आभाळमाया!

फोर्थ डायमेन्शन -30
आभाळमाया!
टॉलस्टॉय व महात्मा गांधी यांनी कम्यून जीवन जगण्याविषयी काही (असफल) प्रयोग केलेले आपल्यातील काहींना तरी आठवत असेल. ह्यांचीच स्फूर्ती घेऊन काही समविचारी मित्र - मैत्रिणी व त्यांचे कुटुंबीय एकत्र आले व कम्यून पद्धतीनुसार राहू लागले. सुरुवातीला अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. वैचारिक तडजोड करावी लागली. परंतु शेवटी प्रयोग यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल. आताची ही त्यांची तिसरी पिढी आहे.
मुख्यस्थाव्यतिरिक्त इतर कुणालाही कम्यूनच्या चार भिंतीच्या बाहेरच्या जगाचा संपर्क नाही. व त्यांना त्याची गरजही वाटत नाही. त्या सर्वांना काय हवे काय नको हे सर्व मुख्यस्थ ठरवतो. त्याप्रमाणे व्यवस्था करतो. म्हणूनच मुख्यस्थाच्या घरात कुणालाही सहजासहजी प्रवेश मिळत नसे. त्याच्या घराच्या भिंतीच्या आत डोकावणेही शक्य होत नसे. कम्यूनच्या बाहेरच्या जगाशी फक्त मुख्यस्थाचाच संबंध येत असे. कम्युनच्या रहिवाश्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची जवाबदारी मुख्यस्थावर होती. कम्यूनच्या रहिवाश्यांना टीव्ही सिरियल्सचे वेड लागले होते. म्हणून बाहेरच्या जगातील सिरियल्सच्या नट-नट्यांना, निर्मात्यांना गुपचुपपणे आपल्या घरी बोलावून त्याला हवे तसे चित्रीकरण करून घेत असे.
कम्यूनमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. सर्व अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे रोज तीन - चार तास काम केले तरी पुरेसे ठरते. मनोरंजनाची साधनं विपुल प्रमाणात असल्यामुळे वेळ कसा निघून जातो हेच कळत नव्हते. टीव्हीच्या सानिध्यातच दिवसातील 10-12 तास सहजपणे बहुतेकांचे निघून जातात. कम्यूनमध्ये राहणाऱ्यांची या प्रकारच्या जीवनशैलीबद्दल काहीही तक्रार नाही. मुख्यस्थाच्या आज्ञेनुसार त्यानी चित्रीकरण करून घेतलेल्या टीव्ही मालिका त्या सर्वांच्या टीव्हीवर चोवीस तास दाखविण्याची सोय केली आहे. त्यामुळे टीव्ही मालिकेतील जगच खरे जग अशी त्यांची समजूत झालेली आहे. टीव्ही सिरियल्स मधील जगच वास्तव जग असे त्या सर्वांच्या मनात ठसवलेले आहे. आभाळमाया, चार दिवस सासूचे, या गोजिरवाण्या घरात, एक अधुरी कहाणी, अभिलाषा, एकता कपूरच्या 'क'च्या बाराखडीतील रडारडीच्या त्या सिरियल्स ..... अशा भरगच्च कौटुंबिक टीव्ही मालिकांच्या माऱ्यामुळे बाहेरच्या जगासंबंधीच्या त्यांच्या कल्पना सर्वस्वी वेगळ्या आहेत. या कम्यूनमधील आताच्या पिढीतील प्रत्येक जण इतर मानवी वस्तीपासून दूर असतानाच जन्मलेले व कम्यूनमध्येच वाढलेले असल्यामुळे बाहेरच्या जगाची अंधुकशी जाणसुद्धा त्यांना नाही. बालपणापासून मुख्यस्थाच्या आदेशाप्रमाणे शिक्षण घेतलेले असल्यामुळे सिरियल्समधील जगाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही जगाची कल्पना ते करू शकत नाहीत. मुख्यस्थाव्यतिरिक्त इतर कुणांचाही बाहेरच्या जगाशी संबंध येत नाही.
परंतु अचानक एके दिवशी त्यांच्यातील एक तरुण कुतूहलापोटी मुख्यस्थ रहात असलेल्या घराची संरक्षक भिंत ओलांडून घरात शिरतो. मुळात या घरात इतरांना प्रवेश नाही. तरीसुद्धा हा तरुण घरात जेव्हा डोकावून पाहतो तेव्हा तो अत्यंत आश्चर्यचकित होतो. कारण घराच्या त्या भागात कुठल्यातरी सिरियल्सचे शूटिंग चालू असते. शूटिंगच्या वेळची ती रडारड, मारामारी, आरडा-ओरडा बघून भांबावलेल्या स्थितीतच तरुण पळत पळत येवून स्वतच्या डोळ्यानी बघितलेली सर्व हकिकत इतरांना सांगतो. परंतु त्यातील प्रत्येक जण त्याला वेड्यातच काढतात.
"मुळात तू त्या घरात पाऊलच ठेवायला नको होते. ती तेवढी सुरक्षित जागा नाही."
"हे सगळे तुझ्या मनाचे चाळे आहेत. तू त्यावर विश्वास ठेऊ नको. "
"त्या घराच्या आत गेलेला माणूस ठार वेडा होऊनच बाहेर पडतो म्हणे. कदाचित तुला वेड लागलेले आहे."
तू काहिच्या काही बरळत आहेस. तुझ्या अशा बरळण्यामुळे आम्हाला त्रास होतो. तू इथून निघून जा.
अशी टिप्पणी करत खरोखरच बळेबळे ओढत ओढत त्याला कायमचेच कम्यूनमधून बाहेर हाकलून देतात.

Source: The Allegory of the Caves in the Republic, Plato (360 BC)

कम्युनची ही कथा एक रूपककथा आहे, हे आतापऱ्यंतच्या वाचनातून आपल्या लक्षात आले असेल. परंतु त्यातील आशय आपल्याला काय काय सुचवते? या रूपककथेला मुळात अनेक कंगोरे आहेत. काहींना या जगातील अगदी सामान्य वाटणारे अनुभवसुद्धा भासमय वाटतात. त्यांच्य मते वास्तव जगाची खरी ओळख होण्यासाठी काही विशेष गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ, जप-तप, ध्यान-अनुष्ठान, उपास-तपास, तपश्चर्या (किंवा अंमली पदार्थांच्या गुंगीत किंवा तुमच्या मेंदूच्या फ्रंटल लोबला इजा) यांचा अवलंब केल्याविना खऱ्या जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार नाहीत. ज्यांना या प्रकारचा साक्षात्कारी अनुभव आला आहे त्यांना नेहमीच इतरानी मूर्ख ठरविले आहे. वेड्यात काढले आहे. परंतु या वेड्यांच्या मते इतर सर्व मूर्खाच्या नंदनवनात राहणारे असून त्यांना जग कळले नाही.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र बहुतेक जण कुठलेही प्रश्न न विचारता, कुठलीही चिकित्सा न करता समोर जे दिसते तेच खरे जग आहे असे समजून जीवन जगत असतात. सामान्यपणे माणसं टीव्ही मालिकामधील जग शंभर टक्के खरे आहे असे मानत नसले तरी वृत्तपत्रं-पुस्तकं चाळून व टीव्हीच्या पडद्यावरील घटना बघून, त्यातील गोष्टींचे चर्वितचर्वण करत त्यातून मिळत असलेल्या 'ज्ञाना'चा निमूटपणे स्वीकार करतात. मुळातच या लोकांची आकलन क्षमता ज्या प्रकारे त्याना त्यांच्या समाजाने घडवले त्यावरच पूर्णपणे निर्भर असते. इराक - इराण येथील समाजाला अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हाच दहशतवादी असून तोच या जगातील सर्व हिंसाचाराला जवाबदार आहे असे वाटत असते. परंतु अमेरिकन समाजाला मात्र इराकच्या सद्दाम हुसेनचा नायनाट करून दहशतवादाला मूठमाती देणारा तो एक प्रेषित आहे असे वाटत असते. हे दोन्ही समाज आपापल्या परीने विचार करत असले तरी त्यातून आपल्याला सत्य काही गवसत नाही.
रूपक कथेत वर्णन केल्याप्रमाणे आपण कधीच चार भिंतींच्या बंदिस्त जगात राहत नसतो. परंतु एवढ्या मोठ्या जगात राहूनसुद्धा आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावलेल्या नसतात. झापड बांधून फिरणाऱ्या बैलाच्या अनुभवासारखे त्या अत्यंत सीमित असतात. एखादं विशिष्ट वृत्तपत्रच रोज रोज वाचण्याची सवय जडलेली असल्यास त्यातील (खऱ्या - खोट्या) माहितीतूनच आपले अनुभव विश्व साकारत असते. आपल्याला मान्य असलेल्या राजकीय प्रणालीच्या समविचारी मित्रांशीच नेहमी चर्चा करत असल्यास आपण आपल्यासमोर एक अदृष्य भिंत उभारतो व त्या भिंतीच्या पलिकडे काहिही नाही अशी (गैर) समजूत करून घेतो. इंटरनेटच्या काही ठराविक संकेत स्थळावरतीच आपला मुक्काम असल्यास त्याच संकेत स्थळाच्या जगाला आपण गुरफटून घेतो. जर आपण दुसऱ्यांच्या (विरोधी) मतांची कदर करत नसल्यास, दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्यास नकार देत असल्यास, त्यांच्याबरोबर चार पावलं चालत जाण्यास तयार नसल्यास आपण आपल्याच विश्वात कूपमंडूक वृत्तीने राहू लागतो. आपली गुहा सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाही. आपल्या अनुभवाच्या पलिकडेही काहीतरी असू शकते याची, पुसटशी का होईना, शंका येत नाही.
त्यामुळे कम्यूनमधल्या त्या तरुणाच्या विद्रोहीपणाचे कितीही कौतुक वाटत असले तरी तो आपल्यातला असणार नाही. आपल्यातला वाटणार नाही. तो शेवटपर्यंत उपराच वाटणार. त्याचे विश्व भावणार नाही. ते सहजासहजी दिसणारही नाही. त्यामुळे कूपमंडुक वृत्तीने राहणारे आणि भासमय जगाच्या पलिकडे दुसरे एखादे खरेखुरे जग असू शकते असे छातीठोकपणे सांगणारे यांच्यातील फरक कसा काय ओळखणार? जे स्वत:ला साक्षात्कारी म्हणवून घेत असतात त्यांना संशयाचा फायदा देत त्यांचेही म्हणणे खरे असू शकेल असे म्हणता येईल का? परंतु हे साक्षात्कारी म्हणवून घेणाऱ्याच्यातच एकवाक्यता नसते, विसंगत विधान करण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यामुळे ते सर्व जण बरोबर आहेत असे कधीच म्हणता येणार नाही. परंतु अशाही विसंगत मतांचा विचारच करणार नाही असा हट्टीपणा करत असल्यास त्या तरुणाला कम्यूनच्या बाहेर काढणाऱ्यात व आपल्यात फरक असणार नाही. आपल्या विचार शक्तीलाच मर्यादा घातल्यासारखे होईल.
म्हणूनच भासमय जग कोणते व वास्तव जग कोणते हा गुंता कसा सोडवायचा याचाच पुनर्विचार करावा लागेल!

Comments

लेख आवडला

रुपक कथेचे तात्पर्य समजले. जग खूप मोठे आहे, त्यातल्या अनुभवांनी, नवीन ज्ञानाने आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. चिकित्सक वृत्तीने भास-आभास तपासले पाहिजेत. आपल्या लेखावरुन श्री.म.माटेंच्या 'परमेश्वराचे भवितव्य' लेखाची आठवण झाली. त्या लेखात ते म्हणतात कोलंबस शोधत गेला म्हणून त्याला नवे भूपृष्ठ सापडले. गॅलिलियोने शोधले म्हणून त्याला चार चंद्राचे दर्शन झाले. आपल्या दैन्याला कर्म नव्हे तर, अमुक एका समाजरचनेमुळे ते दैन्य प्राप्त होते हे मार्क्सने सांगितले या आणि अशा वेगवेगळ्या तज्ञांनी माणसाच्या मनाला चौकटीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. चंद्र, तारे, आणि दैन्य जावे यासाठी पुजा करत बसलो असतो तर काही नवीन शोध लागले असते का असे ते विचारतात.

माझ्या मते ते सर्व विद्रोहीच. समाजाने त्यांना वेडे ठरवले, तरी त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने एका नव्या जगाची, विचारांची ओळख करुन दिली. आपण म्हणता तसे, आपल्या 'रुटीन'विश्वातून आपण् बाहेर पडलो पाहिजे. तसेही मानवी मन एकाच गोष्टीत रमत नाही. तेव्हा चार भिंती माणसाला चिकित्सक वृत्ती नेण्याकडे तरी आडव्या येऊ नयेत. 'इंटरनेटच्या काही ठराविक संकेत स्थळावरतीच आपला मुक्काम असल्यास त्याच संकेत स्थळाच्या जगाला आपण गुरफटून घेतो' गुरफटून घेऊ नये असे वाटते. पण हेही एक व्यसनच आहे, असे असले तरी आपले विचार चौफेर असावेत, विचारांची, ज्ञानाची लांबी रुंदी तरी वाढावी आणि विचार प्रसंगी लवचिकही असावेत असे वाटते.

सारांश : आपापली हद्द सोडून दोन पावले पुढे डोकावण्याचा विचार जरुर आला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

गुहेतील बंद्यांचा दृष्टांत

हा प्लेटोचा अत्यंत काव्यात्म आणि स्मरणीय दृष्टांत आहे.

(याचेच अधिक पॅरॅनॉइड रूप "द ट्रूमन शो" चित्रपटात आहे.)

प्रत्येकाने कुंपणाबाहेर जायचा प्रयत्न करावा, याबाबत सहमत आहे.

- - -

कुंपणाबाहेर गेलेला जेव्हा काही अद्भुत सांगतो, तेव्हा मात्र ऐकणार्‍यांना "वेड" आणि "व्यापक सत्य" यांच्यात फरक करणे अतिशय कठिण जाणार हे तर क्रमप्राप्त आहे. अशा वेळेला सत्य जाणण्यामुळे ऐकणार्‍याचे काही हित आहे, असे काही पटवायची जबाबदारी कुंपणाबाहेरचे जग पाहिलेल्या द्रष्ट्याची असते.

द्रष्टा असल्याची शक्यता मानून प्रत्येक वेड्याचे सत्य पडताळायला जावे, तर पहिल्या खर्‍या द्रष्ट्यापर्यंत पोचण्यापूर्वीच आयुष्य संपून जायचे! ऐकणार्‍याची ही पंचाईत द्रष्ट्याने जाणून घ्यावी.

वेड्यांच्या कलकलाटामधून वेगळे, असे आपले म्हणणे श्रोते कोणत्या मार्गाने जाणून घेईल, हा विचार द्रष्ट्याने केला पाहिजे.

सुरेख.....

जर आपण दुसऱ्यांच्या (विरोधी) मतांची कदर करत नसल्यास, दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्यास नकार देत असल्यास, त्यांच्याबरोबर चार पावलं चालत जाण्यास तयार नसल्यास आपण आपल्याच विश्वात कूपमंडूक वृत्तीने राहू लागतो.

आपल्या अनुभवाच्या पलिकडेही काहीतरी असू शकते याची, पुसटशी का होईना, शंका येत नाही.

ही वाक्ये झकास आहेत. नवं काहीतरी करायची स्फूर्ती देणारा लेख म्हणता येईल....
धन्यवाद.

-सौरभ.

==================

पहिल्याच फटक्यात १३? वा वा वा! १३ आकडा एवढाही अशुभ नसावा.

पटले.

इंटरनेटच्या काही ठराविक संकेत स्थळावरतीच आपला मुक्काम असल्यास त्याच संकेत स्थळाच्या जगाला आपण गुरफटून घेतो.
डोळ्यावर झापडे लावून घेतली की माणून स्वतःला शहाणा आणि जगाला मुर्ख समजायला मोकळा कसा होतो हे अगदी चपखलपणे पटवून देण्यात आले आहे. नव्हे ते पटणारेच आहे. सभोवतालचे जग खरे बघायचे तर मटा, लोकसत्ता, सकाळ बरोबरच सामना, सनातनप्रभात ही चाळायला हवे. राजकीय विचार ठरवायचे तर वचननामा, वचकनामा, जाहीरनामा सगळेच नजरे खालुन घालायला हवे. पण तरीही शेवटी डोळ्यावरची झापडे उतरवायची तर प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे मान्य करून त्या दृष्टीने विचार करायची सवय मेंदूला लावायला हवी. लेखकांचे विचार ब्रॉडमाईंडेड (प्रतिशब्द सुचला नाही) आहेत म्हणून काय ते पाचसहा वर्तमानपत्रे वाचत असतील असे संभवत नाही.

दोनच का?

पण तरीही शेवटी डोळ्यावरची झापडे उतरवायची तर प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे मान्य करून त्या दृष्टीने विचार करायची सवय मेंदूला लावायला हवी.

प्रत्येक गोष्टीला दोनच बाजु का? नाण्याला दोन बाजू असतात हे वाक्य सुद्धा आता गुळगुळीत झाले आहे.सात आंधळे व हत्ती ही रुपककथा अनेक बाजू सांगतात.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर