देनेवाला छप्पर फाडके देता है!
फोर्थ डायमेन्शन -29
देनेवाला छप्पर फाडके देता है!
एटीएममधून पैसे काढत असताना प्रकाशला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला फक्त एक हजार रुपये काढायचे होते. परंतु पाचशेच्या दोन नोटाऐवजी भराभर पन्नास नोटा बाहेर पडल्या. चोविस हजाराचा चक्क फायदा! स्वत:च्या खात्याच्या रिसिटवरसुद्धा फक्त एक हजार रुपये वजा केल्याची नोंद होती. घरी जाण्यापूर्वी वाटेतच असलेल्या बँकेत जावून फक्त एक हजार रुपयेच काढले आहेत याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली. सर्व पैसे सुरक्षित जागेत ठेऊन बँकेतले कुणी तरी आपली चूक उमगून त्याचा पत्ता हुडकून त्याला शोधत शोधत येण्याची वाट बघू लागला. चार - पाच आठवडे गेले; दोन - तीन महिने उलटले. तरी त्याच्याकडे कुणीही फिरकले नाही वा त्याच्या खात्यातील शिलकी रकमेतूनसुद्धा चोविस हजार कमी झाले नाहीत. काही महिन्यानंतर प्रकाशने आपल्याला मिळालेल्या घबाडातून पहिला हप्ता भरून एक महागडी बाइक विकत घेतली.
एके दिवशी बाईकवरून घरी परत येत असताना त्याला उगीचच अपराधीपणाची जाणीव होऊ लागली. "मी खरोखरच चोरी केली का?" "नाही, मी तसे काहिही केले नाही" असे म्हणत स्वत:च्या मनाची समजूत घालू लागला मी स्वत:हून पैसे घेतले नाहीत. कुणी तरी ते मला दिले. यात माझी अजिबात चूक नाही. मी कुणालाही लुबाडले नाही. बॅकेच्या दृष्टीने चोविस हजाराचे नुकसान म्हणजे किस झाड कि पत्ती! समुद्राच्या पाण्यातील एक थेंब! शिवाय बँकेतील अशा उधळपट्टीचा विमा उतरवलेला असतो म्हणे! त्यामुळे बँकेला झळही बसला नसेल! शेवटी बँकेचीच ती चूक होती. बँकेनी एटीएम यंत्रणा अचूकपणे कार्य करेल याची खात्री करुन घ्यायला हवी होती. हा त्यांच्याच गलथानपणाचा नमूना होता. माझी काही यात चूक नाही. मला फक्त नशीबाने साथ दिली.
सामान्यपणे एटीएममधून शंभर रुपये जरी जास्त आले तरी स्वत:हून कुणीतरी बँकेत जाऊन हे तुमचे पैसे म्हणून परत देणार नाहीत. हे माझे नव्हेत. तुमचे पैसे! असे म्हणत पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा (गाढवपणा!) करणारे लाखात एक नव्हे, तर कोटीत एक तरी सापडतील की नाही याबद्दल शंका आहे. म्हणूनच त्याला वृत्तमूल्य असावे. याचा अर्थ सर्वच्या सर्व अप्रामाणिक आहेत; त्यांना नीतीची चाड नाही; त्यांच्यात नैतिकता नाही असे नाही. उदाहरणार्थ दुकानदाराने सुटे पैसे परत करताना जास्त पैसे दिल्यास सामान्यपणे बहुतेक जण पैसे परत करून दुकानदाराकडून धन्यवाद मिळवतात. परंतु एखाद्या यंत्रणेकडून वा बिनचेहऱ्याच्या व्ययस्थेकडून अशी चूक झाल्यास त्यांना अद्दल घडली म्हणत पैसे बळकावतील.
समोर उभे असलेल्या व्यक्तीच्या चुकीचा आपण गैरफायदा घेणे हे आपल्या नीतीतत्वात बसत नाही. परंतु एखादी अनामधेयी, बिनचेहऱ्याची संस्था वा व्यवस्था किंवा यंत्रणा यांची गोष्टच निराळी! अशी समजूत आपण करून घेतलेली असते. कारण या अजस्रकाय यंत्रणेला फसवल्यामुळे कुणाचेच काहिही नुकसान होत नाही, ही त्यामागची मानसिकता असते. गंमत म्हणजे यात काहिही अनैतिक नाही याची आपल्याला मनोमन खात्री असते. विजेच्या मीटरमध्ये बिघाड होऊन दर महिन्याला कमीत कमी विजेचे बिल येत असल्यास आमचा मीटर नादुरुस्त असून त्वरेने दुरुस्ती करावी असे वीज कंपनीला आपणहून जाऊन सांगत नाही. कारण यात आपण मुद्दामहून विजेची चोरी केली नाही ही मानसिकता त्यामागे असते. चूक वीज कंपनीची आहे, माझी नव्हे !
कुठलेही (लंगडे) समर्थन देत आपल्या या कृत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला तरी ती शेवटी चोरीच! चोरीचा उद्देश नव्हता, हा एक अपघात होता, मला माहित नव्हते, मला वेळ नव्हता, असले मुद्दे येथे गैरलागू ठरतील. उदाहरणार्थ, रात्रीच्या अंधारात रस्त्यात तुम्हाला भरपूर दाग-दागिने व नोटांनी भरगच्च भरलेली एक बॅग सापडली. अशा वेळी बॅग हरवलेल्याचा मनापासून पत्ता न शोधता हरवलेला स्वत:हून येण्याची वाट बघत बसत असल्यास तो नैतिक गुन्हा ठरेल. रस्त्यावरची बॅग उचलणे हा गुन्हा नसून बॅगेच्या मालकाचा मनापासून शोध न घेता स्वस्थ बसणे हा गुन्हा आहे. आपल्यावरच अशा प्रकारच्या पैशाची बॅग गहाळ होण्याचा प्रकार घडल्यास आपण काय केले असते, याचाही विचार करायला हवा. बॅग परत न आणून देणाऱ्यास शिव्या-शाप देत आपल्या विसराळूपणाला दोष देत आपण गप्प बसतोच की!
बॅंकेच्या व्यवहारात चोविस हजार रुपये म्हणजे किस झाड कि पत्ती! असे वाटण्यातच प्रकाशची चूक आहे. कारण पैसे परत न करण्याची कृती व यासाठी तो करत असलेला तात्त्विक युक्तीवाद या दोन्ही अनैतिक आहेत. विमा उतरवल्यानंतर काहिही करण्याची मुभा असते, हेच चुकीचे आहे. प्रकाश एखाद्या मॉलमधून वस्तू चोरू लागल्यास ते त्याचे नैतिक अध:पतन ठरेल. कारण मॉलमधील वस्तूंची पण विमा उतरवलेला असतोच की!
प्रकाश स्वत:च्या युक्तीवादात पूर्णपणे फसला होता. आपण काय करत आहोत हेच त्याला नीटपणे उमगत नव्हते. इतर लाखो सामान्य लोक जे करतात ते मी केले तर बिघडले कुठे? असे विधान करणे ही शुद्ध पळवाट ठरेल. मुळातच प्रत्येक जण स्वत:च्या फायद्याला पूरक असाच युक्तीवाद करण्याच्या प्रयत्नात असतो. नुकसान होत असल्यास नीती, विवेक, तत्त्व गुंडाळून ठेवल्या जातात. ही मानसिकता बदलणे फार जिकिरीचे काम ठरेल.
परंतु ही मानसिकता बदलण्यात खरोखरच विवेक आहे का?
Comments
बरोबर आहे
असे ब-याचदा होते बुआ....
||वाछितो विजयी होईबा||
आणखी एक बाजू
बॅंकेच्या व्यवहारात चोविस हजार रुपये म्हणजे किस झाड कि पत्ती! असे वाटण्यातच प्रकाशची चूक आहे.
याला आणखीही एक बाजू आहे. समजा ए.टी.एम मशीनच बिघडलेले असले तर असे प्रकार वारंवार होऊन बँकेचं अधिकधिक नुकसान होत राहण्याची शक्यता आहे. कदाचित कोणीतरी मशीन टॅम्पर करून अगोदर फायदा घेतला असण्याचीही शक्यता आहे. या सर्व गोष्टी बँकेच्या नजरेस याव्या म्हणून झालेला प्रकार बँकेला सांगणे हे सज्जन नागरिकाचे कर्तव्य आहे.
मान्य
सपशेल मान्य आहे.
विवेक आहेच. प्रश्नाचे प्रयोजन समजले नाही. जे श्रेयस आहे ते प्रेयस नसले तरी त्याच्यात विवेक आहेच.
पण कळते ते वळेलच असे नाही.'अपराधीपणाची जाणीव' ही अमूर्त संकल्पना आहे. 'बाईकवरून फिरणे' हे सत्य आहे.मानसिक त्रास आणि भौतिक सुख यांच्यातल्या संघर्षात बहुतेक वेळा भौतिक सुखच विजयी होते.
'मी बदलल्याने जग बदलणार आहे का?'असा विचार प्रत्येकानेच केल्याने ही जगरहाटी अशीच सुरू राहणार.
सहमत
पण यात नेहमीसारखे "चौकटीबाहेरचे विचार नाहीत. सर्वांची सहज सहमती असलेले विचार आहेत :-)