मदत हवी आहे!

विषय - पाणिनी
पाणिनीच्या व्याकरणविषयक विचारांमध्ये ध्वनी आणि स्फोट याविषयी काही रचना आहेत. रचना हा शब्द मुद्दाम वापरतो आहे. त्याला श्लोक म्हणायचे किंवा कसे याविषयी मला काहीही ज्ञान नाही. काही काळापूर्वी या रचना आणि त्यांचा इंग्रजीतील भावानुवाद वाचनात आला होता. आत्ता ते संदर्भ काही केल्या सापडेनासे झाले आहेत. नेमक्या कृतींची संख्या किती वगैरे काहीही सांगू शकत नाही. "ध्वनीच्याही आधी स्फोट होतो," इतकाच त्यांचा आशय असल्याचे तूर्त मला आठवत आहे. मला त्या मूळ रचना आणि त्यांचा मराठीमध्ये भावानुवाद हवा आहे.
काहीही विशेष माहिती न पुरवता ही मदत मागतो आहे, या मर्यादेची जाणीव आहेच.
कोणी मदत करू शकेल का?
श्रावण मोडक
उपक्रम संपादक, हा मजकूर मी लेख म्हणून टाकला आहे. त्यासाठी उपक्रमावर योग्य असे सदर असेल तर तो तेथे स्थानांतरीत करावा. मला तसे सदर सापडले नाही.

Comments

पाणिनीय परंपरेतील, पण पाणिनींनी विशद केलेली नाही

स्फोट कल्पना पाणिनीय परंपरेतील आहे, पण पाणिनींच्या सूत्रात नाही.

स्फोटाबद्दल प्रथम विवेचन केले पतंजलींनी (१.१.७० आणि ८.२.१८ सूत्रांच्या भाष्याबद्दल - ही टीप माझ्यासाठी आहे, हे भाष्य वाचले पाहिजे). स्फोटवादाचा चांगला तात्विक पाया घालून विवेचन केले ते भर्तृहरिने "वाक्यपदीय" ग्रंथात.

स्फोटवादाचे थोडक्यात विवेचन परमलघुमंजूषा या छोटेखानी ग्रंथात सापडेल. मूळ संस्कृत लेखक नागेशभट्ट काळे (१८वे-१९वे इसवी शतक). मराठी अनुवाद आणि स्पष्टीकरणात्मक टीपा - वा. बा. भागवत, परामर्श प्रकाशन (पुणे विद्यापीठ तत्त्वज्ञान विभागाची प्रकाशन संस्था, प्रकाशनवर्ष : भाग १ - १९८४, भाग २ -१९९२).

नागेशाने "स्फोटवाद" नावाचा ग्रंथही लिहिला आहे, पण त्याबद्दल मला अधिक माहिती नाही.

भर्तृहरिपर्यंत माझे वाचन अजून पोचलेले नाही, पण या दुव्यावरचा इंग्रजी निबंध सुरुवात करण्यासाठी चांगला आहे (दुवा). निबंधात स्फोटवादावर एक उपनिबंध आहे.

- - -
पाणिनीच्या रचना :
सूत्रपाठ (यालाच अष्टाध्यायी म्हणतात)
गणपाठ
धातुपाठ
शिवसूत्र (यांनाच माहेश्वरसूत्र म्हणतात. ही पाणिनींनी रचली असतील, किंवा त्या आधीच्या कुठल्या आचार्याने रचली असतील. पण पाणिनीय साहित्याचा अविभाज्य भाग आहेत.)
(ही पुढील रचना पाणिनीची नसावी, त्याच्या शिष्यपरंपरेतील असावी) पाणिनीय शिक्षा
उणादिसूत्र (ही पाणिनींचीच की कोणाची ते विसरलो आहे.)

सूत्रपाठात (आणि उणादि सूत्रांत) सूत्ररूप अल्पाक्षरी वाक्ये आहेत.
गणपाठात शब्दांच्या याद्या (गण) आहेत
धातुपाठात धातूंची "टाचणेयुक्त" (ऍनोटेटेड) यादी आहे.
शिवसूत्रांत वर्णमाला नेहमीपेक्षा वेगळ्या (आणि तरी उपयोगी) क्रमाने दिलेली आहे.
पाणिनीय शिक्षेत पद्यरूपात "कारिका" आहेत. त्यात बहुधा अनुष्टुभ् अष्टाक्षरी श्लोक आहेत. मी पाणिनीय शिक्षा वाचलेली नाही. पण त्याबद्दल ऐकीव-वाचीव माहिती आहे. त्यात वर्णांच्या उच्चारणाबद्दल माहिती आहे - म्हणजे कंठ्य वर्ण कुठले, दंत्य वर्ण कुठले. व्याकरणाच्या तात्त्विक पायाबद्दल (उदा. स्फोटवाद) काही माहिती असेल असे वाटत नाही.

- - -

पतंजलीच्या महाभाष्यातून

पुढील उतारा पाणिनीच्या १.१.७० तपरस्तत्कालस्य सूत्राच्या भाष्यातून घेतला आहे. पुढे वासुदेवशास्त्री अभ्यंकरांचे मराठी भाषांतर दिले आहे.

संदर्भ : प्रश्न असा आहे की एकच शब्द कोणी एका लयीत म्हणेल, दुसरा कोणी वेगळ्या लयीत म्हणेल तर, मग तो एकच शब्द कसा म्हणायचा? त्याला दृष्टांत असा दितात - एकच रस्यावरुन कोणी रथ हळू हाकेल, कोणी रथ वेगाने जाईल तरी रस्ता एकच असतो. कोणी आक्षेप घेईल की हा दृष्टांत अयोग्य आहे. कारण रस्ता रथाला आधार असतो खरा, पण रथ चालल्यामुळे रस्ता बनत नाही. शब्द मात्र ध्वनी उत्पन्न केल्यामुळे बनतो. त्या आक्षेपाला उत्तर असे :

एवं तर्हि स्फोटः शब्दो ध्वनि: शब्द-गुणः । कथम् । भेरी-आघातवत् । तद् यथा भेरी-आघातः । भेरीम् आहत्य कश्चिद् विंशतिं पदानि गच्छति कश्चित् त्रिंशत् कश्चित् चत्वारिंशत् । स्फोट: च तावान् एव भवति ध्वनिकृता वृद्धि: ।
.
ध्वनि: स्फोटश्च शब्दानां ध्वनिस्तु खलु लक्ष्यते ।
अल्पो महांश्च केषांचिदुभयं तत्स्वभावतः ॥

(हे वासुदेवशास्त्री अभ्यंकरांनी केलेले भाषांतर शब्दशः नाही. त्यांनी स्पष्टीकरण करणारे काही शब्द जोडले आहेत. त्यामुळे शब्दशः नसलेले हे भाषांतर मराठीत समजायला बरे होते.)

तर मग येथेही शब्द नित्यच आहे (तो काही उच्चारणक्रियेने उत्पन्न होत नाही.) उच्चारणक्रियेने उत्पन्न होणारा जो ध्वनी तो त्या नित्यशब्दाचा व्यंजक आहे.
तो कसा?
जसा नगारा वाजवणारा मनुष्य नगारा वाजवून निघाला म्हणजे त्या नगार्‍याचा नाद ऐकू येत आहे तोपर्यंत कोणी वीस पावले जातो, कोणी तीस पावले जातो, कोणी चाळीस पावले जातो (म्हणून त्या आवाजामध्ये फरक होतोच असे नाही) तसा येथे नित्यशब्द एका स्वरूपाचाच तिन्ही वृत्तींमध्ये आहे; फक्त ध्वनीच्या भेदामुळे वेळ जास्त लागतो. ध्वनी आणि स्फोट (म्हणजे मूळचा नित्यशब्द) असे शब्दाचे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी ध्वनी हा कोणाला लहान, कोणाला मोठा, असा भासतो. त्या दोन्ही गोष्टी या ध्वनीच्या स्वभावावर अवलंबून आहेत. (मूळ ध्वनीने व्यक्त होणारा मूळचा नित्यशब्द सर्वत्र एक-स्वरूपाचाच आहे.)

वर पतंजलीने स्फोटाबद्दल अत्यंत संक्षेपाने सांगितले आहे, तर भर्तृहरीने त्याबद्दल सांगोपांग विचार केला आहे. परमलघुमंजूषेत भर्तृहरीच्या काही कारिकांचा आधार घेऊन स्फोटाबद्दल सांगितले आहे. परा-पश्यंती-वैखरी-मध्यमा या वाणीच्या चार टप्प्यांपैकी मध्यमा वाणीमध्ये (स्पष्ट ऐकू येत नाही, पण बिन-आवाजी जप वगैरे करताना जी वाणी स्वतःची स्वतःला स्पष्ट जाणवते) शब्द स्फोटरूप असतो, वैखरी वाणीत (एकमेकांना ऐकू येते ती वाणी) शब्द ध्वनिरूप असतो.

ऐकणार्‍याला ऐकू आल्यानंतर शब्द उलटा प्रवास करतो आणि ध्वनिरूपापासून स्फोटरूप होतो, आणि तसा जाणवतो.

धन्यवाद

धनंजयराव,
धन्यवाद.
आता थोडे पुढे सरकतो - स्फोट हाच तर विश्वाच्या उत्पत्तीचे कारण अशा अर्थाची काही कृती तुमच्या या वाचनामध्ये कुठे दिसते का? ती पाणिनीची असेल किंवा इतर कोणाचीही असेल.

हे आहे का?

अनादिनिधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम् ।
विवर्ततेऽर्थभावेन प्रक्रिया जगतो यतः ॥
(भर्तृहरि वाक्यवदीय, प्रथम [ब्रह्म]काण्ड, १.१)

सुरुवात आणि शेवट नसलेले (अनादि-निधनम्), जे र्‍हास पावत नाही (अक्षर) असे शब्दाचे तत्त्व, ब्रह्म (असते). ज्यातून (यतः) अर्थ-होण्याने (अर्थभावेन) जगतः (जगाची) प्रक्रिया मूर्त होते (विवर्तते).

शब्द हे ब्रह्म आहे, "स्फोट" हे शब्दाचे मूळ रूप आहे, असे म्हणून स्फोटातून विश्वाची उत्पत्ती होते, असा काही अर्थ काढता येईल. पण वाक्यपदीयात "स्फोट" हा शब्द येतो, तेव्हा मूर्त ध्वनी विरुद्ध अमूर्त स्फोट, असा भाषेच्या संदर्भातच येतो.

हा स्फोट जड वस्तूचा स्फोट आहे, असे अर्थ काढू नये :-) असा विचार त्या शब्दाला कालबाह्य आणि तंत्रबाह्य अर्थ लावणारा आहे. (हा बिगबँग तर नाहीच, आणि मुख्य म्हणजे "बिगबँग" हे अनुप्रासयुक्त नाव लोकप्रिय असले, तरी त्या घटनेला "एक्स्प्लोजन" म्हणणे फक्त अलंकारिक आहे, तोही जसा-चा-तसा अर्थ नाही.)

ध्वनि कानात शिरताना एकेक स्वर-व्यंजन करत शिरतो, आणि पुढचा स्वर कानात शिरेपर्यंत मागचा विरूनही गेला असतो. तरी अर्थ मात्र ध्वनीबरोबर असा अर्धवट कळत-कळत पूर्ण कळत नाही - एकदम पूर्णच्या पूर्णच शब्दाचा अर्थ कळतो. हे एकदम होणारे अर्थ-ग्रहण म्हणजे "स्फोट".

तसाच वाणी उच्चारण्यापूर्वी अर्थ एकदम मनात असतो (स्फोट), वाणी मात्र एकेक व्यंजन-स्वर तोंडात जमवत उच्चारली जाते.

स्फोटातून जगाची निर्मिती होते, म्हणजे जगातील प्रक्रियांचा अर्थ समजाचे मूळ स्फोट आहे.

हे शास्त्र "एपिस्टेमॉलॉजी"="ज्ञान-कसे-होते-शास्त्र" आहे; "आँटॉलोजी"="तथ्य-काय-आहे-शास्त्र" समजल्यास घोटाळा होऊ शकतो.

हेच, हेच महत्त्वाचे...


हा स्फोट जड वस्तूचा स्फोट आहे, असे अर्थ काढू नये :-) असा विचार त्या शब्दाला कालबाह्य आणि तंत्रबाह्य अर्थ लावणारा आहे. (हा बिगबँग तर नाहीच, आणि मुख्य म्हणजे "बिगबँग" हे अनुप्रासयुक्त नाव लोकप्रिय असले, तरी त्या घटनेला "एक्स्प्लोजन" म्हणणे फक्त अलंकारिक आहे, तोही जसा-चा-तसा अर्थ नाही.)
स्फोटातून जगाची निर्मिती होते, म्हणजे जगातील प्रक्रियांचा अर्थ समजाचे मूळ स्फोट आहे.
हे शास्त्र "एपिस्टेमॉलॉजी"="ज्ञान-कसे-होते-शास्त्र" आहे; "आँटॉलोजी"="तथ्य-काय-आहे-शास्त्र" समजल्यास घोटाळा होऊ शकतो.


ही वाक्ये महत्त्वाची.
मूळ आता मी ताडून पाहतो. हे वाचनात जेथे आले होते, ते संदर्भ मिळवतोय. त्यानंतर कळवेन.

पाणिनीच्या पूर्ववर्ती आचार्य स्फोटायन

"स्फोटायन" नावाचे कोणी आचार्य पाणिनींच्या पूर्वी होते, असे पाणिनींच्या एका सूत्रावरून कळते.

अवङ् स्फोटायनस्य । ६.१.१२३

(आदल्या अनेक सूत्रातून संदर्भ असल्यामुळे हे वाक्य अत्यंत संक्षिप्त आहे. आदल्या सूत्रातून संदर्भाचे शब्द घेऊन अर्थ असा -)
"गो" शब्दापुढे ह्रस्व "अ" आला, तर गोच्या शेवटच्या "ओ"च्या जागी "अवङ्" (यात "ङ्" हा खुणेचा ध्वनी लोप पावून "अव" असेच शिल्लक राहाते) असा बदल होतो असे स्फोटायनाचे मत आहे, (हा बदल विकल्पाने होतो).
पाणिनीच्या सूत्रांत संदर्भाचे शब्द आधीच्या सूत्रांतून उतरवायचे नियम काटेकोर आहेत. या सूत्राच्या अर्थात काही एक अस्पष्टपणा किंवा दुमत नाही. उदाहरण :
गो+अग्रम् = (विकल्प १) गोऽग्रम्; (विकल्प २) गो अग्रम्; (विकल्प ३, स्फोटायनाच्या मताने) गवाग्रम्

स्फोटायनाचे दुसरे कुठलेही मत आज आपल्याला माहिती नाही. त्यामुळे स्फोटायन आचार्याच्या व्याकरणविचारात स्फोटवाद होता, असा विचार म्हणजे निव्वळ कल्पनाशक्ती आहे. आर्थातच या सूत्रावरून पाणिनींचे शब्द-स्फोटाबद्दल काही मत होते का, तेही कळून येत नाही.

आजच्या उपलब्ध पाणिनि-रचित साहित्यात या एका सूत्रावेगळा "स्फोट" असा शब्द कुठेही वापरलेला दिसत नाही, आणि इथेही तो एका आचार्याच्या नावाचा भाग म्हणून दिसतो.

माहितीबद्दल आभार

धनंजय, माहितीत भर घातल्याबद्दल आभार.
सोनाली.

 
^ वर