विचार व कृती

फोर्थ डायमेन्शन 36

विचार व कृती

सौरमालेच्या पलिकडील ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करत असताना आपल्या पृथ्वीसारखाच अजून एक ग्रह या विश्वामध्ये असून तेथेही सजीव वसती आहे हे संशोधकांच्या लक्षात आले. त्या ग्रहाचे ह्युमनस असे नाव ठेवण्यात आले. अत्याधुनिक अंतरिक्ष तंत्रज्ञानाचा वापर करून ह्युमनस व आपली पृथ्वी यांच्यावर राहणाऱ्याच्यां भेटीगाठी होऊ लागल्या. एकमेकांची भाषा अवगत झाली. संवाद वाढला. ह्युमनस ग्रहावरील माणसं हुबेहूब आपल्यासारखीच दिसत असली तरी आपल्यापेक्षा ते वेगळे आहेत हे हळूहळू आपल्या वैज्ञानिकांच्या लक्षात येवू लागले. ह्युमनसला भेट देणारे पृथ्वीवरील वैज्ञानिक याविषयी विचार करू लागले. ह्युमनसवरील तज्ञांशी चर्चा केली. ह्युमनसच्या तज्ञांच्या मते ह्युमनस ग्रहावरील माणसं प्रथम कृती करतात व त्यानंतर त्यासंबंधी विचार करतात. त्यांच्यातील विचार हा त्यांच्या शारीरिक कृतीचा परिणाम असतो. पृथ्वीवर मात्र प्रथम विचार व त्यानंतर कृती असा उफराटा कारभार आहे. पृथ्वीवरील तज्ञांना ह्युमनस ग्रहावरील माणसं कसे काय जगतात याचे आश्चर्य वाटू लागले. तशाच प्रकारे ह्युमनस ग्रहावरील तज्ञांनासुद्धा पृथ्वीवरील माणसं कसे काय जगतात याचे आश्चर्य वाटू लागले.
हे कसे शक्य आहे? उदाहरणार्थ, आपल्याला खायची इच्छा झाल्यास खाण्याचा विचार डोक्यात येतो. कदाचित या इच्छेलाच आपण विचार असे म्हणत असावेत. विचारानंतर खाण्याची प्रत्यक्ष कृती घडते. परंतु ह्यमनस ग्रहावरील माणसांचा मेंदू व शरीर एकाच क्षणी कृती करत असल्यामुळे त्यांचा भौतिक मेंदू व शरीर काहीही व केव्हाही खाण्यासाठी सदैव तयारीतच असतात. त्यामुळे कृतीपूर्व विचार किंवा विचारांती कृती असला प्रकार तेथे नाही.
कदाचित ह्युमनसवरील माणसांना हे शक्य असेल. परंतु पृथ्वीवासीयांना हे शक्य वाही. ह्युमनसच्या तज्ञांचा मात्र विचार प्रथम व नंतर कृती किंवा प्रथम कृती व नंतर विचार यांमुळे तसा काही फरक पडत नाही, असा अभिप्राय होता.

Source: Method and Results, T H Huxley (1848)

एका तत्वज्ञाच्या मते प्रत्यक्ष कृतीचा परिणाम म्हणजे विचार असे खरोखरच घडत असल्यास ते जगाच्या विनाशाची नांदी ठरेल. ह्युमनस ग्रहावरील माणसांच्या विचारामुळे (किंवा त्यांच्या मेंदूत होत असलेल्या काही स्थित्यंतरामुळे ) त्यांच्या प्रत्यक्ष कृतीवर अजिबात परिणाम होत नाही. त्यांचा मेंदू व शरीरातील इतर अवयव एखाद्या यंत्रासारखे स्वतंत्रपणे कार्य करत असावेत. एखाद्या कृतीमुळे आलेला अनुभव हा कदाचित त्या यंत्रणेचे उप-उत्पादन (बाय-प्रॉड़क्ट) असण्याची शक्यता आहे. व या बाय-प्रॉडक्टपासून त्या यंत्रणेला धक्का बसत नाही, कुठलाही धोका नाही व त्या यंत्रणेवर त्याचा परिणाम होत नाही. ह्युमनस ग्रहावरील माणसांच्या संबंधातील या प्रकारच्या तर्क पद्धतीत काही विसंगती असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे दैनंदिन व्यवहार कसे चालत असावेत याचा तर्कही आपण करू शकत नाही. पृथ्वीवरील तत्वज्ञांना प्रथम कृती व नंतर विचार हे कधीच स्वीकारार्ह वाटणार नाही.
आपण नेहमीच विचारांती कृती करत असतो व ती कृती योग्य असते अशी आपली ठाम समजूत असते. आपल्या मेंदूत विविध प्रकारचे असंख्य विचार येत असतात. अशा विचारांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या कृतीवर परिणाम होत नसल्यास हे सर्व जग भासमय आहे असे वाटू लागेल. विचार व कृती यांच्यात कुठलाही संबंध नसल्यास जगात प्रत्यक्ष काय घडत आहे व आपल्या मेंदूत काय होत आहे यांच्यात ताळमेळच नसेल. हात तोंडात घास घालत आहे, घास पोटात जात आहे, शरीरात पचन क्रिया चालू आहे इ.इ. जरी घडत असले तरी आपले पोट भरले आहे का, अजून खायला हवे का, खाणे केव्हा थांबवावे, काय खावे, किती खावे, काय खाऊ नये इत्यादींचा अजिबात विचार नसल्यास खाणे ही क्रियाच आभासमय वाटेल. खाणे वा न खाणे यात फरकच नसेल. उत्स्फूर्ततेतूनच प्रत्येक कृती घडत असल्यास त्याच्या अंतिम परिणामाची जवाबदारी पण शरीरालाच स्वीकारावी लागेल. काही दुष्परिणाम झाल्यास शरीरालाच त्या वेदना सहन कराव्या लागतील. विचार आहेत म्हणून जग आहे, योजना आहेत, जगातील व्यवहार आहेत, विचारातूनच भविष्याला गती मिळते. या विचारामधून साकारलेल्या कृतीचे परिणाम माणसाच्या अस्तित्वाला पूरक ठरतात. हा अनुभव त्याच्या गाठीशी असल्यामुळेच विचाराची कास सोडण्यास माणूस सहजासहजी तयार होणार नाही.
मुळातच विचारापासून कृतीला वेगळे करता येईल का? आपले विचार व आपण करत असलेले कार्य वा कृती यांच्यामध्ये एक अतूट नाते आहे. व ते प्रयत्न करूनही तुटता तुटत नाही. विचारातूनच कृती करण्यास प्रेरणा मिळते व जीवन व्यवहार चालतात. एखादी समस्या सोडविताना आपण पहिल्यांदा विचार करतो. वेगवेगळ्या पर्यायांचे विश्लेषण करतो. परिस्थितीनुसार त्यापैकी एकाची निवड करतो व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा प्रयत्न करतो. ही साखळी तोडण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल. म्हणूनच वैयक्तिक जीवनातील अडचणीच्या प्रसंगांचा मागोवा घेतल्यास अडचणीचे मुख्य कारण अविचार वा विचारच न करणे हेच असण्याची शक्यता जास्त आहे.
आपल्याला होत असलेल्या जाणीवांचा अनुभव किंवा मनात उमटणारे विचार म्हणजे मेंदूतील लाखो-करोडो न्यूरॉन्सच्या चलनवलनाचे एक उप-उत्पादन (बाय प्रॉडक्ट) असे का समजू नये? पाणी उकळत असताना जशा प्रकारे आवाज येत असतो तशाच प्रकारे आपल्यात उमटणारे विचार हजारो-लाखो न्यूरॉन्सच्या स्थानांतरांची फलश्रृती असे का समजू नये? विचारामुळे न्यूरॉन्सचे चलनवलन असे न समजता न्यूरॉन्सच्या चलनवलनाची फलश्रृती म्हणजेच विचार यात गैर काय आहे?
जर हाच तर्क आणखी ताणल्यास पाण्याच्या तापमानातील वाढीमुळे पाणी उकळत नसून त्यावेळी होणाऱ्या आवाजामुळे पाणी उकळते असे म्हटल्यासारखे होईल. ज्याप्रकारे उकळण्यापासून आवाजाला वेगळे करता येत नाही तशाच प्रकारे न्यूरॉन्सपासून विचारांना वेगळे करता येत नाही. न्यूरॉन्सना उद्देपित करण्यासाठी ज्ञानेंद्रियांची मदत मिळत असली तरी एका विचारातून दुसरा विचार, दुसऱ्यातून तिसरा, चौथा... अशी विचारांची साखळी तयार होत असते. त्यानुसार न्युरॉन्स उद्देपित होत असतात. त्यांची गती कमी-जास्त होत राहते. शेवटी कृती आराखडा तयार होतो. व पुढील कारवाई चालू होते. मुळातच विचार आपल्याकडे येत असतात; आपण त्यांच्याकडे जात नाही.
परंतु विचाराऐवजी उत्स्फूर्ततेला किंवा भावनेलाच जास्त महत्व देत राहिल्यास त्यातून होणारी कृती हमखास हानिकारक ठरू शकते. ह्युमनस ग्रहावरील माणसांची जीवनपद्धती कशी विकसित झाली, उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर बदल होत गेले, याच्यांशी आपले काहीही देणे घेणे नाही. एक मात्र खरे की ह्युमनस ग्रहावरील माणसासारखी आपल्या मेंदूची पण स्थिती झाल्यास ही पृथ्वी विनाशाच्या गर्तेत नक्कीच अडकून पडेल.
तरीसुद्धा विचारांती कृती किंवा कृतीनंतरच विचार यात काही फरक असू शकेल का?

Comments

'विचार्' करण्यासारखी कल्पना.

आधी प्रतिसाद देउन मग विचार करु असा 'विचार' केला. खरं तर, विचारांती कृती की याउलट ह्यातील् फरक शोधायचा म्हणजे पुन्हा आधी विचारच करावा लागेल. छे! पृथ्वीवासी असल्याने असेल् कदाचीत पण याचे उत्तर कठीण आहे. :)

प्रतिक्षिप्त क्रिया

प्रतिक्षिप्त क्रिया 'विचाररहीत कृती ' या प्रकारात येऊ शकतील.
आणि जर सर्वच क्रिया 'प्रतिक्षिप्त क्रिया ' असतील किंवा झाल्या तर ?
जसे महाज्ञान्यास अनेक गोष्टी ज्ञातच असतात. विचार करण्याची गरज भासत नाही.

विचार की झटपट कृती ?

>म्हणूनच वैयक्तिक जीवनातील अडचणीच्या प्रसंगांचा मागोवा घेतल्यास अडचणीचे मुख्य कारण अविचार वा विचारच न करणे हेच असण्याची शक्यता जास्त आहे.

मला हे तितकेसे पटले नाही. बर्याचदा आपण इतरांबद्दल खूप विचार करतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच जास्त होतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असल्याने आपल्या मते विचार बरोबर असला तरी इतर माणसे तो समजून घेत नाहीत. पुष्कळ वेळा उलट सुलट विचार करत वेळ घालवण्यापेक्षा काम करून मोकळे झालेले बरे असते.

गौरी

नाही पचला

पृथ्वीवरचे मनुष्य कृतीच्या आधी, कृतीच्या समयी, आणि कृतीच्या नंतर विचार करतात.
(येथे "विचार" म्हणजे जाणीव-असलेले-मनन असा अर्थ मी वापरला आहे. लेखातील अर्थ काही वेगळा आहे का?)

तसेच विचाराच्या आधी, विचाराच्या समयी, आणि विचाराच्या नंतरही कृती करतात.

उदाहरणार्थ :
१. आज सकाळी मी जाणीवपूर्वक "दात घासून तोंड धुवूया" असा विचार केलेला आठवत नाही. (उद्याबद्दल तसा विचार करण्याची मनीषाही नाही.) मात्र आज सकाळी मी दात घासून तोंड घुतले, आणि त्यानंतर आता त्याबद्दल विचार करत आहे.
२. आज रस्त्यावर चालताना पुढे पाय टाकता-टाकता लक्षात आले की पाय साचलेल्या पाण्याच्या छोट्या डबक्यात पडणार आहे. जाणिवेत विचार यायच्या समयीच पाय बाजूला केला.
३. येथे आधी लिहायच्या वाक्याचा विचार केला, मग टंकत आहे.

त्यामुळे पृथ्वीवरचे मनुष्य आणि ह्युमनस ग्रहावरील प्राणी यांच्यात नेमका काय फरक या विचार-प्रयोगात करायचा आहे, ते कळले नाही.

पृथ्वीवरील तत्वज्ञांना प्रथम कृती व नंतर विचार हे कधीच स्वीकारार्ह वाटणार नाही.

हे आश्चर्यकारक आहे. माझा एक अनुभव असा सांगतो : "मसेल्स" नावाचा शिंपल्यांचा प्रकार पहिल्यांदा मी आवडीने खाल्ला. "सर्व प्रकारचा मत्स्याहार मला आवडतो" हाच खाण्यापूर्वीचा विचार होता. तासाभराने मला फार त्रासदायक वांत्या झाल्या. "मसेल्स" खाऊन मला हा अनुभव पुढे आणखी दोनदा आला. आजकाल "मला मसेल्स खाऊन त्रास होतो." असा विचार माझ्या मनात आहे. मसेल्स खाण्याची कृती मी आधी केली, आणि "मला पचत नाहीत" हा विचार नंतर केला. माझे हे वागणे पृथ्वीवरील तत्त्वज्ञांना कधीच स्वीकारार्ह वाटणार नाही का? माझ्या परिस्थितीत पृथ्वीवरील तत्वज्ञांनी काय केले असते? फक्त कृतीआधीचा "मत्स्याहार आवडतो" हा विचार स्वीकारार्ह ठरवला आणि "मसेल्स पचत नाही" हा कृतीनंतरचा विचार अस्वीकार केला तर माझ्या पचनसंस्थेला फार त्रास होत राहील.

विचार्

मला वाटते कृती करण्यासाठी आवश्यक असलेला विचार् असे लेखात त्यांना म्हणायचे आहे(असे मला वाटते). मसेल्सचे उदाहरण द्यायचे तर, त्याचा त्रास् होतो हे तुम्हाला माहीत् नव्हते.

पण् दुसर्‍यांदा ते खाण्यापुर्वी तुम्ही नक्कीच् विचार् केला असेल (कारण् मागील् वेळी त्रास् झाल्याने तुमच्या मनात् शंका असेलच्) पण् खात्री नसल्याने तुम्ही पुन्हा खाउन् पाहिले. आता खात्री झाल्यावर तुम्ही खायच्या आधीच् विचार् करुन ('नको त्रास् होईल्' असा) कृती करता. (एका अ‍ॅलर्जी बद्दल् मी असेच् केलेले आठवते.)
(जरी हा प्रतिसाद् मी लिहला असला तरी लिहण्याच्या आधीच मनात दोन् विचार् आले, मला नक्की लेख समजला नाही की धनंजयांचा प्रतिसाद्, की दोन्ही? अर्थात् तरी मी कृती केलीच, हीला विचारांती कृती म्हणता येइल् का? :) )

चक्रगती क्रमाने विचार आणि कृती

->...->विचारजन्य कृती-> कृतिजन्य अनुभव -> अनुभवजन्य विचार -> विचारजन्य कृती-> कृतिजन्य अनुभव -> अनुभवजन्य विचार -> ...->

असे चक्रगतीने होत असते, असे मला म्हणायचे आहे. पैकी विचार कधी आधी असतो, तर कधी नंतर असतो.

शिवाय हालचाल-कृती नसलेले विचार (उदाहरणार्थ दिवास्वप्ने) आणि जाणीव-विचार नसलेल्या कृती (चेहर्‍यावरून माशी उडवणे, किंवा चटका बसल्यास हात मागे घेणे) या सुद्धा होत असतात. ते विचार, त्या कृती, वरील चक्रातून पूर्ण बाहेर आहेत. एकमेकांच्या आधी नाहीत की नंतर नाहीत.

"कृती करण्यास विचार आवश्यक असल्यास, तसा विचार आधी करावा, त्याशिवाय कृती करू नये" या वाक्यात काहीच माहितीचा गाभा (इन्फोर्मेशन कॉन्टेन्ट) नाही. हे एक स्व-आश्रय वाक्य आहे. "भात करण्यास तांदूळ आवश्यक आहेत, म्हणून आधी तांदूळ घ्यावे, त्याशिवाय भात करू नये" या सल्ल्यात "सल्ला" असा काय आहे?

मला वाटते माहितीपूर्ण विधाने अशी काही असावीत :
१. काही कृती करण्यापूर्वी विचार केला तर फायदा होतो.
२. त्या कृती अमुक-तमुक चिह्नांनी ओळखू येतात. [त्यांच्याबद्दल स्वतःचा किंवा इतरांचा पूर्वानुभव उपलब्ध असतो - माझे सर्वप्रथम मसेल्स खाणे यामुळे अशी विचारावश्यक कृती नाही. त्या कृती करण्या-न-करण्याचा पर्याय व्यवहारात उपलब्ध असतो - यामुळे माझे श्वास घेणे विचारार्ह कृती नाही. कृती करण्या-न-करण्यामुआळे काही फरक पडणार असा अनुभव असतो - काही औषधे घेतली-न-घेतली तरी रोग बरा होतो, तशा कृतींसाठी आधी विचार आवश्यक नाही.]
३. अशा कृती विचारपूर्वक कराव्यात...
वगैरे.

पण वरील "ह्युमनस" कल्पनेतून अशी कुठली दिशा मिळत नाही. विचार आणि कृती चक्रगतीने होतात ही शक्यताच कथानकात दिसत नाही. (सदैव विचार->कृती क्रम) किंवा (सदैव कृती->विचार क्रम) यांच्यात डावे-उजवे ठरवायचा प्रयत्न कथानक करते. कधीकधी विचार->कृती क्रम योग्य तर कधीकधी कृती->विचार क्रम योग्य असे माझे मत आहे, ते कथानकाच्या गृहीतकांत कुठेच बसत नाही.

तुमचं म्हणणं पटतंय्.

पण मी त्यांच्या गृहीतकाचा विचार् केला तो असा.

कृती करण्यास् विचार् आवश्यक असा पृथ्वीवरचा 'विचार' तिथे मात्र (तीच) कृती करणे (तोच) विचार करण्यास आवश्यक!

म्हणजे 'क्ष' हे काम् विचारांतीच केले पाहीजे असे पृथ्वीवरच्याला स्वाभावीक (नैसर्गीक?) वाटेल पण् तीच् कृती ह्युमनस् वाले करतील आणि मग विचार करतील असा त्यांचा स्वभाव( उत्कांतीमुळे!) आहे.

 
^ वर