स्थापत्यकलेतील कमानींचा वापर

सुंदर स्त्रीचे संस्कृतातील वर्णन अनेकदा धनुष्याप्रमाणे कमानदार भिवया असलेली असे असते. असा कमानीचा आकार माणसाला नक्की आकर्षक का वाटत असावा, याची कल्पना नाही, पण कदाचित धनुष्याकृतीच्या प्रमाणबद्धतेचा नकळत सौंदर्याशी संबंध जोडला गेला असावा. धनुष्याच्या दोरीत जाणवत असलेला ताण, आणि सरसावलेल्या धनुष्यामधील बाणाला दिशा देण्याची क्षमता याचा या दोन्ही गोष्टींचा संबंध कदाचित अचूकतेशी, प्रमाणबद्ध आविष्काराशी नकळत होत असल्याने असेल, किंवा सोपे म्हणजे एक आकर्षक स्ट्रक्चरल फॉर्म गवसला म्हणून असेल पण कमानाकृती या जुन्या काळापासून स्थापत्यकलेत खूपच प्रचलित झाल्या.

अर्वाचीन स्थापत्यकलेतून, विशेषतः शहरी भागातील स्थापत्यातून सध्याच्या काळात जरी कमानींना पूर्वीइतके महत्त्व मिळत नसले, तरी या महत्त्वाच्या आकाराचा आविष्कार हा विविध देशांच्या जुन्या स्थापत्यातून कमी अधिक प्रमाणात दारे-खिडक्या, दालने, भुयारे, जोडणारे रस्ते (passage ways), कबरी अशा अनेक ठिकाणी झालेला आढळतो, जसे -

इजिप्त - इजिप्त येथील सर्व बांधकाम अतिभव्य आहे, पण कमानींचा वापर येथे कमी आढळतो. तेथील मृत नगरांमध्ये आढळलेल्या काही अवशेषांमध्ये विटांच्या कमानींप्रमाणे ओबडधोबड छत असल्याचे सांगितले जाते (जॉन गार्डनर विल्किनसन).

रोमन साम्राज्य - रोमनांच्या स्थापत्यात कमानींची शास्त्रशुद्ध रचना केलेली आढ़ळून येते. या रचनेत दगड हे अतिशय प्रमाणबद्ध कापून ते अगदी अर्धवर्तुळाकार रचून त्यावर एक मध्यभागी बसेल असा (कीस्टोन) बसवले जात असत. अशा अर्धगोलाकार कमानी सुंदर दिसत असल्या तरी ही पद्धत लहान कमानींकरता अधिक उपयुक्त आहे. मोठ्या त्रिज्येची अर्धवर्तुळे करायची असल्यास कमानीची उंचीही अर्थातच वाढणार आणि त्याअनुषंगाने कमानीच्या दोन्ही बाजू अधिकाधिक मजबूत कराव्या लागतील, यामुळे स्थापत्यात नंतर अर्धवर्तुळापेक्षा काहीसे चपटे असे आकारही बनवले गेले.

कॉन्स्टंटाईनची कमान म्हणून प्रसिद्ध असलेली एक कमान ही त्याच्या एका युद्धातील विजयाचे प्रतिक म्हणून बनवली गेली.

Arch of Constantine

ही कमान त्याही आधीच्या सेप्टीमस सेव्हरस च्या विजयकमानीवर आधारित होती. ह्यात दोन लहान कमानी आणि मधील एक मोठी कमान असे स्वरूप आहे. या कमानीची तुलना अलिकडच्या काळातील

Gateway of India

या प्रवेशद्वाराशी तुलना होणे अनिवार्य आहे. नवीन आणि इतिहासकालीन काळांतील बांधकामांत फरक असणारच. पण एक स्ट्रक्चरल फॉर्म म्हणून कमानींचा वापर् विजयकमान म्हणून या दोन्ही साम्राज्यांना (रोमन आणि ब्रिटिश) करावासा वाटलेला पाहून गंमत वाटते. याही आधी ग्रीसमधील अथेन्स या शहरातली ही हेड्रियनची कमान पाहिल्यास लक्षात येते की वरच्या खांबांसारखे भाग मुद्दाम जास्त वजनदार होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. नंतरच्या काळात प्राचीन चर्चच्या इमारती या कमानींच्या आकारात वेगवेगळे बदल करून किंवा कमानी एकत्र करून त्यांचे व्हॉल्ट (vault) तयार करणे अशा पद्धतींनी बांधल्या गेल्या.

भारत -

मोहेंजोदारो - मोहेंजोदारो येथे विटांच्या कॉर्बेल्ड प्रकारची कमानाकृती रचना ही एका सांडपाण्याच्या वाहिनीचे छत म्हणून केलेली आढळली आहे. कॉर्बेल्ड प्रकारामध्ये विटा एकमेकांवर न रचता (म्हणजे सरळ उभा कॉलम तयार न करता), काहीशा ओव्हरहँग (म्हणजे विटेचा काही भाग अधांतरी) ठेवून बसवलेल्या आढळतात. म्हणजे सर्वात खालच्या थरात कमानीच्या साधारण खुल्या भागाच्या हव्या असलेल्या रूंदीइतके अंतर ठेवायचे आणि मग विटांचे थर दोन्ही बाजूंनी एकमेकांकडे वाढू लागतील येतील अशा दिशेने, पण एकमेकांवर पूर्ण न बसवता ओव्हरहँग ठेवून दोन्ही टोके शेवटी काही उंचीवर एकत्र मिळवायची. यात विटांची कमान खालच्या बाजूने सलग न दिसता उलट्या पायर्‍यांप्रमाणे दिसते. ही रचना शास्त्रशुद्ध म्हणता येणार नाही पण कमानीचा एक कमी खर्चिक प्रकार आहे.

नंतरच्या काळात अजंठा येथील लेण्यांच्या प्रवेशद्वारांना अशा कमानी घडवलेल्या दिसतात. पण

Ajanta

नीट पाहिले तर लक्षात येईल, की वजन पेलणारा मूळ सांगाडा कमानदार नसून मुख्यत्वे सौंदर्यवर्धनासाठी या कमानी केल्या आहेत. असेच एका दुसर्‍या भागातील प्रवेशद्वारापाशी. इथे भरभक्कम आणि चांगल्या रूंदीच्या शिळांचा वापर करताना दर्शनी भागातील खांब हे नेहमीप्रमाणे सरळ उभे केले आहेत. त्यावर उभी असलेली दगडी कॅनपी ही नेहमीप्रमाणे आयताकारच आहे. वरची कमान ही मुख्यत्वे सांगाड्यासारखी आधारभूत अशी नाही.

भारतातील हिंदू देवळांच्या बांधकामांची पद्धत ही ठराविक आखून दिलेली असल्याने कमानी फारश्या प्रचलित झाल्या नाहीत तरी देखील काही कमी महत्त्वाच्या बांधकामात मात्र कमानींचा कॉर्बेल्ड पद्धतीचा वापर आढळतो. काही ठिकाणी, उदा. कंबोडिया, ब्रह्मदेश येथेही भारतीय परंपरेनुसार मंदिरे बांधलेली दिसतात, त्यामुळेच कमानींचा वापर हिंदू देवळांप्रमाणेच अत्यंत कमी.

नंतरच्या काळात मात्र भारतात मुसलमानी सत्ता आल्यानंतर जुन्या कमानींचा पूर्ण गोलाकार जाऊन विशिष्ट आकार म्हणाजे वरच्या भागातला गोलावा काढून थोडी टोकेरी कमानाकृती बनवली जी तत्कालिन स्थापत्यात

Red Fort Delhi -Wikimedia

दिसते.

नंतरही अलिकडच्या इतिहासात हिंदू राजेरजवाडे, पेशवे यांच्या वाड्यांमध्ये, तसेच किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांमध्येही कलाकारांनी या रचना स्विकारलेल्या दिसतात, जसे शनिवार वाडा, जयपूरचा जलमहल, येथे.

गोव्यालाही पोर्तुगीजांमुळे चर्चच्या बांधकामांमध्ये कमानींचा वापर दिसतो. मुंबईत ब्रिटिश राजवटीत बांधल्या गेलेल्या फोर्टमधील अनेक इमारतींत अशा कमानी आढळतात. नंतरच्या रिचर्डसन रोमानेस्क पद्धतीच्या इमारतींमध्ये कमानी वापरलेल्या आढळतात.

सुरूवातीला दगड, विटा, यांनी मुख्यत्वे बांधल्या गेलेल्या या कमानींचे स्वरूप बदलत जाऊन, नंतर त्या लाकूड आणि काँक्रीटसारख्या माध्यमांमध्येही बनवल्या जाऊ लागल्या. हल्लीच्या काळात कमानींचा वापर काहीसा रोडावला आहे. कदाचित त्यासाठी लागणारे कुशल कामगार कमी असल्याने असेल किंवा जनमानसावर सरळ, नाजूक रेषांच्या सौंदर्याचा प्रभाव अधिक असेल, पण नवीन आर्किटेक्ट इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसत नाहीत. तरी देशोदेशीच्या बांधकाम तज्ञांमध्ये शेकडो वर्षे अशी बांधकामाच्या कलेची देवाणघेवाण होत होती किंवा स्फूर्ती मिळवणे चालले होते याचे प्रतिबिंब देशविदेशांमध्ये आढळणार्‍या अशा साधारण स्ट्रक्चरल फॉर्ममधून दिसते असे म्हणता येईल.

टीप - या लेखामध्ये स्थापत्याचा काळ निश्चित न करणे ही मोठी उणीव आहे, पण वेळ मिळाल्यास संदर्भ पाहून ही आणि अशा काही उणीवा दूर करता येतील अशा विचाराने लेख आधी लिहीला आहे.

Comments

अभियांत्रिकी, सौंदर्य, इतिहास

तीन्ही बाबतीत कमानींचे वर्णन देणारा हा स्थापत्य-लेख आवडला.

लहानपणी या. पेरेलमॅनच्या पुस्तकात कमानीला प्रचंड वजन पेलण्याचे सामर्थ्य का असते, याविषयी वाचले होते. इथे सचित्र बघत आहे.

अजिंठ्यामध्ये सहलीत आमच्या मार्गदर्शकाने सांगितले होते, ती एक गोष्ट आठवली. एका खडकात कोरलेल्या या गुंफांची कित्येक "स्थापत्य" वाटणारी अंगे शुद्ध शिल्पसौंदर्यासाठीच होती. त्या काळात उत्तर भारतात (मगधात) बौद्ध विहार लाकडी होते. लाकडी इमारतींच्या आतमधले खांबही छताचे वजन तोलून धरणारे होते, छताला वासे-तुळया होत्या. एकसंध शिळेत कोरलेल्या गुंफेला या सर्वांची काहीच अभियांत्रिकी गरज नाही. तरी गुंफा खोदणार्‍यांनी आत खांब कोरले, छताच्या दगडात तुळया कोरल्या.

चित्रा यांच्या लेखात सांगितल्यावर त्या तपशिलांची आठवण आली. बहुधा लाकडी विहारांच्या इमारतींत कमानी वजन पेलणार्‍या बनत. इथे मात्र केवळ सौंदर्यासाठी कोरीव कमानी बनवलेल्या आहेत. ही लेखातली माहिती अगदी पटते.

कार्बोल्ड कमानींबद्दल वाचून गंमत वाटली. किती सुपीक डोकी त्या अभियांत्रिकी गवंड्यांची!

विजय कमान आणि आगमनाचे स्मृतिचिह्न

पण एक स्ट्रक्चरल फॉर्म म्हणून कमानींचा वापर् विजयकमान म्हणून या दोन्ही साम्राज्यांना (रोमन आणि ब्रिटिश) करावासा वाटलेला पाहून गंमत वाटते.

मला वाटते विजय कमानीच्या खालून राजा वाजतगाजत गावात आगमन करतो. ज्या कामासाठी सामान्यांनी तोरण बांधावे त्यासाठी (बहुधा त्याच शुभविचाराने) राजाने कमान बांधावी, असे असेल.

कुठल्याशा जातीच्या विवाहात कारल्याच्या मांडवाच्या कमानीतून पतिपत्नी जातात, नाही का?

माहितीपूर्ण लेख

लेख आवडला.. नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण


भारतातील हिंदू देवळांच्या बांधकामांची पद्धत ही ठराविक आखून दिलेली असल्याने कमानी फारश्या प्रचलित झाल्या नाहीत तरी देखील काही कमी महत्त्वाच्या बांधकामात मात्र कमानींचा कॉर्बेल्ड पद्धतीचा वापर आढळतो.

हे वाचून कर्नाटाकात मडीकेरी येथे पुढे दिलेले मंदीर आहे त्याची आठवण झाली. याचे नाव "राजा की गद्दी"(राजाज् टोंब) असे आहे. लांबुन पाहता मशीदीसारख्या दिसणार्‍या ह्या वास्तु प्रत्यक्षात मंदीरे आहेत. त्यातहि रचना अशी की खिडक्यांतून पाहिल्यावर देवाच्या मुर्तीचे दर्शन होतं नाहि त्यामुळे इतक्या जवळ जाऊनहि मशीद असल्यासारखे वाटते. जोपर्यंत मुळ प्रवेशद्वारातून आत जात नाहि हे शिवमंदीर आहे हे कळत नाहि.. या रचनेमुळे परकीय मुसलमान सैन्याने त्या वास्तु पाडल्यानाहित असे सांगितले जाते.

मात्र जर नीट लक्ष दिले तर कळसावर चांद-तार्‍याऐवजी असलेला ध्वज आणि मिनारांवरचा नंदी तसेच खिडक्यांच्या कमानीवरची चित्रे हे मंदीर असल्याची साक्ष देतात. या मंदीराची बरीच छायाचित्रे काढली आहेत त्याबद्दल शंका आहेत पण अवांतर होईल त्यामुळे वेगळा व्यनी पाठवतो / सरळ एक चर्चाप्रस्ताव टाकतो.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

उत्तम

लेख, अतिशय आवडला. मोहेंजोदरोतल्या सोप्या कमानीचे वर्णन रंजक आहे. गेल्या फेरीत, गोवळकोंड्याच्या किल्ल्याला भेट द्यायचा योग आला होता. तिथल्या न्यायनिवाड्याच्या खोलीतील कमानी आणि छतावरील त्रिकोणी उंच-सखल भागांचा ध्वनी वाहून नेण्यासाठी केलेला कल्पक वापर प्रेक्षणीय आहे.

पॅरिसमधली विजयकमान (या कमानीच्या मूळ आराखड्याची कल्पना आणि त्यात झालेले बदलही वाचण्याजोगे.) आणि सेंट लुईसची गेटवे आर्च, या दोन कमानी आधुनिक काळातल्या कमानींचे उदाहरण म्हणता येईल.

अवांतर -
१. कमानदार भुवया हे सौंदर्याचे लक्षण असते या वाक्यावरून 'सुकांत चंद्रानना पातली भ्रूधनु सरसावुनि' हे पद आठवले.
२. खडकांची झीज होऊन तयार झालेली कमान हे अर्थातच या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे. पण युटाहमधल्या या डेलिकेट आर्चचा फोटो द्यायचा मोह आवरत नाही.

Delicate Arch, Arches National Park, Utah

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

दोन प्रकार की फक्त शोभेपुरते?

नंदनने दिलेल्या छा.चि मधे दोन प्रकार वाटले. पहिल्या चित्रातल्या कमानीच्या आतल्या बाजुला चौकट आहे (म्हणस्जे दरवाजा चौकोनीच आहे मात्र भोवती कमान आहे).. तर जस्टीस हॉलमधे बाहेरून चौकट आहे.. मुळ लेखातील छायाचित्रे देखील बाहेरुन असलेली चौकट दाखवतात.. तर हे कमानीचे दोन प्रकार आहेत का गोवळकोंड्याच्या चित्रांतील पहिले चित्र फक्त शोभेपुरत्या असलेल्या (कमनीय ;) ) कमानीचे आहे?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

कमनीय

पहिल्या चित्रातील स्थापत्याला कमान म्हणावे की नाही, ते सांगता येत नाही. यावर कोणी प्रकाश टाकला तर जाणून घ्यायला आवडेल. बाकी कमनीय हा शब्द 'कमान' वरूनच आला असावा काय? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

दरवाजा

या दरवाजाच्या आणि मागच्या दगडांच्या रंगांच्या फरकावरून हा दरवाजा दोन टप्प्यांत बांधला असावा की काय अशी शंका आली.
ह्या चित्रात दिसणारी कमान मला तरी आतल्या भरभक्कम दगडी तुळईच्या तुलनेत वेगळी, नंतर बांधलेली अशी वाटते. त्यावर एकतर कोरीव काम जास्त आहे. तरीही एरवी लोडबेअरिंग असायला हरकत नाही, पण इथे ती लोडबेअरिंग असल्यापेक्षा (वाढीव) भिंतीचा एक भाग दिसते आहे. खर्‍या कमानींमधली बले आणि प्रतिरोधक बले इथे विशेष कार्यरत /गरज असलेली वाटत नाहीत.

ऋषिकेश, मडिकेरीवरून नवा धागा सुरू नक्की करा.

धनंजय, अजिंठ्यावरून काही फोटो असल्यास इथे देता आले तर पहा. वेगळाही लेख टाकता येईल. कार्ल्याच्या वेलाखालून जाणार्‍या पतिपत्नींचे उदाहरण माहिती नव्हते पण रोचक आहे.

सर्वांना प्रतिसादांसाठी धन्यवाद.

शोभेपुरती

सहमत. गोवळकोंड्यातली ती कमान शोभेपुरतीच असावी, अन्यथा चित्रात दिसणार्‍या दगडी तुळई (बीम?) चे प्रयोजन ते काय. कमान नंतर बांधली गेली असणे शक्य आहे.

सुंदर सचित्र माहिती

खूप छान लेख आहे. त्यात उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल कांही तर्क मांडतो.
१.कमानदार भुवई सिमेट्रिकल असल्यामुळे आकर्षक वाटत असावी. वेडेवाकडेपणा सहसा सुंदर गणला जात नाही.
२. मोठ्या आकाराचे चिरे भारतात उपलब्ध होत असल्यामुळे त्यांचा उपयोग तुळयांसाठी करणे शक्य होते. लहान लहान दगड विटांमधूनच निर्मिती करायची असेल तर लोड बेअरिंगसाठी कमान वापरणे आवश्यक असत असावे.

हो

कमानदार भुवई सिमेट्रिकल असल्यामुळे आकर्षक वाटत असावी.

पण सध्या ह्यालाही कला समजतात!

लहान लहान दगड विटांमधूनच निर्मिती करायची असेल तर लोड बेअरिंगसाठी कमान वापरणे आवश्यक असत असावे.

दगड हव्या त्या प्रमाणात कापणे आणि तसेच त्यांना सांधण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तंत्राची/साधनांचीही वानवा असेल असे वाटते. शिवाय भारतातल्या काही विशिष्ट प्रकारच्या वास्तूंची रचना कशी असावी यासंबंधी शास्त्र होते असे सांगितले जाते. त्यामुळे त्यापलिकडे जाण्याची विशेष इच्छा तत्कालिन कारागिरांना झाली नसावी.

कमानींचे प्रकार.

कमानींच्या प्रकारांपैकी कॉर्बेल्ड प्रकारची कमान म्हणजे काय ते छान समजले. पण लॅन्सिट, ओजी, सेग्मेन्टल, ट्रेफ़ॉइल, ट्यूडर, पॅरॅबोलिक, शोल्डर्ड किंवा घोड्याच्या नालासारखी आकृती असणार्‍या कमानींची छायाचित्रे जर इथे टाकता आली तर बहार होईल.
गुजराथ आणि मध्य प्रदेशातील अनेक गावांत रस्त्याच्या मध्येच सुरेख कमानी असतात. आपल्याकडे गावाच्या वेशीजवळ आणि किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराजवळ अशी कमान असते. मला वाटते मुसलमान राजवटीत कमानी असलेली बांधकामे बांधण्याची पद्धत फोफावली असावी.--वाचक्‍नवी

धन्यवाद

लॅन्सिट, ओजी, सेग्मेन्टल, ट्रेफ़ॉइल, ट्यूडर, पॅरॅबोलिक, शोल्डर्ड किंवा घोड्याच्या नालासारखी आकृती असणार्‍या कमानींची छायाचित्रे जर इथे टाकता आली तर बहार होईल.

यावरून एक वेगळा लेख टाकीन. या लेखाची मर्यादा मनात केवळ रस तयार करावा इतपतच होती. पण विषय सुचवल्याबद्दल आभार.

उत्तम - आधुनिक कमानी

आवडीचा विषय आहे, लेख अतिशय आवडला. अत्युत्तम आहे. तूर्तास एवढेच.

भारतात मुसलमानी राजवटीपूर्वी कमानींचा सढळ वापर होत असे किंवा नाही याबद्दल विशेष माहिती नाही परंतु कोनाड्यांची नक्षी किंवा इमारतींवरील कोनाडे सहज दिसून येतात.

वर प्रतिसादात आल्याप्रमाणे आधुनिक काळातील कमान म्हणून सेंट लुईसच्या आर्चचे नाव घेता येईल. कमानीच्या आतून प्रवास करता येऊन तिच्या माथ्यावर पोहोचता येणार्‍या कमानीतील ही सर्वात सुप्रसिद्ध कमान असावी. (अशा आधुनिक कमानी आणखीही असाव्यात. इतरत्र नाही तरी थीम पार्क्स मध्ये असतीलच.)

अशा रोमन बांधकामाच्या (की ग्रीक??) आधुनिक कमानी अमेरिकेतील घरादारांवरही हमखास दिसतात. ही खास आमच्या मालकीची कमान. ;-)

वा!

छान आहे कमानी आकार!

लेख आवडला

कमानी बरोबरच देशविदेशच्या प्रसिद्ध वास्तुमधील अजुन काही बारकावे टिपणारी लेखमाला होउन जाउ दे.

असेच म्हणतो.

लेख सुंदर आहे. अजून असे लेख येऊ देत.

+१

हेच म्हणतो. उत्कृष्ट लेख.

माहितीपूर्ण लेख

माहितीपूर्ण लेख सध्या वरवर चाळला ! ( वरीजनल वाचल्यावर प्रतिसाद लिहितो..ही केवळ पोच )

-दिलीप बिरुटे
( बीझी )

धन्यवाद

प्रियाली, सहज आणि बिरूटेसर प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

लेख आवडला

लेख आवडला. आर्चेस च्या इतर प्रकारांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. (असे हे प्रकार असतात ही महिती देखिल त्याला नवी आहे.)

कमानीवर केवळ एकाच प्रकारची (कॉम्प्रेसिव) बले कार्य करत असल्याने मर्यादा असणार्‍या संसाधनांपासूनही त्या बनवता येत ही त्यांची खासियत त्यांच्या वापराला व पर्यायाने लोकप्रियतेला कारण ठरली असावी. नवनव्या बांधकाम साहित्यांच्या (विशेषतः रिएन्फोर्स्ड् कॉन्क्रीट) उपलब्धतेमुळे आकर्षक असला तरीही, एकूणात खर्चिक असणारा हा वापर, उत्तरोत्तर कमी होत गेला असावा.

अवांरत : १. कमानीत टेन्साईल (तणावजन्य?) बले (व बेन्डिंग मोमेन्टस्) नसतात हे माहीत आहे, पण 'कमानीच्या शीर्षभागी (अपेक्स) वजन दिल्यास शिअर स्ट्रेसेस अनंत होऊन कमान कोसळते व हेच टाळण्यासाठी कमानीच्या टोकावर एक सुळका पुरवला जातो' असा भन्नाट पण न पटण्यासारखा दावा ऐकण्यात आला आहे. याचे समर्थन किंवा खंडन करणारी माहिती हाती लागल्यास आनंद होईल.
२. कमानदार भुवयांच्या सौंदर्यरहस्याचा भेद करण्याचा प्रयास करण्याचे योजत आहे. इतर प्रत्येक आकर्षण समजामागे शास्त्रीय कारणे असल्याचे वाचून आहे

स्ट्रेसेस -

यात अधिक तांत्रिकी माहिती न देण्याचा विचार होता. पण एक स्पष्ट करावेसे वाटते - Brick masonry चे बांधकाम असल्यास ते मटेरिअल ताण घेत (स्विकारत) नाही, असे गृहित धरले जाते. याचा अर्थ ती बले कार्यरत नसतात असे नाही. ती बले मर्यादेपलिकडे स्ट्रेसेस तयार न करू शकतील अशी व्यवस्था करणे हा उपाय असतो - हेच डिझाईन.

बाकी वजन जिथे एक बिंदूरूप म्हणून येणार तेथे शक्यतो दगडविटांच्या बांधकामात तरी कच्चे सांधे ठेवू नयेत हे सूत्र धरल्यास कीस्टोन ठेवण्याचे एक कारण मिळते. दुसरे असे की स्ट्रेस वाढणे म्हणजे एकतर तेथले क्षेत्रफळ ( सेक्शनची इफेक्टिव्ह एरिया) (कदाचित भेगा जाण्यामुळे (क्रॅकिंगमुळे)) कमी होणे किंवा वजन खूप अधिक होण्याने होणार. (अनंत स्ट्रेस म्हणजे बहुदा पहिला प्रकार म्हणायचा असावा). दुसरे म्हणजे पाया हलला यासारख्या कारणाने भेगा पडतात त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी कमान कमकुवत होऊ शकते.
स्लाईड क्र. १५ पहावी.

कमानदार भुवयांच्या सौंदर्यरहस्याचा भेद करण्याचा प्रयास करण्याचे योजत आहे.
स्तुत्य उपक्रम आहे. :)

लेख आवडला

लेख आवडला. पण अवांतर माहिती देण्याइतके ज्ञान माझ्याकडे नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मंचरची कमान

मंचर गावच्या कमानीचे छायाचित्र

थोडीशी मोठी पण अशीच कमान नारायणगांवमध्ये जुन्नर रस्त्यावर आहे आणि एक जुन्नर गावातही आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद,

कमानाकृती नवीन दिसते आहे. आत कोणते स्थान आहे? प्रवेशद्वार आहे का?

गावची वेस

ही मंचरच्या तीन वेशींपैकी एक आहे. (इतर दोन वेशींना प्रवेशद्वारे नाहीत. तिथे चौक आला की वेस आली असे मानतात.) कमानाकृती नवीन नाही. निदान २५ वर्षे तरी जुनी असावी (म्हणजे माझ्या लहानपणापासून पाहत आलो आहे. रंगरंगोटी केल्यामुळे नवीन दिसत आहे. आतमधील परिसराला गावठाण असे मानले जाते. कदाचित इथे आधी प्रवेशद्वारही असेल. पण नंतर गावठाणात चोरण्यासारखे काहीच नाही हे लक्षात आल्यावर प्रवेशद्वार काढून टाकण्याचा निर्णय घेतला असावा. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गावची वेस

गावची वेस हे कमानीचे उत्कृष्ट उदाहरण बहुसंख्य गावात सापडते. वेशीच्या उल्लेखाशिवाय लोकसंस्कृतीचा मागोवाच घेता येणार नाही. उदा. "वेशीला टांगणे," " गावची वेस ओलांडु देणार नाही " "नवरा आला वेशीपाशी" मिरवणुकींची सुरवात बर्‍याच ठिकाणी वेशीपासुन होते.
घरातील कोनाडे हे दुसरे उदाहरण कमानीचे च आहे. स्थापत्यकलेतील उपयुक्तता व सौंदर्य यांचा समन्वय कमानीत होतो.
प्रकाश घाटपांडे

देव्हारा

कमानीचे चटकन आठवणारे अजून एक उदाहरण म्हणजे देव्हारा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लोहगडचा दरवाजा

Darvajaa

हे लोहगडावरची कमान. अशा कित्येक कमानी अनेक किल्ल्यांवर आहेत. रायगडावरचा नगारखाना, मुख्य दरवाजा, पुरंदर, शिवनेरी, सिंहगड, रोहिडा वगैरे वगैरे

चित्र न दिसल्यास इथे क्लिक करा.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

छान!

सर्वांनी कमानाकृतींच्या वापरावरून दिलेली माहिती आवडली.
धन्यवाद!

लेख

आवडला. माहितीपूर्ण आहे. चित्रांमुळे (लेखिकेचे नाव नाही) अधीक आवडला.

--- उपक्रमी
(मराठी संकेतस्थळांवरील सर्व सदस्य तमाशाप्रेमी असतात. काही उघडपणे तमाशा बघतात/करतात, तर काही चोरून, एवढाच फरक!)

सुरेख

सुंदर लेख. आवडला.
माझे आधीचे शहर बोलोन्या कमानींसाठी प्रसिद्ध आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे पावसापासून संरक्षण मिळत असे. :)
अवांतर : जॉन ग्रिशहॅमने द ब्रोकर या कादंबरीत बोलोन्याचे सुरेख वर्णन केले आहे आणि ते तंतोतंत जुळते.

000069.Bologna-6

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

लय भारी

आमच्या स्टेशनावर पण अशाच कमानी आहेत.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

खरंय की अतिशयोक्ती?

यावरून आठवलं, मागे कुठेतरी वाचलं/ऐकलं होतं की सीएस् टीच्या इमारतीमधे स्थापत्यशास्त्रातील इतके प्रकार वापरले आहे की काहिहि शिकायचे असले / कसलेहि उदाहरण द्यायचे असले तरी ह्याच उमारतीचा फोटु देता येतो. :)

चित्राताई,
हे कितपत खरंय आणि कीती अतिशयोक्ती?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

इंडो-सॅरासेनिक स्थपत्यशैली

मला वाटते की सी.एस.टी इमारत इंडो-सॅरासेनिक स्थपत्यशैलीचे खास उदाहरण आहे.
आत काही युरोपियन तत्त्वांचा मिलाफ एतद्देशीय (विशेषतः मुगल) स्थापत्याशी केलेला आहे.

खूपच भरगच्च शिल्पकारीने ही इमारत भरली आहे, हे मात्र खरे. कधीही त्याच्याकडे बघावे तर काहीतरी वेगळेच गमतीदार दिसते. मागे एकदा एक् खिडकीत वेलबुट्टीच्या नक्षीत हरवलेली जी-आय-पी ही अक्षरे दिसली होती. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी विविध जनावरांच्या आकाराच्या तोट्या...

कमानींचे किती वेगवेगळे आकार दिसतात वरील चित्रात!

लेख् आवडला

चित्रा, लेख आवडला. अतिशय माहितीपूर्ण आहे. प्रतिसादात उल्लेख केलेल्या कमानींवर जरूर लिहावेस. वाचायला आवडेल.

सर्वांना धन्यवाद

ऋषिकेश, वरील वाक्य मला अतिशयोक्तीच वाटते आहे. पण आकार वैविध्य मात्र खूपच आहे.

लेख आणि प्रतिसाद / तसेच

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. कमानींविषयी आणखी वाचायला आवडेल.

तसेच माडिकेरी (ऋषिकेश) आणि "कमानदार भुवयांच्या सौंदर्यरहस्याचा भेद" (तो .) याविषयीही :)

 
^ वर