चौकोनी वर्तुळ!

फोर्थ डायमेन्शन 40

चौकोनी वर्तुळ!

एके दिवशी दस्तुरखुद्द प्रत्यक्ष परमेश्वरच एका वैज्ञानिकासमोर उभे राहून
"मी परमेश्वर, श्रृष्टीकर्ता आहे. या जगाचा कर्ता करविता आहे. मी या जगात काहिही करू शकतो. तुला पहायचे आहे का?"
असे म्हणाला. वैज्ञानिक प्रथम गोंधळला. असे कुणीतरी धुतकन समोर येऊन मी परमेश्वर आहे असे कधीच कुणी म्हटलेले त्याला आठवत नव्हते. कुणीतरी चक्रम असेल असे समजून,
"ठीक आहे. परमेश्वर तर परमेश्वर. तू खरोखरच सर्व शक्तीमान असल्यास या जगातील हिरव्या रंगाला तांबड्या रंगात व तांबड्या रंगाला हिरव्या रंगात बदलून दाखव. "
ईश्वराने हवेत हात फिरवत,
"रंगात बदल होऊ दे."
अशी आज्ञा दिली. आणि काय आश्चर्य, बघता बघता सगळीकडचे रंग बदलू लागले. झाडं तांबडी भडक झाली. टेकडी लाल दिसू लागली. पाकिस्तानचा नकाशा तांबडा झाला. भारताच्या नकाशातील हिरव्या रंगाची जागा तांबड्याने घेतली. मुळात तांबडे असलेले हिरवे दिसू लागले. वैज्ञानिकाला काही कळेनासे झाले. समोरच्यानी कदाचित मला संमोहनावस्थेत नेले असेल किंवा माझे डोळे बिघडले असतील वा mind conditioning मुळे तसे दिसत असावे असा विचार त्याच्या मनात आला. तरीसुद्धा तो हार मानायला तयार नव्हता. एका कागदावर चौकोन आकृती काढून
"यात चमत्कार वगैरे काही विशेष नाही. तू या चौकोनाचा वर्तुळ करून दाखव."
ईश्वराने आज्ञा दिली
"चौकोनाचा वर्तुळ होऊ दे."
वैज्ञानिक तक्रारीच्या सुरात
"हे चौकोनी वर्तुळ नाही. फक्त चौकोन आहे."
ईश्वर चिडून रागाने म्हणाला
"मी सांगतोय ना, मग ते वर्तुळच आहे. म्हणजे वर्तुळच असायला हवे. तुझी भुणभुण सोडून दे. नाहीतर तुला शिक्षा देईन "
तरीसुद्धा वैज्ञानिकाचा तक्रारीवजा सूर काही थांबला नाही.
"मी तुला शब्दच्छल करायला सांगत नाही. सुस्पष्ट दिसणाऱ्या चौकोनाला वर्तुळ म्हणावे हा आग्रह सर्व शक्तीमान परमेश्वराला शोभत नाही. तू खरोखरच चौकोनी वर्तुळ दाखव. तुला जमत नसल्यास तशी स्पष्ट कबूली दे."
परमेश्वर विचारात गर्क झाला. शेवटी वैज्ञानिकाला शिव्याशाप देत परमेश्वर अंतर्धान पावला.

----------- ------------ --------------

परमेश्वर सर्वशक्तीमान नाही वा नव्हता, त्याला सगळ्या गोष्टी जमतीलच याची खात्री देता येत नाही,हे ठसवण्यासाठी नास्तिक नेहमीच ही गोष्ट सांगत आले आहेत. ईश्वरी अधिष्ठान या जगात आहे अशी आग्रहाने मांडणी करणाऱ्या अठराव्या शतकातील थॉमस अक्विनास या धर्मशास्त्रज्ञाला सुद्धा ईश्वरीसत्तेविषयी शंका होती. परमेश्वर खरोखरच सर्वशक्तीमान असल्यास एवढी क्षुल्लक गोष्ट सुद्धा त्याला करता येत नाही, याचे त्याला आश्चर्य वाटले असेल.
अक्विनाससारख्या इतर ईश्वरभक्तांनासुद्धा ईश्वरीशक्तीविषयी हार मानण्याखेरीज दुसरा उपाय नाही. ईश्वराचे अस्तित्व तर्काला धरूनच आहे असेच अक्विनासला वाटत असे. याचा अर्थ, ईश्वराचे अस्तित्व तर्काने सिद्ध करता येते किंवा तर्कशुद्ध विचार करत आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वापर्यंत पोचता येते, असा होत नाही. फार फार तर ईश्वरावरील अढळ श्रद्धा व विवेक यांच्यात अंतर्गत विसंगती नसेल असे म्हणता येईल. म्हणजेच ईश्वरावरील श्रद्धा हे अविवेकीपणाचे लक्षण नाही हे मान्य करावे लागेल. कदाचित विवेकी जीवनात ही श्रद्धा उपयोगी पडत असावी. यावरून आपली ईश्वरावरील श्रद्धा अतार्किक नसावी, असा निष्कर्ष काढता येईल. याचाच अर्थ असा की तर्काने सिद्ध होत नसलेल्या गोष्टी आपण ईश्वराला चिकटू शकत नाही.
चौकोनी वर्तुळ हे तार्किकदृष्ट्या अशक्यातली गोष्ट आहे. वर्तुळ व चौकोन यांच्या व्याख्येतच वर्तुळ म्हणजे एकच बाजू असलेला आकार व चौकोन म्हणजे चार वाजूने बंदिस्त असलेला आकार असल्यामुळे चौकोनी वर्तुळ हे तार्किकदृष्ट्या विसंगत व तर्कदुष्ट अशी कल्पना आहे. व अशाप्रकारचा धेडगुजरी चौकोनी वर्तुळाचा आकार या मर्त्य जगातच नव्हे तर इतर कुठल्याही जगात शक्य नाही. जर ईश्वराच्या शक्तीमान क्षमतेचा निकष म्हणून अशा गोष्टींचा विचार करण्याचा आग्रह धरत असल्यास तर्कालाच तिलांजली द्यावे लागेल.
म्हणूनच सश्रद्धांचा ईश्वर तार्किकरित्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सर्व गोष्टी करून दाखवणारा असतो, याचा अर्थ ईश्वर कमकुवत नसून तार्किक विसंगती जेथे असेल तेथे ईश्वरी सत्ता चालत नाही असे म्हणता येईल. ईश्वरी अवतार आहोत असे स्वत:ला म्हणवून घेणारे सत्य साईबाबा, ईश्वरासारखे चमत्कार करून दाखवत असताना अंगठी, हार, रिस्ट वॉच, फुलं, भस्म अशा मुठीत मावणाऱ्या वस्तूच हवेतून काढून भक्तांच्या हाती देत असतात. परंतु त्यांना एखाद्या निष्णात जादूगाराप्रमाणे जिवंत ससा, भोपळा, फणस, फुटबॉल या वस्तू हवेत हात फिरवून काढून दाखवता येत नाहीत. यावरून सत्य साईबाबा ईश्वरासारखे चमत्कार तरी करत असावेत, वा ईश्वर चमत्कार करत नाही असे गृहित धरल्यास हातचलाखी वा लबाडी तरी करत असावेत.
हा दावा स्वीकारार्ह असल्यास ईश्वराची संकल्पना तार्किकरित्या सिद्ध करण्यासाठी दरवाजे खुले राहतील. ईश्वरावरील श्रद्धेस खरोखरच तर्काचा आधार असल्यास 'ईश्वरावरील श्रद्धा हे अविवेकीपणाचे लक्षण आहे' असे म्हणणाऱ्याच्या बाबतीत सश्रद्धांना पुनर्विचार करावा लागेल. परंतु श्रद्धाळूंचा हा ईश्वर खरोखरच कृपाळू, करुणाळू वगैरे असल्यास या जगात एवढे दु:ख का? या प्रश्नाचे तर्कसुसंगत उत्तर द्यावे लागेल. या जगाचा तो निर्माता असल्यास भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ अशा दुर्घटना या जगात का घडतात? लाखोंनी लोक का मरतात? माणूस प्राणी हा देवाचा अत्यंत लाडका असल्यास हिट्लर, स्टॅलिन, सद्दाम हुसेनसारख्या माणसांना त्यानी जन्म का दिला? जर अशा (अडचणीच्या!) प्रश्नांची नीट उत्तरं सापडत नसल्यास सश्रद्धांना तर्काचा आधार न घेता केवळ श्रद्धेवरच विसंबून रहावे लागेल. जे तर्काच्या आवाक्यात नाही त्याला ईश्वरी माया म्हणून आपल्या मनाचे समाधान करून घ्यावे लागेल.
परंतु अशा प्रकारे काही वेळा तर्कशुद्ध विचार करत जगणे व इतर वेळा तर्कविसंगत असंबद्धरित्या जीवन जगणे अशी सर्कस करत ऱाहणे कितपत जमू शकेल याचाही विचार करावा लागेल! कदाचित ही स्किझोफ्रेनिक अवस्था सश्रद्धांना आवडतही असेल!

लेखनविषय: दुवे:

Comments

वेगवेगळ्या प्रकारच्या तार्किक वस्तू

"झाड हिरव्याचे तांबडे होणे/करणे" आणि " वर्तुळाचा चौकोन होणे/करणे" या दोन इतक्या वेगळ्या संकल्पना आहेत की त्या दोघांचा "शक्ती असणे/करू शकणे"बद्दल निकष म्हणून वापर ठीक नाही. शाब्दिक गोंधळ आहे.

तत्त्वज्ञानातील हा गोंधळ प्राचीन आहे. "व्यक्तीचे अस्तित्व आणि जातीचे अस्तित्व यांत 'अस्तित्व'चा अर्थ एकच आहे का?" (इंग्रजीत - the problem of generals and particulars.) प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अजूनही कोणाला मिळाले नाही, पण हा प्रश्न शाब्दिक गोंधळातून बाहेर आलेला आहे, असे वाटते.

येथे वेगवेगळ्या प्रकारच्या तार्किक वस्तूंचा गोंधळ दिसतो :
१. अमुक इतक्या संवेदनांचा स्रोत एकच आहे अशी निरीक्षक मानतो. अशा संवेदनांचा समुच्चय केलेली तार्किक वस्तू = विवक्षित वस्तू (संस्कृत तर्कशास्त्रात "व्यक्ति", इंग्रजी तर्कशास्त्रात particular)
२. वेगवेगळ्या विवक्षित वस्तूंमध्ये काही सामान्य आहे असा तर्क = सर्वसामान्य वस्तू (संस्कृत तर्कशास्त्रात "जाति", इंग्रजी तर्कशास्त्रात general)
३. केवळ तर्कांनी गुंफलेली विधाने (इंग्रजी तर्कशास्त्रात proposition)

"विवक्षित" अशा तार्किक वस्तूच्या बाबत कित्येक संवेदना अजून आपल्याला झाल्या नसतील - उदाहरणार्थ ते समोर मला एक "विवक्षित झाड" दिसते आहे. त्याच्या खोडाला टणकपणा/मऊपणा असा स्पर्शगुण असेल, तो मी अजून अनुभवलेला नाही. पानांना सळसळण्याचा/शांततेचा काही ध्वनी असेल, तो मी अजून अनुभवलेला नाही. फुलांना मंद/उग्र गंध असेल, फळाला तुरट/गोड काही चव असेल - हे सर्व गुण मी अनुभवलेले नाहीत. ते पुढे कधी अनुभवाला येतील तरी "ते विवक्षित झाड" हे अबाधित एकक राहाते. त्याच प्रमाणे आता होत असलेल्या संवेदना नंतर झाल्या नाहीत - वेगळ्या संवेदना झाल्या तरी चालते. झाडाचा रंग बदलला - पानगळीच्या सुरुवातीला झाडाची सगळी पाने लाल किंवा पिवळी झाली, तरी "ते विवक्षित झाड" हे अबाधित एकक राहाते. म्हणजे "ते विवक्षित झाड" या एककाचे रंग-गंध वगैरे हे आनुषंगिक गुण आहेत.

वरील उदाहरणात सर्वशक्तिमान देवाने हिरव्याला तांबडे केले की नाही हे कळत नाही. ज्या-ज्या विवक्षित वस्तूंचा एक आनुषंगिक गुण "हिरवा रंग" होता, त्यांच्यामध्ये "तांबडा गुण" असा फरक केला आहे. "हिरवेपणा" या रंग-जातीला (the general concept of green) "तांबडेपणा" या रंग-जातीत (the general concept of red) बदलले असल्यासारखे वरील कथेत वाटत नाही.

चौकोनीपणा आणि वर्तुळाकार हेसुद्धा कधीकधी आनुषंगिक गुण असू शकतात. उदाहरणार्थ - लहानपणी मी हट्ट करून पोळ्या लाटायला घेत असे. तेव्हा त्याच लाटीचा आकार कधी वर्तुळाकार, कधी त्रिकोणी, चौकोनी, गोव्याच्या नकाशासारखा वगैरे होत असे. "ती लाटी" हे एकक बदलत नसे, तर "आकार" हा आनुषंगिक गुण बदलत असे. जर "हिरव्याचे तांबडे" हे उदाहरण ठीक असेल, तर सर्वशक्तिमान देव "चौकोनी" हा आनुषंगिक गुण असलेल्या प्रत्येक विवक्षित वस्तूला "वर्तुळाकार" हा आनुषंगिक गुण देऊ शकतो.

शाब्दिक खेळ हा की चौ+कोन शब्दात ४-कोन-आहेत हे तार्किक विधानही बसले आहे. हे विधान विवक्षित वस्तूच्या आनुषंगिक गुणाबद्दल कधीकधी वापरले जाते (ती विवक्षित कणकेची लाटी चौकोनी होती, ती लाटी आता गोल आहे). हे विधान कधीकधी सर्वसामान्य गुणाबद्दलही वापरले जाते. "चौकोन या आकार-संकल्पनेत चारच कोन असतात, अन्य संख्या कधीही नसते."

अशा प्रकारचा शाब्दिक खेळ रंग-नामांनी सुद्धा करता येतो. उदाहरणार्थ "तांबूस" हा रंग घ्या. यात "तांबड्या-सारखा-रंग" हे विधान बसले आहे. कधीकधी हा आनुषंगिक गुण असतो. (तव्यावरची ही विवक्षित पोळी थोड्या वेळापूर्वी छान तांबूस होती, तर आता करपून काळीठिक्कर झाली आहे.) तर कधीकधी सर्वसामान्य गुणाबद्दल उल्लेख असतो. "तांबूस" (तांबड्याशी साधर्म्य असलेला) या रंगाला "काळाठिक्कर" (तांबड्याशी मुळीच साधर्म्य नसलेला) रंग करणे म्हणजे तार्किक विसंगती आहे.

जातिबद्दल कोणाची शक्ती आहे/नाही या निकषाबद्दल काय म्हणावे? "जाति"चे अस्तित्व खरे नसते, ते केवळ मनाचे खेळ/सोयीस्कर संकल्पना असतात असा सिद्धांत काही तत्त्वप्रणाली सांगतात. (उदा : भारतातील पूर्वमीमांसक, आजकालच्या विज्ञानाची "इन्स्ट्रुमेंटलिस्ट"" तार्किक चौकट, वगैरे.) या तत्त्वज्ञानांच्या मते बघावे, तर सर्वसामान्य संकल्पना जर मनाचे मायावी खेळ आहेत, तर "सामान्याच्या व्याख्येत बदल करण्याची शक्ती कोणाला आहे की नाही?" हा प्रश्नच निरर्थक आहे. सर्वसामान्य संकल्पनांचे अस्तित्वच खरे, विवक्षित वस्तूंचे अस्तित्व म्हणजे दुय्यम प्रकारचे असे म्हणणारी तत्त्वज्ञाने आहेत (भारतातील वेदांत/उत्तरमीमांसा किंवा ग्रीकांचा प्लेटो, वगैरे), त्यांनासुद्धा हा प्रश्न तसा निरर्थक आहे. सर्वसामान्य संकल्पनांना तसेच विवक्षित वस्तूंनाही वस्तुनिष्ठ अस्तित्व असते असे काही तत्त्वज्ञाने म्हणतात. (उदाहरणार्थ : भारतातील नैयायिक, वेगवेगळ्या संस्कृतींमधील द्वैत-तत्त्वज्ञाने.) अशा तत्त्वाचा पुरस्कार केला तरच वरील प्रश्नाला काही अर्थ राहातो.

विवक्षित व्यक्ती आणि जाति यांच्यात इतका मोठा गोंधळ होतो आहे, याची कुणकुण हजारो वर्षांपासून आहे, तर रोजव्यवहारात आपल्याला जाणवत का नाही? त्याचे कारण की संदर्भानुसार "विवक्षित वस्तू" किंवा "सर्वसामान्य गुण" पैकी एकच अर्थ सहज कळून येतो.

आई जेव्हा म्हणाली - "अरेअरे! पोळी करपली आहे..." तेव्हा ती तव्यावरची विवक्षित पोळी आहे हे संदर्भाने स्पष्ट आहे. विवक्षित पोळी कच्ची/करपली असू शकते. बाबा जेव्हा म्हणाले "पोळी वाढ " तेव्हा ही-किंवा-ती-डब्यातली-कुठलीही-चालेल असा "सर्वसामान्य पोळी" संदर्भ स्पष्ट आहे. ही सर्वसामान्य पोळी "पोळलेलीच" असते, कच्ची किंवा करपलेली असूच शकत नाही. संदर्भानुसार विवक्षित/सर्वसामान्य हा भेद सुस्पष्ट असल्यामुळे "ही विवक्षित पोळी कच्ची आहे" आणि "पोळी पोळली असतेच, कच्ची नसतेच" यांच्यातला विरोधाभास असा काही राहातच नाही. "विवक्षित पोळी करपवण्याची माझी शक्ती आहे, सर्वसामान्य पोळी करपवण्याची माझी शक्ती नाही" वगैरे शब्दांमध्ये स्पष्ट सांगण्याची गरज कधी उद्भवतच नाही. कारण त्या-त्या संदर्भात गोंधळ कधीही होत नाही.

असो. "व्यक्ति-जाति" यांच्यात गोंधळ आणि "इन्फिनिट रिग्रेस/अनवस्थिती" यांच्याबद्दल गोंधळ हा ईश-अस्तित्वाच्या वादांच्या तार्किक तळाशी पुष्कळदा दिसतो. (वर थॉमस ऍक्वायनासचा उल्लेख आहे, त्याच्या अनेक वादांमध्ये आपल्याला हे दिसून येते.) तो घोटाळा सोडवला तरच चौथ्या मितीतील दृष्टीचा फायदा होईल. नाहीतर "येथे काहीतरी गुंतागुंत आहे, पुनर्विचार करावा लागेल" हे आधी माहीत असलेलेच पुन्हा सांगितले जाईल.

हे आवडले

पाकिस्तानचा नकाशा तांबडा झाला. भारताच्या नकाशातील हिरव्या रंगाची जागा तांबड्याने घेतली.
हे फार म्हणजे फार आवडले बरं का...
आशा आहे कधी ना कधी तरी असा दिवस येईल.

बाकी लेख आणि त्यावरचा धनंजयाचा प्रतिसाद वाचून मी तर गारच झालो आहे.
म्यट्रीक्स नावाचा एक भयाण चित्रपट परत पाहात बसल्याचा आनंद मिळाला...

कसं काय सुचतं हो तुम्हाला इतकं भारी लॉजिकल लिहायला?

आपला
गुंडोपंत

भेद

धनंजयनी उत्कृष्ट प्रकारे संकल्पना आणि वस्तू यातला भेद व्यक्त केला आहेच.
माणसाला हिरव्या किंवा तांबड्या रंगाचा बोध हा त्या वस्तूकडून डोळ्यात शिरणार्‍या प्रकाशाच्या फ्रीक्वेन्सीवरून होतो. झाडाची पाने तांबडी होणे यासाठी त्या पानातील रंगद्रव्य बदलणे भाग आहे. तसे एकवेळ (सर्वशक्तिमान) परमेश्वराला शक्य असेल. पण चौकोनी वर्तुळ करणे म्हणजे व्याख्याच बदलणे.

काहीवेळा नानावटींची उदाहरणात्मक कथा आणि त्याखालचे विवेचन यांचा संबंध आहे स्पष्ट किंवा सयुक्तिक वाटत नाही.

अवांतरः गुंडोपंतांना हिरवा रंग नाहीसा झालेला आवडला की रंग तांबडा झालेला आवडला?

नितिन थत्ते
(आय कॅन ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

आवांतर

आवांतरः
अर्थातच रंग तांबडा झालेला आवडला!
काही करून माणसे तांबड्या विचार सरणीत परत आणणे ही एकच बाब शक्य/आणि (मला) लॉजिकल वाटते आहे.

अति - आवांतरः
अणि मला मनापासून मुघलीस्तान व्हायला नकोय!
म्हणून ते वाक्य आवडले!

आपला
गुंडोपंत

रंग

>> काही करून माणसे तांबड्या विचार सरणीत परत आणणे
:). असे उघडपणे म्हणणे सध्याच्या काळात तब्येतीला हानिकारक. कल्जि घेने.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

जात व विवक्षित

ज्ञानेश्वर महाराज जेव्हा अमृतानुभवात सोने व सोन्याचे अलंकार, पाणी व पाण्यावरील तरंग यांचे उदाहरण देतात तेव्हा
त्यांना श्री.धनंजय यांच्या विवेचनातले जात व विवक्षित यांच्या मधील नाते सांगावयाचे असते काय ?
शरद

शक्य आहे - ती उपमा असेल

शक्य आहे - ती उपमा असेल. अधिक विस्ताराने ही उपमा वाचायला आवडेल.

व्याकरणमहाभाष्यात सोन्याचे अलंकार<->सोने या उपमेचा वेगळा उपयोग केलेला आहे - (दुवा)

आक्षेप : आकृती स्थायी आहे असे कसे म्हणता? सोन्याची साखळी मोडून कानातले डूल बनवले, ते मोडून वळे बनवले, ते मोडून आंगठी. आकार तर सारखे बदलतात, मूळ सोने ते बदलत नसते. तसा शब्दोच्चारात बाहेर पडणारा आवाज तेवढा नित्य असतो.
उत्तर : नाही. आकृती नित्य असते. एक सोन्याचे वळे मोडले, तरी वळे ही आकृती दुसर्‍या एका सोनाच्या तुकड्यात दिसते. आकृती म्हणजे त्या वस्तूचे तत्त्व, तिचा "वस्तूपणा".[१]
- -
[१] एकाच सोन्यासाख्या कंठस्वरातून कधी "बैल", तर कधी "घोडं" असे वेगवेगळे आभूषणांसारखे आकार तयार होतात. पण या ठिकाणच्या "बैल"चा आकार आणि दुसर्‍या कोणाच्या कंठस्वरातून बाहेर पडणारा "बैल"चा आकार एकच. तसाच दोन्ही कंठांच्या स्वरातून बाहेर पडणारे "घोडं" चा आकार एकच.

येथे मात्र व्यक्ति/जाति असा भेद नसून द्रव्य/आकृती असा भेद केलेला आहे. ध्वनी हे द्रव्य नित्य ("जाति") आहे, आणि शब्द ही आकृती नित्य ("जाति") आहे. मात्र "धनंजयने २:१५ वाजता 'बैल' असा उच्चार केला, तो ध्वनि-शब्द" ही व्यक्ती = विवक्षित वस्तू आहे. (विवक्षित ध्वनी विरून जातात म्हणून अनित्य असतात.)

नैयायिकांच्या मते "द्रव्य" हा प्रकार कधी व्यक्ती असते, तर कधी जाती असते. म्हनजे "हे समोरचे सोने" असे बोट दाखवून म्हटले, तर कुठली का आकृती असेना, "समोरचे विवक्षित द्रव्य - ती विवक्षित राशी = व्यक्ती" असा संदर्भ असतो. मात्र "सोने चकाकते आणि पिवळे असते" येथे "जाति"चा संदर्भ असतो.

आकृती हीसुद्धा जाति असू शकते (बहुतेक संदर्भात जातिच असते) : म्हणजे हे सोन्याचे वळे, ते चांदीचे वळे, आणखी कुठले कथलाचे वळे... या सर्व व्यक्तींना सामान्य असा "वळे" हा आकार म्हणजे जाति.
त्याच प्रमाणे हे सोन्याचे वळे, ही सोन्याची साखळी, हे सोन्याचे डूल... या सर्व व्यक्तींना सामान्य असे "सोने" हे द्रव्य म्हणजे सुद्धा जातिच.

आणि जरा विचार केल्यास "माझ्या ताईचे सोन्याचे डूल", "माझ्या वैनीचे सोन्याचे डूल", "त्याच्या आईचे सोन्याचे डूल"... या सगळ्या "व्यक्तीं"त सामान्य असे "सोन्याचे डूल" म्हणजे जातिच! त्यामुळे उपमेच्या वेगळा थेट विचार केला, तर मात्र द्रव्य/आकृती यांचा मेळ जाति/व्यक्ती यांच्याशी बसत नाही.

व्यक्ती म्हणजे पुष्कळदा बोट दाखवून निर्देश करता येतो. समजा "हा पिळलेला दोरखंड" असा बोटाने निर्देश केला. कधी त्यातले द्रव्य आनुषंगिक गुण म्हणून बदलू शकते, आनुषंगिक आकार तसाच राहू शकतो : "दोर जळाला तरी पीळ जळाला नाही." कधी त्यातले द्रव्य तसेच राहून आकार बदलू शकतो : "पीळ सोडवल्यामुळे हा दोरखंड लुळा पडला".

मात्र सर्व पिळलेल्या विवक्षित वस्तूंना सामान्य असलेला "पीळ" हा आकार, आणि सर्व दोरांना सामान्य असलेले "काथ्या" हे द्रव्य, दोन्ही त्यांच्या ठिकाणी "जाति"च ठरतात. ("हा समोरचा काथ्या" किंवा "हा समोरचा पीळ" असा निर्देश केला तर विवक्षित वस्तूसुद्धा आहेत.)

जाति

आपण लोखंड म्हणतो ती 'जाति', त्याची बनलेली मोटारगाडी ही पण 'जाति', पण "एम् एच् ०१ ए सी ......" असा क्रमांक धारण करणारी मोटारगाडी ही मात्र 'विविक्षित व्यक्ती' असे धनंजय यांना म्हणायचे असावे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

छान् !

छान !
मूळ विषय आणि त्यावरचे धनन्जय यान्चे विवचन हे अतिशय छान वाटले.

देव ही सन्कल्पना माणसानेच बनवली असुन त्याला काहिही करता येते(सर्वशक्तिमान) हे पण माणसाने ठरवले.
आणि आता स्वत:च ती व्याख्या कशी खोटी आहे हे सिद्ध करायाचा प्रयत्न करत आहे.

गोंधळाचे उत्तम उदाहरण

>>देव ही सन्कल्पना माणसानेच बनवली असुन
येथे माणसाने हा शब्द जाति म्हणून वापरला आहे. तरीही ती सर्व माणसांनी बनवली नसून काही विशिष्ट माणसांनी (व्यक्ती) बनवली.

>>त्याला काहिही करता येते(सर्वशक्तिमान) हे पण माणसाने ठरवले
येथे माणसाने हा शब्द व्यक्ती म्हणून येतो. (विशिष्ट माणसांनी)

>>आता स्वत:च ती व्याख्या कशी खोटी आहे हे सिद्ध करायाचा प्रयत्न करत आहे
येथे काही विशिष्ट व्यक्ती तो सर्वशक्तीमान आहे असेनाअजही मानतात.
दुसर्‍या काही विशिष्ट व्यक्ती ही व्याख्या खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

 
^ वर