शनी मार्गी

लोकहो !!

सोमवार दिनांक १६ एप्रिल २००७ रोजी कर्केत वक्री असलेला शनी स्तंभी होत आहे. सिंह राशीत गेलेला शनी ६ डिसेंबर २००६ पासून वक्री होऊन कर्केत २४ अंश १२ कलापर्यंत मागे आला. आता तो ५ दिवस स्तंभी म्हणजे याच अंशावर राहून दिनांक १९ एप्रिल पासून मार्गी होईल.

ज्या व्यक्ती कर्क राशीच्या आहेत त्यांना गेल्या साडेचार महिन्यात अनेक कटकटींना तोंड द्यावे लागले असेल याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.

विशेषत: आमच्यासारख्या ज्या कर्क राशींच्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी त्रिकस्थानात म्हणजे ६/८/१२ या स्थानात आहे त्यांना तर किती समस्या अनुभवायला लागल्या याची गणती करणे मुश्किल आहे.

शनीमहाराजांनी गेली पाच वर्षे जीवनातल्या अनेक क्षेत्रात नैराश्य, अपयश, अनारोग्य, ताणतणाव अशा अनेक भेटवस्तू प्रेमाने दिल्या आहेत.

आता शनीमहाराज स्तंभी होतील, ४ दिवसांनी मार्गी लागतील आणि जुलैमध्ये सिंहेत पुन: प्रवेश करतील. सिंहेत शनी महाराज गेले की मिथुन राशीचे लोक साडेसातीतून सुटतील आणि १५ जुलैपासून कन्या राशीच्या लोकांना साडेसाती सुरु होईल.

१५ जुलैपासून कर्क , सिंह आणि कन्या या तीन राशींना साडेसाती असेल. ज्या कर्कव्यक्तींच्या जन्मकुंडलीत सिंह राशीत बुध, शुक्र हे शनीचे मित्रग्रह आहेत त्यांना आजपर्यंत जो त्रास सोसावा लागला तो त्रास कमी होईल.

कारण स्वजन्मराशीतून पुढे गेलेला शनी त्याच्या मित्रग्रहांबरोबर असता, तीव्र स्वरूपाची अशुभ फले देणार नाही. त्यामुळे १५ जुलैनंतर ते लोक बर्‍याच अंशी सुटतील.

आपला,
(त्रस्त) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

छान माहिती !

धोंडोपन्त , शनीच्या राशी भ्रमणाची छान माहिती दिलीत. धन्यवाद! मधून मधून अशी माहिती येत रहावी, अशी शनीमहाराजांना प्रार्थना.

सदस्य व्हा

केशवराव,

ज्योतिषात रस असणार्‍यांसाठी उपक्रमावर ज्योतिषशास्त्र हा समुदाय आहे. त्याचे आपण सदस्य बनावे.

या समुदायाचे सभासद होण्यासाठी ज्योतिषात रस असणे पुरे आहे, त्यावर विश्वास असण्याची अट नाही.

आपला,
(आवाहक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धन्यवाद!

धोंडोपंत, आपण आवाहन केलेत. आम्हाला धन्य वाटले. आम्ही सभासद झालो.

भोगा आणी मुक्त व्हा!

आमचे दोन शब्द!

साडेसाती हा आमच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. (चंद्रच आहे हो कर्केत, आणि तो ही दशमात!)

"भोगा आणी मुक्त व्हा" हे शनी चे सूत्र आहे. त्या नुसार आपल्या कर्मातून मुक्त होण्याची साडेसाती ही एक संधीच आहे, असेही म्हणायला हरकत नाही.
पण याच बरोबर शनी महाराज जे देतात, ते दूरगामी परिणाम करणारे देतात (असे आम्हाला वाटते.)
तसेच या काळात साधारण पणे 'स्व' चा शोध सुरू होतो. अनेकदा डिप्रेशनने आपण पिडले जातो. पण एकटेपणा देणे, औदासिन्य आणणे, विमनस्कता देणे, जगापासून तुटलेपण जाणवणे हा शनी च्या फलाचा भाग आहे. तेव्हा असं कधी वाटलं तर, लक्षात ठेवा की एक दिवस शनी तुमची रास पण बदलणार आहे!
शिवाय, या काळातच घेतलेल्या अनुभवाचा उपयोग आयुष्यभर होतो.
अनेकदा कष्टाची /आयुष्याच्या मोठ्या पाया भरणीची (लाँग टर्म प्रोजेक्ट्स) कामे या काळात होवून जातात.
तेव्हा नाही म्हणू नका, ही एक संधी आहे स्वतः कडे पाहण्याची आपली वेगळी पण खरीखुरी ओळख करून घेण्याची!

आपला
(साडेसातवा) गुंडोपंत

गुंडोपंत

नमस्कार गुंडोपंत,

आपला प्रतिसाद खूप आवडला. आपले म्हणणे १००% खरे आहे.

शनी हा सर्वात मोठा "गुरू" आहे. पण तो मोबदला जबर घेतो.

माणसाचा अहम दूर करून त्याला "जमिनीवर" आणतो. आपल्यासारख्या उपक्रमींचे असे माहितीपूर्ण प्रतिसाद यावेत ही ज्योतिषशास्त्र समुदायाच्या दृष्टीने फार आनंददायी बाब आहे.

काल आम्हाला एका उपक्रमीनी एक फार छान प्रश्न विचारला आहे. पंचमात शनी आणि मंगळ दृष्ट केतू काय फलादेश देईल? (पंचमात केतू म्हणजे लाभात राहू)

पंचमातला केतू संततीसौख्याला चांगला नाही. त्यावर शनी मंगळाची संयुक्त दृष्टी असेल तर फलाची निश्चिती होते. संततीकारक गुरू जर शुभस्थितीत आणि बलवान असेल तर संतती होईल पण संततीपासून सुख मिळणार नाही.

शिवाजी महाराजांच्या कुंडलीत हा योग आहे.

शिवाजी महाराजांच्या कुंडलीत सिंह लग्न असून पंचमात केतू, सप्तमात रवी, गुरू, अष्टमात बुध, भाग्यात शुक्र, लाभात राहू, मंगळ, धनात चंद्र, तृतियात शनी अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमेश व कारक गुरू लग्नेशाशी युतीत असून तो पूर्ण दृष्टीने लग्नास पाहतो आहे. पंचमावर लाभातून राहू, मंगळ यांची पूर्ण दृष्टी आणि तृतीयातून शनीची तृतीय दृष्टी आहे.

महाराजांना गुरूमुळे संतती झाली पण संततीपासून सुख मिळाले नाही.

आपला,
(शिवभक्त) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गुंडोपंतांचा प्रतिसाद पटला

दोन्ही पंतांचे या विषयावरील लेखन अत्यंत मार्मिक व (माझ्या व्यक्तिगत अनुभवाप्रमाणे) वास्तवाला धरून आहे.
अर्थात् एवढा मोठा गुरू मिळूनही त्यापासून माणूस किती शिकेल किंवा नाही हे सर्वस्वी त्या शिष्याच्या मगदुरावर अवलंबून आहे.
बहुतेक माणसे (मी धरून) त्याऐवजी तो त्रास हतबलपणे कसाबसा सहन करतात व त्यातून सुटल्यावर नंतर निश्वास टाकतात असे वाटते. कसेही असो, व्यक्तिमत्व घडणीच्या/विकासाच्या दृष्टीने तो काळ महत्त्वाचा याबद्दल दुमत नाही.
माझीही रास कर्कच असून ही माझी आयुष्यातली दुसरी साडेसाती आहे. त्यामुळे धोंडोपंतांनी दिलेली बातमी आनंददायक वाटली.
गेल्या वेळीही असाच शनी वक्री होऊन जवळ सहा-आठ महिन्यांनी तिचा काळ वाढला होता असे अंधुक आठवते आहे.
एकूण फलज्योतिषावर विश्वास असो वा नसो, त्याला शास्त्राचा आधार असो वा नसो, एकदा साडेसातीच्या काळाचा अनुभव घेतला की किमान साडेसाती या गोष्टीवर तरी विश्वास ठेवण्याच्या बिंदूपर्यंत कोणीही माणूस येऊन ठेपतो असे मी तरी म्हणेन.
- दिगम्भा

शनि महाराज

नमस्कार धोन्दोपन्त,
खरच्\ किति सुन्दर माहिति दिलित. पन अजुन एक् क्रिपा होइल् का? इतर बाकिच्या राशिना काय परिनाम होइल ते सन्गाल क? उदा. मझि रास मकर आहे. आम्च्यसाथि देखिल काहि असेल तर जरुर सान्गा. खुप आभारि राहु.

आपला,

दिलिप दाबके.

दाबके साहेब

दाबके साहेब,

जेव्हा जेव्हा एखाद्या राशीबद्दल काही महत्वपूर्ण घटना असते, तेव्हा तेव्हा त्यासंबंधी लेखन आम्ही करतोच.

सध्याच्या शनीभ्रमणाचा मकरेवर काही लक्षणीय परिणाम होणारा नाही. मकरेत त्याचा राशीप्रवेश नाही किंवा त्याच्या धनात व व्ययातही नाही (साडेसातीचा संबंध). त्याचप्रमाणे सिंहेत गेल्यावर शनीच्या ३/७/१० पैकी कोणत्याही दृष्टीत मकर येत नाही.

(( त्यामुळे आनंदात आणि मजेत रहा, आयुष्याची मजा लुटा, एवढेच आम्ही तूर्तास सांगतो.))

मिथुन ते कन्या या चार राशी सद्य विषयाशी सध्या निगडीत असल्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे.

दिनांक ४/१/२००८ पर्यंत मकरेत कोणत्याही ग्रहाचा राशीप्रवेश संभवत नाही.

४ जानेवारीला प्रथम बुध मकरेत येईल मग १४ जानेवारीला रवी आणि १२ फेब्रुवारीला शुक्र मकरेत येईल. एवढेच ग्रहांचे राशीप्रवेश या वर्षी मकरेत आहेत.

सध्या फक्त नेपच्यून मकरेत आहे आणि तो २५ मे रोजी वक्री होत आहे. त्यावेळेस त्या संदर्भात लिहूच.

आपला,
(समयोचित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वा वा

दोन्ही पंतांनी छान लिहिले आहे. दिगम्भांचा अभिप्राय ही मस्त आहे.

धोंडोपंत,

मार्गी लागल्यावर शनी काय ते फलादेश का काय् म्हणता तुम्ही ते कसे देईल ते जरा सांगा की .

(मार्गभ्रष्ट) बापू

ज्योतिषशास्त्र - माझं व्यक्तिगत मत.

पृथ्वीपासून इतक्या दूर असलेल्या ग्रह-तार्‍यांचा, त्यांच्या मार्गक्रमणाचा मानवी जीवनावर काही बरा-वाईट परिणाम होतो यावर माझा विश्वास नाही. मुळात ज्योतिष हे 'शास्त्र' आहे, हेच मला मान्य नाही.

असो. इथेच थांबते. हा विषय वादाचा होऊ शकतो.

माधवी.

नमस्कार

नमस्कार धोंडोपंत,
वरील प्रतिसादात गुंडोपंत म्हणतात की, 'तसेच या काळात साधारण पणे 'स्व' चा शोध सुरू होतो.' या बद्दल मी असे ऐकले आहे की संशोधनात रस हे सुद्धा शनिचेच कारकत्व आहे. ही माहिती बरोबर असेल तर 'मी कोण' हा प्रश्न शनीच्या अंमलाखाली असताना पडणे स्वाभाविकच आहे. आपणास काय वाटते?

ज्योतिषशास्त्रा प्रमाणे, मनुष्य जन्मास आल्यावर कुंडलीच्या रुपाने त्याच्या संपूर्ण आयुष्याचा आलेख, प्रवासाचा नकाशा उपलब्ध होतो. निष्णात अभ्यासक योग्य ते निरिक्षण करुन भविष्य वर्तवतात. पण अनेकदा असे जाणवते की ते निश्चित भविष्य सांगत नसून सल्ला देत असतात.
जसे की, पुढील महिन्यात वाहनामुळे अपघाताचा संभव आहे!, असा योग असेल तर ज्योतिषी असे सांगून थांबत नाही तर तो पुढे सांगतो की वाहन चालवणे प्रवास करणे टाळा. ( एक उदाहरण म्हणूनच याकडे पाहू. उदाहरण देताना ते स्पष्ट नसेल तरी कृपया आशय लक्षात घ्यावा ही विनंती.)
या मध्ये दोन शक्यता जाणवतात,
१. त्याचा स्वतःच्या सांगण्यावर कमी विश्वास आहे. कारण विश्वास ठाम असेल तर तो असे म्हणेल की 'अपघात होणार'. बस्स.
२. अथवा अपघाताचा योग असला तरी तो काही प्रयत्नांनी टळू शकतो.
मला दुसर्‍या मुद्दयाविषयी जरा माहिती घ्याविशी वाटते.
जर प्रयत्नाने योग टळणार असेल तर मग ज्योतिषशास्त्राची नक्की भूमिका काय?
प्रसिद्ध ज्योतिर्विद ऍलन लिओ असे म्हणतो (असे मी ऐकले आहे :) की स्टार्स इन्क्लाईन बट डु नॉट कंपेल. म्हणजेच ग्रहयोग हे मनुष्यास कृत्य करण्यास भाग पाडत नाहित तर ते तिकडे ढकलून पाहतात.
म्हणजे जे घडणार आहे असे पत्रिकेत दिसते त्यातील बदल हे नेहमी मनुष्याच्या हस्तक्षेपावर अवलंबून आहेत का? जर तसे असेल तर मग तो हस्तक्षेप कसा होणार, आणि त्यानंतर त्याचे परिणाम काय असणार हे सुद्धा कुंडली पाहून आधिच समजेल. (समजले पाहिजे). म्हणजे हस्तक्षेपाने तो योग फळ देणार अथवा नाही हे सुद्धा अधिच समजणार असल्याने हस्तक्षेपाकडे कर्तृत्व जातच नाही.
यावर आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
-- (सांगितले गेलेले भविष्य योग्य न ठरण्याचाच योग पत्रिकेत असलेला) लिखाळ.

 
^ वर