माझ्या संग्रहातील पुस्तके -१० - गालिब
कहां मैखाने का दरवाजा, गालिब, और कहां वाइज
पर इतना जानते हैं, कल वो जाता था, कि हम निकले
(मदिरालय कुठे आणि धर्माचा प्रचार करणारा धर्मगुरु कुठे !(वासना कुठे आणि विरक्ती कुठे!) हां, पण काल आम्ही गुत्त्यातून बाहेर पडताना कुणीतरी आत शिरताना दिसला बुवा! बहुदा एखादा धर्मगुरुच असावा!)
धर्म, देव, पापपुण्य अशा कल्पनांची मनसोक्त टिंगल करणारा, आपले दुर्गुण, दोष निलाजरेपणाने जगासमोर मांडणारा, 'आधा मुसलमान हूं, शराब पीता हूं, सुवर नहीं खाता' अशी चालूगिरी करणारा, ऐयाश, उधळ्या, कफल्लक, उद्धट, गर्विष्ठ, व्यसनी , जुगारी शायर गालिब. समकालिन शायरांच्या कितीतरी वर्षे पुढे असणारा विलक्षण प्रतिभावान शायर, उर्दू आणि फारसीचा खराखुरा उस्ताद, दिलदार मित्र, जिंदादिल आशिक आणि अहंकार वाटावा इतका तीव्र स्वाभिमान असणारा मनस्वी कवी गालिब. एका गालिबमध्ये असे अनेक गालिब आहेत. 'अजब आजाद मर्द मिर्जा गालिब' हे वसंत पोतदार यांचे, 'मिर्जा गालिब' हे इंदुमती शेवडेंनी अनुवादित केलेले मालिक राम यांचे आणि नूर नबी अब्बासी यांनी संकलित केलेले 'दीवाने -ए - गालिब' हे - अशी गालिबविषयीची तीन पुस्तके माझ्या संग्रहात आहेत.
सर्वप्रथम मालिक राम यांच्या पुस्तकाविषयी. हे जुनाट पुस्तक म्हणजे गालिबचे एक उत्तम चरित्र म्हणायला हरकत नाही. गालिबच्या जीवनाविषयी आणि शायरीविषयी समग्र माहिती या छोटेखानी पुस्तकात मिळते. २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे जन्मलेला असदुल्ला बेग खान म्हणजेच गालिब. त्यामुळेच गालिब हे त्याचे उपनाम –तखल्लुस’ जरी असले तरी त्याच्या शायरीत असद असाही उल्लेख आढळतो. १८१२ साली गालिब दिल्लीत आला. तेंव्हापासून बहुतेक काळ गालिबचा मुक्काम दिल्लीतच राहिला. दिल्लीतच त्याची शायरी फुलली, बहरली. दिल्लीतच त्याला मान-सन्मान मिळाले, दिल्लीतच त्याची बदनामी झाली, दिल्लीतच त्याला तुरुंगवास सहन करावा लागला आणि दिल्लीतच १५ फेब्रुवारी १८६९ रोजी तो मरण पावला. (कौन जायें जौक दिल्ली की गलियां छोड कर हे आठवते!)
बालपणातच गालिबची प्रतिभा दिसू लागली होती. मीर तकी मीर यांनी बालगालिबची शायरी बघून याला योग्य उस्ताद मिळाला तर हा फार मोठा शायर होईल, नाहीतर बाकी हा भरताडच लिहीत राहील, असे म्हटले होते. समकालीन शायरांविषयीची मीरची तुच्छता ध्यानात घेता हे फार महत्वाचे आहे. याची उतराई म्हणून की काय, गालिबने म्हटले आहे,
रेख्ते के तुम्ही नहीं उस्ताद गालिब
कहते है अगले जमाने में कोई मीर भी था
(उर्दू शायरीचा तूच एक उस्ताद नाहीस, गालिब. तुझ्याआधी 'मीर' नावाचा कुणी एक होऊन गेला असे ऐकिवात आहे)
मालिक राम यांच्या पुस्तकाचे ढोबळ मानाने दोन भाग आहेत. पहिल्या भागात गालिबचे सविस्तर चरित्र आहे, तर दुसर्यात भागात गालिबची निवडक कला - त्याची शायरी आहे. गालिबची शायरी सामान्यांना कळायला अवघड तर आहेच, पण मालिक राम यांनी दिलेल्या तळटीपांमधून अवघड शब्दांचे अर्थ सहज कळून जातात. पण मालिक राम यांच्या या पुस्तकात पूर्ण गजला दिलेल्या नाहीत. गजलेतला प्रत्येक शेर हा स्वतंत्ररीत्या अर्थपूर्ण असतो, हे जरी खरे असले तरी स्वतंत्र असे शेर वाचताना ती मूळ गजल पूर्ण काय होती, याविषयीचे कुतुहल तसेच राहाते.
मालिक राम यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ गालिबचे चरित्र नाही. यात तत्कालिन समाजात होत असलेली उलथापालथ, भाषा आणि तिच्या वापरातील बदल, कवी, लेखक यांचा एकमेकांवर पडलेला प्रभाव अशा ब़र्याच गोष्टींचा आढावा घेतलेला आढळतो. उर्दू भाषेच्या उगमाविषयी या पुस्तकात फार मनोरंजक माहिती आहे. उत्तर भारतात नवीन भाषेचा जन्म घेण्याची प्रक्रिया बरीच वर्षे सुरु होती. योगायोगाने त्या काळात मुसलमान लोक तेथे येऊन पोचले. त्यांनी आपल्याबरोबर फारशी ही आर्यन भाषावंशातील एक भाषा आणली. तिच्यामागे महान साहित्यीक परंपरा तर होतीच, शिवाय ती विजेत्यांची भाषा होती; त्यामुळे नव्याने जन्माला येत असलेल्या उर्दूवर या भाषेचा प्रभाव पडणे अगदी स्वाभाविक होते. पण नव्याने जन्माला आलेली उर्दू ही तिचा शब्दसंग्रह, वाक्यप्रचाराची पद्धत व व्याकरण याबाबत पूर्णपणे भारतीय होती. मुसलमानांचा वाटा फक्त लिपी, काही टक्के फारशी शब्द आणि काही इराणी कल्पना व वाक्प्रचार यापुरता मर्यादित होता. लष्करात बोलली जाणारी भाषा ती उर्दू असा उल्लेख मिर्जा गालिब या मालिकेतही होता.
उर्दूबाबत भारतीय समाजात असलेले गैरसमज पाहाता, हे माहिती असणे महत्वाचे आहे, असे मला वाटते.
गालिबचे वैवाहिक जीवन ही एक शोकांतिकाच होती. त्याची पत्नी उमराव ही कर्मकांडांत अडकलेली देववादी स्त्री होती. तिच्यापासून गालिबला सात मुले झाली, पण त्यातले एकही मूल जगले नाही. संसारात सुखाला पारखा झालेल्या गालिबने आपली शायरी, आपले मित्र आणि शराब यांचा सहारा घेतल्याचे दिसते. त्याच्या आयुष्यात इतरही काही प्रेमप्रकरणे झाली. त्यातल्या डोमनी (अर्थ: नाचगाणे करणारी मुलगी) या पात्राचा उल्लेख बर्याच ठिकाणी आहे.
इश्क मुझको नहीं, वहशत ही सही
मेरी वहशत तेरी शोहरत ही सही
हे गालिबने त्याच्या प्रेमपात्रासाठीच लिहिले होते, असे म्हणतात
गालिबचे आयुष्य ही एक विसंगतीचीच कहाणी म्हणावी लागेल. एकीकडे ऐयाश आणि विलासी जीवन जगणारा गालिब दुसरीकडे आयुष्यभर पैशाच्या चणचणीतच राहिला. त्याला सरकारकडून एक कसलेसे अर्धे पेन्शन वारसाहक्काने मिळाले होते. ते पूर्ण मिळावे म्हणून इंग्रज दरबारी खेटे घालणे आणि वेळीप्रसंगी इंग्रजी अधिकार्यांसचा लाळघोटेपणा करणे यात गालिबचे बरेच दिवस गेले. (गालिबच्या चरित्रकारांनी याला 'भिकारडे पेन्शन' असा समर्पक शब्द वापरला आहे!) पण या पेन्शनच्या कारणाने गालिबला बर्याच ठिकाणी फिरावे लागले. त्यातून त्याचे अनुभवविश्व अधिक समृद्ध झाल्याचे जाणवते. पेन्शनच्या कामासाठी दिल्ली ते कलकत्ता हा प्रवास गालिबच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना आहे. त्या काळातला तो प्रवास आणि त्यातून गालिबचा ऐयाश मिजाज यामुळे गालिबला दिल्लीहून कलकत्त्याला पोचायला चांगले वर्षभर लागले असे दिसते. बनारस आणि कलकत्ता या शहरांच्या तर गालिब प्रेमातच पडला होता. कलकत्त्याबाबतीतले त्याचे काही शेर तर प्रसिद्धच आहेत:
कलकत्ते का जो जिक्र किया तूने हमनशीं
इक तीर मेरे सीने में मारा कि हाय हाय
(कलकत्त्याचा विषय कशाला काढलास तू? जणू माझ्या हृदयावर कुणीतरी बाणच मारावा तसं वाटलं मला!)
वह सब्ज: जारहा-ए-मुतर्र: कि है गजब
वह नाजनीं बुतान-ए-खुदाहारा कि हाय हाय
(तेथील हिरवीगार मैदानं आणि साक्षात माशूका भासणार्या नटखट, कोमलांगी रुपगर्विता - हाय हाय!)
वह मेव:हाए ताज:ओशिरी, कि वाह वाह
वह बाद:हाए नाबओ गवारा कि हाय हाय
(तिथले ताजे आणि गोड मेवे आणि तिथलं उंची आणि चविष्ट मद्य - हाय हाय!)
गालिबचा सगळ्यात प्रसिद्ध चेला म्हणजे अल्ताफ हुसेन – हाली. त्यांच्याविषयी गुलजार म्हणतात, ' हाली वक्त के साथ मिर्जा गालिब के सबसे मुमताज शागिर्द कहलाये. ये बात सुनकर गालिबका जमाना और नजदीक नजर आता है के वो इस दौर के एक बहोत बडे अदीद जनाब ख्वाजा अहमद अब्बास के नाना थे'
गालिबच्या शायरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर हसण्याची त्याची वृत्ती. आपण आख्ख्या दिल्लीत मशहूर आहोत, याचा त्याला सार्थ अभिमान होता, पण आपण का मशहूर आहोत, याची त्याला पुरेपूर जाणीवही असावी.
होगा कोई ऐसा के जो गालिब को ना जाने
शायर तो वो अच्छा है, के बदनाम बहुत है
हा शेर काय किंवा
रंज से खूगर हुवा इन्सां तो मिट जाता है रंज
मुश्किलें मुझ पर पडी इतनीं की आसां हो गयी
(दु:खाची एकदा का सवय झाली, की मग त्याचं काही वाटत नाही. आता माझंच बघा ना, माझ्यावर इतक्या अडचणी येऊन कोसळल्या की आता मला त्यांचं काहीच वाटत नाही!)
हा काय, गालिबच्या जीवनदृष्टीवर प्रकाश टाकून जातात.
आणि यावरचा कळस म्हणजे
हो चुकी गालिब बलायें सब तमाम
एक मर्गे-नागहानी और है
(आता सगळ्याच बला - आपत्ती - ओढवून झाल्या आहेत. अचानक येणारं मरण तेवढं बाकी आहे)
गालिबचे काही शेर तर 'कोटेबल कोटस' च झाले आहेत.
बसके दुश्वार है हर काम का आसां होना
आदमी को भी मयस्सर नहीं इन्सां होना'
हे लिहिणारा गालिब महान तत्वज्ज्ञ वाटू लागतो.
ये न थी हमारी किस्मत के विसाल -ए-यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता' हा 'पार्टनर' मधील नायिकेच्या वहीत लिहिलेला शेर त्या वेळी भलताच रोमँटिक वाटला होता. आज त्याच गजलेतले 'के खुशी से मर न जाते, अगर एकबार होता' हे अधिक प्रभावी वाटते! 'कोई दिन गर जिंदगानी और है' इतकीच गालिबची प्रभावी गजल म्हणजे
आह को चाहिये इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक
हमनें माना की तगाफुल ना करोगे लेकिन
खाक हो जायेंगे हम तुमको खबर होने तक
( माझी कराह तुझ्यापर्यंत येऊन तुला ती कळेपर्यंत जमाना उलटून जाईल. तोपर्यंत कोण आलाय जिवंत राहायला! माझ्या आह कडे तू दुर्लक्ष करणार नाहीस, हे मला माहिती आहे. पण (आपल्यांत अंतरच इतकं आहे की) तुला (माझं दु:ख) कळेपर्यंत मी संपून गेलेलो असेन)
कोणत्याही गोष्टीचे लगेच उदात्तीकरण करणे हे समाजाच्या उथळपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. उर्दू-फारशीचा कदाचित आजवरचा सर्वश्रेष्ठ शायर गालिब अशा उथळपणावर सतत वक्रोक्तिने बोलत राहिला. 'बाजीचा-ए-अतफाल' म्हणून खुज्या, किडक्या समाजाची अवहेलना करणारा गालिब आपल्यापुढे उभा राहातो तो एक सच्चा, जिंदादिल माणूस म्हणून. एक हाडामांसाचा, तुमच्याआमच्यासारखा माणूस. एक बेफिक्र शायर. 'हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकलें, निकलना खुल्दसे आदमका सुनते आये हैं लेकिन, बहोत बेआबरु होकर तेरे कूचेंसे हम निकले' म्हणणारा. आणि मग त्याने म्हटलेले
हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है
वो हर इक बात पर कहना के यूं होता, तो क्या होता
हे खरेच असावे असे वाटू लागते.
'मिर्झा गालिब' आणि 'अजब आजाद मर्द मिर्झा गालिब' ही पुस्तके वाचून गालिब आणि त्याची शायरी अगदी थोडीथोडी कळू लागली आहे, असे वाटते. 'दीवान-ए-गालिब' हे पुस्तक बाकी मी निवृत्तीनंतर वाचायचे, म्हणून घेऊन ठेवले आहे!
मिर्झा गालिब
मालिक राम, अनुवाद: इंदुमती शेवडे
नॆशनल बुक ट्रस्ट, १९६८
८९ पृष्ठे, किंमत २ रुपये ७५ पैसे
अजब आजाद मर्द मिर्झा गालिब
वसंत पोतदार, राजहंस प्रकाशन, १९९७
१३६ पृष्ठे, किंमत १२५ रुपये
दीवान -ए-गालिब
गालिब इन्टिट्यूट, २०००
२५६ पृष्ठे, किंमत ८० रुपये
Comments
आज ही
हजारो ख्वाहिशे ऐकले की कुठेतरी पीळवटते.
हज़ारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
डरे क्यूँ मेरा क़ातिल क्या रहेगा उसकी गरदन पर
वो ख़ूँ जो चश्म ए तर से उम्र भर यूँ दमबदम निकले
निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आए हैं लेकिन
बहुत बेआबरू होकर तेरे कूंचे से हम निकले
भरम खुल जाए ज़ालिम तेरे क़ामत की दराज़ी का
अगर उस तुररा ए पुरपेचोख़म का पेचोख़म निकले
मगर लिखवाए कोई उसको ख़त तो हम से लिखवाए
हुई सुबह और घर से कान पर रखकर क़लम निकले
हुई इस दौर में मनसूब मुझसे बादा आशामी
फिर आया वो ज़माना जो जहाँ में जामेजम निकले
हुई जिनसे तवक़्क़ो ख़स्तगी की दाद पाने की
वो हमसे भी ज़्यादा ख़स्ता ए तेग ए सितम निकले
मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का
उसी को देख के जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले
ख़ुदा के वास्ते पर्दा ना काबे से उठा ज़ालिम,
कहीं ऐसा ना हो यां भी वही काफिर सनम निकले ।
कहाँ मैख़ाने का दरवाज़ा ग़ालिब और कहाँ वाइज़
पर इतना जानते हैं कल वो जाता था के हम निकले
लेखाबद्दल सावकाश लिहिनच.
--------------------------X--X-------------------------------
फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा,
वरूनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा ।
त्यांतहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी,
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचें पाणी ।।
चांगले लिहिले आहे पण..
गालिबचे मनावरील गारूड इतके मोठे आहे की बाकी सारे काही खुजेच वाटावे.
तसाच हा लेखही बरेच काहि सांगूनही काहितरी कमतरता राहिल्यासारखा वाटला. (अजून चार -आठ शेर चालले असते ;) )
मात्र बहुदा यात लेखकाकडून राहिलेली त्रुटी नसून माझा "गालिबबद्दल साजेसे कोणीही लिहू शकत नाहि" असा लेख वाचण्याही आधी मनात घर करून बसलेला पूर्वग्रह असावा.
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
काही रचना
गालिबच्या काही रचना इथे पहा (व ऐका)
हजारो ख्वाइशें ऐसी
आह को चाहिये इक उम्र असर होने तक
इश्क मुझको नही वहशतही सही
(गालिब, तलत महमूद व गुलाम हे व्हिस्की, सोडा, बर्फ असे नशीले काँबिनेशन - भारत भूषण वगैरे सोडून द्या!)
फिर मुझे दीद-ए-तर याद आया
उस बज्म में मुझे नही बनती
नुक्ताचि है गमे दिल (सुरैय्याचा आवाज!)
आणि ये न थी हमारी किस्मत
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!
डोन्ट अंडरएस्टिमेट जगजीत
हजारो ख्वाहिशें आणि आह को चाहिये ही गाण्यांना जगजीतने फारच सुरेख गायले आहे. नसीरुद्दीश शाहच्या चित्राचे कव्हर असलेल्या दोन कॅसेटी माझ्याकडे होत्या त्यात ही गाणी सर्वप्रथम ऐकली होती. (मला वाटते गालिब या मालिकेवरुनच काढलेला गीतसंग्रह असावा.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अगदी
हजारो ख्वाहिशें आणि आह को चाहिये ही गाण्यांना जगजीतने फारच सुरेख गायले आहे. नसीरुद्दीश शाहच्या चित्राचे कव्हर असलेल्या दोन कॅसेटी माझ्याकडे होत्या
अगदी. या दोन कॅसेटी माझ्याकडेही आहेत. यातली एकूणेक कंपोजिशन्स सुरेख आहेत. 'कोई दिन गर जिंदगानी और है' माझ्या विशेष आवडीचे.
गालिबवरील गुलजारच्या उत्तम दूरदर्शन मालिकेतलीच ही गाणी / गजला आहेत.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!
छान
पुस्तकाची आणि गालिबची ओळख आवडली.
माझ्या आवडत्या गझलेतले काही शब्द
दर्द से मेरे है तुझको बेक़रारी हाए हाए
क्या हुआ ज़ालिम तेरी गफलतशिआरी हाए हाए
क्यूँ मेरी गम-ख़्वारगी का तुझको आया था ख़्याल
दुश्मनी अपनी थी मेरी दोस्तदारी हाए हाए
उम्र भर का तूने पैमान-ए-वफ़ा बाँधा तो क्या
उम्र भर को भी तो नहीं है पायदारी हाए हाए*
ज़हर लगती है मुझे आब-ओ-हवा-ए-ज़िन्दगी
यानी तुझसे थी इसे नासाज़गारी हाए हाए
ख़ाक में नामूस-ए-पैमान-ए-मुहब्बत मिल गई
उठ गई दुनिया से राह-ओ-रस्म-ए-यारी हाए हाए
हाथ ही तेग़ाज़मा का काम से जाता रहा
दिल पे इक लगने ना पाया ज़ख़्मेकारी हाए हाए
* नेमाड्यांनी चांगदेव चतुष्टय मालिकेतील एका पुस्तकाच्या पहिल्या पानावरच हा शेर दिला आहे. त्यावरुन ही गझल शोधली, वाचली आणि आवडली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
छान
गालिबची आणि पुस्तकांची ओळख आवडली. "हैं और भी दुनिया में सुख़नवर बहुत अच्छे,
कहते हैं कि ग़ालिब का है अंदाज़-ए-बयाँ और" याचा प्रत्यय घेण्यासारखाच.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
गालिबच्या कवितेची आणि त्याच्या जीवनाची ओळख आवडली.
मागे देवनागरीत गालिबाचा काव्यसंग्रह मिळाला म्हणून घेतला, पण मला वाचायला फारच कठिण जातो आहे. :-( प्रस्तावनेतली संस्कृतप्रचुर हिंदी मला समजली -
तरी रेटून अधूनमधून अर्थ बघत-बघत एखादा शेर वाचतोच. अर्थ लागला की फार मजा वाटते.
आगही१ दाम२-ए-शनीदन३ जिस क़दर४ चाहे बिछाए
मुद्दआ़५ अन्क़ा६ है, अपने आलम७-ए-तक़रीर८ का
- - - - -
१आकलनशक्ती; २जाळे; ३श्रवणाचे; ४प्रकारे; ५मुद्दा/सारतत्त्व; ६दुर्लभ/अवास्तव - एक काल्पनिक पक्षी; ७जग; ७कथन
- - - - -
बुद्धी श्रवणाचे जाळे कुठल्या का तर्हेने पसरो
माझ्या सांगण्याच्या जगाचे सत्य दुष्प्राप्य आहे
**फारसी शिकणे सध्या जमणार नाही तर अशी एक एक बदामबी हुळहुळ्या नखांनी सोलून खावी लागते आहे. काय करावे? :-)**
लेख आवडला
श्री. सन्जोप राव
लेख अतिशय आवडला. माझ्या काही आवडत्या गाण्यांचे दुवे इथे देत आहे.
मुद्दत हुई है यार को
है बस की उनके
रहिये अब ऐसी जगह
रहिये अब ऐसी जगह
रहिये अब ऐसी जगह या गाण्यावरुन ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल हे गाणे सहीसही उचलले आहे असे वाटते. 'रहिये' ची चाल फार म्हणजे फारच ओळखीची आहे. या चालीवरुन एखादे अधिक लोकप्रिय गाणे बांधले आहे काय? जाणकारांनी कृपया खुलासा करावा. गाणे आठवत नसल्यास येणारी बेचैनी -दाढेत सुपारी वगैरे - संगीतप्रेमींना परिचित असेलच.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!
गालिबचा प्रभाव
"रहिये अब ऐसी जगह"वरूनच मजरूह यांनी "ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल" घेतले हे खरे आहे. या गाण्यात "बेदरोदीवार का एक घर बनाया चाहिये" अशी ओळ आहे. बहुधा त्यावरूनच गीतकार सुदर्शन फाकीर यांनी "दूरियाँ" मधल्या "जिंदगी मेरे घर आना" मध्ये "मेरे घर का दरवाजा कोई नहीं है, है दीवारे गुम और छत भी नहें है" अशा ओळी लिहिल्या असाव्यात.
"मुद्दत हुई है यार को"या गाण्याच्या दुसर्या कडव्यात "जी ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन, बैठे रहे तसव्वुरे जाना किये हुए" या ओळी आहेत. "मौसम" मधल्या गुलजार यांच्या प्रसिद्ध गाण्याचा मुखडा हाच आहे. अर्थात् हिंदी/उर्दू साहित्यात प्रसिद्ध साहित्यिकाची ओळ सुरूवातीला घेऊन पुढे स्वतंत्र कविता/ गीत लिहिणे हा मान्य संकेत असावा. आणखी उदाहरण म्हणजे "तेरी आँखोंके सिवा दुनिया में रखा क्या है" हा रफी/लताच्या गाण्याचा प्रसिद्ध मुखडा ही फैज् अहमद फैज यांच्या "मुझ से पहली सी मुहब्बत मेरे मेहबूब ना माँग" या गझलेतून घेतलेला आहे. "एरी मैं तो प्रेम दिवानी"या "नौबहार" मधल्या प्रसिद्ध गाण्याचा मुखडा मीराबाईच्या भजनातला आहे आणि पुढे गीत सत्येंद्र अथय्यांनी स्वतंत्र गीत लिहिले आहे. "मोहे भूल गये सावरिया" हा गाण्याच्या सुरूवातीच्या ओळी
"जो मैं ऐसा जानती के प्रीत किये दुख होए
नगर ढिंढोरा पीटती प्रीत न करियो कोय"
या पण मीराबाईच्याच आहेत.
शेवटी "बरसात की रात" मधला एक विनोदी प्रसंग. कव्वाली मुकाबल्यात भारतभूषणच्या शीघ्रकवित्वापुढे हतबल झालेला प्रतिस्पर्धी काहीच न सुचल्याने
"इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश 'फितना'"
असे लिहून मुकाबल्यातून पळ काढतो.
विनायक
गालिब, लता मंगेशकर व पं. हृदयनाथ मंगेशकर
या सर्व प्रतिसादात एक आणखी दुवा असावा: लता मंगेशकर यांनी गायलेल्या गालिबच्या गजल व त्याला संगीत पं. हृदयनाथ मंगेशकरांचे अशी एक कॅसेट H. M. V. ने उपलब्ध केली आहे. मला नाव नक्की आठवत नाही, Lata Mangeshkar sings Galib असे असावे. त्याची आता एक सी. डी. सुध्दा उपलब्ध आहे. रसिकांनी यातील गजला जरूर ऐकाव्या. पं. हृदयनाथ मंगेशकरांचे अप्रतीम संगीत व लता दीदींचा दर्दभरा आवाज आपल्याला वेगळ्याच मूडमध्ये घेऊन जातो.
त्यातील काही गजला:
हज़ारों ख्वाहिशें , दर्दे मिन्नत कशे
नितीन
अर्थ
लेख आवडला. गझलांचा, शेरांचा (शब्दश:) अर्थही सांगावा.