आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 1

'उपक्रमच्या' दिवाळी अंकामधला, 'भारतातील मूळ रहिवासी' हा माझा लेख वाचून, श्री. आल्हाद देशपांडे यांनी मला ई-मेल द्वारे त्यांचा प्रतिसाद पाठवला आहे. हा प्रतिसाद मला फार महत्वाचा वाटला आणि सत्य सांगायचे तर गोंधळात टाकणारा वाटला. प्रस्तुत लेखामधे मी गेल्या आठ किंवा नऊ हजार वर्षात, सिंधु नदीच्या खोर्‍यात उदयास आलेल्या मोहंजो-दाडो संस्कृतीच्या कालापासून ते आर्यांच्या आगमन कालापर्यंतच्या कालखंडातील कालदर्शक रेषा (TimeLine) कशी असेल याचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ घेऊन श्री. आल्हाद यांना अशी रास्त शंका आहे की आपले महत्वाचे धर्मग्रंथ या कालखंडात कसे बसवायचे?
या विषयावरचे माझे काही विचार मी खाली मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या धर्मग्रंथांची टाइमलाईन ठरवण्यात खरे म्हणजे अडचणी खूपच आहेत. एकतर यातला कोणताही ग्रंथ एकाच विविक्षित कालखंडात लिहिला गेलेला नसावा. त्या कालात सर्व ग्रंथ मौखिक असल्याने मूळ ग्रंथाचे स्वरूप काय होते हे आज सांगणे फार कठिण आहे. आज आपल्याला ज्ञात असलेल्या प्रतीत, मूळ भाग किती व नंतर घुसडलेला भाग किती हे ही सांगणे अशक्यच आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त थोडेफारEducated Guesses फक्त करू शकतो. या शिवाय संस्कृत भाषेच्या माझ्या संपूर्ण अज्ञानामुळे हे ग्रंथ मी अनुवादित स्वरूपातच वाचलेले आहेत. त्यामुळे या ग्रंथांमधे, ते मूळ ज्या कालात लिहिले गेले, त्याच्या कालखंडाबद्दल काय लिहिले गेले आहे हे मला माहिती नाही. परंतु माझ्या या अज्ञानामुळेच कदाचित मला जास्त तटस्थ भूमिका घेणे शक्य होईल असेही मला वाटते. म्हणूनच माझ्या या विचार शृंखलेत जर काही तृटी किंवा विसंगती आढळल्या तर त्यांचा वाचकांनी जरूर निर्देश करावा.

कालनिर्देश रेषा
वरती निर्देश केलेल्या माझ्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे, इंडोनेशिया मधील टोबा या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, इ.स.पूर्व 74000 वर्षे या नंतर एक सहस्त्र वर्षे, भारतात कोणताही आधुनिक मानव अस्तित्वात नव्हता. त्यामुळे या आधीचे कोणतेही धर्मग्रंथ कोणी रचले असले तरी आता ज्ञात असणे अशक्यप्रायच आहे.
सिंधु नदीच्या खोर्‍यातील सर्वात जुने अवशेष, पाकिस्तानमधल्या मेहेरगड या गावाजवळ सापडले आहेत.. या अवशेषांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पाषाणयुगातील आहेत (सापडलेली हत्यारे दगडापासून बनवलेली आहेत.) कार्बन डेटिंग प्रमाणे हे अवशेष इ.स.पूर्व 5500 या कालातील असावेत. म्हणजेच आपली कालनिर्देश रेषा या कालापासून सुरू होते. आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात, दगडापासून बनवलेल्या शिकारीच्या किंवा लढाईच्या कोणत्याही हत्यारांचा कुठेही उल्लेख नसल्याने, हे सर्व धर्मग्रंथ इ.स.पूर्व 5500 या कालखंडानंतरच लिहिले गेले असले पाहिजेत याबद्दल शंका वाटत नाही.

यानंतरचा महत्वाचा कालखंड सुरू होतो इ.स. पूर्व 3300 ते 1700मधे. या कालातच सिंधुच्या खोर्‍यातली संस्कृती पूर्ण बहरास आली होती. नगर रचना, शेती, व्यापार उदीम, वाहने (बैलगाडीचा आराखडा जो आपण अजुनही वापरतो) या सर्व बाबतीत ही संस्कृती अत्यंत पुढारलेली होती असे म्हणता येते. या कालातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रॉन्झ या धातूचा सुरू झालेला उपयोग. यामुळे अर्थातच हत्यारांच्या गुणवत्तेत प्रचंड सुधारणा झाली. सिंधु खोर्‍यातली ही संस्कृती इ.स.पूर्व 1700 ते 1300 या कालात अचानक नष्ट पावली. सिंधमधील इतिहास संशोधकांच्या मताप्रमाणे या संस्कृतीवर जास्त चांगली हत्यारे असलेल्या परदेशी आक्रमणामुळे हे घडले. या संस्कृतीचे उत्खननातले अवशेष हे सिद्ध करतात असे त्यांचे म्हणणे आहे.

या पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे याच कालखंडात झालेले आर्यांचे आक्रमण. या कालखंडातच लोखंडी हत्यारांचा शोध लागला होता व त्यामुळे आर्य योद्धे त्यांच्या शत्रूंपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी ठरू शकत होते. पुढच्या हजार बाराशे वर्षात आर्य संस्कृती भारताशी इतकी एकजीव झाली की त्या संस्कृतीलाच मूळ भारतीय संस्कृती म्हणण्याची वेळ आली.

यानंतर इ.सनाच्या पहिल्या शतकात कुषाण व नंतर हुण आक्रमणे झाली. परंतु या कालदर्शक रेषेचा अखेरचा टप्पा इ.सनाच्या सातव्या शतकात इस्लामच्या झालेल्या उदयानंतर, आठव्या शतकात मुहंमद बिन कासिम याच्या सिंधमधल्या आक्रमणाच्या कालात येतो. यानंतर भारतात इस्लामचे प्राबल्य वाढत गेले.

थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले तीन महत्वाचे धर्मग्रंथ इ.स. पूर्व 3300 ते इ.स. 700 या कालातच रचले गेले असावेत. असे (Exclusion Principle) ने म्हणता येते. हे विधान करणे जरी सोपे असले तरी ते सिद्ध करणे अशक्य कोटीतीलच काम वाटते. तरीसुद्धा आपले हे तीन धर्मग्रंथ म्हणजे रामायण, ऋवेद व महाभारत या कालखंडात बसवणे शक्य आहे का याचा विचार पुढील भागात करूया.

चंद्रशेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

शब्द

आपला आक्षेप केवळ आक्रमण या शब्दाला असावा असे वाटते.

आपण दिलेल्या विकी दुव्यात 'स्थलांतरा'विषयी बरेच लिखाण आहे. तसेच आपणही मध्यपूर्वेतील स्थलांतरित लोकांचा उल्लेख केला आहे.

शिवाय आर्यांच्या स्थलांतराला पोषक पुरावे केवळ भाषिक नसून इतरही असल्याचे त्यात लिहिले आहे.
(लोकमान्यांनी आर्क्टिक होम इन् वेदाज् हा ग्रंथ आर्यांचे मूळ स्थान भारताबाहेर असल्याचे दाखवण्यासाठीच लिहिला होता आणि त्यात ज्योतिषशास्त्रातील पुरावे दिले होते).

सध्या आर्य/वैदिक संस्कृती एतद्देशीयच असल्याचा दावा केला जातो. त्याच्याशी आपल्या आक्षेपाचा गोंधळ होऊ नये म्हणून हा अवांतर प्रतिसाद.

नितिन थत्ते

एक् शंका.

जर स्थलांतर(च) झाले होते असे मानले तर त्यांना स्थानिकांचा विरोध झाला असेलच? की स्थलांतरापुर्वीच स्थानीक नष्ट झाले होते? का स्थानीक हे युद्ध करण्याइतके पुढारलेले नव्हते?

शब्द आणि अर्थ

आपला आक्षेप केवळ आक्रमण या शब्दाला असावा असे वाटते.

आक्रमण या शब्दाशी माझे काहीच वाकडे नाही (ह.घ्या.) मुळात असे काही "आक्रमण" झाले नव्हते हे बहुतांशी मान्य मत असल्याने पुन्हा तसा उल्लेख करणे योग्य नाही असे मला म्हणायचे आहे.

तसेच आपणही मध्यपूर्वेतील स्थलांतरित लोकांचा उल्लेख केला आहे.

हो.

सध्या आर्य/वैदिक संस्कृती एतद्देशीयच असल्याचा दावा केला जातो. त्याच्याशी आपल्या आक्षेपाचा गोंधळ होऊ नये म्हणून हा अवांतर प्रतिसाद.

तत्कालीन आणि सध्याची संस्कृती (त्या त्या वेळचे)एतद्देशीय आणि (त्या त्या वेळचे) स्थलांतरित यांच्या संस्कृतींच्या संयोगातून बनली असावी असे वाटते.

असे असावे

भारतीय उपखंडावर आर्यांचे आक्रमण हा काही काळापूर्वी प्रचलित असणारा पण आता बर्‍याच पुराव्यांनी नाकारलेला प्रवाद आहे.

माझ्या माहितीनुसार आर्यांचे एक मोठे आक्रमण झाले नाही. एका पाठोपाठ एक काही वर्षांच्या अंतराने आर्यांच्या टोळ्या किंवा जथ्थे भारतात येत गेले. हे उत्तर भारतीयांच्या स्थलांतरासारखेच म्हणावे लागेल. काहींना ही स्थलांतरे आक्रमणे वाटतात, ही गोष्ट वेगळी. असो. तर ही स्थलांतरे अनेक वर्षे सुरू होती.

आर्यांचे आक्रमण होऊन सिंधू खोर्‍यातील संस्कृती नष्ट झाली याचे काही संदर्भ आहेत का?

सिंधू संस्कृती नंतरही टिकून राहिली. निरंतरता ही भारतीय संस्कृतीचे एक लक्षण आहे असे म्हणतात. सिंधू संस्कृतीच्या काही वैशिष्ट्यांचे अवशेष आपल्या दैनंदिन जीवनातून डोकावतही असतील. जसे घाटावर जाऊन आंघोळ करणे.

संघर्षाविना आर्यांना इथे जम बसविता आला नसावा. ऋग्वेदात इंद्राचे एक नाव पुरंदर आहे. पुरंदर म्हणजे नगर/किल्ले ध्वस्त करणारा. सिंधू संस्कृतीवाल्यांचे ही नगरे/किल्ले होते असे म्हणतात.

असो. ह्याबाबतीत जाणकार अधिक सांगतीलच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

टोबा नावाचा महाप्रचंड ज्वालामुखी

कालच टोबा येथील ज्वालामुखीवर हिस्टरी च्यानेलवर मेगा डिजॅस्टर्स हा कार्यक्रम पाहण्यात आला. त्यानुसार, सुमारे ७४००० व.पू. (वर्तमाना-पूर्वी) सुमात्रा येथील बेटावर या महाप्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला. जग त्याकाळी शीतयुगातून जात होते. या ज्वालामुखीचा उद्रेक इतका प्रचंड होता की त्यातून उत्पन्न झालेली राख भारतवर्षातही पसरली होती.

अफ्रिकेतून यापूर्वीच आशियाच्या दिशेने स्थलांतर झाले होते पण या उद्रेकामुळे मानवाची संख्या केवळ १०,००० वर येऊन स्थित झाल्याचे म्हटले जाते. आफ्रिकेतून स्थलांतरित झालेला मानव आणि इतर अनेक प्राणी, त्यांच्या जाती-प्रजाती या उद्रेकात नष्ट झाल्या. असे म्हटले जाते की कपिकुटुंबातील चार महान जातींपेक्षाही (गोरिला, चिम्पान्झी, ओरँगउटॅन आणि मनुष्य) अधिक जाती या काळात अस्तित्वात होत्या. त्यांचा विनाश या उद्रेकात झाला. याचबरोबर प्राण्यांच्या प्रजातींचाही विनाश झाला.

व.पू. सुमारे ७०००० ते ६७०००० साली पुन्हा आफ्रिकेतून उर्वरित मानववंशाचे स्थलांतर झाले.

या काळात माणूस भाषेचा वापर करत नव्हता असे तज्ज्ञांचे मत आहे. भाषाच* नव्हती, तर महाकाव्ये, धर्मग्रंथ, लिपी वगैरेंचा प्रश्नच येत नाही.

* भाषा म्हणजे ध्वनी किंवा हावभावांतून होणारी देवाण घेवाण असा अर्थ येथे अपेक्षित नाही.

 
^ वर