ऋणं कृत्वा घृतं पिबेत - चार्वाक
यावज्जीवेत सुखज्जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः
मंदीवरच्या अनेक चर्चांपैकी एका ठीकाणी चार्वाकाच हे वचन परत एकदा दिसल. अनेकदा संदर्भासाठी वापरल गेलेल हे वचन नक्की आहे कोणाच म्हणून शोधाशोध केली असता ही विचारधारा सापडली.
जवळपास अडीच हजार वर्षापूर्वी नास्तिकतावाद आणि भौतिकतावाद यांचा पुरस्कार करणारा आणि जातिव्यवस्थेच्या अस्तित्वाच कारण नाकारणारा एक माणूस या भरतखंडात होऊन गेला. त्यान ह्या जन्माच्या आधी आणि नंतर काही असत या विचारालाही छेद दिला. हाच विचार पुढे नेऊन जे काही आहे ते याच जन्मात, हा जन्म हे मागील जन्मातल्या कृत्याच फळ आहे आणि या जन्मातील कर्मांच फळ पुढच्या जन्मी मिळेल हे तत्वज्ञान चुकीच आहे असा विचार त्यान मांडला. त्यामुळ आनंदान हे जीवन जगा, एकदा मेल्यावर पुनर्जन्म कुठला अस तो सांगतो.
तसच देव-दानव, भूत-प्रेत, आत्मा असल काही नसत. समाजात जी काही कर्मकांड आहेत त्यांच्या वाढीला ब्राम्हण कारणीभूत आहेत ह्या विचाराचा तो पुरस्कर्ता होता.
ह्या चार्वाक विचारसरणीविषयी आणि चार्वाकाविषयी जाणकारांची काय मत - विचार आहेत ते जाणून घ्यायला हा लेखनप्रपंच.
सातारकर
Comments
चार्वाकवाद
चार्वाकवाद आणि "लोकायत" तत्त्वविचाराचे पंडित पूर्वी अनेक असावेत, पण सध्या त्यांच्या कुठल्याही मूळ संहिता उपलब्ध नाहीत. परंतु अन्य तत्त्वपद्धतीच्या ग्रंथांमध्ये या पद्धतीचे खंडन करण्याकरिता त्यांच्या मताची काही वाक्ये उद्धृत केलेली आहेत.
पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या "परामर्श प्रकाशन"ने लोकायताबद्दल वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन (मराठी भाषांतरे करून) प्रसिद्ध केले आहे. मला हे पुस्तक वाचनीय वाटले.
(सापडल्यास अधिक माहिती देईन.)
विंदा
या दर्शनाबद्दल माझे अनेक गैरसमज होते ते विंदा करंदीकरांच्या "अष्टदर्शन" या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय दर्शनांपैकी चार्वाक-दर्शनाला स्थान दिले आहे त्याबद्दल वाचून दूर झाले.
ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. "शब्द" आणि "अनुमान" याला जागा नाही. यामुळे आत्मा, ईश्वर आणि स्वर्ग याला यात स्थान नाही. जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते. यात चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते. पण विंदा यांनी या दर्शनातील विचारांना स्पष्ट केले आहे -
" जीवनाचे ध्येय | असे सुखप्राप्ती
सुखानेच तृप्ती | माणसांना"
या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरूषार्थ म्हटले आहेत. (धर्म आणि मोक्ष या संकल्पना नाहीत). सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. पण असा हा चार्वाकवाद वर घृतं पित्वा .. मध्ये काहीसे हेटाळले गेल्याप्रमाणे अयोग्य सुचवत नाही. सुखासाठी चोरी किंवा मद्यप्राशन योग्य नाही. चार्वाकवाद हिंसेचा धिक्कार आणि शाकाहाराचे समर्थन करतो. वेदांत सत्य नसून वेद रचणारे निशाचर, धूर्त आहेत. अग्निहोत्र आणि वेदांचे पठन तसेच त्यातील हवन हे उपयुक्त नाहीत. पौरोहित्यावर गुजराण करणार्यांची त्याने निंदा केली आहे. सुख मिळवण्यासाठी प्रामाणिक श्रम करावेत, काव्य, नृत्य, संगीत या कलाही हव्यात, राजकीय स्थैर्य हवे आणि स्वार्थीपणा नको असा हा विचार आहे.
इ अनुभव
इ अनुभवच्या एका अंकात यावर आले होते.
इंग्रजीमध्ये बरेच साहित्य मिळावे.
आपला
गुंडोपंत
थोडी माहिती
लोकायत किंवा चार्वाक दर्शन
लोकायत हे बौद्ध आणि जैन दर्शनांसारखेच एक अवैदिक दर्शन आहे. इतर दर्शने वेदप्रामाण्य मानतात वा त्यांना वळसा घालतात पण शक्य तो सरळ टक्कर घेत नाहीत. लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे.शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद. सर्व धर्म चेतनावादावर अवलंबून आहेत व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्वांनीच चार्वाक मतावर कठोर हल्ले केले व त्यातही बुद्ध धर्म आघाडीवर राहिला. याचा एक परिणाम म्हणजे चार्वाक मताचा एकही अधिकृत ग्रंथ वा त्यावरील टीका आतापर्यंत मिळत नव्हत्या. बृहस्पतीसूत्र व जयराशीभट्टाचा तत्वोप्लवसिंह हे अलिकडे उपलब्ध झालेले ग्रंथ एवढेच अपवाद. मग हे दर्शन समजावून घ्यावयाचे तरी कसे?
तीही एक गंमतच आहे.विरोधक चार्वाकाचे मत म्हणून एक वाक्य देतात व त्यावर जोरदार टीका करतात. अशी मते एकत्र करावयाची व त्याला म्हणावयाचे लोकायत दर्शन. आता विरोधकांकडून फार सरळपणा (Fairness) अपेक्षित करण्यात अर्थ नाही. उदा. श्री सातारकर यांनी दिलेले व सर्व साधारणपणे सगळ्यांना माहित असलेले
"यावज्जीवं सुखं जिवेत् ऋणं कृत्वा धृतं पिबेत्" हे वचन विद्यारण्य़स्वामींनी सोळाव्या शतकातील सर्वदर्शन संग्रहात भोगवादी लक्षण म्हणून दिले. पण मुळात ते नवव्या शतकातील न्यासमंजिरीत असे आहे
" यावज्जीवं सुखं जिवेत् नास्ति मृत्युरगोचर:" यात कोठेही भोगवाद नाही. विरोधकावर टीका करावयाची म्हणून विपर्यास केला आहे. असो. आता थोडक्यात दर्शनाचा इतिहास व मते बघू.
(१) काल... सुरवात जवळजवळ वेदकालापासूनच. महाभारतातील उल्लेख व पाली बुद्ध वाड:मयामधील टीकेवरून इ.स.पूर्व ५०० नक्कीच.या काळातच उपनिषदांनी वेदांवर टीकेला सुरवात केली होती.
(२) मान्यता .. बुद्ध्पूर्व काळामध्ये विद्वान ब्राह्मणांच्या व राजनीतीच्या अभ्यासाचा विषय होता. आश्रमांमध्ये व यज्ञ काळीही चर्चा चाले. समाजात कसे वागावे-दण्डनीतीचा अभ्यास- याचे शिक्षण हा मुख्य उद्देश.
(३) आचार्य ... देवगुरु बृहस्पती पासून सुरवात. चार्वाक हा नंतरचा. शक्य आहे कीं चार्वाक ही व्यक्ती नसून पंथ वा उपाधी होती. लोकायत व बृहस्पत्य ही दुसरी नावे.
(४) काही सुत्रे
पृथ्वी,आप,तेज,वायू ही चार तत्वे; यांच्या संयोगास शरीर,इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते.
चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरूष.
प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे.
अनुमान प्रमाण नाही ( परलोकाबाबतीत).
परलोक नाही.
अर्थ व काम हेच पुरूषार्थ आहेत.
दण्डनीति हीच एक विद्या आहे व यातच कृषि,गोरक्ष वाणिज्य समाविष्ट आहेत.
तीन वेद हा धुर्तांचा प्रलाप आहे.
उद्याच्या मोरापेक्षा हातचे कबुतर बरे.
(५) काही नित्कर्ष (निरनिराळी मते)
हे असूरांचे म्हणजे आर्यपूर्व रहिवास्यांचे (सिंधू संस्कृती?) दर्शन आहे.
याची सुरवात सांख्य व तंत्रापासून झाली.
हे लोकायत म्हणजे लोकांचे दर्शन असल्याने राजसत्तेने ते दडपून टाकले.
उत्पत्ती पूर्व मिमांसेपासून झाली.
अर्वाचिन अब्यासाचा मूलस्त्रोत म्हणजे श्री देविप्रसाद चटोपाध्याय यांचा इंग्रजी ग्रंथ Lokaayat. या
वरून मराठीत गाडगीळ, आठवले, कुरुंदकर, साळुंखे थिटे इत्यादींची पुस्तके. देविप्रसाद व हे बहुतेक सर्व वामपंथी विचारसरणीचे.
( आधीच प्रतिसाद मोठा झाला आहे; जास्त माहिती पाहिजे असेल तर व्य.नि.वर विचारावी.)
शरद
आभार
सुरेख विवेचन. अनेक आभार.
----
उत्तम प्रतिसाद
सुरेख प्रतिसाद . प्रतिसादाच्या एकेका विभागावर विचार करावा , त्या निमित्ते नवीन संदर्भ शोधावे असे वाटले. धन्यवाद.
आठवलेंवर अन्याय
सदाशिव आठवले यांचा 'चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान' हा ग्रंथ देवीप्रसादांच्या ग्रंथाच्या आधी प्रकाशित झाला आहे. चार्वाकाविषयीचे आठवलेंचे आकलन त्यांचे स्वतःचे आहे व ते साम्यवादाच्या प्रभावापासून मुक्त आहे. त्यामुळे देवीप्रसादांच्या ग्रंथावरून सदाशिव आठवले यांनी आपला ग्रंथ लिहिला असे लिहिणे अन्यायकारक आहे.
सर्वदर्शनसंग्रहातील उद्धरण
माधवाचार्यांच्या चौदाव्या शतकातील "सर्वदर्शनसंग्रहा"मध्ये लोकायताविषयी पुढील उतारा आला आहे :
तदेतत्सर्वं बहस्पतिनाप्युक्तम् -
तर हे सर्व बृहस्पतीनेही म्हटले आहे
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥१॥
स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक असा आत्माही नाही,वर्ण, आश्रम आदींची कर्मकांडे फळ देणारी नाहीच नाही.
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥२॥
अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निमाण केल्या आहेत.
पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥३॥
ज्योतिष्टोम यज्ञात मारलेले जनावर जर स्वर्गात जाते, तर यजमान स्वतःच्या पित्यालाच का मारत नाही?
मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम् ।
निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः प्रज्ज्वलयेच्छिखाम् ॥४॥
मेलेल्या जिवांची तृप्ती जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.
गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम् ।
गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता ॥५॥
येथे प्रवासाला जाणार्या जगणार्या लोकांसाठी शिदोरी बनवणे व्यर्थ म्हणावे - घरच्याघरी केलेल्या श्राद्धाने आयतीच रस्त्यात तृप्ती होईल.
स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः ।
प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते ॥६॥
दानामुळे स्वर्गात असलेल्यांची तिथल्या तिथे तृप्ती होत असेल, तर इमारतीत वरच्या भागात राहाणार्यांसाठी अन्न येथे (खाली) अन्न का देत नाहीत?
यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥७॥
जोपर्यंत जगावे, सुखाने जगावे, कर्ज घेऊन तूप प्यावे. राख झालेल्या देहाचे पुन्हा येणे कुठचे?
यदि गच्छेत्परं लोकं देहादेव विनिर्गतः ।
कस्माद्भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुलः ॥८॥
देहच सोडून गेलेला जर परलोकात जात असेल, तर नातलगांच्या जिव्हाळ्यामुळे तो वारंवार परत का येत नाही?
ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह ।
मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित् ॥९॥
तर उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी उपाय सांगून दिले आहेत, नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापी अस्तित्वात नसती.
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम् ॥१०॥
वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत. जर्भरी, तुर्फरी, वगैरे (निरर्थक) बोल पंडितांकडून ऐकल्याचे आठवतच असेल.
अश्वस्यात्र हि शिश्नं तु पत्नीग्राह्यं प्रकीर्तितम् ।
भण्डैस्तद्वत्परं चैव ग्राह्यजातं प्रकीर्तितम् ।
मांसानां खादनं तद्वन्निशाचरसमीरितम् ॥११॥
(अश्वमेध यज्ञात) पत्नीने घोड्याचे शिश्न घ्यावे हे माहीतच आहे. (आणखी) याहून वेगळ्या गोष्टी घ्याव्यात असे भंडांनी सांगितलेलेही प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे मांस खाण्याचे विधीही निशाचरांनी निर्माण केलेले आहेत.
- - -
स्रोत : "चार्वाकमंथन" परामर्श ग्रंथमाला, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, २००१.
उपयुक्त माहीती
उपयुक्त माहीतीबद्दल शरद, धनंजय, चित्रा, गुंडोपंत यांना धन्यवाद.
या आणि यासंदर्भात इतरत्र असलेल्या माहीतीवरून मला पडलेल्या काही शंका.
१. चार्वाक हे एका व्यक्तीच नाव होत का त्या विचारसरणीला चार्वाक हे नाव दिल गेल? (चार्वाक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?)
२. लोकायत आणि चार्वाक दर्शन ही एकच विचारसरणी आहे का?
कारण एका ठिकाणी मी अस वाचल की लोकायत हे नाव कौटिल्याच्या साहीत्यात आणि तिथून पुढे आढळत. (एक ठीकाणाचा दुवा शोधून देतो.)
३. अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निमाण केल्या आहेत.
ह्यात विधाता म्हणजे कोण असेल? का इतर सर्व गोष्टी मान्य नसल्या तरी परमेश्वराच अस्तित्व मान्य होत?
४. वरील श्लोकात तीनच वेदांचा उल्लेख आहे. मी आणखी एका ठीकाणी याचसंदर्भात वाचताना देखील तीनच वेदांचा उल्लेख वाचला यामागे काय कारण असाव काही कळलं नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥
काही पुस्तके (संपादित)
आ.ह. साळुंखे यांचे 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' (या लेखकाचा अलिकडिल राजकीय/सामाजिक मते पटो न पटो परंतु हे लिखाण नक्की वाचण्याजोगे)
लोकायत - स. रा. गाडगीळ - प्रकाशक लोकवाङ्मय गृह
लोकायत (इंग्रजी ) - देविप्रसाद चट्टोपाध्याय - मोतीलाला बनारसीदास (प्र.) - पुण्यात अत्रे सभागृहासमोरील कॉम्प्लेक्समध्ये यांचे दुकान आहे.
सर्वदर्शनसंग्रह (सर्वधर्मसंग्रह नव्हे!) - माधवाचार्य - प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, मध्यवर्ती इमारतीसमोर (शासकीय प्रकाशन)
चार्वाक - इतिहास आणि तत्त्वज्ञान - सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा - वाई)
वेध चार्वाकाचा - उदय कुमठेकर - अभय प्रकाशन नांदेड.
चार्वाकमंथन - संपादकः उदय कुमठेकर - परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे विद्यापीठ. (प्रस्तावना: मे. पुं रेगे)
चार्वाकवाद आणि अद्वैतवाद - डॉ. प्रदीप गोखले - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रकाशन.
याशिवाय 'भारतीय जडवाद' हे राममनोहर लोहिया (की एम. एन्. रॉय, नक्की आठवत नाही, माझ्याकडे याची प्रत नाही) यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
त्याचा मराठी अनुवाद भारतीय बुक ट्रस्ट ने प्रकाशित केला आहे.
याशिवाय मानवेन्द्रनाथ रॉय यांचे 'जडवाद' हे पुस्तक (बा.र. सुंठणकर यांनी अनुवाद केलेले) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केले आहे.
काही संदर्भ स.रा. गाडगीळ यांच्या 'विचारमंथन' (प्रतिमा प्रकाशन, पुणे) मधेही मिळावेत
हा आमचा आवडीचा विषय. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.
चार्वाक
चार्वाकाबद्दल अनेकदा वाचनात येते. परंतु त्याचे मूळ लिखाण उपलब्ध नसल्याने त्याचे खरोखरचे म्हणणे काय होते हे कळणे कठीणच आहे. इतरांच्या लेखनातील उल्लेखावरून चार्वाक समजून घेणे म्हणजे गोपाळराव गोडशांच्या पुस्तकांवरून गांधी समजून घेण्यासारखे आहे.
चार्वाकाबद्दल लिहिणारे आधुनिक पंडित काय उद्देशाने लिहितात हे बर्याचदा कळत नाही,
कधी चार्वाकावद्दल लेखातून 'आम्ही काही पहिल्यापासून/कायमच असे (अध्यात्मिक) नव्हतो काही..' असे सांगत असल्याची शंका येते. तर कधी 'भौतिकवाद काय पश्चिमेतूनच आला नाही काही.. आमच्याकडेही होता' असे सांगत असल्याचीही शंका येते.
चार्वाक होऊन गेला असेलही किंवा नसेलही. कोणी म्हणतात त्याप्रमाणे सामान्य लोकांमधील प्रचलित विचारांचे संकलन म्हणजे चार्वाकदर्शन असेही असेल. पण त्याची मते पूर्णपणे नेस्तनाबूत केली गेली. भारतात तरी त्या मतांना कोणी किंमत दिली नव्हती हे सत्य उरतेच.
@शरद: इतर दर्शने वेदप्रामाण्य मानतात वा त्यांना वळसा घालतात पण शक्य तो सरळ टक्कर घेत नाहीत
जुन्याकाळात वेदप्रामाण्याचे (आणि स्मृतींचे) स्तोम इतके होते की आपल्याला काही गोष्ट नव्याने सांगायची झाली तरी 'वेदांचेही असेच म्हणणे आहे' असे किंवा मनूचेही हेच मत आहे असे म्हणावे लागत असे. (भले वेदात तसे काही सांगितले असो वा नसो. आणि कदाचित प्रत्यक्ष वेद फार कोणी वाचत नसल्याने बहुतेक वेळा खपून जात असेल).
कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात अनेक गोष्टी सांगताना मनूचे असेच मत आहे असे लिहिले आहे. वेदात चुकीचे सांगितले आहे असे म्हणण्याची कल्पनाही कोणी करीत नसेल.
नितिन थत्ते
हम्म
>चार्वाकाबद्दल लिहिणारे आधुनिक पंडित काय उद्देशाने लिहितात हे बर्याचदा कळत नाही,
>कधी चार्वाकावद्दल लेखातून 'आम्ही काही पहिल्यापासून/कायमच असे (अध्यात्मिक) नव्हतो काही..' असे सांगत असल्याची शंका येते. तर कधी 'भौतिकवाद काय पश्चिमेतूनच आला नाही काही.. >आमच्याकडेही होता' असे सांगत असल्याचीही शंका येते.
> भारतात तरी त्या मतांना कोणी किंमत दिली नव्हती हे सत्य उरतेच.
हे बहुदा खरे असावे. पण तसे जरी असले तरी निदान काहीएक चूक झाली आहे म्हणून त्याबद्दलच्या विषयाला प्रसिद्धी देऊन एका (योग्य) दिशेने पाऊल पुढे टाकले आहे असे म्हणायला हरकत नसावी.
जसे ब्राह्नण जातीत जन्माला आलेले काही ब्राह्मण हे मधल्या काळात मुद्दाम चारचौघांमध्ये मी मच्छी खातो, असे अभिमानाने सांगू लागले, तसेच हे धरावे. त्यांच्यातील जन्मजात जातीच्या अभिमानाची मनोवृत्ती संपूर्णपणे गेली असली /नसली, तरीही त्यांचा मूळ उद्देश हा जर आपण आणि इतर जातींमधील अंतर कमी करण्याचा असला, तर ही बडबड वेडपटपणाची वाटत असली तरी ठीक आहे, असे समजायला हरकत नाही. याहून खरी सुधारणा म्हणजे अजूनच काही वेगळी आहे, तिचा वेग हा तुम्हाला/मला हवा तसा नाही हे कितीही खरे आहे असे धरले, तरी समाजाच्या अशा सुधारणेचा वेग हा तुमच्या-माझ्या एका माणसाच्या विचारांवर अवलंबून नसतो असे वाटते. शिवाय अशा एखाद्या (उदा: मार्क्स) माणसाच्या तत्वज्ञानात तुम्हाला हवे तितक्या लवकर बदल घडवून आणण्याची एवढी शक्ती असली तर त्याचा उलटाही परिणाम होऊ शकतो असेही वाटते. असो.
थोडी आणखी माहिती
'चार्वाक' या शब्दाचा अर्थ गोड बोलणारा.(चारु वाक् यस्य सः|) हे दर्शन म्हणजे 'लोकायत.' बृहस्पतिने रचले आणि चार्वाक इत्यादी शिष्यांद्वारे सगळीकडे पसरविले. यती "कृष्णमिश्र" यांनी लिहिलेल्या प्रबोधचंद्रोदय या नाटकात अगदी सोप्या पद्धतीने या दर्शनाचे विवेचन केले आहे. अन्य अनेक ग्रंथांचा उल्लेख विद्वान् मित्रांनी केला आहेच.
त्यांच्या मतानुसार प्रत्य़क्ष हे एकमेव ज्ञानाचे प्रमाण आहे. पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. महाभूते चारच-पृथ्वी, आप,तेज आणि वायू. आत्मा मानत नाहीत त्यामुळे अर्थात पुनर्जन्म सिद्धांत मानत नाहीत.श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. किंबहुना श्राद्धानिमित्त ब्राह्मण भोजन घालणे म्हणजे खालच्या मजल्यावरच्या व्यक्तीला जेवायला देऊन वरच्या मजल्यावरच्या माणसाला तृप्त करण्यासारखे आहे असे उद्गार त्या दर्शनाचे मत स्पष्ट करताना कोठेतरी वाचल्याचे स्मरते.
आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे त्यांचे मानतात. त्यामुळे परलोकही मानत नाहीत. कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही, म्हणून ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो हे त्यांचे मत आहे.
ऋग्वेदाच्या दुसर्या मंडलात इंद्रसूक्ते प्रामुख्यानी आहेत. त्यातील ( २.१२) या सूक्तात 'अदेवयु:' या नावाने उल्लेखिलेले 'इंद्राला न मानणारे' काही लोक असावे असा उल्लेख सायणाचार्यांच्या भाष्यात येतो. हा गट पुढे नास्तिक लोकांचा निर्माण झाला असावा,कदाचित ही चार्वाकदर्शनाची सुरुवात असेल असा अंदाज ऋग्वेदाच्या अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
एक् शंका
चार्वाकाचा मृत्यु कसा झाला? कोणी सांगेल् का?
काही उत्तरे
(१) आधुनिक पंडितांचा उद्देश
देविप्रसाद (व त्यांचीच मते मराठीत लिहणारे) गाडगिळ, आठवले हे वामपंथी विद्वान. यांच्या लिखाणाचा उद्देश स्वच्छ होता व तो त्यांनी लपवून ठेवला असेही नाही. वामपंथाच्या विचारसरणीप्रमाणे वर्गविद्रोह हिंदूस्थानातही होता व तो दडपून टाकण्याचा प्रयत्न उच्च वर्णीयांनी व राजसत्तेने ( उदा. विद्यारण्यस्वामी, हे विजयनगरला प्रमुख मंत्री होते) केला. लोकायत तत्वज्ञान हे असूरांचे(आर्यपूर्व हिन्दूस्थानातील आदीवासी -गिरिजन,द्रविड, सिंधू संस्कृतीचे), मातृसत्ताक व कृषी प्रधान लोकांचे.सांख्य व तंत्र विचारसरणी यांतून लोकायत विचार निर्माण झाला.वेदसंस्कृतीच्या,गोपालक, पितृसत्ताक आर्यांनी ही विचारधारा मोडून काढली.
एकदा एका पंथविचाराचा प्रचार म्हणून लिहावयाला सुरवात केली म्हणजे संशोधनाचे नियम मोडूनही आपलेच खरे असे लेखन होते. याचे हे उदाहरण.
(२)आम्ही कायमच असे आध्यात्मिक नव्हतो ...
आध्यात्मिक नव्हतो याचा अर्थ जडवादी होतो असा घ्यावा कां? तसा घेतला तर उत्तर अकल्पित, चक्रावणारे आहे. "हो".
आजकाल आपण जाला आध्यात्मिक म्हणतो त्या अर्थाने वेदसंस्कृती कधीच आध्यात्मिक नव्हती. या संस्कृतीची ओळख म्हणजे "यज्ञ". यज्ञ कशाकरिता करावयाचा ? उत्तर एकच. इहलोकी व स्वर्गात सुख मिळवण्याकरिता. इतकेच नव्हे तर तुम्ही योग्य पद्धतीने यज्ञ केलात तर त्याचे फळ मिळालेच पाहिजे.ते देणे न देणे इंद्रावरही अवलंबून नाही. आणि त्या काळात निरनिराळे यज्ञ निरनिराळ्या कारणांकरिता करत.
काही अशी... असलेल्या व पुढील भाऊबंदांचा नाश, शत्रूचा नाश, भरभराट, अन्नप्राप्ती, पशुधनाचा लाभ, गावाची मालकी....
(३) भारतात चार्वाक मताला किंमत दिली नाही...
बुद्धकाळापूर्वी लोकायत हे विद्वत्मान्य होते. त्याचा अभ्यास आश्रमांत व राजदरबारीही होत होता. त्याची परंपरा ..शंकर..पुरंदर.. बृहस्पती.. अशी धरली जाई.कौटिलीय अर्थशास्त्रात लोकायत हे आन्वीक्षिकी म्हणजे तर्कविद्येचा भाग असल्याचे म्हटले आहे. ही परिस्थिती बुद्धकाळापासून बदलली.
(४)एका माणसाच्या तत्वज्ञानात जलद बदल घडवून आणण्याची शक्ती ..
लोकायत एका माणसाचे नव्हे.मार्क्सवादाचे आयुष्य किती ? ८० वर्षेही नव्हे.
शरद
चार्वाकावरचे ग्रंथ, संशोधन प्रबंध वगैरे.
मध्यंतरी, एका मुलीला चार्वाकावर एम्फ़िल/पीएच्डी करायचे होते म्हणून ती माझ्याकडे या विषयावर काही पुस्तके किंवा निदान त्यांची यादी मिळते आहे का ते विचारायला येऊन गेली. माझ्याकडची पुस्तके तिला फारशी उपयोगी पडण्याची शक्यता नव्हती, म्हणून मी पुणे आणि मुंबई विद्यापीठांमधील पुस्तकांची यादी जालावर शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सहज म्हणून वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट दिली. चार्वाक तत्त्वज्ञानावरची शंभराहून अधिक पुस्तके तिथे सापडली. सुमारे दहा बंगाली किंवा दक्षिणी भारतीय आणि ८-१० मराठी लेखक(लक्ष्मणशास्त्री जोशी, के.व्ही. आपटे, सदाशिव आठवले, जी. व्ही. तगारे, गणेश उमाकान्त थिटे, लक्ष्मण श्रीनिवास अर्जुनवाडकर, इ.इ.) सोडले तर बाकीचे लेखक पाश्चिमात्य.
पुस्तकांची यादी येथे आहे. प्रयत्न केल्यास त्यांतली काही पुस्तके आपल्या येथेही मिळू शकतील.--वाचक्नवी