गणिती संज्ञांसाठी प्रतिशब्द

गणितासाठी मराठीत काही प्रतिशब्द योजित आहे. या शब्दांच्या वापराचे एक उदाहरण म्हणून विसंधी गणितातील (Discrete Mathematics) एका इंग्रजी उताऱ्याचे स्वैर रूपांतर येथे देत आहे. मूळ उताऱ्यात उपवनाची उपमा घालून तो रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे -

"….गणिताच्या सृष्टीत नानाविध उपवनांची मौज आहे. आज आपण अशाच एका रमणीय उपवनात शिरणार आहोत. त्याचे नाव आहे विसंधी गणित. यात विसंधी मायकांचा अभ्यास केल्या जातो. येथे फलनांच्या बूलीयन आणि कवर्गीय तर्क, सीमानिर्धारी आणि गणनिय फलन आदी प्रमुख वर्गांचाच विचार केला आहे, एका प्रकारच्या फलनापासून दुस-या प्रकारच्या फलनाची रचना करता येणा-या क्रियांचा एकमेकांशी संबंध असतो. यात उच्चासन, म्यू-क्रियक, प्रतिक्रियन आणि सामान्य स्वावर्तनाचा समावेश होतो. त्यांना निरखण्यात आपण कार्यधर फलनिय विधीच्या (काफवि) उपवनात शिरतो. सोप्या संज्ञांपासून सुरूवात करून त्यावर रचल्या जाणा-या क्लिष्ट संज्ञांना समजावून घेणे ही रित आपण पाळू या. संज्ञांच्या या ताटव्यांमधील साम्य आणि भेद दाखवणारी उदाहरणे देऊन विषय अधिक पक्का करण्याची दृष्टी ठेवली आहे. सारांश, काफवि या विसंधी गणितातील महत्त्वाच्या कारंज्याची मौज घेणे हा या भागाचा उद्देश आहे…."

प्रत्येक शब्द काढतांना त्याच्या चपखलपणावरही विचार केलेला आहे. विस्तारभयास्तव विचारांचे ते सव्यापसव्य येथे देता येत नाही. पण, विशिष्ट शब्दाबद्दल काही गोंधळ असल्यास मत देऊ शकेल. शब्द काढतांना प्रथम मायमराठीत शोध घेतला आहे. शक्यतो संस्कृत संज्ञांचा वापर टाळला आहे. मात्र, आवश्यक तेथे संस्कृत संज्ञाही मराठीच्या वळणाने वापरल्या आहेत. जर काही प्रचलित शब्दांची येथे पुनरूक्ती होत असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. हा लेख माझ्या अनुदिनीवर एक लेख प्रकाशित केला होता. उपक्रम वर या विषयावर मंथन होण्यासाठी तो येथे किंचित संपादन करून पुनःप्रकाशित केला आहे.

Algorithmics कृतिक्रमाभ्यास
Boundedly deterministic सीमानिर्धारी
Class वर्ग
Combinatorics गणनाभ्यास (Study of counting)
Complexity Theory क्लिष्टता प्रवाद
Computability Theory गणनीय प्रवाद
Computable गणनीय
Continuity सातत्य
Continuous सतत
Countable Set गणनक्षम संच
Digital Geometry अंकिय भूमिती (अंभू?)
Digital Topology अंकिय स्थानविद्या (अंस्था?)
Discrete विसंधी
Feedback Operation प्रतिक्रियन
Finite Mathematics सांतय गणित
Finite सांतय (सा अंत,य) अंतय हे अंतच्या ऐवजी वापरतोय कारण सांतचे दोन अर्थ होऊ शकतील, सात ह्या संख्येशी संबंधित हा अर्थ बुचकळ्यात टाकू शकतो म्हणून सांतय!
Formal Language शिष्टभाषा (शिभा?)
Function फलन
Functional फलनीय
Graph Theory आलेख प्रवाद / आलेखन
Graph आलेख (Finite Graph सांतयालेख)
k-valued logic कवर्गी तर्क
Linear Algebra एकसम बीजगणित
Linear एकसम
Logic तर्क
Mathematical Analysis गणितीय विश्लेषण
Matrix पघा (हा शब्द फार पूर्वी खेड्यामध्ये या भावार्थाने ऐकला होता.)
Number Theory अंकप्रवाद
Operation क्रिया
Order / Ordered संगती / सुसंगत
Partially Ordered Set अंशतः सुसंगत संच (अंसुस?)
Probability Theory शक्यता प्रवाद (शप्र?)
Recursion स्वावर्तन
Set Theory संचप्रवाद
Superposition उच्चासन
System विधी
Theory प्रवाद (उपपत्ति)
Topology स्थानविद्या
Transform माया
Transformer मायक

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

शैलेश,
प्रतिशब्द शोधण्याचा आणि बनवण्याचा हा उपक्रम छान आहे. रिकर्शन ला 'स्वावर्तन' हा शब्द फारच आवडला. 'थिअरी' साठी 'सिद्धांत' ('थिअरॉटिकल' साठी 'सैद्धांतिक') असा शब्द वापरला जातो का?

मनःपूर्वक आभार

शशांक,

आपले मनःपूर्वक आभार! ह्या विषयावर जेवढी अधिक चर्चा होईल तेवढे चांगलेच आहे.

थियरीसाठी प्रतिशब्द काढतांना बरेच प्रतिशब्द डोळ्यापुढे आले होते. त्याची तर्कसंगती खाली देत आहे.

सिद्धांत या शब्दाची फोड केल्यास म्हणजे सिद्ध केलेला निष्कर्ष असा साधारण अर्थ निघतो. याऊलट, 'थियरी' ही मांडल्यानंतर काही काळानंतर चुकीची आहे हेही सिद्ध होऊ शकते. सिद्धांत या शब्दाचा अर्थछटा axiom ला अधिक जवळची वाटते.

मोल्सवर्थ इंग्रजी-मराठी शब्दकोषात थियरीसाठी उपपत्ती हा शब्द दिलेला आहे.

मराठीतील कित्येक शब्दांचा आधार संस्कृत भाषेतून आल्याने त्याचाही विचार केला. मोनियर-विल्यम्स इंग्रजी-संस्कृत शब्दकोषात, थियरीसाठी पुढील शब्द आढळतात - कल्पना, मनःकल्पना, मानसकल्पना, मानससृष्टीः, तर्कः, कल्पितं, मनःकल्पितं, अर्थापन्निः, स्वकल्पनासाधनेच्छुः,बीजनिर्देशः, उपपत्तिः. आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने पाहता यापैकी कुठलाही अर्थ थियरी ही नंतर खोडता येते ती अर्थाची छटा चपखलपणे दाखवत नाही. मॅक्डोनेलच्या इंग्रजी-संस्कृत शब्दकोषात थियरीसाठी दृश् असा प्रतिशब्द आढळतो. पण, तो या संदर्भात इष्ट वाटत नाही.

या सर्वांचा एकत्रिक विचार करता थियरीसाठी प्रवाद हा शब्द अधिक योग्य वाटतो.

संदर्भ - मोल्सवर्थ इंग्रजी-मराठी शब्दकोष, मोनियर-विल्यम्स् इंग्रजी-संस्कृत शब्दकोष (छापिल आवृत्ती, विश्वजाळ्यावर ही उपलब्ध नसावी असे दिसतेथियरी), मॅक्डोनेलच्या इंग्रजी-संस्कृत शब्दकोष.

स्नेहांकित,
शैलेश

हममम...

शैलेश, विस्तृत स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद!

सिद्धांत या शब्दाची फोड केल्यास म्हणजे सिद्ध केलेला निष्कर्ष असा साधारण अर्थ निघतो. याऊलट, 'थियरी' ही मांडल्यानंतर काही काळानंतर चुकीची आहे हेही सिद्ध होऊ शकते.

हमम... या अर्थाने 'थिअरी' साठी 'सिद्धांत' चपखल बसत नाही असे वाटते. 'थिअरी' साठी 'प्रवाद' वापरला तर 'थिअरॉटिकल' साठी काय वापरता येईल? लिझ माइटनर या लेखात एके ठिकाणी "थिअरॉटिकल मॉडेल' साठी मी 'सैद्धांतिक आराखडा' असा शब्दप्रयोग निवडला होता. तो त्यानुसार बदलावा लागेल.

प्रवादी

खालिल शब्द कसे वाटतात?

Theoretical -- प्रवादी
Theorist/Theorists -- प्रवादिक (थियरीचा पुरस्कर्ता, अनुयायी)

संवादे संवादे जायते तत्त्वबोधः, :)

पुस्तकी?

प्रवाद म्हणजे समज/गैरसमज असाही अर्थ आहे असे वाटते. त्यामुळे थिअरी साठी प्रवाद हा शब्द कितपत संयुक्तिक आहे सांगता येत नाही.त्याऐवजी थिअरी साठी 'पुस्तकी' असा साधा सोपा शब्द वापरायला काय हरकत आहे? कदाचित तो अर्थाच्या दृष्टीने तितकासा जवळ जाणारा नसला तरी साधारणपणे थिअरीसाठी पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टीकलसाठी प्रात्यक्षिक असा शब्द आपण वापरत असतो. त्या अनुषंगाने विचार केल्यास 'पुस्तकी ' हा अर्थ पचनी पडायला हरकत नसावी.

काही प्रतिशब्द

शैलेश,

तुमचा उपक्रम चांगला पण कठीण आहे. असे शब्द शोधणे किंवा तयार करणे आणि त्यापासून तयार झालेले इतर शब्द हे देखील शोधणे जेवढे कठीण आहे तेवढेच त्यांना रोजच्या व्यवहारात सामावून घेणे कठीण आहे. तसेच काही शब्दांचे अर्थ उदा:फलन - इतर क्षेत्रांत वेगळे असू शकतात आणि म्हणून ते खरे तर बदलले पाहिजेत - पण मला Function साठी फलन असाच शब्द ऐकल्यासारखे वाटते आहे. खाली अजून काही शब्द सुचवले आहेत पण तेदेखील चपखल आहेत असे नाही -

Computable गणनिय - गणना करणे हे Count या अर्थाने वापरले जाते पण आपण कंप्युटरला गणकयंत्र म्हणतोच. "गणितीय" म्हणून त्यात सर्व क्रिया आणू शकतो.
Continuity सातत्य - सलगता, संलग्नता?
Continuous सतत - सलग, संलग्न
Countable Set गणनक्षम संच - मोजण्यासारखा संच
Discrete विसंधी - तुटक, असंलग्न
Linear Algebra एकसम बीजगणित रेषीय बीजगणित
Linear एकसम - रेषीय
Superposition उच्चासन लेपन
System विधी - पद्धती
Theory प्रवाद (उपपत्ति) - विचार?

- चित्रा

चांगली चर्चा

शशांक, प्रमोद देव, चित्रा,

या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि प्रतिशब्द सुचवल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! चर्चा चांगलीच रंगली आहे. याच पद्धतीने आपण मराठी भाषा अजून पुढे नेऊ शकतो. नविन शब्द काढतांना जी सूत्रे पाळली त्यांचा ऊहापोह नविन मराठी शब्दकोष या दुव्यावर केला आहे. तसेच सर्व नविन शब्द तेथेच ठेवले आहेत. सवडीने मी ते शब्दभांडारात टाकत असतो.

उपक्रम आणि शब्दभांडार

परंतु ह्या स्थळाचे एक उपस्थळ म्हणून तो प्रकल्प ह्या स्थळावर हालवण्याची माझी तयारी आहे. उपक्रमच्या व्यवस्थापकांनी ह्याविषयी विचार करावा अशी नम्र विनंती.

कल्पना चांगली आहे. वैश्विक जाळ्यावर तांत्रिक शब्दांसाठी मराठीचा वापर वाढवण्यात शब्दभांडाराचे योगदान उल्लेखनीय आहे. फक्त उपक्रम आणि शब्दभांडार ह्या दोन्ही ठिकाणी वापरलेले तंत्रज्ञान वेगवेगळे असल्याने हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाजूंचा विचार करून योजना बनवावी लागेल. यावर सकारात्मक दृष्टीने अवश्य विचार करू.

चांगला विचार

मिलिंद,

आपण चांगला विचार मांडला आहे. आपल्या ह्या प्रस्तावास माझा हार्दिक पाठिंबा आहे. अर्थातच उपक्रमच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा व ध्येय-धोरणांचा पूर्ण आदर आहे.

मराठी पाऊल पुढे टाकणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी उपक्रम असे होस्टिंग देऊ शकले तर दुधात साखर !

अत्युत्कृष्ट कल्पना! तुमच्या विचारांना मनापासून नमस्कार! या कल्पनेची व्याप्ती खूपच भव्य आहे. त्यासाठी भरपूर अर्थबळ आणि हजारो हात लागतील. यावर मंथन व्हावे.

शैलेश

मनोरन्जन हा शब्द उपयोगासाठी

कृपया करुन आपल्या कोणत्याही दुव्यान्वर मनोरन्जन हा शब्द वापरु नये वा कमीत कमी वापरला जावा. अशी पृस्ठे सर्वत्र सहजी उघडत नाहीत. विशेशतः कामाच्याठिकानी. काळजी घ्यावी. शुद्ध लेखन करताना तारान्बळ उडते!!!!

ऑर्डर्ड

या शब्दाला 'क्रमवार' हा मराठी शब्द कसा वाटतो?

क्रमवार

'क्रमवार' म्हणजे सिक्वेंस अशा अर्थाने होईल का?

क्रमवार!

क्रमवार हा शब्द Consecutive या शब्दासाठी प्रतीशब्द योग्य वाटतो.

ऑर्डर्ड !

ऑर्डर्ड या शब्दासाठी क्रमित हा शब्द मला योग्य वाटतो.

पघा

मिलिंद,

पघा हा शब्द मी ३x३ च्या चौरसात फुली (x) आणि वर्तुळ (o) खेळायचा खेळ असतो त्या संदर्भात ऐकला होता. मॅट्रिक्सचा विचार करतांना मला एकदम तो शब्द दिसला आणि प्रतिशब्द योजला. त्याचा दुसरा काही अर्थ असल्यास मला ठाऊक नाही. येथे झालेल्या चर्चेवरून सारणी हा शब्द जास्त चपखल वाटल्याने तोच प्रतिशब्द म्हणून घेत आहे.

शैलेश

पघा आणि सुपर पोझिशन

मॅट्रिक्ससाठी सारणी हा शब्द पघाच्या तुलनेत सोपा नाही का वाटत?
सुपरपोझिशनचा अर्थ/तत्त्व लक्षात घेता उच्चासन तितकासा चपखल शब्द वाटत नाही. उच्चासन हे सुपरपोझिशनचे शाब्दिक भाषांतर वाटते. त्यात सुपरपोझिशनचे तत्त्व/गणिती अगर शात्रीय अर्थ प्रतीत होत नाही. त्यामुळे यासाठी एखादा जास्त योग्य शब्द कुठला असू शकतो, यावर विचार करावासा वाटतो.
एकूणच अशा संज्ञा तयार करण्यामागची खटपट खूपच कौतुकास्पद आहे. या उपक्रमात सक्रीय सहभागी व्हायला आवडेल.
शुभेच्छा.

सारणी

परीवश,

आपले स्वागत असो. सारणी हा शब्द आवडला. हाच शब्द वापरू या. सुपरपोझिशनसाठी अजून चपखल शब्द सापडला तर फारच छान होईल.

शैलेश

स्प्रेडशीट

सर्किट,
सारणी अगर मॅट्रिक्स एक किंव बहुमितीय असू शकते. द्विमित सारणी, त्रिमित सारणी (वन डायमेन्शनल मॅट्रिक्स, टू डायमेन्शल मॅट्रिक्स इत्यादी) इत्यादी. परंतु स्प्रेडशीट ही द्विमित सोडून इतर मिती असलेली ऐकली नाही कधी. त्यामुळे तिला अंकासरी किंवा अंकतालिका किंवा अगदी साधेसोपे म्हणजे 'तक्ता' असेच म्हटले तर चालेल का?

गणिती संकल्पनां साठी मराठी प्रतिशब्द


हे पहा शैलेश, तुझा हा प्रयत्‍न वाखाणण्या सारखा आहे.संस्कृत आणि मराठी शब्दांचे तुझे ज्ञान चांगलेच आहे.(मी एक ज्येष्ठ नागरिक आहे.तेव्हा वयाने तरी तुझ्यापेक्षा मोठाआहे असे मानून हे लिहित आहे.तरी राग नसावा.)
माझ्याकडे 'गणितशास्त्र परिभाषा कोश'(भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन.१९७५)हे पुस्तक आहे.त्यांत बरेच शब्द दिले आहेत. त्याचा आधार या लेखनाला आहे.

Theory साठी 'उपपत्ती' हा शब्द अधिक योग्य वाटतो.'प्रवाद' हा शब्द भिन्न अर्थाने रूढ आहे.
Matrix साठी सारणी शब्द योग्यच आहे. Determinant ला 'सारणिक' शब्द कोशात दिला आहे.
......... (आणखी शब्द पुढच्यावेळी)
..............यनावाला

आभार

यनावाला,

आपले मनःपूर्वक आभार! सारणिक हा शब्द सुंदर आहे. गणितशास्त्र परिभाषा कोषाबद्दल माहिती खूपच उपयुक्त आहे.

स्नेहांकित,
शैलेश

सूचना

हा उपक्रम चांगला आहे व त्यात मला व्यक्तिशः बराच रस आहे.
( मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे, त्यात असे बरेच शब्द आधीपासूनच रूढ झालेले आहेत. कोणाजवळ पाठ्यपुस्तके असतील तर त्यांचाही संदर्भ घेता येईल. निदान शालेय स्तरावरचे शब्द तरी आधी रूढ असणारे घेतले तर सोयीचे होईल असे वाटते)

माझी मते खालीलप्रमाणे
थिअरी - सिद्धांत हाच शब्द बरा वाटतो, तो चुकीचा ठरल्यावर आपोआपच त्याला सिद्धांत म्हणणे बंद होईल नाही का? आवश्यक तर तत्व हा शब्दही वापरून पहावा. थिअरेटिकल् ला तात्विक म्हणणे योग्य वाटते.
उपपत्ती हा शब्द हायपोथेसिस् साठी वापरात आहे.
ऑर्डर् ला क्रम हा शब्द योग्य आणि ऑर्डर्ड् ला क्रमवार.
सुपरपोझिशन् ला आरोपण किंवा ऊर्ध्वारोपण ?
ट्रान्सफॉर्मेशन् ला रूपांतरण?

- दिगम्भा

सहमत / असहमत आणि...

थिअरी - या साठी प्रवाद हा शब्द मला आवडाला. पण या साठी सिद्धांत हा शब्द आपल्याकडे रुळला आहे. तो कशाला बदलायचा? तसेच वर दिगम्भा म्हणतात त्याप्रमाणे सिद्धांत खोटा ठरल्यावर तो सिद्धांत राहणारच नाही :)
थिअरोटिकल - तत्व हे स्वतःसिद्ध असते आणि ते फक्त शोधले (डिसकवर केले ) जाते असे मला वाटते. त्यामुळे थिअरोटिकल ला तात्विक पेक्षा सैद्धांतिक हा शब्दच बरा.
हायपोथेसिस - या शब्दात कल्पनेचा भाग जास्त आहे. हायपोथेसिस सप्रमाण सिद्ध केले (पटवून दिले) की मग ती थिअरी बनते असे वाटते. त्यामुळे हायपोथेसिस साठी कल्पना हा शब्दच योग्य वाटतो.
हायपोथेटिकल - याला कल्पित म्हणू शकतो.
ऑर्डर - हा शब्द क्रम दखवतोच पण तो क्रम अथवा संगती नियोजनावर आधारित नसून तर्कावर आधारित असल्याने सुसंगत हा शब्द मला जास्त योग्य वाटला.
ट्रान्सफॉर्मेशन - याला रुपांतरण हा अगदी योग्य अर्थवाही शब्द वाटतो. याच सारखा मेटामॉर्फिसम हा शब्द आहे. दोनही शब्द चेंन्ज इन फॉर्म हेच दर्शवतात. भूशस्त्रातील मेटामोर्फोस्ज्ड खडकांना रुपांतरित खडक अशी योग्य संज्ञा मराठीत वापरतात.

शैलेश,
आपला प्रतिशब्द बनवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. आपण अभ्यासू आणि संस्कृतचे जाणकार आहात त्यामुळे आपण अर्थवाही शब्द बवनवित आहात. अभिनंदन.
--लिखाळ.

आभार

दिगम्भा आणि लिखाळ,

आपले मनःपूर्वक आभार! चर्चा छान रंगली आहे. आपल्या सुचवण्यांच्या आधारावर अनुदिनीवरील शब्दकोष संपादित करण्याचा प्रयत्न करतो.

स्नेहांकित,
शैलेश

अतिस्थिती

सुपर पोसिशन ला अतिस्थिती कसा वाटतो? महास्थिती, परस्थिती असेही काही पर्याय सुचतात.

विसंवाद

आपला उपक्रम् चांगला आहे पण असे करण्या मागचे कारण समजले नाही. प्रतिशब्द् शोधणे गरजेचे का आहे हे कोणी सांगु शकेल का?

 
^ वर