महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार
फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो. यासाठी जन्मनावाचा उपयोग केला जातो.
खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते.महात्मा फुल्यांनी फलज्योतिषाची जनमानसावरील पकड अचुक पद्धतीने ओळखली. आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' मध्ये त्यांनी ज्या प्रकारचे स्पष्टीकरण दिले त्यावरुन फलज्योतिषाच्या मुळ सिद्धांताचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता हे स्पष्टपणे जाणवते. प्रथम अभ्यासक व नंतर टीकाकार अशी त्यांची भूमिका होती. प्य्हलज्योतिष हा धर्माचा एक भाग मानला जात असल्याने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात फलज्योतिषासंबंधी टीका केली.फुल्यांच्या काळातील म्हणजे शतकापुर्वीची असलेली सामाजिक परिस्थिती व सामाजिक मानसिकता या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर फलज्योतिषाला सामाजिक शोषण व अंधश्रद्धा म्हणणारे म.फुले काळाच्या किती पुढे होते हे समजते. फलज्योतिषी लोकांच्या अज्ञानाच्या फायदा उठवुन भरभक्कम दक्षिणा उकळतात असे ते स्पष्टपणे म्हणतात. ग्रहांची पीडा टाळण्यासाठी ग्रहशांतीचे यज्ञयाग केले जातात. ज्या धर्मग्रंथात ग्रहपीडानिवारणाचे कर्मकांड सांगितले जाते त्याविषयी तीव्र भाषेत टीका करतात."अहो त्यांच्या या भूमंडळावरील चतुष्पाद भाउबंदास म्हणजे बैलास जन्म देणा-या गायांसह मेढ्यांस अघोरी आर्यभट ब्राह्मण त्यांस खाण्याच्या निमित्ताने यज्ञामध्ये त्यांचा बुक्क्यांनी वध त्यांचे मांस गिधाडासारखे खात होते, त्यांच्याने त्यावेळी आर्यभट ब्राह्मणांचे काही नुकसान करवले नाही. तथापि हल्लीच्या सत्ययुगामधे जर गायामेंढ्यास जर ईश्वरकृपेने वाचा फुटली असती तर त्यांनी धूर्त आर्यातील ग्रंथकारांची नांवे ठेवण्यास कधीही मागेपुढे घेतले नसते."
अशाच जन्मनांव प्रकरणाचा समाचार महात्मा फुल्यांनी शंभर वर्षांपुर्वी घेतला. "सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक" मध्ये फुल्यांनी बळवंतराव हरी साकवळकर यांच्या जन्मवेळेवरुन जन्मनांव कसे काढतात? यावरुन जन्मरास पत्रिका कशी मांडतात? याविषयींच्या प्रश्नाला विश्लेषणात्मक उत्तर दिले आहे. त्यावरुन त्यांना फलज्योतिषविषयक चांगली जाण होती हे दिसुन येते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर " मानव स्त्री पुरुष जन्म होताना त्यावेळी नक्षत्रांचे कोणते चरण होते म्हणुन समजणारे लोक फारच विरळा. त्यातुन नक्षत्रांचा पहिला व दुसरा चरण संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर 'चे' याची 'ची' अथवा 'चु' याचे 'चे' होण्याचा संभव आहे. त्याच प्रमाणे अश्विनीची चार चरणे, भरणीची चार चरणे आणि कृत्तीकाचे पहिले चरण अशी एकंदरीत नउ चरणे मिळुन एक मेष रास होती. आता मेष व वृषभ राशीचा संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर वृषभ राशीची मेष रास अथवा मेषराशीची वृषभ रास होण्याचा संभव आहे. त्या सर्वांवरुन स्त्री पुरुषांचा जन्म होतेवेळी घंगाळाच्या पाण्यात वाटी टाकून घटका पहाणारे फारच थोडे. परंतु वाव अथवा कास-याने सुर्य अथवा रात्रीच्या तपा मोजणारे बहुत सापडतील.यावरुन आर्यातील ग्रहशास्त्रवेत्ते मुली मुलांच्या जन्मपत्रिका कोणत्या त-हेने वर्तवतात याविषयी एखादा अनुभव असेलच. याशिवाय आपण पेशवे सवाई माधवराव यांची जन्मपत्रिका वाचुन पहा. म्हणजे आर्य जोशांची ठकबाजी तुमच्या सहज लक्षात येईल."
वरील विवेचनावरुन फुल्यांनी केलेली टीका तर्कसंगत आहे हे लक्षात येते. नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो. सुशिक्षित माणसे मात्र पत्रिका जुळत नाही म्हणुन वधु - वरांना प्राथमिक फेरीतच बाद करतात.ज्या पायावर पत्रिकातयार होते तो पायाच किती डळमळीत आहे हे फुल्यांनी आपल्या विवेचनात दाखवुन दिले आहे. तत्कालीन समाजात तर फलज्योतिषाचे बडे प्रस्थ होते.. अशा परिस्थितीत लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा फुल्यांनी प्रयत्न केला. मोठी मोठी माणसे सुद्धा फलज्योतिषावषयी उघड टीका करीत नसत. कारण हा जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने फलज्योतिषात तथ्य नसल्याचे सांगणे त्यांच्या प्रतिष्ठेच्या, प्रतिमेच्या दृष्टीने हितावह नव्हते.
आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनातील सुख दु:खावर परिणाम होतो का? अशा आशयाचा प्रश्न जेव्हा फुल्यांना विचारला तेव्हा फुले म्हणतात," या सर्व विस्तीर्ण पोकळीत अनंत तारे आहेत. त्यापैकी आपल्या एका संनिध चे सुर्य आणि चंद्र हे उभयता या पृथ्वीवरील एकंदर सर्व जलचर,भुचर आणि वनचरांसह प्राणजिवन आहेत म्हणुन निर्विवाद आहेत व तसेच बाकी शनी वगैरे ग्रह एकट्या मानव स्त्री पुरुषांस पीडा देतात म्हणुन सिद्ध करता येत नाही. तसेच शनी वगैरे ग्रहांच्या संबंधाने एखादे वेळी या आपल्या पृथ्वीवरील एकंदर सर्व प्राणिमात्रास काही एक त-हेने हित अथवा अनहित होण्याचा जरी संभव आहे तरी ते एकंदरीत सर्व प्राण्यांपैकी फक्त मानव स्त्रीस अथवा पुरुषास पीडा देतात, म्हणुन सिद्ध करता येणार नाही. कारण शनीवरील एकंदरीत सर्व प्रदेश इतका विस्तीर्ण आहे की त्याच्या निर्वाहाकरिता चार चंद्र आहेत. व त्यास आपल्या सर्वांच्या निर्मिकाने नेमुन दिलेले उद्योग एके बाजुला ठेउन तो या भुमंडळावरील एखाद्या मानव व्यक्तीस पीडा देण्यास येतो, आणि ती पीडा टाळण्याकरिता अज्ञानी लोकांनी धुर्त आर्य भट जोशास भक्कम दक्षिणा दिल्याने दुर होते., ही सर्व पोटबाबु आर्य जोशांची लबाडी आहे."
फुल्यांनी फलज्योतिषाच्या मूळ सिद्धांतावर हल्ला चढवला. त्याकाळी फुल्यांनी स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टीकोण आज आपल्याला स्वीकारणे जड जाते. फुल्यांच्या काळात नउवारी साडी नेसणारी स्त्री शनी पीडा देईल साडेसातीत शनीला तेल घालण्यासाठी ज्या भीतीपोटी जात होती त्याच भीती पोटी आजची स्लीवलेस ब्लाउज घालणारी, बॊबकट केलेली ललना शनीला जाते.
जन्मवेळ कुठली मानावी याविषयी प्रतिपादन करताना फुले म्हणतात," याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी या कामी केवळ आपली पोटे जाळण्याकरिता ज्योतिषशास्त्रात हे मनकल्पित थोतांड मुख्य उभे केले आहे. कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
यावरुन फुल्यांनी फलज्योतिषविषयक आपली भुमिका किती स्पष्ट व तर्कशुद्ध मांडली आहे हे दिसते.आपला फलज्योतिषावर विश्वास नाही अशि साधारण भुमिका न घेता इतरांनीही विश्वास ठेउ नये म्हणुन कारणमिमांसा करुन लोकांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळी टीकेसाठी लागणा-या शब्दांसाठीही तडजोड स्वीकारली नाही. युवापिढीने त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
Comments
नाडि जोतिश
आधिच्या प्रस्नाना उत्तर द्याच सोडुन् हे काय नविन् लिह्ताय् त्यान्नि कधि नाडि ज्योतिश पाह्यल होत का
सौ. बक्कुबाई बिलंदर
आभार
लेख तूर्तास वरवर वाचला. संदर्भ म्हणून त्वरित लेख चढवण्याबद्दल लेखकाचा अत्यंत आभारी आहे. यामुळे (इतरत्र आधी म्हटल्याप्रमाणे) लेखावर किंवा त्यातील मुद्द्यांवर कोणाचा आक्षेप असल्यास त्यावर किमान चर्चेस नेमका संदर्भ राहतो, आणि (मला किंवा इतरांना) स्वतंत्रपणे निष्कर्ष काढावयासही आधार होतो.
लेख वाचून हळूहळू काही धारणा मनात होत आहेत. जसजसे नेमके आक्षेप स्पष्ट होतील, जसजशी चर्चा पुढे जाईल त्याप्रमाणे (आणि जसजसे माझेच या लेखाचे अधिकाधिक सखोल वाचन होत जाईल आणि माझेच विचार मलाच स्पष्ट होत जातील आणि जसजशी गरज भासेल आणि मुख्य म्हणजे जसजसे जमेल त्याप्रमाणे) मांडेनच. (आणि मला ते मांडावयास न जमल्याससुद्धा एक उत्कृष्ट संदर्भ म्हणून या लेखास महत्त्व आहेच.)
लेखाच्या संदर्भाबद्दल लेखकाचा पुनश्च आभारी आहे.
उत्तम लेख
लेख आवडला.
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक
लेख आवडला,
आता थोडेसे अवांतर : लेखात उल्लेखिलेले "सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक" हे एक छोटेखानी, पण अत्यंत वाचनीय पुस्तक आहे.
हे पुस्तक नव्याने कोणी हल्ली लिहिले असते, तर कदाचित दंगली झाल्या असत्या, असे मला वाटते. (कमीतकमी ज्ञानेश्वर-रामदासांना नावे ठेवल्यामुळे अशा लेखकाला मराठी साहित्यसंमेलनाची दारे बंद झालीच असती.) त्या पुस्तकातील उद्धरणे जशीच्यातशी उपक्रमावरती देण्यास मी कचरलो होतो, आणि काटछाट करून केवळ संदर्भासाठी आवश्यक शब्दांचे उद्धरण मी दिले होते!
१९व्या वेळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आणि फुले यांच्या समाजविचाराच्या रेट्याने प्रवृत्त होऊन पुस्तकात परखड मते मांडलेली आहेत. त्यातील बहुतेक वाद तर्कसंगत आहेत, किंवा किमानपक्षी विचारप्रवर्तक आहेत.
नक्कीच
नक्कीच. फुल्यांनी केलेली जवळपास सगळीच टीका तर्कसंगत, परखड, कडवट तसेच चुरचुरीतही आहे. 'रामायणांतील अनेक गोष्टी जंबुकांच्या तोलाच्या असंभवनीय आहेत व भागवतांतील एकंदर सर्व गोष्टी असंभवनीय, आपल्या सर्वांच्या निर्मीकाच्या नांवाला बट्टा लावण्यासारख्या आहेत... रामायणांतील लोभी रावणांस दहा मुखें, दहा नाकें, वीस डोळे, वीस कान आणि वीस हात होते; परंतु त्यास एकच गुदद्वार असून दोन पाय मात्र होते, यावरून त्यानें आपल्या दशमुखांनी खाल्लेले पदार्थ पचन होऊन एकाच गुदद्वाराने बाहेर निघण्याची कशी काय योजना केली होती व त्याविषयी एकंदर सर्व सृष्टीक्रमास ताडून पाहतां रावणाच्या शरीराच्या रचनेविषयी मोठा चमत्कार वाटतो!'
क्वचित ही टीका तर्कसंगत वाटेलच असे नाही. पण धनंजय म्हणतात तशी ती विचारप्रवर्तक आहे. रामदासांबद्दल एके ठिकाणी लिहिले आहे: '...त्याने आपल्या नावांस शर्मा असें पद जोडून न घेतां, अतिशूद्र सुरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊं लागला. यांतील मुख्य इंगित अज्ञानी शूद्र शूर शिवाजीस खूष करणे होय.'
काही शंका
अधोरेखिताचा आणि विशेषतः ठळक केलेल्या भागाचा हिशेब लागला नाही. यावर कोणी प्रकाश पाडू शकेल काय?
'निर्मीक' म्हणजे काय?
निर्मिक=निर्माता, नि:क्षत्रिय पृथ्वीवर अब्राह्मण सारे शूद्र
निर्मिक=निर्माता (सार्वजनिक सत्यधर्मातील ईश-संकल्पना)
नि:क्षत्रिय पृथ्वीवर अब्राह्मण सारे शूद्र ही कल्पना ब्राह्मण/अब्राह्मण वादात सांगितली जाते.
मराठा ही शूद्र-जात असल्याचे काही ब्राह्मणांचे मत अशा प्रकारे फुल्यांनी त्यांच्यावरच उलटवले आहे.
लेख आवडला
लेख पटला. द्न्यानेश्वर रामदासांना का नावे ठेवली आहेत? सदस्य धनंजय म्हणतात तो लेख कोणता आहे कसा वाचता येईल
एक शक्यता
हा प्रतिसाद असावा अशी शक्यता आहे (चुभूदेघे).
तर्कशुध्द विचार
वरील लेखात मांडलेले सारेच विचार तर्काला धरून आहेत. पण फलज्योतिष सोडून चर्चा एका पुस्तकावर झालेली दिसते. त्याचा कांही संदर्भ लागणे कठीण आहे.
तर्कसंगत, परखड, कडवट तसेच चुरचुरीतही : पण ब्राह्मण!
महात्मा ज्योतिबा फुले केवळ 'जन्माने ब्राह्मण' नव्हते आणि त्यांचे विचार ब्राह्मणविरोधी होते म्हणून ते ब्राह्मणद्वेष्टे होते असा अर्थ लावायची गरज नाही.
ब्राह्मणांनी केवळ जन्माच्या आधारावर इतर जातींना अंधारात ठेवले आणि त्यांचा गैरफायदा घेतला हे निश्चित! कदाचित त्यांनी ते परंपरेनुसार केले असेल, जाणूनबुजून केले नसेल, काही-बरेचसे सहृदय ब्राह्मण इतर जातीयांना चांगले वागवत असतील (एकनाथ महाराज, दामाजीपंत इ.) असे मानले तरी त्या जातींची आजची परिस्थिती पाहता ही अपवादात्मक उदाहरणे होती असे म्हणावे लागते.
वर चित्तरंजन यांनी म्हटल्याप्रमाणे 'तर्कसंगत, परखड, कडवट तसेच चुरचुरीतही 'लेखन करणारे अनेक 'जन्माने ब्राह्मण' (त्यातही चित्पावन) समाजसुधारक जेहत्ते कालाचे ठायी होऊन गेले. ( ज्ञानेश्वरांसारख्या काहींना 'जन्माने' आणि 'कर्माने' ब्राह्मण असूनही 'संस्काराने' ती जात मिळाली नाही हे वेगळे)
जातीप्रथा आणि अंधश्रद्धा हे भारतीय समाजास लागलेले रोग आहेत आणि ते केवळ वैचारीक , बोजड लेख लिहून बरे होणार नाहीत हे जाणून अत्यंत वैचारिक , संस्कृतप्रचूर ग्रंथ लिहीणार्या एका समाजसुधारकाने सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत, शब्दोच्छल न करता,समाजात घडणारी उदाहरणे घेऊन अनेक तर्कसंगत, परखड, कडवट तसेच चुरचुरीत कथा लिहिल्या. संदर्भासाठी पहा: http://www.savarkar.org/content/pdfs/mr/andhashradhha-nirmulan-katha-kh6...
दुर्दैव असे की -
'जन्माने ब्राह्मण' समाजसुधारकांना केवळ ब्राह्मणांनी सोयीपुरते आपले म्हणायचे, त्याच्या सुधारणावादी विचारांना बगल द्यायची आणि
इतर जातींनी तो ब्राह्मण-तो ब्राह्मण म्हणून दूर लोटायचे
-तर-
'जन्माने अब्राह्मण' समाजसुधारकांना इतर जातींनी देव बनवायचे, त्याचे विचार ब्राह्मण जातीविरोधात विखार पसरवण्यासाठी वापरायचे आणि ब्राह्मणांनी त्यांना ब्राह्मणद्वेष्टे म्हणून हिणवायचे
-या दुष्टचक्रात भारतीय समाज सापडला आहे. पण लक्षात कोण घेतो?
(इथे फुल्यांचे विचार ब्राह्मणविरोधी मानणार्यांना असा सवाल आहे की सावरकरांचे विज्ञानवादी विचार त्यांना मान्य होतात काय?)
उत्तम प्रतिसाद
ईसुनाना
उत्तम प्रतिसाद. जात धर्म पंथ न मानणारे नरेंद्र दाभोलकर जेव्हा साधनाचे संपाद्क झाले तेव्हा "साधनाचे संपाद्क अखेर ब्राह्मणच का?" अशी टीका झाली होती त्याची आठवण झाली.
तुम्ही पुष्कळ जन्माने जात धर्म पंथ मानत नाही पण इतर मानतात व त्याचे नकळत बळी तुम्ही ठरता याचा अनुभव मी घेतला आहे
प्रकाश घाटपांडे
काय बोललात
वा! काय बोललात विसुनाना!
या वाक्यावर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव