संकेतस्थळांची नैतिक आणि सामाजिक जवाबदारी

गेल्या काही दिवसात संकेतस्थळांवरील लेखन पाहिले असता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे संकेतस्थळांवरून होणारे अनुचित लेखन आणि त्याचा जनमानसावर होणार परिणाम. मतमतांतरे ही चालायचीच. आवडीच्या विषयावर वाचायला आवडते तसेच नावडत्या विषयावर चर्चा करायलाही आवडते. नावडत्या लेखनावर टीका करणे ह्यात काहीही अयोग्य नसले तरी जर एखादे लेखन समाजात अंधश्रद्धा फैलावणारे लोकांची दिशाभूल करणारे आणि सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणणारे असेल तर असे लेखन एक नैतिक जवाबदारी म्हणून संकेतस्थळ चालकांनी काढून टाकायला नको का? उद्या कुणी इथे अवैध मार्गाने हत्यारे कशी मिळवावीत, लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना कशा आखाव्यात? दंगल कशी करावी? ह्यावर माहिती स्वरूपात किंवा मनोरंजनाच्या बुरख्याआड लिहू लागला तर ते काढून टाकण्याची जवाबदारी संकेतस्थळ चालकांनी पार पाडली पाहिजेच पण एक जागरूक नागरिक म्हणून सदस्यांनीही योग्य ठिकाणी तक्रार करून अश्या व्यक्तींना कायद्याच्या हवाली केले पाहिजे. ज्योतिष्याच्या नावाखाली कुठलाही आधार नसलेले गैरसमज पसरवणे ह्यामुळे समाज स्वास्थ्याला हानी पोहचू शकते. एखाद्या मुलीचे लग्न मोडणे ह्यापासून ते एखाद्याला प्राण गमावयास लागणे इथपर्यंत भीषण परिणाम अश्या लेखनाने होऊ शकतात. त्यांमुळे अश्या लोकांना गजाआड करणे आवश्यक आहे.

ह्याच्याबरोबर दुसरा एक मुद्दा म्हणजे हिंसेचे समर्थन करणारे चिथावणीखोर लेखन करणे. मध्यंतरी बसेस फोडणे, रस्त्यावर उतरून तोडफोड करणे अश्या घटना घडल्या. त्यावर प्रतिक्रिया म्हणून काही संकेतस्थळांवर ह्या गोष्टींचे जाहीर समर्थन आणि उघड उघड चिथावणी देणारे लेखन दिसून आले. हे लेखन वाचून उद्या रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन दंगल सुरू करण्यात पर्यवसान होणे सहज शक्य आहे. अश्या गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी अश्या व्यक्तींवर आणि संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे का? त्यासाठी कुठे तक्रार करता येईल? कोणते कलम लावत येईल? इथे अनेक कायदेपंडित, क्राईम रिपोर्टर ह्यांचा वावर असतो. ते लोक काही मार्गदर्शन करू शकतील का? माझ्यामते मुळात हिंसाचाराचे समर्थन करणारे फॅसिस्ट विचारणीचे लेखन प्रसिद्ध करणे हे विचार स्वातंत्र्याखाली येत नसावे. नाहीतर सेना प्रमुखांवर प्रक्षोभक अग्रलेख लिहिल्याच्या केसेस कधी झाल्याच नसत्या. तेव्हा असे लेखन सार्वजनिक संकेतस्थळांवरून करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करता येतो का? (गुन्हा दाखल करायलाच हवा असे माझे म्हणणे नाही पण माहिती करून ठेवावी हा उद्देश आहे)तसेच् बदनामी (defamation) बद्दल काय करता येते इंटरनेटवर समजा बदनामीजनक मजकूर असल्यास काय करता येते नव्या माध्यमांनी नवीन आव्हाने न्यायपालिकेपुढे, कार्यपालिकेपुढे, कायदेमंडळापुढे उभी केली आहेत ह्या अनुषंगाने इथे चर्चा अपेक्षीत आहे.

Comments

रिपोर्ट ऍब्यूज

यू ट्यूब सारख्या संकेतस्थळांवर जरी सदस्य काहीही चढवू शकत असला तरी इतरांना त्याबद्दल तक्रार करण्याची "Report Abuse" "Flag as improper" अशी सोय असते. तशा तक्रारी आल्यावर बहुधा ते मटेरिअल उडवून टाकले जाते.

तशी काही सोय करता येईल काय?

संकेतस्थळाच्या स्वतःच्या कायदेशीर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या बाबत काही काळजी घेणे गरजेचे वाटते. उपक्रमाने त्या बाबीचा विचार केलाच असेल.

नितिन थत्ते

कायदा

.

ज्योतिष्याच्या नावाखाली कुठलाही आधार नसलेले गैरसमज पसरवणे ह्यामुळे समाज स्वास्थ्याला हानी पोहचू शकते. एखाद्या मुलीचे लग्न मोडणे ह्यापासून ते एखाद्याला प्राण गमावयास लागणे इथपर्यंत भीषण परिणाम अश्या लेखनाने होऊ शकतात. त्यांमुळे अश्या लोकांना गजाआड करणे आवश्यक आहे.

आजतरी या गोष्टीसाठी कायदा नाही.झाला तरी गजाआड करुन हे प्रश्न सुटणार नाहीत. ड्रग ऍन्ड मॅजिक रेमिडि ऍक्ट नुसार हे सिद्ध होणे अवघड आहे. हा कायदा पुरेसा नाही म्हणुनच अंनिसला जादुटोणा विरोधी कायदा करण्यासाठी स्वतःच्या गालावर् थप्प्पड मारुन घ्या, रक्ताने मजकुर लिहा अशा सवंग गोष्टीचा आधार घ्यावा लागतो.
ढोंगी ज्योतिषाविरुद्ध कायदा पास करुन घ्यावा अशी मागणी चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकात सत्यान्वेषी यांनी केली आहे.
उपक्रमावर यापुर्वी याची चर्चा झाली आहे. सुरेश चिपळुनकरांचा प्रस्ताव होता. http://mr.upakram.org/node/864
प्रसारमाध्यमातील नमुन्यादाखल या जाहिराती पहा १०१ टक्के ग्यारंटीची भाषा. ज्योतिष हे इतर वस्तु प्रमाणे विकले जाणारे प्रॉडक्ट आहे. मग जाहीरात आलीच. सातत्याने जनप्रबोधन करत राहणे हाच यावरील् उपाय आहे. प्रबोधनासाठी आपणही हीच तंत्र वापरली पाहिजे.
Jyotisha Jahirat-Hanumanbhakta
classified
Vidhilikhit

प्रकाश घाटपांडे

गजाआड करा

ज्योतिषाच्या नावाखाली कुठलाही आधार नसलेले गैरसमज पसरवणे ह्यामुळे समाजस्वास्थ्याला हानी पोचू शकते. एखाद्या मुलीचे लग्न मोडणे यापासून ते एखाद्याला प्राण गमावयास लागणे इथपर्यंत भीषण परिणाम अश्या लेखनाने होऊ शकतात. अश्या लोकांना गजाआड करणे आवश्यक आहे.
अवांतर : मी ज्योतिषावरचे लेखन वाचत नाही. परंतु प्रतिसाद मात्र करमणुकीकरता वाचतो. आपल्या लेखामुळे असाच एक विचार डोक्यात आला :
प्रवास कंपन्या यात्रेकरूंना लुभावण्याकरिता आकर्षक जाहिराती देतात.तुमचे भविष्यातले दिवस सुखाचे जातील असे भाकित करतात. याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. अश्या प्रवासामुळे (अपघातात) एखाद्याचा हातपाय मोडणे यापासून ते एखाद्याला प्राण गमावयास लागणे इथपर्यंत भीषण परिणाम होऊ शकतात. अश्या प्रवासी कंपन्यांच्या संचालकांना गजाआड करणे आवष्यक आहे.
शरद

चुकिची तुलना!

प्रवास कंपन्यांनी जाणून बुजून मोडकळीस आलेली (धोकादायक) वाहने वापरली, फायद्या साठी वा अन्य कोणत्याही कारणासाठी वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालवली आणि प्रवाश्यांना अपाय झाल्यास अश्या संचालकांना गजाआड करणे गरजेचे आहे. तुमचे दिवस चांगले जातील असा दावा केल्याने अपघात होत नसतात. हा फरक लक्षात घ्या. प्रवासी कंपन्यांनी योग्य ती सर्व काळजी घेऊन व्यवसाय केल्यास अपघात होण्याची शक्यता ही 'अपघातानेच' उद्भवते. परंतू एखादा ज्योतिषी जेव्हा बिनबुडाचे आधार नसलेले भाकित वर्तवतो तेव्हा त्यावर अवलंबून निर्णय घेणार्‍या लोकांचे नुकसान विलक्षण असू शकते. (ज्याची शक्यता 'अपघाताने' घडण्याइतपच राहात नाही) हे तुम्हाला मान्य नाही का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

प्रवास कंपन्या

प्रवासामुळे (अपघातात) एखाद्याचा हातपाय मोडणे यापासून ते एखाद्याला प्राण गमावयास लागणे इथपर्यंत भीषण परिणाम होऊ शकतात. अश्या प्रवासी कंपन्यांच्या संचालकांना गजाआड करणे आवष्यक आहे.

हम्म! प्रवास कंपन्यांचा अपघात झाला तर त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागत असावी असे वाटते. तसेच, या कंपन्यांना विमाही काढता येतो. तुलना करायचीच झाली तर भाकित खोटे ठरले. उदा. धंद्यात उतरा प्रचंड फायदा होईल, आणि व्यक्तिचे नुकसान झाले तर ज्योतिषी नुकसान भरपाई देतात का?

नुकसान भरपाई....!

नुकसान भरपाई देतात का?

हा हा हा कशाची नुकसान भरपाई. अहो, मुलामुलीचे गुण योग्य जुळले आहेत.
अगदी वेळेवर लग्न लागले आहेत.तरी हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

अर्रर्र !विषय दुसरीकडे चालला वाटतं..... ? क्षमस्व. :)

-दिलीप बिरुटे

सहमत

समाजाला हितकारक अशी कोठलीही गोष्ट कायदा करून साध्य होतेच असे नाही. त्यातील पहिली मेख अशी आहे की कायदा कोणी करायचा? ते अधिकार ज्या विधीमंडळांकडे असतात त्याच्या सदस्यांनाच ते पटलेले नसते. त्यानंतर दुसरी मेख म्हणजे त्या कायद्याची अंमलबजावणी कोणी करायची? ती करणारी यंत्रणा सक्षम असायला हवी तसेच सजग असणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कायद्याचे उल्लंघन करणार्‍याला जास्तीत जास्त किती दंड करता येईल? तो दंड भरण्याची तयारी असलेले लोक उघड उघड कायदेभंग करतात आणि वर त्याची फुशारकी मारतात हे आपण रोज पहात आहोत. शिवाय मानवी मूलभूत हक्क वगैरे मुद्दे काढणारे लोक आड येतात. त्यामुळे कायदा हे अशा बाबतीत मुख्य शस्त्र वाटत नाही.
आंतर्जालावर कोणी काय लिहावे याला निर्बंध राहिलेला नाही हे खरे आहे, पण ते स्थळ चालवणार्‍या लोकांना थोडी काळजी वाटत असावी आणि अधून मधून ते त्यासंबंधी सूचना आणि मार्गदर्शन करत असतातच, कधी कधी नियंत्रणाचा बडगाही उगारतांना दिसतात.

सहमत आहे

घारे सरांशी सहमत आहे.दंड भरल्यामुळे जणु कायदा तोडण्याचा परवानाच मिळतो. बर्‍याच वेळा ती इष्टापत्तीच असते. पापकरुन गंगेत स्नान केले कि झाले.पुढची पापे करायला मोकळा.
प्रकाश घाटपांडे

अभिव्यक्ती स्वांतंत्र्य...

मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रात म्हटल्याप्रमाणे-

कलम १९ प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा , तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, ती मिळवणे व इतरांना ती देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.

[अधिक माहिती पाहा मराठी विकिपीडिया]

दुसरी गोष्ट;व्यक्तीचे स्वातंत्र्य,बोलणे,लिहिणे,राहणे, वागणे, हे आणि इतर या सर्व आधुनिक संकल्पना असून त्यात अधिक खुलेपणा असला पाहिजे, त्याचे समर्थन केले पाहिजे. व्यक्तीचे हक्क आबाधित राहिले पाहिजे.

तिसरी गोष्ट; समाजाच्या हिताला बाधा होणारी गोष्ट संकेतस्थळावर होते का ? तसे होत असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी मालक आणि संपादकमंडळाचे काही धोरण असले पाहिजे. त्याहीपलिकडचा विचार असेल तर त्याला कायद्याद्वारे प्रतिबंध घालता येत असावे,असे वाटते. 'सामाजिक हीताचे' स्वरुप व्यापक असून बाधा कशामुळे येऊ शकते त्याच्या सिमा निश्चित करणे सापेक्ष आणि तितकीच अवघड गोष्ट वाटते.

संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे का?
नाही. संकेतस्थळे खाजगी स्वरुपाची असल्यामुळे त्यावर शासनाचे काही नियंत्रण नाही. त्यावर काय असावे आणि काय नसावे, हे संपूर्ण स्वातंत्र्य संकेतस्थळ मालकाचे आहे. असे वाटते. उदा. सनातन सारखी संस्थळे सतत काहीएक विचार पेरत असतात.अशा प्रकारची अनेक वेगवेगळी संस्थळे दिसून येतील. आणि आपापले विचार तिथून प्रसारित करत असतात. अर्थात हिंसा, कौर्य, द्वेष,विंध्वस, या विषयीचे आणि इतर अनुषंगिक विचार कायद्याच्या चौकटीत येऊ शकतील असे वाटते.

-दिलीप बिरुटे

डज्झड सक्कयकव्वं सक्कयकंव्वच निम्मियं जेण |
वंसहरम्मि पलित्ते तडयडतट्टत्तणं कुणइ ||

बरोबर!

संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे का?
नाही. संकेतस्थळे खाजगी स्वरुपाची असल्यामुळे त्यावर शासनाचे काही नियंत्रण नाही. त्यावर काय असावे आणि काय नसावे, हे संपूर्ण स्वातंत्र्य संकेतस्थळ मालकाचे आहे. असे वाटते. उदा. सनातन सारखी संस्थळे सतत काहीएक विचार पेरत असतात.अशा प्रकारची अनेक वेगवेगळी संस्थळे दिसून येतील. आणि आपापले विचार तिथून प्रसारित करत असतात. अर्थात हिंसा, कौर्य, द्वेष,विंध्वस, या विषयीचे आणि इतर अनुषंगिक विचार कायद्याच्या चौकटीत येऊ शकतील असे वाटते.

बरोबर. माझ्या मनातही सनातन.ओआरजी हेच संकेतस्थळ आले. काय योगायोग आहे बघा !

भारतीय दंडविधानानुसार सार्वजनिक शांतता भंग करणं; समाजासमाजांत दुही निर्माण करणं; हिंसेसाठी चिथावणी देणं, मदत करणं, कटकारस्थान करणं; धमकी देणं; चारित्र्यहनन करणं हे बहुधा दंडनीय अपराध आहेत. ह्या अशा संकेतस्थळांवर, संकेतस्थळाच्या नेमस्तकांवर (विकेरियस लायबिलिटीमुळे) व अपराधी सदस्यांवर कारवाई करण्यासाठी आधार बहुधा मिळू शकतो.

आदरणीय हैयो हैयेय्यो ह्यांच्यासारखे कायदेपंडित ह्याबाबतीत अधिक मार्गदर्शन करू शकतील!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कारवाई

भारतीय दंडविधानानुसार सार्वजनिक शांतता भंग करणं; समाजासमाजांत दुही निर्माण करणं; हिंसेसाठी चिथावणी देणं, मदत करणं, कटकारस्थान करणं; धमकी देणं; चारित्र्यहनन करणं हे बहुधा दंडनीय अपराध आहेत. ह्या अशा संकेतस्थळांवर, संकेतस्थळाच्या नेमस्तकांवर (विकेरियस लायबिलिटीमुळे) व अपराधी सदस्यांवर कारवाई करण्यासाठी आधार बहुधा मिळू शकतो.

(माझ्या मते) ह्यात नक्कीच तथ्य आहे! काही दिवसांपूर्वी/महिन्यांपूर्वी ह्याच भितीने मिसळपाव.कॉमचे मालक (सरपंच?) तात्या ह्यांनी काही लेख काढून टाकले होते/दिसेनासे केले होते (असे आठवते). आता पुन्हा तिथे द्वेषमुलक लिखाण येत आहे असे काही (आंतरजालीय) स्नेह्यांशी चर्चा करताना निदर्शानस आले. तेव्हा पुन्हा एकदा तात्यांनी साफसफाई मोहीम हाती न घेतल्यास त्यांना विनाकारण (देव न करो!) कायदेशीर बडग्याला सामोरे जावे लागेल का? अशी एक चिंता/काळजी वाटते. त्यावरुन आणखी काही प्रश्न/शंका मनात आले/आल्या. संकेतस्थळ मालकांना अश्या गोष्टीत लक्ष घालता येते(च) असे नाही, तेव्हा अश्या मजकुराची जवाबदारी कुणाची असते? संकेतस्थळ खाजगी असल्याने मालकांची/ज्यांच्या नावावर डोमेन आहे त्यांची की ज्या आयपी पत्त्यावरुन असे प्रतिसाद आले त्या सभासदांची? एकिकडे संकेतस्थळ खाजगी आहे पण लिखाण बर्‍याच सभासदांकडून होत असल्याने सार्वजनिकही आहे. तांत्रिकदृष्ट्या हा निकाल लावणे अवघड/कठीण आहे असे वाटते.

(शंकेखोर) बेसनलाडू

आदरणीय हैयो हैयेय्यो ह्यांच्यासारखे कायदेपंडित ह्याबाबतीत अधिक मार्गदर्शन करू शकतील!

सहमत आहे!

(सहमत) बेसनलाडू

आताच का?

नावडत्या लेखनावर टीका करणे ह्यात काहीही अयोग्य नसले तरी जर एखादे लेखन समाजात अंधश्रद्धा फैलावणारे लोकांची दिशाभूल करणारे आणि सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणणारे असेल तर असे लेखन एक नैतिक जवाबदारी म्हणून संकेतस्थळ चालकांनी काढून टाकायला नको का?

ज्योतिषशास्त्र हा समुदाय धोंडोपंत या सदस्याने सुरु केला ते देखील हे असेच लेख टाकत. ते अद्यापही उपक्रमावर शाबूत आहेत. तेव्हा संजीव नाईक यांना आपपरभाव ;-) नको.

जर काही बदलायचेच झाले ज्योतिषशास्त्र या समुदायाची व्याख्या आणि उद्देश बदलावे. जेणेकरून भविष्यात अशा लेखांवर संपादन आणता येईल.

बरोबर!

ज्योतिषशास्त्र हा समुदाय धोंडोपंत या सदस्याने सुरु केला ते देखील हे असेच लेख टाकत.

तोही लेख पाहिला. तिथे 'माधवी गाडगीळ' ह्यांचा हा प्रतिसाद (विशेष) नोंद घेण्यासारखा. धोंडोपंतही असेच/असले लेख टाकत असले तरी त्याला(ही) आजच्या सारखाच विरोध होत व्हायचा(फक्त तीव्रता बदलली आहे) हे गाडगीळांच्या प्रतिसादावरुन दिसून येईल. असो, हा दुवा आणि त्यावरील रोचक प्रतिसाद ह्यांची आठवण करुन दिल्याबद्दल प्रियाताईंचे आभार!

(आभारी) बेसनलाडू

छान, माहितीपूर्ण चर्चा! :)

छान, माहितीपूर्ण चर्चा! :)

आपला,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर