या मराठीच्या ऐतिहासिक शिलेदारांची माहिती हवी आहे.

विकिवर मराठी भाषा हा लेख वाढवतो आहे. त्यात कालिक भेद हा विभाग आहे. त्यात अनेक लेखकांचा उल्लेख येतो. या लेखकांची काही माहिती आपण देऊ शकाल काय?

यादवकाल
हा काल इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगीरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळाता वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तीपर रचना केल्या व मराठी साहित्याचे दालन भाषिक वैविध्यानी समृद्ध केले. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. सांकेतिक लिपी ची सुरुवातही याच काळात झाली असावी असे मानले जाते.

बहामनी काल
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरु झाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झाल्याने मराठी भाषेत अनेक फारसी शब्दांचे आगमन झाले, जसे तारिख. अशा धामधूमीच्या काळातही साहित्याची भर मराठी भाषेत पडली. नृसिंहसरस्वती, एकनाथ, दासोपंत, जनार्दन स्वामी, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनी भक्तीपर काव्याची भर घातली.

आता या लेखकांची पाने बनवायची आहेत. पण मला काहीही माहिती मिळत नाहिये. उदा. चोंभा अथवा नागदेव यांचे कोणते लेखन होते हे ही मला माहिती नाही! ( हे आता सांगावे लागते आहे, याची मला अतिशय खंत अणि लाज वाटते).

या मराठीच्या ऐतिहासिक शिलेदारांची माहिती हवी आहे-

कृपया या माहितीत संतांचे/लेखक/कवीचे
पुर्ण नाव
जन्म - मृत्यु काल
जीवनक्रम
प्रमुख घटना
प्रमुख साहित्याची नावे
त्यांच्या साहित्याचा किमान एक नमुना देता येईल का? ( अनेकही चालतील.)

या शिवाय जालावरील बाह्यदुवे, अधिक माहिती, आवांतर माहिती तसेच आपणाला योग्य वाटेल ती ही चालेल.

या शिवाय अजून अजून या यादी व्यतिरिक्त कुणी व्यक्ति माहिती असतील तर त्या ही द्यायला हरकत नाही.

यादी खालील प्रमाणे-

गोरा कुंभार,
सावता माळी,
चोखा मेळा,
बंका महार,
सेना न्हावी,
कान्होपात्रा
चक्रधर स्वामी,
भावे व्यास,
महिंद्र व्यास,
नागदेव,
महदंबा
नृसिंहसरस्वती,
एकनाथ,
दासोपंत,
जनार्दन स्वामी,
रंगनाथ,
विष्णूदास नामा,
चोंभा

Comments

थोडी फ़ार माहिती

थोडी फ़ार माहिती " महाराष्ट्र सारस्वत " ले. वि.ल.भावे, प्रकाशक पॉपुलर प्रकाशन, येथे मिळेल. दुर्दैवाने वैयक्तिक माहिती
लिहून ठेवावयाची पद्धत पूर्वी नव्हती. त्यामुळे बहुतेक वेळी ही अंदाजेच असते. जास्त माहितीकरिता व्य.नि. पाठवा.
शरद

इथे

व्य नि पाठवतो आहेच पण इथे दिली तरी चालेल.
इतर सदस्यांनाही नवीन माहिती मिळेल असे वाटते.

-निनाद

निनाद !

निनाद, माहिती टंकायची म्हटल्यावर पुस्तके उचकावी लागतील, कंटाळवाने काम आहे !
पण मराठी विकीवर आपण खूप लेखन टाकत असतात तेव्हा आपले काम खूप मोठे आहे. तेव्हा ही थोडी भर....

'सावता माळी'

पूर्ण नाव : सावता परसूबा माळी
आई : नांगिताबाई
जन्म इ.स. १२५०, मृत्यु १२९५
जन्मगाव : अरणभेंडी ( कुठे गाव आहे, माहीत नाही )

सावता माळ्याचे एकुण २५ अभंग उपलब्ध आहेत. सेना न्हावी, नरहरी सोनार, यांच्याप्रमाणेच त्यानेही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगात नव्या शब्दांची त्यामुळे भर पडली.

कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी
लसण मिरची कोथंबिरी |अवघा झाला माझा हरि

किंवा

शांती शेवंती फुलली | प्रेम जाई जुई व्याली

व्यवसायातील प्रतिमांचा वापर करुन त्याने विठ्ठलाला सार्वत्रिक केले आहे. विठठलभक्तीपुढे ज्ञान, मान, मुक्ती तुच्छ् समजतो.
नको तुझे ज्ञान | नको तुझा मान | माझे आहे मन वेगळेचि ||
नको तुझी भुक्ती*नको तुझी मुक्ती | मज आहे विश्रांती वेगळीचि ||

सावता माळ्याचे अभंगात भावोत्कटता, अल्पाक्षरत्व, रचनेची सुलभता हे वैशिष्टे दिसतात. त्याचबरोबर ज्ञानदेव आणि नामदेवांच्या अभंगाचा प्रभाव त्यांच्या अभंगातून दिसतो.
* भुक्ती शब्द बरोबर आहे का ? तपासून घ्यावे.

सावता माळ्याचे संदर्भ : 'मध्ययुगीन मराठी वाड;मयाच्या वेचक इतिहासातून' साभार ! लेखक डॉ. विद्यासागर पाटंगणकर.

माहिती

वा. माहितीपुर्ण प्रतिसादांना सुरुवात झाली. पण माहितीमध्ये वडिलांचे नाव का नाही बरे?

बापाचे नाव परसूबा असावे

असा आपला कयास!

संदर्भासहित

चांगली माहिती दिलीत.
संदर्भासहित माहिती दिल्या बद्दल अनेकानेक धन्यवाद.
हा चांगला पायंडा आहे.

अजून प्रतिसादांची वाट पाहीन.

सगळ्याच सदस्यांना परत आवाहन करतो की , जमेल तसे आठवा, पुस्तके उचका, तज्ञ लोकांना विचारा, किर्तनकारांना विचारा पण मला ही माहिती द्या.

मराठी भाषेच्या पानावर या माहितीचे महत्त्व मोठे आहे!

-निनाद

काही शंका

मराठीचे शिलेदार
श्री.निनाद यांचा उपक्रम नक्कीच चांगला आहे. जालावर मराठी लेखकांची माहिती उपलब्ध होत असेल तर छानच आहे. पण त्यांच्या कार्यात रेखिवपणा व सुत्रबद्धता यावयास हवी आहे असे वाटते. मी माझ्या वैयक्तिक सुचना करू इच्छितो.
[१] चक्रधर स्वामी, नागदेव,नृसिंह सरस्वती,हे लेखक नाहित.
[२] रंगनाथ [जन्म : जन्म १६०२] दिलेल्या कालातला नाही.
[३] बंका महार, सेना न्हावी यांचे अभंग मिळतात पण ते संख्येने फ़ारच कमी आहेत आणि तरीही जालावर नोंद करावी इतक्या उच्च दर्जाचेही नाहित.
[४] साहित्यिक निवडावयाचा निकष कळला तर योग्य नावे [अर्थात माझ्या मते] सुचविणे सोपे जाईल.
[५] संपूर्ण नाव, जन्म-मृत्यु वगैरे माहिती बहुदा मिळत नाही, मिळाली तर त्यात एकवाक्यता नसते. फ़ार फ़ार तर अमक्याचे शिष्य, एकनाथकालीन असे म्हणावे लागते.
अशा वेळी काय करणार ?
शरद

अभंगाची संख्या आणि दर्जा

सेना न्हावी यांचे अभंग मिळतात पण ते संख्येने फ़ारच कमी आहेत
सेना न्हावी यांच्या अभंगाची संख्या पंचवीसच्या पुढे आहे.
आणि तरीही जालावर नोंद करावी इतक्या उच्च दर्जाचेही नाहित.
अहो, एक तर सेना न्हावी हा जबलपुरचा, भाषा हिंदी. तरिही, त्यांचे मराठी अभंग वाचतांना तो हिंदी भाषिक आहे, याचा मागमूसही लागत नाही. सेना यांचे अभंग सोपे आहे. खरं म्हणजे, त्यांच्या अभंगापेक्षा त्यांच्या गौळणी खूप प्रसिद्ध आहेत. कृष्ण-गोपी-यशोदा यांच्यातील संवाद मोठे चुरचुरीत आहेत. त्यांच्याबद्दलची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, बेदरच्या पातशहा अल्लाउद्दिन बहामनी याच्या पदरी असलेल्या या सेना न्हाव्याने बादशहालाही विठठलाचे वेड लावले होते.

'आम्ही वारीक वारीक । करु हजामत बारीक ' हा अभंग तर प्रसिद्ध आहे.

असो, ल. रा. नसिराबादकरांचा 'प्राचीन मराठी वाडःमयाचा इतिहास' या पुस्तकात बरीच संतप्रभावळ सापडेल !

-दिलीप बिरुटे

सहमत आहे...

तोची दिवाळी दसरा| सेना म्हणे आले घरा||
असे एका अभंगात ऐकल्याचे आठवते आहे.

पुण्याचे पेशवे

माहिती

भुक्ती .... जेवण
अरणमेंडी ... पंढरपूर जवळचे गाव
शरद

दासोपंत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मराठी साहित्य व व्याकरण (आ.८ वी,१९४७,) ले.मोरेश्वर सखाराम मोने,या पुस्तकात दासोपंतांविषयी पुढील प्रमाणे लिहिले आहे. माझ्यामते माहिती विश्वासार्ह आहे.
..................................................................................
दासोपंत(१५५१-१६१५)बेदरजवळ नारायणपेठ येथे जन्म. वास्तव्य आंबेजोगाई येथे.यानेही गीतेवर टीका लिहिली असून गीतार्णव, पदार्पण असे ग्रंथ आहेत.त्यांत प्रत्येकी सवा लाख ओव्या आहेत.त्याची रचना सुबोध,रसाळ आणि दृष्टान्तादिकांनी भरलेली आहे."पंचीकरण" हा पासोडीवर लिहिलेला ग्रंथ अद्यापि उपलब्ध आहे असे म्हणतात....(माझे मित्र प्रा.मनोहर राईलकर यांनी ही पासोडी आंबेगावी प्रत्यक्ष पाहिली असे त्यांनी मला सांगितले...यनावाला.)
या शिवाय पदे,कूटे,रचना विपुल आहे. त्याची काही पदे रागदारीत आळविण्याजोगीही आहेत.त्याचा मराठीविषयीचा अभिमान जाज्वल्य होता."संस्कृत बोलणे सेविणे|तेंचि सांडावी प्रकृत वचने|ऐसिया मूर्खा मुंडणे|किती आता||"असे तो म्हणतो.संस्कृतापेक्षा मराठी न्यून नाहीच उलट मराठीत एकेका गोष्टीकरिता जी बहुविध शब्दसंपत्ती आहे, तशी संस्कृतात कोठे आहे? असे संस्कृतवादी आणि प्राकृतवादी यांच्या संभाषणात्मक एक कथानक रचून मुद्देसूद रीतीने दासोपंताने संस्कृतवाद्याचे खंडन केले आहे. त्याचा मासला पुढे उतार्‍यात दिला आहे.
.....................................................................................

मराठीचे अभिमानी दासोपंत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

संस्कृते घटु म्हणती|आतां तया घटांचे भेद किती|
कवण्या घटाची प्राप्ती |पावावी तेणे ?||
हारा,डेरा,रांजणू |मुढा, पगडा, आनु|
सुगड, तौली,सुजाणू|कैसी बोलेल?
धडीं,घागरी, घडौली|आळंदे,वाचिके बौळी|
चिटकी मोरवा,पातेली|सांजवणे ते|
ऐसे प्रतिभाषे वेगळाले|घट असती नामाथिले|
एके संस्कृतें सर्व कळे ऐसे कैसेन?

..........................दासोपंत.
****************************************
या खाली मोरेश्वर स. मोने टीप लिहितातः "इंग्रजीवाचून मराठीचे कसे होईल , ही विवंचना पडणार्‍यांना दासोपंतांचे हे फार मार्मिक उत्तर आहे. मराठीची असलेली संपत्तीही आपण परभाषेच्या वर्चस्वामुळे कशी नष्ट करितो, हें यावरून कळून येईल."

+१

मी सर्केश्वरांशी सहमत. ;-)

सुंदर कविता

यनावाला सरांनी इथे कविता दिल्याबद्दल हार्दिक आभार. संस्कृत आणि इंग्रजी या मराठीच्या सासवा आहेत अशा अर्थाचा मं.वि.राजाध्यक्ष यांचा लेख आठवला. मात्र आता पुस्तक उपलब्ध नसल्याने काही लिहिता येत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत आहे..

दासोपंतांशी आणि सान्यांच्या विचारांशीही सहमत आहे.
पुण्याचे पेशवे

ऐसे प्रतिभाषे वेगळाले|घट असती नामाथिले|

यनावाला यांनी चांगली माहिती दिली आहे. या चर्चेच्या निमित्ताने मला खूप माहिती मिळते आहे.

थोडे अवांतर :
घटांचे भेद किती ... ऐसे प्रतिभाषे वेगळाले|घट असती नामाथिले|

दासोपंतांचे हे सोदाहण विवेचन "समानार्थी शब्द असतात का?" चर्चेत उपयोगी ठरावे.

इथे पाहा बरे

व्यक्तिपरिचय पाहा बरे, बरीच उपयुक्त माहिती दिसते.
भक्तिपरंपरा हा ही दुवा उपयुक्त ठरावा.
अभंगसंग्रह व अल्पपरिचय इथे.
संत गाडगे महाराज व इतरांची माहिती विकीवर (नीलकांतने दिली) असेलच अशी आशा आहे.

चोखा मेळा

चोखा मेळा मंगळवेढ्याचे. याच दुव्यावर इतर अल्पपरिचय मिळावेत.

 
^ वर