समाजवाद, भारत आणि महाराष्ट्र

नमस्कार,
हा विषय चर्चेसाठी घेण्याचे कारण म्हणजे नुकतेच झालेले समाजवादी बाबूराव सामंत यांचे निधन. त्यामुळे हा विषय पुन्हा डोक्यात आला. चर्चेत मला अपेक्षित असलेले मुद्दे असे:

  • भारताचा इतिहास हा शाळेत स्वातंत्र्य मिळाल्यावर संपतो. भारतातील समाजवादाचा उदय हा त्या नंतरचा. त्यामुळे त्याबद्दल व्यवस्थित कधीच मिळाली नाही. दरवेळी या चळवळीतील कोणी गेले की वर्तमानपत्रातून काहीतरी वाचायला मिळते.
  • कार्ल मार्क्स च्या विचारसरणीला इतिहासाच्या पुस्तकात साम्यवाद असे नाव होते. साम्यवाद आणि समाजवाद हा एकच का? नसेल तर त्यांतील फरक काय?
  • भारतातील समाजवादाचा आणि विशेषतः महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचा इतिहास काय? ही चळवळ कशामुळे थंडावली? इत्यादी.

टीपा:

  1. विषय चर्चेला घेताना आंतरजालावर अशी चर्चा झाली आहे का याचा शोध घेतलेला नाही. त्यामुळे कोणास अशा चर्चेचा दुवा माहीत असल्यास अवश्य द्यावा.
  2. स्वतःचा संगणक नसल्यामुळे मला वारंवार चर्चेत भाग घेता येणे कठीण आहे. तरी चर्चा चालू ठेवावी. मला शक्य होईल तेव्हा मी भाग घेईनच.

धन्यवाद.

Comments

थोडे अवांतर

मला राजकारणात विशेष गती नाही. (खरे तर ढ असे म्हणता यावे.) परंतु बाबूराव सामंतांचे नाव आल्यामुळे दोन पैशे.

लहानपणापासून प. बा. सामंत हे एक शालीन, सुसंस्कृत, सभ्य व्यक्तिमत्व म्हणून माहित होते. राजकारणाच्या चिखलात राहूनही या माणसाच्या सफेत कपड्यांवर कधी शिंतोडे कसे उडाले नाहीत हे एक नवल आहे. लोकांपर्यंत सहज पोहोचू शकणारा, मदतीला धावून येणारा, अनेक सामाजिक उपक्रमांत मदतीचा हात पुढे करणारा असा एक सभ्य गृहस्थ या जगातून गेल्याची खंत वाटली. अशी माणसे राजकारणात नेमकी काय करतात आणि कशी तगतात असा प्रश्न नेहमी पडतो.

समाजवादाची चळवळ कशी थंडावली ते माहित नाही पण मृणाल गोरे, प. बा. आणि इतरांकडे पाहता असे दिसून आले की आजच्या (किंवा कालच्या म्हणा) तरुण रक्ताला या पिढीचे आदर्श मानवणारे नव्हते. आणि राजकारणातील एकंदरीत गलिच्छपणा या लोकांना मानवणारा नव्हता म्हणून औदासिन्य आले असावे असे वाटते. चू. भू. दे. घे.

मला वाटतयं

महाराष्ट्रात स्वातंत्र्य आणि महाराष्ट्रस्थापनेच्या काळात अनेक चांगली समाजवादी मंडळी होवून गेली आहेत.त्यातील एक ज्येष्ठ नेते प.बा.सामंत होते. जनसामान्यांसाठी सामंत, मृणाल गोरे, त्याआधी एस एम जोशी,जॉर्ज फर्नांडीस आणि आत्ता न आठवणारी, प्रसिद्धीस न आलेली अनेक असतील. अशी माणसे आता समाजवाद्यांमधे आणि इतरत्रही मिळंणे दुर्लभ झाले आहे आणि आत्ताची तरी अवस्था अशी आहे की जरी मिळाली तरी टिकणे कठीण आहे. अर्थात हे कालचक्र आहे त्यामुळे परत बदलेल अशी नक्कीच आशा आहे.

प.बा.सामंत आणि मॄणाल गोरे या जोडगोळीने अंतुले भ्रष्टाचार उघडकीस आणणे तसेच मध्यमवर्गीयांसाठी बरेच काम केले. त्यामुळे त्यांची नावे चांगली लक्षात राहीली. तेच मधु-प्रमिला दंडवते यांच्या बाबत आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्याही बाबत. यातील प्रत्येकाने जरी काही चुका केल्या असतील (सामंतांच्या संदर्भात मात्र ऐकलेले नाही) तरी त्यांच्या हेतूबाबत कधी शंका येणार नाहीत.

कार्ल मार्क्स च्या विचारसरणीला इतिहासाच्या पुस्तकात साम्यवाद असे नाव होते. साम्यवाद आणि समाजवाद हा एकच का? नसेल तर त्यांतील फरक काय?

साम्यवाद म्हणजे कम्युनिझम (मूळ सुरवात - रशिया, तत्व म्हणून सुरवात मार्क्स ने लंडनमधे केली) आणि समाजवाद म्हणजे सोशालीझम (मूळ सुरवात - फ्रान्स). दोन्हीतील मुख्य फरक म्हणजे समाजवाद हा लोकशाहीवादी आहे तर साम्यवादाला लोकशाही मान्य नाही. समाजवाद हा सरकार वाढवतो म्हणजे सर्वत्र सरकारी वर्चस्व रहाते. म्हणूनच आपल्याकडे अनेक प्रमुख संस्था या सरकारी आहेत (उ.दा.इंडीयन ऑईल, हिंदूस्थान पेट्रोलीयम, हिंदूस्थान ऍरोनॉटिक्स वगैरे).

भारतातील समाजवादाचा आणि विशेषतः महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचा इतिहास काय? ही चळवळ कशामुळे थंडावली? इत्यादी.

सर्वप्रथम थोडे अवांतर - गांधीजी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहळ म्हणायचे. पण तसेच ते दूरदृष्टी असलेल्या विविध विचारसरणीचे पण एक केंद्रस्थान होते. तसे दुसरे म्हणजे अर्थातच बंगाल. त्या संबंधात विचार केल्यास पहा, काँग्रेस स्थापना - रानडे, नंतर त्यात गोखले,टिळक वगैरे, आद्यक्रांतिकारक - वासुदेव बळवंत फडके, त्याही आधी १८५७चे स्वातंत्र्य समर - झाशीची राणी (मनू तांबे) ते तात्या टोपे, नंतर समाजसुधारणा - रानडे, आगरकर, फुले, शाहू महाराज, आंबेडकर, महर्षी कर्वे इतर अनेक, हिंदुत्ववाद - सावरकर, साम्यवाद - कोल्हटकर,डांगे आदी, रा.स्व.संघ - डॉ.हेगडेवार, नंतर गुरूजी गोळवळकर आणि सुरवातीस स्वतःचे या कार्याला जीवन संपुर्णपणे अर्पण करून भारतभर फिरलेले अनेक प्रचारक ज्यांनी कुणाला आवडो न आवडो ७५ वर्षे झाली तरी वाढत असलेली ही संघटना तयार केली. सर्वात मोठा दुर्दैवी विरोधाभास - गांधीजींना भारतीय राजकारणात आणुन एक नवीन जीवन देणारे त्यांचे राजकीय गुरू हे गोखले तर त्यांचे ऐहीक जीवन माथेफिरू होवून संपवणारा गोडसे...

असो. वरील विषयांतराचे कारण इतकेच की तत्कालीन मराठी वृत्ती यातून दिसू शकते. यात नंतर समाजवादी झालेले बहुतांशी लोकं हे गांधीजींच्या प्रभावाखालील काँग्रेसमधे कार्यरत होते. मात्र गांधीहत्येनंतर आणि पहील्या राष्ट्रीय सरकार नंतर यात फरक पडला...जसा जनसंघाच्या दिनदयाळ उपाध्यायांचा, काँग्रेसच्याच चिंतामणराव देशमुखांचा, रीपब्लीकन पक्षाच्या डॉ. आंबेडकरांचा भ्रमनिरास झाला, तसाच भ्रमनिरास हा त्यातील प्रामाणिक आणि सत्तेसाठी म्हणून राजकारण न करणार्‍या समाजवाद्यांचा झाला आणि त्यांनी प्रजासमाजवादी पक्ष स्थापला. पण उद्दीष्ट उच्च, आचार आदर्श पण राजकारण न कळणे ह्या इतर संघटनांच्या तृटी यांच्यात पण होत्या आणि देशात नेहरू, राज्यात यशवंतराव अशा व्यक्तीमत्वांपुढे महाराष्ट्रातील प्रजासमाजवादी कधी सत्तेत येऊ शकले नाहीत. सत्तेत राहणारे राज्यकर्ते होतात आणि सत्तेबाहेर राहून लोकजागृती करत राहणारे बर्‍याच अंशी चळवळेच ठरतात. त्यांच्यात बरेच कर्तुत्व असूनही त्याचा हवा तितका फायदा न धड त्यांना होतो ना धड समाजाला. फक्त आपण आदर्श आहोत, धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ आहोत हा सत्विक असेल पण अहंकारच त्यांना सुखावत बसतो. समाजवादी चळवळीचे महाराष्ट्रात हेच घडले असे वाटते.

म्हणूनच मग ते स्वतः राज्य करू शकले नाहीत आणि त्यांचा अहंकार सुखावणारे पण वास्तवात उपयोग करणारे सत्ता करत राहीले. याचे आठवणारे उदाहरण म्हणजे "पुरोगामी लोकशाही दल" अर्थात आणिबाणिनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले राज्य! नंतर मग व्हि.पि.सिंग... वास्तवीक मला कुठेतरी असे वाटते की संयुक्त महाराष्ट्र मिळण्यासाठी झटल्यानंतर आणि त्यात विजयी झाल्यानंतर निवडणूकीत मात्र काँग्रेसच्या विरोधात पराभव पत्करावा लागला जो हे नेतृत्व (एस एम, ना.ग.गोरे आदी) पचवू शकले नाहीत आणि सक्रीय राजकाराणापासून दूर राहणेच मग पसंद करू लागले. थोडक्यात नेतृत्वाला पराभवाचा पण जो काही धोका पत्करावा लागतो, त्यापासून ते कारणे विविध असतील पण ते लांब राहीले. पर्यायाने त्यांनी त्यांच्यातील नेतृत्व देऊ शकतील अशी विश्वासार्हता निघून गेली होती, परीणामी जुन्या फळितले खर्‍या अर्थाने चांगले नेते/नेतृत्व मोकळेच राहीले कारण त्यांना "फॉलोअर्सच" मिळाले नाहीत...

नंतरच्या पिढीत जे समाजवादी तयार झाले त्यांचे विचार आणि आचार हे एका अर्थी समाजात दुफळी माजवणारे ठरले.म्हणूनच समाजवादी म्हणण्यापेक्षा समाजभेदी ठरले. म्हणजे हिंदूंना नावे ठेवणे आणि अल्पसंख्यांकाचे राजकारण करायचे (जमोत अथवा न जमोत!).

बाकी मला काय म्हणायचे आहे ते आपण माझ्या आधी एका छापल्या गेलेल्या लेखात वाचू शकाल: साधना साताहीक, १२ जुलै २००८, पृष्ठ २३

समाजवाद

श्री.विकास यांनी सुंदर विवेचन केलेले आहे. मला गेल्या पन्नास वर्षात जे जाणवले ते थोडक्यात देत आहे.
१. समाजवाद ही एक विचारसरणी धरली तर त्याचा प्रभाव गांधीजी व पंडितजींवर झालेला होता. तो काँग्रेसच्या धोरणाचा भाग होता.
स्वातंत्र्यानंतर त्या धोरणाची पुरेशी अंमलबजावणी झाली नाही असे डॉ.राममनोहर लोहिया यांना वाटल्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी समाजवादासाठी चळवळीचा मार्ग धरला. समविचाराचे इतर लोक त्यांच्यासोबत बाहेर पडले.
२.कम्यूनिझम (साम्यवाद) मध्ये व्यक्तिगत मालमत्ताच असू नये. सर्व कांही समुदायाच्या मालकीचे असावे असा विचार होता. समाजवाद म्हणजे व्यक्ती स्वतन्त्र असाव्यात पण त्यांच्या संपत्तीत समानता असावी असा विचार होता. एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचे शोषण करता कामा नये हा उद्देश होता.
३.भारतातील किंवा महाराष्ट्रातील समाजवादी चळवळ तत्वाच्या मुद्यावर कधीच फोफावू शकली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीमुळे कांही काळ ती लोकप्रिय झाली आणि ती मागणी पूर्ण होताच ती थंडावली.
समाजवादी हा शब्द असलेले अनेक पक्ष निघाले, आजही अस्तित्वात आहेत, पण त्यांना समाजात समाजवाद आणण्याची तीव्र इच्छा आहे असे दिसत तर नाही.

मानवेंद्रनाथ रॉय

स्वातंत्र्यानंतर त्या धोरणाची पुरेशी अंमलबजावणी झाली नाही असे डॉ.राममनोहर लोहिया यांना वाटल्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी समाजवादासाठी चळवळीचा मार्ग धरला. समविचाराचे इतर लोक त्यांच्यासोबत बाहेर पडले.

या संदर्भात थोडी माहीती, थोडा प्रश्न : जाणकारांनी माहीती द्यावी ही विनंती.

जसा लोहीयांच्या विचाराचा प्रभाव समाजवादी विचारसरणीवर पडला तसाच काहीसा प्रभाव मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीचा आणि व्यक्तीमत्वाचा देखील पडला असे वाटते. त्यात भले भले आले असे काहीसे आठवते. सर्व नावे आठवत नाहीत पण यशवंतराव चव्हाण, गोविंद तळवळकर (माजी म.टा. संपादक) असे अनेक स्वतःला रॉयीस्ट म्हणवून घेत/घेतात.

एकदा या मानवेंद्रनाथ रॉय यांच्यावरील शिवाजीराव भोसल्यांनी लिहीलेला माहीतीपूर्ण आणि स्वतंत्र (कुठेही टिका नसलेला) लेख वाचनात आला आणि मोठ्ठा प्रश्न पडला की असल्या माणसाने ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला आदर आहे अशा व्यक्ती कशा मागे गेल्या? कारण रॉय स्वतः कम्युनिस्ट आणि रॅडीकल विचारसरणित मोडणारे होतेच (जे एखाद्या नेतृत्वाचे गूण पण ठरू शकतात) पण त्यांनी केलेली धरसोड आणि एकेरी विचार यांचा पण त्यांच्या बुद्धीवादी प्रतिमेमुळे समाजवादी नेत्यांवर प्रभाव पडला असे वाटते आणि कुठेतरी समाजा कसा पुढे नेयचा या संदर्भात द्विधा मनसःस्थिती झाली. ज्याचा परीणाम ठोस पावले न उचलणे अथवा गोंधळलेल्या मानसिकतेत झाला असावा असे वाटते.

डॉ. लोहिया...

स्वातंत्र्यापूर्वी वीसेक वर्ष अगोदर काँग्रेसवर मार्क्सवाद व लेनिनवादाचा प्रभाव असल्याचा दिसतो. काही काळ जरी काँग्रेसवर मार्क्सवादाचा प्रभाव पडत असला तरी काँग्रेसचा समाजवाद मार्क्सवादापासून जरासा वेगळा होता म्हणतात. कारण सुरुवातीची काँग्रेस उच्चविद्याविभूषित श्रीमंत वर्ग, जमीनदार, भांडवलदार उच्च जातीजमातीच्या लोकांच्या हाती होती. डॉ. मनोहर लोहिया या बाबतीत खरे समाजवादी म्हटले पाहिजेत त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान देऊनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्याला कारण म.गांधी हेच असावे. डॉ. लोहियांनी एखादा निर्णय घेतला की त्याचा विरोध म. गांधी करायचे. ' हरिजन' मधील एक उदाहरण वाचण्यात आहे की, त्यांनी 'सत्याग्रह करावे' असे म्हटले की म. गांधी म्हणायचे 'आत्ताच त्याची गरज नाही'. डॉ. लोहिया यांनी भेदभावाविरुद्ध नेहमी संघर्ष केला. म. गांधी-नेहरु यांच्याबरोबर वावरतांना जयप्रकाश नारायण आणि डॉ.लोहियांचे यांची मात्र नेहमीच गोची झाली असावी, स्वातंत्र्याच्या काही धोरणाबरोबर हेही एक कारण असावे की, डॉ . लोहिया काँग्रेसमधून बाहेर पडले.

अवांतर : ओंकारसेठ, कम्युनिष्ट जाहिरनामा; कार्ल मार्क्स / फ्रेडरिक एंगल्स या पुस्तकाचे कम्युनिष्ट पक्षाने मराठीत भाषांतर केलेले एक छोटेसे पुस्तक आहे. ते जर मिळाले तर वाचा आणि इथेही टंका. त्यावरुन काही विचार स्पष्ट होण्यास मदत होईल असे वाटते.

शाळेत स्वातंत्र्य

भारताचा इतिहास हा शाळेत स्वातंत्र्य मिळाल्यावर संपतो.

हे वाक्य आवडले आणि दुर्दैवाने ते बर्‍याच अंशी खरे आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळी आणि विचारप्रवाह याविषयी स्वतःहून मिळवल्याशिवाय माहिती मिळत नाही.

वर्तमान

हे वाक्य आवडले आणि दुर्दैवाने ते बर्‍याच अंशी खरे आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळी आणि विचारप्रवाह याविषयी स्वतःहून मिळवल्याशिवाय माहिती मिळत नाही.

हाच आपला वर्तमान आहे. तो जो वर इतिहास बनत नाही तो वर काही खरे नाही. आणि इतिहास बनायला क्रांती होण्याची गरज आहे. :) तरच इतिहास बनेल. नाहीतर जो काही इतिहास सोनिया गांधी सभांमध्ये सांगतात तोच आपला इतिहास बनुन जाईल. भारताच्या एका घराण्याने आपल्या घरचे २ सदस्य जे पंतप्रधान होते ते गमावले आणि भारताला महासत्ता (?) बनवले.






आभार

विकास,
आनंद म्हणतात त्याप्रमाणे खूपच चांगले व सविस्तर विवेचन. साम्यवाद व समाजवाद यातील फरक समजण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद.

बिरूटेसर,
पुस्तक मिळाले तर नक्की वाचेन आणि इथे जरूर लिहीन.

येथे प्रतिसाद देण्यार्‍या आणि चर्चेत भाग घेण्यार्‍या सर्वांचे आभार.

- ओंकार.

 
^ वर