जवाबदार कोण?

फोर्थ डायमेन्शन 49

जवाबदार कोण?

न्यायाधीशासमोर एका खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यावर आली होती.
"तुम्ही तिघेही एका घोर अपराधाचे गुन्हेगार आहात. यासंबंधात आपल्याला काही सांगायचे आहे काय?". न्यायाधीशाने विचारले.
"मी ही कृती केली, हे मला मान्य आहे. परंतु ही कृती करण्यापूर्वी मी एका सल्लागाराशी सल्लामसलत केली होती. व त्यानीच मला ही कृती अशा प्रकारे करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे जे काही घडले असेल त्याला हा सल्लागारच जवाबदार आहे. तुम्ही त्या तज्ञ सल्लागारालाच याविषयी विचारावे." त्यातील एकजण म्हणाला.
"मी माझा अपराध अमान्य करणार नाही. परंतु ही माझी चूक नाही. मी यासंबंधात डॉक्टरी सल्ला घेतला होता. हा डॉक्टर मानसोपचार तज्ञ आहे. चूक झालेली असल्यास ती त्या डॉक्टरची चूक. माझी नव्हे."
"मी पण अपराध मान्य करतो. हे निंदनीय कृत्य करण्यापूर्वी मी एका जोतिषीकडे याविषयी विचारपूस केली होती. गुरू शुभ राशीत प्रवेश करत आहे, ही कृती केल्यास नक्कीच यश प्राप्त होईल, करायला हरकत नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे दोष असल्यास त्या जोतिषीचा आहे. माझा नव्हे." तिसऱ्याने कबूलीजवाब दिला.
दुपारच्या सत्रात न्यायाधीशाने या खटल्याचा निकाल दिला.
"अशा प्रकारचा खटला या कोर्टासमोर पहिल्यांदाच आला असावा. गुन्ह्याची पद्धतही चक्रावून टाकणारी आहे. निकाल काय द्यावा याबद्दल मीसुद्धा गोंधळलेल्या स्थितीतच होतो. त्यामुळे मी ही केस माझ्या वरिष्टासमोर ठेवली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हा तिघांना कठोरातली कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. यात माझी चूक नाही. त्यामुळे मला दोष न देता माझ्या वरिष्टांना ध्यावा." असे म्हणत न्यायाधीशाने शिक्षा सुनावली.

(Source: Existentialism and Humanism : Jean Paul Sartre)

सहसा आपण आपली चूक कधीच कबूल करत नसतो. आपण चूक करत नाही याच पावित्र्यात आपण कायमपणे वावरत असतो. अगदी नाइलाजास्तव, दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसेल तरच आपण चूक कबूल करतो. परंतु काही चांगले केलेले असल्यास मात्र आपण आपले नाव पटकन पुढे करतो. आपण केलेल्या कृतीच्या फलश्रुतीला खरोखरच आपण जवाबदार असतो का, याबद्दल अजूनही अनेकांच्या मनात शंका आहेत.
आपण केलेल्या (चुकीच्या) कृतीच्या परिणामांची जवाबदारी टाळण्यासाठी दुसऱ्यावर वा दुसऱ्यांच्या सल्लामसलतीवर ढकलून देणे हा एक सोपा उपाय असतो. त्यानी सांगितले म्हणून मी केले असे म्हणायला काही कष्ट लागत नाही. आपण जेव्हा एखाद्याकडे सल्ला विचारायला जातो, तेव्हा तो आपले म्हणणे मान्य करेल, आपल्याला दुजोरा देईल याची खात्री करून घेऊनच आपण त्याच्याकडे जात असतो. प्रशासकीय व्यवस्थेत बॉस जेव्हा आपल्याला सल्ला विचारतो तेव्हा त्याला तुमच्याकडून 'जी हुजूर' चीच अपेक्षा असते, याचा अनुभव आपल्यातील अनेकांना आला असेल. त्यामुळे अशा प्रकारच्या सल्ल्याला वा उपदेशाला तसा काहीच अर्थ उरत नाही. कृतीचा निर्णय अगोदरच ठरलेला असतो. फक्त ती कृती करण्याइतके धैर्य नसते म्हणून दुसऱ्यांच्या सल्ल्याचा आधार घेतला जात असावा.
दुसऱ्याचा सल्ला घेतल्यामुळे आपल्या कृतीच्या बरे-वाईट परिणामातून काही प्रमाणात सूट मिळेल, हे बालिश वाटेल. इतरावर जवाबदारी ढकलण्यात काहीही अर्थ नाही. केवळ कृतीच नव्हे तर सल्लागाराच्या निवडीची जवाबदारी पण आपणच उचलायला हवी. आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे आपण वागणार याची पण हमी द्यायला हवी.
त्यामुळे वर उल्लेख केलेल्या कैद्यांचा बचाव अपूर्ण वाटतो. याचा अर्थ असा नव्हे की दुसऱ्या कुणाशी सल्लामसलत करणे चुकीचे आहे. सामान्यपणे प्रत्येकाला योग्य निर्णय घेण्यासाठी दुसऱ्याच्या उपदेशाची - होकाराची गरज असते. उदाहरणार्थ आपल्याला व्यवस्थितपणे काम करणारा संगणक विकत घ्यावयचा आहे. आपल्याला संगणकातील छोटे-मोठे बारकावे कळत नाहीत म्हणून आपण एका (ओळखीच्या) संगणक तज्ञाकडे जातो. जर त्या तज्ञाच्या चुकीच्या सल्ल्यामुळे आपल्या संगणकात काही दोष आढळल्यास चूक तज्ञाचीच आहे असे ठामपणे म्हणता येईल. यात सल्ला घेणाऱ्याचा नक्कीच दोष नाही. आपण त्या व्यक्तीला तज्ञ समजून काही चागल्या सल्ल्याच्या अपेक्षेने त्याच्याकडे गेलो होतो. परंतु त्याने घोर निराशा केली, असे म्हणण्याची पाळी आपल्यावर येईल. डॉक्टराच्या चुकीच्या निदानामुळे रुग्ण दगावल्यास रुग्ण वा रुग्णाच्या कुटुंबियांना जवाबदार धरता येत नाही. याच न्यायाने कौटुंबिक व्यवहार विकोपाला जात असल्यास विवाह जुळवणाऱ्याला (वा कुंडलीला) दोष देता येत नाही.
जर हे असेच घडत असल्यास जवाबदारीसाठी आपल्याला काही स्तर ठरवावे लागतील:

