सुखांत

मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला. हा चित्रपट दयामरण या संकल्पनेवर आहे. इच्छामरण या संकल्पनेशी साधर्म्य दर्शवणारी गोष्ट असल्याने माध्यमांनी त्याला इच्छामरणाभोवती गुंफले आहे, परिसंवादाच्या निमित्ताने चित्रपट व वास्तव यातील साम्य व तफावत याचा उहापोह झाला. एका अर्थाने चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच त्याचे सर्वांगिण परिक्षण. डॊ मोहन आगाशे यांनी मरण हा अपरिहार्य विषय असला तरी अप्रिय असल्याने त्याचे विश्लेषण होत नाही. विचार व भावना यांच्या कात्रीत सापडलेला हा विषय आहे. प्रेक्षकांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर त्याच्या दृष्टीने हा चित्रपट भावनेला हात घालणारा आहे.मधेच तो विचाराकडे झुकतोय कि काय अस वाटतानाच तो पुन्हा भावनेकडे वळतो. मुकुंद संगोरामांनी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जीवनमान हे वाढत आहे म्हणुन मत्युच्या दर्जाविषयी विचार होणे गरजेचे आहे हा विचार मांडला. संध्या टांकसाळे यांनी हा अप्रिय विषय साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात घेताना मनात वाचकांच्या प्रतिक्रिया काय येतील अशी धाकधुक असल्याचे सांगितले.डॊ शिरिष प्रयाग यांनी वैद्यकीय नितीमत्ते मध्ये हा विषय मांडताना होणारी मतमतांतर व त्यातील व्यवहार्यता यांची सुरेख मांडणी केली. आयसीयु क्षेत्रातील वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी दयामरण या संकल्पनेला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी अनुकुल प्रयत्न केले. अतुल कुलकर्णी हा अभिनेता विषय पटल्याशिवाय भुमिका स्वीकारत नाही.कायद्याचा गैरवापर होतो म्हणुन कायदाच करायचा नाही का? प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग होत असतो. दुरुपयोग थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन करुन आपण आपल्या घरात, नातेवाईकात माणस जेव्हा मृत्युच्या बेतात असतात त्यावेळी आपण त्यांना बांधुन ठेवत असतो. आपण त्यांना का शांतपणे जाउ देत नाही? या चित्रपटाच्या निमित्ताने यावर सखोल विचार आपली प्रक्रिया चालु झाली. ज्योती चांदेकरांना आईची भुमिका आव्हान होत. चित्रीकरणात गाडीला ब्रेक लागण्याच्या प्रसंगातुन त्यांना खरच मानेला धक्का बसला होता. किरण यज्ञोपवित ला कथेच्या निमित्ताने इंटरनेट पुस्तकाच्या माध्यमातुन सखोल माहिती मिळवुन अभ्यासकाच्याच भुमिकेत जावे लागले. कथेसाठी त्याच्यातला अभ्यासकाला थोडी तडजोड करावी लागली. परिसंवादात बोलताना त्याची ही थोडीशी नाराजी जाणवत होती. अनुया म्हैसकर यांचा ही पहिलीच निर्मिती. आई मुलगा संबंधावर चित्रपट तयार करण्याच्या मुळ कल्पनेतुन हा विषय घेतला गेला. चाकोरीबाहेरचा चित्रपट तयार करताना घेतलेली 'रिस्क' त्यांनी प्रेक्षकांवर सोपवली आहे.
आपल्या जगण्याशी संबंधित सगळे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे मग मृत्यूशी संबंधित निर्णय आपला आपल्याला का घेता येऊ नये, असा प्रश्न संजय सूरकर दिग्दर्शित या सुखांत नावाच्या उद्या म्हणजे २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्‍या चित्रपटात मांडला आहे.परिसंवादात प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली गेली. त्यामुळे परिसंवाद एकतर्फी न होता खर्‍या अर्थाने सुसंवादी झाला.

सुखांत ची कथा थोडक्यात अशी आहे . एक अत्यंत कर्तृत्ववान पण असाध्य आजारामुळे अंथरुणाला खिळलेली सीता बाई गुंजे ही स्त्री ( ज्योती चांदेकर) आणि तिला आदर्श मानणारा, तिच्यावर नितांत प्रेम करणारा तिचा मुलगा (अतुल कुलकर्णी) यांच्यातल्या नात्याची ही गोष्ट आहे. लोळागोळा होऊन जगण्याच्या सक्तीपेक्षा मृत्यूचा अधिकार या कथेतल्या आईला हवी आहे. सीताबाई गुंजे ही खरं तर एक खेडेगावातली बाई आहे. पण अत्यंत कर्तृत्वशाली आहे. लघुउद्योगाच्या माध्यमातून आपलं हे कर्तृत्व तिने सिद्ध केलेलं आहे. आपल्या वकील मुलाशी असलेलं नातं अतिशय भावनिक व वैचारिक आहे. त्याला तीनेच कष्टाने शिकवून मोठं केलेलं आहे. आयुष्याच्या एका वळणावर तिला कार मधे प्रवास करताना ब्रेक मारल्यावर मानेला हिसका बसुन अपघात होतो. त्यातुन 'क्वाड्रीप्लेजिया' नावाची व्याधी जडते.( उच्चारताना जीभेशी फारच झटापट करावी लागते) अतिशय दुर्धर अशा या व्याधीमध्ये रुग्णाचं मानेपासून खालचं शरीर लुळं पडतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टीं परावलंबी बनतात.पण मेंदूचं काम मात्र सुरळीत चालू असल्याने हे परावलंबित्व जाणवत राहतं.भावना व विचार यांच द्वंद्व चालु रहात. सीताबाई गुंजेसारख्या आत्माभिमानी बाईला आपल्यामुळे लोकांना होणारा हा त्रास आणि स्वत:चा स्वत:लाही होणारा त्रास पाहवत नाही . म्हणून ती मृत्यूची मागणी करते; ती मान्य व्हावी म्हणून मुलाला कोर्टात लढायला लावते.
चित्रपटात वकील मुलाची भूमिका करणारा अतुल कुलकर्णी हा प्रताप सिताबाई गुंजे या आपल्या नावात आईचे नांव लावतो यातच त्याची मातृभक्ती आली .हा मुलगा, तिनेच केलेली मृत्यूची मागणी पूर्ण करण्यासाठी कोर्टात बाजू मांडत आहे, दयामरणाच्या बाजूने कोर्टात आपली बाजू मांडण्याचा निर्णय हा एका विचारावर आधारलेला आहे. हे पात्र त्याच्या आईसारखंच अत्यंत कणखर आणि तर्कनिष्ठ आहे. आणि तर्काच्या कसोटीवर घासूनच त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचं हे प्रतिपादन जगभरातल्या विविध खटल्यांवर आधारलेल आहे.
परिसंवाद संपल्यावर अनुया म्हैसकर यांना भेटुन अधिक माहिती घेतली. मिपा, उपक्रम, मायबोली, मनोगत इत्यादी सारखी मराठी संकेत स्थळांवर गप्पा टप्पांसोबत एक विचारमंथनही चालू असत असे सांगुन त्यांना या चित्रपटावर आम्ही जरुर चर्चा करु असे सांगितले. http://finalwishthefilm.com या संकेत स्थळावर त्यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया जरुर द्या असे सांगितले.

असो! हा विषयच असा आहे कि नसलेली/ नको असलेली जवळीक आयुष्यात कधी ना कधी विचार करायला भाग पाडते. मंडळी, आपल्याला काय वाटतं?

वा वा

वा वा! इतक्या सुंदर परिसंवादाला हजेरी लावल्या बद्दल अभिनंदन.
हा विषय खरोखरच जीवाभावाचा आणि चिंतनिय आहे.
चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
नक्की पाहीन.

क्वाड्रीप्लेजिक लोकांचे आयुष्य हा खरोखर अतिशय क्लेशकारक विषय आहे.
फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या जवळच्यांसाठीही अतिशय क्लेशदायक!

त्यातही चित्रपटासाठी 'प्रतिपादन जगभरातल्या विविध खटल्यांवर आधारलेल आहे.' हे वाचल्यावर अभ्यासाचीही कल्पना आली असे वाटते.

सुखांतच्या चमु चे इतका महत्त्वाचा विषय मुख्य प्रवाहात आणल्या बद्दल अभिनंदन.

मराठी संस्थळांची माहिती त्यांना दिल्याचे वाचून तर विशेष वाटले. ही मौखिक प्रसिद्धी फार महत्त्वाची आहे.
आपला
गुंडोपंत

इच्छामरण

इच्छामरण या कल्पनेला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. 'जे आपल्याला निर्माण करता येत नाही ते संपवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे 'असे या चित्रपटात कविता मेढेकर म्हणते , पण ते पोकळ वाटते. 'जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे' हे नाहीतरी माझे आवडते वाक्य आहेच.
'सुखांत' हा चित्रपट बघावासा वाटतो आहे.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

उत्तम ओळख

लोकसंख्यावाढ आणि आयुष्यमानाची वाढ यांच्यामुळे भविष्यात वृद्ध/विकलांग लोकांची संख्या वाढतच जाणार.

आपण विकलांग झालो तर काय होईल? हा विचार भीतिदायक आहे. भीती दोन प्रकारची आहे, आणि दोन टोकांची आहे.
१. आपल्याला नको असताना दबाव आणून लोक खतम करतील.
२. आपल्याला जीवन नको असताना लोक, प्रेमाने का होईना, आपल्या स्वतंत्रतेची विटंबना करतील.

चित्रपट पाहायची इच्छा आहे.

उत्सुक

माझे या विषयावर मत दयामरणाच्या बाबतीत ठरलेले नाहि. मात्र इच्छा मरणाच्या बाबतीत ते असावे ह्याकडे झुकलेले नाहि.
तरीही दोन्ही विषयावर ठाम असे मत बनवू शकलेलो नाहि.
इथे होणारी चर्चा वाचायला उत्सूक आहे
(अर्थात जर चर्चा झाली तर, कारण चर्चा ज्योतिष/धार्मिक ग्रंथ यावर नसेल तर हल्ली गेले काहि दिवस अश्या विषयांना उपक्रमावर लोक डावलत आहेत हे श्री.धम्मकलाडू यांचे निरिक्षण मलाही पटू लागले आहे)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

दयामरण

इच्छामरण किंवा दयामरण हा फार गुंतागुंतीचा प्रश्न आहे.

सध्याच्या वैद्यकीय जगात उपचारांचा भर बर्‍याचदा माणूस जिवंत ठेवणे यावर असतो आणि तो समर्थनीय वाटतो. मृत्यू ही (अजूनतरी)इर्रिव्हर्सिबल गोष्ट असल्याने एकदा माणूस मेला की पुढे काही करता येत नाही. त्यामुळे न जाणो पुढे उपाय सापडला तर!!! असे समजून काही करून सध्या पेशंटला जगवा अशा प्रकारे उपचार केले जातात.

इच्छामरणाची/दयामरणाची अपेक्षा करणारे मुख्यत्वे दोन प्रकारचे लोक असतात.
माझे जगायचे ते जगून झालेले आहे आणि आता मला मरून जायचे आहे अशी इच्छा करणारे आणि कुठल्याशा विकाराने ज्या स्वरूपाचे विकलांग/पराधीन जगणे माझ्या वाटणीला आले आहे ते नको वाटते म्हणून मला जीवन संपवायचे आहे असे वाटणारे.

पहिल्या प्रकारच्या लोकांबद्दल माझे काही मत नाही.

दुसर्‍या प्रकारच्या लोकांमध्ये जे बेशुद्धीत असल्याने काहीच न कळता जिवंत असणारे लोक सोडले तर जाणिवेत असलेल्यांपैकी अनेक लोक तोंडाने 'मला मरू द्या' असा घोष करीत असतात. परंतु छातीत कळ येऊ लागल्यावर आप्तांना हाका मारतातच. त्यांना आप्ताना हाका न मारता मरून जाण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी ऐनवेळी तो पर्याय वापरण्याचे धाडस करीत नाहीत.

त्यामुळे दयामरणाचा प्रश्न माझ्या दृष्टीने कोमात असलेल्या व्यक्तींबाबतच लागू आहे.

नितिन थत्ते

वेदनाविरहित मृत्यु

त्यांना आप्ताना हाका न मारता मरून जाण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी ऐनवेळी तो पर्याय वापरण्याचे धाडस करीत नाहीत.

साधी ठेच लागली तरी तोंडातुन अभवितपणे आई ग! असं बाहेर पडते. जर वेदनाविरहित मृत्यु चा पर्याय उपलब्ध असता तर त्यांनी अशा हाका मारल्या नसत्या. भय वेदनेच असत मरणाच नसत. ८९ साली माझे वडिल कर्क रोगाने गेले. त्यावेळी त्यांना होणार्‍या वेदना कुणालाही पहावत नव्हत्या. मी कधीही कोणाचे वाईट केल नाही मग मला हा त्रास का? इश्वर मला यातुन का सोडवत नाही. असा प्रश्न त्यांना पडे. त्याच वेळी माझ्याकडे उपचारासाठी पैसे आहेत म्हणुन माझ्यावर उपचार होताहेत पण ज्यांच्या कडे नाहीत त्यांचे काय? असाही प्रश्न त्यांना पडे.
प्रकाश घाटपांडे