स्वप्न की वास्तव......

फोर्थ डायमेन्शन 46
स्वप्न की वास्तव......

स्वातीला कुठले तरी भयानक स्वप्न पडले असावे. लांडग्याच्या चेहऱ्याचा एक विचित्र प्राणी खिडकीतून उडी मारून तिच्या बिछान्यात शिरला. तिच्या अंगावरची चादर फेकून दिली. नखाने तिचा चेहरा ओरबाडू लागला. तिच्या नरडीलाच हात घातला. ... तितक्यात तिला थोडीशी जाग आली. नीटपणे श्वास घेणेसुद्धा तिला जमेनासे झाले. तिने खोलीभर नजर फिरवली. तिला विशेष काही दिसले नाही. जे घडले ते एक दु:स्वप्न होते म्हणत तिने सुस्कारा सोडला. तितक्यात तो विचित्र प्राणी पुन्हा एकदा तिच्यावर झडप घालू लागला. तिला जोरजोराने किंचाळावेसे वाटू लागले. ती धडपडू लागली. स्वत:वर कोसळलेल्या या प्रसंगातून बाहेर पडता येत नसल्याबद्दल ती रडकुंडीला आली. काय करावे हेच तिला कळेनासे झाले....
तिने डोळे किलकिले केले. तिच्या श्वासाची गती हळूहळू वाढू लागली. धैर्य एकवटून चहूकडे नजर फिरवली. भोवती भयानक असे काहीही नव्हते. मुळात तिला स्वप्नातच अजून एक स्वप्न पडले होते. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा जाग आली असे वाटत होते तेच मुळी स्वप्न होते. पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी डोळे वटारून खोली न्याहाळली. सर्व वस्तू जागच्या जागीच होत्या. खिडकी बंद होती. कुठलाही प्राणी दिसत नव्हता. तिला हायसे वाटले.
परंतु या क्षणीतरी ती स्वप्नावस्थेत नाही याची तिला खात्री कोण देईल? हेसुद्धा स्वप्न नसेल हे कशावरून?...... या विचाराने तिचा थरकाप उडाला. काही सुचेनासे झाले.......

Source: Meditation by Rene Descartes (1641)
Film: An American Werewolf, Dir: John Landis

स्वप्नामध्ये अजून एखादे स्वप्न पडणे हे सामान्यपणे अनेकांच्या अनुभवातली घटना आहे. आपण स्वप्नातून जागे होऊन शेजारच्या घरातील एखाद्या समारंभात वा कार्यक्रमात (वा पार्टीत!) सामील झालो आहोत, हा एक नेहमी पडणारा स्वप्नानुभव असतो. जर स्वप्नामधून जागे झालो आहोत असे स्वप्नात असताना वाटत असल्यास आपण खरोखर कधी जागे होतो? आता तरी आपण खरोखरोखरच जागे झालेलो आहोत का?
काहींना हा प्रश्न अतिशय बालिश, बाष्कळ वा खुळचट वाटेल. हाताला चिमटा घेऊन पहा....ओरडतो की नाही.... पण हे स्वप्नातही होऊ शकेल. स्वप्नं नेहमीच तुकड्या तुकड्याने दिसत असतात. मी जागा आहे याचे प्रत्यय मला क्षणोक्षणी येत असते. आता माझ्यासमोर माझ्या नरडीला हात घालणारा प्राणी नाही. किंवा मी एखाद्या पार्टीत खात पीत मौजमजा करत नाही. माझ्या भोवतीचे सर्व वस्तू जागच्या जागी आहेत.
परंतु आपल्या जागेपणाची खात्री देण्यास हे उत्तर पुरेशे ठरेल का? अनेक वेळा आपण कुठल्या तरी ओळखीच्या खेड्यात गेलो आहोत व आपल्याला त्या खेड्यातील ओळखीचे लोक भेटत आहेत अशी स्वप्नं पडत असतात. जरी हे स्वप्न असले तरी स्वप्नातल्या या प्रकारच्या घटनांना भूतकाळ नसतो. स्वप्नातला हा अनुभव प्रत्यक्षात घडल्यासारखाच हुबेहूब असतो. आपण तेथे प्रत्यक्ष होतो, भेटायला आलेली माणसं खरी होती, इतपत ते स्वप्न वास्तवाला भिडलेले असते. कुठल्यातरी अनोळखी, काल्पनिक जगाचा अनुभव त्यात नसतो.
आपल्यासमोर आता आपले जे अनुभव असतात ते खरोखरच वास्तवाशी निगडित आहेत की नाही याची खात्री कशी करून घेता येईल? हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ एखादे पुस्तक वाचत असताना काही पानं उलटून त्यातील एखाद्या हृद्य प्रसंगाचा अनुभव घेत असतो. आपण पुस्तक केव्हा हातात घेतले, किती पानं उलटली, पुस्तकातील कुठल्या प्रसंगाशी तल्लीन झालो होतो याची इत्थंभूत माहिती आपल्या मनात घोळत असते. परंतु स्वप्नातसुद्धा आपण एखादं पुस्तक वाचत असताना त्यातील एखाद्या प्रसंगाशी समरस झाल्याविषयीसुद्धा हाच तर्क मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुकड्या तुकड्याने अनुभवलेल्या स्वप्नातसुद्धा या गोष्टी घडत आहेत याचा आपल्याला भास होऊ शकतो.
कदाचित आपल्याला जाग आल्यानंतरच स्वप्नातला 'तो' अनुभव किती वास्तवस्पर्शी होता व भोवतालचे वास्तव किती स्वप्नवत आहे याची जाणीव होत असावी.

Comments

सत्य आणि कल्पना

आपल्य पंचेंद्रियांकडून जे संदेश आपल्या मेंदूकडे जाऊन पोचतात त्याचा सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न आपली बुद्धी करते आणि त्यातल्या गोष्टी वास्तव आहेत असे आपण पूर्वीच्या अनुभवाच्या आधारावरून ठरवतो. ते करतांनासुद्धा चुका होत असतात आणि नंतर त्या लक्षात येतात. त्यामुळे 'दिसते तसे नसते' याचा अनुभव आपल्याला कधी कधी येतो.

विचार आणि कल्पना यांच्या आधारानेही आपले मन घटनांची जुळवाजुळव करत असते. त्यांच्याच आधाराने कथा, नाटके, कादंबर्‍या रचल्या जातात. पण त्या घटनाक्रमाला सुसंगत असे संदेश त्या वेळी पंचेंद्रियांकडून आले नाहीत तर ते वास्तव नाही असा निष्कर्ष आपली बुध्दी काढते आणि त्याचे भान आपल्याला राहते. स्वप्न पहात असतांना बुध्दीला हा दुसरा चॅनल उपलब्धच नसतो त्यामुळे मनात जे येते तेच खरे वाटते. अगदी लहान मुले किंवा मानसिक रुग्ण यांना त्यांच्या मनात आलेले विचार हेच वास्तव आहे असे अनेक वेळा वाटते.

स्वप्न पडणे हा सुध्दा इतर अनुभवांसारखाच एक अनुभव असल्यामुळे आपल्याला स्वप्नात गाढ झोप लागू शकते. त्यात स्वप्न पडू शकते आणि आपण त्यातून जागे होऊ शकतो किंवा आपण अजून स्वप्नच पहात आहोत असे सुध्दा वाटू शकते. पण केंव्हा तरी झोप संपून आपण जागे होतोच. वास्तवाशी विसंगत असलेला हा अनुभव जाग आल्यानंतर आपली बुध्दी झिडकारून देते यामुळे बहुतेक स्वप्ने आपल्याला नीट आठवत नाहीत. कांही माणसे किंवा कांही स्वप्ने याला अपवाद असतात.

आवडले

विचार आणि कल्पना यांच्या आधारानेही आपले मन घटनांची जुळवाजुळव करत असते. त्यांच्याच आधाराने कथा, नाटके, कादंबर्‍या रचल्या जातात. पण त्या घटनाक्रमाला सुसंगत असे संदेश त्या वेळी पंचेंद्रियांकडून आले नाहीत तर ते वास्तव नाही असा निष्कर्ष आपली बुध्दी काढते आणि त्याचे भान आपल्याला राहते. स्वप्न पहात असतांना बुध्दीला हा दुसरा चॅनल उपलब्धच नसतो त्यामुळे मनात जे येते तेच खरे वाटते. अगदी लहान मुले किंवा मानसिक रुग्ण यांना त्यांच्या मनात आलेले विचार हेच वास्तव आहे असे अनेक वेळा वाटते.

स्पष्टीकरण आवडले!

लेख उत्तम आहे.

एक मुद्दा

लिहायचा राहिला. जो अनुभव आपण जागेपणी घेतो तो बराच काळ स्मरणात राहतो आणि पूर्वी घेतलेल्या व नंतर येत असलेल्या अनुभवाशी तो सुसंगत असतो. जागेपणी वाचलेल्या पुस्तकातला मजकूर थोडा तरी लक्षात राहील, स्वप्नात आपण अमूक एक पुस्तक वाचत होतो एवढेच नंतर आठवेल.

झोपेतला सराव

मध्ये एकदा "सायन्स नाऊ" (discovery or national geographic...) कार्यक्रमात उंदरांवरचा प्रयोग बघितला. त्यांना एका चक्रव्युहातून नेले, व त्यांच्या मेंदूचे कुठचे भाग उद्दीपित होतात ते पाहिले. ते झोपल्यानंतर मेंदूचे तेच भाग उद्दीपित झालेले दिसले. त्यांना स्वप्नातही तो चक्रव्यूह दिसत होता... तासन् तास tetris खेळल्यावर आपल्याला सुद्धा झोपायच्या वेळी ते तुकडे खाली पडताना दिसतात तसे (मला अनुभव आहे...)!

 
^ वर