आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -२

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट - भाग २

पहिल्या भागाला ५० प्रतिसाद प्रतिसाद झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भरघोस प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

असेच नवनवीन चित्रपटांबद्दल येवू द्या...
----------------------------------------------
आपण सगळेच चित्रपट बघत असतो. काही जण अधून मधून तर काही अगदी नियमीतपणे.
आपण कोणते चित्रपट येव्हढ्यात पाहिले आहेत?
या यादीत
अगदी सगळे चालतील फ्रेंच, इटालियन, स्पॅनीश, इंग्रजी, हिंदी, मराठी, तामीळ...
डॉक्युमेंटरीज, आर्ट फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, फिचर फिल्म्स आणि अगदी ऍडल्ट सिनेमे सुद्धा! ;)

मात्र या चर्चेत नुसते चित्रपटाचे नाव देवू नका, त्या चित्रपटात काय आवडले/नावडले तेही द्या.
चित्रपट पाहिल्यावर काय वाटले, भावले, पटले न पटले व तसे का वाटले हे दिलेत तर बहारच!
शिवाय चित्रपटाचे संक्षिप्त कथानक दिले तर फार उत्तम. मात्र सस्पेन्स असेल तर शेवट देवू नका हे सांगणे नलगे!

या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला माहीत नसलेल्या भाषांमधील जागतिक चित्रपटांची ओळख व्हावी ही अपेक्षा आहे.
(त्यामुळे अति गाजलेले हिंदी, मराठी, इंग्रजी सिनेमे यात आले नाहीत तरी चालतील असे वाटते.)

आपला
गुंडोपंत

Comments

स्तुत्य विचारणा.

अशा जागतिक दर्जाच्या छान चित्रपटांची माहिती घरबसल्या मिळाली, तर चित्रपटगृहात न बिचकता जाऊन ते चित्रपट बघावेसे वाटतील. --वाचक्‍नवी

लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड

युगांडाचा हुकूमशहा इदी आमिन वरील हा काल्पनिक चित्रपट असला तरी त्यातील प्रमुख नायक - इदिआमिनचा स्कॉटीश सल्लागार हे कुठल्याशा वास्तव व्यक्तिवरून घेतेलेले व्यक्तिमत्व आहे.

एक स्कॉटीश डॉक्टर मानवतेच्या नजरेतून युगांडामधे काम करायला गेलेला असतो. तेथे त्याची गाठ इदी आमिनशी पडते. ब्रिटीशांवर विश्वास नसल्यामुळे ब्रिटीशमाणसाचे तो ऐकत नाही आणि त्याच्या (इदी आमिनच्या) जाळ्यात (मानवतेच्या दृष्टीकोनात राहत) अडकतो. आणि नंतर आहे तो संघर्ष आणि त्यावेळी चाललेल्या अत्याचारांचे वर्णन. एखाद-दोन दृश्ये सोडल्यास बाकी चित्रपटात जास्त हिंसक/क्रुर दृश्ये नाहीत.

फॉरेस्ट व्हिटेकरला त्याच्या इदीआमिनच्या भुमिकेबद्दल उत्कृष्ठ नटाचे २००६ चे ऍकेडमी (ऑस्कर) आणि गोल्डन ग्लोब पारीतोषिक मिळाले होते.

राइझ अँड फॉल पेक्षा वेगळा?

बघायला हवा...
इदी अमिन - राइझ अँड फॉल पेक्षा वेगळा असवा हा सिनेमा असे वाटते.

-निनाद

जोधा अकबर

कालच जोधा -अकबर बघितला. :-) तेही पिटात बसून!
सध्या बरीच चर्चा चालली होती, ती ठरवून जास्त न वाचता गेले होते. कथानकावर आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी नक्कीच आढळल्या, पण त्याची सत्यता वगैरे फालतू गोष्टींना (ह. घ्या. ) जास्त महत्त्व न बघता बघितल्यास आशुतोष गोवारीकरने परत एकदा एक करमणूक होईल चित्रपट दिला आहे एवढे नक्की. उदाहरण द्यायचे झाले तर जोधाचे तलवारीचे कसब बघून जलालुद्दीन महंमद इतके इंप्रेस होतात की पत्नीशी तलवारीचे हात करून तिला जिंकू बघतात आणि आपण पिटात बसून पडद्यावर तलवार गोलगोल चालताना बघून एकतर जीव मुठीत धरून बसतो, किंवा त्या भरात माहितीची सत्यासत्यता तपासणे विसरून तरी जातो. चित्रपटाला आलेल्या (अमेरिकन भारतीय) पोराबाळांनीही शिट्टया, टाळ्यांनी भरपूर करमणूक करून घेतली/केली. बाकी घरी बसून बघण्यासारखा हा चित्रपट नव्हे.

आशुतोष गोवारीकरचे कौतुक अशासाठी की एवढा साडेतीन तासाचा लांबट चित्रपट (मलातरी) कंटाळवाणा वाटला नाही (अनेक हिंदी चित्रपटांतून १० मिनिटांत उठावेसे वाटते). त्यासाठी अर्थातच मोठे सेट, युद्धे, रंगीबेरंगी भरजरी कपडे आहेतच. पण मुख्य चित्रपट भराभर पुढे जातो. लहान-लहान कामे करणारे सर्वच कलाकार (कुलभूषण खरबंदा, सुहासिनी मुळ्ये इत्यादी) आपापल्या भूमिकेत शोभून दिसले. हृतिक आणि ऐश्वर्या आपापल्या भूमिकेत बर्‍यापैकी शोभतात.

हा हा हा!!!

आणि आपण पिटात बसून पडद्यावर तलवार गोलगोल चालताना बघून एकतर जीव मुठीत धरून बसतो,

हा हा हा...
हे तर मी वाचलेच नव्हते हो!

म्हणजे आता बघावा लागतो तर मग हा चित्रपट.

आपला
गुंडोपंत

कॉमे तुत ल माँद - मि. ऍव्हरेज

कालचा
कॉमे तुत ल माँद
Comme tout le monde - मि. ऍव्हरेज बरा होता.

२००६ चा हा
फ्रेंच चित्रपट पिएर पॉल राँदर्स ने दिग्दर्शीत केला आहे.
हाच सहलेखकही आहे.

खलीद मादुर मुख्य अभिनेता.

