आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 1
'उपक्रमच्या' दिवाळी अंकामधला, 'भारतातील मूळ रहिवासी' हा माझा लेख वाचून, श्री. आल्हाद देशपांडे यांनी मला ई-मेल द्वारे त्यांचा प्रतिसाद पाठवला आहे. हा प्रतिसाद मला फार महत्वाचा वाटला आणि सत्य सांगायचे तर गोंधळात टाकणारा वाटला. प्रस्तुत लेखामधे मी गेल्या आठ किंवा नऊ हजार वर्षात, सिंधु नदीच्या खोर्यात उदयास आलेल्या मोहंजो-दाडो संस्कृतीच्या कालापासून ते आर्यांच्या आगमन कालापर्यंतच्या कालखंडातील कालदर्शक रेषा (TimeLine) कशी असेल याचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ घेऊन श्री. आल्हाद यांना अशी रास्त शंका आहे की आपले महत्वाचे धर्मग्रंथ या कालखंडात कसे बसवायचे?
या विषयावरचे माझे काही विचार मी खाली मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या धर्मग्रंथांची टाइमलाईन ठरवण्यात खरे म्हणजे अडचणी खूपच आहेत. एकतर यातला कोणताही ग्रंथ एकाच विविक्षित कालखंडात लिहिला गेलेला नसावा. त्या कालात सर्व ग्रंथ मौखिक असल्याने मूळ ग्रंथाचे स्वरूप काय होते हे आज सांगणे फार कठिण आहे. आज आपल्याला ज्ञात असलेल्या प्रतीत, मूळ भाग किती व नंतर घुसडलेला भाग किती हे ही सांगणे अशक्यच आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त थोडेफारEducated Guesses फक्त करू शकतो. या शिवाय संस्कृत भाषेच्या माझ्या संपूर्ण अज्ञानामुळे हे ग्रंथ मी अनुवादित स्वरूपातच वाचलेले आहेत. त्यामुळे या ग्रंथांमधे, ते मूळ ज्या कालात लिहिले गेले, त्याच्या कालखंडाबद्दल काय लिहिले गेले आहे हे मला माहिती नाही. परंतु माझ्या या अज्ञानामुळेच कदाचित मला जास्त तटस्थ भूमिका घेणे शक्य होईल असेही मला वाटते. म्हणूनच माझ्या या विचार शृंखलेत जर काही तृटी किंवा विसंगती आढळल्या तर त्यांचा वाचकांनी जरूर निर्देश करावा.
कालनिर्देश रेषा
वरती निर्देश केलेल्या माझ्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे, इंडोनेशिया मधील टोबा या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, इ.स.पूर्व 74000 वर्षे या नंतर एक सहस्त्र वर्षे, भारतात कोणताही आधुनिक मानव अस्तित्वात नव्हता. त्यामुळे या आधीचे कोणतेही धर्मग्रंथ कोणी रचले असले तरी आता ज्ञात असणे अशक्यप्रायच आहे.
सिंधु नदीच्या खोर्यातील सर्वात जुने अवशेष, पाकिस्तानमधल्या मेहेरगड या गावाजवळ सापडले आहेत.. या अवशेषांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पाषाणयुगातील आहेत (सापडलेली हत्यारे दगडापासून बनवलेली आहेत.) कार्बन डेटिंग प्रमाणे हे अवशेष इ.स.पूर्व 5500 या कालातील असावेत. म्हणजेच आपली कालनिर्देश रेषा या कालापासून सुरू होते. आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात, दगडापासून बनवलेल्या शिकारीच्या किंवा लढाईच्या कोणत्याही हत्यारांचा कुठेही उल्लेख नसल्याने, हे सर्व धर्मग्रंथ इ.स.पूर्व 5500 या कालखंडानंतरच लिहिले गेले असले पाहिजेत याबद्दल शंका वाटत नाही.
यानंतरचा महत्वाचा कालखंड सुरू होतो इ.स. पूर्व 3300 ते 1700मधे. या कालातच सिंधुच्या खोर्यातली संस्कृती पूर्ण बहरास आली होती. नगर रचना, शेती, व्यापार उदीम, वाहने (बैलगाडीचा आराखडा जो आपण अजुनही वापरतो) या सर्व बाबतीत ही संस्कृती अत्यंत पुढारलेली होती असे म्हणता येते. या कालातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रॉन्झ या धातूचा सुरू झालेला उपयोग. यामुळे अर्थातच हत्यारांच्या गुणवत्तेत प्रचंड सुधारणा झाली. सिंधु खोर्यातली ही संस्कृती इ.स.पूर्व 1700 ते 1300 या कालात अचानक नष्ट पावली. सिंधमधील इतिहास संशोधकांच्या मताप्रमाणे या संस्कृतीवर जास्त चांगली हत्यारे असलेल्या परदेशी आक्रमणामुळे हे घडले. या संस्कृतीचे उत्खननातले अवशेष हे सिद्ध करतात असे त्यांचे म्हणणे आहे.
या पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे याच कालखंडात झालेले आर्यांचे आक्रमण. या कालखंडातच लोखंडी हत्यारांचा शोध लागला होता व त्यामुळे आर्य योद्धे त्यांच्या शत्रूंपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी ठरू शकत होते. पुढच्या हजार बाराशे वर्षात आर्य संस्कृती भारताशी इतकी एकजीव झाली की त्या संस्कृतीलाच मूळ भारतीय संस्कृती म्हणण्याची वेळ आली.
यानंतर इ.सनाच्या पहिल्या शतकात कुषाण व नंतर हुण आक्रमणे झाली. परंतु या कालदर्शक रेषेचा अखेरचा टप्पा इ.सनाच्या सातव्या शतकात इस्लामच्या झालेल्या उदयानंतर, आठव्या शतकात मुहंमद बिन कासिम याच्या सिंधमधल्या आक्रमणाच्या कालात येतो. यानंतर भारतात इस्लामचे प्राबल्य वाढत गेले.
थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले तीन महत्वाचे धर्मग्रंथ इ.स. पूर्व 3300 ते इ.स. 700 या कालातच रचले गेले असावेत. असे (Exclusion Principle) ने म्हणता येते. हे विधान करणे जरी सोपे असले तरी ते सिद्ध करणे अशक्य कोटीतीलच काम वाटते. तरीसुद्धा आपले हे तीन धर्मग्रंथ म्हणजे रामायण, ऋवेद व महाभारत या कालखंडात बसवणे शक्य आहे का याचा विचार पुढील भागात करूया.
चंद्रशेखर
Comments
उत्तम
उत्तम. वाचते आहे. वेळ मिळाला की अधिक टीप्पणी करेन. तूर्तास लेखमालेबद्दल धन्यवाद.
रामायण म्हाभारताचा काळ
रामायण महाभारताचा काळ ही चर्चा आठवते.
प्रकाश घाटपांडे
भंपकपणा
उपक्रमचे एक सक्रिय सभासद श्री. गुंडोपंत यांना हा लेख भंपक वाटत असल्याचे त्यांनी दुसर्या एका चर्चा विषयाच्या माध्यमाद्वारे कळवले आहे. ही लेखमाला लिहिण्याच्या मागे माझा हेतू असा होता की शास्त्रीय कसोटीवर उतरणार्या सत्यांच्या आधारावर तर्क करून या धर्मग्रंथांचे काही कालखंड ठरवता येतील का? हे बघावे. परंतु माझा हा प्रामाणिक प्रयत्न जर भंपकपणा वाटत असला तर तो उपक्रमवर पुढे चालू ठेवण्यात मला तरी हंशील दिसत नाही. यामुळे ही लेखमाला उपक्रमवर पुढे चालू न ठेवण्याचा मी निर्णय घेतला आहे. माझ्या अक्षरधूळ या ब्लॉगवर आपण पुढचे भाग वाचू शकाल
चन्द्रशेखर
भंपकपणा
तुम्ही कशाला लक्ष देत आहात? इतके सगळे सभासद प्रतिसाद देत आहेत ना? गुंडोपंतांची आवड कशात आहे हे दिसून आलेच आहे.तेव्हा तिकडे दुर्लक्ष करुन तुम्ही लेखन करत राहा.
गुंडोपंत=उपक्रम नव्हे हे तुम्हाला मी सांगीतले पाहिजे का?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
उत्तम लेख
श्री चंद्रशेखर, सुरुवात उत्तम झाली आहे. एखाद्या सदस्याने केलेल्या विधानाकडे दुर्लक्ष करावे. माझ्याप्रमाणेच बहूसंख्य सदस्यांना आपला उपक्रम स्तुत्य वाटत आहे. कृपया लेखमाला थांबवू नये.
अरेरे
अरेरे!
मला या चर्चेत अशा रीतीने ओढले नसते तर खुप बरे वाटले असते. आपण कदाचित खरडी, व्यनि द्वारेही आपापली मते मांडू शकलो असतो.
असो,
आपला लेख 'मला' भंपक वाटला असे विधान मी केले आहे. लेखन अथवा लेखकावर ही टिप्पणी नाही.
हे 'मला' काय वाटते याचे विवरण आहे.
हा लेख कदाचित इतर सदस्यांसाठी मह्त्त्वाचा दस्त ऐवजही असेल. एखाद्यासाठी हे रसपूर्ण ज्ञानही असेल.
त्याविषयी मला काहीच म्हणायचे नाहीये. ते सदस्य या चर्चेत सहभागीही होतांना दिसत आहेत.
आपले लेखन मी पूर्वीही वाचले आहे. त्याला प्रतिसादही दिले आहेत. वेळ प्रसंगी तावातावाने चर्चाही केली आहे.
लेखक म्हणून मी आपल्या बद्दलच आदरच बाळगतो.
मी उपक्रमावर पूर्वीही अनेक लेखकांना उत्तेजन दिले आहे आणि भांडणे केली आहेत.
पण तरी ती लेखनावरून केली आहेत. भावनावेगात क्वचित प्रसंगी व्यक्तीगत टिप्पणी केली तरी कुणी येथून जावे म्हणून कधीच अपेक्षा केली नाही!
अश्या प्रकारची भावना माझी कधीच नव्हती आणि नसेल याची खात्री बाळगावी.
तसेच उपक्रमावर वेगवेगळे आणि कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्याची गळचेपी नकरता लेखन यावे याविषयी आग्रही राहिलो आहे.
सगळेच लेख सगळ्यांनाच आवडतील असे शक्य असेल असे मला वाटत नाही.
वरील सर्व बाबी ध्यानात घेवून्,
एखादा लेख मला आवडला नसला तरी आपण उपक्रमावर लेखन करत राहावे अशी मनापासून विनंती मी आपल्याला करतो.
आपला
विनम्र,
गुंडोपंत
भंपकपणाचा कळस
एकीकडे कुठलाही पुरावा न देता एखाद्याच्या शास्त्रीय लिखाणाला भंपक म्हणायचे आणि दुसरीकडे असली विनंती करायची. हा भंपकपणाचा कळस आहे. असो. उपक्रमाला फलज्योतिषचिकित्सा संवर्द्धन मंडळाच्या संकेतस्थळात रूपांतरित करायचे असल्यास विषय संपला!
चंद्रशेखर ह्यांना उपक्रमावर लिहावेसे वाटू नये, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गुंडोपंत म्हणजे उपक्रम नाही
कळवू देत. त्याने आपल्याला नेमका फरक का पडावा? आपल्याला काय करायचे आहे हे आपण ठरवले होते ना, मग त्यापासून मागे फिरून गुंडोपंतांना निमित्त बनवण्याचे कारण नसावे.
आपला उपक्रम स्तुत्य आहे. ज्योतिषशास्त्रविषयक लेखांना आलेले प्रतिसाद बघावेत आणि आपल्या लेखाला आलेले प्रतिसाद बघावेत. लोकांना काय पसंत आहे हे कळून येईल.
एका गुंडोपंतांना भंपकपणा वाटला तर आपण त्याचे खापर उपक्रमावर फोडून आणि जे सदस्य आपल्या पुढील भागांची वाट बघत होते त्यांना नाराज करून त्या पुढचा भंपकपणा करत आहात असे मला वाटते. स्पष्ट शब्दांबद्दल राग नसावा.
आपली मर्जी. सुजाण वाटणारी मंडळी अशाप्रकारचे वागतात तेव्हा "उपक्रमावर लिहिणे न लिहिणे हा ज्याच्यात्याच्या स्वेच्छेचा प्रश्न आहे" असे सांगावेसे वाटते.
या न्यायाने
आपला उपक्रम स्तुत्य आहे. ज्योतिषशास्त्रविषयक लेखांना आलेले प्रतिसाद बघावेत आणि आपल्या लेखाला आलेले प्रतिसाद बघावेत. लोकांना काय पसंत आहे हे कळून येईल.
या न्यायाने प्रभाकर नानावटी यांच्या जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (उत्तरार्ध) या लेखाला तर एकच प्रतिसाद आहे.
म्हणजे हा लेख सदस्यांना आवडलाच नाही असे म्हणायचे का?
;))
आपला
गुंडोपंत
~लेखनाला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९~
आपल्या लेखनाला प्रतिसादच येत नाहीत असे वाटून
काही लोक संस्थळ सोडून जाण्याच्याच धमक्या देतात.
मग सदस्य "सोडून जाउ नका राया" असे प्रतिसाद तरी देतातच!
;))
१००% बरोबर
होय. गणित सोपे आहे. हा लेख सदस्यांना आवडला नाही असे म्हणा किंवा सदस्य लेखाच्या वाटेलाच गेले नाहीत. सदस्यांना लेख आवडला असता त्यावर प्रतिक्रिया न देण्याएवढे लोक शिष्ठ नाहीत उपक्रमावर.
अरेरे
अरेरे!
एक ओळ राहिली होती
पण तोवर तुमचा प्रतिसाद आला. :-)
काही लोक तर इतके सोशल आहेत उपक्रमावर की एका लेखावर द्यायचा प्रतिसाद ते दुसर्याच लेखात जाऊन देतात.
हा हा हा!
हा हा हा!
खरे आहे, आणि मग वादग्रस्त सदस्यांना आपल्या लेखात ओढतात. :)
असो,
येनकेन कारणेन प्रतिसाद ५० पर्यंत पोहोचल्याशी कारण!! ;)))
आपला
गुंडोपंत
~लेखनाला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९~
आपल्या लेखनाला प्रतिसादच येत नाहीत असे वाटून
काही लोक संस्थळ सोडून जाण्याच्याच धमक्या देतात.
मग सदस्य "सोडून जाउ नका राया" असे प्रतिसाद तरी देतातच!
;))
शुभेच्छा!
मला याविषयी पूर्ण अज्ञान आहे. त्यामुळे हया लेखमालेतून ह्या लेखाप्रमाणेच उत्तमोत्तम माहिती मिळेल याची खात्री वाटते.
लेखमाला तडीस नेण्यासाठी शुभेच्छा!
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
वाचतो आहे...
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत आहे. दिवाळी अंकातील लेखही पुन्हा वाचला आहे.
वाचते आहे
पुढील भागांची वाट पाहते.
लिहले गेले की रचले गेले ?
श्री.चंद्रशेखरजी मथळ्यात धर्मग्रंथ कधी "लिहले गेले" असे म्हणतात आणि शेवटच्या परिच्छेदात "रचले गेले असावेत" असे म्हणतात. रचणे व लिहणे या भिन्न-भिन्न गोष्टी असल्याने त्यांना नक्की काय म्हणावयाचे आहे ते कळल्यास समजण्यास सोपे जाईल.
शरद
रचले का लिहिले?
शरद्जी आपला मुद्दा अगदी बरोबर आहे. ग्रंथ लिहिले का रचले हे कालखंड निश्चित करता आला तरच फक्त् खात्रीने ठरवता येईल.या ठिकाणी मी लिहिले आणि रचले हे दोन्ही शब्द समान अर्थानेच वापरले आहेत (Created) या अर्थाने.
चन्द्रशेखर
रचणे-लिहणे--समानार्थी ?
मान्य होणे अवघड. वेद हे प्रथम मौखिक पद्धतीने जतन केले गेले असल्याने त्यांच्या रचण्याचा आणि लिखाणाचा काल
यांमध्ये शेकडो वर्षांचे अंतर आहे. तसेच महाभारताच्या बाबतीत जय-भारत व महाभारत हे तीन निरनिराळ्या लेखकांनी
निरनिराळ्या काळात लिहले. रामायणाच्या बद्दल बाल कांड व उत्तरकांड प्रक्षिप्त मानले तर हीच अडचण निर्माण होते. रामकथा
ही वाल्मिकीपूर्वीही प्रचलित होती असेही मानावयास जागा आहे. आपला पुढला भाग समोर येईपर्यंत थांबावयास पाहिजे हे मान्य, पण तरीही हे मुद्दे राहून जाऊ नयेत म्हणून जरा (अप्रस्तुत) घाई.
शरद
रचले-लिहिले?
हे शब्द समान अर्थी नाहीत हे एकदम मान्य. या लेखाला मी प्रथम आपले धर्मग्रंथ कधी रचले गेले? असेच हेडिंग दिले होते. परंतु मला असे वाटले की या हेडिंगवरून, हे धर्मग्रंथ, लेखन कला अवगत होण्याच्या आधीच रचले गेले असणार असे लेख सुरू करण्याच्या आधीच मी ठरवून टाकले आहे असे वाचकांना वाटेल. तसे वाटू नये म्हणून हेडिंग थोडे बदलले. आपण तो मुद्दा माझ्या अपेक्षेप्रमाणे दर्शवलात.या बद्दल आभार.
अवांतर
इ.स.पूर्व ३३०० ते १७०० या कालातील सिंधु खोर्यातील संस्कृतीमधे चित्र लिपीतून परस्पर कम्युनिकेशन करण्याची(लेखन?) कला अवगत होती. त्यांची स्वतःची चित्र खुणांची लिपी होती. या लिपीत अंदाजे ४०० ते ६०० चित्र खुणा होत्या.
चन्द्रशेखर
महत्व कशाला?
यमन रागाचा जन्म केव्हा नी कसा झाला हे पाहण्यापेक्षा त्यातले एखादे छानसे गाणे वा बंदिश ऐकणे महत्वाचे, तद्वत धर्मग्रंथ केव्हा लिहिले गेले हे पाहण्यापेक्षा त्यात काय लिहिले आहे आणि ते आपल्या जीवनात कसे उपयोगी पडेल हे पाहणे अधिक महत्वाचे, असे मला वाटते!
आपला,
(कालातीत) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
महत्व
मग कशाला ते रागदारींवरचे लेख लिहिता? कुठल्या रागात कुठला सूर कोमल आणि तीव्र असला उहापोह करण्यापेक्षा त्या रागातील छानसो बंदीश ऐकावी. नाही का?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
हम्म..
हम्म..
वसंता, तुझं म्हणणंही खरं आहे..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
रोचक् विषय्!
धर्मग्रंथ कधी 'रचले' गेले हा खरच फार रोचक विषय् आहे. पुढील् लेखांबद्दल् उत्सुकता आहे.
कुठेतरी वाचल्याप्रमाणे, वेदांच्या अभ्यासावरुन वेद रचना काल साधारण ५००० वर्षे मागे (इ.स्. पु. ३०००) असावा असे आठवते. अभासकांच्या मते वेदांमधील् माहिती नुसार वेदांची रचना उत्तर् ध्रुवाच्या जवळ् झाली असावी. (पण महाभारताचा शेवट म्हणजे कलियुगाची सुरुवात् मानलं तर् महाभारत ही ५००० वर्षे जुने आहे.!??)
एक् शंका, रामायण-महाभारतात् वेदांचा उल्लेख्ख् आढळतो का?
प्रयागमध्ये बुचकळ्या
तात्यासाहेब, मी आपल्या यमनच्या ऐवजी दुसरे उदाहरण देतो. पवित्र गंगामातेत स्नान करण्याकरिता एकजण प्रयागच्या शांत प्रवाहात बुचकळ्या मारणे पसंत करेल तर दुसरा या गंगेचा उगम कोठे आहे ते पहाण्याकरता हिमालयाच्या उत्तुंग,हिमाच्छादित दर्याखोर्यात पायपीट करणे पसंत करेल. हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. "तू कशाला कडमडायला जातोस" हे विचारणे अनाठायी आहे. ज्याला काही लिहावयाचे ते त्याला लिहू द्या, वाचणे न वाचणे तर तुमच्या हाती आहे ना ?
शरद
सहमत आहे
उद्या यमन रागाचा शोध आम्हीच लावला असे ब्रायन ऍडम्स, जॅनेट ज्याकसन (दोघांची नावे कारण नसताना, सकाळी सकाळी डोक्यात आली म्हणून ठोकून दिली आहेत.) किंवा इतर कोणी म्हणू लागले तर मला तरी आवडेल बॉ यमनाचा उगम नेमका कसा झाला ते वाचायला.
शब्द साधर्म्य
शब्द साधर्म्यावरुन मला यमन हा येमेन मध्ये तयार झाला असावा असे वाटते. माणसाची शेपूट गळून पडली तसे कालांतराने मात्रा पडून गेले असावेत. :)
अवांतर
यमन/ईमन/ऐमन हे त्या रागाचं मुसलमान गवयांनी वपारलेलं/प्रचारात आणलेलं नाव आहे. कदाचित त्याकाळी प्रचारात असलेल्या फारसी भाषेत अशा अर्थाचा एखादा शब्द असेल. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. हिंदू गवई या रागास 'कल्याण' म्हणून संबोधित असत. 'कल्याण' हे भगवान शिवाचे नाव आहे असे ऐकले आहे. या यमन रागा शुद्ध मध्यम लावून जो 'यमन कल्याण' राग होतो त्यालाच 'जैमिनी कल्याण' असेही नाव आहे. हा 'जैमिनी' शब्द कुठून आला ठाऊक नाही. कदाचित 'यमनी/ऐमनी' चा 'जैमिनी' झाला असावा. असंही उत्तरेत पब्लिक य ला ज म्हणतंच.
-- येडा बांटू
मतभेद
काही मतभेद
(१) धर्मग्रंथांत रामायण व महाभारत यांचा समावेष होतो का ? माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांना "इतिहास" म्हणावयाची प्रथा आहे. वेद, वेदांगे, स्मृती, श्रुती यांना धर्मग्रंथ गणतात. रामायण व महाभारत (त्यात गीता असली तरीही) धर्मग्रंथ नव्हेत. येथे धर्मग्रंथ व धार्मिक ग्रंथ यातील फरक लक्षात घेतला गेला नाही असे दिसते."पंचम वेद" वगैरे नंतर त्यांचे महत्व व त्यांची लोकमानसावरील मजबूत पकड यामुळे झालेली भर आहे. तरीही शब्दच्छल सोडून रामायण-महाभारत यांचा रचनाकाल व
लेखनकाल यावरील माहिती/मत उद्बोधक ठरावे.
(२) दगडी हत्यारे : यांचा महाभारतात उल्लेख आहे. जयद्रथवधपर्व.अ.१२१.... दु:शासन (शूर पार्वतीयांस) म्हणाला, " वीरहो, तुम्ही पाषाणयुद्धात कुशल आहां आणि सात्यकीस तर हे माहीत नाही ; तेव्हां युद्धासाठी हपापलेल्या पण पाषाणयुद्धाची माहिती नसलेल्या या सात्यकीला तुम्ही लम्बे करा ".... शिलायुद्ध करण्यासाठी ते सात्यकीकडेचाल करून येत असता.... म्हणजे भारतीय युद्धात दगडांचा शस्त्र म्हणून उपयोग करणारे हजारो योद्धे होते.
(३) सिंधु संस्कृतीबद्दची विधाने थोडी जूनी (Outdated) आहेत. परकीय (येथे आर्य) यांच्या आक्रमणाने सिंधु संस्कृती विनाश पावली हे आता कोणी मानत नाही. शाळेतली माहिती विसरावयास हरकत नाही. परंतु याचाही चालू विषयाशी संबंध नसल्याने खोलात जात नाही. यावरचा स्वतंत्र लेख लिहावयास घेतला आहे.
(४) हे तीनही ग्रंथ इ.स.पूर्वच लिहले गेले असे सर्व मानत असतांना इ.स. सातव्या शतकापर्यंत कालरेघा ओढावयाची गरज कळत नाही.
शरद
'रचणे'च योग्य
रामायण व महाभारताला 'इतिहास' म्हणावयाची प्रथा कुठे आहे बरे? जाणून घ्यावेसे वाटते आहे. 'सनातन प्रभात' च्या संकेतस्थळावर का?
कोण शब्दच्छल करत होते! असो. धर्मग्रंथांत प्रक्षिप्त मजकुराचा ढीगही बराच आहे. त्यामुळे धर्मग्रंथासाठी 'रचणे'च क्रियापदच योग्य वाटते आहे.
म्हणजे कोण मानत नाही? अधिक प्रगत लोहयुगीन आर्य संस्कृतीने अहिंसा मार्गाने हलकेच ताम्रयुगीन सिंधू संस्कृतीचे स्थान घेतले की काय? शक्य असल्यास कृपया अधिक प्रकाश पाडावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मतभेद
शरदजी
आपल्या प्रतिसादाला मी उत्तर देणार नव्हतो कारण ही लेख माला पुढे चालू न ठेवण्याच्या निर्णय मी घेतला आहे. तरीही आपण उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देऊन ही चर्चा संपवावी असे वाटते.
१. दगडी हत्यारे.- इ.स.पूर्व ५५०० या कालात फक्त दगडी हत्यारे वापरत होते. धातूंचा शोधच तेंव्हा लागलेला नव्हता.
धातूचा शोध लागल्यावर दगडाचा हत्यार म्हणून वापर थांबला असे माझे म्हणणे नाही. (तो आजमितिलाही चालूच आहे.)
२. सिंधु संस्कृती.- आर्यांनी सिंधु संस्कृती नष्ट केली असे मी म्हटलेले नाही. इ.स.पूर्व १७०० ते १३०० या कालखंडात आर्य भारतात आले व याच सुमारास सिंधु संस्कृती नष्ट झाली एवढेच मी म्हटले आहे.
३. इ.स.पूर्व ५५०० ते इ.स. ७०० या दोन कालखुणा(मार्कर) आहेत एवढेच मी म्हणतो आहे. या दोन कालखुणांमधे हे ग्रंथ लिहिले/रचले/घडले/निर्मिले गेले एवढेच सांगायचे आहे.
४. इ.स ०००० च्या नंतर ही ग्रंथनिर्मिती झाली असे मी कुठेच म्हटलेले नाही.
५. ग्रंथनिर्मितीच्या प्रक्रियेला काय क्रियापद लावायचे याच्या बद्दल माझ्या मनात संदेहच आहे. घडले म्हटले तर पुरावा नाही. रचले म्हटले तर षडयंत्र किंवा कुंभांड रचल्यासारखे ही ग्रंथ रचना बनावट आहे असे माझे मत असावे असाही अर्थ निघतो. लिहिले म्हटले तर त्या वेळेस लेखन कला अवगत होती याला पुरावा काय असेही म्हणता येईल.निर्मिले असे म्हणले तर घडलेली गोष्ट सांगताना निर्मिली कशी? अशी शंका व्यक्त केली जाऊ शकते.यामुळे शब्द थोड्या भोंगळ (लूज) अर्थानेच वापरणे अपरिहार्य बनते.
तुम्ही या विषयात घेतलेल्या रसाबद्दल आभारी
चन्द्रशेखर
ही काय भनगड आहे ?
हे बरोबर नाही. चार लोकांनी चार प्रतिसाद दिले म्हणून लेखमाला बंद करतात काय ? छे,छे तात्यासाहेब वा मी काय म्हणतो याचा विपरित अर्थ घेणे योग्य नव्हे. चित्रा,श्रावण मोडक, ऋषिकेश यांच्याइतकीच मलाही पुढील लेखाची प्रतिक्षा आहे.
शरद
हे काय?
चंद्रशेखरजी, एक दोन लोक विरोधी सूर लावून आहेत तरी बाकीचे तुम्ही इथे जरुर लिहा म्हणत् आहेत ना? त्याकडे का दुर्लक्ष करता आहात?
हे काही बरोबर् नाही, लवकरात लवकर भाग २ टाका पाहू!
निर्णय पटलेला नाही
पुढचे लेखन ब्लॉगवर जाऊन वाचता येईल यात शंका नाही. पण लेखमाला इथे लिहिणे ज्या कारणासाठी बंद करता आहात ते कारण लेखमाला बंद करण्याच्या निर्णयाइतके भारदस्त आहे का? कुणी भंपक म्हणतं म्हणून आपण किंवा आपले काम भंपक ठरत असते? मला तुमचा हा निर्णय पटलेला नाही.
+१
पुढे न लिहिण्याचा (येथे) निर्णय अनाकलनीय.
निर्णय अनाकलनीय
माझंही या विषयावर अजिबात वाचन नाही. पण सिंधु संस्कृतीचा उल्लेख आला आहे म्हणून आठवलं टी.आय.एफ.आर.मधले काही भौतिकशास्त्रज्ञ, काही संस्कृत-अभ्यासक आणि चेन्नैच्या इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅथमॅटीकल सायन्सेसमधले एक गणितज्ञ मिळून सिंधू संस्कृतीमधल्या "चित्रांना" भाषा म्हणता येईल का, जुन्या ग्रंथांमधल्या खगोलीय घटनांच्या उल्लेखावरून त्या ग्रंथाचं वय ठरवता येईल का, अशा दिशेने संशोधन करत आहेत.
पुढचे लेख वाचायला नक्कीच आवडेल.
मला लेख भंपक का वाटला?
हा लेख मला भंपक वाटण्याची कारणे पुढील प्रमाणे.
इंडोनेशिया मधील टोबा या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, इ.स.पूर्व 74000 वर्षे या नंतर एक सहस्त्र वर्षे, भारतात कोणताही आधुनिक मानव अस्तित्वात नव्हता.
शास्त्रीय संदर्भ?
सिंधु नदीच्या खोर्यातील सर्वात जुने अवशेष, पाकिस्तानमधल्या मेहेरगड या गावाजवळ सापडले आहेत..
अवशेष सर्वात जुने असल्याचा शास्त्रीय संदर्भ?
कार्बन डेटिंग प्रमाणे हे अवशेष इ.स.पूर्व 5500 या कालातील असावेत.
कार्बन चाचणी कधी, कोणी केली होती त्याचा संदर्भ?
आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात, दगडापासून बनवलेल्या शिकारीच्या किंवा लढाईच्या कोणत्याही हत्यारांचा कुठेही उल्लेख नसल्याने,
अजून कोणत्या शास्त्रज्ञाचा असा निष्कर्ष आहे काय, त्याचा काही संदर्भ? की हे लेखकाचे व्यक्तीगत मत आहे?
हे सर्व धर्मग्रंथ इ.स.पूर्व 5500 या कालखंडानंतरच लिहिले गेले असले पाहिजेत याबद्दल शंका वाटत नाही.
या आधीच्या निष्कर्षाचा संदर्भ नसल्याने हे विधान मला योग्य वाटत नाही.
यानंतरचा महत्वाचा कालखंड सुरू होतो इ.स. पूर्व 3300 ते 1700मधे.
म्हणजे सुमारे २५०० वर्षांचा मधला काळ महत्त्वाचा नव्हता? याचा उल्लेख टाळण्याची काही खास कारणे?
नगर रचना, शेती, व्यापार उदीम, वाहने (बैलगाडीचा आराखडा जो आपण अजुनही वापरतो) या सर्व बाबतीत ही संस्कृती अत्यंत पुढारलेली होती असे म्हणता येते.
संदर्भ?
सिंधमधील इतिहास संशोधकांच्या मताप्रमाणे या संस्कृतीवर जास्त चांगली हत्यारे असलेल्या परदेशी आक्रमणामुळे हे घडले. या संस्कृतीचे उत्खननातले अवशेष हे सिद्ध करतात असे त्यांचे म्हणणे आहे.
कोणते इतिहास संशोधक? कोणत्या लेखात असे म्हणाले?
कधी? काही संदर्भ?
या पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे याच कालखंडात झालेले आर्यांचे आक्रमण. या कालखंडातच लोखंडी हत्यारांचा शोध लागला होता व त्यामुळे आर्य योद्धे त्यांच्या शत्रूंपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी ठरू शकत होते. पुढच्या हजार बाराशे वर्षात आर्य संस्कृती भारताशी इतकी एकजीव झाली की त्या संस्कृतीलाच मूळ भारतीय संस्कृती म्हणण्याची वेळ आली.
लेखक या विषयातील मतांतरांशी /विचारांशी अजिबातच परिचित नसावा की काय अशी शंका मला आली.
तसे नसल्यास, आर्यांचे आक्रमण या विचाराने लेख पुढे नेण्याचे प्रयोजनही लेखकाने विषद केले नाही.
तसेच लेखकाने भारतीय संस्कृती म्हणजे काय हेच मुळात सांगितलेले नाही. त्यामुळे 'त्या संस्कृतीलाच मूळ भारतीय संस्कृती म्हणण्याची वेळ आली.' या विधानाची संगती मला लागली नाही.
शिवाय लेखात इ.स.पूर्व १३०० व्या शतका नंतर थेट पहिल्या शतकाचाच उल्लेख येतो. हा काळ शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचा नव्हता असे मानले जाते काय? तसे असल्यास का व त्या संदर्भातील संशोधनाचा/लेखांचा काही संदर्भ?
या मधल्या काळातला कोणतेही उल्लेख टाळण्याचे कारण कळले नाही.
हा लेख शास्त्रीय रित्या सिद्ध झालेल्या गोष्टींवरच आधारित आहे. असे लेखकांनी एका चर्चेत कळवले आहे.
परंतु कोणतेही शास्त्रीय संदर्भ त्यांनी दिलेले नाहीत हे उल्लेखनीय आहे.
वरील उल्लेखलेल्या अनेक कारणांमुळे मला हा लेख भंपक वाटला.
आपला
गुंडोपंत
काही संदर्भ मिळाले ते घ्या
संदर्भः येथे बघा.
मेहेरगढ ही सिंधु नदीच्या खोर्यातील अतिशय जुनी साईट असल्याबद्दल संदर्भ येथे आहे.
कार्बन चाचण्या कोण करतात याचे संदर्भ इस्लामाबादेतील पुरातत्त्व खात्याला जाऊन विचारावेत. अवश्य मिळतील. ज्या देशांत अशी ठीकाणे आढळतात त्या देशातील पुरातत्त्व विभाग अशा चाचण्या करतात. काही इतर देश, ज्यांच्याकडे असे संशोधन करण्यास फंड आहे ते ही अशी संशोधने करतात. या संकेतस्थळाला भेट द्यावी, काही आणखी संदर्भही मिळतील. बाकी संदर्भ वरील विकी लेखातही आहेत. काही पूरक माहिती येथेही मिळू शकेल.
संदर्भ हे लेखमालेच्या शेवटी देण्याची प्रथा आहे. लेखांच्या प्रस्तावनेत संदर्भ सूची देण्याची प्रथा माझ्या पाहण्यात नाही. (ही माझी मर्यादा असेल.) तसे लेखक देतीलही कदाचित. आत्तापासून घाई कशाला?
पण
संदर्भ हे लेखमालेच्या शेवटी देण्याची प्रथा आहे. लेखांच्या प्रस्तावनेत संदर्भ सूची देण्याची प्रथा माझ्या पाहण्यात नाही.
जेथे संदर्भ द्यायचा असतो, देणे आवश्यक असते तेथे खुण करण्याची अथवा संदर्भाचा आकडा देण्याची प्रथा असते.
संदर्भच द्यायचा नसेल तेथे खुण केली जात नाही.
संदर्भाची सूची लेखाच्या शेवटी दिली जाते, असे माझे शास्त्रीय लेखना संदर्भात त्रोटक ज्ञान आहे.
वरील लेखात मला तरी कोठेही संदर्भा संबंधीत खुणा दिसल्या नाहीत.
कदाचित वयोमानानुसार मला संदर्भांचे छोटे आकडे दिसण्यात जरा कमी होत असावे.
असो,
आपला
गुंडोपंत
~लेखनाला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९~
आपल्या लेखनाला प्रतिसादच येत नाहीत असे वाटून
काही लोक संस्थळ सोडून जाण्याच्याच धमक्या देतात.
मग सदस्य "सोडून जाउ नका राया" असे प्रतिसाद तरी देतातच!
;))
उपक्रम म्हणजे विकी नव्हे
खरेच? उपक्रमावर अनेक शास्त्रीय लेख आले आहेत पण त्यांतील अनेकानेक लेखांत असा आकडा देण्यात आलेला नाही. अनेक लेखक हौशी असल्याने त्यांना असे करायचे असते किंवा एचटीएमएलने असे करणे शक्य असते हे ही माहित नसावे. ते सर्व लेख आपल्यामते भंपक आहेत हे आज कळले आणि प्रश्न मिटला.
चंद्रशेखरपंत, आम्ही तुमच्याप्रमाणेच भंपक लेख लिहितो. आतातरी काळजी नसावी. :))
एक वाक्य राहिले.
ज्याप्रमाणे गुंडोपंत म्हणजे उपक्रम नव्हे, त्याप्रमाणे उपक्रम म्हणजे विकी नव्हे.
अच्छा
उपक्रमावर अनेक शास्त्रीय लेख आले आहेत पण त्यांतील अनेकानेक लेखांत असा आकडा देण्यात आलेला नाही.
शक्य आहे. आकडा लागला तर देण्यात मजा ना! ;))
अनेक लेखक हौशी असल्याने त्यांना असे करायचे असते किंवा एचटीएमएलने असे करणे शक्य असते हे ही माहित नसावे.छच्छा म्हणजे ते हौशी शास्त्रीय लेखक असतात असे होय!
ते सर्व लेख आपल्यामते भंपक आहेत हे आज कळले आणि प्रश्न मिटला.
लेखकानी शास्त्रीय लेखन असण्याचा दावा केला असेल तर ते लेख भंपक आहेत असे मानण्यास जागा आहे असे वाटते.
आपल्याला काही तरी कळले हे वाचून आनंद झाला.
ज्याप्रमाणे गुंडोपंत म्हणजे उपक्रम नव्हे, त्याप्रमाणे उपक्रम म्हणजे विकी नव्हे.
गुंडोपंतांनी गुंडोपंत म्हणजे उपक्रम असा दावा केल्याचे माझ्या वाचनात कधीच आलेले नाही. तसेच उपक्रमाच्या संचालकांनी त्याप्रमाणे उपक्रम म्हणजे विकी असा दावा केल्याचेही वाचले नाही बॉ.
माझ्या माहिती प्रमाणे काही साम्ये असलेली ही दोन्ही स्वतंत्र स्थळे आहेत.
आपला
गुंडोपंत
~लेखनाला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९~
आपल्या लेखनाला प्रतिसादच येत नाहीत असे वाटून
काही लोक संस्थळ सोडून जाण्याच्याच धमक्या देतात.
मग सदस्य "सोडून जाउ नका राया" असे प्रतिसाद तरी देतातच!
;))
सारवा सारव
होका? नक्क्कीच! तुमची शास्त्रीय संदर्भांची ज्ञानलालसा इतरत्र दिसलीच आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
लेखमाला
गेल्या दोन दिवसात या लेखमालेबद्दल जे प्रतिसाद आले त्या बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. प्रियाली ताईंनी अनेक संदर्भ देऊन माझे काम सुकर केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. मी ही मालिका बंद करण्याचा जो निर्णय घेतला होता तो "आता मी नाही बोलणार हं!" या स्वरूपाचा नव्हता. माझा प्रामाणिक प्रयत्न जर वाचकांना भंपकता वाटत असेल तर तो चालू ठेवण्याचे काय प्रयोजन? असे मला वाटल्याने मी तो घेतला होता. उपक्रमवर मी आता लिहिणारच नाही असे मला म्हणायचे नव्हते.
असो. बहुसंख्य वाचकांना या विषयात रस आहे हे कळल्यामुळे ही लेख माला मी चालू ठेवत आहे. रामायण कालाबद्दलचा लेख पुढच्या ३/४ दिवसात मी आपल्याला सादर करीन.
एक छोटीशी विनंती. आता या पुढच्या सर्व लेखात आपण 'ग्रे एरिआत' शिरत आहोत. हे ग्रंथ मूळ स्वरूपात काय होते? कोणी लिहिले? कधी लिहिले? या बद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. आतापर्यंतच्या लिखाणाच्या प्रत्येक ओळीचा मी संदर्भ देऊ शकतो. या पुढे कोणत्या ना कोणत्या खगोलशास्त्रीय निरिक्षणाचा (Astronomical observation) आधार घ्यावा लागणार आहे. हा आधार व या ग्रंथांमधून मिळालेली माहिती यावरून तर्क संगत असा काही विचार मांडता येईल का याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या विचारात काही तृटी, चुका असल्यास जरूर दर्शवाव्या, परंतु शब्दछल करून ( रचले/लिहिले/घडले/निर्मिले यातले काय बरोबर? किंवा धर्मग्रंथ का इतिहास का कथा?) किंवा विषयाला सोडून( संस्कृती म्हणजे काय?) या सारख्या शंका प्रदर्शित न केल्यास मूळ विषय सोडून चर्चेला जी दुसरीच वळणे लागतात ती टाळता येतील.
लेख लिहिताना ज्या ज्या ठिकाणी मला आंतरजालावरचे संदर्भ देता येतील ते मी देईन. काही पुस्तकांचे संदर्भ मी लेखमालेच्या शेवटी देणार आहे.
धन्यवाद
चन्द्रशेखर
बघा पटते का?
लेखमाला चालु करत आहात ऐकून बरे वाटले
मात्र
हे मात्र पटले नाहि. लेखकाच्या हातात फक्त लेख लिहिणे अथवा न लिहिणे असावे.. त्यावर मला अशाच प्रतिक्रीया पाहिजेत.. अशा नको असे करणे किती संयुक्तीक आहे?
तुम्ही लेख लिहिता आहात हे उत्तम आहे. पण पुढे वाचक ठरवतील त्यावर प्रतिक्रीया काय द्यावात. ते तुम्ही ठरविणे / सुचविणे संयुक्तीक नाहि. बघा पटते का?
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
सहमत्!
ऋषिकेशशी सहमत् आहे. तुम्ही दुसर्या चेंडुलाच 'बॅकफुट' वर् जात् आहात् हे पाहुन् जरा मौज् वाटली. मौज् अशाकरता की हा विषय् म्हणल्यावर् पुष्कळ टिका, चिखलफेकेला इ. तयार रहावेच लागणार्!
संदर्भ
आणखी अनेक संदर्भ देता आले असते पण मला वेळ नाही मिळत. :( आपल्या लेखांना संदर्भ विचारले असता देता येतात. ज्योतिषविषयक लेखांना संदर्भ विचारण्याची गरजही भासत नाही. :-)
हे मान्य नाही. शब्दच्छल होऊ द्यात. त्यामुळे आपले विचार अधिक फोकस्ड (गंडलं मराठी) होतात असा माझा दावा आहे. तुम्हाही अशा शब्दच्छलांचा स्वतःसाठी उपयोग करून घ्या. प्रतिसादांतून शंका व्यक्त होऊ द्यात. ज्यांना रस आहे, ते उत्तरे देतीलच.
पुढील लेखांच्या प्रतीक्षेत
पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहे.
बघा पटते का?
या प्रकारचे प्रतिसाद/टीका यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त विषयांतर टाळता आले तर टाळावे एवढेच मला वाटते आहे. पुढच्या भागांच्यात टीका करण्यास खूपच खाद्य मिळणार आहे कारण सगळ्याच गोष्टी विवादास्पद आहेत.त्यावर टीका भरपूर येईल आणि यावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी विनंति केली इतकेच.सर्व शंकाना मी माझ्या कुवतीप्रमाणे उत्तरे देईनच व माझे चुकले असले तर मान्यही करीन.
चन्द्रशेखर
मी
आता फक्त पुढच्या लेखनाची वाट पाहतो आहे.
आर्यांचे आक्रमण?
भारतीय उपखंडावर आर्यांचे आक्रमण हा काही काळापूर्वी प्रचलित असणारा पण आता बर्याच पुराव्यांनी नाकारलेला प्रवाद आहे. फक्त भाषाशास्त्रविषयक शक्यतांतून काढलेले ते एक अनुमान होते. आता अधिक भाषिक आणि पुरातत्त्व/उत्खननातून आक्रमणाची शक्यता नाकारली जाऊन मध्य-पूर्व आशियातून स्थलांतरित लोक तत्कालीन भारतीय उपखंडातील संस्कृतीत सामावले गेले आणि त्यातून वैदिक संस्कृती निर्माण झाली असे मानले जाते. आर्यांचे आक्रमण होऊन सिंधू खोर्यातील संस्कृती नष्ट झाली याचे काही संदर्भ आहेत का?
http://en.wikipedia.org/wiki/Indo-Aryan_migration येथे चांगले विश्लेषण आहे.