सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -2
फोर्थ डायमेन्शन -25
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -2
एप्रिल 1994 मध्ये आफ्रिका खंडातील ऱ्वांडा या देशात हुतु व तुत्सी जमातीत यादवी युद्ध पेटले. या जमातीतील विरोध टोकाला गेल्यामुळे बहुमतात व सत्तेवर असलेल्या हुतु जमातीने तुत्सी वंशीयांची कत्तल करण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात नरसंहार घडला. हुतुचे सत्ताधारी शस्त्रास्त्रांच्या बळावर निरपराधी तुत्सीवंशियांना दिसेल तेथे गोळ्या मारून ठार करू लागले. शंभरेक दिवस चाललेल्या या नरसंहारात लाखोंचा बळी गेला. शेजारी-पाजारी, तान्ही मुलं, आजारी स्त्री-पुरुष, म्हातारे-कोतारे, या कुठल्याही संवेदनशील गोष्टीकडे न बघता हुतु जमातीतील लोक सूड उगवत होते. डॉक्टर्स रुग्णांना मारून टाकत होते. शिक्षक विद्यार्थ्यांची कत्तल करत होते. काही तुरळक अपवाद वगळता खेड्या- पाड्यातील तुत्सी जमात निर्वंश झाली.
सत्ताधाऱ्यांना सामूहिक हत्याकांडाची नशा चढू लागली. निरपराध्यांना मारण्यासाठी नवीन नवीन क्लृप्त्या शोधू लागले. 'चर्चमध्ये जमल्यास तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पोचवू' असे चुचकारत शेकडोंनी जमलेल्यांना सामूहिकपणे मारत होते. झुरळांना मारल्यानंतर रस्त्यावर फेकून दिल्या प्रमाणे प्रेतांचे ढीगच्या ढीग ठिकठिकाणी दिसू लागले.
अशा प्रकारच्या अमानुष नरसंहारात पॉल रुसेसाबागिना या हुतु जमातीच्याच मिल्ले कॉलिन्स या हॉटेलच्या मॅनेजरने दाखवलेले असामान्य धैर्य व युक्तीच्या प्रदर्शनामुळे सुमारे 1200 तुत्सी व काही उदारमतांच्या हुतु लोकांची सुटका होऊ शकली. किगला शहरातील या पॉश हॉटेलच्या मॅनेजरने स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या हॉटेलच्या तळघरात या निराश्रितांना लपवून ठेवले व त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू लागला. हॉटेलमधील ग्राहकांसाठी राखून ठेवलेल्या रम-व्हिस्कीचा साठा, फोन-फॅक्सची सुविधा, हॉटेलमध्ये यापूर्वी उतरलेल्या परदेशी व्यक्तींचे पत्ते व होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी यांच्या जोरावर त्यांनी या निरपराध्यांना वाचविले. लाच म्हणून हुतुच्या सैन्याधिकाऱ्यांना दारू पाजून हॉटेलचे रक्षण करू लागला. हॉटेलच्या कॅश कौंटरमधील पैशाने मोठ्या प्रमाणात बटाटे व इतर अन्न पदार्थांची खरेदी करून त्यानी या हजार-बाराशे लोकांना उपासमारीतून वाचवले. हॉटेलमधील फोन-फॅक्स वापरून शेजारच्या देशातील व हॉटेलची मालकी असलेल्या बेल्जियम येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून या संकटग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागला. ऱ्वांडा येथील कत्तलीची बातमी जगभर पसरवण्यात पॉल यशस्वी झाला.
कत्तलीच्या या दोन-चार आठवड्याचा काळ फार मोठा धोक्याचा होता. या काळात रुसेसाबागिना अत्यंत तणावाखाली वावरत होता. शेकडो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. त्यांचा जीव वाचवणे, त्यांच्या दैनंदिन गरजा पुरवणे, त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधणे, तेथे पोचवण्यासाठी व्यवस्था करणे इत्यादीमुळे तो हैराण झाला होता. वैतागला होता. परंतु त्यानी जिद्द सोडली नाही. हुतुचे क्रूर सैनिक व सैन्याधिकारी यांच्या करड्या नजरा चुकवत त्यांना मोफत दारू पाजत, काही वेळा चुकीची माहिती देत या निराश्रितांचे तो रक्षण करत होता. याच्या संशयास्पद हालचालीमुळे हुतु सैनिकांनी निराश्रितांच्या कत्तलीचे दोन-चार अयशस्वी प्रयत्नही केले. परंतु दरवेळी त्याना हुलकावणी देण्यात तो यशस्वी झाला. तो फार मोठा धोका पत्करत होता. हॉटेलच्या भिंतीच्या बाहेरून किंकाळ्या ऐकू येत होत्या. बाहेरची माणसं मारली जात होती. हॉटेलच्या तळघरातील लोक मृत्युच्या भीतीच्या छायेत वावरत होते.
हॉटेलमध्ये या निराश्रितांना फार काळ राहू देणे अत्यंत धोक्याचे ठरले असते. काही तरी करून या निराश्रितांना हॉटेल बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोचवण्याची अत्यंत गरज होती. शांती प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या गाड्या शहरभर (नुसत्या) फिरत होत्या. काही राजकीय डावपेचामुळे संयुक्त राष्ट्र संघ निराश्रितांना हलवण्याच्या परिस्थितीत नव्हता. कुठलाही धोका पत्करण्यास तयार नव्हता. तरीसुद्धा पॉलच्या आग्रहासाठी केलेले एक-दोन प्रयत्न अयशस्वी ठरले. संयुक्त राष्ट्र संघाच्या गाडीतील सर्व मारले गेले. शेवटी राजकीय परिस्थिती थोडीशी निवळल्यानंतरच निराश्रितांना सुरक्षित स्थळी पोचवणे शक्य झाले. हुतु जमातीच्या सैन्यातील काही बंडखोरानीच तुत्सी जमातीतील निराश्रितांना जीवदान द्यावे असा आग्रह धरला. नाईलाज म्हणून सैन्यातील कडव्यांना नमते घ्यावे लागले. त्यामुळे शहरातील काही उरल्या सुरल्या तुत्सींना जीवदान मिळू शकले.
17 जून 1994 रोजी निराश्रितांची शेवटची तुकडी सुरक्षित ठिकाणी पोचण्यासाठी सज्ज होऊन बसली होती. तितक्यात हुतु जमातीचा जनरल बिझिबिंगु व्हिस्कीचे घोट घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोचला. जनरलची सरबराई करण्यासाठी पॉल खाली उतरत असताना त्याच्या राहत्या खोलीतच हुतु सैनिक धुमाकूळ घालत असल्याचे लक्षात आले. सैनिकांनी पुढचा हॉल उध्वस्त करून टाकला होता. पॉलची पत्नी व मुलं घाबरून झोपण्याच्या खोलीत लपून बसले होते. प्रसंग जिवावर बेतणारा होता. पॉलनी प्रसंगावधान राखून युक्ती करून सैनिकांना हाकलून दिले. वर बसलेल्या जनरलला ही हकिकत कळली. त्यानी हाताखालील एका अधिकाऱ्याला पाठवून हल्ला करणाऱ्या सैनिकांना पिटाळून लावले.
पॉल रुसेसाबागिनाला हॉटेलसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार मिळणारे कुठलेही संरक्षण मिळाले नव्हते. पॉलने स्वत:च्या हिकमतीच्या बळावर, स्वत:च्या जिवावर उदार होऊन अनेकांचे जीव वाचवले. बाहेरच्यांची कत्तल तो थांबवू शकला नाही हे खरे असले तरी एका सामान्य माणसाने आणीबाणीच्या प्रसंगी दाखवलेले अतुलनीय धैर्य, तल्लखपणा, चाणाक्षता व प्रसंगावधान खरोखरच कौतुकास्पद ठरतील.
Comments
सही!
वेगळीच ओळख!
आपला
गुंडोपंत
हॉटेल र्वांडा
पॉल रुसेसाबागिना यांच्या कर्तबगारीबद्दल "हॉटेल र्वांडा" हा चित्रपट गाजला आहे.
चित्रपट बघून मन सुन्न होते, तरी आशेचा एक छोटा किरणही शिल्लक राहातो. अत्यंत स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व आहे.