लंडन
लंडनला मी कधी गेलो नाहीये आणि पुढे कधी जाण्याचा योग येणार असेल तर आत्तातरी मला त्याबाबत कल्पना नाही. पण अलीकडे लंडन मला सारखंच भेटत असतं. सारखा कुठे ना कुठे त्याचा उल्लेख येतच असतो. पुस्तकं वाचताना त्याचा उल्लेख येतो, टीव्ही बघायचा झाला तर डिस्कव्हरी किंवा नॅट जिओ वर हमखास लंडनवरचा कार्यक्रम लागलेला असतो आणि विशेष म्हणजे गाणी ऐकावी म्हटली तर त्या दिवशी गाण्यातही लंडन भेटलंच.
आताच काही दिवसांपूर्वीची गोष्ट. इंग्रजी विषयाचा अभ्यास चालला होता. भरपूर कविता अभ्यासायला होत्या. त्यात लंडनवरच्या दोन कवितांनी लक्ष वेधून घेतलं. दोन्हीही वेगवेगळ्या कवींनी रचलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर त्यांच्या ज्या मध्यवर्ती कल्पना..... सेंट्रल थीम्स आहेत त्या देखील अगदी जमीन अस्मानासारख्या परस्परविरोधी आहेत, वेगळ्या आहेत. एकात आहे निर्दय आणि थंड वाटणारं लंडन. तर दुसरीत आहे कौतुक. अगदी अतिशयोक्ती वाटेल इतपत कौतुक. पहिली कविता आहे विल्यम ब्लेकची. लंडन हेच तिचं नाव आहे. ( विल्यम ब्लेकच्या कविता झकास असतात. मला आवडतात. साँग्ज ऑफ इनोसन्स आणि साँग्ज ऑफ एक्स्पिरियन्स वाचण्यासारखे!) लंडनचं ब्लेकनं केलेलं चित्रण अक्षरश: भेसूर वाटावं असं आहे. अंधारं, कुबट, ओलसर , धुरानं काळवंडलेलं आणि लहानग्या मुलांना Chimney Sweeper म्हणून राबवून घेणारं असं नैराश्याने भरलेलं लंडन ब्लेकनं रेखाटलंय. या कवितेतल्या काही ओळी ब्लेकनेच आधी वेगळ्या लिहल्या होत्या आणि नंतर बदललेल्या आहेत आणि समीक्षकांनीही कवितेच्या अर्थाच्या वेगवेगळ्या शक्यता मांडलेल्या आहेत.
दुसरी कविता आहे वर्डस्वर्थची. विल्यम वर्डस्वर्थची. इंग्रजी साहित्यात या तीन विल्यमनी, शेक्सस्पियर, वर्डस्वर्थ आणि ब्लेक यांनी बरीच, मोलाची वगैरे जी म्हणतात ना तशी भर घातलेली आहे. वर्डस्वर्थने ही कविता लिहली तेव्हा तो Annete Vallon या आपल्या प्रेयसीला आणि तिच्यापासून झालेल्या आपल्या मुलीला भेटायला, बहीण डोरोथी बरोबर फ्रान्सला निघाला होता. ( त्यावेळेस त्याने मेरी हॅचिन्सन या लहानपणीच्या मैत्रिणीबरोबर लग्न करायचे ठरवले होते आणि आता काही तडजोड करणे आवश्यक आहे म्हणून फ्रान्सचा रस्ता पकडला होता.) तर त्यावेळेस वेस्टमिन्स्टर ब्रिजवर जो थोडावेळ त्याने घालवला त्या वेळेस लंडनचे भल्या सकाळचे जे अतिशय सुंदर(?) दर्शन त्याला झाले त्यावर ही कविता आहे. कवितेचे नावच मुळी Composed Upon Westminster Bridge असे आहे. या कवितेत अगदी कैच्याकैच वर्णन केले आहे. म्हणजे पृथ्वीवर यासारखे दुसरे पाहण्यासारखे काही नसेल, जो कोणी या दृश्याच्या आस्वाद न घेताच पुढे जाईल तो बावळट असेल वगैरे वगैरे. वर्डस्वर्थ, ज्याने स्वत:ला Worshipper of Nature असे म्हटले आहे त्याने असल्या शहरी बकालपणाच्या सगळ्या खुणा अंगावर मिरवणार्या लंडनचे केलेले वर्णन पटत नाही. १८०२ च्या काळातल्या औद्योगिक क्रांतीने धुराड्यांमध्ये पडलेली भर, त्यात मिसळलेले सदानकदाचे धुके असे जे शहर होते त्याच्या All bright and glittering in the smokeless air अशा वर्णनावर कोण विश्वास ठेवेल? अशी ही निरव शांतता मी कधी पाहिलेलीही नाही आणि अनुभवलेलीही नाही असेही वर्डस्वर्थने पुढे म्हटले आहे. लेक डिस्ट्रीक्ट सारख्या बारा महिने तेरा काळ सृष्टीची हिरवाई लाभलेल्या भागात राहूनही वर्डस्वर्थला निरव शांतता जर वेस्ट मिन्स्टरवर लाभत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकले आहे असे मानायला बराच वाव आहे.
असो. हे झालं इंग्रजी साहित्यात दिसलेलं थोडंफार लंडन. आपल्या मराठीतही लंडनवर पुस्तकं आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे मीना प्रभूंचं 'माझं लंडन'. त्या बहुतांश वेळ लंडनमध्येच असतात आणि पूर्ण लंडनचा (मला थोडासा कंटाळवाणा वाटलेला) त्यांनी चांगला परामर्श घेतला आहे. बाकी पुलंनीही लंडन, तिथला ब्रिटीश माणूस यांबद्दलही लिहले आहे ते इथे परत वेगळे सांगायची गरज नाही. आनंद पाटलांनी लिहलेले 'पाटलाची लंडनवारी', विलास खोले यांचे 'अमेरिका व्हाया लंडन' (अजून वाचलेले नाही) ही देखील इतर पुस्तकं आहेत. 'रॅंग्लरीचे दिवस' हा नारळीकरांच्या आगामी आत्मकथनात येत असलेला आणि मौजेच्या २००८ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेखही लंडनबद्दल बरंच काही सांगून जाणारा आहे. लंडन मध्ये २००५ साली झालेल्या बॉम्ब हल्ल्यांवरचे निळू दामले यांचे 'लंडन बॉम्बिंग २००५' ही अवश्य वाचण्यासारखे आहे.
लंडन शहराबद्दल बोलतोच आहोत तर लंडनशी संबंधित अजून एक विषय म्हणजे लंडनचे हवामान. अरेरे, अरेरे, अरेरे! त्रिवार अरेरे! दुसर्या कुठल्याही शहराचे हवामान एवढे कुप्रसिद्ध आणि बदनाम नसेल. आपले बालकवी कधी लंडनला गेले होते की माहित नाही पण ’क्षणांत येते सरसर शिरवें, क्षणात फिरुनी ऊन पडे’ ही ओळ श्रावण महिन्यापेक्षा लंडनला जास्त लागू पडणारी आहे. तुम्ही कधी विंबल्डनचे सामने पाहिले आहेत का? आधी या स्पर्धेत भाग घेणार्या खेळाडूंना सामना हरतो का जिंकतो, स्पर्धेत आपले कसे होणार याची चिंता करावी लागतच असे, शिवाय पावसाने गोंधळ घातला तर काय? याचीही चिंता करुन त्यांची तोंडे सुकून जात व बघण्यासारखी होत असत. मागच्याच वर्षीची गोष्ट, फेडेक्स आणि राफ्फा यांच्या अंतिम सामन्यात पावसाने असा काही धुमाकूळ घातला की सामन्यात बराच खंड पडला, मॅच लांबत गेली आणि शेवटी जेव्हा नदालचा विजय झाला तेव्हा जवळजवळ अंधार पडला होता. पुढे मग "एवढ्या अंधारात चेंडू दिसायला फारच अडचण होत होती" वगैरे कारणे सांगून फेडररने आयोजकांना दूषणे दिली, स्वत:चे समाधान करुन घेतले आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. विंबल्डनच्या आयोजकांना पावसामुळे खेळाडूंकडून असे खडे बोल ऐकायला लागतच होते पण मध्ये महिला विजेत्या खेळाडूंना समान रक्कम न देण्यामुळेही त्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. एवढं होऊन भरपूर पैसे खर्च करुन यावर्षी विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर चांगले छप्पर घातले तर यावर्षी पाऊस पडलाच नाही आणि आयोजकांची तोंडे परत एकदा मलूल होऊन गेली. बिच्चारे! देव त्यांचं भलं करो.
वर लंडनचा उल्लेख असलेलं गाणं मी ऐकलं असं लिहलं आहे ते गाणं आहे शकिराचं. लंडनच्या हवामानाची पद्धतशीर बदनामी या गाण्याच्या एका ओळीने केली आहे. Oral Fixation - Volume 2 मधलं Your Embrace हे गाणं. त्यातल्या ओळी अशा आहेत की That without you, this place looks like london, It rains every day वगैरे वगैरे..... मला तर पहिल्यांदा ऐकलं तेव्हा फारच हसू आलं होतं. एका प्रेयसीची विरहव्यथा सांगणारी याच्यापेक्षा चांगली उपमा दुसरी कोणती असल्यास ती मला सांगण्याची कृपा करावी.
अलीकडेच मुंबईत ५० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबद्दल विचार चालू आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये लंडन शहराला जागतिक विक्रमाचा पुरस्कार नक्कीच दिला पाहिजे. एकट्या लंडनमध्येच जवळजवळ पाच लाख कॅमेरे असून त्यांची एकूण इंग्लंडमधली संख्या जवळजवळ ४२ लाख आहे. गुन्हेगारांना गुन्हा करणे ही अशक्य बाब झाली असून तुम्ही नुसतं संशयास्पद वर्तन करायचा अवकाश की तुमच्यावर पाळत सुरु होते. असा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तिथल्या पोलिसांनी केला आहे पण व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी (as usual) जो एक घिसापिटा वाकप्रयोग आहे, त्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी तुम्ही कुठेही गेलात तरी कुणीना कुणी तुमच्यावर नजर ठेऊन आहे ही भावना जरा विचित्रच वाटते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ब्रिटीशांची रॉयल मेल पण करत असून त्यांचे वेळेवर, न गहाळ करता आणि दिवसाच्या आत पत्रे पोहोचवण्याचे प्रमाण जवळजवळ ९९.६ टक्के एवढे आहे. आपल्याकडे गर्दीच्या वेळी ज्याप्रमाणे वाहतुकीचा बोजवारा उडतो त्याप्रमाणे लंडनमध्ये होण्याची शक्यता नाही. इथेही त्यांचे कडक नियम भलतेच कडक आहेत आणि सेंट्रल लंडनला तुम्हाला स्वत:चं वाहन घेऊन जायची इच्छा असेल तर एका दिवसाच्या पासची किंमत आहे ८पाऊंड.
अशा या लंडनबद्दल जाणून घेण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत. सगळं काही पद्धतशीर करण्याची त्यांची सवय अचंबित करुन टाकणारी आहे. प्रत्येकालाच आपलं शहर नेहमीच चांगलं वाटतं, जसं पुणेकरांना पुणे, मुंबईवाल्यांना मुंबई वगैरे. लंडनबद्दलही सॅम्युएल जॉन्सन या लेखकाचे वाक्य लक्षात घेण्यासारखे आहे. तो म्हणतो, "You find no man, at all intellectual, who is willing to leave London. No, Sir, when a man is tired of London, he is tired of life; for there is in London all that life can afford."
वर म्हटल्याप्रमाणे मी अजून लंडन पाहिलेलं नाही. पाहण्याची इच्छा आहे पण योग कधी येईल त्याची कल्पना नाही. जाईन तेव्हा या वाक्याची खातरजमा करता येईल.
-सौरभदा.
Comments
सुरेख
लेख आवडला. लेख वाचल्यावर एका क्षणात जर्नी डाऊन द मेमरी लेन घडल्यामुळे फारच नॉस्टॅल्जिक वगरे वाटायला लागलं.
वर्डस्वर्थवरची टिप्पणी मार्मिक आहे. ब्रिटिश माणूस राणी, लंडन आणि तिथली हवा यांच्याबद्दल सारखाच हळवा होत असावा असं वाटलं.
शेवटी पळसाला पाने तीनच असतात तशी 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ' अशी भावना साधारण मनाच्या एका कोपर्यात कायम वस्तीला असतेच असे वाटते. म्हणूनच लंडनला गेलेले मुंबईकर ट्यूब आहे पण लोकलच्या गर्दीची मजा (!) नाही म्हणून हळहळतात, मुंबईला गेलेले पुणेकर दर दहा फुटांवर एक स्टेशन आणि पूर्व-पश्चिमेचा घोळ पाहून मायगावीचे रस्ते बरे असं म्हणतात आणि जगभरात गेलेले ब्रिट्स जिकडे तिकडे आपल्या मायगावाच्या नावचीच गावं वसवून त्या गावाशी असलेली आपली नाळ जपायचा प्रयत्न करतात. :)
(हे वाक्य जरा जास्त साहित्यिक वगरे झालं असेल तर ह घ्या! )
मी लंडनला गेल्यावर पहिलंच दर्शन रस्त्यावर साठलेल्या पावसाच्या पाण्याचं घडलं आणि दुसर्याच क्षणी एका मोटारीने ते पाणी बेदरकारपणे माझ्या अंगावर उडवल्यामुळे मला त्या शहराबद्दल जे काही ऍट होम फीलिंग आलं त्याला मात्र तोड नाही :)
तुम्ही म्हणता तसं हे शहर प्रत्यक्ष अनुभवलंच पाहिजे असं आहे याबद्दल मात्र दुमत नाही.
विषयाचा वेगळेपणा आणि लेखनातल्या भावना मस्त. असे आणखी वाचायला आवडेल.
--अदिती
-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने
धन्यवाद...
प्रतिसादाबद्दल....
==================
लंडन
आणखी एक लंडनप्रेमी भेटल्यावर छान वाटले. :-)
मलाही लंडनबद्दल आकर्षण आहे. सुदैवाने बघण्याचा योगही येऊन गेला. पण जाण्याआधी माझ्या लंडनबद्दल अशाच कल्पना होत्या. लंडनचे सर्वात पहिले दर्शन शेरलॉक होम्सच्या मालिकेत झाले. नंतर कादंबर्या, चित्रपट यातून लंडन भेटत राहिले. मग रॉबर्ट नावाचा एक लंडनवासी भेटला. त्याला विचारल्यावर तो म्हणाला तुझ्या मनातील लंडन आणि आत्ताचे यात बराच फरक आहे. तू गेल्यावर निराश होणार नाहीस अशी आशा आहे. त्याचे म्हणणे बरेच खरे होते. कथेतील शहर आणि प्रत्यक्षातील शहर यात बराच फरक होता. तरीही निराशा झाली नाही. लंडन प्रत्यक्षातही आवडले. :-)
याखेरीज राणीच्या देशातील खेडीही मला खूप आवडली.
साधारणपणे नकाशावर फारशी प्रसिद्ध नसणारी. तिथे बस स्टेशनवर गावातील पेन्शनर लोक, आ़जी-आजोबा आपल्या गावातल्या पारावर चालतात तशाच गावगप्पा करत टीपी करत असतात. बहुतेक सगळीकडे हिरवा रंग मुबलक. मी जिथे जिथे गेलो तिथे ठेंगणी, सुबक घरे दिसली. अवाढव्य वाढलेल्या फ्ल्याटसिस्टीम दिसल्या नाहीत. बहुधा लिव्हरपूलसारख्या इंडस्ट्रीयल शहरांमध्ये कदाचित चित्र वेगळे असेल. प्रत्येक घराला फुलबाग ही हवीच. भाषेची अडचण नसल्याने चुकण्याची भीती नाही. त्यातही बहुतेक आजी-आजोबा गप्पा मारायला उत्सुक असतात असे जाणवले.
84, Charing Cross Road हे पुस्तक आठवले. यातील नायिका अमेरिकेतून इंग्लंडमध्ये असलेल्या एका पुस्तकाच्या दुकानात काम करणार्या लोकांबरोबर पत्रव्यवहार करत असते. तिलाही लंडनबद्दल बरीच उत्सुकता असते. तिच्या म्हणण्यानुसार, "A newspaper man I know, who was stationed in London during the war, says tourists go to England with preconceived notions, so they always find exactly what they go looking for. I told him I'd go looking for the England of English literature, and he said: "Then it's there."
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
लिहीत जा...
राजेंद्र, इंग्लंडमधल्या खेड्यांवर तुझा एखादा लेख आणि चित्रे बघायला आवडतील. बाकी, हे चित्रही झकास आहे! अशा खेडेगावांमध्ये जमीन सपाट वगैरे करायच्या भानगडीत पडत नाहीत का? लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधल्या हॉबिटसच्या गावासारखेच हे गाव वाटते!
-सौरभ.
==================
छान लेख
लंडनला हवाई सफर झाली आहे (कनेक्टींग फ्लाईट जर फिरत फिरत गेले) :-) लेख वाचुन जायची इच्छा झाली आहे.
अवांतर -उपक्रमाचे एक सदस्य श्री. चंद्रशेखर यांच्या वाचनीय ब्लॉगवरील "आरामखुर्चीतील प्रवासी" हा लेख अवश्य वाचा.
धन्यवाद..
आरामखुर्चीतील प्रवासी लेख वाचनीय आहे.
धन्यवाद.
==================
चांगला लेख
लेख आवडला. लंडनची लहानशी सफर इतरांच्या डोळ्यांतून झाली.
युकेच्या हवामानावर गल्फ स्ट्रिमचा मोठा प्रभाव असल्याचे शालेय जीवनात भूगोलात शिकल्याचे आठवते. गल्फ स्ट्रिम नसतात तर तेथील तापमान १०-१२ (से कि फॅ आठवत नाही पण से. असावे) घटले असते. बंदरे हिवाळ्यात गोठली असती वगैरे वगैरे शिकल्याचे आठवते.
नाही बॉ! जगातील सर्वात कुप्रसिद्ध हवामान शिकागो या शहराचे आहे यावर अनेकजण शिक्कामोर्तब करतील. ;-) त्यामानाने लंडन मवाळ. तिथे फारसा बर्फवर्षाव होत नाही. बोचरे वेगाचे वारे सुटत नाहीत. कडकडाट होऊन वादळे येत नसावीत. उन्हाळा १-२ महिनेच राहत नाही वगैरे. जर लंडनला त्रिवार अरेरे तर शिकागोला हज्जार अरेरे अशी तुलना मी करू शकते. (शिकागोच्या हवामानापेक्षा अलास्का बरे असे आमचे अलास्काला राहून आलेले एक मित्र सांगतात.)
ह्म्...
शिकागोबाबतची ही माहिती नवीन आहे.
तिथे फारसा बर्फवर्षाव होत नाही. बोचरे वेगाचे वारे सुटत नाहीत. कडकडाट होऊन वादळे येत नसावीत. उन्हाळा १-२ महिनेच राहत नाही वगैरे.
म्हणजे शिकागोत हे सगळे होत असते काय? बापरे! :-(
शिकागोत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलेल्या सभागृहात त्या प्रसंगाची आठवण करुन देणारे काहीच नाही व ते आता सभागृह म्हणून न वापरता
वेगळ्याच कारणासाठी उपयोगात आणले जाते हे खरे आहे का?
-सौरभ.
==================
शिकागोत
शिकागोत यापेक्षाही वाईट परिस्थिती असावी. तिथे टोरनॅडोसारखी चक्रीवादळे येतात. बर्फाचा पाऊस पडतो. (हिमवर्षाव नाही. पाऊस पडता पडता त्याचा कडक पारदर्शक बर्फ बनतो.) ही परिस्थिती हिमवर्षावापेक्षा अधिक शोचनिय असते. जे काही घसरण्यासारखे आहे ;-) गाड्या, माणसे इ. ते सर्व यावेळेस घसरून घेऊन अपघात घडवून घेतात. वारे वहायला लागले की ४०-५० मैलाच्या वेगानेही वाहतात.
कमी अधिक फरकाने २०० मैल खाली आमच्याकडेही असेच घडत असते पण आम्ही शिकागोपेक्षा बरे अशी मनाची समजूत करून घेतो. मध्यंतरी आमच्याकडे असे वारे वहात असताना आमच्या ब्याक यार्डातील सर्व वजनी फर्निचर आमच्या शेजार्याच्या ब्याकयार्डात पोहोचले होते. ;-)
याबद्दल नेमके माहित नाही. शक्यता नाकारता येत नाही परंतु शिकागोतील लेमॉन्टच्या देवळात विवेकानंदांचा भव्य पुतळा उभारला गेला आहे.
फोटोत दिसतोय त्यापेक्षा नक्कीच भव्य आहे पुतळा.
हूरहूर लावणारा लेख
"लंटन!" हा प्रां लक्ष्मण देशपांड्यांचा उच्चार हा माझा लंडनचा सगळ्यात आवडता उच्चार ;)
लंडन, जपान, जर्मनी, रोम आणि जेरूसलेम ही स्थानं आयुष्यात एकदा तरी बघायची इच्छा आहे. नशीब असलं तर तिथे काहि काळ वास्तव्य करायचीच इच्छा आहे.
अनेक पुस्तकांत, मासिकांत, कथांमधे, कादंबर्यांत हे शहर इतके भेटले आहे की न जाताच तिथली अनेक ठिकाणे माहितीची आहेत. एकदा विमानातून लंटन बघितलं आहे. हिथ्रोला पाय देखील लागले आहेत.. मात्र लंडन अजून प्रत्यक्ष भेटलेलं नाहि. हा लेख वाचून ती राहिलेली इच्छा पुन्हा जोराने डोके काढत आहे.
लंडनबाबत वरील लेखात घेतलेला धांदोळा खूप आवडला.
राजेंद्रने आजूबाजूची गावं म्हटल्यावर मला आठवली ते बीबीसीच्या प्राईड अँड प्रिज्युडीस मधील दृश्ये.. ति दृश्ये बघून मी कंट्रीच्या प्रेमातच पडलो होतो / आहे. (राजेंद्रने दिलेला फोटुही क्लासच)
मुंबईकराला सहसा ब्रिटीश गावे/शहरे आवडतात असे माझे निरिक्षण आहे. तेव्हा मला लंडन आवडेल असेच वाटते :)
सौरभदा, या मस्त लेखाबद्द्ल अनेक आभार!
अवांतरः जसे जुन्या आठवणी जागवणार्याला आपण नॉस्टॅल्जिक म्हणतो तश्या अपुर्या इच्छा कुरवाळणार्या लेखाला काय शब्द आहे?
(न गेलेल्या ठिकाणाच्या स्वप्नात) ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
लंडन-लंडन-लंडन!
कदाचित मुंबईच्या - विशेषतः मुंबई शहर 'प्रॉपर'च्या - मूळ जडणघडणीत भरपूर प्रमाणात ब्रिटिश संस्कार असणे, इतके की मुंबईची बससेवा (डबलडेकर बसेसचे डिझाइन धरून) आणि अगदी मुंबईच्या लोकलवाहतुकीच्या स्टेशनांच्या नावांच्या पाट्यांवरील लोगोपर्यंत बर्याच कशावर लंडनची छाप असणे, यामुळे येणार्या एका प्रकारच्या परिचयाच्या (familiarity) भावनेतून असे होत असावे का?
माझ्याही बाबतीत एकदा असेच झाले आहे. शिवाय ब्रिटिश एअरवेजच्या सौजन्याने म्हणा किंवा माणूस एके दिवशी तर त्याचे सामान दुसर्या दिवशी पोहोचवण्याच्या सामान्य प्रथेमुळे म्हणा, त्याच प्रवासाअंती सहार विमानतळालाही लागोपाठ दोन दिवस पाय लागलेले आहेत. (पण मुंबई मात्र अनेकदा बघितली आहे.)
पुढील आयुष्यातही 'लंडन'चा संबंध अनेकदा पण दूरान्वयानेच आला. नोकरीनिमित्त फिरतीच्या दिवसांत काही काळ कॅनडामधील ओंटारियो प्रांतातील 'वॉटर्लू' नावाच्या गावी (नेपोलियनचा पराभव युरोपातल्या ज्या गावी झाला, त्याच नावाचे आणखी एक गाव!) जावे लागत असे, तेव्हा टोराँटो विमानतळावर उतरल्यानंतर गाडीने लंडन (ओंटारियो)चा रस्ता पकडून, वाटेत येणार्या 'केंब्रिज' नावाच्या गावाकडे जाणार्या फाट्यापाशी मुख्य रस्ता सोडून त्या फाट्याने केंब्रिजच्या पुढे आणखी थोडे जावे लागत असे. मात्र प्रत्यक्ष लंडन शहर (ओंटारियो प्रांतातलेसुद्धा) पाहण्याची संधी मिळाली नाही.
(ओंटारियो प्रांतातल्या या लंडनमधून वाहणार्या नदीचे नावसुद्धा 'थेम्स' आहे हे कळल्यावर गहिवरून आले. पण बाकी इंग्रज जेथे खुद्द लंडनमधल्या एका मुख्य रेल्वेस्थानकाचे नाव 'वॉटर्लू' ठेवू शकतो, तेथे कॅनडामधील गावांची नावे 'लंडन', 'केंब्रिज' आणि 'वॉटर्लू' - आणि प्रतिलंडनमधील नदीचे नाव 'थेम्स' - ठेवल्यास वास्तविक आश्चर्य वाटण्यासारखे असे काही नव्हते. फक्त मला सवय नव्हती इतकेच.)
तसे याच नोकरीनिमित्त फिरतीच्या दिवसांत अमेरिकेतील ओहायो राज्यातील 'डब्लिन' नावाच्या जागी जावे लागत असे, तेव्हा डेटन विमानतळावरून डब्लिनला जात असताना वाटेत जेवणासाठी वाकडी वाट करून ओहायोतील 'लंडन' नामक एका अत्यंत छोट्या गावातील एका उपाहारगृहात जेवलेलो आहे. त्यामुळे 'लंडन' अगदीच पाहिलेले नाही, असे म्हणता येणार नाही. (किंबहुना ब्रिटनमध्ये हीथ्रो विमानतळाबाहेर एकदाही न पडता - आणि दक्षिण आयर्लंडमध्ये तर पाऊलही न ठेवता - लंडन, केंब्रिज आणि डब्लिन पाहिल्याचा दावा - करायचाच म्हटले तर - करता येईल. पण ते एक असो.)
इंग्लंडातील 'लंडन' मात्र प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधी येतो, ते पाहायचे! (पाहावयास आवडेल!)
अवांतर: ब्रिटिश एअरवेजवरून काही गोष्टी आठवल्या. मी ब्रिटिश एअरवेजने केलेल्या एकमेव प्रवासाच्या वेळी नेमकी युरोपात - आणि विशेषतः ब्रिटनमध्ये - ती 'मॅड काऊ डिसीझ'ची भीती पसरलेली होती. त्यामुळे कधी नव्हे ते मी प्रवासात भारतीय शाकाहारी जेवण मागवले होते. लंडन-मुंबई टप्प्यात आणि परतीच्या प्रवासात मुंबई-लंडन टप्प्यात जे जेवण मिळाले, तितके अप्रतिम जेवण आजवर केलेल्या कोणत्याही विमानप्रवासात मी तरी अनुभवलेले नाही. (नाही म्हणायला डेल्टाने काही वर्षांपूर्वी अटलांटा-न्यूयॉर्क-विनाथांबा मुंबई अशी सेवा सुरू केली होती, त्यातील न्यूयॉर्क-मुंबई टप्प्यावर - बहुधा साधारणतः ९०% प्रवासी हे न्यूजर्सीस्थित गुजराती असल्यामुळे - भारतीय शाकाहारी जेवण आणि मसाला चहा हे दोन प्रकार बरे मिळत. पुढे ही सेवा बंद होऊन त्याजागी अटलांटा-थेट मुंबई सेवा सुरू झाल्यावर काय परिस्थिती आहे, कल्पना नाही. पण एकंदरीत एवढे एकदोन अपवाद वगळल्यास एकंदरीत पश्चिमी देशांतील विमानकंपन्या 'भारतीय शाकाहारी जेवण' या नावाखाली जे काही देतात, त्याबद्दल फारसे चांगले ऐकलेले किंवा अनुभवलेले नाही. काँटिनेंटलने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या नूअर्क(न्यूजर्सी)-थेट मुंबई विमानसेवेतील भारतीय शाकाहारी जेवणाबद्दलही फारसे चांगले ऐकलेले नाही. एअर इंडिया किंवा इतर भारतीय आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्या विमानांवरील भारतीय भोजनसेवेबद्दल कल्पना नाही.)
बाकी (अमेरिकेत अनेक वर्षे राहिल्यामुळे वगैरे) आपल्याला इंग्रजी बोलण्याचे उच्चार चांगले समजतात या (आपल्याच स्वतःबद्दलच्या) कल्पनेचा फुगा फोडायचा असेल, तर एकदा ब्रिटिश एअरवेजने प्रवास जरूर करावा. तेथील परिचारकाने विचारलेला 'चहात साखर किंवा दूध घालू का?' हा साधा प्रश्नसुद्धा मला तीनदा 'क्यॅय?' असे (अर्थात इंग्रजीतून) विचारल्याशिवाय समजायला कठीण गेला होता. असो.
ब्रिटिश एअरवेजच्या मुंबईतील भारतीय ग्राउंड स्टाफबद्दलची आठवण मात्र फारशी चांगली नाही. एक भारतीय माणूस अधिकारपदावर पोहोचला की दुसर्या भारतीयाशी किती उद्दामपणे आणि उर्मटपणे वागू शकतो, आणि जेथे तक्रार करण्याचा खरे तर अधिकार असावा, तेथे तक्रार करण्यासाठी नव्हे, तर नम्रपणे ('माझे सामान पोहोचले का? नसल्यास कधी पोहोचेल याची कल्पना देऊ शकाल का?' यासारखी) साधी चौकशी करण्यासाठी आलेल्या गिर्हाइकाकडे 'हा मला त्रास द्यायला इथे का आणि मुळात कसा आला?' या वृत्तीने पाहून वागू शकतो (तेही चौकशी संबंधित अधिकार्याकडे केलेली नसून शेजारीच बसलेल्या आणि या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्याकडे केलेली असता), याचे नमुने पाहावयास मिळाले. (बहुधा १५ ऑगस्ट १९४७बद्दलची वार्ता १९९६च्या इसवीपर्यंत सदरहू अधिकार्यापर्यंत पोहोचली नसावी.) अर्थात एका अनुभवावरून संपूर्ण विमानकंपनीबद्दल अनुमाने काढणे योग्य नव्हे, परंतु इतर अनेक सोयिस्कर पर्याय उपलब्ध असता या एका अनुभवानंतर पुन्हा प्रचीती पाहण्याची इच्छा झाली नाही, एवढेच.
ब्रिटीश एअरवेज
ब्रिटीश एअरवेजने कुठेही प्रवास करत असलात आणि लंडनमध्ये फ्लाईट बदलायची असेल तर यूकेचा ट्रान्झिट व्हिसा लागतो. हे माहित नसल्याने एकदा मला भरल्या सूटकेसनिशी विमानतळावरून परत यावे लागले होते.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
अपवाद
हा नियम गेल्या काही वर्षांत लागू झाला आहे याची कल्पना होती. त्यापूर्वीच्या नियमांप्रमाणे केवळ विमानबदलीसाठी लंडनमधून जायचे असल्यास, विमानबदलीबरोबर विमानतळबदलीचीही (उदा. गॅटविक ते हीथ्रो) आवश्यकता नसल्यास आणि केवळ या कारणाकरिता ब्रिटनमधील वास्तव्य २४ तासांहून अधिक नसल्यास (शिवाय पुढील प्रवासाकरिताचे तिकीट वगैरेंसारख्या नेहमीच्याच यशस्वी नियमांचे उल्लंघन होत नसल्यास) ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता नसे. (कदाचित तेव्हाही ही सवलत केवळ अमेरिका आणि कॅनडासारख्या काही ठराविक देशांच्या व्हिसाधारकांस उपलब्ध असल्यास कल्पना नाही. परंतु तसे नसावे असे वाटते. कारण, तसे असल्यास नवीन नियमांमध्ये 'नवीन' ते नेमके काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे, आणि काही प्रमाणात आठवणीवरून, बहुधा ब्रिटनमध्ये केवळ विमानबदलीसाठी आणि तेही २४ तासांपेक्षा कमी वेळ उपस्थित असणार्या आणि त्यातही विमानतळाबाहेर पडाव्या न लागणार्या कोणत्याही प्रवाशास ब्रिटनच्या ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता त्या काळी नसे, असे वाटते.)
त्या काळीसुद्धा, विमानबदलीबरोबर विमानतळबदलीही करावी लागत असल्यास तत्त्वतः ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता असे असे वाटते, परंतु अशा परिस्थितीत अनेकदा ब्रिटिश एअरवेज त्यासाठी काही परस्पर तजवीज करू शकत असे (आणि करत असे) असे ऐकलेले आहे. (प्रत्यक्ष अनुभव नाही. चूभूद्याघ्या.)
नवीन नियम नेमके कधीपासून लागू झाले हे निश्चितपणे आठवत नाही, परंतु साधारणतः इ.स. २०००च्या सुमारास (किंवा कदाचित त्याच्याही थोडे आधी) झाले असावेत असे वाटते.
परंतु नवीन नियमांप्रमाणेसुद्धा काही अपवादात्मक परिस्थितींत भारतीय सामान्य पासपोर्टधारकास इंग्लंडमध्ये केवळ विमानबदलीसाठी (२४ तासांहून अधिक काळ ब्रिटनच्या हद्दीत राहणार नसल्यास आणि विमानबदलीबरोबरच विमानतळबदलीचीही आवश्यकता नसल्यास, थोडक्यात विमानतळातून बाहेर पडणार नसल्यास) ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता नाही असे कळते. अशा भारतीय पासपोर्टधारकास अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अथवा न्यूझीलंड यांपैकी कोणत्याही देशाचा व्हिसा (पर्यटक व्हिसासह) किंवा स्थायी रहिवासपरवाना (उदा. अमेरिकेचे ग्रीनकार्ड*) उपलब्ध असल्यास, केवळ अशा देशांकडे किंवा अशा देशांकडून इतर देशांकडे ब्रिटनमार्गे होणार्या प्रवासांत अशा ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता अजूनही नाही.
(*मात्र अमेरिकेच्या ग्रीनकार्डच्या बाबतीत प्रत्यक्ष ग्रीनकार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे. ग्रीनकार्ड संमत झाल्यावर प्रत्यक्ष ग्रीनकार्ड मिळेपर्यंत जो तात्पुरता ग्रीनकार्डसंमतीचा शिक्का पासपोर्टात मारला जातो, तो शिक्का या सवलतीसाठी पुरेसा मानला जात नाही असे कळते.)
अधिक माहिती येथे आणि येथे. पैकी दुसर्या दुव्यावरील १, २ आणि ३ हे विभाग विशेष लक्ष देण्यासारखे.
अरेच्या!
२००० साली? अरेच्या! मला तर २००६ मधे एअर इंडीयाच्या फ्लाईटमधून उतरून -सिक्युरीटी चेक करून - पुन्हा तेच फ्लाईट पकडायचे होते होते तेव्हा तरी ट्रांसिट व्हीजा लागला नव्हता.. बहुदा हे सर्व प्रकारच्या चेंज ऑफ फ्लाईटसाठी नसावे
(प्रतिसाद देण्याआधी दुवे बघितलेले नाहित. तिथे उत्तर असल्यास क्षमस्व)
ही तेव्हाची गोष्ट जेव्हा फक्त पारदर्शक प्लॅस्टीक पिशव्या केबिन बॅगेज म्हणून घेतल्या जात होत्या. इथे केवळ हॉल्ट-नो चेंज असणार्या विमानांच्या प्रवाशांना देखील विमानांतून उतरून पुन्हा सिक्युरिटी चेक मधून जावे लागे. तरी पट्रआंझित विजा लागला नव्हता.(इतकी बिकट आंतरराष्ट्रीय परिस्थिती असूनही) तेव्हा ब्रिटीश एअरवेजला याच प्रोसेससाठी लंडनमधे लागतो हे ऐकून जरा आश्चर्य वाटले
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
शक्य आहे
नवीन नियम नक्की कधी लागू झाले याबद्दल मला खात्री नाही. तसेच, त्यांतील तरतुदी वेळोवेळी हळूहळू बदलत गेल्या असणे शक्य आहे. २००६ साली लागू असणारे नियम नेमके काय होते, आणि ते नेमके कोणकोणत्या राष्ट्रीयत्वांसाठी तेव्हा लागू होते, हे मी निश्चितपणे सांगू शकणार नाही. वर दिलेले नियम हे सध्या लागू असलेले नियम आहेत, एवढे निश्चित. (२००० सालच्या सुमारापासून किंवा कदाचित त्याच्याही किंचित अगोदरपासून अनेक युरोपीय राष्ट्रांचे ट्रान्झिट व्हिसासाठीचे नियम हळूहळू एकापाठोपाठ एक - अनेकदा अचानक आणि फारशा पूर्वसूचनेअभावी - बदलू लागले, असे काहीसे आठवते. याच काळात वेगवेगळ्या वेळी ब्रिटनचेही ट्रान्झिट व्हिसासंबंधीचे नियम थोड्याथोड्या अंशाने बदलू लागले, असे आठवते.)
काही तरतुदी वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वांसाठी वेगवेगळ्या वेळी लागू केल्या असणे शक्य आहे. (जसे, या डायरेक्ट एअरसाइड ट्रान्झिटसाठीच्या नियमांच्याच बाबतीत, खात्रीलायक रीत्या आठवत नाही पण, पाकिस्तानी नागरिक हे भारतीय नागरिकांच्या काही काळ आधी या नियमाखाली आले, असे वाटते. केवळ कुतूहल म्हणून या सर्व नियमांवर मी अधूनमधून लक्ष ठेवत आलेलो आहे. रीतसर नोंद ठेवलेली नाही. यातील कालरेषा अचूक आहे किंवा सर्व ऐतिहासिक तपशील हे १००% बरोबर आहेत, असा कोणताही दावा मी करू इच्छीत नाही आणि करू शकणारही नाही. केवळ पूर्वी कधीतरी वाचलेल्यातले जेवढे आठवले, तेवढे - जेथे रीतसर खातरजमा करणे शक्य झाले नाही तेथे अंदाजाने - शक्य तेवढे अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.)
तसेच, उपरोल्लेखित उड्डाण हे लंडनवरून पुढे नेमके कोठे जात होते, यानेही फरक पडत असावा, असे वाटते.
(अवांतर: वेगवेगळ्या देशांचे व्हिसाचे नियम वेळोवेळी बदलत असतात. त्याचे बरेवाईट परिणाम काय होतील त्याबद्दल भाकीत करणे अनेकदा अवघड असते.
शेन्जेन कराराखाली शेन्जेन देशांना भेट देण्यासाठी (केवळ विमानतळातून ट्रान्झिटसाठी नव्हे) ज्या राष्ट्रीयत्वांना शेन्जेन व्हिसाची आवश्यकता आहे, त्या राष्ट्रीयत्वांच्या यादीत भारतीय राष्ट्रीयत्व मोडते, अमेरिकन राष्ट्रीयत्व मोडत नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांना शेन्जेन देशांना भेट देण्यासाठी व्हिसा लागतो, परंतु अमेरिकन नागरिकांना लागत नाही. मात्र अमेरिकेचे ग्रीनकार्ड धारण करणार्या भारतीय नागरिकांस यात कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही.
स्वित्झर्लंड हे काही काळापूर्वीपर्यंत शेन्जेन व्हिसायोजनेत अंतर्भूत नव्हते. त्या काळी शेन्जेन व्हिसाखाली स्वित्झर्लंडला जाता येत नसे. स्वित्झर्लंडसाठी स्वतंत्र व्हिसा लागे. स्वित्झर्लंडचा व्हिसा हा भारतीय पासपोर्टधारकांस आवश्यक असे, तर अमेरिकन पासपोर्टधारकांस तो आवश्यक नसे. मात्र अमेरिकेचे ग्रीनकार्ड धारण करणार्या कोणत्याही देशाच्या - पर्यायाने भारताच्यासुद्धा - पासपोर्टधारकांस स्वित्झर्लंडकरिता व्हिसामुक्तीची सवलत असे.
नुकतेच - २००८अखेर - स्वित्झर्लंड हे शेन्जेन व्हिसायोजनेत अंतर्भूत झाले. त्यामुळे एकाच शेन्जेन व्हिसांतर्गत शेन्जेन करारातील इतर देशांबरोबर स्वित्झर्लंडलाही जाण्याची सोय झाली. मात्र त्याचबरोबर, केवळ स्वित्झर्लंडला जाऊ इच्छिणार्या परंतु इतर शेन्जेन देशांत जाऊ न इच्छिणार्या अमेरिकन ग्रीनकार्डधारी भारतीय पासपोर्टधारक पर्यटकांची व्हिसामुक्तीची सवलत रद्द झाली.)
फलद्रुप
ऋषिकेश, तुझी जी शहरे बघायची इच्छा आहे ती फलद्रुप होवो. तुला एक फर्मास लेख हवा होता तो मिळाला ना?
-सौरभ.
==================
उत्तम
छान लेख.
आजपावेतो लंडन बर्याचदा घडले. पायी भटकणे झाले, एकाखाली एक अशा अनेक थरी भुयारी रेल्वेतून झाले, उघड्या टपाच्या बसमधून झाले आणि उंचच उंच जाणार्या लंडन आय मधूनही झाले. राणीच्या मुकुटातील कोहिनूरदेखिल ३-४ वेळा बघून झाला (खरे तर्, सरकत्या पट्ट्यामुळे तो एका वेळेस डोळे भरून पाहतादेखिल येत नाही).
लंडन भूरळ पाडणारे आहे यात शंका नाही. मुंबईकराला मुंबईशी साधर्म्य असणार्या अनेक इमारती लंडनमध्ये दिसतात, हेही खरेच.
एक प्रश्न पडतो. त्यांनी आपल्यावर् राज्य केले, आपल्याला लुटले, लुबाडले तरीही, त्यांच्याबद्दल संतापाची तिडीक वगैरे डोक्यात कधीही जात नाही. काय कारण असावे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
स्टॉकहोम सिंड्रोम
एक प्रश्न पडतो. त्यांनी आपल्यावर् राज्य केले, आपल्याला लुटले, लुबाडले तरीही, त्यांच्याबद्दल संतापाची तिडीक वगैरे डोक्यात कधीही जात नाही. काय कारण असावे
स्टॉकहोम सिंड्रोम सारखा प्रकार असावा काय? की जेत्यांनी लादलेल्या संस्कृतीची कुठेतरी आपोआप झालेली सवय? सध्या स्वतंत्र भारताच्या इतिहासावरचे एक पुस्तक वाचतो आहे, त्यात १९७१ च्या आधीही (अमेरिकेने पाकिस्तानच्या उघड समर्थनार्थ भारतीय महासागरात युद्धनौका पाठवण्यापूर्वी) अभिजन वर्गात आणि अधिकार्यांच्या वर्तुळात, अमेरिकेबद्दलचं मत - टिपीकल ब्रिटिश, नाक मुरडणारं होतं (शॉच्या भाषेत - अमेरिका इज द ओन्ली कंट्री दॅट वेन्ट फ्रॉम बार्बरिझम टू डिकॅडन्स विदाऊट सिव्हिलायझेशन इन बिटवीन - छापाचं) असं वाचनात आलं.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
लेख आवडला. आतापर्यंत मराठी लेखकांच्या नजरेतून जे लंडन पाहिलं, ते प्रत्यक्षात पहावं अशी ओढ लावण्यासारखंच आहे. वर्डस्वर्थने केलेलं लंडनचं वर्णन आणि मर्ढेकरांच्या 'न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने, बंदर; मुंबापुरीचे उजळत येई माघामधली प्रभात सुंदर'मधला जिव्हाळा एकाच जातीचा.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आवडला
लेख आवडला. ग्रानाडा प्रॉडक्शनच्या शेरलॉक होम्स या मालिकेतले लंडन आवडले होते, या लेखातलेही आवडले.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!
उत्तम
लेख आवडला. वेस्टमिन्स्टरच्या पुलावर शांती लाभणे म्हणजे कमाल आहे. :-) पण शक्य आहेच.
मला लंडन आवडते ते तिथल्या बागांमुळे आणि संग्रहालयांमुळे. गेल्या सहा वर्षात २५ वेळेला तरी लंडनवारी झाली असेल. पण अजून लंडन 'पाहून' झालेले नाही.
अर्थात शक्य आहे!
ज्याला शांती लाभायचीच असेल, त्याला ती भर लकडीपुलावर* लाभणे शक्य आहे. ज्याला लाभायची नसेल, त्याला निर्जन ठिकाणी नेले, तरी निरव शांततेत स्वतःचेच मन खायला उठेल.
शेवटी 'मन चंगा, तो कटौती में गंगा'** म्हटले आहे, ते उगीच नाही!
=======================================================================================
*'भर लकडीपुलावर' म्हणजे लकडीपुलाच्या फुटपाथवरून चालत असताना. लकडीपुलाच्या मध्यभागी एखाद्या वाहनाने उडवल्यामुळे नव्हे. (तरी आता लकडीपुलावरची दुचाकी वाहतूक बंद करून ती झेडब्रिजवर वळवल्यापासून ही दुसरी शक्यता जवळपास नाहीच म्हणा!)
**असेच काहीसे म्हटले आहे असे वाटते. चूभूद्याघ्या. 'कटौती' म्हणजे काय, हे प्रस्तुत प्रतिसादकर्त्यास आजतागायत न उकललेले एक गूढ आहे.
'मन चंगा, तो कटौती में गंगा'
हा जर लेगपुलिंगचा भाग नसेल तर ती कटौती नसून कटोरी आहे, हे सुचवावेसे वाटते.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!
थोडेसे चुकलेच, पण...
सर्वप्रथम, काहीतरी चुकते आहे याची जाणीव करून दिल्याबद्दल मनापासून आभार. तशी शंका होतीच.
हे वचन अनेकदा उडतउडत ऐकलेले होते, त्याच्या अर्थाबद्दल खात्री असल्यामुळे वापरून पाहण्याची जबरदस्त इच्छा तर होती. एका शब्दाबद्दल शंका होती, पण उत्साहाच्या भरात संदर्भ तपासून पाहण्याचा कंटाळा केला आणि जसे आठवले तसे लिहिले. त्यामुळे त्या एका शब्दाबद्दल ती माझी अटकळ होती, असे म्हणता येईल.
तरीही त्या शब्दाच्या बाबतीत काहीतरी चुकते आहे, अशी आतून कोठेतरी जाणीव होती. म्हणून तर "'कटौती' म्हणजे काय, हे प्रस्तुत प्रतिसादकर्त्यास आजतागायत न उकललेले एक गूढ आहे." असे डिस्क्लेमर टाकले. (हे जे काही आहे ते एखाद्या प्रकारचे भांडे असावे, अशी - पुन्हा एकदा - अटकळ होतीच. आता भांडे म्हटले, की कधीकधी फुटते - 'शीशे का खिलौना था, कुछ ना कुछ तो होना था - हुआ!' - चालायचेच!)
काहीतरी चुकले आहे याला आपण पुष्टी दिल्यावर* (confirm केल्यावर) 'मग नेमके बरोबर तरी काय आहे?' हे पहावे, म्हणून थोडा शोध घेतला. (हा गृहपाठ आधीच करायला हवा होता, हे मान्य.)
'कटौती' या शब्दाचा अर्थ 'कपात' असा होतो, असे शोधाअंती कळले. प्रस्तुत संदर्भात याचा काहीच अर्थ लागू शकत नाही. (म्हणजे, 'कप नावाच्या भांड्यात' अशा अर्थाने 'कपा'चे सप्तमीचे रूप म्हणून नव्हे, तर काहीसे 'काटछाट' अशा अर्थी. म्हणजे, 'कटौती में गंगा' याचे शब्दशः भाषांतर '(चहा पिण्याच्या) कपात गंगा आहे' असे न होता 'गंगा कपातीत आहे' असे व्हावे. म्हणजे, एक तर 'कपा'ची दुहेरी सप्तमी, जी व्याकरणदृष्ट्या वैध नाही, किंवा 'गंगेची काटछाट आहे', अर्थात 'गंगा काटकसरीने वापरायची आहे'. आता गंगा - म्हणजे गंगेचे पाणी - काटकसरीने वापरायची गरज पडण्याची अनेकविध कारणे असू शकतील, पण 'मन चांगले असण्या'चा अशा कारणांशी अर्थाअर्थी काही संबंध कळू शकत नाही. म्हणजेच प्रस्तुत संदर्भात काही अर्थ लागू शकत नाही.)
त्यामुळे, 'कटौती' हा शब्द येथे पूर्णपणे चुकीचा आहे, हे मान्य. (ज्याबद्दल तशीही शंका होतीच.)
अधिक शोध घेतला असता, ते मूळ वचन 'मन चंगा तो कठौती में गंगा' असे असून (शोधसूत्र), 'कठौती' या शब्दाचा अर्थ 'एक प्रकारचा लाकडी वाडगा' असा असल्याचे (शोधसूत्र) कळले. या वचनाचा उगम दाखवून देणारी एक उद्बोधक कथाही सापडली (दुवा क्र. १, दुवा क्र. २). असो.
(थोडक्यात, Not an instance of leg-pulling - At least, not this time. Just an honest - if audacious - error.)
चुकीबद्दलची (आधीच असलेली) जाणीव दृढ करून अधिक शोध घेण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल पुनश्च आभार.
============================================================================================
*To confirm अशा अर्थी 'पडताळा करून देणे' असा शब्दप्रयोग अगोदर वापरला होता. तो अचूक नाही, असे श्री. ऋषिकेश यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर योग्य वाटला तो बदल केलेला आहे. श्री. ऋषिकेश यांचे आभार.
दुरुस्ती
- 'मन चंगा, तो कटौती में गंगा' हे 'मन चंगा, तो कठौती में गंगा' असे वाचावे. (स्पष्टीकरण याच प्रतिसादमालिकेत इतरत्र.)
- 'लकडीपुलाच्या मध्यभागी एखाद्या वाहनाने उडवल्यामुळे नव्हे.' हे 'लकडीपुलाच्या मध्यभागी एखाद्या वाहनाशी एकात्म झाल्यामुळे नव्हे.' असे वाचावे. कशा ना कशाशीतरी एकात्म होण्याचा शांती लाभण्याशी दृढ संबंध मानण्याचा प्रघात बहुधा सर्वमान्य आहे.
माझ्या आठवणी
लंडनसकट जगातील आपल्याला पहाव्याशा जागा आपल्याला पहायला मिळाव्यात अशा सदीच्छा.
लंडन या शहराचे प्रत्यक्ष दर्शन मला घडलेले असले तरी त्याबद्दल मी फारसे वाचलेले नव्हते. या लेखातले त्याचे सुरेख वर्णन वाचून माझ्या कांही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी या ठिकाणी त्या शब्दबध्द करण्याचा एक प्रयत्न केला आहे.
राणीचे शहर लंडन - भाग १
राणीचे शहर लंडन - भाग २
राणीचे शहर लंडन - भाग ३
राणीचे शहर लंडन - भाग ४
राणीचे शहर लंडन - भाग ५
राणीचे शहर लंडन - भाग ६
अजून काही....
प्रतिसाद देणार्यांचे मनापासून आभार. आनंद घारे, आपल्या लेखमालिकेचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद.
लेखात अनवधानाने द्यायची राहून गेलेली माहिती म्हणजे लंडनमधले कॅमेर्यांचे प्रमाण हे दर चौदा माणसांमागे एक असे आहे. :-)
ऍगाथा ख्रिस्तीच्या एका पुस्तकात एका पात्राने ब्रिटीशांबद्दलचे हे निरीक्षण मांडले आहे.
If there is a fault about the British, It is that they are inclined to be a bit stand-offish until they have known you a couple of years. After that nobody could be nicer.
बाकीच्यांचा काय अनुभव आहे?
-सौरभदा
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना
==================