(तर्कक्रीडा ७२अ: एकशे दहा नाणी.)

प्रेरणा: यनावालाकृत तर्कक्रीडा ७२: एकशे दहा नाणी.

एकशे दहा(११०) नाणी आहेत. त्यांत एकच नाणे सदोष (खोटे) आहे. (हे अगोदर माहीत आहे.) उर्वरित सर्व समान वजनांची (सरकारी टांकसाळीतून बाहेर पडलेली, जेन्युइन) आहेत. (सदोष नाणे नेमके कोणते हे मूळ कोड्याप्रमाणे अर्थातच माहीत नाही.) दोन पारड्यांच्या तराजूवर एकदाही तुलना न करता सदोष नाण्यासहित सर्व नाणी खपवायची आहेत.

तर हे तुम्ही कसे कराल?

(उपप्रश्नः खोटे नाणे नेमके कोणते हे अगोदर माहीत असल्यास खपवण्याच्या पद्धतीत आणि यशात काही फरक पडेल काय? असल्यास नेमका कसा?)

............................................................................................
कृपया उत्तर येथेच. (डिस्क्लेमरः उत्तर मलाही माहीत नाही. मीही त्याच्या शोधात आहे.)
............................................................................................

Comments

हा हा हा!

तर्कक्रीडेवरची ही विडंबनक्रीडा पाहून धन्य झालो! ;)

(तर्कडुंबक)चतुरंग

नेमके विडंबन नाही, प्रेरणा म्हणा!

किंबहुना, या तथाकथित विडंबनावर अधिक विचार केल्यास, या विडंबित कोड्याचे उत्तर सापडो वा न सापडो, मूळ कोड्याचे एक पर्यायी उत्तर, आणि तेही मूळ कोड्यात अपेक्षित असलेल्या दोन तुलनांऐवजी एकाच तुलनेत, सापडते असे वाटते.

पहा विचार करून!

सृजनशीलता(क्रीएटिव्हिटी)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.पर्स्पेक्टिव म्हणतात ते बरोबर आहे.एखाद्या गोष्टीवरून दुसरी वेगळीच गोष्ट सुचणे हे प्रतिभेचे लक्षण आहे. विडंबन कविता ही सुद्धा एक नवनिर्मिती असते. त्यामुळे त्यांच्या कोड्यात काही प्रमाणात का होईना प्रतिभेचा आविष्कार आहेच.
१) खोटे नाणे कोणते ते ठाऊक नाही. पण ते या ११० त निश्चित आहे. म्हणून ग्रॅहॅम्स( की ग्रेशॅम?) लॉ(बॅड मनी ड्राइव्ज गुड मनी आऊट ऑफ सर्क्युलेशन) अनुसार प्रथम हीच नाणी वापरात येतील.एखाद्या दुकानदाराने खोटे नाणे ओळखले तर दुसरीकडे प्रयत्न कारवा. जमेनासे झाले तर देवळात जाऊन पेटीत टाकावे.
२) खोटे नाणे नेमके ठाऊक असले तर परत त्याच नियमा प्रमाणे प्रथम तेच चालवण्याचा प्रयत्न होईल. न जमल्यास देऊळ आहेच.

उत्तरे रोचक, पटण्यासारखी, पण...

...आपल्या पहिल्या उत्तराच्या अनुषंगाने आपल्या मूळ कोड्याच्या माझ्या पर्यायी उत्तरामागील माझे तर्क पुन्हा तपासून पाहण्याची गरज भासू लागली आहे (थोडक्यात, माझी काहीशी गोची झाली आहे) असे वाटते.

१) खोटे नाणे कोणते ते ठाऊक नाही. पण ते या ११० त निश्चित आहे. म्हणून ग्रॅहॅम्स( की ग्रेशॅम?) लॉ(बॅड मनी ड्राइव्ज गुड मनी आऊट ऑफ सर्क्युलेशन) अनुसार प्रथम हीच नाणी वापरात येतील.एखाद्या दुकानदाराने खोटे नाणे ओळखले तर दुसरीकडे प्रयत्न कारवा. जमेनासे झाले तर देवळात जाऊन पेटीत टाकावे.

खोटे नाणे दुकानदार लगेच ओळखेल (विशेषतः नाणी खपवताना निदान माझ्यासारख्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून तरी 'हा काहीतरी लफडेबाजी करण्याचा प्रयत्न करतो आहे' हे दुकानदाराच्या लगेच लक्षात येईल) या गृहीतकावर माझे उत्तर अवलंबून होते.

माझे उत्तर काहीसे असे:

बरोबर एकशे दहा नाणी एकूण किंमत असलेल्या वस्तूंची खरेदी करावी आणि त्याकरिता ही एकशे दहा नाणी देऊ करावीत. खोटे नाणे दुकानदाराच्या लगेच लक्षात येईल, आणि तो म्हणेल, "काय साहेब, मला गंडवायला बघता काय? हे पहा, हे नाणे खोटे आहे, चालणार नाही. दुसरे असेल तर द्या नाहीतर चालू लागा इथून मुकाट!" त्याला "दुसरे नाणे माझ्याजवळ नाही" म्हणून सांगून (वस्तू विकत न घेता) चालू लागावे.

अशा पद्धतीने एकशे दहा नाण्यांपैकी खोटे नाणे नेमके कोणते हे तर (एकदाही तागडीने तुलना न करता) कळले! आणि सर्व नाणीही परत मिळाली.

आता हे खोटे नाणे आणि उरलेल्या नाण्यांपैकी कोणतेही एक नाणे अशी दोन नाणी घ्यावीत, आणि त्यांची तागडीत तुलना करावी. एकाच तुलनेत खोटे नाणे इतरांपेक्षा हलके की जड हे कळेल.

अर्थात, दुकानदार (माझ्यासारख्याकडूनसुद्धा) गंडला तर मात्र कठीण आहे. (म्हणजे आपल्या मूळ कोड्याच्या माझ्या पर्यायी उत्तराचे कठीण आहे. दुकानदाराचेही बहुधा कठीण असावे, पण मला त्याच्याशी घेणेदेणे नाही.)

बहुधा आपल्याला असे उत्तर अपेक्षित नसावे, परंतु (दुकानदार निदान माझ्यासारख्याकडून तरी गंडणार नाही या गृहीतकाच्या आधारावर) ते बरोबर आहे असे मला वाटते. आपल्याला अपेक्षित उत्तर हे नसावे असे वाटल्याने व्यनिने न पाठवता जाहीरपणे देण्याचे दु:साहस केले आहे. चूभूद्याघ्या.

उत्तरे?

उत्तरे रोचक, पटण्यासारखी, पण...

मलातर एकच उत्तर दिसतेय बॉ.

उत्तरे!

२) खोटे नाणे नेमके ठाऊक असले तर परत त्याच नियमा प्रमाणे प्रथम तेच चालवण्याचा प्रयत्न होईल. न जमल्यास देऊळ आहेच.

हे दुसरे (दुसर्‍या प्रश्नाचे/उपप्रश्नाचे) उत्तर.

समजले

आभारी आहे. बाकी श्री यनावालांनी मूळ कोड्याचे उत्तर सांगावे अशी विनंती करतो. मी बराच प्रयत्न केला पण जमले नाही. सरासरीचा खेळ आहे का?

अनेक दुकानदारांना विचारा, अभ्यास करा

उत्तर देणार्‍याने उत्तर कसे शोधले या तपशिलाशी कर्तव्य नसेल, तर एक-एक करत लाखो लोकांना नाणी खपवा.

नाहीतर ११० मित्रांना एक-एक नाणी द्या आणि त्यांच्या घरच्या (टांकसाळीतल्या) नाण्यापेक्षा वजन कमी-अधिक असल्याचे उत्तर मागा - फक्त "तोलून उत्तर मिळवले की नाही" हे सांगू देऊ नका.

ज्या ठिकाणून ११० नाणी मिळवली त्या ठिकाणी कोणीतरी "नेमके एकच नाणे खोटे आहे" सांगणारा भेटला आहे. त्या व्यक्तीला नाणे ओळखता येते. साम-दाम-दंड-भेद नीतीने त्या व्यक्तीकडून उत्तर वदवून घ्या.

कुठल्या नाण्याचा विजेचा रेझिस्टन्स वेगळा आहे त्यावरून खोटे नाणे शोधा. एक खोटे नाणे आणि एक खरे नाणे घेऊन प्रत्येकाचे लोलक बनवा (धागा बांधून). लोलके एकमेकांना आपटतील अशा तर्‍हेने बांधा. आपटल्यानंतर खोटे नाणे अधिक उंच गेले, तर ते हलके आहे, कमी उंच गेले तर जड आहे.

जगातील अन्य लोक आणि अन्य वस्तू वापरण्याची मुभा असेल तर "तागडी न वापरता" कित्येक प्रकारे उत्तर मिळेल. प्रश्न आहे की त्या अन्य मार्गांसाठी लागणारी हत्यारे आपल्यापाशी उपलब्ध आहेत का?

हरकत नसावी

जगातील अन्य लोक आणि अन्य वस्तू वापरण्याची मुभा असेल तर

का नसावी? "मुभा नाही" असे कोड्यात कोठेही म्हटलेले नाही.

प्रश्न आहे की त्या अन्य मार्गांसाठी लागणारी हत्यारे आपल्यापाशी उपलब्ध आहेत का?

इच्छा असेल तर मार्ग दिसेल. हत्यारे नसतील तर ती भीक मागून आणावीत, विकत आणावीत, उसनी आणावीत किंवा चोरून आणावीत. अडवले कोणी आहे?

(विकत आणायची झाल्यास त्याकरिता ही एकशे दहा नाणी खपवण्याचा प्रयत्न करावा. या नाही तर त्या कोड्याचे तरी उत्तर मिळेलच. प्रयत्नांती परमेश्वर! )

मूळ कोडे

तुम्ही मूळ कोडे सोडवले का हो? सोडवले असल्यास निरोपाने हिंट देता का?

नाही बुवा!

'ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याचा विचार न करता, तो पिऊन रिकामा करा' या उक्तीनुसार, एकशे दहा नाणी आहेत आणि त्यातले एखादे खोटे आहे हे कळल्यावर 'पैकी खोटे नाणे कोणते असावे'च्या चिंतेपेक्षा 'खोट्या नाण्यासकट ती सर्व नाणी कशी खपवावीत'ची चिंता मला अधिक महत्त्वाची (आणि उपयुक्त) वाटते.

(असो. असते एकेकाचे 'पर्स्पेक्टिव'.)

थोडा विचार

मी केलेला आहे. तुम्ही त्यात तुम्हाला काय सुचते पहा. मिळवून् सोडवू.

ठीक

खरड पाठवावी. काही सुचल्यास खरडीने कळवेन.

असो

यनावालांनी उत्तर जाहीर केलेले आहे.

कोड्यातील अट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोड्यांत अटी दिल्या असतील तर ते कोडे त्या अटींच्या अधीन राहूनच सोडवायचे असते.
प्रस्तुत को़ड्यात लिहिले आहे:"दोन पारड्यांच्या तराजूवर केवळ दोनदाच तुलना करून सदोष नाणे हलके का जड ते ओळखायचे आहे."
म्हणजे कोडे सोडविण्यासाठी काय करायचे ते दिले आहे. ते कसे करायचे एव्हढेच विचारले आहे. त्यामुळे अन्य कोणतेही मार्ग अप्रस्तुत आहेत.

तरीही...

हरकत नाही. म्हणजे कोड्याच्या अटीप्रमाणे (१) सदोष नाणे हलके की जड हे ओळखण्यासाठी तराजूवर तुलना करणे आवश्यक आहे, आणि (२) अशी तुलना नेमक्या २ वेळा होणे आवश्यक आहे. (दोनपेक्षा कमी किंवा अधिक वेळा चालणार नाही.)

आता, कोड्याच्या अटींच्या भाषेप्रमाणे अशी तुलना करण्यापूर्वी इतर कोणतीही कृती करू नये असे कोठेही म्हटलेले नाही. उदाहरणार्थ, तुलना करण्यापूर्वी मला डोके खाजवावेसे वाटले किंवा कोलांटी मारावीशी वाटली किंवा जोरजोरात श्वासोच्छ्वास करावासा वाटला, तर त्यास प्रत्यवाय असू नये.

अर्थात, अशी एखादी पूर्वक्रिया केल्यास त्या पूर्वक्रियेद्वारे खोटे नाणे इतर नाण्यांपेक्षा हलके आहे किंवा जड हे ठरवले जाऊ नये असे कोठेही स्पष्टपणे म्हटलेले नाही. परंतु तरीही अशी मर्यादा रास्त असल्याकारणाने ती मर्यादा आहे असे समजू.

ठीक. आता कोड्याच्या अटींचा स्कोप पुरेसा स्पष्ट आहे असे वाटते. आता त्या अटी पाळून काही करता येते का ते पाहू.

समजा, पूर्वक्रिया म्हणून जर मी याआधी मी किंवा श्री. धनंजय यांनी सुचवलेल्या मार्गांपैकी एखादा मार्ग नेमके कोणते नाणे खोटे आहे हे ठरवण्यासाठी वापरला. (उदा. सर्व नाणी दुकानदाराकडे खपवण्याचा प्रयत्न किंवा नाणी जेथून आली तेथील एखाद्या व्यक्तीवर सामदामदंडभेदप्रयोग.) असे केल्याने मला नेमके कोणते नाणे सदोष आहे हे कळावे. ही पूर्वक्रिया असून त्यात तराजूचा अजिबात उपयोग केलेला नाही. मात्र ही पूर्वक्रिया सदोष नाणे इतर नाण्यांपेक्षा हलके किंवा जड आहे हे ठरवण्यासाठी वापरलेली नसून केवळ कोणते नाणे खोटे आहे हे ठरवण्यासाठी केलेली आहे, जे अटींच्या कक्षेत येत नाही. (खोटे नाणे नेमके कोणते ते अगोदर माहीत नाही. ते येनकेनप्रकारेण माहीत करून घेण्यास प्रतिबंध करणारी कोणतीच अट मला कोड्याच्या भाषेत दिसली नाही. आणि याकरिता मी जरी तराजू वापरलेला नसला, तरी तराजू न वापरणे हे सदोष नाणे हलके किंवा जड हे ठरवण्यासाठी झालेले नसल्यामुळे कोड्याच्या अटींचे उल्लंघन होत नाही.)

आता, खोटे नाणे कोणते हे एकदा कळल्यावर, ते खोटे नाणे आणि उरलेल्या नाण्यांपैकी कोणतेही एक नाणे अशी दोन नाणी घ्यावीत आणि त्यांची तराजूने तुलना करावी. ही झाली पहिली तुलना. नंतर, खात्री करण्यासाठी म्हणून दुसरे एखादे निर्दोष नाणे उचलावे, आणि त्याची सदोष नाण्याबरोबर तराजूने तुलना करावी. (Repeatability of Experiment.) ही झाली दुसरी तुलना. अशा प्रकारे दोन तुलनांत निष्कर्ष निघावा, आणि कोड्याच्या अटींचेही उल्लंघन होऊ नये.


अवांतरः 'बॅरॉमीटर वापरून एखाद्या इमारतीची उंची कशी मोजावी' या प्रश्नाची अशीच अनेक उत्तरे वाचनात आली होती. त्यावरून ही प्रेरणा.

काही उत्तरे:
१. बॅरॉमीटर घेऊन इमारतीच्या गच्चीवर जावे आणि तेथून दोरीला बांधून बॅरॉमीटर जमिनीपर्यंत सोडावा. मग दोरीची लांबी मोजावी.
२. इमारतीच्या गच्चीवरून बॅरॉमीटर खाली फेकावा आणि तो जमिनीवर आदळायला लागणारा वेळ मोजावा. मग s = ut - (1/2)gt2 (u=0, g=-9.8m/s2) हे सूत्र वापरून इमारतीची उंची काढावी.
३. इमारतीची देखभाल करणारा अधिकारी भेटल्यास त्याला सांगावे, "हे बघ, माझ्याकडे हा महागातला बॅरॉमीटर आहे. तू जर मला या इमारतीची उंची सांगितलीस तर मी तो तुला बक्षीस देईन."
(स्रोतः रीडर्स डायजेस्टचा एक अतिप्राचीन अंक.)

 
^ वर