सरा नृत्य करण्याची प्रथा आहे. पूर्वी मंदिरात देवतांना प्रसन्न करण्याकरता हे अभिजात नृत्य केले जात असे. आज या नृत्याला कंबोडियाच्या पारंपरिक नृत्याचा दर्जा आहे. बरेचदा हे नृत्य, नृत्यनाट्य म्हणून सादर केले जाते. यक्ष, किन्नर, अप्सरा, गरूड, ऋषी अशा अनेक भूमिका या नृत्यातून फुलवल्या जातात.

राजकन्या भोपादेवी अप्सरा नृत्य करताना
राजकन्या भोपादेवी अप्सरा नृत्य करताना

रेशमी वस्त्रे, आभूषणे, नाजूक पदन्यास व नत्यमुद्रांद्वारे केल्या जाणार्‍या या नृत्यात आंग्कोर वाटच्या मंदिरातील भिंतींवर कोरलेल्या अप्सरांचे दर्शन होते.

थायलंडमध्येही असे नृत्य केले जाते परंतु त्याला अप्सरा नृत्य म्हणण्याचा प्रघात नाही.

चीनमधील मोगाओ गुहा

चीनमधील दुनहुआंग प्रांतात इ.स.पूर्व ४००व्या शतकातील बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या गुहा आहेत. हिंदू कलाकुसरीचा या गुहांवर मोठा प्रभाव दिसतो. यातील काही चित्रांत व लेण्यात अप्सरांचा समावेश आहे. या अप्सरा स्वर्गस्थ दाखविल्या असून त्या अवकाश विहार करतानाही दिसतात. काही ठिकाणी नृत्य, वादन करतानाही त्यांचे चित्रण केले आहे.

चीनमधून पुढे कोरियातही अप्सरांचा कलाकुसर व चित्रकलेत समावेश झालेला आढळतो.

जपानमधील अप्सरा

तेन्यो नावाच्या स्वर्गीय सुंदरी स्वर्गात बुद्ध व बोधिसत्त्वांसमवेत राहात असल्याचे संदर्भ मिळतात. तेन्योंचा उगम संस्कृतातील अप्सरांवरून झाल्याचे सांगितले जाते. पुढे बौद्ध धर्माच्या प्रसारासमवेत चीनमार्गे जपानात यांचा प्रसार झाल्याचे दिसते. पारंपरिक पंचरंगी किमोनो, उंची आभूषणे ल्यालेल्या या सुंदरींना जपानी चित्रकला, बौद्ध मंदिरातील कोरीवकामांत व इतर कलाकुसरींमध्ये एक आगळे स्थान आहे आणि त्यांच्या अनेक कथा जपानात सांगितल्या जातात.

इतर अनेक पौर्वात्य आणि आग्नेय आशियाई देशांत अप्सरांचा उल्लेख, कथा, चित्रणे आढळतात. आपली संस्कृती देशाबाहेर कशी विस्तारित गेली त्याचा हा एक लहानसा पुरावा येथे सादर केला आहे. विषयाची व्याप्ती यापेक्षा खचितच फार मोठी आहे.

***

  1. या लेखाचे शुद्धलेखन तपासलेले नाही.
  2. महाभारतातील किंवा इतर नाटके, ग्रंथ आणि पुराणांतील मूळ् श्लोक माहित असल्यास कृपया त्यांची माहिती द्यावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान विषय

खरे तर या विषयाची व्याप्ती प्रबंध लिहिण्याजोगी आहे. तुमच्या कल्पकतेला मनापासून दाद!

धन्यवाद

खरे तर या विषयाची व्याप्ती प्रबंध लिहिण्याजोगी आहे.

तुमचे म्हणणे अगदी खरे आहे म्हणूनच मी हा लेख विकिवर टाकून फक्त सुरुवात केली, वाचकांकडे अधिक माहिती असल्यास ती त्यांना तेथे भरता येणे सहज शक्य आहे.

अगदी

अगदी सहमत. लेखिकेने संदर्भ गोळा करताना घेतलेली मेहनत, त्यांची मांडणी आणि लेखनशैली फारच कौतुकास्पद.व्याप्ती प्रबंधाची नक्कीच आहे. ऐश्वर्या, बिपाशा, रानी, माधुरी आदी बॉलिवुडीय आणि एंजलीना जोली, निकोल किडमनादी हॉलिवुडीय अप्सरांचा समावेश केला असता तर व्याप्तीसोबत खुमारीही शतगुणित झाली असती.

चित्तरंजन भट

हेच..

अगदी सहमत. लेखिकेने संदर्भ गोळा करताना घेतलेली मेहनत, त्यांची मांडणी आणि लेखनशैली फारच कौतुकास्पद.

हेच म्हणतो!

ऐश्वर्या, बिपाशा, रानी, माधुरी आदी बॉलिवुडीय आणि एंजलीना जोली, निकोल किडमनादी हॉलिवुडीय अप्सरांचा समावेश केला असता तर व्याप्तीसोबत खुमारीही शतगुणित झाली असती.

हेही म्हणून पाहतो! ;)

आपला,
(शापीत यक्ष!) तात्या.

छान

ऋषी-मुनींची उग्र तपश्चर्या, नारदाकडून त्याचा वृत्तांत इंद्राला समजणे, आपले स्थान धोक्यात येईल या भीतीने इंद्राने अप्सरांना पाचारण करणे, अप्सरांकडून ऋषींचा तपोभंग, आणि ऋषींनी अप्सरांना शाप देणे हे कथानक बऱ्याच पौराणिक कथांमधून येते.

रंभा. मेनका आणि उर्वशी या अप्सरांची नावे (नावेच नुसती :)) माहीत होती पण त्यांचा प्रभाव अतिपूर्वेपर्यंत पसरला आहे हे माहीत नव्हते. छान आणि माहितीपूर्ण लेख!

छान

लेख माहितीपूर्ण, साधा-सोपा आहे. खूप आवडला.

चित्रांची शीर्षके

चित्रांना/आकृत्यांना शीर्षके देता येण्याची नवी सोय आता उपलब्ध आहे. या लेखातील चित्रांना त्याचा उपयोग करून नावे दिली आहेत. नावांसाठी चित्रांच्या "alt" मध्ये असणारा मजकूर वापरला आहे.
अधिक माहितीसाठी चित्रांसाठी शीर्षकाची नवी सोय

धन्यवाद

शैलेश, शशांक आणि परीवश अनेक धन्यवाद.

उपक्रम

आपण केलेल्या सोयीबद्दल धन्यवाद. नावांसाठी चित्रांच्या "alt" मध्ये असणारा मजकूर अशाप्रकारे यावा कॅप्शन्सप्रमाणे अशीच इच्छा होती.

प्रियाली.

लेख आवडला

लेख आवडला. माहितीपूर्ण आहे.

धन्यवाद

वरदा, चित्तरंजन आणि (शापीत यक्ष!) तात्या :)) लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.

ऐश्वर्या, बिपाशा, रानी, माधुरी आदी बॉलिवुडीय आणि एंजलीना जोली, निकोल किडमनादी हॉलिवुडीय अप्सरांचा समावेश केला असता तर व्याप्तीसोबत खुमारीही शतगुणित झाली असती.

नाही हो! यांच्याविषयी इतरत्र भरपूर लिखाण आढळेल, तरी यातील् काही (चवळीच्या शेंगा)अप्सरांना 'उर्वशी उर्वशी टेक इट् इझी उर्वशी, उंगली जैसी पतली को नहीं चाहिये फार्मसी' असे नक्की म्हणता येईल.

तपोभंग

'उर्वशी उर्वशी टेक इट् इझी उर्वशी, उंगली जैसी पतली को नहीं चाहिये फार्मसी' असे नक्की म्हणता येईल

.

हाय् उरु, स्वर्गाची कास धरु असे मात्र नक्किच म्हणता येत नाही.
असे म्हणण्याच्या पातळीवर आला कि त्याचा तपोभंग झाल्याचे समजले जाते. ऋषी मुनींच्या तपोबलाने इंद्राची खुर्ची डळमळीत होते. खुर्ची टिकवण्याची परंपरा तेव्हापासून आहे.मग साम दाम दंड भेद यातील भेद नीती नुसार इंद्र ऋषी मुनींच्या मनोबलात भेद निर्माण करुन तपोबलाचा भंग करीत असतो. विश्वामित्राचा सुद्धा मेनका तपोभंग करु शकते.आताच्या राजकारणात तरी वेगळे काय चालतं?
प्रकाश घाटपांडे

सुरेख

माहीतीपूर्ण आणि मनोरंजक लेख आहे. संदर्भासहीत लेख लिहीण्यासाठी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे. आत्तापर्यंत रंभा, उर्वशी, मेनका आणि शकिरादेवी ह्या अप्सरा माहीत होत्या :-) त्यांची संख्या इतकी असेल असे वाटले नव्हते.

वर उल्लेख केल्याप्रमाणे विषयाची व्याप्ती खरोखरच मोठी आहे. याचा निरनिराळ्या पैलूने विचार करता येईल. संस्कृतीचा विस्तार हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. अप्सरा फक्त आशियाई संस्कृतीतच होत्या की पाश्चात्य किंवा दक्षिण अमेरिकन संस्कृतीमध्ये अप्सरांचा उल्लेख आहे हे बघणेही मनोरंजक ठरावे.

राजेंद्र

धन्यवाद/ इतर संस्कृतीतील अप्सरा

शकिरादेवी. :))))

अप्सरा याहूनही अधिक आहेत. केवळ महाभारतात सुमारे शेकड्याने अप्सरांची नावे येतात असे वाचले आहे. त्यांच्या कथा काही माझ्याकडे उपलब्ध नाहीत परंतु त्यांच्या कथांवरून त्यांचे अनेक गुणधर्म निश्चित करता येतील असे वाटते.

पाश्चिमात्य संस्कृतीत जसे केल्टिक, नॉर्डिक इ. अप्सरांना निम्फ म्हणून ओळखले जाते. वनदेवी म्हणून त्यांचा उल्लेख येतो. सुरेल आवाज आणि मोहक रुप यांनी त्या वाटसरूंना भुलवत असल्याचे उल्लेख दिसतात. मानवी नितीनियम त्यांनाही लागू नव्हतेच. फक्त हिंदू अप्सरांशी त्यांचा काही संबंध नाही.

इतरत्र चर्चिल्याप्रमाणे कोणत्याही संस्कृतीतील पौराणिक कथा या एकमेकांशी अगदी मेळ खातात, बरेचदा ऐतिहासिक व्यक्तीही अगदी सारखेच विचार पुढे करताना किंवा सारख्याप्रकारे वागल्याचे दिसून येते. या संबंधी लिहायला नक्कीच आवडेल. अशाच दोन ऐतिहासिक व्यक्तींवर (एक भारतीय आणि एक पाश्चात्य) लेख लिहिण्याचे मनात आहे. वेळ मिळाला की टाकेनच.

धन्यवाद.

पंख

प्रियाली,

तुमचा लेख आवडला. त्यात चीनमधील लेण्यात दाखवलेल्या अवकाश विहार करीत असलेल्या अप्सरांचे वर्णन आहे. तुमच्या लेखाला थोडी भर अशी (दुर्गाबाई भागवत यांच्यावरील लेखावर आधारित..) : आपल्याकडच्या आकाशमार्गाने भ्रमण करीत असलेल्या स्त्रियांना पंख नसतात , तर गळ्यात घातलेल्या लांब माळांच्या सहाय्याने त्या उडतात. चीनमधील लेण्यातल्या अप्सरांची छायाचित्रे / अजंठा वेरूळमधील अश्या अप्सरांची छायाचित्रे यांची तुलना केल्यास अजून काही कळू शकेल.

चित्रा

सेनोरिटा शकू

सुरेख लेख. लावणी, पंचांग, आणि आता हा लेख. उपक्रम टॉप १० साठी जोरदार स्पर्धा आहे.

आत्तापर्यंत रंभा, उर्वशी, मेनका आणि शकिरादेवी ह्या अप्सरा माहीत होत्या :-) त्यांची संख्या इतकी असेल असे वाटले नव्हते.

:)

आय नेव्हर रिअली न्यू शी कुड डॅन्स लाईक धिस
शी मेक्स अ मॅन वॉन्ट टू स्पीक स्पॅनिश
कोमो से लामा, बोनिटा, मी कासा, सु कासा
शकिरा शकिरा

शकिरा

विषयांतराबद्दल क्षमस्व. पण हे खरंच विषयांतर आहे का?

अवांतर - कोमो से लामा/यामा

कोमो से लामा

स्पॅनिशमध्ये हा उच्चार कोमो से यामा असा होतो. दोन ल (ll) चा उच्चार य. उदा. टॉर्टिया.

कोमो से यामाचा अर्थ - तुझे नाव काय?

(शकिरा फ्यान) प्रियाली.

शकिरा शकिरा

काळजाला हात घालणारा विषय आहे :-)
आमच्या देवीचे इथे इतके भक्त आहेत याची कल्पना नव्हती. चला, आता एक फ्यान क्लब काढायला हरकत नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

छान् लेख

प्रियाली,

लेख मस्त माहितीपुर्ण् आहे.

ऐकीव माहीती आहे,
अप्सरा शब्दाचा अर्थ्, पाण्यात् राहणारी किंवा पाण्यातून् जन्मलेली...

बरोबर् आहे का ? अधिक काही माहीती मिळेल् का या विषयी?

--सचिन्

जलपर्‍या

चित्रा आणि सचिन आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

चित्रा, गळ्यात घातलेल्या लांब माळांच्या सहाय्याने त्या उडतात. >> याबद्दल आपण अधिक लिहू शकाल काय?

सचिन, तुमची माहिती बरोबर आहे. मला वाटते अप्सु या शब्दाचा अर्थ पाणी असाही होतो. (कृपया माझे संस्कृतचे ज्ञान अतिशय तोकडे आहे.) इंद्राच्या दरबारातील अप्सरा सोडल्यास बर्‍याच अप्सरा पाण्यात राहत असल्याचे वाचनात आले होते.

इतर संस्कृतीतही जसे ओडिसी या महाकाव्यात पाण्याशेजारी राहणार्‍या आणि पांथस्थांना भुलवणार्‍या सुंदरींचे वर्णन येते.

धन्यवाद
प्रियाली.

लेख माहितीपूर्ण आहे

एकंदरीत असे दिसते की अप्सरांनाही देवांना वगत असलेल्या सर्व कला/जादू अवगत होत्या.

अवकाश विहाराबद्दल अजून थोडे

प्रियाली,

तुम्ही म्हटल्याप्रमाणे अप्सरांबद्दलची (खरे तर उडणार्‍या स्त्रियांबद्दलची) आठवत होते ते पटकन लिहीले. पण जेव्हा अधिक माहिती मिळवण्याचा विचार आला तेव्हा मला असे आढळले की जालावर जी माहिती उपलब्ध आहे ती प्रामुख्याने पर्यटनाशी संबंधित आहे. यावर काही पुस्तके उपलब्ध असणार पण आजतरी ती माझ्याकडे नाहीत. त्यामुळे अजून जी काही माहिती मिळाली त्यातून मला काय वाटले ते विस्कळितपणे पुढे मांडत आहे :

अप्सरांचा प्राचीन उल्लेख हा ऋग्वेदात आढळतो आणि तो प्रामुख्याने पाण्यासंबंधाने आला आहे. तसेच मराठी लोककथां/ कहाण्यांमध्ये अप्सरांना "आसरा" असा शब्द वाचल्याचे आठवते - आसरांचा उल्लेख हा नागकन्या देवकन्या यांच्यासोबत येतो. कदाचित पाण्याशी संबंध असल्याने असेल पण आपल्याकडे त्यांना पंख नाहीत अशी कल्पना रूढ झाली असावी. पुराणांत जी समुद्रमंथनाची कल्पना आहे त्यातदेखील फरक आढळले - काही ठिकाणी असा उल्लेख आहे की मंथनातून केवळ रंभा पाण्यातून बाहेर आली तर काही पुराणांत असे म्हटले आहे की एकच नाही तर अनेक अप्सरा बाहेर आल्या. अर्थात इतर अनेक चांगल्या गोष्टींप्रमाणेच त्याही देवांना मिळाल्या आणि पर्यायाने त्या स्वर्गात (आकाशात) गेल्या अशी कल्पना रूढ झाली असेल. त्यामुळे त्यांचा अवकाशविहार ही कल्पना नंतरच्या काळात आली असावी. तसेच आपल्या देवांनाही पंख असल्याची कल्पना रूढ नाही. गरूड / जटायु हे सरळ पक्षीच आहेत. बाकी देव एकतर वाहनाने किंवा अतिंद्रिय शक्तींचा वापर करून अवकाश विहार करतात तशीच कल्पना अप्सरांबद्दल केली गेली असावी. भारतातील अनेक देवळांमध्ये आणि लेण्यांमधे अप्सरांची भित्तीचित्रे किंवा शिल्पे आढळतात. त्यांच्या अलंकारांच्या आणि वस्त्रांच्या हालचालीतून त्यांचा अवकाश विहार किंवा हालचाल सूचित केलेला दिसतो.

अशापैकीच अ़जंठा येथील अप्सरेचे एक छायाचित्र या दुव्यावर बघता येईल. (काही ठिकाणी हिला अप्सरा म्हटलेले आढळले तर काही ठिकाणी नर्तकी - काही का असो ती सुंदर आहे). विशेष म्हणजे काळीसावळी आहे. तिने डोक्यावर एक सुंदर नक्षीचे कापड फेट्याप्रमाणे बांधले आहे. आणि तिच्या गळ्यातील माला तसेच कर्णभूषणे स्थिर नाहीत. काहींच्या मते ती झांजांसारखे काही वाजवीत आहे.

(अशीच सुंदर चित्रे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संकेतस्थळावर येथे बघता येतील).

-चित्रा

धन्यवाद/ आसरा

चित्रा, आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अनुलाही येथेच धन्यवाद देते.

अप्सरांचा उल्लेख पाण्यासंदर्भात येतो हे अगदी बरोबर, आसरेबद्दल वाचून थोडे आश्चर्य वाटले. आसरा हा शब्द पाण्याजवळ राहणारी आणि अतिंद्रिय शक्तींनी इतरांना भुलवणारी आणि त्यांचा नाश करणारी अमानवी स्त्री अशा अर्थी येत होता का? मला चटकन आठवेनासे झाले आहे. (कृपया कोणा भूतप्रेमीने मदत करावी) परंतु माहिती खरंच उपयुक्त आहे.

माणसाला पंख असणे (गरूड्, जटायू, संपाती सोडून) ही कल्पनाच थोडी पाश्चात्य असावी असेही वाटून गेले. तुम्ही म्हणता ते बरोबर, केवळ् भारतीयच नाही परंतु इतरत्रही अप्सरांना पंख दाखवलेले नाहीत. अतिंद्रिय शक्तींचा वापर करूनच त्या अवकाशविहार करत असाव्यात आणि ती हालचाल त्यांच्या वस्त्रप्रावराणातून सूचित होते. मोगाओ गुहांतील अप्सरांच्या चितत्रातील लांबलचक पायघोळ वस्त्रे ही वार्‍यावर हलणारी/ उडणारी दिसतात.

अजंठाचे दिलेले चित्र तर खासच आहे. अनेक धन्यवाद. ते अप्सरेचे की नर्तकीचे माहित नसले तरी एक टिपण्णी म्हणजे कोणत्याही संस्कृतीतील अप्सरा या अर्धनग्नावस्थेत दाखवल्या जातात. मी खजुराहो देवळावरील आणि आंग्कोर वटवरील अप्सरांची चित्रे पाहिली होती, त्यामुळे अजंठातील हे चित्र अप्सरेचे आहे/ असावे म्हणायला जागा आहे. (अर्थात हे माझे तर्क आहेत.)

दुव्यांसाठी धन्यवाद.
प्रियाली.

साती आसरा

"आसरा हा शब्द पाण्याजवळ राहणारी आणि अतिंद्रिय शक्तींनी इतरांना भुलवणारी आणि त्यांचा नाश करणारी अमानवी स्त्री अशा अर्थी येत होता का?"
असेच असावे. 'साती आसरा' म्हणजे सात अप्सरा, ज्या माणसांना भुलवून खोल डोहात जीव द्यायला प्रवृत्त करतात किंवा ओढून नेतात असे भूतकथातील उल्लेख ऐकले आहेत.
एकंदरीत 'सुंदर स्त्री' आणि 'माणसाचे (विशेषतः पुरुषांचे) झपाटणे/मती भ्रष्ट होणे/त्या म्हणतील तसे करणे' याचा जवळचा संबंध जोडून अप्सरांना हे हडळीचे स्वरुप दिले असावे असे वाटते.

ओडिसी

हा काहीसा Sirenसारखा प्रकार असावा का?

हो. ओडिसी या महाकाव्यात Siren या सुंदरींचा उल्लेख येतोच, त्यांचा सुरेल आवाज कानावर पडून खलाशी त्यांच्या मोहाने बळी पडत याकरता इथकाचा राजा ओडिसिअस आपल्या खलाशांना कान घट्ट झाकून घेण्यास सांगतो अशी काहीशी गोष्ट आहे. (बर्‍याच दिवसांत न वाचल्याने विसरले आहे, चू.भू.द्या.घ्या.) त्यांचे एकंदरीत गुणधर्म आणि वेशभूषा अप्सरांशी मिळतीजुळती आहे. दुव्याबद्दल धन्यवाद. सावकाश वाचते.

साती आसरा

साती आसरांबद्दल माहिती आणि ऋग्वेदातील पुरुरवा-उर्वशी संवाद यांवर चर्चा करून, पाण्याजवळ राहाणार्‍या धोकादायक स्त्रिया या कल्पनेची ऐतिहाहिक परंपरा देणारा दामोदर धर्मानंद कोसंबींचा अभ्यासपूर्ण लेख वाचल्याचे आठवते. सापडल्यास आणखी लिहीन.

पाण्याजवळ राहाणार्‍या स्त्रिया/ भूते - रुसल्का

साती आसरांबद्दल माहिती आणि ऋग्वेदातील पुरुरवा-उर्वशी संवाद यांवर चर्चा करून, पाण्याजवळ राहाणार्‍या धोकादायक स्त्रिया या कल्पनेची ऐतिहाहिक परंपरा देणारा दामोदर धर्मानंद कोसंबींचा अभ्यासपूर्ण लेख वाचल्याचे आठवते. सापडल्यास आणखी लिहीन.

आपल्याला मिळाले तर जरूर लिहा. पाण्याजवळ राहणार्‍या धोकादायक स्त्रियांचा उल्लेख जगात सर्वत्र आढळतो. सायरन आणि निम्फप्रमाणे रुसल्का या पाण्यांवरील स्त्री-भूतांचे वर्णन स्लाविक पुराणांत वाचता येते. त्यांची माहिती साती आसरांशी जवळीक साधते असे वाटते.

शंका

हा लेख वाचल्यावर (नेहमीप्रमाणे) एक शंका मनात आली आहे.

यक्ष, गंधर्व आणि किन्नर यात काय फरक आहे?

गायन करतात ते गंधर्व. हे माहिती आहे.
किन्नर विषयी माहिती येथे सापडली. पण अधिक माहिती वाचायला आवडेल.

थोडक्यात निरसन

बा अजानुकर्णा,

हा लेख खूप जुना आहे. बहुधा उपक्रमाचे उद्घाटन झाले आणि उपक्रमावर अशा लेखांना वाचले जाईल असे वाटले तेव्हा टाकलेला. :) कौतुकाबद्दल आभारी आहे. यक्ष आणि किन्नरांवर लिहा असे आधीही सुचवले होते काहीजणांनी परंतु वेळ झाला नाही. यक्षांवर लिहिण्यासारखे भरपूर असावे असे वाटते.

यक्ष, गंधर्व आणि किन्नर यात काय फरक आहे?

यक्ष हे कुबेराच्या राज्यातील नागरिक. देवांशी आणि स्वर्गाशी त्यांचा प्रत्यक्ष फारसा संबंध नाही, संपत्ती, गुप्तधन यांचे ते संरक्षण करत. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. अतिंद्रिय आणि अमानवी शक्ती यांना अवगत होत्या असे सांगतात. यक्ष हे केवळ सुष्ट शक्तींशी निगडीत नसून दुष्ट शक्तींशीही संबंधीत असत. त्यांच्या कृपेने धन प्राप्त होई.

गंधर्व हे अप्सरांचे सहचारी मानले जातात. त्यांना अप्सरांप्रमाणे सामान्य मानवांचे नितीनियम लागू होत नाहीत. स्वर्गात देवांशी प्रत्यक्ष संबंध, प्रसंगी देवतांना मदत करणे - युद्धात, देवकारणात (राजकारणात कसे म्हणावे? :)) इ.

किन्नर या मानाने इतके महत्त्वाचे मानले जात नाहीत असे वाटते. गायन-वादन आणि नृत्याने देवांना रिझवणे हे त्यांचे मुख्य काम. भारतातील हिजड्यांना किन्नर असे म्हटले जाते असे वाचले होते. (नेमका संबंध कसा ते माहित नाही परंतु गायन-वादन-नृत्य यांच्याशी संबंध वाटतो.)

मध्यंतरी वाचलेल्या काही संदर्भांवरून असे कळले की यक्ष, किन्नर आणि गंधर्व या मूळ लंकेतील जमाती होत्या. रावणाने कुबेराला हाकलून दिल्यावर त्याच्या समवेत त्या तेथून बाहेर पडल्या आणि हिमालयाच्या पायथ्याशी त्यांनी वसाहत केली. त्यांची राज्ये बहुधा आताचा हिमाचल प्रदेश आणि त्याच्या उत्तरेला असावी.

किन्नर

किन्नर विषयी माहिती येथे सापडली. पण अधिक माहिती वाचायला आवडेल.

प्रकाटाआ
प्रकाश घाटपांडे

वामा

प्रियाली यान्नी लिहिल्याप्रमाणे अप्सरा हे एक रत्न नसून केवळ रम्भादी देवान्गना (यात ऊवर्शीचा समावेश नाही.) समुद्रमन्थनातून निघाल्या.
ऊवर्शी नर - नारायण ऋषीन्नी इन्द्राला भेट म्हणुन दिली. (कारण व कथा भागवतात)
अप्सरान्ना वामा असे ही म्हणतात. कारण त्यान्चे शरिर उन्हाळ्यात थन्ड आणि थन्डीत गरम असते.

 
^ वर