सनल एडामारुकू यांचे अभिनंदन

ढोंगी बाबा सुरेंद्र शर्माच्या 'अध्यात्मिक शक्ती वापरून मी कुणालाही ठार मारू शकतो' ह्या दाव्याला आव्हान देऊन श्री. एडामारुकू ह्यांनी दुरदर्शनवर सर्वांसमोर खोटे सिद्ध केले. इंडियन रॅशनलिस्ट असोशीअन अध्यक्ष श्री सनल एडामारुकू ह्यांचे अभिनंदन. श्रद्धेच्या आवरणाखाली लपल्याने चिकित्सेला दूर ठेवून राजरोस लबाडी करणार्‍या समस्ता बाबा बुवांची असाच पर्दाफाश होत राहो. सविस्तर वृत्त इथे वाचा..

http://www.timesonline.co.uk/tol/news/world/asia/article7067989.ece

यूट्यूब विडियो..

लेखनविषय: दुवे:

Comments

ढोंगी वाहिनी

काही दिवसांपुर्वी मी पाच एक् मिनिटे हा कार्यक्रम पाहिला होता. श्री. एडामारुकू कदाचित खरोखरच तळमळीने अंधश्रद्धे विरुद्ध काम करत असतील, परंतु ज्या इंडीया टीव्ही वर हा कार्यक्रम होता ती वाहिनी मात्र जादूटोणा व अन्य अघोरी कृत्यांचे कार्यक्रम नियमित दाखवून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असते.

बाय द वे, श्री.एडामारुकू याचा अशाच एका ढोंगी संतीणीचा पर्दाफाश करणारा खालील लेख वाचनीय आहे.

http://www.mukto-mona.com/Articles/mother_teresa/sanal_ed.htm

जयेश

इंडिया टिव्हीचा बनाव

हा इंडिया टिव्ही काय प्रकार आहे ते माहित नाही पण इतका विनोदी प्रकार आधी पाहिलेला नाही.

खरे सांगायचे झाले तर, छे!छे! योग्य प्रयोग केलेलाच नाही ;-)

एकतर संपूर्ण पूजा उभी राहून केल्याने तांत्रिकाच्या पायांना रग लागली असावी आणि त्याने एकाग्रता साधली नसावी. ;-) दुसरे असे की हे प्रयोग स्मशानात केले तर सकारात्मक (की नकारात्मक?) उर्जा निर्माण होते असे पंडितजी म्हणतात.(अरेच्चा! काळे वेशधारी, कवटीतून दारु पिणार्‍या आणि मृतशरीराची राख फासणार्‍या अघोर साधूंचे काय झाले? हे पंडितजी तर दिवसातून दोनदा सचैल स्नान करत असावेत असे वाटतात. किरवंतही नसावेत.) इंडिया टिव्हीचा सेट स्मशानात नसावा असे वाटते त्यामुळे प्रयोग तेथेच फसला आणि पंडितजी/ मांत्रिकजी चक्क श्वेतवर्णी वेशात...अरेरे! काळ्या जादूचा प्रभाव पडायचा कसा?

दुसर्‍या चित्रफितीत चक्क खालचे मंत्र म्हटले आहेत -

  1. महामृत्युंजय मंत्राचा जप - जो अकाली मृत्यू येऊ नये म्हणून केला जातो असे वाटते. :-))))))))))))))))
  2. या कुन्देन्दु तुषार हार धवला
  3. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू
  4. या देवी सर्व भूतेषु
  5. मंगलम् भगवान विष्णू| मंगलम् गरुड ध्वजम् - अरेरे! त्या कोणत्याशा चित्रपटात अक्षय कुमारच्या पोटातून हा मंत्र वाजत होता.
  6. संस्कृत श्लोकांची आमची दौड येथपर्यंतच

लोकहो, सावध व्हा! वरील मंत्र कदाचित तुम्ही, तुमच्या आणि कुटुंबियांच्या स्वास्थ्याकरता रोज म्हणत असाल तर इंडिया टिव्हीच्या या चित्रफितीनुसार त्यांना अपाय होण्याची शक्यता आहे....अरेरे काय विनोदी प्रकार आहे हा! ह.ह.पु.वा.

आणि शेवटी उगीच चवीला ओम् र्‍हिम् क्लिम् ओम् फट स्वाहा हा माझा आवडता मंत्र टाकल्याने ही तांत्रिक साधना फळलेली नाही असे माझे स्पष्ट मत आहे. एकंदरीत माझी अतिशय निराशा झाली.

नावात चुकले हो!

मस्त टाईमपास धागा!
मंत्र 'मारताना' घेण्याचे नाव चुकले - 'सनल' ऐवजी भटजीबुवा (तांत्रिक कुणीकडून?) 'संतोष' म्हणाले.
कोण्या संतोषावर त्याचा परिणाम झाला असावा. (सनलचे 'जन्मनाव' / 'मूळनाव' काय होते ते भटजीबुवांनी विचारलेच नाही.)

http://www.youtube.com/watch?v=t9taL2vcOJ0

श्लोक

ऐकायला काहितरी महत्वाचे वाटतील असे एखाद्या मृत अथवा मृतवत भाषेतील शब्द फेकून सामान्य माणसाला गुंगारा देण्याची कला सगळ्यात धर्मांमधील भोंदू लोकांमधे दिसून येते.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सुरेंद्र शर्मा यांचे अभिनंदन

सुरेंद्र शर्मा यांचे अभिनंदन
होय हा टायपो नाहि. अंनिस वा तत्सम लोकांच्या आव्हानांच्या पुढे नांगी टाकणार्‍या तमाम बुवा-बाबा-माता-(विंग कमांडर) यांपेक्षा सुरेंद्र शर्मा यांचे धाडस वाखाणण्याजोगे आहे.
निदान त्यांचा तरी त्यांच्या विद्येवर इतका विश्वास आहे की त्यांनी च्यालेंज उचलले

बाकी च्यांलेंजही न उचलणार्‍या भित्र्यांचे काय?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

आक्षेप

करड्या अक्षरातल्या साहेबांनी नांगी टाकली या म्हणण्याला काय आधार आहे? ;)

'तिकडे' दळणावर दळण चालू आहे. :(

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

खरं की काय?

करड्या अक्षरातल्या साहेबांनी कोणत्याही संस्थेचे / व्यक्तीचे आव्हान घेतल्याचे माझ्या ऐकण्यात अगर वाचनात नाहि (खर्रेखुर्रे बरं का त्यांच्याच गोष्टीतले नव्हे ;) ) असल्यास निकाल जाणण्यास उत्सुक आहे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

हा हा हा.

तिकडे त्यांची यथेच्छ थट्टा चालू आहे. (मालक त्यांना चावी मारतात). पण त्यांचे दळण चालू असते. नवीन नवीन सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचे.
हां पण आव्हान स्वीकारलेले मात्र नाही. :)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

धाडसी नव्हे मूर्ख

धाडसी नव्हे मूर्ख आहे सुरेंद्र शर्मा.
'ह्यावर आमची श्रद्धा आहे, आमच्या श्रद्धेची चिकित्सा करण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? विज्ञानाकडे तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरे कुठे आहेत?' असे दळण दळत बसला असता तर त्याचे दुकान आजही जोरात चालू असते.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

हा हा हा

कॉमेडी असा टॅग नाही टाकला का या धाग्याला?

शर्मांचे खासच अभिनंदन.

अंनिस वा तत्सम लोकांच्या आव्हानांच्या पुढे नांगी टाकणार्‍या तमाम बुवा-बाबा-माता-(विंग कमांडर) यांपेक्षा सुरेंद्र शर्मा यांचे धाडस वाखाणण्याजोगे आहे.
अगदी. सुरेंद्र शर्मा तर मला छुपे रॅशनलिस्ट वाटतात. त्यांचे खास अभिनंदन! दुसरा भाग बघा. भरपूर मनोरंजन आहे. मंत्र नीट ऐका.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विन विन नाटक

हे सर्वांनीच मिळून केलेलं नाटक (संवाद न ठरवता) वाटलं... सनलना जाहीर टीव्हीवर अंधश्रद्धेचा पाडाव करण्याची संधी मिळाली. इंडिया टीव्हीला काहीतरी सनसनाटी दाखवून प्रेक्षक खेचण्याची संधी मिळाली. शिवाय एकदा विज्ञानाला झुकतं माप देऊन आपण संतुलित आहोत असं सांगता आलं. शर्मांचं धाडस वगैरे काही नाही. त्यांना तासभर आपल्या पवित्र शुभ्र वस्त्रात टीव्ही कॅमेऱ्यासमोर उभं राहून बुवाबाजी वर्तुळात अधिष्ठान मिळालं. जिथे भुक्कड मंत्र, व स्वघोषित दावे (आणि थोडी दाढी, कफनीसारखा युनिफॉर्म) एवढंच भांडवल आवश्यक असतं, त्या व्यवसायात इव्हन बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. त्यांचे भक्तगण, व होतकरू भक्तगण अर्थातच प्रियालींनी दिलेली कारणपरंपरा वापरून परिणाम का झाला नाही हे सांगणार. आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोनाची प्रगती झाल्याचा आनंद. सगळेच सुखी. टीव्ही मानवाचा आनंद वाढवतो तो हा असा...

सनल यांनी पुढचे काही आठवडे इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये किंवा घरात सुरक्षित जगावं अशी माझी इच्छा आहे. जर का त्यांना चुकून काही अपघात झाला तर सुरेंद्र शर्मा काय म्हणतील याचा विचार करा...

आपण सर्व जण त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्यामागे आपली सकारात्मक ऊर्जा पाठवूया...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विन विन नाटक

यू ट्युबवर मी हे पूर्वी पाहीलं होतं. हे खरं का खोटं कसं ठरवायचं?

हम्म्म्

हा कार्यक्रम एकदा चुकून पाहिला.
त्याच्या आधीपर्यंत एन् डी टी व्ही हा बर्‍या लोकांचा समूह आहे अशी माझी "अंधश्रद्धा" होती.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बहुतेक मिथुन चक्रवर्तीचा

याच जन्मात एक अजून नवीन जन्म झाला आहे की काय असे वाटले! ;)

अंधश्रद्धा!!

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. नितिन थत्ते यांच्या प्रतिसादलेखनात किंचित बदल करूनः
"हा कार्यक्रम या वाहिनीवर सुरू झाल्याचे ऐकले.
त्याच्या आधीपर्यंत एन् डी टी व्ही हा बर्‍या लोकांचा समूह आहे अशी माझी "अंधश्रद्धा" होती.

हे काही उत्तर नाही

त्याच्या आधीपर्यंत एन् डी टी व्ही हा बर्‍या लोकांचा समूह आहे अशी माझी "अंधश्रद्धा" होती.

थत्ते आणि यनावाला यांचे उत्तर म्हणजे सुरेंद्र शर्मांनी योग्य तो प्रयोग केला नाही, अन्यथा सनल यांचा मृत्यू अटळ होता प्रमाणेच पळवाट वाटली. हे काही वरील प्रश्नाचे उत्तर वाटत नाही. अशाप्रकारे उत्तरे येणे म्हणजे आपल्या विश्वासांवर कोणीतरी अविश्वास दाखवताच त्याला तोडून टाकणे झाले.

वरील चित्रफीत पाहिली. त्या अनुषंगाने होमी भाभांच्या अपघाताविषयीही वाचले. दोन्ही घटनांत निश्चितच तथ्य आहे असे वाटले. परंतु, केवळ हिप्नोटिझममुळे हा पुनर्जन्म आहे असे सिद्ध होत नाही असे वाटते. त्यासाठी केस बाय केस अधिक संशोधन करावे लागेल. ही केस पर्सनॅलिटी डिसऑर्डरची आहे का हे तपासणेही योग्य ठरेल. मुख्य म्हणजे केवळ एका तज्ज्ञाच्या तपासणीवरून निष्कर्ष काढणे घाईचे वाटते आणि तसेही, असे प्रयोग सिद्धतेची पातळी कधीच गाठत नाहीत कारण मग हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न बनतो. विश्वास ठेवणारे लहानशा प्रयोगावरून ठेवतील आणि न ठेवणारे अनेक प्रयोगांनंतरही ठेवणार नाहीत. अशा प्रयोगांत खुसपटे काढून दोन्ही बाजू आपापले मुद्दे रेटत राहतात. तेव्हा, आपल्याला पटत असल्यास विश्वास ठेवावा हेच खरे.

अशाच प्रकारचा किस्सा उत्तरा हुद्दार यांचा होता. पक्ष आणि प्रतिपक्ष यांनी इतके ढोबळ मुद्दे मांडले की मूळ व्यक्तिची त्यात उगीच होरपळ झाली असावी असे वाटते. या केसमध्येही मुद्दे खोडून काढणारे स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते परंतु आपली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले.

असो. टिव्हीवर असे कार्यक्रम दाखवतात आणि सेलेब्रिटिजना ओढून आणून कार्यक्रम केला जातो त्यात तथ्य किती आणि जाहिरातीचा भाग किती हा प्रश्न पडतोच.

करड्या अक्षरातल्या साहेबांनी

अशाच प्रकारचा किस्सा उत्तरा हुद्दार यांचा होता. पक्ष आणि प्रतिपक्ष यांनी इतके ढोबळ मुद्दे मांडले की मूळ व्यक्तिची त्यात उगीच होरपळ झाली असावी असे वाटते. या केसमध्येही मुद्दे खोडून काढणारे स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते परंतु आपली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले.

प्रियालींचे म्हणणे नाडी ग्रंथांना ही तितकेच चपखलपणे फिट होते. जसे प्रा. उत्तरा हुद्दारांच्या केसमधे मुद्दे खोडून काढणारे स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते मात्र आपली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले.असे मत झाडून मोकळे होतात.

करड्या अक्षरातल्या साहेबांनी कोणत्याही संस्थेचे / व्यक्तीचे आव्हान घेतल्याचे माझ्या ऐकण्यात अगर वाचनात नाहि (खर्रेखुर्रे बरं का त्यांच्याच गोष्टीतले नव्हे ;) ) असल्यास निकाल जाणण्यास उत्सुक आहे

साहेबांनी अंनिसला आव्हान देण्याचा वा घेण्याचा प्रश्न पुर्वी नव्हता व आज ही नाही. नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे म्हणणाऱ्यांनी ते कसे थोतांड आहेत हे सिद्ध करायचे आहे. त्यांनी जे पुरावे सादर केले त्यांना समर्पक उत्तरे देऊन ते आक्षेप खोटे व बिनबुडाचे असल्याने तो निकाल नाडी ग्रंथांच्या बाजूने आधीच लागला आहे. आता त्याला संबंधित लोक दुर्लक्षुन टाळतात व तेच तेच आक्षेप उगाळत बसतात इतकेच. संदर्भासाठी वाचा - नाडीग्रंथ भविष्याने केला अंनिसचा पराभव - उर्फ बोध अंध श्रद्धेचा हा ग्रंथ.
प्रियालींचा हा प्रतिसाद नाडीला उद्देशून नसला तरी तो नाडीग्रंथांना ही तितकाच लागू ठरतो म्हणून वापरला. इतकेच.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.

सिद्धतेची जबाबदारी

नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे म्हणणाऱ्यांनी ते कसे थोतांड आहेत हे सिद्ध करायचे आहे.

हे पटत नाही. प्रियाली सिद्ध करण्याच्या मार्गातले अडथळे सांगत होत्या असं वाटतं. एखादा निष्कर्ष काढण्यापूर्वी किती खडतर चिकित्सा केली गेली पाहिजे याविषयी.

सर्वच थोतांड असणाऱ्या गोष्टी थोतांड आहेत असं सिद्ध करण्याची जबाबदारी ते ऐकणाऱ्यांवर पडली तर नवीन संशोधन होणारच नाही. कुठचाही सिद्धांत हा थोतांड नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी तो सिद्धांत मांडणाऱ्यावर असते. वैज्ञानिक विचारसरणीत प्रत्येकच सिद्धांत 'थोतांड असू शकेल' या शक्यतेबरोबर तपासला जातो. हे काम सिद्धांत मांडणारा करतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

सहमत

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

सहमत आहे, परंतु

प्रियाली सिद्ध करण्याच्या मार्गातले अडथळे सांगत होत्या असं वाटतं. एखादा निष्कर्ष काढण्यापूर्वी किती खडतर चिकित्सा केली गेली पाहिजे याविषयी.

:-) सहमत आहे. हेच सांगायचे होते. याच बरोबर,

सिद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येक वाचकावर येत नाही परंतु जे या केसचा अभ्यास करतात त्यांनी तटस्थ भूमिका घेऊन अभ्यास/ चिकित्सा केल्यास अशा प्रकरणांना मदत होऊ शकेल.

वैज्ञानिक विचारसरणीत प्रत्येकच सिद्धांत 'थोतांड असू शकेल' या शक्यतेबरोबर तपासला जातो. हे काम सिद्धांत मांडणारा करतो.

हे देखील बरोबर परंतु हे करताना डोळे झाकून थोतांडच आहे असे म्हणून चिकित्सा नाकारण्याच्या पद्धतीला माझा किंचित आक्षेप आहे.

माझा मुद्दा केवळ असा आहे की पक्ष आणि प्रतिपक्ष हे हिरिरीने आपापले मुद्दे मांडत असतात त्यामुळे कोणत्याही ठोस निष्कर्षावर सर्वांनी येणे कठिण होते. म्हणूनच, अशा प्रकरणांत ज्या व्यक्तिला विश्वास ठेवावासा वाटतो त्याने तो ठेवावा, वाटत नसेल त्याने ठेवू नये.

वरील प्रतिसादात माझा एक मुद्दा राहून गेला होता तो असा की हिप्नोटिजमचे प्रयोग मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यात हिप्नोटिजम करणारी व्यक्ती हिप्नोटाईज्ड् झालेल्याला गाईड करत असते :-) असे मला दरवेळेस वाटले आहे. (त्यातील खरे खोटे मला माहित नाही. मी चिकित्सा केलेली नाही.) परंतु एक उदाहरण देते,

हिप्नोटिजम करणारी व्यक्ती म्हणते,"एक तळे आहे. त्यात एक कमळ आहे. त्यात एक पत्ता आहे तो कोणता?"
हिप्नोटाईज्ड झालेली व्यक्ती उत्तर देते,"एक्का."
"एक्का आहे का? नव्वी तर नाही?"
"हो, नव्वीच आहे."
त्यामुळे हिप्नोटिजम हाच केवळ उपाय आहे असे वाटत नाही. परंतु, त्या व्यतिरिक्त चाचण्या करणे आवश्यक आहे. जसे, लाय डिटेक्टर टेस्ट, नातेवाईकांच्या मुलाखती वगैरे.

मागे शशांक यांनी मनोगतावर अडिच वर्षांच्या आदित्यच्या तबलावादनावर काही चित्रफिती दाखवल्या होत्या. त्या यूट्यूबवरून आता काढून टाकल्या आहेत. (कारण माहित नाही.) परंतु त्या अनेकांनी पाहिल्या आहेत. मूळ लेख: येथे.

शकुंतला देवीसारखे अवघड गणिते झटक्यात सोडवणार्‍या व्यक्ती.

हे पुनर्जन्म आहेत वगैरे असे मला मुळीच म्हणायचे नाही परंतु या स्वतंत्र व्यक्ती आहेत. प्रत्येक केस वेगळी असावी. इच्छुकांनी अशांचा अभ्यास करावा/ चिकित्सा करावी की ही माणसे इतरांपेक्षा वेगळी का? "अबब! चमत्कार" किंवा "छट! थोतांड" हे केवळ सामान्य वाचकांनी म्हणावे. चिकित्सकांनी नाही.

मागच्या जन्माचे काय, हा जन्मातल्या हरवलेल्या आठवणी

अमेरिकेत १९९५ मध्ये एका मोठ्या विचित्र सेक्स कांडाचा बोभाटा झाला. "वेनाची, वॉशिंगटन राज्य" येथे मध्यमवर्गीय/सभ्य/पोक्त अशा कुटुंबांविरुद्धा स्वतःच्या अपत्यांवर आणि अन्य मुलांवर घोर लैंगिक अत्याचार केल्याच्या केसेस "उघडकीला आल्या". ४३ प्रौढ, ६० मुले, तब्बल २९,७२६ अत्याचाराच्या घटना!

थोडी "मदत केल्यानंतर" लैंगिक अत्याचार झाल्याचे लहान-लहान मुलांना स्पष्ट आठवू लागले. आपल्या आईवडलांनी, शेजार्‍यांनी केलेले बलात्कार! आपल्या मुलांनीच आपल्याविरुद्ध साक्ष दिल्यानंतर काही आईवडलांना तोंड उघडायला जागा राहिली नाही.

मुलांच्या या आठवणी खर्‍या आहेत का? याबाबतीत "उघडे मन" ठेवून काय करावे? त्या प्रौढांना "उघड्या मनाने" वाळीत टाकावे का? - कारण हे अत्याचार खरोखर घडले असल्यास अत्यंत क्रूर गुन्हे आहेत.

असे कुठले गुन्हे घडले नाहीत, आणि घाबरलेल्या मुलांच्या मनात प्रॉसेक्यूशनने "कहाणी विचारण्याच्या" प्रकाराने कहाण्या पेरल्या, असा हल्लीचा निष्कर्ष आहे. (वरील विकी दुव्याखाली अधिक संदर्भ बघावे.)

या घटनेमुळे ज्या मुलांना आता या कहाण्या "अगदी खर्‍याखुर्‍या" आठवू लागल्या त्यांची परिस्थिती दयनीय आहे.

"वेनाची येथील प्रॉसेक्यूटरने मुलांना प्रश्न विचारण्याची योग्य पद्धत वापरली नाही" असे म्हणणे पळवाट आहे का? ज्या मुलांना न-झालेले अत्याचार आता आठवत आहेत त्यांना कुठल्यातरी सभ्य पद्धतीने "तुम्हाला आठवते तसे काही झाले नाही" असे म्हणण्यापेक्षा वेगळे असे नेमके काय साधन समाजाकडे उपलब्ध आहे? आणि त्या मुलांना "तुमचेही खरे" असे म्हटले तर मुलांच्या आठवणीतल्या गुन्हेगारांविरुद्ध समाज कारवाई का करत नाही, याचे समर्थन कसे करायचे?

असो. मागच्या जन्माच्या आठवणीबद्दल प्रियाली यांचा नेमका मुद्दा कळला नाही.

माझा मुद्दा

"वेनाची येथील प्रॉसेक्यूटरने मुलांना प्रश्न विचारण्याची योग्य पद्धत वापरली नाही" असे म्हणणे पळवाट आहे का? ज्या मुलांना न-झालेले अत्याचार आता आठवत आहेत त्यांना कुठल्यातरी सभ्य पद्धतीने "तुम्हाला आठवते तसे काही झाले नाही" असे म्हणण्यापेक्षा वेगळे असे नेमके काय साधन समाजाकडे उपलब्ध आहे? आणि त्या मुलांना "तुमचेही खरे" असे म्हटले तर मुलांच्या आठवणीतल्या गुन्हेगारांविरुद्ध समाज कारवाई का करत नाही, याचे समर्थन कसे करायचे?

माझा मुद्दा एवढाच आहे की वरील घटना, पुनर्जन्माची दुसरी घटना, भूत पाहिल्याची तिसरी घटना, अवघड गणित वयाच्या तिसर्‍यावर्षी सोडवता येण्याची चौथी घटना या सर्व स्वतंत्र घटना आहेत.

वरील घटना वाचल्यावर त्यावरून आपल्याला साजेसा निष्कर्ष प्रत्येक व्यक्ती काढेलच परंतु निदान,

हॅ! हे असले अमेरिकेतच घडायचे. त्यात काय मोठे? अशी प्रतिक्रिया तरी देऊ नका.

बरोबर

वरील घटना, पुनर्जन्माची दुसरी घटना, भूत पाहिल्याची तिसरी घटना, अवघड गणित वयाच्या तिसर्‍यावर्षी सोडवता येण्याची चौथी घटना या सर्व स्वतंत्र घटना आहेत.

या सर्व घटना वेगवेगळ्या आहेत.
खरे तर काही आर्थिक/मानसिक/गुन्हेगारी फायदा-तोटा असेल तरच "काहीही सिद्ध करायची जबाबदारी कोणाची?" या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक होते.

एखादी वस्तू गुणकारी आहे, किंवा फोबियाचा उपचार योग्य आहे, ... यातून काही फायदा तोटा होतो. त्या परिस्थितीत "सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची?" हा प्रश्न संदिग्ध आहे, असे म्हणून चालत नाही.

तिसर्‍या वर्षाच्या मुलाने गणित सोडवले, त्यावरून कोणी नवी नवी शिक्षणपद्धती-बालसंगोपनपद्धती विकत नाही, तोवर "सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची?" हा प्रश्न लगेच सोडवायची गरज पडत नाही.

"एक्स-फाइल्स" सारखा कार्यक्रम ललित मनोरंजक आहे, असे माहीत असले, तर "सिद्धता" वगैरे मुद्दे गैरलागू आहेत. एनडीटीव्ही वरील कार्यक्रमाबद्दल तथ्यात्मक मनोरंजन की ललित मनोरंजन आहे? हे निर्मात्यांनी स्पष्ट केले नसावे, असे वाटते. कार्यक्रम तथ्यात्मक असेल तर लोकांचा आर्थिक/भावनिक फायदातोटा होऊ शकतो, असे वाटते. म्हणून सिद्धतेचा प्रश्न लागू होतो.

 
^ वर