  1. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला योग्य माहिती नाही, व ती कृती पूर्णपणे इतरावर विसंबून असल्यास त्याला आपण जवाबदार नसतो; (डॉक्टर, वकील, बिल्डर, इत्यादींची ती जवाबदारी ठरते)
  2. ज्याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान वा माहिती आहे व त्या माहितीच्या आधारे केलेल्या कृतीच्या परिणामास आपणच पूर्ण जवाबदार असतो; आणि
  3. इतर बाबतीत आपण अंशत: जवाबदार असतो;

असे तीन स्तर ठरवावे लागतील.
परंतु हा युक्तिवादसुद्धा तितका योग्य वाटत नाही. वर उल्लेख केलेल्या कैद्यांच्या बाबतीत नेमके काय करावे हा तिढा यातून सुटत नाही. कारण सल्ला देणाऱ्या तज्ञाची निवड ही आपली जीवनशैली, अनुभव, शहाणपण, उत्स्फूर्तता, व मैत्रीसंबंधांच्या आवडी-निवडी अशा अनेक घटकांच्या सरमिसळीतून केलेली असते. त्यामुळे अनुभवी सल्लागार, डॉक्टर वा जोतिषी यापैकी कोण, कितपत दोषी ... किंवा त्यांचा अजिबात दोष नसून त्या घोर अपराधास आरोपीच पूर्णपणे जवाबदार.... असे ठामपणे म्हणता येईल का? अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरं सापडत नाहीत. हीच गोष्ट जास्त ताणल्यास तत्वज्ञ, विचारवंत, इत्यादींचा सल्ला वा विचार वा उपदेश धुडकावून द्यावे लागेल. साधू - संत फक्त पूजा-अर्चेपुरतेच लक्षात राहतील.
किंवा या कुठल्याही फंदात न पडता अकेला चलो रे म्हणत आपण स्वत:चे जीवन जगणार आहोत का?

Comments

श्रद्धा ठेवा

हॅहॅहॅ
श्रद्धा ठेवा! मग असले प्रश्नच पडणार नाही. मात्र ती 'आतुन' निर्माण व्हावी लागते. तो पर्यंत वाट पहा.
प्रकाश घाटपांडे

तज्ञाची आडून जवाबदारी

मी ऑडिटिंग शिकत असताना ऑडिटरची कायदेशीर आणि क्रिमिनल लाएबिलिटी याविषयी जे शिकलो ते.

कायद्यामध्ये एक 'डॉक्ट्रिन् ऑफ होल्डिंग आउट्' असे एक तत्त्व असते. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा आपण एखाद्या विषयातील तज्ञ आहोत असे घोषित करते- 'होल्डिंग आऊट' त्यावेळी त्या व्यक्तीने दिलेल्या सल्ल्यावर विसंबून जर दुसर्‍या व्यक्तीने एखादी कृती केली तर त्या दुसर्‍या व्यक्तीच्या होणार्‍या नुकसानीस तज्ञ व्यक्ती जवाबदार आहे असे समजले जाते.

