गंगाजल!

फोर्थ डायमेन्शन -23

गंगाजल!

समोर उभा असलेल्या कैद्याची इन्स्पेक्टर सावंत उलट तपासणी घेत होते. कैदी निर्ढावलेला वाटत होता.थर्ड डिग्री वापरूनसुद्धा त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. खरे पाहता या कोवळ्या वयाच्या तरुण कैद्याच्या बापानेच काही अज्ञात ठिकाणी बॉम्ब पेरलेले आहेत व काही तासातच त्यांचा स्फोट घडवून शेकडो लोकांना मारण्याचा कट या तरुणाच्या बापानीच रचला आहे अशी खात्रीलायक माहिती सावंताना मिळाली होती. या तरूणाला बॉम्ब कुठे कुठे पेरलेले असावेत याची नक्कीच कल्पना असणार, या अंदाजाने इन्स्पेक्टर सावंत त्याच्याकडून सर्व काही वदवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.
परंतु समोरचा हा तरुण कितीही छळ केला तरी काही सांगण्यास तयार नव्हता. कदाचित या तरुणावर केलेल्या अमानुष छळाची बातमी एव्हाना त्याच्या बापापर्यंत पोचलीही असेल.मुलाचे हाल बघितल्यावर बाप कोसळून पडेल.बापानी तोंड उघडल्यास आपण बॉम्ब निकामी करून शेकडो जीव वाचवू शकू असा कयास सावंत मनातल्या मनात बांधत होते.
परंतु मुळातच या संपूर्ण प्रकरणाबद्दल सावंत द्विधा मनस्थितीत आहेत.त्यांना कैद्यांचा छळ करून गुन्हा कबूल करून घेणे मान्य नाही. पोलीस ठाण्यात असे काही घडत असल्याची कुण कुण लागली तरी ते निमूटपणे बाहेर जातील. बॉम्बस्फोटाच्या या कटामध्ये या तरुण कैद्याचा कदाचित सहभाग नसेलही. तो निरपराधीही असू शकेल. परंतु येथे शेकडो निरपराध्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. या तरुण कैद्याचा छळ केल्यामुळे शेकडो जीव वाचतीलही. शिवाय सावंतासमोर दुसरा कुठलाही पर्याय पण नाही.
सावंतानी आपल्या तत्त्वात बसत नाही म्हणून छळ करण्यास नकार दिल्यास शेकडो लोक हकनाक मरतील त्याचे काय? सावंताकडे छळ करण्याचे नैतिक धैर्य नाही म्हणून शेकडोंचा बळी देणार की काय?

--------------------------

वर उल्लेख केलेला प्रसंग पूर्णपणे काल्पनिक असून फारच क्वचित वेळा असे काही घडत असेल. कदाचित सावंतासारखी माणसं पोलीसदलात सापडणेही अशक्य वाटत असेल. परंतु 'दहशतवादाविरुद्ध युद्ध' या युद्धज्वराने पिडीत झालेला हा सुसंस्कृत समाज झपाट्याने बदलत चालला आहे, याची नक्कीच आपल्याला जाणीव झालेली असेल. इराकमधील अबुघारिब येथील इराकी कैद्यांच्या छळाच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून ठळकपणे झळकवल्यानंतरसुद्धा काहींना यात काहीही चूक नाही असे वाटले असेल. 'अद्दल घडली' असेच उद्गार त्यानी काढले असतील. येथे मुद्दा हा छळवाद कुणी आरंभिला, कुणी आज्ञा दिली, हीच पद्धत का वापरली इ.इ. नसून हा छळवाद निषेधाऱ्ह आहे की नाही हा आहे.
'गंगाजल' या हिंदी चित्रपटातील कथानकात पूर्ण गावाला वेठीस धरलेल्या गुंडांना पकडल्यानंतर तेथील पोलीसच गुंडांच्या डोळ्यात ऍसिड (गंगाजल!) ओतून गुंडांना आंधळेपणाची 'शिक्षा' देतात. या पोलीसी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारालाच गावातील सामान्य जनता मारहाण करते. येथे प्रश्न कायदा - न्याय यांचा नसून छळवादाचा आहे. शेवटी पोलीसही माणसंच असतात. दुष्कृत्यांचा अतिरेक झाल्यानंतर माणसामधील विवेकी विचार सुप्तावस्थेत जातो व हिंस्रपणा उफाळून वर येतो.
सावंतांच्या मनस्थितीचा विचार करू लागल्यास प्राप्त परिस्थितीत शेकडो जीव वाचविण्यासाठी एखाद्याला बळी देणे सयुक्तिकच नव्हे तर नीतीयुक्तही ठरेल. एका व्यक्तीचा वा काही जणांचा बळी देऊन फार मोठ्या संख्येने जीव वाचवता येत असल्यास अशा गोष्टी नाईलाज म्हणून करायला हरकत नसावी, असेही वाटेल. तुमच्या वैयक्तिक नीतीमत्तेचे चोचले पुरवण्यासाठी शेकडोंचा बळी देणार का? तुम्ही नामानिराळे राहून असले दुष्कृत्य करण्यास मूकसंमती देणार का? इतरांना असले कृत्य करण्यास भाग पाडणार का?
समोर उभा असलेला हा तरुण कैदी कदाचित निरपराधी असू शकेल. परंतु शेकडोंचा जीव वाचविण्यासाठी एखाद्या निरपराध्याचा बळी देणे योग्य व नीतीच्या चौकटीत बसणारा ठरेल. अबुघारिब येथील इराकी कैदी तर बोलून चालून गुन्हेगारच होते; त्यामुळे जो छळवाद मांडला तो न्यायसंमतही असेल व नैतिकही असेल.
हा युक्तिवाद मानवी हक्कासाठी लढणाऱ्या मानवतावाद्यांना आव्हान देणारा ठरत आहे. मानवतावाद्यांच्या मते कुठलाही छळवाद निषेधाऱ्ह व माणुसकीला काळिमा फासणारा असतो. मानवतावादी आपल्या ताठर भूमिकेच्या समर्थनार्थ "कुठलाही छळवाद तात्विकरित्या निषिद्ध असून हजारो मेले तरी चालतील; पण तत्त्व म्हणून अंगिकारलेली लक्ष्मणरेषा ओलांडणे कदापि शक्य नाही." असा वाद करतील. जर तत्त्वालाच चिकटून बसण्याचा हट्ट धरल्यास हजारो लोकांच्या जिविताचे काय? हा यक्षप्रश्न यातून सुटत नाही. यावरून तत्त्वाधिष्ठितपणाचा पाया अत्यंत भुसभुशीत आहे, असेही वाटेल.
अजून एका पर्यायामध्ये तत्त्व म्हणून छळवाद नको हे मान्य असले तरी काही वेळा तुरळक अपवाद करण्यास हरकत नसावी असे वाटेल. ते नीतीला अनुसरुनच असेल असे मनाचे समाधानही करून घेता येईल. परंतु एकदा अपवाद करण्याचे ठरवल्यास त्याला अंत नाही. काही तरी निमित्त काढून अशा अपवादांची मालिका तयार होत राहील. प्रत्यक्ष व्यवहारात गरज नसेल तेव्हासुद्धा छळवाद सुरूच राहील. त्यामुळे अत्यंत गरज वाटली तरीसुद्धा छळ करू नये या तत्त्वाला चिकटून राहणे योग्य ठरेल.या संबंधात काहीही निर्णय घेतला तरी इन्स्पेक्टर सावंताना त्याचा उपयोग होणार नाही. हा एक नियम म्हणून त्याचे पालन करणे कितीही योग्य वाटत असले तरी सावंताना या पेचप्रसंगातून बाहेर काढणे तितके सोपे नाही.
या तरुण कैद्याचा छळ करत राहिल्यास त्यातून काही चांगले निघण्याची शक्यता सावंताना दिसत आहे. छळाला परवानगी द्यावी की नाही, अपवाद करावा की नाही हा त्यांच्यासमोरचा प्रश्न नसून या विशिष्ट प्रसंगी छळाचा अवलंब करून शेकडो जीव वाचवावे की नाही, हा आहे. त्यांनी आपल्या तत्त्वावर, नीतीमत्तेवर ठाम असावे असे तुम्हाला आरामात खुर्चीवर बसून सांगणे सोपे आहे.परंतु सावंतांची निवड इतकी सोपी नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल.

Comments

गंगाजल

या सिनेमात गुन्हेगारांनी केलेले अत्याचार सर्व गावाने पाहिलेले असतात. त्या ठिकाणच्या तत्कालीन न्यायव्यवस्थेत त्यांना शिक्षा होत नाही असे दिसल्यामुळे त्यांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांना सरळ अंध करण्याचा निर्णय गावकरी घेतात. वरील उदाहरणात एका संशयिताच्या मुलाला हाल हाल करून मारण्याने त्या संशयिताला उपरती होईल किंवा त्याच्यावर मानसिक दबाव येईल आणि त्यातून हजारो लोकांचे प्राण वाचतील हा नुसता अंदाज आहे.

एक पुरवणी

या सिनेमात गुन्हेगारांनी केलेले अत्याचार सर्व गावाने पाहिलेले असतात.

असे असूनहि एकहि गावकरी न्यायालयात तशी साक्ष देत नाहि आणि मग

त्या ठिकाणच्या तत्कालीन न्यायव्यवस्थेत त्यांना शिक्षा होत नाही असे दिसल्यामुळे त्यांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांना सरळ अंध करण्याचा निर्णय गावकरी घेतात

हे कितपत योग्य आहे?

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

योग्य नाहीच

पण कायद्याच्या राज्यात न्याय मिळत नाही म्हणून नायकाने तो हातात घेण्याच्या कृतीचे समर्थन करणार्‍या सिनेमांची संख्या खूप मोठी आहे आणि त्या कृतीला प्रेक्षक दाद देतात ही वस्तुस्थिती आहे. ती बदलण्यासाठी न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता वाढवणे आवश्यक आहे. गंगाजल सिनेमातला नायक तसे करू इच्छीत नाही, तरी अखेर त्याचासुद्धा नाइलाज होतो असे दाखवले आहे.

बरोबरच आहे...

योग्य नाहि हे बरोबरच आहे.. पण सहसा हा दोष न्यायसंस्थेच्या नावावर खपवला जातो.. मात्र दोष साधारणतः न्यायसंस्थेपेक्षा जनतेचा + सुव्यवस्थेच्या अभावाचा आहे असे दिसते.
गंगाजलमधेही लोकांचा + सुव्यवस्थेच्या अभावाचाच दोष कसा आहे हे अधोरेखित करण्यासाठी "एकहि गावकरी साक्ष देत नाहि" हे वाक्य टाकले होते.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

७ तर्क

संशयित बापाने (१) बॉम्ब ठेवले आहेत (२) ते कुठे ठेवले आहेत ते तरुणाला माहिती आहे (३) तरी तो सांगत नाही (४) आणि तरुणाचा छळ केल्यावर बाप कोसळेल (५)आणि तो बॉम्ब दाखवील (६) आणि ते निकामी करता येतील (७). अबब तब्बल ७ नुसते तर्क आहेत आणि तरी छळ करणे नैतिक आहे की नाही याची चर्चा करू पाहतोय आपण.

लेखातील अपवाद करण्याच्या सोयीचा गैरफायदा घेतला जाईल हेच मत योग्य.

नितिन थत्ते

सहमत

सहमत आहे.

 
^ वर