३ ते ६ जून १९८४

३ ते ६ जून १९८४ हा काळ स्वतंत्र (अधुनिक) भारताच्या इतिहासातील महत्वाचा कालखंड आहे. "ऑपरेशन ब्ल्यू स्टार" ही एका अर्थी दुर्दैवी पण तरी सुद्धा काही अंशी यशस्वी मोहीम या काळात राबवली गेली. एकमेकांविरुद्ध जात, धर्म, प्रादेशिक अस्मिता इत्यादींवर खेळवत ठेवायचे राजकारण आणि त्यातून स्वतःचे सत्तास्थान बलवान करायची सवय याचा जेंव्हा अतिरेक होतो तेंव्हा काय घडू शकते याचे पंजाब मधील दहशतवाद हे अधुनिक काळातील ढळढळीत उदाहरण आहे.

जो शिख समाज हा एका अर्थी देश रक्षणार्थ एक संप्रदाय म्हणून तयार केला गेला, ज्या शिखसमाजाचे भारताच्या इतिहासात, स्वातंत्र्यचळवळीत आणि नंतरचे योगदान हे नक्कीच मोठे आहे अशा शिख समाजाने आणि त्यांच्या अकाल तख्ताने पाणी आणि प्रदेशवाटपाच्या कारणावरून आणि नेहमीच गृहीत धरत दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून ही चळवळ चालू केली. आणि बघता बघता त्या चळवळीचे रुपांतर हे पंजाब दहशतवादात झाले आणि खलीस्तान हे स्वतंत्र राष्ट्र मागण्यापर्यंत त्यांची मजल गेली....

या चळवळीमुळे देशाचे खूप नुकसान झाले. अनेक निरपराध व्यक्तींचा बळी गेला. इतिहासाची पाने चाळताना असे दिसते की इंदिरा गांधींच्या ब्रिटीश स्टाईल फोडा आणि झोडा या धोरणाचा हा परीपाक आहे. अर्थात त्यांचे जसे राजकारण चुकले असे म्हणता येते तसेच त्यातील चूक लक्षात येताच त्यावर तोडगा काढण्याची हिंमत ती पण स्वतःच्या जीवावर उदार होवून, इंदिरा गांधींमधेच होती. परीणामी भिन्द्रनवालेंच्या मृत्यूने एका अर्थी ही मोहीम यशस्वी झाली. पण त्याची किंमत काय?

२०० सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. स्वतःच्या देशात स्वतःच्याच माणसांशी लढताना.

जहाल अतिरेकी संत जर्नेलसिंग भिन्द्रनवाले यांना मारण्यात भारतीय सैन्यास यश आले. पण शिख समाजात आजही असा एक भाग आहे ज्यांना असे वाटते की ते जिवंत आहेत.

सुवर्ण मंदीराची दशा झाली...

जनरल अरूणकुमार वैद्य यांना पुण्यात खलीस्तान्यांनी मारले...

(एक दुर्दैवी सरकारी भाग आत्ताच लक्षात आला - या जगजाहीर घटने विषयी आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र "He passed away on 10th Aug 1986." इतकेच लिहीले गेले आहे...

इंदिरा गांधी यांना त्यांच्या शिख अंगरक्षकांनी मारले.

पुढे हे प्रकरण बराच काळ चालू राहीले. राजीव गांधी यातून पंजाबबाबत शिकले मात्र तामिळ लोकांच्या बाबतीत मात्र ते शिकलेले वापरले नाही. शेवटी पंतप्रधान राव आणि केपिएस गील यांनी काही सन्मान्य आणि काही "एव्हरी थिंग इज फेअर..." म्हणत हा प्रश्न तडीस नेला.

तरी देखील आजही शिख समाज हा दुखावलेलाच आहे. असे दुखावलेले शिख भारताबाहेर अमेरिका, कॅनडात तसे इतरत्रही दिसत असतील. दिल्लीला माझ्या एका हॉटेलच्या गाडीचा ड्रायव्हर पण भिन्द्रनवालेंच्या संदर्भात् जसे आदराने बोलत होता ते ऐकल्यावर आजही काय अवस्था आहे हे समजते.