परंतु या कैद्यांचा दावा कायदेशीर दृष्ट्या अयोग्य आहे.

जेव्हा अशा व्यक्तीचे नुकसान होते तेव्हा ते त्या व्यक्तीनेच सोसायचे असते. इन् टर्न ती दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीवर नुकसानभरपाईचा दावा करू शकते आणि तो मान्य होऊ शकतो.
तज्ञ व्यक्तीने परस्पर नुकसान भरपाई करायची नसते/शिक्षा भोगायची नसते. ती कैद्यानेच भोगायची असते.

ते तिन्ही कैदी झालेल्या त्रासाबाबत/शिक्षेबाबत त्या त्या तज्ञाविरुद्ध नुकसानभरपाई मागू शकते.
(यातली मेख अशी की असा सल्ला पैसे देऊन दिला असेल तरच नुकसानभरपाई मागता येते. चू भू दे घे)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

नुकसानभरपाई कोणाकडून?

वरच्या प्रतिसादास एक पुरवणी.

हे तत्त्व बहुधा सरकारने ज्यांना 'प्रोफेशनल' म्हणून मान्यता दिली आहे अशा तज्ञांच्या बाबतच लागू असते. त्यानुसार डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउटंट इत्यादि व्यावसायिकांवर दावा लावता येतो. ज्योतिषी, पोपटवाले, वास्तुतज्ञ, रत्नांचे जाणकार, नारायण नागबळी आदि विधी करणारे भटजी इत्यादींना सरकारी मान्यता नसल्याने नुकसानभरपाई मागता येत नसावी. (हैयो यांनी अधिक खुलासा करावा).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

स्वतःच

वरील प्रश्न हा गुन्हेगारी संदर्भात असल्याने उत्तर देखील त्या संदर्भातच, अर्थात मर्यादीत आहे. एखाद्या गुन्ह्यास बाकी कोणी नसून "सुजाण" गुन्हेगारच जबाबदार असतो. ("सुजाण" म्हणायचे कारण इतकेच, की एखादा खरेच मानसीक रूग्ण असला आणि त्याचा वापर केला गेला असला तर त्या संदर्भात, तो जबाबदार राहीलच पण त्यामानाने कमी, ज्याने वापर केला तो जास्त जबाबदार ठरेल.)

वरील तिन्ही गुन्हेगारांचे म्हणणे मान्य न होण्याचे एक कारण असे आहे की ज्यांनी त्यांना उत्तेजना दिली, त्यांना त्यातून काही फायदा होता का हे स्पष्ट नाही. म्हणजे उगाचच दुसर्‍याला गुंतवण्यातील प्रकार झाला. त्या व्यतिरीक्त गुन्हेगार हे मानसीक रूग्ण ठरलेले दिसत नाहीत मग जे काही केले त्याचा परीणाम (कायद्याने त्यांच्यावरचाच नाही तर चांगले-वाईट या अर्थी) त्यांना माहीत असताना त्यांनी गुन्हा केला आहे.

या संदर्भात मला एकदम जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील एक गुन्हेगार, मुन्वर शहाचे फासावर जाण्या आधीचे, "येस आय ऍम गिल्टी" हे (वादग्रस्त) पुस्तक आठवले. त्यात त्याने जक्कलला बरीच नावे ठेवली होती. जे काही त्यावेळेस/नंतर वाचले त्याप्रमाणे जक्कलमधे इतरांवर विकृत प्रभाव पाडण्याची कदाचीत उपजत असेल पण वृत्ती/शक्ती होती. एका अर्थी मुन्वर शहा त्याला बळी पडला आणि त्याच्या स्वतःच्या मधील विकृतीने त्यावर कब्जा केला आणि तो हत्याकांडात सक्रीय सामील झाला. आठवते त्याप्रमाणे त्या पुस्तकात त्याने जरी इतर कारणे सांगितली होती, तरी कुठेही स्वतःची जबाबदारी झटकली नव्हती, तर शेवटी, "असंगाशी संग, प्राणाशी गाठ" प्रमाणे स्वतःवर ही अवस्था ओढवून घेतली असे म्हणले होते. वरील गुन्हेगार हे फारतर मुन्वरशहासारखे असतील असे म्हणता येईल पण सरते शेवटी त्यांच्या कृत्याची जबाबदारी त्यांच्या स्वतःवरच आहे.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विचार करण्यालायक

"जबाबदारी ठरवणे" आणि "कारणमीमांसा" या संकल्पनांमध्ये घनिष्ठ संबंध आहे.

वर नितिन यांनी व्यापारी/लेखाजोखा कायद्याच्या दृष्टीने स्पष्टीकरण दिलेले आहेच. त्यात असे दिसते, की नुकसानभरपाई एक-एक टप्प्याने होते - परंतु सल्लागारांपर्यंत साखळी-क्रमाने जबाबदारी पोचू शकते.

त्याच प्रकारे कायदा नसतानाही सल्लगारापर्यंत जबाबदारी पोचवण्याची आपली विचारांची रीत असते. या मनुष्यस्वभावाचे पडसाद साहित्यातील कथानकांत दिसतात.

एखादा खलनायक नवर्‍याच्या मनात बायकोबद्दल संशयाचे बीज पेरतो ("चुकीचा सल्ला देतो") आणि सोन्यासारखा संसार उधळून जातो. "ऑथेल्लो" नाटकात नायक आपल्या पत्नीचा खून करतो. अशा सर्व कथानकांमध्ये विष कालवणार्‍या खलनायकाची पुष्कळ जबाबदारी आहे, असे प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटते. खलनायक नसता तर सुखी संसार उधळलाच नसता, असे आपल्याला मनोमन वाटते.

त्याच प्रकारे लहान मुलाने जर काही नुकसान घडवले, तर त्याच्या पालकांना आपण जबाबदार ठरवतो. पालकांचा मुलाच्या प्रत्येक हालचालीवर अधिकार नसतो. (आई-बाबांच्या नकळत आम्ही पोरांनी काय-काय केले!) अशा परिस्थितीतसुद्धा त्या बालकाला "न-जाणता" म्हणून जबाबदारीतून मुक्त केले जाते. याचा विकृत गैरफायदा घ्यायचे एका खुन्याने ठरवले. जॉन ऍलन मुहम्मद याने आपल्या ओळखीतल्या एका मुलाला रायफलने निशाणी टिपायला शिकवले. मग त्या मुलाकडून लोकांचे खून करवले. कोर्टाने मुलाला शिक्षा केलीच तशी "फक्त-सल्ला-देणार्‍या"लाही शिक्षा केली.

कोणी थेटरात उगाच "आग" म्हणून ओरडले, तर त्यांनी लोकांना फक्त चुकीचा सल्ला दिलेला असतो. लोक स्वतःच एकमेकांना चेंगरतात. तरी "आग" ओरडणार्‍याकडे जबाबदारी असते. "दंगल उकसवली" असे सिद्ध झाल्यास, स्वतः शांत बसलेल्या व्यक्तीसही सजा होऊ शकते.

जबाबदारी सल्लागारापर्यंत पोचवण्याची उदाहरणे, आणि त्यासाठी समाजातली यंत्रणा आपल्याला काही बाबतीत दिसते. तरी सुद्धा ज्या बाबतीत अशी यंत्रणा, आणि असे नियम निश्चित नाहीत, त्या बाबतीत सल्लागाराकडे बोट दाखवून आपण वाचणार नाही, हे आपल्या ध्यानात असले पाहिजे. (म्हणजे आयुष्यातल्या जवळजवळ सर्व गोष्टींची जबाबदारी यात आली.)

असो. डॉक्टर-पेशंट संबंधामधील जबाबदारीवर माझे मत या लेखात दिले आहे - मिपा संपादकीय - आपले आरोग्य आपण कोणाच्या हातात सुपूर्त करतो? (पेशंटकडे जबाबदारी आहे, असा सारांश आहे.)

साखळी क्रम

>>नुकसानभरपाई एक-एक टप्प्याने होते - परंतु सल्लागारांपर्यंत साखळी-क्रमाने जबाबदारी पोचू शकते.

उदाहरण म्हणून सत्यम प्रकरण घेता येईल. सत्यमचे भागधारक ही एक पार्टी, राजू आणि इतर संचालक ही दुसरी पार्टी आणि पी डब्लू सी आणि त्यांचे ऑडिटर ही तिसरी पार्टी.

सत्यमच्या भागधारकांनी कंपनी चालवण्यासाठी संचालक मंडळाला नेमले. आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी भागधारकांनीच ऑडिटर नेमले.
त्यानंतर जे घडले त्याबाबत संचालक मंडळाने शिक्षा भोगायची आहे (दोषी ठरल्यास). परंतु कंपनीच्या ताळेबंदावर 'हा ताळेबंद कंपनीच्या व्यवहारांचे आणि आर्थिक स्थितीचे खरे आणि वाजवी चित्र दर्शवतो' असे प्रमाणपत्र ऑडिटरनी दिले. त्यावर विसंबून कंपनीच्या भागधारकांनी त्याच त्याच संचालकांना पुन्हा पुन्हा नियुक्त केले. त्यामुळे भागधारकांचे नुकसान झाले. म्हणून भागधारक ऑडिटरना जवाबदार धरून नुकसानभरपाई मागतात.

परंतु नुकसान फक्त भागधारकांचेच झाले असे नाही. त्याच प्रमाणपत्रावर विसंबून याखेरीज इतर अनेकांनी उदा. पुरवठादार कंपनीशी व्यवहार केले. त्यांचेही नुकसान झाले. त्यांनी ऑडिटरांकडून पैसे देऊन सल्ला मागितला नव्हता. पण येथे माझ्या वरच्या प्रतिसादातील 'डॉक्ट्रिन ऑफ होल्डिंग आउट' हे लागू होते आणि या बाहेरच्या पार्ट्यासुद्धा ऑडिटरकडून नुकसानभरपाई मागू शकतात.

एकूण धनंजय यांनी केलेले विवेचन योग्यच आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

वैज्ञानिक; बाह्य आणि आंतरिक

धनंजयशी सहमत.

आणखी एक मुद्दा असा (जो सार्त्रने अधोरेखित केला आहे) तो म्हणजे सल्लागाराने दिलेला सल्ला हा व्यक्तिनिरपेक्ष, वैज्ञानिक सत्यांवर आधारलेला होता का, यावरून सल्लागाराची जबाबदारी ठरते. अशांनाच व्यावसायिक म्हणून मान्यता असते व ते त्यावर पैसे कमावतात. जर ठरलेले नियम वापरून निघू शकणाऱ्या निष्कर्षाऐवजी त्याने वेगळा सल्ला दिला तर त्याने चूक केली हे मान्य करावं लागतं. उलटा विचार केला तर ज्योतिषांना अधिकृत मान्यता नाही व अशी जबाबदारी नाही हे त्या धंद्याच्या निष्कर्षशक्तीवर वाच्य आहे.

खलनायक हे बाहेरचे असतात की आतले - हा मुख्य प्रश्न आहे. सार्त्रचं म्हणणं शेवटी सगळ्याच बाबतीत बाहेरचे घटक जबाबदार मानले तर कुठच्याच निर्णयाला काहीच अर्थ राहात नाही - निवड आणि जबाबदारी ही शेवटी आंतरिक आहे. पूर्णपणे पटत नाही. प्रत्येकच जण प्रत्येकच विषयात जन्मत:च प्रवीण असेल तरच हे लागू होतं. गरम काय आहे याचं ज्ञान मिळवताना हाताला चटके बसतातच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

"याला जबाबदार कोण?"

पुर्वी डॉक्युमेंटरी मधे सामाजिक प्रश्नांवर काही भाष्य केले असायाचे. मुद्दा मांडुन मग "याला जबाबदार कोण? तुम्ही आम्ही कि शासन" असा प्रश्न त्यात विचारलेला असायचा ते आठवले. म्हणजे आपण सगेळेच जबादार आहोत असा अर्थ त्यात ध्वनित असायचा.
गावात सामाजिक न्यायासाठी ज्यावेळी मुद्दा चव्हाट्यावर् मांडला जायचा त्यावेळी दोषी हा दोष मान्य करताना म्हणायचा "त्या अमक्यान सांगितल म्हनुन् म्या क्याल" त्यावर सुजाण जुने लोक त्याला म्हणायचे " त्यो मस सांगन काही बी तुला अक्कल नाई का? त्याने सांगितल कि कोरड्या हिरीत उडी मार मंग तु मारनार का? काई बी सांगतोय!"
समजा नानावटींनी उधृत केलेल्या केस मधे तो निकाल हाय कोर्टाचा आहे. त्यानंतर् सुप्रिम कोर्टाचा निकाल लागुन तो निर्दोष झाला तर् काय म्हणणार? काहि केसेस नक्की अशा असतात कि हाय कोर्टाने दोषी ठरवलेल्या व्यक्ति सुप्रिम कोर्टात निर्दोष ठरतात.
तर्कक्रिडा म्हणुन असलेल्या गोष्टी व्यवहारातील सामाजिक न्यायावर तोलणे अवघड असते. म्हणजे एखादी गोष्ट कायदेशीर आहे म्हणुन ती न्याय्य आहे असे मान्य केल्यासारखे असते. सामाजिक न्याय ही गोष्ट फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर