चंद्र आणि पृथ्वी यांची फुगडी

'पृथ्वीभोंवती फिरता फिरता सूर्याभोंवती परिभ्रमण करण्याचा चंद्राचा अवकाशातील मार्ग' कसा आहे याबद्दल मी मागील लेखात लिहिले होते. एवढा मोठा मथळा वाचून त्यानंतर खाली काय लिहिले आहे ते कदाचित कोणी वाचणार नाही अशी भीती वाटल्यामुळे मी शीर्षकात थोडी काटछाट करून ते 'चंद्राच्या आकाशातील भ्रमणाचा मार्ग' एवढेच ठेवले होते. चंद्राचा हा मार्ग पूर्वीपासून असलेल्या माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळा निघाला होता. त्यातला सूर्याभोंवती फिरण्याचा भाग वगळला, किंवा पृथ्वी आणि चंद्र एका अदृष्य अशा महाकाय यानावर आरुढ होऊन सूर्याला प्रदक्षिणा घालत आहेत अशी कल्पना केली तर त्यावर तरी चंद्ग हा पृथ्वीभोंवती फिरत असेल असे कोणालाही वाटेल, कारण चंद्राचे पृथ्वीभोंवती फिरणे हा शालेय शिक्षणातून आपल्या सामान्यज्ञानाचा भाग झालेला असतो.

चंद्र पृथ्वीभोवती कां फिरतो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर आइझॅक न्यूटन यांनी विचार करायला सुरुवात केली आणि त्यावर विचार करता करता ते गुरुत्वाकर्षणाच्या
सिध्दांतावर जाऊन पोचले. (डोक्यात सफरचंद पडल्यामुळे नव्हे) हे मी माझ्या गुरुत्वाकर्षण या विषयावरील लेखात सविस्तर लिहिले होते. पृथ्वीच्या दिशेने खेचला गेल्यामुळे चंद्र आपल्या सरळरेषेतील मार्गापासून क्षणाक्षणाला अगदी किंचित असा ढळत जातो आणि अशा रीतीने वळता वळता वर्तुळ पूर्ण करून पृथ्वीभोंवती त्या कक्षेत फिरत राहतो. पण ही गोष्ट एवढ्यावर संपत नाही.

एक सोपे उदाहरण द्यायचे झाल्यास एका अवखळ वासराच्या गळ्यात एक लांब दोरी बांधून त्या दोरीचे दुसरे टोक एका मोकळ्या जागेत ठोकलेल्या मजबूत अशा खुंटाला बांधले आहे अशी कल्पना करू. त्या वासराच्या कानात वारा भरून ते चौखूर उधळले तरी त्याच्या गळ्यात जेवढी लांब दोरी बांधली आहे त्याहून दूर ते जाऊ शकत नाही आणि खुंटापासून तेवढे अंतर ठेऊन ते धांवत राहते. या उदाहरणातले वासरू दमेल, भागेल, कंटाळेल आणि पळायचे थांबेल, पण आकाशातला चंद्र मात्र अनादी काळापासून धांवतोच आहे.

वरील उदाहरणात जमीनीत ठोकलेला खुंटा तसूभरसुध्दा जागचा हलत नाही. मजबूत पायावर बांधलेली इमारत किंवा खोलवर मुळे पसरलेला वृक्ष जमीनीच्या आधारावर उभे असतात. वादळवारा, पाऊसपाणी वगैरेंनी त्यांच्यावर केलेले आघात ते जमीनीकडे पोचवतात, जमीन ते सहन करते आणि त्या इमारतीला आणि झाडाला घट्ट धरून ठेवते. पण अवकाशाच्या निर्वात पोकळीत पृथ्वीला कोणाचा आधार असतो? तिला जर कोणी ओढले किंवा ढकलले तर ती कशाला धरून आपल्या जागी स्थिर राहील? तिलासुध्दा आपल्या जागेवरून हलावे लागणारच. ज्याप्रमाणे पृथ्वीकडे ओढला गेल्यामुळे चंद्र आपली दिशा किंचित बदलतो त्याचप्रमाणे चंद्राकडे ओढली गेल्यामुळे पृथ्वीसुध्दा त्याच्या बाजूला किंचित वळते. पृथ्वी आकाराने खूप मोठी असल्यामुळे ती कमी हलते. चंद्र जर हातभर सरकला तर ती नखभर सरकेल.

फुगडी

त्यामुळे चन्द्र खरेच पृथ्वीभोवती फिरतो कां? असा प्रश्न पडतो. वर वर पाहता तसे दिसते खरे. पण चन्द्र पृथ्वीच्या केन्द्रबिन्दूभोवती फिरतच नाही असे सूक्ष्म निरीक्षणानंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. प्रत्यक्षात काय होते? चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी व चन्द्र हे एका अदृष्य आणि शून्य वस्तुमानाच्या लांब काठीने एकमेकांना एकाद्या डम्बेलसारखे जोडले आहेत असे समजले तर त्या दोघांचा मिळून जो समायिक गुरुत्वमध्य येईल त्याभोवती तो डम्बेल भोवर्‍यासारखा फिरत असतो. पण पृथ्वीचे वस्तुमान चन्द्राच्या ऐंशीपट इतके जास्त आहे आणि पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर तिच्या त्रिज्येच्या सुमारे साठपट इतकेच आहे. यामुळे हा गुरुत्वमध्याचा बिन्दू तिच्या पोटातच कुठेतरी येतो. दोघांमधील अंतर कमी जास्त होत असल्यामुळे तो बिन्दू सुध्दा एका जागी स्थिर न राहता पृथ्वीच्या पोटात आतल्या आत थोडा थोडा सरकत असतो आणि त्याभोवती पृथ्वी आणि चंद्र हे दोघे फिरत असतात. एक आडदांड सुमो पहिलवान पाप्याच्या पितरासारख्या काटकुळ्या मुलाबरोबर फुगडी घालतांना कसे दृष्य दिसेल? पहिलवान जागच्या जागीच राहील आणि तो मुलगा तेवढा त्याच्याभोवती गिरक्या घेत असलेला दिसेल. तसाच कांहीसा प्रकार इथे होतो.

चंद्राभोवती फुगडी घालतांना होणारी पृथ्वीची हालचाल ज्या कक्षेत चंद्र फिरत असतो त्या प्लेनमध्ये होते. पृथ्वीचे हे फिरणे तिच्या बाकीच्या भ्रमणांच्या तुलनेत अत्यंत सू्क्ष्म असते. ही गोष्ट फक्त या विषयाच्या अभ्यासकांनाच माहीत असते. याशिवाय पृथ्वी स्वतःभोंवती रोज एक गिरकी घेते ती तिची सर्वस्वी वेगळी क्रिया आहे. त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात, दिवस आणि रात्र यांची लांबी कमी जास्त झाल्यामुळे उन्हाळा आणि हिंवाळा होतात आणि ऋतुचक्र चालत राहते. त्या भ्रमणाचे हे परिणाम मात्र सर्वसामान्य माणसाला जाणवतात. चंद्र देखील स्वतःभोंवती फिरत असतो. त्याबद्दलची माहिती पुढील लेखात.

लेखनविषय: दुवे:

Comments

महत्त्वाची माहिती.

पॄथ्वीचे चंद्राबरोबर फिरणे हे लक्षात आले नव्हते.पाठ्यपुस्तकात या गतीचा कोणताही उल्लेख का नसावा बरे?

पृथ्वीचे हे फिरणे तिच्या बाकीच्या भ्रमणांच्या तुलनेत अत्यंत सू्क्ष्म असते.

प्रत्यक्ष परिमाणात किती?

४६७०

विकिपिडिया प्रमाणे ४६७० किमी. म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्येच्या ७३%. अगदीच् थोडे नाही. पण् दोघांमधील् अंतराच्या मानाने (३,८४,००० किमी) अगदीच् थोडे.
http://en.wikipedia.org/wiki/Centre_of_gravity

खराटा.

सुस्पष्ट चित्रे आणि सहज समजेल असे स्पष्टीकरण

सुस्पष्ट चित्रे आणि सहज समजेल असे स्पष्टीकरण हे लखकाचे वैशिष्ट्य पुन्हा दिसून येत आहे.

विसुनाना म्हणतात तशी ही बाब शाळेत शिकवतात, पण नीट समजावून सांगत नाहीत.

न्यूटनचा तिसरा कायदा आहे की "प्रत्येक क्रियेच्या ठीक विरुद्ध प्रतिक्रिया असते." पैकी "क्रिया" ही जर पिंड१ हे पिंड२ वर करत असेल, तर "प्रतिक्रिया" पिंड२ हे पिंड१ वर करत असते. हे लक्षात घेतल्याशिवाय न्यूटनची गणिते करताच येत नाहीत, हे लक्षात घेऊन न्यूटनने त्याला मूलभूत कायदा बनवले आहे.

झाडावरून सफरचंद पृथ्वीच्या दिशेने पडते, तशीच पृथ्वी सफरचंदाच्या दिशेने पडत असते - असे जाणल्याशिवाय न्यूटनचे गणित होत नाही (नाहीतर न्यूटनचा तिसरा कायदा निष्फळ होतो.) सफरचंदाचे वस्तुमान तसे थोडेच असल्यामुळे तितक्याच "बलाने" सफरचंदाला डोळ्यांना सहज जाणवेल इतके त्वरण प्राप्त होते. पृथ्वीचे वस्तुमान मात्र खूप जास्त असल्यामुळे समसमान असलेल्या "प्रतिक्रिया"बलामुळे तिला खूपच थोडे त्वरण प्राप्त होते. ते सहजासहजी जाणवण्यासारखे नसते.

न्यूटनचा तिसरा कायदा किती व्यापक आहे, त्याचे शब्द एका वाक्यात शाळेत सांगतात, पण त्याची जाणीव मात्र हवी तितकी स्पष्ट करून दिली जात नाही, असा माझा शाळेतील अनुभव आहे.

सुमो पैलवान आणि रड्या लुकड्याची फुगडी, या उदाहरणाने ही बाब वरील लेखात स्पष्ट झालेली आहे. फुगडी दोघेही घालत असतात, मात्र पैकी लुकडाच खूप फिरताना दिसतो हे रोजव्यवहारातले उदाहरण अगदी लगेच पटण्यासारखे आहे.

"कोण कोणाभोवती फिरतो" याबद्दल अस्पष्ट/चुकीचे विचार असले की मग अनपेक्षित गडबड होते. मग दोन पैलवान, एक लुकडा अशी तिहेरी फुगडी कशी घालतील? असा विचार करताना लोकांची गडबड होते. मागे "दोन सूर्यांचे मॉडेल" अशी चर्चा अन्यत्र झाली होती. त्यातला ग्रह आधी एका, मग दुसर्‍या सूर्याभोवती "ळ" आकारात फिरेल, अशी काही लोकांची कल्पना होत होती. विचार करा. अशा दोन-पैलवान-एक-लुकडा तिहेरी फुगडीत लुकडा आधी एका पैलवानाभोवती, मग दुसर्‍या पैलवानाभोवती फिरेल का? (माझे उत्तर - नाही.)

हा चपखल दृष्टांत सुचवल्याबद्दल आनंद घारे यांना धन्यवाद.

वाकलेले अवकाश

शालेय अभ्यासात ही 'फुगडी' बाब कधीच अभ्यासली नाही. नाहीतर स्पष्ट लक्षात राहिली असती.
न्यूटनपेक्षा आईनस्टाईनचा 'सापेक्षता सिद्धांत' या वाकलेल्या अवकाशाचे स्पष्टीकरण कसे करतो हे महत्त्वाचे आहे.
(शाळेत/कॉलेजात आईनस्टाईनपेक्षा न्यूटनच जास्त शिकवला जातो. :( )

उत्तम

लेख. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे आकृत्यांसह सहज समजेल असे स्पष्टीकरण असणारा. पुढील लेखांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

हेच म्हणतो. सोप्या उदाहरणांसमवेत स्पष्टीकरण. सर्व लेखमाला माहितीइतकेच रंजनही करते. वासराचे उदाहरण वाचून खरेच करमणूक झाली !

चंद्र पृथ्वीला ओढतो.

सूर्य-चन्द्रांच्या, विशेषत: चंद्राच्या आकर्षणामुळे समुद्राला भरती-ओहोटी होते. समुद्राच्या ज्या दिशेला चंद्र आहे तिथे भरती होते हे समजू शकते, पण त्याचवेळी पृथ्वीची चंद्र नसणारी जी विरुद्ध बाजू आहे, तिकडील समुद्राला भरती का येते, हे भूगोलाच्या पुस्तकात कधीच दिलेले नसते. भरतीच्या वेळी जसे समुद्राचे पाणी चंद्राकडे आकर्षिले जाते, तशीच पृथ्वीही ओढली जाते हे विचारात घेतले की विरुद्ध बाजूच्या भरतीचे कारण स्पष्ट होते. दोन बाजूंच्या भरतीचे पाणी ज्या उरलेल्या दोन बाजूंच्या समुद्रातून खेचले जाते तिकडे अर्थात ओहोटी होणार. --वाचक्‍नवी

भरतीची समसमान उंची - प्रकार कळलेला नाही

चंद्राच्या दिशेला येणारी भरती (म्हणजे पूर्णिमेला मध्यरात्री) आणि चंद्राच्या विरुद्ध दिशेला येणारी भरती (म्हणजे पूर्णिमेला मध्याह्नी) यांची उंची समसमान असते. (किंवा जवळजवळ समसमान असते.) ती का?

अलीकडचे पाणी पृथ्वीपासून चंद्राच्या दिशेने "क्ष" मीटर उचंबळले, म्हणा. पलीकडच्या पाण्याखालून पृथ्वी "आणखी खोल" गेली, हे खरे. तरी नेमकी ~क्ष मीटरच का सरकली पृथ्वी? याचे सोपे स्पष्टीकरण मला समजलेले नाही. (म्हणजे सूर्यसापेक्ष बोलायचे, तर अलीकडचे पाणी २*क्ष मीटर उचंबळायला पाहिजे, पृथ्वी क्ष मीटर सरकायला पाहिजे, म्हणजे दोन्हीकडे +/- क्ष मीटरची भरती येईल.)

कदाचित एकदा गणित करूनच बघायला पाहिजे. काही सोपे समीकरण होत असले पाहिजे.

चंद्र धावतोच आहे

आणखी एक सोपा सरळ आणि उत्तम लेख. वासराचे, सुमो पहिलवानाचे उदाहरण आवडले. चंद्र, पृथ्वी धावतातच आहेत. विशेषतः पृथ्वी थोडीशी कलून धावते आहे याचा जीवसृष्टीला कळत नकळत झालेला फायदा लक्षात घेण्याजोगा आहे.

लेख आवडला.

खूपच रंगतदार केला आहे विषय. ह्या लेखात वर्णन केलेल्या गतीचा विचार आपण करीत नाही हे खरे.

असेच

खूपच रंगतदार केला आहे विषय. ह्या लेखात वर्णन केलेल्या गतीचा विचार आपण करीत नाही हे खरे.

असेच म्हणतो.

किंबहुना अश्या अनवट तथ्यांवर रोचक पद्धतीने / शैलीत प्रकाश टाकणे हे लेखकाचे ठेवणीतले वैशिष्ट्य ठरावे. घारे सर, धन्यु!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मस्त

मुळ लेख व काही प्रतिसाद दोन्ही मस्त.

 
^ वर