आपल्याला काय वाटते तसेच इतर अधिक माहीती येथे वाचायलाअ आवडेल.

Comments

उत्तम आढावा

लेख आवडला.

माझ्या महाविद्यालयातील दोन मित्रांनी सांगितलेले दोन प्रसंग - दोघे मित्र आता भारतीय सैन्यात आहेत. (आठवणी सांगतो आहे तो काळ १९८९-१९९२). अगदी सामान्य लोकांमध्ये सुद्धा या वादाचे विष आणि त्याची होरपळ वाईट प्रकारे भिनली होती, त्याबद्दल आठवणी आहेत.

एक अमृतसरात राहाणारा हिंदू. भिंडरांवाले याने पुंडारून प्रतिसरकार निर्माण केले होते, तेव्हा अल्पसंख्याक हिंदूंना पंजाबातून घालवून टाकण्याची स्वप्ने तो बघत होता. किंवा त्याच्या चिथावणीने लोक बघत होते. हिंदू लोक पळून गेल्यावर त्या घरांवर हक्क सांगण्यासाठी नोंदणी कार्यक्रमही सुरू केला होता. ब्ल्यू स्टार मध्ये भिंडरांवालेच्या प्रतिसरकारचा नायनाट झाला, तेव्हा यातील काही प्लॅन तपशीलवार उघडकीला आले - म्हणजे नोंदणीपुस्तके वगैरे. त्यांना कळले, की त्यांच्या घरावर हक्क मिळावा म्हणून शेजारच्या काही परिचितांनी नोंदणी केली होती. म्हणजे पंजाब फुटणार याची खात्री शिखांपैकी सामान्यांनाही वाटू लागली होती.

दुसरा एक मित्र शिख होता पण शेतकरी-जमीनदाराचा मुलगा. (कॉलेजातले बहुतेक शिख सेनेतील अधिकार्‍यांची मुले होती.) तो म्हणाला की पंजाबात त्याला बसमध्ये, रस्त्यावर कुठेही दहशत वाटायची की त्याच्या काही मित्रांसारखी त्याला अटक होईल - "टाडा" लागेल. म्हणजे केपीएस गिल काळात भारत-राष्ट्रवादी शिखांनाही भयंकर जाच वाटत होता.

"फोडा आणि झोडा" हे अंतर्गत राजकारणासाठी वापरताना अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजे. (राजकीय पक्षाने सरकार म्हणून नव्हे, तर पक्ष म्हणून विरोधी पक्षाबद्दल फोडा-झोडा वापरणे, ते वेगळे. याला आपण "मुत्सद्दीपणा" म्हणतो. पण लोकशाही सरकारने सरकारी यंत्रणेच्या बळावर "फोडा-आणि-झोडा" वापरणे म्हणजे लोकशाही राष्ट्राच्या जिवाशीच खेळ आहे.)

हे थोडे विचार. पुन्हा - लेख आवडला.

भारताबाहेर

दिल्लीला माझ्या एका हॉटेलच्या गाडीचा ड्रायव्हर पण भिन्द्रनवालेंच्या संदर्भात् जसे आदराने बोलत होता ते ऐकल्यावर आजही काय अवस्था आहे हे समजते.

त्याकाळी बायका पोरांसहित फरार होऊन अमेरिका/कॅनडा ह्यांच्या आश्रयास गेलेल्या शिखांमध्ये अजूनही निर्विवाद कटूता आहे. विशेषतः त्यांच्या पुढच्या पिढीत (तेव्हाची बालके, आजचे तरुण) सुद्धा कडवा भारतद्वेष आहे. त्या पिढीतल्या काहींचा दुरून परिचय झाल्यावर हे समजले.

विसरलेले मुद्दे

दोन मुद्दे मी लिहीणार होतो पण राहून गेले म्हणून येथे थोडक्यात लिहीतो:

ह्या लेखाचे निमित्त - ऑपरेशन ब्ल्यू स्टार ला पंचवीस वर्षे झाली. यात त्याच्या संदर्भात अनेक गोष्टी बदलल्या पण काही गोष्टी विसरल्या गेल्या नाहीत. शिख समाजाच्या मनात - किमान काहींच्या मनात अजूनही कडवटपणा आहे. हे कुणाच्याच बाबतीत किमान एकाच राष्ट्रात घडू नये असे वाटत असेल तर काय करायला हवे - यात सरकारची आणि नागरीकांची जबाबदारी काय असू शकते ह्यावर चर्चा व्हावी असे वाटले.

घटनांचा आढावा घेत असताना इंदिरा गांधींच्या हत्येचा कालक्रम हा जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या हत्येच्या आधी आहे. तसेच एक महत्वाची घटना लिहायची राहीली ज्याच्या जखमा आत्ताच्या निवडणूकांच्या आधी ताज्या झाल्या होत्या - इंदिरा गांधी हत्येनंतर झालेली ३०००+ शिखांची हत्या आणि त्याचे राजीव गांधींनी केलेले सभ्य शब्दात पण समर्थनच.

२५ वर्षं!!!

हा प्रकार घडल्याला २५ वर्षे उलटून गेली. आजही या घटनेचे पडसाद (त्या वेळी उमटलेले) पूर्णतः विरलेले नाहीत. पण हे पडसाद मुख्यतः आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावर असणार्‍या लोकांमधे आहे असे वाटते. (या उलट, इंदिराहत्येनंतर उसळलेल्या दंग्याच्या जखमा मात्र आजही बहुतांश शीख समाज बाळगून आहे हे नक्की.) ब्ल्यूस्टार बाबत बहुतेक शीख समाज आता बर्‍यापैकी सावरलेला आहे. पण भारताबाहेर, विशेषतः कॅनडामधे मात्र सूडभावना मुद्दाम जागती ठेवली जाते आहे. काही शीख मित्रांशी बोलताना जाणवलेल्या गोष्टी आहेत या.

विकास यांनी इंदिराजींबद्दल (चूक केली पण ती निस्तरायला जी हिंमत लागली ती पण दाखवली) केलेले निरीक्षण अचूक. छान उजळणी करणारा लेख.

मला नेहमी एका गोष्टीचे खूपच कुतूहल वाटत आले आहे. जशी एक उघड / निर्विवाद सीमा हिंदू - मुस्लिम या दोन धर्मांमधे आहे, तशी हिंदू - शीख या दोन धर्मांमधे नाही. किंबहुना शीख विचारधारेबद्दल धर्म / पंथ हे दोन्ही शब्द सारख्याचपध्दतीने वापरले जातात. बर्‍याच हिंदू घरात मोठा मुलगा शीख करायची पध्दत आहे. तसेच सगळेच शीख काही दाढी, पगडी इ. बाह्य लक्षणे ठेवत नाहीत. आज पर्यंत जितक्या पंजाबी /सिंधी घरांमधे जायचा योग आला तिथे गुरू नानकजींचा फोटो देवघरात असतोच. आणि 'जपजीसाहेब' (एक शीख धर्मग्रंथ) चा नियमित पाठ करताना घरातली बुजुर्ग माणसे दिसतात. मग अशी सगळी सरमिसळ असताना, नक्की काय / कसे चुकले? आणि हिंदूंविरोधात कारवाई करताना हे लोक भेदभाव कसा करू शकत होते? कधी संधी मिळाली तर जाणून घ्यायचे आहे. पण जितके पण ओळखीचे शीख होते / आहेत ते हा विषय निघाला की चक्क सरळ टाळून देतात.

बिपिन कार्यकर्ते

आंतर्राष्ट्रीय राजकारण...कोड्याचे तुकडे

ग अशी सगळी सरमिसळ असताना, नक्की काय / कसे चुकले? आणि हिंदूंविरोधात कारवाई करताना हे लोक भेदभाव कसा करू शकत होते? कधी संधी मिळाली तर जाणून घ्यायचे आहे. पण जितके पण ओळखीचे शीख होते / आहेत ते हा विषय निघाला की चक्क सरळ टाळून देतात.

