सुरुवात आणि समरीतन गर्ल्स

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट या गुंडोपंतांनी सुचवलेल्या प्रस्तावाचे ३ भाग मागे झाले होते.

मात्र आता प्रत्येक चित्रपट वेगळा यावा असे वाटून आंतरराष्ट्रीय चित्रपटाची ओळख - अशा स्वरूपाची मालिका करण्याचा मानस आहे. बघु या कसे जमते ते.
या लेखांमध्ये चित्रे देतांना ती कशी द्यावीत हे मला सुचत नाहीये कारण मला जालावरची चित्रे तशीच डकवायची नाहीयेत. प्रताधिकाराचा भंग नको अशी भूमीका आहे. यामुळे मी आधीची चित्रेही काढून टाकली आहेत.

कुणी चित्रपटाच्या पोस्टरवर प्रताधिकार असतो का हे स्पष्ट करू शकेल का?

या आधी पाहिलेल्या चित्रपटांचे परिक्षण येथे आणि माझ्या ब्लॉगवरही आहेच.
आधीच्या भागांचे दुवे खालील प्रमाणे.

१. आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट - भाग १

२. आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -२

३. आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -३

आता चित्रपटाकडे वळू या.
काल पहिलेला समरीतन गर्ल्स हा एक कोरियन भाषेतील चित्रपट आहे.

किशोरवयीन आणि अजून शाळेत असलेल्या दोन मैत्रिणी याओ जीन आणि जाए याँग. युरोपला जाण्यासाठी म्हणून पैसे मिळवण्याच्या मागे लागतात. आणि त्या साठी त्या चक्क वेश्या व्यवसायाचा मार्ग स्विकारतात. जाए पुरुषांसोबत जाते तर याओ तीच्यासाठी गिऱ्हाइके मिळवते आणि पोलिसांवर लक्ष ठेवते. या सगळ्यात जाए याँग आनंदी असते आणि ती आनंदी का आहे या साठी ती चक्क एका भारतीय बुद्धकालीन वारांगनेचा संदर्भ देते आणि म्हणते की तीच्या बरोबर जी माणसे संग करायचे ते निर्वाणाला पोहोचायचे. परंतु याओ ला हे पटत नाही. दर वेळी ती कुणा पुरुषा कडून आल्यावर याओ जीन तीला संपुर्ण आंघोळ घालते.

अशाच एका वेळी याओचे दुर्लक्ष होते आणि जाए असलेल्या त्या मोटेलवर पोलिस धाड घालतात. पोलिसांपासून वाचण्यासाठी जाए दोन मजले उंच असलेल्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारते. यात तीच्या डोक्याला मार बसतो आणि ती इस्पितळात मरते. पण त्या आधी ती तीच्या एका आवडलेल्या संगितकार असलेल्या क्लाएंटला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. याओ त्या माणसाला भटून त्याला सांगते पण तो याओ सोबत झोपायला मिळाल्या शिवाय यायला तयार होत नाही. जेंव्हा तो तायर होतो तोवर जाए मृत्यू पावलेली असते.

जाए याँगच्या मृत्युचे कारण याओ जीन आपणच आहोत असे मानते. ही टोचणी कमी करण्यासाठी म्हणून ती ठरवते की ज्या लोकांनी जाए याँग ला पैसे दिले आहेत, त्यांना भेटून त्याच पद्धतीने ते पैसे परत करायचे. आणि ती तसे करायला सुरुवातही करते. तीचे वडील एक कडक पोलिस अधिकारी असतात. ते एका धाडीमध्ये तीला समोरच्या इमारतीत एका पुरुषासोबत पाहतात. आणि अस्वस्थ कोलमडून पडतात. ते तीच्या एका एका क्लायंटला भेटून अल्पवयीन मुलीशी संबंध का ठेवतो असे प्रश्न विचारून बदडायला सुरुवात करतात. हा हिंसकपणा वाढत जाऊन यात एका गिऱ्हाईकाचा मृत्यू होतो.

मग वडील मुलीला घेऊन गाव सोडण्याचेच ठरवतात आणि प्रवासाला निघतात. पण या बरोबर असण्याच्या काळात दोघांनाही एकमेकांचे काहीतरी बिनसलेले आहे हे जाणवत असते पण कुणीच काही बोलत नाही. प्रचंड अस्वस्थता असतांनाच पोलिस तीच्या वडिलांना पकडतात.

एकुणच किशोरवयात असलेली मुले/मुली एखाद्या गोष्टीच्या मागे लागून काय करू शकतात याचे उदाहरण. त्यापेक्षा पुढे जाऊन कुंटुंबात एकमेकांशी मोकळेपणानी संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे हा विचारही मनात आल्याशिवाय राहिला नाही.
किम की दुक या कोरियन लेखक - दिग्दर्शकाचा हा चित्रपट.
याओला मृत्यु येण्या आधीच्या काळातले प्रसंग चटका लावतात.

बाकी ठीक ठीक वाटला.

कलाकार
जाए याँग - हॅन याओ ऱ्युम
याओ जीन - क्वाक जी मिन

२००४ मध्ये चित्रपटाला बर्लीन चित्रपट मोहोत्सवात सिल्व्हर बेअर मिळाले आहे.

-निनाद

Comments

हं

>त्यापेक्षा पुढे जाऊन कुंटुंबात एकमेकांशी मोकळेपणानी संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे हा विचारही मनात आल्याशिवाय राहिला नाही.

सिनेमा पाहून असा विचार आला की सिनेमात त्या दृष्टीने विचार मांडला आहे?

थोडक्यात इतका काही खास सिनेमा आहे असे नाही तर?

विचार

कुंटुंबात एकमेकांशी मोकळेपणानी संवाद साधणे महत्त्वाचे आहे

सिनेमात असा काही विचार मांडायचा प्रयत्न झाला आहे की नाही याची कल्पना नाही.
पण बाप मुलीशी स्पष्टपणे बोलत का नाही असे मात्र मनात येत राहिले.
आपली मुलगी जर योग्य दिशेने जात नसेल तर बापाला तीच्याशी बोलले पाहिजे. आणि ती जबाबदारी मुलीची नसून बापाचीच आहे.

जर लेखक-दिग्दर्शकाला हे व्हायला हवे होते तर तो त्याचा संदेश देण्यात यशस्वी ठरला असे म्हणता येईल.

बाकी सिनेमा काही खास वाटला नाही, कारण कथा आणि मांडणी भंपक वाटली.

-निनाद

धन्यु!

माझ्या उल्लेखाबद्दल धन्यु!

आपला
गुंडोपंत

हो

कुणी चित्रपटाच्या पोस्टरवर प्रताधिकार असतो का हे स्पष्ट करू शकेल का?
प्रताधिकार असतो असे वाटते. अधिक माहिती इथे.
अवांतर : आधुनिक जगात प्रताधिकार कितपत प्रसंगोचित आहे कल्पना नाही.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

प्रताधिकार

माहिती उत्तम आहे.
उपयोगी आहे.

खरे तर पोस्टर हे चित्रपटाची प्रसिद्धी व्हावी म्हणून बनवलेले असते.
म्हणून मला समजत नाहीये की जोवर प्रताधिकार नाही असा स्पष्ट उल्लेख येत नाही तोवर वापरू नये की वापरावे ते.
असो,
सध्या 'वापरू नये' असे इष्ट मानतो.

-निनाद

 
^ वर