जलील एक बालवाडीचा शिक्षक असतो, तो एक मि. ऍव्हरेज नावाचा खेळ जिंकतो. त्याच दिवशी त्याला क्लेर नावाची एक मुलगी भेटते. ही मुलगी
मार्केटींग कंपनीसाठी काम करत असते. जलील एक अतिसामान्य माणूस असतो. व सामान्य माणसाला नक्की काय आवडते हे जाणून घेण्यासाठी त्याला लक्ष्य केले जाते. त्याच्यावर २४ तास पहारा ठेवला जातो त्यासाठी ६० कॅमेरे व ३० माईक त्याच्या घरात बसवले जातात. आणि क्लेर बनते त्याची खोटी प्रेयसी. त्याच्या कडून त्याला नक्की काय आवडते ही माहीती काढण्याचे काम तीचे असते. मात्र क्लेरला कुठेतरी हे सगळे रुचत नाही व ती काम मध्येच सोडण्याचा निर्णय घेते. जलील ला ती आपल्याला का सोडून जाते आहे हे कळत नाही व तो तीच्या मागे जाऊन विचारण्याचा प्रयत्न करते. शेवटी ती त्याला सोडून जाण्या आधी ती जलीलला कल्पना देते की नक्की काय होते आहे. जलील ते सगळे कॅमेरे फोडतो माईक्स शोधतो. त्या रेकॉर्डींगचे हक्क ताब्यात घेतो.

हे प्रकरण बाहेर आल्याने जलील अचानक नॅशनल हिरो बनतो. प्रेसिडेंटना ही त्याने आप्ल्याला मत द्यावे अशी अपेक्षा असते त्यामुळे जनमत आपल्याकडे झुकेल असे त्यांना वाटते. मात्र जलील अचानक पणे भलतेच भाकित करतो व सगळ्यांना चक्राऊन टाकतो.

शिवाय अस्वस्थपणे क्लेर पण गायब असते. जलील तीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

पुढे काय होते हे पडद्यावरच पाहा...

सिनेमाचे पोस्टर
Comme tout le monde 3

जलीलला गिनि पिग बनवणारे लोक
Comme Tout Le Monde

मध्ये बसलेले मुख्य पात्र जलील
Comme Tout Le Monde 2
-निनाद

आज सलाम नमस्ते

अर्र्!

आज आमच्या एसबी एस वर
सलाम नमस्ते चाललाय...

झोपणे इष्ट :)

-निनाद

लिटल् मिस् सनशाईन्

परवा टीव्हीवर पाहिला. आणि तो मला आवडला. मनात रेंगाळत राहिला.

या चित्रपटात कसलीही भव्यदिव्य दृष्ये नाहीत. प्रतिसृष्टीची निर्मिती नाही. हिंसा, सेक्स् , काहीच नाही. ही चॉकलेट् प्रेमकथा नाही ; ऐतिहासिक-मिथके-पौराणिक-धार्मिक कथानके नाहीत. सस्पेन्स नाही. संगीतिका नाही. नृत्ये नाहीत. (सॉरी; संगीत आणि नृत्ये आहेत . पण ..... त्यांचे काम मनोरंजनाचे नाही . त्याच्यात उच्च कलात्मक पातळी नाही). विनोदाची जातकुळी डार्क् आहे ; आणि अगदी सूक्ष्म आहे.

मग काय आहे बरे यात ? आणि आवडण्यासारखे तरी काय असू शकते ?

-स्पॉइलर अलर्ट् - (मराठी शब्द ?)

हा चित्रपट आहे अपेशी माणसांच्या एका कुटुंबाच्या दोन दिवसांच्या तुकड्याचे चित्रण करणारा.

चित्रपट सुरू होतो आणि पहिल्या काही दृष्यांतच दिसते की शेरिल् ही एक चिंताग्रस्त , अभावग्रस्त वाटणारी अशी मध्यमवयीन बाई आहे. तिला दोन मुले आहेत. तिचा भाऊ फ्रॅंक् याची जबाबदारी नुक्तीच तिच्यावर येऊन पडली आहे ; कारण त्याचा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याला एकटे सोडणे धोक्याचे आणि शेरिल् शिवाय त्याचे कोण ? फ्रॅंक् "प्रूस्त" या फ्रेन्च लेखकावरचा एकेकाळी मान्यताप्राप्त असा एक विद्वान आहे. मात्र आपल्या एका विद्यार्थ्याबरोबरील एकतर्फी समलिंगी प्रेमसंबंधात त्याला अपयश आले. पर्यायाने त्याचे भावनिक विश्व आणि त्याची सगळा व्यावसायिक मानमरातब एकाच वेळी गंगार्पण झाले.

शेरिलचा नवरा रिचर्ड्. रिचर्ड् हा स्वतःला प्रयत्नवादी म्हणवतो ; विजिगिषु वृतीचा जणु तो प्रवक्ताच. आयुष्यात यशस्वी बनण्याचा मूलमंत्र त्याच्याकडे तय्यार आहे. या मूलमंत्राचेच पुस्तक, व्याख्याने यावाटे भांडवल बनवून आपल्या आयुष्याचे त्याला सोने करायचे आहे. अर्थात , सद्यस्थितीमधे , त्याच्यापाशी या मूलमंत्राचे उदाहरण देण्याइतपत यशस्विता काडीची नाही हा भाग वेगळा.

ड्वेन हा तिचा टीन् एज् मुलगा. ड्वेनला पायलट बनायचे आहे. जोवर तो हे साध्य करत नाही तोवर त्याने मौनव्रत धारण केले आहे. त्याच्या एकूण आविर्भावामुळे (जेमेतेम १५-१६ वर्षांचा हा , "नीत्शे" वाचतो !! ) आणि विशेषतः त्याच्या मौनव्रतामुळे आणि या सगळ्याशी मेळ न खाणार्‍या फायटर पायलट च्या स्वप्नामुळे हा देखील एक "हुकलेला" गडी आहे हे सुमारे २-३ मिनिटंमधे कळतेच. ड्वेन शेरिलचा पहिल्या लग्नापासूनचा मुलगा.

या कुटुंबाबरोबर राहतो रिचर्डचा बाप. पिताश्रीना त्यांच्या वानप्रस्थाश्रमातून हेरॉइन-सेवनामुळे नारळ मिळाल्यामुळे यांची खाट सुद्धा इथेच.

ऑलिव्ह् ही सात वर्षांची दुसरी मुलगी. ऑलिव्हला नृत्याचा छंद आहे असे संभाषणातून कळते. एकूण वयोपरत्वे थोडी अबदुल् गबदुल वाटेल अशा या गोंडस , निरागस मुलीच्या मनात मनात स्वत:च्या बांध्याबद्दल या वयातच गंड निर्माण करण्याचे काम तिचा "फाडफाड यशस्वी" बाप करत राहतो.

तर चित्रपट आहे या मंडळींच्या एका प्रवासाबद्दलचा. हे सारे जण एका रविवारी ऑलिव्हच्या नृत्याच्या स्पर्धेकरता साधारण ७००-८०० मैल जातात. बस्. हाच एक धागा. एखाद्या "नॉर्मल्" कुटुंबाच्या बाबतीत हा प्रवास एकदम नॉर्मल आणि म्हणून कंटाळवाणा ठरला असता. उदाहरणार्थ :

१. "नॉर्मल्" अमेरिकन कुटुंबातल्या लोक इतक्या अंतरावर अशा स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी विमानाने गेले असते. अशा प्रवासाकरता तेव्हढे पैसे त्यांच्याकडे असते.

२. "नॉर्मल्"कुटुंबाने रस्त्याने प्रवास केला असता तर त्यांची गाडी बंद पडणारी जुनाट नसती. बंद पडलीच तर धक्के मारूनच चालू करण्याइतपत अवस्था दयनीय नसती.

३. या प्रवासात एकूण वातावरण खेळीमेळीचे असते. ऑलीव्ह वगळता प्रत्येकाने एकमेकांच्या अपयशाची क्रूर चेष्टा उडविली नसती.

४. यशस्वितेच्या बड्या बाता मारणार्‍या कुणाला नेमके या प्रवासादरम्यानच सर्वात मोठ्या अपेशाची बातमी न कळती. आणि या अपेशामुळे आपण , आपले कुटुंब खंक झालेय हे पाहण्याची वेळ न येती.

५. आत्महत्येच्या प्रभावातून पुरते बाहेरहि न पडलेल्या फ्रॅंकला आपल्या प्रेमपात्राच्या सध्याच्या प्रियकराला भेटावे न लागते. आणि आपल्या प्रेमपात्राला त्याच्याबरोबर आपल्याबद्द्ल कुत्सितपणे बोलताना पहावे न लागते.

६. हेरॉईनवीर आजोबा ओव्हरडोसमुळे न मरते. त्यांची बॉडी हॉस्पिटलातून पळवून आपल्याबरोबर नेण्याची नौबत सार्‍यांवर न येती.

७. आणि ज्या नृत्याकरता हा सगळा व्याप केला ते नृत्य म्हणजे ....... शरीरविक्रय करणार्‍या बायकांचे नसते. आपल्या निरागस नातीला त्या "गुणवान्" आजोबाने हे शिकवलेले असते !

हे सर्व कथानक सांगूनसुद्धा अनेक छोटे छोटे मार्मिक प्रसंग, व्यक्तिविशेष मी येथे टिपलेले नाहीत. आणि सगळा अनुभव कथानकात कसा एकवटता येणार !

ए़कूणच हा सारा चित्रपट एक अनुभूती देतो एखादे शोकात्म नाटक पाहण्यची किंवा एखादी "जी ए" कथा वाचण्याची. माणसाच्या स्वभावधर्मावर , त्यातील विसंगतीवर , अपयशावर , त्यातून निर्माण होणार्‍या शोकांतिकेवर आणि चक्क विनोदावर केलेले हे भाष्य आहे.
प्रत्येक नटाचे काम अस्सल. आणि ती व्हॅन् ! ती सुद्धा एक पात्रच !

अनेक वर्षात असे काही वाचले , पाहिले नव्हते. चित्रपट पाहिल्यावर विकीची एंट्री चाळून पाहिली. ऐंशी लाखात बनविलेल्या या पटाने धंदा केला चक्क १० कोटींचा ! हे ऐकून सुखद आश्चर्य वाटले. बाकी या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले , बहुतांश टीकाकारानी त्याला नावजले याचे मात्र आश्चर्य वाटले नाही.

आजकाल हॉलीवूडमधे असे चित्रपट मिळणे मुश्किल आहे असे मला वाटते. (बॉलिवूड दूरची बात ! )

बघायला हवा

हंम्म्
मुक्तसुनित ने रेकमेंड केलाय म्हंटल्यावर 'बघायाचा' या यादीत टाकतो.
बघायला हवा असे वाटते आहे. :)

आपला
गुंडोपंत

द होन्कीटोन्क मॅन

एक अत्यंत वेगळा (क्लिंट ईस्टवूड) चित्रपट. अमेरिकेच्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर घडणारा एक प्रवास.
पहाण्यालायक. मनावर धुळीची पुटे चढवून जातो.

काही कथा द्या ना...

विसुनाना,
अहो काही कथा तर द्या ना...
अगदी २ ओळीतच आटोपले तुम्ही...

आपला
गुंडोपंत

लेटर्स फ्रॉम इवो जिमा

फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स आणि लेटर्स फ्रॉम इवो जिमा या जोडगोळीतला हा चित्रपट. नुकताच पाहिला. अवश्य पाहण्यालायक. मनावर विषण्णतेची गडद छाप सोडून जातो.

फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स त्यामानाने किंचित कमी. दोन्ही चित्रपट ईस्टवूडचेच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हॉन्कीटॉन्क मॅन

आजच पाहिला. हा चित्रपट सुचविल्याबद्दल श्री. विसुनाना यांचे मनःपूर्वक धन्यवाद. वेस्टर्न स्टाईलचा हा चित्रपट फार चांगला आणि अर्थपूर्ण आहे. ईस्टवूडचे नंतर आलेले चित्रपट हे अधिक पॉलिश्ड प्रेझेंटेशन असलेले आहेत. हा चित्रपट ईस्टवूडच्या एका प्रगल्भ दिग्दर्शकाकडे होणाऱ्या प्रवासातील सोनपावले आहेत याची पदोपदी जाणीव चित्रपट पाहताना होते. मानवी नातेसंबंध, मृत्यू, वेदना अशा मूलभूत गोष्टींवर ईस्टवूडला चित्रपट करावेसे वाटतात हे आपले भाग्यच.

चित्रपटातील गाणी अतिशय सुंदर आहेत. मी ओरिजिनल साऊंडट्रॅक शोधायचा प्रयत्न केला पण कुठे मिळाला नाही. ईस्टवूडच्या सर्वच चित्रपटांमधील बॅकग्राऊंड साऊंडट्रॅक-गाणी फार छान असतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हे नि झा यि कि

हे नि झा यि कि

काल हे नि झा यि कि (Together - He Ni Zai Yi Qi) टुगेदर हा सुरेख चीनी चित्रपट पाहिला.
लु झाउचूं हा अतिशय टॅलेंटेड फक्त तेरा वर्षांचा मुलगा व्हायोलिन वाजवत असतो.
या वाजवण्याची सुरुवात त्याने वयाच्या तिसर्‍या वर्षीच केलेली असते. त्याचे वडील लु चें नी त्याला चीन च्या ग्रामीण भागातील छोट्यागावात वाढवलेले असते.
हे नि झा यि कि3
एक दिवस वडिलांना पत्र येते बिजिंग मध्ये एका स्पर्धेला येण्यासाठी लु झाउचूं ला निमंत्रण आलेले असते. वडिलांना वाटते की बिजिंग मध्ये आप्ल्या मुलाला मोठी संधी मिळेल. त्याला तेथे यश मिळेल. ते जाण्याचा निर्णय घेतात. आपले जमवलेली सगळी ठेव घेवून या प्रवासाला निघतात. बिजिंगच्या भल्यामोठ्या स्टेशनवर त्यांची चुकामूक होते. पण शेवटी ते परत सापडतात. त्या स्पर्धेत तो अधिकृत रीत्या पाचवा येतो. मात्र त्याचवेळी तेथे एक असलेला परिक्षक हा मुलगा खरं तर पहिला यायला हवा होता असं म्हणतांना त्याचे वडील ऐकतात. मग ते त्या शिक्षकाला गळ लु झाउचूं शिकवावे यासाठी घालतात. शेवटी कसाबसा तो शिक्षक तयार होतो.
हे नि झा यि कि
लु झाउचूं पण उत्साहाने शिकवणी घ्यायला लागतो. त्याच वेळी त्यांच्या घरा शेजारी राहणारी एक मुलगी लु झाउचूं ला व्हायोलिन वाजवण्यासाठी बोलावते. त्याला त्या साठी पैसेही देते.
लु झाउचूं चे आयुष्य बदलते. तो आपल्या असफल प्रेमाने निराश झालेल्या शिक्षकाला निराशेतून बाहेर काढतांना शिक्षण घेत असतो.

मात्र पुढे काय होते ते प्रत्यक्षच पहा. वडिलांचे काम करणारा नट अप्रतिम काम करतो. त्याची लु झाउचूं ला यशस्वी करण्याची धडपड अतिशय सुरेख उतरवली आहे. चित्रपट पाहतांना लु झाउचूं चा इतिहास अचानक समोर येवून जातो. युं तांग् ने व्हायोलिन वाजवण्यापासून सगळीच कामे उत्कृष्ठ केली आहेत.

वडिलांना यश हवे असते पण लु झाउचूं मात्र संगितावर प्रेम करतो. हा झगडा अप्रतिम आहे.

शिवाय लिलि चे काम करणारी हाँग चेन पण मस्तच आहे. हे नि झा यि कि4

Together (He Ni Zai Yi Qi)
प्रभु - लु झाउचूं = युं तांग् (मुलगा)
लू चेंग = पेकी लू (वडील)
इ.स. - २००२
भाषा - चीनी
लेखक - केज चेन व झाओ लू झे
दिग्दर्शक - केज चेन

अर्थात नेहमीप्रमाणेच एस बी एस कृपेने इंग्रजी टायटल्स सहीत! :)

-निनाद

अजून

काल अजून स्पॅनीश सिनेमा - एव्हरी स्ट्युवर्डेस गोज टु हेवन पाहिला.
शिवाय वेंद्रेदी स्वा (vendredi soir) हा फ्रेंच.

परिक्षणे टाकतो आजकडे...
-निनाद

ल पॅपिलिआँ

ल पॅपिलिआँ
(फुलपाखरू) हा फ्रेंच सिनेमा कुणी पाहिलाय का?
मला आजच रेकमेंड झालाय हा एक वेगळा सिनेमा म्हणून.

आता मिळवायचा प्रयत्न करतो...

-निनाद

पॅपिलॉन

बर्‍याच पुर्वी एका कादंबरीचे मराठी भाषांतर 'पॅपिलॉन' (अर्थः फूलपाखरू) या नावाचे वाचले आहे (भाषांतर बहुतेक रविंद्र गुर्जर, नक्की आठवत नाहि. पुस्तक चांगले ५००+ पानांचे जाडजूड होते हे आठवते :) याच नावाचे इंग्रजी पुस्तक परवा लायब्ररीत पाहिले).
अतिशय सुंदर पुस्तक.... एक कैदी आठवेळा तुरूंगातून निसटु पाहतो त्याच्या प्रत्येक निसटण्याची काहणी आहे.. त्यावरच आहे का हा चित्रपट?

(पॅपिलॉन) ऋषिकेश

पॅपिलॉन नाही!

ते पॅपिलॉन मी पण वाचलेय
मस्तच पुस्तक. आता आठवण काढल्याने परत वाचावेसे वाटले .
हा चित्रपट आहे. एका लहान मुलीचे भावविश्व दाखवणारा. शोधतोय आता...

एकदा सिनेमा कळला, कळवला की पाहिल्या शिवाय रहावत नाही. :-)

कथा कशी आपल्यात खेचून घेते,
दिग्दर्शक कुठे सिनेमात जाणवतोय,
फोटोग्राफी कशी आहे,
एंगल्स काय आहेत.
संगित काय जाणीव देतं
पात्र आपल्या अनियंत्रीत हालचालीतून काय सांगतात

हे सगळं मला सारखं सारखं अनुभवण्यासारखं शोधावसं वाटतं.
किंवा या वेगवेगळ्या देशा-भाषां मधल्या वेगळेपणाचीच गोडी लागली आहे असंही म्हणायला हरकत नाही.

-निनाद

हो

पॅपिलॉन फारच छान होते.
नारळांचा तराफा... प्रयत्न कदापी न सोदणारे मन.

खूप सूडाचे विचार कर करकरून शेवटी त्याचे न्यायाधीशाला व वकिलाला माफ करून टाकणे.
त्याला त्या आदिवासी(?) टॉळीमध्ये सामावून घेतले जाणे व त्याचा तो सोडून जाण्याचा निर्णय.
कुष्ठरोग्यांच्या वसाहती मधले राहणे.
या सगळ्याने काही काळ अगदी भारलेला गेला आहे आयुष्यातला.
आता मोटोर सायकल डायरीज पाहतांना त्याची आठवण झाली होती.
या पुस्तकाचा दुसरा भागही आला होता ना...

बँको नावाने?

आपला
गुंडोपंत

प्राईड ऍन्ड प्रेज्युडिस

प्राईड ऍन्ड प्रेज्युडिस.. एक अजरामर कथा.. यावर अनेक चित्रपट अनेक भाषांत येऊन गेले. मी त्यातील अजून पर्यंत (माझ्या आठवणीनुसार) ७ पाहिले आहेत. आणि इथुन लायब्ररीतून गेल्या महिन्यात ६ सिडीजचा संच आणला. बी बीसी ने एक ५ तासांचा पट या कादंबरीवर बनवला आहे. हा पट पाहिल्यावर हीच ती लिझी आणि हाच तो कादंबरीतील डारसी असे वाटून गेले. त्याकाळातील कंट्रीमधील निसर्ग, वेगवेगळ्या परगण्यातील (काऊंटीज) तुलना वगैरे बारिकसारीक गोष्टी यात टिपल्या आहेत. यातील त्याकाळातील ड्रेसेस वगैरे तर मनमोहक आहेतच पण याहि पेक्षा तेव्हाची इंग्रजी मनावर गारूड करते.
मला हा संच इतका आवडला की मी कालच या सिडीज विकत घेतल्या (भारतात रु. ५००)
इथे ट्रेलर आणि काहि फोटु टाकतो आहे.. पण् कहाणी माहित असली तरी चित्रपट पहाच
प्राईड ऍन्ड प्रेज्युडिस

सही

हे पुस्तक फार पूर्वी वाचलं होतं, पण बहुधा वाचताना खूप अपेक्षा ठेवून वाचल्यानं अपेक्षाभंग झाला असावा. तुला जमल्यास एखादा लेख नक्की लिही या संचावर.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

दूरदर्शनवरची "तृष्णा" मालिका

याच कादंबरीवर आधारित होती. लहानपणी ती मला आवडायची. पण आता तिच्यातले काहीच आठवत नाही... ती चांगली होती का, भारतीय समाजाच्या पार्श्वभूमीवर तिचे रूपांतर कितपत चांगले होते, काही म्हणजे काही आठवत नाही...

तृष्णा

तृष्णा मीही बघायचो. यात किट्टू गिडवानी नायिका होती एवढेच आठवते. :)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

किट्टू

किट्टू गिडवानी मलाही आवडायची.
आताशा दिसतच नाही कुठे.
अर्थात कार्यक्रमही अति झालेत म्हणा...
आपला
गुंडोपंत

सेन्स अँड सेन्सिबिलिटी

प्राईड ऍन्ड प्रेज्युडिस आवडला असेल तर जेन ऑस्टीनच्याच कथेवर आधारित सेन्स अँड सेन्सिबिलिटीही आवडेल. एम्मा थॉम्पसनची उत्कृष्ट पटकथा आणि अभिनय, आणि क्राउचिंग टायगरवाल्या अँग लीचे दिग्दर्शन.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

त्रोटक

हा चित्रपट पाहिला आहे.. पण फारच त्रोटक वाटला.. म्हणजे.. जेन ऑस्टिनचं पुस्तक आणि हा चित्रपट बरीच फारकत ठेऊन वागतात :)
जेन ऑस्टीनचे (माझ्यामते) सर्वात प्रमुख वैषिश्ट्य म्हणजे मानवी चित्रण आणि कंगोरे.. सेंन्स आणि सेंन्सिबिलिटिमधल्या दोन बहिणी (एक सेन्सिबल तर दुसरी सेन्सिटिव) पुस्तकात जितक्या "भेटतात" तितक्या या चित्रपटात नाहि. याच कादंबरीवर याच नावाचा एक ब्लॅक ऍन्ड व्हाईट चित्रपट एका ठिकाणी अर्धा पाहिला होता.. तोहि नव्हताच आवडला म्हणा :(

(वर सांगितलेली फिल्म ५ तासांची असल्याने प्रत्येक बारकावा इतक्या सुंदरपणे टिपलाय की त्या महाकथेला उत्तम न्याय मिळतो असे वाटते :) )

हम्म

मी मूळ पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे याबद्दल माहिती नाही. कदाचित अडीच तीन तासांमध्ये बसवताना असे झाले असावे. :)
पण अँग लीचे दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांचा अभिनय सुरेख वाटला. अँग लीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चित्रपटातील फ्रेम्समधून त्याचे अस्तित्व जाणवते. यातील एक प्रसंग फारच सुरेख आहे. केट विन्सलेटचे आई आणि बहीणींशी बिनसते आणि ती आपल्या खोलीत जाते. आई रडत दुसर्‍या खोलीत, छोटी बहीण आपल्यावर सर्व रागावले म्हणून तिसरीकडे. राहते फक्त नायिका. तिच्या हातात बहीणीसाठीचा चहाचा कप असतो, तो ती स्वतःच पायरीवर बसून घ्यायला लागते. यावेळेस कॅमेरा वर आहे. सर्व दारे बंद, पायरीवर पाठमोरी एम्मा थॉमसन, आणि तिच्या हातातील कपात बदामी रंगाचा चहा, एकदम सुरेख फ्रेम जमली आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

वा वा!!

कदाचित अडीच तीन तासांमध्ये बसवताना असे झाले असावे. :)

मलाही असेच वाटले :)..

सर्व दारे बंद, पायरीवर पाठमोरी एम्मा थॉमसन, आणि तिच्या हातातील कपात बदामी रंगाचा चहा, एकदम सुरेख फ्रेम जमली आहे.

वा वा!! अप्रतिम शीन!! आठवण करून दिल्याबद्दल धन्यु!

बाकी जेन ऑस्टिनच्या "एमा" वर चित्रपट आहे का? मी अजून बधितलेला नाहि. तेही पुस्तक ग्रेटच :)

आहे ना

बाकी जेन ऑस्टिनच्या "एमा" वर चित्रपट आहे का? मी अजून बधितलेला नाहि. तेही पुस्तक ग्रेटच :)
एमावर टीव्ही सीरीज आणि चित्रपट दोन्ही आहेत. दोन्ही पाहिलेले नाहीत. :)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

एमा

आताच एमा शोधून बघितला... आवडला :) .. सवडिने लिहिनच :)

इथे पहा

सेन्स अँड सेंसिबिलिटी इथे पाहु शकता

विट

धागा वर आला आहे तर त्या निमित्ताने एम्मा थॉमसनचा विट हा चित्रपट आठवला. इंग्रजी साहित्य शिकवणारी एक प्राध्यापिका, एम्मा थॉम्पसन. आत्तापर्यंत बरेचदा साहित्यातील मृत्यूचे स्थान, कवी/लेखकांची वर्णने याबद्दल तिने व्याख्याने दिली आहेत. कर्मधर्मसंयोगाने तिला खर्‍या आयुष्यात तरूणपणीच मृत्यूला सामोरे जावे लागते. तो प्रवास म्हणजे हा चित्रपट. बघायलाच हवा असा.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

उत्सुकता

राजेंद्रा,
इतके छान वर्णन करून माझी उत्सुकता जागृत केली माझी.
वा दृष्य अगदी डोळ्यासमोरच आलंय माझ्या.

आपला
गुंडोपंत

पीबीएस वर दिसणार आहे /वेळापत्रक

माझ्याकडेही हा संच आहे - मला आवडला.

एक चांगली गोष्ट म्हणजे पीबीएस ही अमेरिकेतील वाहिनी अनेक जुन्या कादंबर्‍यावरील चित्रमालिकांचे प्रसारण मागच्या महिन्यापासून करते आहे.

पीबीएस वरचा दुवा

प्रसारणाचे वेळापत्रक खालील दुव्यावर -
वेळापत्रक

असं

वा बरेच नवीन पिच्चर आहेत इथे. ऐकलेही नाही मी कधी ते.
असं चॅनल आप्ल्याकडे सुरु झालं तर बरे होईल नाही?

शिवानी

हो

अगदी खरे आहे.
म्हणूनच मी चर्चा सूरु केली... तेच ते हिंदी इंग्रजी सिनेमे काय बघायचे.?
हिंदी वाले सारखे प्रेमात पडणार... इंग्रजी वाले सारखे जग वाचवत बसणार.
छ्या!

आपला
गुंडोपंत

हा हा हा

हिंदी वाले सारखे प्रेमात पडणार... इंग्रजी वाले सारखे जग वाचवत बसणार.

:):):))))))))))

एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन

एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन (Todas las Azafatas van al cielo) Every Stewardess Goes to Heaven
हा स्पॅनीश चित्रपट पाहिला.
काहीशी विनोदी दक्षिण अर्जेंटीन मध्ये घडणारी कथा.

एक नुकताच विधूर झालेला तरूण डॉक्टर आपल्या दिवंगत पत्नीची रक्षा समुद्राच्या खाडीत टाकण्यासाठी येतो. ती स्ट्युर्डेस असते.
तो ही आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतो.
त्याचवेळी त्या विमानात असणारी स्ट्युर्डेस पण एका प्रकरणातून प्रेग्नंट असल्याने आत्महत्या करण्याचा विचार करत असते.
त्याचवेळी बॉम्बची अफवा पसरल्याच्या कारणाने सगळी उड्डाणे रोखली जातात. ते एकमेकांच्याच शेजारच्या रूम्स मध्ये राहतात.
स्ट्युर्डेस आधार देणारी एक वेश्या भेटते. ती तीला मानसिक आधार देते.

दुसर्‍या दिवशी हे दोघेही आत्महत्या करण्यासाठी बर्फात उभे असतात व एकमेकांना पाहतात. व त्यांची ओळख होते.
गप्पा मारतांना एकमेकांच्या प्रेमात पडावे की न पडावे अश्या संभ्रमांत असतात.
दुसर्‍या दिवशी विमान वाहतूक परत सुरु होते. स्ट्युर्डेस हे प्रकरण मला नको म्हणून त्याला झिडकारून निघून जाते.
एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन1

विमानतळावरच्या सिग्नलमनच्या छोट्या मुलीची ओळ्ख या डॉक्टरशी होते.
ती त्याला आपले वडील दर वेळी विमान उतरले की त्याचा एक भाग चोरून आणतायेत व घरीच विमान बनवतायेत असे बरेच किस्से सांगते व तुझ्या गर्लफ्रेंडला मी ओळखते असेही सांगते.
डॉक्टर परत जायला निघतो पण त्याचा अपघात होतो. ४ महिने हॉस्पिटलमध्ये काढतो. त्याला कळते की त्याला बघायला म्हणून एक मुलगी येवून गेली आहे. तो परत त्या स्ट्युर्डेस चा शोध घ्यायला लागतो. स्ट्युर्डेस आधार देणारी वेश्या यालाही भेटते. ती त्याला तीच्या विषयी सांगते.
मध्ये बर्‍याच गोष्टी घडतात. त्या सिग्नलमन चे विमान उड्डाण यशस्वी होते.
पुढे शेवट काय होतो हे पडद्यावरच पहा. अनपेक्षित वगैरे नाही.
एकुण चित्रपट वेगळाच आहे.

एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन

हा सिग्नलमन डॉक्टरला भेटल्यावर एका प्रसंगात म्हणतो की, "मी हे विमान माझ्या मुलीसाठी बनवतोय. मी काही आता रिकिमार्टीन ऐकण्याच्या वयात नाही पण आमच्या नात्यात काही तरी पॅशन तर असली पाहिजे असे मला वाटते. हा माझा विमानाचा प्रयोग व त्याची गुप्तता हा त्यातला मोठा भाग आहे."
त्या करामती सिग्नलमनची भूमीकाही छान आहे. त्याच्या मुलीनेही मस्त रंगवली आहे भूमीका.
मात्र मुख्य नायिका इन्ग्रिड रुबियो मक्ख वाटते. त्यापेक्षा जाडाजूडा डॉक्टर अल्फ्रेदो कॅसेरो चांगले काम करून जातो. बाकी काही समुद्रावरच्या फ्रेम्स सुरेख आहेत.

दिग्दर्शक : डॅनियल बर्मन
लेखक : डॅनियल बर्मन व एमिलोयानो तॉरेस (परत लेखक दिग्दर्शक एकच!)
इ.स.: २००२
भाषा: स्पॅनीश
सांता फे फिल्म फेस्टिव्हलचे लुमिनरिया Luminaria ऍवॉर्ड /त्रुवा इंटरनॅशनल चे गोल्डन डॉल्फिन Golden Dolphin मिळाले.
इंग्रजीमध्ये येथे रिव्यु आहेच http://www.plume-noire.com/movies/reviews/everystewardess.html

-निनाद

डिलिव्हरी

डिलिव्हरी नावाचा एक ग्रीक सिनेमा आहे.
हा फुकट काय कुणी पैसे देवून बघायला सांगितले तरी पाहु नका.
इतका भीक्कार निराशावादी सिनेमा मी अजून पाहिला नव्हता!

इतक्या भीकार सिनेमाला व्हेनीस फिल्म फेस्टीवलचे गोल्डन लायन अवॉर्ड मिळाले आहे हे पाहून मला मोठाच धक्का बसला. म्हणजे उद्या मलाही एखादा सिनेमा काढायला हरकत नाही.
याशिवायही काही अवॉर्डस मिळाले आहेत...

दिग्दर्शकः निकोस पॅनयोटोपोलोस
लेखकः निकोस पॅनयोटोपोलोस
इ.स.: २००४
भाषा: ग्रीक

स्टोरीलाइनही देण्याची माझी इच्छा नाही.
अगदीच वाचावेसे वाटत असेल तर रिव्यु येथे वाचा
http://www.greekfilmfestival.com.au/filmfestival05/sydney/films/film_del...

-निनाद

वेंद्रेदी स्वा

वेंद्रेदी स्वा (vendredi soir) हा फ्रेंच सिनेमा पाहिला.
कथावस्तु साधारणपणे अशी आहे.

शुक्रवारची पॅरिसमधली रात्र. लौरा आपल्या अपार्टमेंट मधली आवरा-आवरी करते. ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत आता रहायला जाणार असते. ती आपल्या गाडीत बसून डिनरसाठी बाहेर पडते. रस्त्यावर आल्यावर तीला कळते की ती आज पब्लीक ट्रासपोर्टचा संप आहे. त्यामुळे सगळीकडे मोठा ट्रॅफिक जाम! ना ती पुढे जाउ शकते ना ती घरी जाउ शकते. तसेच तीचे आयुष्यही काही काळासाठी थबकते.

वेंद्रेदी स्वा2

रेडियोवर आवाहन होते की जमेल तशी लोकांना लिफ्ट द्या.
ती रस्त्याने जाणार्‍या 'जीन'ला पाहते. तो तीच्या काचेवर टकटक करतो. ती लिफ्ट तर देते पण गाडी हलतच नाही. शेवटी गाडी सोडून देतात. पायी आपल्या मित्रांच्या भेटी गाठी करत फिरत असतांनाच एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढते. ही छोटीशी भेट अर्थात रात्रीच्या शॄंगारात बदलते.

एकमेकांच्या आयुष्यातले इतर कोणतेही संदर्भ न येता दोघे पॅरिस मधल्या एका साध्याशा हॉटेलमध्ये रात्रीचा आनंद लुटतात. (कंटेंपररी फ्रेंच सिनेमा मधे "कोणतेही संदर्भ न येता "हा भाग महत्वाचा झाला आहे आजकाल.)

या सिनेमाची फोटोग्राफर एक स्त्री आहे. त्यामुळे शॄंगाराचे चित्रण वेगळ्याच एंगल्सनी होते आहे हे मात्र नक्कीच जाणवले.
किंवा काही ठिकाणी कॅमेरा स्थिरावतो आहे हे ही जाणवत राहते. हातांची पकड चेहर्‍यावरचे भाव.
वेंद्रेदी स्वा1
शिवाय अबोल क्षण... सिनेमातील पात्रे प्रणयात खूप काळ अबोलपणे घालवतात. चटोर प्रणय पण शारीर न करता केलेली वेगळीच फोटोग्राफी.

सकाळी लौरा उठते सगळा ट्रॅफिक जाम आता संपलेला असतो. रस्ते मोकळे आ॑हेत. औरा आता एक नवी व्यक्ती बनून एक वेगळेच मुक्ततेचे हास्य घेउन बाहेर पडते व नव्या दिवसाकडे निघून जाते...

अशा वन नाईट स्टँड मधून स्त्री पारंपारीकतेतून मुक्ततेकडे जाते आहे असा काहीसा भाग(?).

पॅरिस चे चित्रण नेहमीपेक्षा खूपच वेगळे आहे. काहीसे अनोळखी भासणारे आहे.

चित्रपट मी आधी दिलेल्या अ पॉर्नोग्राफिक अफेयर ला अगदीच समांतर आहे. यापुढे पॉर्नोग्राफिक अफेयर खूपच सुरेख आहे.

दिग्दर्शक :क्लेर डेनीस
लेखक : एमॅन्युएल बर्नहेम
इ.स. २००२
भाषा : फ्रेंच
प्र.भू. : वालेरी लेमर्सियर
विंसेंत लिंदाँ

२००४ चे क्लोत्रुदीस अवॉर्ड सिनेमॅटोग्राफीसाठी ऍग्नेस गोदार्दला मिळाले

-निनाद

मलेना

मलेना malena नावाचा झकास इटालियन चित्रपट पाहिला.
१३ वर्षाच्या इटालियन मुलाचे भावविश्व व कामविश्व... काहीच्या काहीच भन्नाट आहे चित्रपट....

लिहितो लवकरच!

-निनाद

नो कंट्री फॉर ओल्ड् मेन

ह्यावर्षॉच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये ८ नामांकने मिळालेला हा चित्रपट नुकताच पाहिला. वाळवंटात गर्दचा व्यवहार फिसकटतो आणि एक थरारक चित्रपट घडतो. चित्रपटाला बरीच चांगली परिक्षणे मिळाली आहेत पण मला तरी समजायला जरा जडंच गेला. टॉमी ली जोन्सने एका छोट्या गावातील शेरिफची भुमिका मस्त वठवली आहे पण त्याच्या संवादांना ८० च्या ग्रामिण टेक्सस मधील इंग्लीशचा इतका ऍक्सेंट आहे की जो भुमिकेला साजेसा असला तरी मला कळायला फारच अवघड गेला (अर्ध्याच्या वर कळलाच नाही :) तुमच्यापैकी कुणी बघीतल असेल तर कसा वाटला ते सांगा.

नाही

नाही पाहीला हा,
हॉलिवुडपटांपासून सध्या इतका दूर गेलो आहे की
पडद्यावर इंग्लिश ऐकले तरी कसेतरीच वाटते :-))

-निनाद

पर्सोना

आता मला आता इन्मार बर्गमन ने दिग्दर्शित केलेला पर्सोना बघायचाय.
हा १९६६ मध्ये आला होता.
पाहुया मिळतो का.
कथा मला तरी चांगली वाटते आहे आणि शिवाय इन्मार बर्गमन हे नाव... मोठं नाव!

-निनाद

वॉर्म वॉटर अंडर अ रेड ब्रिज

वॉर्म वॉटर अंडर अ रेड ब्रिज हा जपानी सिनेमा

बरा होता. अगदी काही मजा आली नाही बघायला.

आपली नोकरी व कुंटूंब गमावलेला योसुके टोक्योच्या रस्त्यावर येतो. त्याला म्हातारा टॅरो भेटतो. काहीसा तत्त्वज्ञ असणारा हा माणूस त्याला सांगतो की नोटो या समुद्र किनाऱ्यावरच्या गावात लाल पुलाजवळच्या एका घरात खजिना लपवलेला आहे. टॅरोने तेथे क्योटो येथून चोरलेला सोन्याचा बुद्ध लपवलेला असतो. म्हातारा टॅरो अचानकपणे मेल्यावर योसुके हा खजिना शोधायला निघतो. शहरात पोअल्यावर तो एका सुपर मार्केट मध्ये जातो. तिथे तो एका मुलीला भुरटी चोरी करतांना पाहतो. ती मुलगी तेथून निघून गेल्यावर त्याला तिथे तीच्या कानातले सापडते. शोधाशोध करत त्याला 'ते' त्याला घर सापडते पण तेथे एक म्हातारी तीच्या तरूण साएको नावाच्या नातीसोबत राहत असते. हीच ती भुरटी मुलगी असते. योसुके तीची जवळीक तयार होते. साएकोला एक प्रॉब्लेम असतो, तीचे प्रणयातले एजॅक्युलेशन चक्क बादलीने पाणी ओतावे तसे वाहत असते. या पाण्याची एक खासियत असते. यामुळे कोणताही ऋतू नसतांनाही फुले फुलतात. तसेच समुद्रातले मासे पोहोत नदीमध्ये येतात व त्यासाठी गोळा होतात.

वॉर्म वॉटर अंडर अ रेड ब्रिज

योसुके ला एका मच्छीमार होडीवर काम मिळते व तो त्याच शहरात राहण्याचा निर्णय घेतो. साएकोसोबत होत असलेल्या प्रणयाने साएको 'बरी' व्हायला लागते. त्याचवेळी अजून एकजण या बुद्धाची चौकशी करायला टोक्योहून तेथे येवून पोहोचतो. त्यातच एका गँगलाही या सगळ्याचा सुगावा लागतो. पुढे सगळी पळापळ पडद्यावरच पाहा.

शोही इमामुरा चा हा शेवटचा सिनेमा होता.

काहीसा विनोदी वेगळाच व चमत्कारीक पण आजच्या जपानचे बरेचसे चित्रण करणारा एक बरा सिनेमा इतकेच.

दिग्दर्शकः शोही इमामुरा
इ.स.: २००१
लेखक: यो हेन्मी व शोही इमामुरा
भाषा: जपानी
प्र.भू.. : कोजी याकुशो, मिसा शिमीझु

-निनाद

ल पॅपिलिआँ

ल पॅपिलिआँ मिळाला!!!
मस्तच आहे, अमेझिंग...
खुपच आवडलाय मला. खुप दिसांनी इतके सुरेख काहीतरी बघायला मिळाले.
नक्की लिहितो लवकरच त्या विषयी...

-निनाद

लूंदी मातीन

लूंदी मातीन (मंडे मॉर्नींग) हा फ्रेंच सिनेमा पाहिला.
काहीसा विनोदी.
एका लहान गावातला विंसेंट हा साधारण पन्नाशीचा माणूस रोजच्या कारखान्यात वेल्डर असण्याच्या दिनक्रमाला कंटाळून चित्रकार होण्यासाठी व्हेनीसला पळून जातो.
मग त्या सगळ्या घटनाक्रमात काय काय घडते याचे काहीसे विनोदी चित्रण आहे.
विनोदाला लागणारे बरेचसे घटक जसे, बायकांना न्याहाळणारा पॅरिश मधला धर्मगुरू, नागड्या नन्स, बगीच्यात येणारी मगर वगैरे भरपूर आहेत. पण सिनेमा खदखदवून हसवत नाही. संथपणे कथा घडत जाते.
लूंदी मातीन

लेखक/दिग्दर्शक :ओतर लॉसेलियानी
इ.स.: २००२
भाषा: फ्रेंच
प्रभू:जॅके बीदू
ऍने क्राव्ज-तर्नव्स्की
बर्लीन इंटरनॅशनल फिल्म महोत्सवात ओतर लॉसेलियानीला फ्रिपेस्की ऍवॉर्ड शिवाय गोल्डन बर्लीन बेर साठी नॉमिनेशन.

-निनाद

निनाद याना दंडवत् !

तुमची परीक्षणे उत्तम असतातच. पण एकूण तुमची पहाण्याची क्षमता पाहून तुम्हाला सलाम करतो ! इतके चांगले चित्रपट आणि इतकी चांगली समीक्षा !

एक प्रश्न मात्र विचारतो. गैरसमज करू नका. पण इतके चित्रपट पहाताना , चांगल्या चित्रपटाचा परिणाम मुरवणे कदाचित जमत नसेल्, नाही का ? म्हणजे , एखाद्या चांगल्या चित्रपटाचा मनावर उमटणारा एक संस्कार असतो. एकामागोमाग इतके पहाताना या घटकावर थोडा अन्याय होतो का ?

कधी कधी

होते ना तुम्ही म्हणताय तसे घडतही असेल.

कधी कधी चांगला सिनेमा असेल तर २ वेळा पाह्तो.
एखादा सिनेमा इतका आवडतो मी त्यावर काहीच लिहू शकत नाही...
जसे सध्या ल पॅपिलिआँ...
त्याच्या फ्रेम्स आठवणे आठवतच राहणे, संवाद आठवणे.... भाव... कथा, नयन रम्य चित्रण सगळे काही मनात अगदी रूतून बसले आहे.
ती आईच्या प्रेमाला आसूसलेली छोटीशी मुलगी आणि तिरसटराव म्हातारा जुलियाँ. त्याचे एकदम टिपिकल फ्रेंच स्लँग मध्ये नो! नो!! ए नो!! म्हणणे.

किंवा त्या छोटीचे हे फुलपाखरू कोणत्या "ब्रँडचे" आहे हे विचारणे. हे अविस्मरणीय!
मी म्हंटले तरी बाहेर येणे होत नाहीये. त्यामुळेही नंतर पाहिलेला लूंदी मातीन अगदी साधा वाटला असेल.
अशी विचारांची मिसळही होते कधी कधी. पण मी म्हण्तो की हेच आहे तुमची कथा किती सशक्त आहे आणि ती किती परिणाम घडवू शकते हे असेही दिसूनच जाते.

तसाच इटालियन "मलेना" ही बाजूला ठेवलाय परत बघायला म्हणून.
आणि बर्गमनचा पर्सोना लिस्ट मध्ये आहे.

-निनाद

म्हणून मी

म्हणूनच मी चित्रपट पाहत नाही.
माणसाने वर्षातून एक चित्रपट पहावा अशा मताचा आहे मी.

आपला
गुंडोपंत

 
^ वर