जान है तो जहान है!

जान है तो जहान है!

भारतीय युवकावर मेलबर्न मध्ये ३ जानेवारी २०१० रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये नितिन गर्ग हा युवक ठार झाला. हा हल्ला वंशद्वेषी होता की नाही याची शहानिशा यथायोग्य होईलच.

पण असे हल्ले कुणावरही मेलबर्न मध्येच नाही तर जगात कुठेही, भारतात, मुंबईत, पुण्यात, बंगळुरु मध्येही होऊ शकतात, हे मात्र आपण ध्यानात ठेवले पाहिजे. आपली सुरक्षितता आपणच आधी पाहायची असते. यामुळे आपल्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी हे सांगण्याचा या निमित्ताने हा प्रयत्न. यातले सल्ले योग्य नसतील तर अवश्य सांगा. त्याबरोबर सुरक्षेचे तुम्हाला योग्य वाटलेले उपायही द्या.
--
सुरक्षा उपाय

  • - तुमचा आतला आवाज जर सुरेक्षेसाठी साद घालत असेल तर ऐका! सुरक्षेसाठी तुमच्या सिक्थ सेंस वर भरोसा ठेवा. तुमची असुरक्षित असल्याची भावना तुम्हाला संभाव्य धोक्यापासून वाचवत असते हे लक्षात घ्या!
  • - कायम सतर्क रहा आणि आत्मविश्वासाने चाला. गोंधळल्यासारखे फिरू नका. चुकले असलात तरी! तुमची आत्मविश्वासू चाल हल्लेखोराचा आत्मविश्वास डळमळवते.
  • - शक्य असेल तर पर्सनल अलार्म बरोबर बाळगा. त्याच्या आवाजाने त्वरीत मदत मिळू शकते आणि हल्लेखोर घाबरू शकतो.
  • - संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर पार्क सारख्या अंधार्‍या आणि निर्जन जागा टाळा, शक्य असेल तर सोबतीला कुणी येते आहे का ते पाहा. कुणी बरोबर नसल्यास दुरचा असला तरी सुरक्षित मार्गच वापरा.
  • - किमती वस्तू दागिने अंगावर बाळगणे टाळा पण काही पैसे मात्र नक्की बरोबर ठेवा. (काही वेळा लुटारू काहीच मौलवान मिळाले नाही म्हणूनही मारहाण करू शकतात.)
  • - अनोळखी लोकांशी बोलणे टाळा. प्रसंगी तसे वागणे उद्धट वाटले तरी 'सुरक्षा प्रथम' हे ध्यानात घ्या.
  • - कुणी तुमचा पाठलाग करते आहे असे वाटले तर त्वरील गर्दी / लोक आहेत अशा ठिकाणी जा, पोलिसांशी संपर्क साधा, मदत मागा.
  • - अनोळखी ठिकाणी मद्यपान व पेयपान करू नका. अनोळखी लोकांकडून खाद्य-पेय स्विकारू नका.
  • - शक्य असेल तर ज्युडो कराटे शिकवणारा स्व-संरक्षणाचा एखादा कोर्स करा.

सार्वजनिक रेल्वे बस इत्यादी वापरतांना

  • -एकटे असाल तर शक्य तोवर वाहनाची वाट पाहणे टाळा आपल्या वेळापत्रकाची माहिती करून घ्या आणि वेळेवरच पोहोचा.
  • - रेल्वेचे तिकिट घेतांना स्टेशनवरील व्यक्तींचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करा.
  • - सुरक्षित वाटत नसेल तर गाडी येई पर्यंत स्टेशनवर जाणे टाळा.
  • - जवळपास क्लोज सर्किट कॅमेरे असतील त्याच्या रेंज मध्येच रहा.
  • - कुणी तुम्हाला त्रास देत असेल असेल तर त्या व्यक्तीला तसे न करण्या विषयी ओरडून सांगा. त्यामुळे इतरांचे लक्ष तेथे वेधले जाईल. आणि ती व्यक्ती बचावात्मक धोरण स्विकारेल. शक्य असेल तर सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांना बोलवा.
  • - बस स्टॉपवर असाल तर पुर्ण उजेड असलेल्या ठिकाणी थांबा. शक्य असेल तर इतर लोकांसोबत राहा.
  • - शक्य तोवर रेल्वेचे पुर्ण रिकामे डबे टाळा. शक्य असेल तेंव्हा ड्रायवरचा मागचा डबा वापरा.
  • - एकटेच टॅक्सीने जाणार असाल तर हात दाखवून टॅक्सी बोलावण्या पेक्षा फोन करून टॅक्सी बोलवा. या मुळे तुम्ही टॅक्सी बोलावल्याची नोंद झालेली असते.
  • - टॅक्सीच्या नंबरची नेहमीच नोंद ठेवा. ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला (क्लीनर साईडला) बसा. बोलतांना अनोळखी ठिकाणी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नका.

कार ने जातांना

  • - आपली कार परत आल्यावरही भरपूर प्रकाश असलेल्या सुरक्षित अशा ठिकाणीच पार्क करा.
  • - कार लॉक केली आहे हे पाहून घ्या. कारच्या किल्ल्या सुरक्षित ठेवा.
  • - आपल्या कारच्या आसपास संशयास्पद व्यक्ती दिसत असल्यास कार पासून दूरच राहा, शक्य असल्यास इतरत्र मदत मागा.
  • - अनोळखी ठिकाणी कार पार्क केली असेल तर कार मध्ये शिरण्या पुर्वी मागच्या सीटवर आणि सीटच्या खाली कुणी नाहीये, हे पाहून मगच कारचे दार उघडा.
  • - एकदा कार मध्ये बसल्यावर सर्व दारे आतून लॉक करून घ्या आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचे पर्यंत काचा वरच/बंद ठेवा.

फोन

  • - सार्वजनिक फोनला आवश्यक असलेली चिल्लर कायम स्वतः बरोबर ठेवा. मोबाईल फोन हरवल्यास/चोरीला गेल्यास अथवा सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला मित्रांना, नातेवाईकांना किंवा पोलिसांना फोन करता येईल.
  • - पब्लिक बुथ मधून फोन करत असलात तर डायल केल्या नंतर फोन कडे पाठ करून उभे राहा म्हणजे बाहेर काय चालले आहे हे तुम्हाला सतत दिसत राहील.
  • - कुणी तुम्हाला धमकी देत तर असेल वाट पाहू नका, त्वरित पोलिसांना फोन करा.
  • - आपत्काळात मदतीसाठी फोन केल्यावर प्रथम नाव सांगा व परिसराचे नाव माहिती नसल्यास दिसणार्‍या प्रमुख खाणा-खुणा सांगा.

या झाल्या प्राथमिक सुरक्षेच्या गोष्टी.
आता वैयक्तिक सुरक्षा विस्ताराने पाहु या.
आपल्या सुरक्षेचा विचार करून ठेवणे हिताचे असते.त्यासाठी एक योजना बनवलेली हवी.

  • सुरक्षा योजने विषयी नातेवाईकांशी, मित्रांशी बोला
  • त्यात काही तृटी आहेत का ते वारंवार तपासून पाहा.
  • इतर लोक आपली सुरक्षा कशी सांभाळतात याचाही आढावा घ्या.
  • त्यांच्या योजनेतले तुम्हाला उपयोगी पडणारे भाग तुमच्या योजनेत घेवून टाका!

मात्र लक्षात ठेवा तुम्हाला जी योजना सर्वात सुरक्षित वाटते, तीच तुम्हाला योग्य आहे.

  • - 'असा हल्ला माझ्या कधी होणारच नाही' असा विचार करू नका. परिस्थिती सांगुन येत नसते!
  • - तुमची सुरक्षा धोक्यात असेल तर मदत मागायला मागे-पुढे पाहू नका.
  • - आपत्काळात कुणाशी संपर्क साधणार आहात याची यादी ठेवा. शक्य तो फोन नंबर्स पाठ करा. शक्य नसेल तर लिखित स्वरूपात जवळ ठेवा. मोबाईलवर विसंबू नका!

आपल्या सुरक्षा योजनेचे भाग तपासून घ्या

  • - मी जेथे जाणार आहे तेथला सर्वात सुरक्षित कार पार्क कुठे आहे?
  • - सगळ्यात जवळचा बस स्टॉप/ रेल्वे स्टेशन कुठे आहे?
  • - मी नेहमी जात येत असलेल्या इमारतींची सुरक्षा दारे कुठे आहेत ते पाहून ठेवा.
  • - येण्या जाण्याचे सर्वात सुरक्षित मार्ग पाहून ठेवा आणि नेहमी तपासत राहा.
  • - येण्याजाण्याच्या मार्गावर प्रकाश आहे का ते पाहून घ्या.
  • - माझ्या रोजच्या मार्गावर कुणी चढून बसण्या जोगी झाडे आहेत का? अथवा अशी ठिकाणे आहेत का याचा विचार करा. असल्यास तेथून सुरक्षित अंतर किती याचा विचार आधीच करून ठेवा.
  • - सर्वात जवळचा सार्वजनिक फोन कुठे आहे ते पाहून ठेवा.
  • - वेळ प्रसंगी कुणाला सोबत घेवून जाऊ शकतो याचा विचार करून ठेवा. इतरांना सोबत म्हणून जात जा. (म्हणजे इतरही तुमच्या सोबत येतील!)
  • - तुम्ही असलेल्या ठिकाणाहून सुरक्षितरित्या पळून जाण्याचा माग कोणता आहे हे पाहून ठेवा!
  • - पळून जाऊन सुरक्षा घेण्यासाठी कुठे जाणार आहात याचा विचार करून ठेवा. तशाच मार्गाचा विचार करून ठेवा.

तुम्ही सर्वसाधारण कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त थांबून काम करणार असाल तर

  • - तुमच्या सोबत कुणी असेल असे पाहा, नसल्यास तुम्ही तेथे आहात याची कल्पना अजून कुणाला तरी देवून ठेवा.
  • - चपळाईने निसटण्यासाठी दारांच्या आणि कारच्या किल्ल्या हाताशी ठेवा.

स्व संरक्षण
स्व संरक्षणाची अशी कोणतीही एकच पद्धत अस्तित्त्वात नाही. निरनिराळ्या परिस्थितीत वेगवेगळे उपाय कामी येतात.
प्रतिहल्ला - तुमच्यावर हल्ला झाला प्रतिहल्ल्याने हल्लेखोर गोंधळतो, घाबरतो आणि तुम्हाला पळायला आवश्यक असलेला क्षण मिळतो.
प्रतिहल्ला हा अनेक प्रकारे करता येतो.

  • - जोरात ओरडा
  • - कानात किंचाळा
  • - नाक, गळा डोळे आणि जननेंद्रिये अशा नाजूक ठिकाणी फटका द्या
  • - पायावर लाथ मारा
  • - बरगडीत कोपर खुपसा
  • - तुमच्याकडे असलेली छत्री, पर्स, किल्ल्या, अगदी ओढणीही हल्ले खोराचे डोळे क्षणिक झाकण्यासाठी शस्त्रासारखी वापरता येते हे लक्षात ठेवा. ते वापरून स्वतःला सुरक्षित करा.

शांततेत सुरक्षा
शांततेत सुरक्षा म्हणजे प्रतिहल्ला शक्य नसेल तर काय करावे याची तयारी/चाचपणी.

  • - मनाशी खंबिरपणे शांत रहा
  • - हल्लेखोरासोबत आत्मविश्वासाने पण नम्रतेने बोला, त्याला हल्ला करण्यापासून परावृत्त करा, त्याचे लक्ष इतरत्र वेधा आणि त्या क्षणी आपली सुरक्षितता शोधा.
  • - सर्व बारिक सारीक गोष्टी नजरेने टिपून ठेवा. त्याचा कसा वापर करता येईल याचा विचार करा.

खरे तर सुरक्षेसाठी कोणतीही अशी एकच व्यवस्था आणि योजना शक्य नाही. परिस्थिती आणि व्यक्तीनुसार वागा.
आशा आहे की याचा उपयोग होईल.
तुम्हाला अजून काही उपाय माहिती असतील तर मलाही द्या.

- निनाद

Comments

महत्वाचा मुद्दा

हा हल्ला वंशद्वेषी होता की नाही याची शहानिशा यथायोग्य होईलच.

हेच कळणे महत्वाचे आहे. भारतीय लोकांवर ऑस्ट्रेलियात का हल्ले होतात? एवढा रोष का? दै.सकाळ मधे यावर एक लेख गेल्या वर्षात वाचल्याचे स्मरते. लेख उत्तम होता. निनाद ने दिलेले उपाय हे प्राथमिक काळजी म्हणुन घेतले तरी सुरक्षितते भर पडेल. काही बेफिकिर लोक सुरक्षिततेसाठी काळजी घेणे याला भित्रटपणा म्हणतात.
खर तर सुरक्षितता ही मानसिक अवस्था आहे. असंतोषासमोर जगातील सगळी सुरक्षाव्यवस्था फिकि पडते.
भारतीयांमुळे स्थानिक लोकांच्या रोजगारावर गदा आली हे कारण काही लोकांचे डोके फिरण्यास पुरेसे असते.भारतीयांनी ऑस्ट्रेलियात रहाताना स्थानिकांचा मान राखुन नम्रपणे व खेळीमेळीने वागल्यास भारतीयांविषयी रोष कमी होईल.

प्रकाश घाटपांडे

गल्ली पासून दिल्ली

भारतीयांनी ऑस्ट्रेलियात रहाताना स्थानिकांचा मान राखुन नम्रपणे व खेळीमेळीने वागल्यास भारतीयांविषयी रोष कमी होईल.

हेच वाक्य आपण मानसिकता या एकाच परिमाणावर घेतल्यास भारतात सुद्धा गल्ली पासून दिल्ली पर्यंत लागू पडते. नाही का? नाहीतर मग शरद पवारांना ऑस्ट्रेलियामध्ये पाठवून समजवायला सांगू. (शरद पवारांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीच धक्का दिला होता.)






गुन्हेगारी

मला वाटते त्या प्रमाणे फक्त भारतीयांवरच हल्ले होत नसून सर्वांवरच होत आहेत. कोणत्याही मोठ्या शहरात प्रमाणे येथेही गुन्हेगारी वाढते आहे, हे एक कारण नक्कीच आहे.

शिवाय भारतीय वंशाचे लोक येथे वेगाने वाढत आहेत हे ही एक कारण असावे. मात्र रोजगारवर त्याचा परिणाम होतो आहे की नाही हे मात्र माहिती नाही. कारण हल्ले करणारे बहुदा जुने गुन्हेगार आहेत, असेच बातम्यांमधून दिसून आले आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधीही तशा बर्‍या आहेत.

पुर्वी येथे पोलिसांना स्ट्रिप सर्च चे अधिकारच नव्हते, त्यामुळे शस्त्र सहजतेने नेता येत होती - ते अधिकार आता मिळाले आहेत. आशा आहे की त्यामुळे काही फरक पडेल.

-निनाद

हल्ले

मला वाटते त्या प्रमाणे फक्त भारतीयांवरच हल्ले होत नसून सर्वांवरच होत आहेत.

आजच रेडियोवरती इंडीयन स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष गौतम गुप्ता ह्यांची मुलाखत ऐकली. त्यामध्ये त्यांनी भारतीयांवर होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण हे इतर गुन्हेगारीपेक्षा बरेच जास्त आहे असे सांगितले. मोठ्या शहरांमधे गुन्हेगारी जास्त प्रमाणात असते हे मान्यच आहे पण ह्या आकडेवारीमुळे भारतीय नागरिकांची जोखिम थोडी जास्त आहे असे दिसते. निनाद ह्यांच्या सूचना थोड्या कठोर असल्या तरी 'जान है तो जहान है' हेही लक्षात घ्यावे. परिस्थिती निवळे पर्यंत शक्य तेवढे सावध राहावे हे उत्तम.

तुमचे ऐकुन

तुमचे सगळ्यांचे अभिप्राय वाचून आता मला खरोखरच काळजी वाटायला लागली आहे...
(इतके दिवस तसे वाटत नव्हते...)

-निनाद

शेजार्‍यांशी संबंध

सुरक्षिततचे उपाय चांगले आणि उपयुक्त आहेत. निनाद, तुम्ही आणि आप्तजन सांभाळून आणि सुखरुप रहा. अनेकदा ऑस्ट्रेलियातील भारतीयांविषयी हल्ले वाचले की नेटावरील आपल्यासारख्या आप्तजनांची हटकून आठवण होते.

आणखी एक उपाय म्हणजे, आपल्या शेजार्‍यांच्या संपर्कात रहा. परदेशांत शेजार्‍यांशी संबंध असतातच असे नाही परंतु मदतीची गरज असल्यास सर्वप्रथम त्यांचीच मदत होण्याची शक्यता मोठी असते.

असो.

स्थानिक पोलिसयंत्रणा, सामाजिक संस्था, मनुष्यकल्याण संस्था वगैरेंचे पाठबळ मिळवणे येथे शक्य आहे का? किंवा तसे उपाय योजले आहेत का अलरेडी?

शहराचा भाग

मी माझ्या काही सहकार्‍यांशी बोललो.
त्यातले दोघे त्या भागात म्हणजे त्या पार्क पासून २ रस्ते पलिकडे राहतात.
त्या दोघांनेही सांगितले की ते त्या पार्क मध्ये रात्री आणि एकटे कधीच गेले नसते. (दोघे ही स्थानिक ओस्ट्रेलियन आहेत). फुटस्क्रे, वेस्ट फुटस्क्रे आणि सेंट अल्बान्स वगैरे विभाग ड्रग्ज आणि गुन्हेगारी साठी ओळखला जातो. त्यामुळे येथे जागेचे भाव स्वस्त आहेत. नवीन आलेले लोक स्वस्त जागा मिळते आहे म्हणून अनेकदा (माहिती नसल्याने) राहण्यास जातात. त्यात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय 'मला कोण काय करणार?' असाही एक विचार असायचा असे त्यांच्याशी बोलल्यावर आढळायचे.

त्या विभागात राहणार्‍या माझ्या स्थानिक सहकार्‍यांपकी एकीने आत्ताच सांगितलेला अनुभव.
तीची १७ वर्षाची बहिण २ रस्ते पलिकडे असलेल्या मैत्रिणी कडे गेली होती. येतांना परतायला ११ वाजले. पण घर तर जवळच आहे आणि आपले आयुष्य येथेच तर गेले असा काहीसा विचार करून ती घराकडे निघाली. पण रस्त्यात पोरांनी भरलेली एक कार तीचा पाठलाग करू लागली. म्हणून ती एका ड्राइव्ह वे च्या आडोशा ला गेली. तर ती कारही थांबली. मग मात्र तीने मदतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आणि ती त्या घरात गेली व परिस्थिती कथन करून फोन मागितला. (जवळच जायचे म्हणून फोनही बरोबर घेतला नव्हता!). मग माझी सहकारी तीला गाडी घेऊन घ्यायला गेली. मग मात्र ती पाठलाग करणारी कार गायब झाली!

तर सांगण्याचा उद्देश असा की या गुन्हेगारीत स्थानिकही भरडले जात आहेत.

मदतः
भारतीय संस्था पुढे होऊन त्यांचे स्वयंसेवक आता सनशाईन स्टेशन वर पहारा ठेवतात. एकटा दुकटा जात असेल तर त्याला घरा पर्यंत सोबत करतात. पण हे काही काळ असते. प्रसिद्धी ओसरली की मदतही ओसरते. आणि मग परत एखादे प्रकरण घडते.

मी शहराच्या पूर्व विभागात राहतो तेथे असे अजून तरी काही कधी घडलेले नाही. शिवाय तेथे गुन्हेगारीही अगदीच कमी म्हणजे नगण्य आहे. (तेथले पोलिस डोन्कास्टर पोलिस स्टेशन म्हनजे 'रिटायरमेंट' समजतात. आणि सन शाईन पोलिस स्टेशन म्हणजे डबल ड्युटी!)

घरांवर वगैरे हल्ले होत नाहीत. एकट्या दुकट्यावर होतात - झाले आहेत.
सबब काळजी नसावी!

शिवाय सर्वसाधारण ऑस्ट्रेलियन्स हे चांगले आणि मदतीला तत्पर असे लोक आहेत याची मात्र खात्री बाळगा!

-निनाद

काळजी घ्या..

आपण सुचविलेले उपाय योग्य आहेत. पण दै.सकाळच्या बातमीवरुन ज्या नितीन गर्ग वर हल्ला झाला त्यात नितीनने मदतीसाठी आरडाओरडा केला. पण त्याच्या मदतीला कोणी आले नाही. जखमी अवस्थेत तसाच तो हॉटेलपर्यंत आला. पुढे त्याला रुग्णालयात दाखलही केल्या गेले पण त्याचे दैव बलवत्तर नव्हते.

भारतियांच्या सुरक्षिततेसाठी तिथे काय उपाययोजना केल्या जात आहे ? भारतीयांवर होणार्‍या अशा हल्ल्यांच्या बाबतीत भारताने निषेध व्यक्त केला. भारत-ऑष्ट्रेलिया संबंधावर परिणाम होण्याचा इशारा भारत सरकारने दिला. पण अशा दबावाचा तेथील सरकारावर किती परिणाम होतो त्यावर सुरक्षीततेचे उपाय अवलंबून आहेत असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदत

गर्गने त्या पार्क मध्ये कितीही ओरडा आरडा केला असता तरी त्याला मदत मिळाली नसती कारण ते एक निर्जन ठिकाण आहे. कशी मदत मिळेल?

मात्र हंग्री जॅक्स मध्ये गेल्यावर त्याला त्वरित मदत मिळाली. पण तोवर उशीर झाला होता.
हल्लेखोराला त्याचा खुनच करायचा होता अशा पद्धतीने त्याने चाकू खुपसला आणि पोट ते र्‍हुदय असा खोलवर वार केला, असे आजच्या द एज या पेपर मधे वाचले.
पोलिस हल्लेखोराचा कसून तपास करत आहेत असे दिसते आहे.

भारतीयांच्याच नाही पण वंशविद्वेषी वागणूक दिली तर त्यासाठी कायद्याने शिक्षेची तरतूद आहे. त्यात सुधारणा करून आता वंशविद्वेषी हल्ला केला वेगळी शिक्षा देण्याची तरतूद केली आहे.
शिवाय येथे खटले झटपट निकाली निघून मागे हल्ले करणार्‍यांना त्वरित मागच्या नोव्हेंबर- डिसेंबर मध्येच शिक्षाही झाल्या आहेत!

-निनाद

काळजी घ्या

तुम्ही सांगितलेले सुरक्षेचे उपाय योग्यच वाटतात.

पण रोजव्यवहारात इतके अतिदक्ष राहाणे म्हणजे फार जाचक वाटते, ऑस्ट्रेलियामधील भारतीयांबद्दल अधिकच काळजी वाटते.

खरे आहे

उपाय मलाही आता जाचक दिसत आहेत.
मी बहुदा जरा जास्तच उपाय लिहिले असावेत.

त्याच रात्री अजून दोन लोकांवरही सुरामारी झाली आहे. त्यातला एक अजूनही अत्यवस्थ आहे. तो तर बिचारा त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करून त्याच्या कारकडे परत येत होता. तर त्याच्यावर हा हल्ला झाला. परंतु तो स्थानिक असल्याने त्याची बातमी मोठी झाली नाही.
तसेच एका आफ्रिकन वंशाच्या माणसालाही मारहाण झाली होती पण त्याचीही बातमी मोठी झाली नाही.

भारतीय सरकार अशी प्रकरणे लाउन धरते आहे हे चांगले आहे. यामुळे येथिल सरकारवर चांगला दबाव आहे.

-निनाद

ठीक आहे रे

सगळेच उपाय लक्षात नाही रहात किमान् ५०% राहीले तरी फायदा आहे.

चांगला लेख निनाद.

व्यवहार्य सूचना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. निनाद यांनी सुचवलेले सर्व उपाय उपयुक्त आणि व्यावहारिक आहेत. या लेखाच्या प्रती काढून त्या आपल्या मित्र मैत्रिणींना आणि आप्तेष्टांना वाटाव्या इतके त्याचे महत्त्व आहे. हे उपाय केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे तर सर्व ठिकाणी सर्व काळी उपयोगी पडणारे आहेत. सध्या जगभर अशी परिस्थिती दिसते की समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अखंड सावधान असावे हे बरे.इतक्या उत्तमरीतीने आणि अंतःकरणपूर्वक कळकळीने हे उपाय इथे मांडले याबद्दल श्री. निनाद यांस धन्यवाद!

सकाळ मधे

श्री निनाद यांचा लेख दै सकाळच्या पैलतीर सदरामधे प्रकाशित झाला आहे.

अरे वा!

अरे वा!
अभिनंदन

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अरे वा !

अभिनंदन...!

-दिलीप बिरुटे

उपाय

चांगलेच आहेत, जरा अवघड आहे, लक्षात ठेवायला आणि नेहमी वापरास. (खरे तर मेल गिबसनच्या एका चित्रपटाची आठवण झाली! पण हे गंमत म्हणून घेऊ नये, स्वत:वर प्रसंग ओढवला की अशा गोष्टींचे महत्त्व समजते असा अनुभव आहे - नशिबाने एवढ्या वाईट परिस्थितीत नाही, पण गाडी मध्येच बंद पडण्याचा प्रसंग भारतातच असताना पूर्वी सेल फोन नव्हते तेव्हा आला होता). माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीवर असा प्रसंग फ्रान्समध्ये गेली असताना तरूणपणी आला होता. तिला पाठीवर वार करून मारण्याचा (हा वांशिक हल्ला नव्हता, उगाचच केलेला हल्ला होता) प्रयत्न झाला. त्यातून ती बाहेर आली, आता अगदी नॉर्मल आहे, पण याबद्दल बोलायला तिला अनेक वर्षे लागली असे ती सांगते.

निदान कोणाशी तरी पटकन संपर्क व्हावा यासाठी फोन घेऊन जाणे हे तरी हल्ली सोपे झाले आहे, पण ते कधीकधी विसरले जाते, फोन कधी कधी चार्ज्ड नसतो. शक्यतो तसा तो असलेला बरा. कधी कामास येईल ते सांगता येत नाही. घरी/बाहेर एकटे राहण्याचा प्रसंग आल्यास घराची आणि गाडीची किल्ली/फोन/पैसे किंवा पाकिट हे शक्यतो कुठेही जाताना विसरू नये.

अजून उपाय

तुम्ही वर सांगितलेले उपाय सर्वच योग्य आहेत मात्र धनंजयनी म्हणल्याप्रमाणे रोजच्या व्यवहारात जाचक ठरू शकतात. शिवाय सर्वसामान्य माणसास सावध रहा सांगताना "सावधपणाचे" संशयात रुपांतर होऊन भयग्रस्त (paranoid) कधी होऊ शकेल हे सांगता येत नाही. ९/११ नंतर आणि त्याहीपेक्षा सामान्यांना भयग्रस्त केलेल्या नंतरच्या अँथ्रॅक्स या पोस्टातून आलेल्या पांढर्‍या पावडरीमुळे येथे नंतर सावध रहायला सांगितले पण त्याचा अतिरेक झाला, हे या संदर्भात आठवले.

शिवाय जर इतके सतत सतर्क बनूनच रहायचे असेल तर (अमिताभच्या मि. नटवरलाल मधील) "ये जीना भी कोई जीना है लल्लू" सारखेच होईल. याचा अर्थ मी "टेक इट इझी" घ्यावे म्हणतोय असा कृपया करून घेऊ नका. मला थोडे वेगळे म्हणायचे आहे...

गुगलवर "australia racial attacks" असा शोध घेतला तर भारतीयांवरचेच उल्लेख देशी-विदेशी संकेतस्थळावरील येत आहेत. याचा अर्थ इतरांवर जरी हल्ले वर निनादनी सांगितल्याप्रमाणे झाले असले तरी भारतीयांवरील हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे असाच प्राथमिक अंदाज काढता येईल. कधीकाळी न्यू यॉर्कमधे गुन्हेगारी खूप होती, बॉस्टन, एल ए, शिकागो आदी शहरांमधे काही भाग होते, जिथे गुन्हेगारी खूप होती. मात्र तेथे बर्‍याचदा कोणाबरोबरही गुन्हा घडलेला दिसायचा.... त्यावर स्थानिक स्वराज्य संस्था (ज्यांना खूप अधिकार या देशात आहेत, स्थानिक पोलीस त्यांचेच कर्मचारी असतात इथपासून) आणि त्यांचे नेतृत्व (महापौर) हे दबावाखाली आले अथवा त्यांना त्या भागातीलच असल्याने बदलावेसे मनापासून वाटले (उ.दा. न्यूयॉर्क माजी महापौर रूडी जिलीयानी). आणि गोष्टी बदलल्या...

पण गेल्या २-४ वर्षात विशेष करून काही दुर्दैवी घटना घडल्या ज्यात भारतीय विद्यार्थ्यांना मारले गेले आहे. अर्थात ते या शहरांमधे न घडता इतरत्र झाले आहे. ९/११ नंतर तसेच अधूनमधून अजूनही कधीतरी कुठेतरी शिखांवर हल्ले झाले आहेत, पण त्यावेळेस कोणी गप्प बसले नाही. एक महत्वाची गोष्ट सातत्याने घडली ती म्हणजे स्थानीक तसेच काही अंशी अमेरिकेतील इतरत्र असलेल्या भारतीय संस्थांनी त्यावर निषेध व्यक्त करणारी वक्तव्ये घोषीत केली. स्थानीक राजकारण्यांना जाऊन भेटणे, तक्रारी करणे, प्रसिद्धी माध्यमांमधे पत्रे छापणे, स्थानीक लोकांचे आपल्याबरोबर आणि आपले त्यांच्याबरोबर संबंध प्रस्थापित करणे वगैरे गोष्टींना पण खूप महत्व आहे.

आज ज्या न्यूजर्सीत डॉट बस्टर्स (कुंकू लावलेल्या बाईस मारणे/दुखापत करणे)सारखे प्रकार घडले तेथे भारतीय वंशाचे मतदार, करदाता आणि त्यांच्या राजकीय (आर्थिक) पाठींबा शिवाय गाडी पुढे जाणे अवघड होईल. बाकी दुकाने आणि उपहारगॄहेतर विचारूच नका किती आहेत ती...

स्वतःची काळजी घेणे, भारतीय वकीलातीने/सरकाराने निषेध व्यक्त करणे आणि ऑस्ट्रेलीयातील भारतीयांनी आवाज समाज (कम्यूनिटी) म्हणून उठवणे यात फरक आहे. त्यातील स्वतःची काळजी घेताना आपण संकट टाळत नसतो तर तसे ते आले तर काय करायचे याच्या तयारीत असतो (जे नक्कीच महत्वाचे आहे पण या संदर्भात परीपूर्ण उत्तर नाही) आणि कुवतीप्रमाणे वाचू शकतो. भारतसरकारने निषेध केला तर एखाद्या वेळेस (या वेळेप्रमाणे) दिवाळी वगैरे ऑस्ट्रेलीयन सरकार साजरी करेल... मात्र जेंव्हा संपूर्ण (करदाता आणि मतदार) समाजच आवाज उठवतो आणि एकत्र आहे हे दाखवून वागू लागतो तेंव्हा असले हल्ले जर वर म्हणल्याप्रमाणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वांशिकतेमुळे होत असले तर ते बंद होण्यासाठी सरकार आणि कायदेव्यवस्थेस उद्युक्त करत असतो. तसे झाले तर तिथले सरकार खर्‍या अर्थाने बूड हलवेल, नुसतेच तोंडदेखल्या प्रयत्नांची पाने तोंडाला पुसणार नाही. कदाचीत तसे तेथील भारतीय संस्था करत असतीलही, पण ते सातत्याने करत रहाणे, ही सध्याच्या काळाची स्थानीक गरज आहे असे वाटते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सावधानता

काळजी घ्यावी. सावध राहणे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही सांगितलेले बहुतेक सर्व उपाय उपयोगी आहेत, प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे आहेत. हे सर्व इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

धनंजय आणि विकास यांनी मांडलेल्या मतांशीही सहमत आहे. यातून असुरक्षेची अनाठाई भावना वाढीस लागू नये. त्यातून मानसिक आजारही निर्माण होऊ शकतील. भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे म्हटलेच आहे. त्यावर तुम्ही सांगितलेला "कायम सतर्क रहा आणि आत्मविश्वासाने चाला. गोंधळल्यासारखे फिरू नका. चुकले असलात तरी! तुमची आत्मविश्वासू चाल हल्लेखोराचा आत्मविश्वास डळमळवते" हा उपाय बरा आहे!

अवांतर -
१.

तुमचा आतला आवाज जर सुरेक्षेसाठी साद घालत असेल तर ऐका! सुरक्षेसाठी तुमच्या सिक्थ सेंस वर भरोसा ठेवा. तुमची असुरक्षित असल्याची भावना तुम्हाला संभाव्य धोक्यापासून वाचवत असते हे लक्षात घ्या!

भयगंडग्रस्त माणसांचा 'आतला आवाज' नेहमी एकाच दिशेने जाईल, त्यामुळे या उपायाचा उपयोग कसा होईल ते कळले नाही. तसेच 'सिक्स्थ सेन्स' वर भरोसा कसा ठेवायचा हेही कळले नाही.

२. टाइम्स ऑफ इंडियावाले या गरम तव्यावर पोळ्या भाजून घेत आहेत आणि तवा गरमच कसा राहील यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत असे दिसते आहे :)

समांतर

अवांतर -
१.

तुमचा आतला आवाज जर सुरेक्षेसाठी साद घालत असेल तर ऐका! सुरक्षेसाठी तुमच्या सिक्थ सेंस वर भरोसा ठेवा. तुमची असुरक्षित असल्याची भावना तुम्हाला संभाव्य धोक्यापासून वाचवत असते हे लक्षात घ्या!

भयगंडग्रस्त माणसांचा 'आतला आवाज' नेहमी एकाच दिशेने जाईल, त्यामुळे या उपायाचा उपयोग कसा होईल ते कळले नाही. तसेच 'सिक्स्थ सेन्स' वर भरोसा कसा ठेवायचा हेही कळले नाही.

समांतर- बर्‍याच वेळा सिक्स्थ सेन्स हा शब्द प्रयोग मनाचा कल अशा अर्थाने वापरला जातो. परामानसशास्त्रातील अतिंद्रिय शक्ती अशा थेट अर्थाने वापरला जात नाही.जसे कि वाईट दिवस चालु आहे हे सांगताना सध्या मला साडेसाती चालु आहे असे तो म्हणतो. याचा अर्थ फलज्योतिषातील साडेसाती त्याला चालु आहे व/वा त्याला फलज्योतिषसाडेसाती संकल्पना मान्य आहे असे नव्हे.
प्रकाश घाटपांडे

उत्तम संकलन

काळजी घेणे योग्यच.. उपाय चांगले आहेतच
मात्र त्याच बरोबर तरीही एखादी घटना घडलीच तर कायदेशीर मार्गाने न कंटाळता-घाबरता गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे व पोलिसांना तपासात सहकार्य करणे हेही तितकेच गरजेचे व पुढील हल्ला टाळण्यासाठी महत्त्वाचे वाटते.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर