पर्यावरणाचे रक्षणकर्ते

फोर्थ डायमेन्शन - 15
पर्यावरणाचे रक्षणकर्ते
पर्यावरणाची चर्चा करत असताना काही हितसंबंधियांची उलट-सुलट मतं ऐकल्यानंतर परिस्थिती खरोखरच हाताबाहेर गेली आहे का असा प्रश्न नेहमीच पडतो. पर्यावरणप्रेमींना मात्र भविष्यकाळ अंधारमय असेच वाटत आले आहे. विज्ञानानी हवामान बदलासंबंधी, प्रदूषण पातळीविषयी टाहो फोडून दिलेला गंभीर इशारा बहिऱ्या कानावर आदळत आहे. वातावरणातील दूषित वायूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. करोडोंच्या संख्येत असलेला हा मनुष्यप्राणी पृथ्वी जणू स्वत:ची मालमत्ता असल्यासारखा वागत आहे. नैसर्गिक संपत्तीची लूटमार करत आहे. नष्ट होत चाललेल्या ऊर्जास्रोतासाठी अवकाश, जलस्रोत, प्राणीजगत, व जंगल-वनस्पतींशी टक्कर देत आहे. आधुनिक (चंगळवादी!) जीवनशैलीच या पृथ्वीवर जीवन जगण्यास आव्हान देत आहे. आपल्याला याविषयी मदत करायची तीव्र इच्छा आहे. परंतु या आव्हानाचा आवाकाच एवढा मोठा आहे की हे एकट्या दुकट्याचे काम नाही अशी मनोमन खात्री झाली आहे. आपण सर्व निश:क्त, हताश, निर्वीर्य व निर्बल झालेलो आहोत.
या परिस्थितीवर मात करणे शक्य नाही का? शक्य आहे. पर्यावरण समस्यांना निधड्या छातीने सामोरे जाणारे या जगाच्या पाठीवर अजूनही शिल्लक आहेत. त्यांचा आदर्श आपल्याला सारखा खुणावत असतो. ब्राझिलमधील वर्षारण्यासाठी झगडणारी मारिना सिल्वा, जर्मनीमध्ये सौर ऊर्जेविषयी व्यावहारिक पातळीवर प्रयोग करणारा जोकिम लूथर, कॅलिफोर्निया राज्यालाच हरितमय करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला प्रसिध्द हॉलिवुड नट व त्या राज्याचा गव्हर्नर, अर्नाल्ड श्वार्झनेग्गर, शहरी चिमण्यांना जगविण्यासाठी जिवाचे रान करत असलेला महंमद दिलावर, पंजाबमधील नदीच्या प्रदूषणासंबंधी अभियान चालवणारा बलबीरसिंग सिचेवाल, पर्यावरण रक्षणासाठी करोडो डॉलर्सची देणगी देणारा जॉन डोयर.... असे एक नव्हे अनेक जणांची नावे आपल्यासमोर येतात.
त्यांच्या कार्याइतकीच ही माणसंसुध्दा महत्वाची आहेत. कदाचित हवामान बदलामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीवर त्यांचे नियंत्रण नसेलही. किंवा वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्राणीवंश नामशेष होण्याच्या मार्गावर असताना ते थांबवणे त्यांना शक्य झाले नसेलही. परंतु त्यांनी हाती घेतलेला वसा व त्यांच्या कार्याची प्रेरणा परिस्थितीवर - अगदी थोडया प्रमाणात का होईना - मात करणे शक्य आहे याची जाणीव आपल्याला सदैव करून देत असते. या अंधारमय जगात पणतीचा क्षीण दिवा घेऊन फिरणारे ती विझू नये म्हणून जिवाची बाजी लावणारे पर्यावरण रक्षणकर्ते आपल्याला दीपस्तंभासारखे आहेत. मनावर घेतल्यास माणूस काय काय करू शकतो याचे ते जिवंत उदाहरणं आहेत. त्यांच्यापुढे कुठलेही आव्हान कठिण नाही. कुठल्याही युध्दाचे पराजयात पर्यावसान होऊ देणारे ते नाहीत. फक्त आपण लढत राहिले पाहिजे, शेवटपर्यंत लढले पाहिजे. म्हणूनच अशा काही प्रेरणादायी व्यक्तींचा परिचय करून घेतल्यास आपल्यालाही याविषयी हालचाल करण्यास स्फूर्ती मिळेल. जीन फ्राँकाय व जीन चार्ल्स डी कॉ यांची व्हेलिब कंपनी या स्फूर्तीस्रोतामधील एक स्रोत आहे. इतराबद्दलची माहिती क्रमश: करून दिले जाईल.
जीन फ्राँकाय व जीन चार्ल्स डी कॉ यांची व्हेलिब कंपनी
फ्रान्सची राजधानी, पॅरिस शहराला अलिकडे भेट देणाऱ्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसेल. कारण शहरातील रस्त्यांच्या एका बाजूला सायकलींचा सुळसुळाट दिसेल. सायकल वापरणारे तरुण-तरुणी दिसतील. यासाठी जीन फ्राँकाय व जीन चार्ल्स डी कॉ या बंधूद्वयाना धन्यवाद दिले पाहिजेत. या दोघानी मिळून व्हेलिब या नावाची, सायकली भाडयाने देणारी कंपनी काढली. नाममात्र वार्षिक फी भरून सायकली भाडयाने घेण्याची सोय त्यांनी केली. व आपला प्रवास संपला की जवळच्याच या कंपनीच्या सायकल स्टँडवर सायकल सोडून देण्याची सुविधा असत्यामुळे पर्यावरणप्रेमीमध्ये ही कंपनी लोकप्रिय होत आहे. जुलै 2007 साली सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळत असून तीन कोटीहून जास्त सायकलीचे भाडेकरू त्यांना आतापर्यंत मिळाले आहेत. मुळातच त्यांची जाहिरात कंपनी होती. सायकली भाडयाने देण्याच्या या पूरक उद्योगामुळे त्यांच्या उत्पन्नाचा आकडा 300 कोटी डॉलर्सच्या पुढे गेला आहे.
सायकलीच्या भाडेकरूंना कंपनीतर्फे एक क्रेडिट कार्ड दिले जाते. या क्रेडिट कार्डच्या आधारे संगणक प्रणालीमधून ऑफीसमध्ये बसल्या बसल्या सर्व माहिती गोळा केली जाते. सायकली कुठे आहेत याचा मागोवा घेणे शक्य झाले आहे. सायकल कुठून घेतली, कुणी घेतली, कुठे सोडली, कुणी वापरली, किती वेळ वापरली, इत्यादी सर्व तपशील संगणक क्रेडीट कार्डद्वारे मिळण्याची सुविधा या संगणक प्रणालीमध्ये आहे. शिवाय शहरभर पसरलेल्या सायकल स्टँडचा वापर जाहिरातीसाठी केल्यामुळे त्यातूनही बऱ्यापैकी उत्पन्न मिळू शकते. सुमारे दोन लाख ग्राहक वर्षभराची वर्गणी भरून सदस्य झालेले आहेत.
फ्रान्सच्या राजधानीत सायकलीलाच सार्वजनिक वाहन म्हणून शिक्का मोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सायकलीपासून पर्यावरणाला धोका नाही, प्रदूषण नाही, आवाज नाही, व ऊर्जेसाठी धरतीला ओरबडणे नाही. युरोपमधील आणखी 49 शहरात व्हेलिबचा विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. शिकॅगोपासून सिंगापूरपर्यंतच्या अनेक महानगरपालिका या उद्योग प्ररूपाचा अभ्यास करत आहेत. या बंधूंच्या मते ही एक लहान कृतीच आहे. यात आमच्या पदरचे काही नसून योग्य वेळ आल्यामुळे लोकांच्या वर्तनात फरक पडत आहे.
सायकलीच्या लोकप्रियतेला केवळ जीन फ्राँकाय व जीन चार्ल्स डी कॉ यांचा औद्योगिक प्रारूप ही एकच गोष्ट कारणीभूत नसून पॅरिसचे महापौर बट्राँड डेलोनी यांचाही यात फार मोठा वाटा आहे. या महापौराने शहर वाहतुकीतील अडथळा दूर करणे व वाहतूक प्रदूषण नियंत्रित करणे यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. व्हेलिबच्या सायकलीच्या उपक्रमासाठी पॅरिस शहरभर प्रत्येक 300 मीटर्सवर सुमारे 1400 सायकल स्टँडची व्यवस्था या महापौराच्या पुढाकारामुळे शक्य झाले. 371 किमी लांबीची सायकलीसाठी स्वतंत्र रस्ते बांधणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. परंतु या जिद्दी महापौराने ती करून दाखवली.
जागतिक बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून कागदोपत्री सायकलीचे रस्ते पण त्याचा वापर मात्र स्कूटर व बाइकसाठी अशी सत्यस्थिती असलेल्या आपल्या देशातील महापौर व इतर नेत्यांनी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. आठवडयातून एकदा व तेही 50 मीटर्स सायकल चालवून (व सोबत येत असलेली आलिशान महागडी कार!) वृत्तपत्रातील रकाने भरून स्तुतीसुमने उधळून घेणारे आपल्या येथील महापौर व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापासून प्रेरणा घेतल्यास वाहतूक प्रदूषणाच्या प्रमाणात निदान वाढ तरी होणार नाही हे मात्र नक्की!

Comments

ओळख दिल्याबद्दल धन्यवाद

आताच वेलिब' संस्थेचे संस्थळ बघितले. मस्त कल्पना आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्षात उतरलेली कल्पना आहे. (संस्थळ आधी फ्रेंचमध्ये उघडते, पण उजव्या हाताच्या वरच्या कोपर्‍यावर तीन भाषांपैकी सोयीची भाषा निवडता येते.)

(माझे मनाचे भरकटणे कित्येकदा "शुभ बोल रे नार्‍या" म्हणायला लावते. पण विचार आला की आपल्या हातची सायकल चोरीला गेली, किंवा मोडली तर काय करावे. सायकल हरवली तर काय करावे, त्याबद्दल ग्राहकासाठी सूचना मात्र वेलिब'च्या संस्थळावर सापडत नाही. पण बहुतेक लोकांचा गृहविमा भाड्याच्या सायकलचेही ग्रहण करतो ही "चांगली बातमी" एका पानावर सापडली. विकिपेडिया पानावरून दिसते, की अशा घटना आराखड्यातल्या अपेक्षेपेक्षा अधिक झाल्यात. पण ज्या अर्थी कंपनी अजून वाढतेच आहे, बुडत नाही, त्यावरून असे वाटते, की या वाईट घटनांचे प्रमाण काळजी करण्याइतपत नसावे.)

सुंदर

सुंदर कल्पना आहे.

परंतु फेब्रूवारी मध्ये आलेल्या बी बी सी च्या बातमी नुसार
सायकली चोरी जाण्याचे प्रमाण बेसुमारपणे वाढल्याने या प्रकल्पावर ताण येतो आहे.

स्वतःची सायकल नसल्याने या सायकली चोरून वाटेल तश्या ताबडवल्या जातात. आणि मग त्यावर केल्या जाणार्‍या स्टंट्स चे चित्रण करून ते यु ट्युब वरही दाखवतात. (म्हणे).

असो,
हा प्रकल्प खरच खुप आवडला आहे.
आख्या शहरालाच सायकली देणे जर काही कारणाने अपयशी ठरले तर, (तसे न होवो!)
किमान प्रत्येक गेटेड कम्युनिटीमध्ये तरी असा प्रकल्प असावा -
मग तो वाढवून उपनगरीय आणि मग आख्या शहराला जोडणारा -
अशी वाढही करता यावी.

या शिवाय,

सहजतेने मोडतोड करताच येवू नये
अश्या दणकट सायकलींचे डिझाईन कुणी बनवलेच नाहीये का?

आपला
गुंडोपंत

आय आय एम आणि कल्पनाविलास

भारतात आय् आय एम मधून बाहेर पडणार्‍या व्यवस्थापनकुशल स्नातकांना या कल्पनेवर काम करण्यास हरकत नसावी. अशी सायकल भाड्याने देण्याची कल्पना भारताला फार जुनी नाही. (माझ्या लहानपणी १ तासाला ५० पैसे दराने भाड्याने घेऊनच मी सायकल चालवायला शिकलो. अजूनही मोठमोठ्या शहरातही ठिकठिकाणी सायकल भाड्याने देणारी दुकाने अस्तित्वात आहेत.) भारतात समभूज चौकोनी साच्यावर आधारित मजबूत सायकली अजूनही बनतात. त्यामुळे उत्तम दर्जाची टिकाऊ सायकल बनवणे फारसे अवघड नाही. परंतु या सायकलमध्ये 'पावसापासून संरक्षण' करण्याची यंत्रणा बसवावी. ( एक पेटंटेबल आयडिया ;) - सायकल रिक्षाला किंवा कन्वर्टिबल कारला जसा मागे जाणारा टप असतो (रिट्रॅक्टेबल हूड) तसाच पण पारदर्शक टप सायकलसाठी बनवणे. (C)2009 विसुनाना :):);))

दुकानांची साखळी निर्माण करून (योग्य तो प्रचार करून ) तिला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि सायकलिंग ही 'इन्-थिंग' बनली तर भारतात ही कल्पना नक्कीच यशस्वी होईल.
मोडतोडीला आळा घालण्यासाठी एका सायकलची अर्धी किंमत अनामत रक्कम म्हणून ठेऊन घेता येईल. (मग त्यापेक्षा लोक सायकल विकतच घेणार नाहीत काय? कदाचित घेतील. पण शक्यता कमी - कारण सायकलची देखभाल, स्वतःच्या गावाहून दूर ठिकाणी सायकल मिळण्याची सोय इ.)

भाऊ काटदरे - 'अनुभव'च्या अंकात

कोकणात पर्यावरणातल्या जीवसाखळीसाठी काम करणार्‍या भाऊ काटदरे यांची माहिती 'अनुभव'च्या अंकात आली आहे.

झीप कार

फ्रान्समधील सायकली अमेरिकेतील अंतरांमुळे चालू शकणार नाहीत मात्र येथे इथल्या पद्धतीस योग्य ठरेल असा एक यशस्वी उद्योग चालू केला आहे.
बॉस्टनपासून तो चालू झाला पण आता तो अनेक ठिकाणी आहे. त्याचे नाव आहे "झीप कार".

सर्वसाधारणपणे येथे गाडी शिवाय चालत नाही. जे अगदी प्रमुख शहराच्या जवळ राहतात त्यांना थोडेफार सार्वजनीक वाहतुकीवर अवलंबून राहता येते. उ.दा. बॉस्टन, न्युयॉर्क, नॉर्थ न्यू जर्सी, वॉशिंग्टन डिसी वगैरे भागात सबअर्बन भुयारी आणि जमिनीवरील् रेल्वे तसेच बसेस आहेत. तरी देखील पद्धतच अशी करून ठेवली आहे की गाडीशिवाय पूर्ण जगता येणे कठीणच...

मग त्यात एक उपाय म्हणून शहरात राहणारे (विशेष करून तरूण विद्यार्थी/काम करणारे ज्यांचे कुटूंब वाढलेले नाही, जे पर्यावरणवादी आहेत असे) गाडी दिवसाच्या तत्वावर भाड्याने घेऊ शकतात. पण मग त्याला $३०-४० + विमा+ इतर पैसे + गॅस (पेट्रोल) देत बरेच खर्चिक होते, विशेष करून तिथल्यातिथे दिवसभरपण गाडी लागणार नसेल तर. शिवाय गाडी खूप आधी रिझर्व करा, त्याची दुकाने विशिष्ठ ठिकाणी, ऑफिसच्या काळातच उघडी (अपवाद विमानतळांवरील)..

झीप कारने असे ग्राहकसमुदाय हेरला आणि त्यांनी "रेडीओ फ्रिक्वन्सी आयडेंटीफायर (आरएफाअयडी), हिडन जीओ इन्फॉर्मेशन सिस्टीम वगैरेचा उपयोग करून गाड्या बाजारात आणल्या. त्या अगदी साध्या साध्या होंडा,, माझदा पासून ते टोयोटा हायब्रिड मर्सिडीझ आणि पिकाअप ट्रक्स पर्यंत सगळे विविध ठिकाणी पार्कींगलॉट, रस्त्यांवर ठेवून दिल्या. या पद्धतीची मेंबरशीप (वर्षाला $७० का असेच काही) घ्यावी लागते. मग ते तुमचे मेंबरशिप आरएफाअयडी कार्ड पाठवतात. जेंव्ह गाडी हवी असते तेंव्हा zipcar.com या संकेतस्थळावर जाऊन हव्या त्या वेळेसाठी गाडी बुक करायला फॉर्म बरायचा. मग तुमच्या लोकेशन प्रमाणे तुम्हाला आसपासच्या सर्व उपलब्ध गाड्या कळतात आणि त्या किती पासून किती पर्यंत उपलब्ध असू शकतील तेही कळते. त्यांचे रिझर्वेशन हे तासाच्या भावाने असते - साधारण $८ ते $११ असे पैसे पडतात त्यात तुमचा विमा, गॅस, वगैरे सर्वकाही तेच देतात. मग गाडी बुक करून झाली की अगादी मध्यरात्रीची पण वेळ दिली असेल तर तेंव्हा त्या ठिकाणी जायचे, गाडीच्या विंडशिल्डवर लावलेल्या आरएफाआयडीवर आपला आरएफाआयडी फिरवायचा. दार उघडते किल्ली आतच असते. गाडी वापरून झाली अथवा वेळ संपली की परत तिथेच आणून ठेवायची. जर ८ तासाच्या वर घेतली तर दिवसभर ८ तासाच्या पैशात मिळते.

एका अर्थाने गाड्या कमी घेऊन पण असा उपाय लोकं चालवून घेतात हे लक्षात येते.

 
^ वर