याला एकच एक उत्तर आहे असे वाटत नाही. पण एकातून एक गोष्टी जसजशा अंतर्गत राजकारणातून घडत अथवा बिघडत गेल्या तसतसा त्याचा वापर हा भारत विरोधी कारवायांसाठी आंतर्राष्ट्रीय राजकारणात केला गेला.

अंतर्गत राजकारण
अगदी थोडक्यात सांगायचे तर सतलज नदीचा पाणि पुरवठा, चंदिगढ ही दोन राज्यांची एकच राजधानी आणि त्याला अनुषंगून निवडणूकींचे राजकारण करत हा प्रश्न अगदी भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरवातीच्या दशकापासून हळूहळू चिघळायला सुरवात झाली. इंदिरा गांधींनी जे काही केले तो त्याचा परिपाक होता आणि अर्थातच त्यांचा राजकीय स्वार्थ होता. अशा काळात आणिबाणी, नंतर जनता पार्टीचा फसलेला प्रयोग आणि नंतर परत इंदिरा गांधींचे पुनरागमन या काळात अनेक बाकी जनता तशी सामान्यच होती. ठराविक बुद्धीवंतांच्या विश्लेषणाच्या भरवशावर सर्व काही समजून घेत होती... त्यावर चर्चा आणि विचारांचे आदान-प्रदान हा प्रश्नच नव्हता. कारण मुख्य म्हणजे माध्यमात दूरदर्शन-आकाशावाणी सरकारच्या ताब्यात, प्रसिद्धीमाध्यमे विशेष करून डाव्या विचारवंतांच्या ताब्यात. थोडक्यात एकेरीपणा आला होता...

आंतर्राष्ट्रीय राजकारण

काळाबरोबर आपण बर्‍याच गोष्टी विसरतो, संदर्भ विसरतो, नविन पिढ्यांना तर केवळ कल्पनाच करावी लागते... पण तो काळ (सत्तरीचा शेवट आणि ऐंशिच्या दशकाची सुरवात) हा टोकाच्या शितयुद्धाचा होता. १९७९ मधे रशियाने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला होता आणि आता इतिहासात पाहीले तर तो तसाच १९८९ पर्यंत रहाणार होता. त्याच काळात अमेरिकेच्या मदतीने तालीबान तयार झाले आणि ते करण्यात पाकीस्तानने सिंहाचा वाटा घेतला. (अवांतरः अर्थात परत हे अमेरिकेस का करावे लागले याचा ढोबळ मानाने विचार केल्यास जाणवते: भारत रशियाला जवळ. अध्यक्ष कार्टर यांची प्रवृत्ती आक्रमक नाही, नंतर रेगन आले पण त्यांना आधी इकॉनॉमिकडे लक्ष द्यावे लागले आणि सीआयए ला वगैरे असे हळू हळू घुसखोराना शस्त्रास्त्रे देऊन प्रबळ करणे सोयीचे वाटले आणि त्यातून स्वतःचे व्हिएटनाम परत घडणार नाही असे वाटले... या संदर्भात "चार्ली विल्सनज् वॉर" हा चित्रपट बघण्यासारखा आहे.)

पाकीस्तानने दिलेला हा वाटा फुकटचा नव्हता आणि सत्ता ही लक्षरशहा झियांच्या ताब्यात होती. "देवाने एका माणसाला वर दिला की हवे ते माग पण तुला जे देईन त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्‍याला मिळेल. ह्या द्वेषी माणसाने विचार करून काय मागावे? तर एका डोळ्याने आंधळेपण!" पाकीस्तानची वृत्ती राष्ट्र म्हणून अशी आहे. त्याची फळे ते आता भोगत आहेत. पण तेंव्हा त्यांचा डोळा हा काश्मिरप्रमाणेच पंजाबप्रश्न चिघळवून भारताचे हालहाल करत तुकडे करण्याचा होता. आजही पाकीस्तानातील पंजाब मधील राज्यकर्त्यांकडेच जास्त सत्ता असते. झिया हे पंजाबीच होते... भारतीय पंजाबमधील माथेफिरुंना आपल्याकडे वळवून स्वतंत्र खलीस्तानचे स्वप्न अर्थात हिंदूंना घालवून साकार करण्याचे आश्वासन देण्यात आणि ते त्यांच्याकडून मान्य करून घेण्यात ते यशस्वी झाले...थोडक्यात अमेरिकेकडून मिळणारी मदत ही पाकीस्तानने जशी अफगाणिस्तानविरोधात वापरली तशीच काश्मीर आणि पंजाबसाठीपण वापरली.

मग आपले तत्कालीन राज्यकर्ते काय करत होते?

मी अभ्यास केलेला नाही, पण कदाचीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात इस्लामीक व्होटबँक पॉलीटीक्स साठी हा काळ सर्वात जास्त "ऍक्टीव्ह" असावा असे वाटते. त्यामुळे एक "परकीय हात" हा शब्द सोडून आपण पाकीस्तानचे नाव घेयला पण कचरायचो. तसेच एकंदरीतच "धार्मिक भावना दुखावयाच्या नाहीत," असे म्हणत जे काही राजकारण आणि धोरण अंगिकारले होते त्याचा फायदा शिखांना आणि सुवर्णमंदीरावरील हल्ल्याला वेळ लावायला पण घेतला गेला. त्या काळात हे ऐतिहासिक मंदीर किल्लाच झाले... पण त्याशिवाय तेथे अनेक सामान्य नागरी जीवनातील बेकायदेशीर कारवाया पण चालू झाल्या होत्या ज्यांने त्याचे उरलेसुरले मंदीर म्हणून असलेले पावित्र्य पण गेले. या शिवाय रशियाने सांगितल्याप्रमाणे वागण्याची सवय... त्या वेळेसपण इंदीरा गांधी या सियाचेनला गेल्यात असे सांगून ताष्कंदला रशियन अधिकार्‍यांशी ऑपरेशन ब्ल्यू स्टार वर प्लॅनिंगसाठी चर्चा करायला गेल्याचे वाचल्याचे आठवते (अर्थात् हे पत्रकारांचे ठोकताळे होते). तसेच भारतीय सैन्याने ब्रिटीशांकडून पण या हल्यासंदर्भात मदत घेतल्याचे ऐकले आहे.

अर्थात आता बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. आपण बर्‍यापैकी जास्त स्वतंत्र झालो आहोत असे वाटते, लोकशाही ही जास्त सजग लोकांची झाल्या सारखी वाटते. विविध पद्धतीने विचार मांडले जाऊ लागले आहेत.. अजूनही मुत्सद्दीपणात कमी पडत असलो तरी पाकीस्तानचे नाव घेऊन आरोप करताना आता काँग्रेसपण मागेपुढे पहात नाही.

पण अजून बरेच बदलावे लागणार आहे - सत्ताधार्‍यांना, नोकरशहांना आणि जनतेला.

भिंडरावाले आणि गोडसे

"... दिल्लीला माझ्या एका हॉटेलच्या गाडीचा ड्रायव्हर पण भिन्द्रनवालेंच्या संदर्भात् जसे आदराने बोलत होता ते ऐकल्यावर आजही काय अवस्था आहे हे समजते".
"त्याकाळी बायका पोरांसहित फरार होऊन अमेरिका/कॅनडा ह्यांच्या आश्रयास गेलेल्या शिखांमध्ये अजूनही निर्विवाद कटूता आहे. विशेषतः त्यांच्या पुढच्या पिढीत (तेव्हाची बालके, आजचे तरुण) सुद्धा कडवा भारतद्वेष आहे. त्या पिढीतल्या काहींचा दुरून परिचय झाल्यावर हे समजले..."

अवांतर वाटेल - पण अचानकच कां कुणास ठाउक, गोडसेच्या निमित्ता ने महाराष्ट्रातून मारहाण करून हाकलून लावलेले ब्राह्मण आठवले, त्यांच्या पण पिढ्या मनावर घाव घेवून बसल्या आहेत आणि बरेच लोकांच्या मनात गोडसे बद्दल आदर आणि कांग्रेस विरुद्ध द्वेष आहे (६० वर्ष उलटली तरी ही, शिख ह्यांना तर् २५ वर्षच् झाले आहे).

http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर