हनुमानाची पत्नी

मागच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने (हा दाक्षिणात्य, कन्नडिगा आहे) मला आधी विचारले की गणपतीच्या दोन बायका आहेत का? आणि असतील तर त्यांची नावे काय? तेव्हा मी त्याला सांगितलं की "हो, गणपतीच्या दोन बायका आहेत असे मानतात. 'ऋद्धी' आणि 'सिद्धी 'ही त्यांची नावे आहेत. "

इथवर सगळं ठीक आहे. पण पुढचा प्रश्न त्याने विचारलं की हनुमानाच्या बायकोचे नाव काय??!! या प्रश्नाने मला आश्चर्याचा धक्का बसला की एखादा हिंदू माणूस असा प्रश्न कसा विचारू शकतो. मी त्याला अगदी ठामपणे सांगितलं हनुमान हा बालब्रह्मचारी आहे. त्याचा विवाह झालेला नाही. बऱ्याचशा हनुमानाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश करण्यास मनाई असते हे देखील आणखी पाठिंबा म्हणून सांगितलं. हा प्रश्न जरा खटकलाच होता मला...
(मकरध्वज हा जरी त्याचा मुलगा असला तरी हनुमानाचा मकरध्वजाच्या आईसोबत विवाह झालेला नव्हता किंवा आणखी काहीही संबंध नव्हता; ती कथा वेगळी आहे. )

आज मात्र त्या सहकाऱ्याने मला हनुमानाचे लग्न झाले होते हे त्याच्या पत्नीच्या नावासकट सांगितले!! 'सुवरचला' असे तिचे नाव आहे. संदर्भासाठी त्याने ३-४ दुवे सुद्धा दिलेत. त्या दुव्यांवरून असे वाटते की दक्षिण भारतात हनुमान-सुवरचला यांना पती-पत्नी मानतात. (हनुमानाचे 'पंचमुखी' रूप सुद्धा त्यात आहे. )

हा म्हणजे माझ्या लहानपणापासूनच्या धार्मिक विश्वासाला बसलेला मोठा धक्का आहे. मी आजवर हेच मानत होते की हनुमान 'बालब्रह्मचारी' आहे.

आता माझा प्रश्न असा आहे की माझा विश्वास चुकीचा होता की दाक्षिणात्य धार्मिक कथा, विश्वास वेगळे आहेत?
जाणकारांनी आपले मत मांडावे.

ते संदर्भ दुवे येथे देत आहे:
http://panchamukhi.com/tn_31.aspx
http://www.jayahanuman.org/jayahanuman/history.htm
http://www.telugubloggers.com/2007/01/08/this-one-is-a-photo-of-suvarcha...
http://kuttipriya.blogspot.com/2006/07/did-hanuman-ever-get-married.html

Comments

आणखी काही सुवर्चला

सुवर्चला(१): देवल ऋषीची कन्या. ही ब्रह्मचारिणी होती. पित्याने रचलेल्या स्वयंवरात हिने (वैवाहिक नीतिनियम पहिल्याप्रथम बनवणार्‍या)श्वेतकेतूला पसंत केले. त्या स्वयंवराच्या वेळी हिने श्वेतकेतूशी जी चर्चा केली ती 'श्वेतकेतु-सुवर्चला संवाद' या नावाने महाभारतातील शांतिपर्वात आली आहे.
सुवर्चला(२)(३): भागवतात दिल्याप्रमाणे परमेष्ठिन्‌ राजाची पत्‍नी आणि प्रतीहाची आई. प्रतीहाच्या बायकोचे नावही सुवर्चला होते. या दुसर्‍या सुवर्चलेला तीन मुलगे होते.
सुवर्चला(४): महाभारत(अनुशासनपर्व) आणि विष्णुपुराणानुसार सूर्याची पत्‍नी.
या चौघींपैकी कुणीही हनुमानाशी लग्न केलेले दिसत नाही. त्यामुळे दक्षिणी भारतात जिला मारुतीची पत्‍नी म्हणतात तो मारुती कदाचित वेगळा असावा.
दक्षिणेला कार्तिकेयाच्या देवळात स्त्रियांना प्रवेश असतो, महाराष्ट्रात स्त्रिया त्याचे दर्शन घेत नाहीत्त. अशीच काहीतरी वेगळी गोष्ट हनुमानपत्‍नीसंबंधी असावी. -वाचक्‍नवी

दाक्षिणात्य कन्‍नडिगा?

कानडी म्हणा, कन्‍नड म्हणा, फारतर कन्‍नडिग म्हणा. पण कन्‍नडिगा? हे, हे जरा जास्तच बेंगळूरुरी वाटते आहे!--वाचक्‍नवी

रामायणाप्रमाणे

रामायणाप्रमाणे हनुमानाचे लग्न झालेले नाही. तो ब्रह्मचारीच आहे. परंतु,

भक्त देवाला आपल्या मनाप्रमाणे रुप देतात. हा खालील फोटो बघा -

गणपती बाप्पा क्रिकेट खेळत असत का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येणे स्वाभाविक आहे. हनुमानाचेही याचप्रकारे झाले असावे. एखाद्या भक्ताला त्याने स्वप्नात येऊन मी तुझ्या गावात वास करणार आहे, लग्न करणार आहे, मुले-बाळे जन्माला घालून संसार करणार आहे असा दृष्टांत दिला की झाली एक कथा तयार आणि एक मंदिरही.

कार्तिकेयाचेही असेच दक्षिणेत लग्न करून दिलेले आहे.

तसे, एखाद्याचे लग्न झाले किंवा नाही झाले त्याने काय मोठा फरक पडतो?

फरक

एखाद्याचे लग्न झाले किंवा नाही झाले त्याने काय मोठा फरक पडतो?

छे छे... हनुमानाचे लग्न झाल्याने विशेष काही फरक पडतोय असं नाही. पण काही लोक मारुतीच्या ब्रह्मचर्यामुळे त्याची उपासना करतात...
ही कथा अगदी वेगळी निघाली; म्हणजे अगदी उलटच! त्यामुळे पटवून घ्यायला जरा वेळ लागतोय.

बाकी तुम्ही चिटकवलेला फोटो फारच गोड आहे. :)

लग्न

कदाचित त्याने दक्षिण भारतात जाऊन गुप्तपणे लग्न केले असेल
चन्द्रशेखर

मुळात तो दाक्षिणात्यच होता..

मारुती मूळचा दक्षिणी भारतातला. रावणवधानंतर अयोध्येला गेला. रामाच्या मृत्यूपर्यंत तिथेच असावा. नंतर महाभारतात त्याने भीमाला आपली शेपटी उचलून दाखवण्याचे आव्हान दिले. पुढे युद्धाच्यावेळी अर्जुनाच्या रथावर बसकण ठोकली. हल्लीहल्ली तो तुलसीदासाला काशीत भेटला होता. त्याला मूल तर समुद्र उल्लंघनाच्या वेळीच झाले होते. मग उगाच गुपचुप लग्‍न करण्यासाठी दक्षिणेला जाण्याची काय गरज? आणि गेलाच असेल तर कधी गेला?--वाचक्‍नवी

चिरंजीव मारुती

मारुती चिरंजीव मानला जातो. आता इतकी हजारो वर्षे (करा गणित रामायणाच्या काळाचे) ब्रह्मचारी राहणे ही कठिण गोष्ट आहे. शेवटी, जेवण करायला, घर सांभाळायला (तत्कालीन बायका नोकरी करत नसत असे मानते.) सुख-दु:खाची सोबती असावी असे कोणत्यातरी काळात त्याला वाटले असणे शक्य आहे.

असो. मारुतीचे लग्न झाले असल्यास ही माझ्यामते आनंदाची गोष्ट आहे. ;-)

वेडिंग ऍनिव्हर्सरी

लग्नाची तिथी समजली असती तर बरे झाले असते. तुळशीच्या लग्नाप्रमाणेच मारुतीच्या लग्‍नाचा वाढदिवसही दरवर्षी आम्ही आनंदाने आणि धूमधडाक्यात साजरा केला असता.--वाचक्‍नवी

सुख-दु:खाची सोबतीण?

अशी चिरंजीवी पत्‍नी कुठून मिळणार? एकूण चिरंजीव सातच, फारतर मार्कण्डेय धरून आठ. आणि त्यांतून सर्व पुरुष. तेव्हा मारुतीसाठी एक सोबतीण असून भागणार नाही. दर ६०-७० वर्षांनी दुसरी करावी लागणार. त्यातलीच एक सुवर्चला असणार!--वाचक्‍नवी

देवतांची लग्ने - प्रादेशिक फरक

देवतांची लग्ने - यात प्रादेशिक फरक आहेत.

शिवाचा आणखी एक पुत्र षडानन - याचा वैवाहिक स्थितीबाबत वेगवेगळ्या प्रादेशिक कथा आहेत, असे वाटते.

देवतांच्या नातेसंबंधाच्या कथा पौराणिक आहेत, आणि वेगवेगळ्या पुराणांमधील कथा वेगवेगळ्या अहेत. पुराणलेखकांनी एकमेकांशी सुसंगती साधली असेलच असे नाही. आणि एकदा का एक विसंगती आली, पुढच्या कुठल्याही लेखकाला दोहोंशी सुसंगती साधणे अशक्य!

जोवर "सर्व पुराणे एकसंध सुसंगत तथ्यकथा आहेत" अशी काही कल्पना आहे, तोवर "धार्मिक विश्वासाला धक्का" बसेल. "पुराणकथा वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या काळात लिहिल्या" असे समजल्यास विश्वासाला तडा वगैरे जाणार नाही.

महत्वाचे

जोवर "सर्व पुराणे एकसंध सुसंगत तथ्यकथा आहेत" अशी काही कल्पना आहे, तोवर "धार्मिक विश्वासाला धक्का" बसेल. "पुराणकथा वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या काळात लिहिल्या" असे समजल्यास विश्वासाला तडा वगैरे जाणार नाही.

हे महत्वाचे आहे असे वाटते. सहमत आहे.

----
"कॅमरे में रील चले या न चले, स्टीव्हन कपूर ऐसा डायरेक्टर है जिसके दिमाग में हमेशा रील चलती रहती है"

बरोबर

जोवर "सर्व पुराणे एकसंध सुसंगत तथ्यकथा आहेत" अशी काही कल्पना आहे, तोवर "धार्मिक विश्वासाला धक्का" बसेल.

हे पटलं. कारण माझा आतापर्यंत असाच समज होता की रामायण हे संपूर्ण भारतभर सारखेच असेल. खरं तर आधी असाही समज होता की हिंदु धर्मातील रुढी-परंपरा, देव-देवता, सण-वार सगळीकडे सारखे असावे. त्याबाबतीत तर फरक बघतेच आहे.

मी "धार्मिक विश्वासाला धक्का" असा शब्दप्रयोग केला खरा, पण तो धार्मिक विश्वासाला धक्का असण्यापेक्षा 'हनुमान ब्रह्मचारी आहे' हे मनावर इतकं पक्कं बिंबवलं गेलंय की त्याची पत्नी असणे हे पचायला जरा त्रास झाला.
असो. आता पुराणकथांमधे सुद्धा तफावत असण्याचीही मानसिक तयारी करून घेते.

अवांतरः षडानन म्हणजेच कार्तिकेय असेल तर माझ्या मते महाराष्ट्रात तसेच दक्षिणेतही त्याला ब्रह्मचारी मानतात. पण दक्षिणेबद्दल खात्री नाही...

दाक्षिणात्य षडानन

कार्तिकेय(सहा कृत्तिका त्याच्या माता!) किंवा षडानन हा मूळचा उत्तर भारतीय शंकराचा पुत्र. महाराष्ट्रात असेपर्यंत तो ब्रम्हचारी होता. पण तो जेव्हा दक्षिणेला गेला तेव्हा त्याला मृगेश-मुरुगन-सुब्रह्मण्य-शर्वणभव-षण्‌मातुर-षण्मुख-शक्तिधर-तारकारि-कुमार(कुमारसंभव आठवा!)-सनत्‌कुमार-स्कंद-क्रौंचभेत्ता-क्रौंचदारण ही नावे मिळाली. शिवाय गुह,गांगेय,उमासुत, स्वामिनाथ वगैरे वगैरे सुमारे तीसएक नावे आहेतच. गणपतीला जशी चतुर्थी प्रिय तशी कार्तिकेयाला षष्टी. त्याला दोन दाक्षिणात्य बायका आहेत. वल्ली आणि देवसेना. देवसेना इंद्राची मुलगी, तर वल्ली ऊर्फ़ वल्लिअम्मा ही शेती आणि सुतारकाम करणार्‍या एका वन्य जमातीच्या मुखियाची बेटी.
गणपती ज्याप्रमाणे आग्नेय आशिया, चीन, जपान आणि अफ़गाणिस्तानापर्यंत पोचला तसा हा नाही. इसवी सनाच्या पहिल्या पाच शतकांपर्यंत उत्तरी भारतात सर्वज्ञात असलेला कार्तिकेय, त्यानंतरच्या काळात दक्षिणेत स्थिरावला.--वाचक्‍नवी

एक शंका

पण तो जेव्हा दक्षिणेला गेला तेव्हा त्याला मृगेश-मुरुगन-सुब्रह्मण्य-शर्वणभव-षण्‌मातुर-षण्मुख-शक्तिधर-तारकारि-कुमार(कुमारसंभव आठवा!)-सनत्‌कुमार-स्कंद-क्रौंचभेत्ता-क्रौंचदारण ही नावे मिळाली.

यावरून 'मुरुगन' हे नाव तमिळोद्भव नसून मृगेश-मृगन-मुरुगन असा प्रवास करत गेलेले (अपभ्रष्ट?) संस्कृतोद्भव नाव असावे असे वाटते. हा अंदाज बरोबर आहे काय?

(तमिळनाडूमधील 'आर्य' मूळ असल्याचे समजल्या गेलेल्या समाजांत 'षण्मुगन' हे नाव प्रचलित आहे, तर 'द्रविड' - पक्षी: 'अनार्य' - मूळ असल्याचे समजल्या गेलेल्या समाजांत त्याऐवजी 'मुरुगन' हे नाव प्रचलित आहे, या ऐकीव माहितीची या बाबीशी सांगड घालण्याचा प्रयत्न करीत आहे.)


"You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time." -Abraham Lincoln?????
"Fool me once, shame on you. Fool me twice, shame on me!" - An English Proverb.

मुरुगन

यावरून 'मुरुगन' हे नाव तमिळोद्भव नसून मृगेश-मृगन-मुरुगन असा प्रवास करत गेलेले (अपभ्रष्ट?) संस्कृतोद्भव नाव असावे असे वाटते. हा अंदाज बरोबर आहे काय?

रा. पर्स्पेक्टिव यांचा वरील अंदाज चुकीचा आहे. कार्तिकेय या देवाचा मुरुक्कु हा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे त्या देवाचे मुरुक्कुन असे नाव पडले आणि पुढे मुरुगन असा त्याचा अपभ्रंश झाला.

उदा. लक्ष्मीचे नाव जसे हरिप्रिया पडले तसेच हेही.

मुरुक्कुः

अवांतरः महाराष्ट्रातील कार्तिकेयापेक्षा खंडोबा हा दाक्षिणात्य कार्तिकेयाला जास्त जवळचा आहे असे श्री. ढेरे यांचे मत आहे. कार्तिकेय = स्कंद. त्यावरुन स्कंदोबा-खंडोबा असा संबंध.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुरवणी

त्यामुळे त्या देवाचे मुरुक्कुन असे नाव पडले

खरे म्हणजे मुरुक्कु हा कार्तिकेयाचा अतिशय आवडता पदार्थ असला तरी मुरुक्कुच्या मोहापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने 'मुरुक्कु नको' असे म्हणावयास सुरुवात केली. (तमिळ आणि मराठी संस्कृतीचा संबंध तेव्हापासून). मात्र हे पाहून इतर देवांनी त्याला 'मुरुक्कु नको' 'मुरुक्कु नको' असे चिडवण्यास सुरुवात केली आणि यथावकाश 'को'चा लोप होऊन मुरुक्कुनको ऐवजी मुरुक्कुन असे नाव पडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मुरुक्कु!!??

कार्तिकेय या देवाचा मुरुक्कु हा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे त्या देवाचे मुरुक्कुन असे नाव पडले आणि पुढे मुरुगन असा त्याचा अपभ्रंश झाला.

अं!!!! हे खरंच असं आहे की तुम्ही विनोद केलाय??

अवांतरः मुरुक्कु (गोल न केलेली चकलीच) मला पण आवडते :)

मोदक/मुरुक्कु

गणपतीला मोदक आवडतात मग मला मुरुक्कु का आवडू नये असा प्रश्न कार्तिकेयाने पार्वतीला केला होता असे नंदीचे मत आहे.

(ऐकीव माहिती)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गनपावडर

आपला अंदाज बहुधा बरोबर असावा. ही व्युत्पत्तीसुद्धा ऐकलेली होती, परंतु विस्मरणात गेलेली होती.

त्यापुढे जाऊन मुरुक्कु आवडणारा तो मुरुक्कुन, मुरुक्कुनचा अपभ्रंश मुरुगन आणि मुरुगनला आवडते ती पूड म्हणजे गनपावडर या व्युत्पत्तीबद्दलही कल्पना आहे.

अभिनंदन! :)

हा म्हणजे माझ्या लहानपणापासूनच्या धार्मिक विश्वासाला बसलेला मोठा धक्का आहे. मी आजवर हेच मानत होते की हनुमान 'बालब्रह्मचारी' आहे.

अच्छा, म्हणजे आमच्या मारोतरायाचं लगीन झालं आहे तर! चांगलंच आहे की मग! :)

मला तर बॉ ही बातमी वाचून आनंद वाटला. मी हनुमानाचे मनोमन अभिनंदन करतो!

बजरंगबली की जय!

आपला,
(हनुमानभक्त) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बालब्रम्हचारी

बालब्रम्हचारी म्हणजे काय हो? बालपणी ब्रम्हचारी का बालपणापासून ब्रम्हचारी

अर्थ काहीही असला तरी बालपणी सगळेच ब्रम्हचारी असतात तेँव्हा ते परत सांगण्याची काय आवश्यकता?

चन्द्रशेखर

बाल म्हणजे मिनी

बालब्रह्मचारी म्हणजे बहुतेक छोटा ब्रह्मचारी असावा. मारुतीचे वय वाढत नसेल तर तो सदैव बालच राहणार.
अवांतर: वसंतराव गाडगिळांना मिनि शंकराचार्य म्हणतात.--वाचक्‍नवी

बालब्रह्मचारी

बालब्रह्मचारी म्हणजे नक्की काय हा प्रश्न मलासुद्धा होता.
काही लोकांना विचारले असता सगळ्यांनी सांगितलेला अर्थ जवळपास सारखाच होता.
'बालब्रह्मचारी = बालपणी जसे ब्रह्मचर्याचे पालन केले जाते त्याच भावनेने आयुष्यभर वागणारा.' म्हणजे बालपणात ज्याप्रकारे विषयांबद्दल अनास्था असते तशीच पुढे तारुण्यात(आणि आयुष्यभर)देखील असणे.
उदा. जसे एखादे बालक कोणत्याही स्त्रीला 'माता-भगिनी' या दृष्टीने बघते, तशीच दृष्टी आयुष्यभर ठेवणे/असणे.

अर्थात ही ऐकीव माहिती आहे. खरा अर्थ वेगळा असू शकतो. किंवा 'बालब्रह्मचारी' हे 'पिवळा पितांबर' सारखे रूप असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बालक्रीडा

ही व्युत्पत्ती आत्तापर्यंत माहीत असलेल्या आणि सुचलेल्या सर्व व्युत्पत्त्यांमध्ये सरस आहे. बालबुद्धी म्हणजे जर बाळ शोभेल अशी बुद्धी (असलेला माणूस), तर बालब्रह्मचारी म्हणजे लहान मूल शोभेल असा ब्रह्मचारी, असा अर्थ का असू नये?
पिवळा पितांबर सारखी इथे शब्दाची द्विरुक्ती झालेली दिसत नाही.--वाचक्‍नवी

मारुति ..... चांग भलं

मला हि गोष्ट पतलि ...

हनुमानने लग्न केला ह्याबद्दल् मला जास्त् वाद् घालायचा नाहि ... पन् लहाणापासुन् माज्या मनात् हा प्रश्ना होताच् ... कि सप्तर्शि -- सगळे लग्न का नाहि केले ...
हनुमान् सोडुन् बाकि सगलळ्याच्या बायका अस्लेले माहित् आहे .. मग् हनुमानासोबत् हा अन्याय् का?

मला वाटत् , हनुमान् जेव्हा सुग्रिवासोबत् होता( ह्यात् सुग्रिव् बाइलवेडा अस्लेला सगळ्याना माहित् असेल् अशि कल्प्ना करतो) तेव्हा अस कहि तरि झालं अस्न्याचि शक्यता वाट्ते.

विनय आगसे.
हैद्राबाद्. आंन्ध्रप्रदेश. भारत

हं

सध्या जुने धागे उकरून् काढून वाचतो आहे. कालच एका वेगळ्या संदर्भात सुवर्चला हे नांव् वाचण्यात आले होते, अन् ती सूर्यकन्या आहे इतके समजले. या नावाचा जालावर शोध घेता ती मारूतीची बायको आहे असे समजले. मग हा असा माहितीचा तुकडा उपक्रमावर् धागा म्हणून लिहावा असे मनात ठरवून झोपी गेलो. सकाळी हा धागा सापडला. तर,

suvarchala

व्याकरण(!?) हे वेदांङ् शिकायला म्हणून मारुतिराया सूर्यदेवाकडे गेले, तेव्हा हे फक्त गृहस्थाला शिकवता येते, असे म्हणून सूर्यदेवाने नकार दिला. तेंव्हा मारूतीस लग्न करण्यासाठी म्हणून सूर्याच्या तेजातून एक कन्या उत्पन्न केली गेली, ती सुवर्चला.

another

हे असं पराशर संहितेत आहे असे जालावरही दिलेले सापडले. गम्मत म्हणजे ही सुवर्चला स्वतः आजन्म ब्रह्मचारिणी आहे.
लग्न् झाले तरी 'मॅरेज कन्झ्युमेट्' न झाल्याने मारूती ब्रह्मचारीच आहे असेही सापडले.
फोटो जालावरून साभार.

प्रगत भारत

ह्यावरून आजच्या तुलनेत प्राचीन भारत हा अधिक प्रगत समाज होता असे दिसते. आज आन्तरजातीय विवाहाला काहीजण खळखळ करतात. प्राचीन भारतात मात्र वानर आणि माणूस अशाहि विवाहाला मान्यता होती.

तरीच काहीजण म्हणतात की प्राचीन भारतात सर्व काही होते.

खतरनाक!!!

जबरा माहिती. उपक्रमावर फिरत असताना काय हाताला लागेल ते सांगता येत नाही!!

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर