जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (पूर्वार्ध)

फोर्थ डायमेन्शन - 33
जीन्सचे (जनुकांचे) बरोबरी करणारे मीम्स (पूर्वार्ध)
उपक्रम, दिवाळी, 2009 मधील श्री राजेंद्र यांचा 'एक उत्क्रांती अशीही' हा लेख वाचत असताना म.टा. मध्ये प्रसिद्ध झालेल्या याच विषयावर मी लिहिलेल्या लेखाची आठवण झाली. राजेंद्र यांच्या लेखाला पूरक व थोडीशी विस्तृत अशी माहिती यात असल्यामुळे हा लेखही वाचकांना आवडेल अशी अपेक्षा. लेखाच्या विस्तारभयामुळे लेख दोन भागात विभागला आहे.
मीम्स संकल्पना
आइन्स्टाइनच्या सापेक्षतावाद सिद्धांताला वैज्ञाविकांच्या जगात मान्यता मिळू लागते. चलेजाव चळवळीत गांधीजींच्या एका हाकेसरशी हजारो लोक तुरुंगात जातात. नाझी भस्मासुरांच्या वंशश्रेष्ठतेच्या हट्टापायी लाखो जर्मन तरुण-तरुणींचे आयुष्य बरबाद होते. आणीबाणीच्या काळात गप्प राहिलेली जनता ऐन निवडणुकीच्या वेळी मात्र ठरवून दिल्याप्रमाणे इंदिरा गांधी आणि तिच्या पक्षाचा पराभव करते. गणपती दूध पितो ही अफवा पसरल्यानंतर लाखो स्त्री-पुरुष दुधाचे भांडे घेऊन मंदिराजवळ गर्दी करू लागतात. 'एका महिन्यात दुप्पट पैसे करून देतो' अशा फसवणुकींच्या घटनांचा क्रम माहित असूनही त्याच प्रकारच्या घटनाक्रमांना लोकं बळी जातात...... अशा गोष्टींचा अभ्यास करत असताना एखाद्याच्या सुपीक डोक्यातून निघालेला विचार वा कल्पना बघताबघता पसरत पसरत हजारो -लाखो लोकापर्यंत पोचतो, हे लक्षात आले. अशा प्रकारे एखादा विचार सर्व स्तरातील लोकांना कसा काय भावतो, मग त्याप्रमाणे कृती करण्यास ते कसे काय उद्युक्त होतात, याबद्दल मानवी मनांचा व वर्तणुकींचा अभ्यास करणाऱ्यांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. संपर्क माध्यम, प्रचार यंत्रणा, मोहक वा प्रभावी व्यक्तिमत्व, भाषण शैली, देहबोली, इत्यादीमुळे अशा गोष्टी घडू शकतात यावर अभ्यासकांचा विश्वास नाही. यापेक्षा फार वेगळे मूलभूत असे काहीतरी मानवी जीवनात घडत असावे, असे या क्षेत्रातील संशोधकांना वाटते. गुणोत्तर श्रेणीने वाढत जाणाऱ्या अशा विचारांचा अभ्यास सुसान ब्लॅकमोर या मानसशास्त्रज्ञाने केला असून रिचर्ड डॉकिन्स यांनी मांडलेल्या संकल्पनेचा तिने पाठपुरावा केला. 'सायंटिफिक अमेरिकन' या वैज्ञानिक विषयासाठी वाहिलेल्या मासिकासाठी तिने एक लेख लिहिला असून त्यात 'मीम्स' या संकल्पनेची माहिती दिली आहे. तिने या विषयावर लिहिलेले मीम मशिन्स हे पुस्तक फार गाजले होते.
मनुष्य हा जगातील सर्वात विचित्र प्राणी आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार त्याचे इतर प्राण्याशी असलेले नाते स्पष्ट झाले असले तरी आपण प्राणीजगतात एकाकी आहोत. मनुष्य व इतर प्राण्यातील जनुकीय संकेत, अवयवांची रचना, चेताकोशांची (न्यूरॉन्सची) कार्यप्रणाली इत्यादीत समान धागा असला तरी मनुष्यप्राणी हा इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळा आहे. शरीराच्या आकाराच्या तुलनेत त्याचा मेंदू सर्वात मोठा आहे. तोच केवळ संगीत रचना करू शकतो. गुंतागुंतीच्या तंत्ररचना असलेल्या गाड्या - विमानं सहजपणे चालवतो. या विश्वाच्या उत्पत्तीबद्दल त्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वासाठी अशा विविध प्रकारच्या कार्यक्षमतेची खरोखरच गरज आहे का? जीवशास्त्रांच्या कार्यकारणानुसार संगीत, साहित्य निरुपयोगी आहेत. याच प्रकारे बुद्धीबळासारखे खेळ, गणितीय कुशलता, नृत्य- नाट्य यासारखे कलाप्रकार, मानवी जीवाच्या अस्तित्वासाठी किंवा त्यांच्या वंशवृद्धीसाठी आवश्यक आहेत, याचा ठोस पुरावा नाही. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा मनुष्यप्राण्यामधील जनुक, अस्तित्व व वंशवृ्द्धीव्यतिरिक्त इतर प्रकारच्या कार्यकुशलतेसाठी विनाकारण संसाधनांचा नाश का करतात, हे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही.
या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत असताना रिचर्ड डॉकिन्स या शास्त्रज्ञाने 'मीम्स' ही संकल्पना मांडली व या शास्त्रशाखेला 'मीमॅटिक्स' असे नाव दिले. 'मीम्स' हा जीन्स या शब्दाशी गमक साधण्याचा प्रयत्न होता. 'मीम्स' चा शब्दश: अर्थ अनुकरण असा होतो. मीम्स म्हणजे मिथके, गोष्टी, गाणी, संगीत, सवयी, कौशल्य, सर्जनशीलता, फॅशन्सचे प्रकार, कार्यपद्धती इत्यादींचे अनुकरण करण्याची रीत. मानवी स्वभावाचे विश्लेषण करण्यासाठी जनुकाबरोबरच मीम्स या संकल्पनेचा आधार घेणे उपयुक्त ठरेल, असे मीमॅटिक्सच्या अभ्यासकांचे मत आहे.
रेप्लिकेटर्स
मीम्स या संकल्पनेचा जन्म 35 वर्षापूर्वी झाला. रिचर्ड डॉकिन्स यांनी 'द सेल्फिश जीन' या पुस्तकात त्याची पहिल्यांदा मांडणी केली. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे विश्लेषण करत असताना, माहितीची अनेक वेळा होत असलेली नक्कल, ती करत असताना त्यात होणारे छोटे मोठे बदल व त्यातून निवडीला मिळत असलेला वाव असे तीन महत्वाचे मुद्दे मांडले जातात. माहितीवर सतत घडणाऱ्या या प्रक्रियेमुळे अस्तित्व व वंशविस्तार यांसाठी सर्वात सामर्थ्यवान अशी प्रतच टिकते. तिला नवीन गुणधर्म चिकटतात.
ज्याची नक्कल केली जाते, तिला डॉकिन्सने रेप्लिकेटर हे नाव दिले आहे. रेप्लिकेटरचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे जनुक. उत्क्रांती कुठल्याही प्रकारच्या रेप्लिकेटरमुळे होऊ शकते. यावर भर देताना मीम्सची कल्पना त्याला सुचली. नक्कल करताना एखादी चूक राहते. गोष्ट सांगत असताना काही भाग आठवत नाही. गाण्याचा अर्धा तुकडा लक्षात येत नाही. जुन्या विचारातून सर्वस्वी वेगळ्या व बुचकळ्यात टाकणाऱ्या एखाद्या भन्नाट कल्पनेचा जन्म होतो. या सर्व छोट्या मोठ्या बदलांसकट अनेक वेळा कित्येक प्रती काढल्या जातात व त्यातल्या काही नष्टही होतात. अशा प्रकारे मीम्ससुद्धा रेप्लिकेटर असून, प्रती काढणे, बदल घडवणे व निवड करणे या डार्विनच्या सिद्धांताला पोषक असे तिन्ही गुणधर्म मीम्समध्ये असू शकतात.
मीम्सः जनुकांचे सहकारी की स्पर्धक?
उत्क्रांतीतील 'जनुकामुळेच सर्व काही घडते' या संकल्पनेलाच धक्का देणारी ही मीम्सची संकल्पना आहे. शिवाय जनुकाप्रमाणेच मीम्ससुद्धा आपलीच प्रत निघावी म्हणून स्पर्धेत उतरू शकतात, हा विचारही त्यामागे आहे. उत्क्रांतीवादाच्या कट्टर समर्थकांना कदाचित हा विचार रुचणार नाही. कारण मानवी संस्कृती ही केवळ जनुकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी व वंशसातत्यासाठीच असते, असे त्यांचे ठाम मत आहे. ई. ओ. विल्सन या जीवशास्त्रज्ञाच्या मते जनुकं मानवी संस्कृतीला वेठीस धरत आहेत. काही वेळा मानवी संस्कृती व त्या समाजाचे व्यवहार जनुकांच्या मूलभूत उद्देशांना छेद देणारे आहेत असे वाटले तरी काही काळानंतर ती गाडी रुळावर येते व नैसर्गिक निवडीला वाव देते, हा अनुभव गाठीशी आहे. या अर्थाने पाहिल्यास मीम्स जनुकांचे सहकारी म्हणून कार्य करत आहेत व मेंदूची रचना करणाऱ्या जनुकांचे काम हलके करतात, असे म्हणायला हवे. परंतु मीम्सना स्वतंत्र अस्तित्व आहे असे गृहित धरल्यास जनुकाप्रमाणे तेसुद्धा आपापल्या प्रतीच्या अस्तित्वासाठी स्पर्धेत उतरू शकतील. मग मात्र मीम्स मानवी संस्कृतीला वेगळेच वळण लावतील. अशा परिस्थितीत जनुकांचे काहीही होऊ दे, त्याची पर्वा मीम्स करणार नाहीत.
मीम्सचे उत्तम उदाहरण म्हणजे साखळी पत्र किंवा साखळी ई-मेल. अशा प्रकारच्या साखळी पत्र /ई-मेल व्यवहारात पत्राच्या अनेक प्रती करून वाटण्याचा विचार रुजवला जातो. आलेला ई-मेल शंभरेक ई-मेल आयडीवर फॉर्वर्ड करण्यासाठी आग्रह धरला जातो. साखळीत खंड पडल्यास दैवी प्रकोप होईल अशी भीती दाखवली जाते. जास्तीत जास्त प्रती काढून वाटल्यास अमुक अमुक लाभ होईल, असे प्रलोभन दाखविले जाते. ही सर्व प्रक्रिया निरर्थक, वेळखाऊ आहे हे माहित असूनसुद्धा रिस्क नको म्हणत प्रती काढल्या जातात, ई-मेल फॉर्वर्ड केल्या जातात. याचाच पुढचा टप्पा म्हणून ईश्वराच्या अस्तित्वावरचा विश्वास (श्रद्धा) वा धर्मपालन यांच्याकडे पाहता येईल. भीती किंवा फळाची आशा यासाठी अनुकरण करत राहणे हाच धर्माच्या अस्तित्वाचा व तो दीर्घ काळ टिकण्याचा मर्म असावा. यासाठी आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे संपत्तीचे दान करण्यास व कुणातरी संत-महंताची आयुष्यभराची गुलामी पत्करण्यास मीम्स भाग पाडत असावेत. साखळी पत्राप्रमाणे धर्म वा पंथ यांचे मीम्स कदाचित तेवढे जालीम नसतीलही. परंतु भीती किंवा प्रलोभन कितपत प्रभावी आहे यावर त्यांची तीव्रता अवलंबून असेल.
मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे अनेक प्रकारचे मीम्स आहेत. भाषेचे ज्ञान, राजकीय जाणिवा, आर्थिक व्यवहार, शिक्षणाची आवड-निवड, विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दलची मतं, इ. अनेक विषयावरील निर्णयाची दिशा मीम्स ठरवतात. त्यांचे नियंत्रण करतात. कारण यात एकाचे अनुकरण दुसरा, दुसऱ्यापासून आणखी दोघे, दोनाचे चार, चाराचे आठ अशा प्रकारे गुणोत्तर श्रेणीने त्यांच्या संख्येत वाढ होत जाते. परंतु मानवी संस्कृतीचे नियम व व्यक्तींची स्मरण शक्ती यांच्या मर्यादेतच राहून मीम्सना काम करावे लागते. त्यामुळे मीम्सच्या प्रसाराला खीळ बसते.

क्रमशः

Comments

उत्तम माहितीपूर्ण लेख

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रभाकर नानावटी यांच्या या लेखातून नवीन,अत्याधुनिक आणि विश्वासार्ह अशी माहिती मिळते.पुनःपुन्हा वाचून समजून घ्यावे असे हे लेखन आहे. 'द सेल्फिश जीन' हे रिचर्ड डॉकिन्स यांचे पुस्तक वाचले असेल तर यातील मीम्स या संकल्पनेचे आकलन होणे थोडे सोपे जाईल.
आता या लेखमालेच्या उत्तरार्धाची प्रतीक्षा आहे.

मीम्स

लेख् आवडला
चन्द्रशेखर

उत्त्तम लेख

पुरक माहिती म्हणुन लेख दिल्याबद्दल धन्यवाद. अनुनय करणे ही बाब ज्या उर्मीतुन येते त्या संकल्पनेचा वेगळा विचार करावाच लागला.

मीम्सः जनुकांचे सहकारी की स्पर्धक?

हा विचार पाहु या कुठपर्यंत नेतो.
प्रकाश घाटपांडे

एक काव्यात्मक संकल्पना

मला "मीम्स" ही संकल्पना खूप रोचक आणि काव्यात्मक वाटते.

"काहीतरी द्विगुणित होते" ते जर रंगसूत्रात-पेशीत असेल, अंड-शुक्रातून पसरत असेल तर त्याला "जनुक"="जीन" म्हणावे; मनःपटलावर द्विगुणित होत असेल तर त्याला "मीम" म्हणावे. हे काव्य आहे, सुंदर आहे.

पण "मिमेटिक्स" वगैरे वैज्ञानिक शास्त्र करायला जावे, म्हणजे विपर्यास वाटतो.

आई-बापांकडून अपत्याला काही गुण मिळतात, हे ज्ञान शेकडो वर्षे होते. पण त्याचे काही गणित करता येते, त्या गणितापासून भाकिते करता येतात, तपासता येतात - असे असल्यामुळे जनुकशास्त्र हे वैज्ञानिक होते.

तोच प्रकार उत्क्रांतीच्या (डार्विनियन) सिद्धांताचा.

गुरूकडून तत्त्वे शिष्याला मिळतात, हेसुद्धा शेकडो वर्षांपासून आपल्याला माहीत आहे. या कल्पनांपैकी एखादी मरण पावते, तर एखादी पुढच्या-पुढच्या पिढ्यांमध्येही शिष्य मिळवत जाते, हेसुद्धा सामान्यज्ञान आहे. "मिमेटिक्स" मध्ये गणिते काय आहेत, किंवा तार्किक भाकिते काय आहेत? काय तपासून बघता येते?

एक सुंदर काव्यात्मक दृष्टांत आहे, हे पुन्हा मान्य करतो.

रोचक् विषय्.

रोचक विषय. डॉकीन्सचे सेल्फीश जीन आणि सुसान ब्लॅकमोर यांचे मीम मशीन्स ही दोन्ही पुस्तके मागवली आहेत. पुढील् भागाची वाट पाहतोय्.

 
^ वर