समानार्थी शब्द असतात का?
हल्लीच "स्वकीय/परकीय शब्दांच्या"बाबतीतल्या एका वेगळ्याच चर्चेत ही उपचर्चा सुरू झाली, की समानार्थी शब्द असतात/नसतात.
या संदर्भात गूगलता इंग्रजी व्याकरणाचे एक पुस्तक "द गुड ग्रामर गाईड" (लेखक : रिचर्ड पाल्मर, The Good Grammar Guide, by Richard Palmer) हे गूगलून वाचण्यात आले.
त्यातील "समानार्थी शब्द : तथ्य की अद्भुतरम्य कल्पना" (दुवा) या परिच्छेदाचे भाषांतर येथे देत आहे.
- - - -
समानार्थी शब्द : तथ्य की अद्भुतरम्य कल्पना
माझा अनुभव प्रातिनिधिक मानला, तर प्राथमिक शाळेत बहुतेक मुलांचा "समानार्थी शब्द" या संकल्पनेशी परिचय होतो, आणि ती माध्यमिक शाळेत जातात तोवर ही संकल्पना त्यांना साहजिक वाटू लागते. हे चांगले आहे तसे वाईटसुद्धा आहे. या प्रकारे इंग्रजीतील भाषिक पर्याय आणि प्रचंड साधनसामुग्रीच्या बाबत समज विद्यार्थ्यांना इतक्या बालपणीच यावी, हे चांगले आहे. परंतु, हे कितीका स्तुत्य असो, लहान वयात हे असे प्रशिक्षण मिळाले तर "अर्थ" या संकल्पनेबाबत हानिकारक प्रमाणात अतिसुलभ आणि ताठर समज उत्पन्न होऊ शकते.
"समानार्थी शब्द" ही खरे तर एक समस्याग्रस्त संकल्पना आहे. कन्साइझ ऑक्स्फोर्ड डिक्शनरीने (Concise Oxford Dictionaryने) व्याख्येची सुरुवात अशी केली आहे :
एका शब्दाशी समसमान अर्थव्याप्ती आणि वापराची व्याप्ती असलेला, त्याच भाषेतला दुसरा शब्द किंवा शब्दसमूह.
- आणि असाच अर्थ सामान्यपणे गृहीत घरला जातो आणि वापरला जातो. पण प्रत्यक्षात असे सोपे किंवा नेटके क्वचितच असते. शॉर्टर ऑक्स्फोर्ड इंग्लिश डिक्शनरीमधील (Shorter Oxford English Dictionaryमधील) सविस्तर व्याख्या ते दाखवून देते -
नेमका अर्थ दुसर्या शब्दाशी समसमान अर्थ असलेला शब्द... पण सामान्यपणे ढोबळमानाने कुठल्यातरी बाबतीत अर्थाचे साम्य असलेले दोन किंवा अधिक शब्द. प्रत्येकाच्या अर्थाचा काही भाग असतो जो बाकीच्यांशी सारखा नसतो. किंवा त्यांच्या अर्थच्छटांमध्ये असलेला फरक वेगवेगळ्या संदर्भांत वापर करण्यासाठी सुयोग्य असतो.
(तिरपा ठसा माझा [पाल्मर यांची टीप])
तिरप्या ठशातील व्याख्येमधून असे अनुमान करता यावे, की उघड "नागडा" समानार्थी शब्द क्वचितच भेटणारा असावा. रोजेच्या थेसॉरस मधील क्रमांक ३२ बघितला, तर "ग्रेट" बरोबर शेकड्यावर वर्णनात्मक शब्दांची यादी दिलेली आहे. परंतु त्यापैकी एकही दुसर्याचा नेमका समानार्थी शब्द नाही. आपण त्यांच्यापैकी उघड-उघड समान वाटावे अशा पाच शब्द उदाहरणादाखल घेऊया :
ग्रेट बिग लार्ज ग्रँड सुप्रीम
(great big large grand supreme)
- हे पाच एकमेकांच्या जागेवर वापरले जाऊ शकत नाहीत. पुढील साध्या सुरुवातीच्या वाक्यपंचकाने ते स्पष्ट व्हावे -
१. शी इझ अ ग्रेट रायटर.
(She is a great writer.)
२. आ'इल गेट माय बिग ब्रदर ऑन-टु यू.
(I'll get my big brother onto you
३. यू आर ऍझ लार्ज ऍझ लाइफ.
(You are as large as life.)
४. देअर ऑथॉरिटी वॉझ सुप्रीम.
(Their authority was supreme.)
५. इट वॉझ द मोस्ट ब्यूटिफुल ग्रँड पिआनो ही हॅड एवर सीन ऑर हर्ड.
(It was the most beautiful grand piano he had ever seen or heard.)
(... इत्यादि, इत्यादि. प्रत्येक वाक्यातील "महत्-वाचक" शब्दांची आदलाबदल करून झालेली अर्थहानी पाल्मर चर्चा करून सांगतात.)
- - -
संक्षिप्त ऑक्स्फोर्ड शब्दकोशाने "समानार्थी शब्द" असतात असे भासवले, तरी शब्दकोशाच्या लघु आवृत्तीत सुद्धा भाषावैज्ञानिकांना चांगला ठाऊक असलेला मुद्दा सांगितला आहे. "समानार्थी शब्द" असे क्वचितच असतात. इंग्रजीत ढोबळमानाने अर्थसाम्य असलेल्या शब्दांना वेगवेगळ्या संदर्भातच सुयोग्य अशा अर्थच्छटा असतात ते काही इंग्रजीचे वैशिष्ट्य नाही. व्याख्येतले "त्याच भाषेत" या शब्दांनी असे दिसते, की हे विवेचन कुठल्याही भाषेतल्या दोन शब्दांबद्दल आहे, इंग्रजीबद्दल नव्हे.
त्याच प्रकारे मराठीतही ढोबळ अर्थसाम्य असलेल्या वेगवेगळ्या शब्दांना वेगवेगळ्या अर्थच्छटा असतात. तशा नसाव्यात असे वाटू लागले, आणि ढोबळमानाने अर्थसाम्य असलेले हे "समानार्थी" शब्द सरसकट एकमेकांच्या जागी वापरात दिसू लागले, तो दिवस "मराठी सामान्य उपयोगातून गेली" असे निदान करण्यास पुरेसा ठरावा.
(ती चर्चा स्वकीय-परकीय मुद्द्यापासून भरकटू नये, या भाषावैज्ञानिक मुद्द्याची वेगळी चर्चा व्हावी म्हणून वेगळा चर्चाविषय सुरू केला आहे.)
Comments
उत्सुकता
चर्चाप्रस्ताव आवडला. या चर्चेत काही बोलण्याइतके मुद्दे माझ्याकडे नाहीत मात्र इतर लोक काय लिहिणार आहेत याची उत्सुकता लागून राहिली आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मेरियम-वेब्स्टर "समानार्थी" शब्दकोशाच्या प्रस्तावनेत
"सिनॉनिम" म्हणजे त्या कोशाला काय म्हणायचे आहे, त्याविषयी ऊहापोह आहे.
(दुवा)
"समानार्थी" सिनॉनिम शब्दाने "निर्दिष्ट वस्तू"एकच असते. पण त्यापुढे पान २५अ च्या सुरुवातीला ही वाक्ये आहेतः
अशा प्रकारे "अर्थ तंतोतंत एकसारखे असणार नाहीत" अशी मर्यादा हा शब्दकोश मान्य करतो, मग कुठे ढोबळपणे समानार्थी शब्दांच्या याद्या बनवण्याचे कार्य हाती घेतो.
*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*गर्हणीय रोमन चिह्ने १०%वर अनभिज्ञ अज्ञ वारतात.*
समानार्थी
समानार्थी शब्द असे काही नसतेच हे मत पटण्यासारखे आहे. एकाच अर्थाच्या एकाहून अधिक शब्दांची गरजच का निर्माण व्हावी? कालांतराने अर्थच्छटेतील नेमकेपणा नाहीसा होऊन एकाच अर्थाने दोन शब्द वापरले जाऊ लागले, असे होणे शक्य आहे असे वाटते.
ह्यावरून मनोगतावरील "समृद्धी की समृद्धता" (http://www.manogat.com/node/9071) ह्या चर्चेची आठवण झाली.
हल्ली मित्र, रवि, सूर्य, भानू, भास्कर वगैरे अनेक शब्द सूर्य ह्या अर्थी वापरले जातात. त्यातील दिनकर वगैरे विशेषणे सोडल्यास एकाच सूर्याचा निर्देश करण्यासाठी एवढे शब्द कशासाठी असा प्रश्न पडतो. अर्थात पूर्वी हे शब्द नक्की काय दर्शवत होते हे माहित नाही.
समानार्थी शब्दांतील पूर्वी अस्तित्त्वात असलेली वेगळी अर्थच्छटा शोधून काढणे हा एक संशोधनाचा व रोचक विषय होईल.
काही अपवाद सोडले तर..
काही अपवाद सोडले तर समानार्थी शब्द असे काही नसतेच हे पटण्यासारखे आहे. यासंबधीच्या मागच्या एका लेखावरच्या प्रतिसादात श्री. विनायक यांनी ज्ञानेश्वरांनी 'पर्यंत'साठी वापरलेल्या वेरी (तयाचा वेलू गेला गगनावेरी)या शब्दाचे उदाहरण दिले आहे. हा वेरी शब्द, 'पर्यंत' या संस्कृत शब्दाला समानार्थी आहे असे म्हणायला काही हरकत नाही. मराठीतला 'पावेतो' हाही त्याच अर्थी बोली-लेखी भाषेत वापरला जाणारा शब्द. परंतु मूळ मराठी असलेले दोन शब्द तंतोतंत एकाच अर्थाचे असणे दुर्मीळ आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेवेगळे लोक एकाच संकल्पनेसाठी नवीन शब्द तयार करतात आणि ते कालान्तराने भाषेत रूढ होतात, अशावेळी समानार्थी शब्द अस्तित्वात येणे शक्य आहे. सूर्य, भानु, रवि वगैरे शब्दांचे वर दिलेले उदाहरण यासाठी पर्याप्त आहे.--वाचक्नवी
काही मुद्दे
हा उतारा भाषांतरीत करून येथे चर्चेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय यांना धन्यवाद.
हा चर्चाप्रस्ताव व त्यावरचे आणि आधीच्या चर्चाप्रस्तावावरचे प्रतिसाद वाचताना डोक्यात आलेले काही मुद्दे-
१- कन्साइझ ऑक्स्फोर्ड डिक्शनरीने केलेली व्याक्या ही 'समानार्थी शब्द' याची तांत्रिक व्याख्या म्हणून शोभून दिसेल, तर मेरियम-वेब्स्टर ने केलेली व्याख्या ही तांत्रिक माहिती नसलेल्या लोकांनी लक्षात घ्यावयाची व्याख्या आहे. यातून मला असे म्हणायचे आहे की 'समानार्थी शब्द' ही तांत्रिक संकल्पना आहे. एक तांत्रिक संकल्पना म्हणून तिचा अर्थ पहिल्या व्याख्येत सांगितल्याप्रमाणे 'संकुचित व्याप्ती'चा आहे. या व्याख्येच्या व्याप्तीत अगदी नगण्य उदाहरणे बसतात. शालेय शिक्षणाद्वारे तांत्रिक माहिती नसलेल्या लोकांच्या मनात 'समानार्थी शब्दा'ची जी व्याख्या निर्माण होते, ती तुलनेने बरीच लवचिक असते. तिची 'व्याप्ती मोठी असते. गणितातील गोलात गोल दाखवून काय कशात मोजले जाते आणि काय कशाच्या बाहेर आहे हे दाखवणार्या आकृतीचा उपयोग केल्यास या दोन व्याख्यांची आकृती काहीशी अशी असेल- एक बराच मोठा गोल आहे. या गोलात दुसर्या व्याख्येप्रमाणे मानले गेलेले 'समानार्थी शब्द' आहेत, व त्यातच कुठेतरी अगदी बारीकसा, दिसेल न दिसेल एवढ्या आकाराचा एक गोल आहे, त्यात पहिल्या व्याख्येप्रमाणे मानले गेलेले 'समानार्थी शब्द' आहेत. छोट्या गोलाचा अंतर्भाव पूर्णपणे मोठ्या गोलात होतो ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
२- आता या दोन व्याख्यांमधे फरक नेमका आहे तरी काय, ते पाहू. पहिली व्याख्या दोन शब्द समानार्थी आहेत की नाही हे ठरवण्यासाठी दोन निकष वापरते- एक म्हणजे अर्थाची व्याप्ती व दुसरे म्हणजे वापराची व्याप्ती. समानार्थी भासणार्या शब्दांची अर्थाची व्याप्ती कशी वेगवेगळी असू शकते याची बरीच उदाहरणे आधी आलेली आहेत. इंग्रजीतील उदाहरणे वर चर्चाप्रस्तावात आहेत, तर मराठीतील उदाहरणे आधीच्या चर्चाप्रस्तावावर धनंजयरावांनी दिलेल्या प्रतिसादात आहेत. वापराच्या व्याप्तीची उदाहरणे मात्र फारशी आलेली नाहीत. एखाद्या शब्दाचा 'वापर' एखाद्या वाक्यात करायचा की नाही हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरते. अशा निकषांतील एक सर्वांत महत्त्वाचा निकष म्हणजे तो शब्द ज्या लिखाणात किंवा संभाषणात आपण वापरणार आहोत, त्याची प्रकृती. लिखाण किंवा संभाषण यांची प्रकृती ३-४ वेगवेगळ्या प्रकारांची असू शकते- औपचारिक, अनौपचारिक आणि जवळकीची. औपचारिक प्रकृती म्हणजे आपण कार्यालयातील व्यक्ती, अनोळखी व्यती यांच्याशी ज्या प्रकारे बोलू ती, किंवा कामकाजाशी संबंधित कागदपत्रे लिहताना, वर्तमानपत्र किंवा तत्सम अनोळखी अशा मोठ्या वाचक किंवा श्रोतृवर्गाच्या वाचनात /ऐकण्यात येऊ शकेल असे लिखाण/ संभाषण करताना वापरू ती. अनौपचारिक म्हणजे आपण मित्र,मैत्रिणींशी ज्या प्रकारे बोलू ते आणि जवळकीची म्हणजे आपण आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांशी- आई, बाबा, बहिण, भाऊ, नवरा, बायको, मुलगा, मुलगी यांच्याशी ज्या प्रकारे बोलू ते. आपल्या या चर्चेच्या संदर्भात आपले लक्ष पहिल्या दोन प्रकृतींपुरते मर्यादित ठेवणे जास्त बरे पडेल. यांतला फरक कळून घेण्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे 'मरणे' हे क्रियापद व त्याची समानार्थी क्रियापदे- जाणे, देहावसान होणे. वर्तमानपत्रात मरणे किंवा जाणे ही क्रियापदे कदापि वापरली जात नाहीत. तेथे देहावसान होणे,धारातीर्थी पडणे, मृत्यू होणे अशीच शब्दयोजना केली जाते. नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती, मित्रमंडळ यांच्याशी संभाषण करताना 'जाणे' आणि 'मरणे हीच क्रियापदे वापरली जातात. अशाप्रकारे आपण मरणे, जाणे आणि देहावसान होणे या क्रियापदांत फरक केला. आता तुम्ही म्हणाल- धारातीर्थी पडणे, मृत्यू होणे हे वाक्प्रयोगही देहावसान होणे ला समानार्थी आहेत व एकाच प्रकृतीच्या लिखाणात वापरले जातात, त्यांच्यात फरक करता येणार नाही. परंतू या तिन्हींतही फरक करता येतो. एखाद्या बड्या राजकारण्याचा किंवा लोकप्रिय कलाकाराचा मृत्यू झाला तर वर्तमानपत्रात त्यासंबंधी बातमी देताना शीर्षकात म्हटले असेल 'अमुक तमुक यांचे देहावसान'. जर एखाद्या अपघातात किंवा घातपाती कारवायांत मोठी ओळख नसलेली सर्वसामान्य माणसे मारली गेली, तर 'अपघातात १५ जणांचा मृत्यू' अशी बातमी येते. देशाचे रक्षण करण्यासारखे उदात्त कार्य करताना जर कोणाला मृत्यू आला, तर ना त्याचे देहावसान होते, ना मृत्यू होतो. तो धारातीर्थी पडतो. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तिची ओळख व कार्य हा निकष अशा वाक्र्पयोगांचा 'वापर' करायचा की नाही हे ठरवताना वापरला जातो. 'जाणे' आणि 'मरणे' या क्रियापदांचा वापर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीकडे पाहण्याचा बोलणार्या व्यक्तीचा दृष्टीकोन यावरून ठरत असतो.
याखेरीजही 'वापर' या संकल्पनेला आणखी एक कंगोरा आहे. अनौपचारिक लिखाणात किंवा संभाषणात बरेच विभाग करता येतात. जसे सर्वसामान्यांसाठी केलेले अनौपचारिक लिखाण व त्या त्या विषयांतील तज्ञांसाठी केलेले माहितीपूर्ण व तांत्रिक संज्ञांनी युक्त असे लिखाण. उदाहरणार्थ - एखाद्या फुलाचे रोजच्या वापरातले नाव व त्याचे शास्त्रीय नाव. यांचा अर्थ एकच असतो, पण रोजच्या संभाषणात शास्त्रीय नाव वापरले जात नाही व तज्ञांच्या लिखाणात रोजच्या वापरातले नाव वापरले जात नाही.
याच संदर्भात आणखी एक उदाहरण 'रवि' आणि 'सूर्य' या प्रथमदर्शनी समानार्थी वाटणार्या शब्दांचे. हे खरे आहे की रवि आणि सूर्य या दोन्ही शब्दांवरून 'सूर्य' या एकमेव तार्याचा बोध होतो, परंतू 'रवि' हा शब्द ज्योतिषविषयक चर्चेत वापरला जातो. 'आठव्या घरात रविचे आगमन झाले आहे' असे काहीसे म्हटले जाईल, 'आठव्या घरात सूर्याचे आगमन झाले आहे' असे नाही. त्याचप्रमाणे रोजच्या बोलण्यात 'आज लवकर उठलास? आज भास्कर कुणीकडून उगवला पाहू दे तरी' किंवा 'आज लवकर उठलास? आज भानू कुणीकडून उगवला पाहू दे तरी' किंवा 'आज लवकर उठलास? आज दिनकर कुणीकडून उगवला पाहू दे तरी' असे न म्हणता 'आज लवकर उठलास? आज सूर्य कुणीकडून उगवला पाहू दे तरी'े असेच आपण म्हणू.
आता यावरून पुन्हा आपण गोलांच्या आकृती काढून पाहू. त्यासाठी आपण सूर्य आणि रवि हे दोन शब्द घेऊ. दोन शब्दांचे दोन गोल, ते एकमेकांत गुंतले आहेत, जेणेकरून मधला भाग हा दोन्हींत समाविष्ट होईल. हा मधला भाग म्हणजे या दोन्ही शब्दांकडून निर्दिष्ट होणारी वस्तू- सूर्य हा तारा. व बाहेरचे दोन्ही एकमेकांपासून वेगळे भाग म्हणजे त्या शब्दांच्या वापरामुळे त्या शब्दांत पडलेला फरक.
या उदाहरणांवरून 'शब्दांचा वापर' व त्यांची 'व्याप्ती' ही संकल्पना स्पष्ट झाली असेल असे वाटते. असे आणखी मुद्दे लक्षात येतील तसे इथे देईनच.
माहितीपूर्ण
आणि उदाहरणांमुळे स्पष्ट झालेले विश्लेषण आहे.
समानार्थी
एकाच अर्थाच्या शब्दांबाबत असे ऐकले आहे की जी गोष्ट एखाद्या संस्कृतीमध्ये मुबलक असते तिला अनेक नावे असतात. याचे प्रसिद्ध उदाहरण एस्किमोंमध्ये बर्फाला बरीच नावे आहेत. याचे एक कारण असे दिले जाते की त्यांचा नेहेमी बर्फाशी संबंध येतो त्यामुळे त्यातील वेगवेगळे प्रकार (जसे की ओला बर्फ, कोरडा बर्फ इ.) ओळखण्यासाठी त्यांना वेगवेगळी नावे लागतात.
याच प्रकारे मराठीत नात्यांसाठी बरीच नावे आहेत. इंग्रजीत कझिन म्हणून थांबतात, आपल्याकडे मावसभाऊ, मामेभाऊ, चुलतभाऊ, आतेभाऊ वगैरेंवरून कोडीसुद्धा तयार होतात.
याउलट जपानी भाषेत कुठलीही वस्तू मोजताना ती वस्तू कोणती आहे यावरून आकड्यांची नावे बदलतात! (हे अर्धसत्य आहे, मूळ आकडा तोच रहातो पण त्याला जोडून येणारे शब्द बदलतात.)
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
समानार्थी ? छॆ, छे,जवळचे.
समानार्थी शब्द असतात का ?
फ़ार वर्षांपासून हा प्रश्न पडला होता. मला वाटते ह्याचे उत्तर शब्दकोश पाहून मिळण्यासारखे नाही. कसे ? शब्दकोश अर्थ देतात. पण अर्थांच्या छटा उलगडवून दाखवण्यास ते असमर्थ असतात. त्या साठी तुम्ही प्रतिभावंत लेखकाने शब्दाचा उपयोग कसा केला आहे त्याचा अभ्यासच करावयास पाहिजे. गेली पन्नास वर्षे मी आवडीने कविता वाचत आलो आहे. आपल्याला आवडलेली कविता का आवडली याचा विचार करावयास सुरवात केली. तेव्हा सुरवातीला समधर्मी मित्रांबरोबर चर्चा करावयाचो. मग लक्षात आले
की हे आंधळ्याने आंधळ्याला वाट दाखवण्यासारखे आहे. मग सत्यकथा सारख्या मासिकामधील कविता संग्रहांची रसग्रहणे नियमितपणे वाचू लागलो. हळूहळू कळू लागले कवितेतले मर्म हाती लागावयास हवे असेल तर कवीने कवितेतला प्रत्येक शब्द का वापरला आहे, तेथे दुसरा शब्द बसवता येईल का याचा विचार केला पाहिजे. मग तो छंदच लागला.याचा फ़ायदा असा झाला की की समानार्थी शब्द शोधावयाची सवय लागली. आणि ... हे महत्वाचे .. कळू लागले की असा प्रयत्न करताना पर्यायी शब्द बहुतेक वेळी चालत नाही. कवीला जे सांगावयाचे असते, जे त्याला अभिप्रेत असते, त्या करिता एकच शब्द योग्य असतो. कवीने तो शब्द जाणून बुजुन वापरला असेल वा त्याच्या प्रतिभेने / शब्दप्रभुत्वाने निवडला गेला असेल; त्याला पर्याय शोधणे अवघड जाते. पर्यायी शब्दाने कविता ’ हरवते ’, विस्कटते. तीची लय, तीचा भाव, एकात्मता, सर्व बदलून जाते. श्रेष्ठ कवी शब्द निवडताना श्रम घेत असावा किंवा ती ईश्वराची देणगी असावी. कुमुदिनी काय जाणे तो परिमल ! आपण फ़क्त स्वाद घ्यावा.
[कविते मधील डावे-उजवे निवडावयाला एक सोपा नित्कर्ष .... कोणत्याही कवितेतील ३-४ शब्द तुम्ही कवितेला हानी न आणता बदलू शकलात तर ती कविता फ़ार श्रेष्ठ नव्हे.]
[किंवा तुम्ही त्या कवीपेक्षा श्रेष्ठ अहात, कालिदास आठवतो ?]
शरद
वास आणि गंध
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अजून माती लाल चमकते
खुरट्या बुंध्यावरी चढून
अजून बकरी पाला खाते."
....
हे कडवे वाचल्यावर यांत वास शब्दाच्या जागी गंध हा शब्द अधिक शोभला असता, समर्पक ठरला असता, असे वाटले. मग कवी बा.सी. मर्ढेकर यांनी इथे वास शब्द का योजला असेल याचा विचार करू लागलो तर 'कवीच्या डोक्यात तेव्हा वास शब्द आला म्हणून त्यांनी तो वापरला.गंध आधी आठवला असता तर तो वापरला असता." या पलीकडे काहीच सुचू शकले नाही.
गंध आणि वास
गंध आणि वास ह्या दोन्ही शब्दांचे सर्व अर्थ एकसारखे नाहीत. त्यामुळे 'त्या' दृष्टीने हे समानार्थी नाहीत. गंध या शब्दात जे माधुर्य आणि कोमलता आहे ती वास मध्ये नाही. म्हणून कदाचित, या कवितेत गंध अधिक शोभला असता. तरीसुद्धा, फुलांचा वास घ्यावा लागतो, गंध घेता येत नाही, गंध येतही नाही, तो फक्त पसरतो किंवा दरवळतो. इथे 'येतो' हे क्रियापद वापरल्याने कवीला वास आधी स्फुरला असावा. --वाचक्नवी
गंध भरून कळ्यांत
बा. सी. मर्ढेकरांच्या मनात कधी "वास" शब्द येत असे, तर कधी "गंध" शब्द येत असे. माझ्या मते तरी त्या शब्दांच्या पडसादांत फरक आहे.
आला आषाढ श्रावण मध्ये ही कडवी वाचायला मिळतात :
ही कविता एक निखळ आनंददायी निसर्गवर्णन सांगते.
"अजून येतो वास फुलांना" हे कडवे यनावाला यांनी वर दिलेलेच आहे.
त्या कवितेत सुंदर आणि बीभत्साला (नागडे पोर, भूकंप, युद्ध वगैरेंचा उल्लेख पुढील काही कडव्यांत येतो) बाजूबाजूला ठेवून विरोधाभास अधोरेखित केलेला आहे. पुढील काही ओळी अशा आहेत :
येथे "तरीही" शब्दाने तो विरोधाभास आहे, हे स्पष्टच सांगितले आहे.
"वास" आणि "गंध" या पर्यायांपैकी कवीने वेगवेगळे निवडण्याची गोम मला यात आहे असे वाटते - त्या दोन कवितांचे स्थायी रस वेगवेगळे आहेत.
मला असे वाटते, की "वास" शब्द कधी चांगला/वाईट/वेगळाच या सर्व संदर्भात वापरलेला चालतो. सुटा "गंध" मात्र चांगल्या ठिकाणी अधिक शोभतो ("सुटा" का म्हटले? "दुर्गंध" असा एक शब्द आहे म्हणून.). अन्यत्र थोडा विचित्र वाटतो.
"रानफुलाचा उग्र वास", "खमंग फोडणीचा वास", "कसला तरी वास येतो आहे", "वास मारतंय" वगैरे ठिकाणी "गंध" शब्द मला तितका आवडत नाही. (कदाचित उगाळलेल्या चंदनाला "गंध" म्हणतात म्हणून "कणिक आंबल्याचा गंध" वगैरे मला म्हणवत नाही...)
मनाची अशी चीरफाड झाल्यानंतर "तरीही येणारा" त्या फुलांचा वास तितका सुंदर वाटत नाही, मातीचा लाल रंग रक्तरंजित वाटतो... म्हणूनच तर "खुरट्या" हा काटेरी, जिभेला बोचणारा शब्द योजलेला आहे. पहिल्या कडव्यात दिसणारे शांत ग्रामीण दृश्य फक्त "तरीही" शब्द घालून, कडव्यातले बाकी शब्द जसेच्या तसे ठेवून कसेनुसे करते. असे दुधारी शब्द मर्ढेकरांनी "उगीच कुठला शब्द मनात पहिला आला" म्हणून योजले असतील असे वाटत नाही.
बा. सी. मर्ढेकरांनी आयुष्यभरात मोजक्याच कविता लिहिल्या आहेत. त्यातही एका कवितेला मित्रामित्रांमध्ये म्हणण्यासाठी रचलेली, म्हणून वाचकाची माफी सुद्धा मागितली आहे. त्यांच्या कवितांमधले बहुतेक शब्द तावून-सुलाखून योजले असावेत असे मनोमन वाटते.
"शब्द अदलता-बदलता येत नाहीत" या कसाला उत्तम कविताच उतरतात, या शरद यांच्या विचाराशी मी सहमत आहे. या ओळीच्या संदर्भातही आपले मत त्यांनी सांगावे, ही विनंती.
समानार्थी शब्द
एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे तसेच एकाच वस्तूला अनेक शब्द असणे हे कोणत्याही भाषेचे समृध्दीचे लक्षण समजले जाते. यामधे कदाचित संस्कृतचा बराच वरचा क्रमांक लागेल.
संस्कृत मध्ये समानार्थी शब्द अनेक सापडतात. उदाहरणार्थः पृथ्वी या अर्थी एक अक्षरी शब्दापासून चार अक्षरी शब्दापर्यंत अनेक शब्द सापडतात. भू, धरा, भूमी, वसुंधरा इत्यादी. अर्थात या सर्व शब्दांची व्युत्पत्ती एकेका उपयोगानुसार किंवा गुणविषेशानुसार आहे. पूर्वी गुरू कडून शिष्याला मौखिक स्वरूपात ज्ञान प्राप्त होत असे. हे ज्ञान श्लोकांच्या स्वरूपात म्हणजेच गेय स्वरूपात दिले जाई. यामुळे सहजच लक्षात ठेवणे सोपे जात असणार. प्रत्येक श्लोक एका विशिष्ठ वृतात बांधलेला असे. त्या वृतात योग्य अश्या शब्दांची योजना करणे यासाठी अश्या समानार्थी शब्दांची योजना केली असावी.
याचा अजून एक उपयोग जगद्गुरू शंकराचार्यांच्या वैदिक गणितात केलेला आहे. देवनागरी अक्षरांचा उपयोग एका कूट भाषेसारखा करता येतो. मोठ्या संख्या लक्षात ठेवणे फार कठीण असते. जर वैदिक गणितात सांगितलेली युक्ती वापरली तर एक श्लोक पाठ केला की ती संख्या सहज लक्षात राहू शकते.
खालील श्लोक ही कूट भाषा कशी आहे ते सांगतो.
का दि नव टा दि नव
पा दि पंचक या दि अष्टक
क्ष शून्यम्.
याचा अर्थ असा: सर्व अक्षरांना प्रत्येकी एक अंक दिला आहे. त्याचे कोष्टक पुढील प्रमाणे:
क पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: क = १ ख = २ ग = ३ घ = ४ ङ = ५ च = ६ छ = ७ ज = ८ झ = ९
ट पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: ट = १ ठ = २ ड = ३ ढ = ४ ण = ५ त = ६ थ = ७ द= ८ ध = ९
प पासून पाच असे क्रमाने १ ते ५: प = १ फ = २ ब = ३ भ = ४ म = ५
य पासून आठ असे क्रमाने १ ते ८: य = १ र = २ ल = ३ व = ४ स = ५ श = ६ ष = ७ ह = ८
क्ष = ०
यात कोणत्याही जोडाक्षरात अर्धे अक्षर विचारात घेतले जात नाही.
पाय (= २२/७)या ग्रीक अक्षराची २१ दशांश स्थळापर्यंत किंमत एका श्लोकात सांगितली आहे. यातील पहिल्या चरणात कृष्णाची स्तुती आहे व दुसर्या चरणात शंकराची स्तुती आहे. मला त्याचा थोडासा भाग आठवतो आहे. जाणकारांनी कृपया पूर्ण करावा. मला आठवला तर मी नक्की सांगेन.
गोपिभाग्यं मधुव्रात.....?????
गो ग ३
पि प १
भा भ ४
ग्यं - अर्धे अक्षर न घेता य घ्यायचा य १
म म ५
धु ध ९
व्रा - व् + र म्हणून र घ्यायचा र २
त त ६
= ३१४१५९२६
या पध्दतीने आपण कोणतीही मोठी संख्या श्लोक बध्द करून सहज लक्षात ठेऊ शकतो.
नितीन
शब्दांचे आयुष्य
धनंजय
मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत नाही.
तार्किक व गणिती दृष्टीने तुमचे म्हणणे योग्य असले तरी भाषा ही एक जिवंत गोष्ट आहे आणि ती तर्क नि गणित यांच्या पलीकडची आहे असे माझे मत आहे.
मला वाटते की प्रत्येक शब्दाला कालमानाप्रमाणे एक मर्यादित आयुष्य असते. जेव्हा त्याची निर्मिती किंवा प्रचलन होते तेव्हा त्याची आवश्यकता असते म्हणूनच तो येतो. त्यावेळी त्याची स्थिती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विशिष्ट अर्थछटा धारण केलेली असते व त्याला प्रतिशब्द असू शकत नाही. पण जसा काळ बदलतो, माणसे जन्मतात व मरून जातात तसे त्या शब्दाचा वापर करणारे लोकही बदलतात. मग त्या शब्दाचा तोच अर्थ तितक्याच तीव्रतेने रहात नाही व त्याचे रूपांतर जवळपासच्या पण एका सामान्य अर्थ धारण करणार्या शब्दात होते - त्या शब्दाची मूळची झगझगीत वस्त्रे मळतात आणि तो व इतर कितीतरी असे मळकट वस्त्रधारी शब्द सारखेच दिसू लागतात. या अवस्थेत हे सर्व शब्द एकमेकांचे प्रतिशब्द म्हणून वापरले जाऊ शकतात. सूर्य, मित्र, सविता, भास्कर, मरीचि या शब्दांना मूलतः वेगवेगळ्या छटा असतीलही पण जर मला (म्हणजे तो/ते शब्द वापरणार्याला) त्या माहीत नसतील किंवा त्या प्रचारातून गेल्या असतील तर हे सर्व व्यवहारतः एकमेकांचे प्रतिशब्दच झाले नाहीत का? मग कालांतराने यातील काही शब्द त्यांचे त्यांचे आयुष्य संपून मरून जातील व पुन्हा एकदा एका टिकलेल्या शब्दाला प्रतिशब्द नाही अशी अवस्था होईल. असे शब्दाचे संपूर्ण जीवनचक्र डोळ्यासमोर आणले की तुमचा प्रश्न उरत नाही असे मला वाटते.
शब्द त्या विशिष्ट छटेने निर्माण होतात ते हल्ली कित्येक वेळा हेतुपुरस्सर केले जातात असे मला वाटते (उदा. तस्कर) पण तो स्वतंत्र विषय झाला.
- दिगम्भा
(सहमत आहात असे वाटते)
यात तुमची-माझी सहमती तुमच्या शब्दांत सांगत आहात असे मला वाटते.
एका भाषेतल्या जिवंत बोलीतल्या शब्दांना दुसर्या कालबाह्य बोलीत, किंवा दुसर्या भाषेत प्रतिशब्द असतात, याबाबत मी सहमत आहे. समानार्थी भासणारे शब्द मृतप्राय असतात, अथवा समानार्थी भासणारे शब्द ज्या संकल्पनांबद्दल असतात, त्या संकल्पना कालबाह्य होत चालल्या असतात असे काही तुमचे म्हणणे आहे, त्याबद्दल मी सहमत आहे.
"सूर्य, मित्र, सविता, भास्कर, मरीचि" हे सूर्यनमस्कार घालताना म्हणतात खरे. पण कुठल्या मित्राशी गप्पा मारताना "सविता काय रणरणतोय्!" हे शब्द वापरलेत तर लोक विचित्र नजरेने बघतील किंवा वर्तमानपत्रासाठी आजच्या महत्व वाटणार्या सूर्य-संकल्पनेबाबत लिहिताना "मरीचीच्या रश्मींची ऊर्जा वापरली तर कोळशाचे प्रदूषण कमी करता येईल", असे लिहिले तर संपादक शब्द बदलण्याबद्दल आग्रह धरेल.
काही शब्दांच्या छटा धुवट झाल्या असतात. ते "प्रति"शब्द वापरण्यापासून आजूबाजूच्या मराठी भाषकांची चेष्टा आपल्याला परावृत्त करते. (माझ्या मते हे योग्यच आहे.)
त्या अर्थी व्यवहारतः ते एकमेकांचे प्रतिशब्द नसावेत. व्यवहारात "सूर्य माथ्यावर आलाय्" म्हटले तर माझा मित्र संवाद चालू ठेवतो ("चला जेवायला बसू!" किंवा "काय उकडतंय्!"). त्याअर्थी मला अपेक्षित संदेश त्याच्यापाशी पोचला आहे. "सविता माथ्यावर आलाय्" म्हटले तर तो भिवया उंच करतो (किंवा "कैच्याकै काय बोलतोय्स्" असे म्हणतो). त्या अर्थी मला अपेक्षित संदेशापेक्षा वेगळाही काही संदेश पोचला असावा हे स्पष्टच आहे. तुमचे उत्तम मराठी बोलणारे मित्र यावेगळा व्यवहार करतील अशी तुमची असहमती आहे का?
मला वाटते, इथे तुम्ही आणि मी तर्क किंवा गणित वापरत नाही, निरीक्षण (लोक चेष्टा करतात, लोक अमुक वापरतात, वगैरे) सांगतो आहोत.
सहमती, पण ...
तुमचे म्हणणे नेहमीप्रमाणे अचूक आहेच, त्याबद्दल नेहमीप्रमाणेच "धन्य, धन्य" असे मी मनातल्या मनात म्हणून पुढे जातो.
मला जास्त भर देऊन असे सांगायचे होते -
कोणत्याही काल = क१ या क्षणी पाहिले तर ढ या जवळपासच्या अर्थाने ढ१, ढ२, ... असे काही शब्द प्रचारात असतात (म्हणजे फक्त बोलीपुरते मर्यादित नव्हे तर बोलणे, लिहिणे, वृत्तपत्रीय लिखाण, कविता/ललित, भाषणे, दूरचित्रवाणीवरील बातम्या, निवेदने या सर्वांचा समुच्चय/युनियन पहावा. अजूनही वृत्तपत्रीय लेखांत भास्कर, सविता, सहस्ररश्मी वगैरे शब्द वापरलेले चालतात अशी माझी समजूत आहे).
थोडक्यात ढ जवळजवळ ईक्वल्स {ढ१, ढ२,...} म्हणजेच व्यवहारात ढ = {ढ१, ढ२,...} त्याअर्थी प्रतिशब्द असतात असे माझे प्रतिपादन होते/आहे. (मृतप्राय असले तरी मृत नव्हेत)
आता त्याच क्षणी ठ१ नॉट् ईक्वल टु ठ२ नॉट् ईक्वल टु ठ३ असे इतर काही शब्दही असतातच (जिवंत व सुदृढ). पण त्यामुळे प्रतिशब्द असतात हे असिद्ध होत नाही.
अर्थात् काल = क२ या क्षणी ते ते शब्द त्यांच्या त्यांच्या जीवनावस्थेप्रमाणे दुसर्या वर्गातून पहिल्या वर्गात जातीलही.
(तुमच्या लेखाला गणिती किंवा तर्काधारित म्हणण्याचे कारण म्हणजे त्यात अ आणि ब वेगळे असले तर अ नॉट् ईक्वल टु ब अशी काहीतरी युक्लीडियन वा मिनिमॅलिस्ट् ट्रीट्मेंट् मला भासली - काहीसे पाचवे गृहीत नाकारण्यासारखी. आता वाटते कदाचित् हा माझा पूर्वग्रहदूषित विचारही असेल.)
- दिगम्भा
दासोपंताची याबाबत कविता
अन्यत्र (येथे) यनावाला यांनी दिली आहे.
***********************************
कवण्या घटाची प्राप्ती |पावावी तेणे ?||
हारा,डेरा,रांजणू |मुढा, पगडा, आनु|
सुगड, तौली,सुजाणू|कैसी बोलेल?
धडीं,घागरी, घडौली|आळंदे,वाचिके बौळी|
चिटकी मोरवा,पातेली|सांजवणे ते|
ऐसे प्रतिभाषे वेगळाले|घट असती नामाथिले|
एके संस्कृतें सर्व कळे ऐसे कैसेन?
..........................दासोपंत.
****************************************
घटांचे भेद किती ... ऐसे प्रतिभाषे वेगळाले|घट असती नामाथिले|
दासोपंतांचे हे सोदाहण विवेचन या चर्चेतही उपयोगी ठरावे.
प्रत्येक शब्दामध्ये वेगळाले भेद आहेत, अशा प्रकारे वेगवेगळे नामकरण केले आहे.
पैकी काही प्रकारांमध्ये भेद सूक्ष्म असेल.
संस्कृत म्हणजे काय...
प्रतिसादातील संस्कृत म्हणजे काय आणि प्राकृतचे विवेचन आवडले !
बाकी उरलेला प्रतिसाद दोन घोट घेतल्यावर (पाण्याचे ) मग वाचीन म्हणतो !
शेवटचा पॅरा..तुमच्यासाठी आहे का ? ओके, आम्ही उगाच मनाला लावून घेतले होते:)
-दिलीप बिरुटे
सहमत पण..
श्री. टग्या यांच्या तर्कशुद्ध युक्तिवादाशी सहमत आहे. तरीही संस्कृतचे अभिमानी लोक शतकानुशतके* मराठीला हीन भाषा म्हणून कमी लेखत असतील तर मराठीच्या अभिमान्यांनी संस्कृतबद्दल थोडेसा अतिशयोक्तिपूर्ण युक्तिवाद करणे हे स्वाभाविक मानले पाहिजे. अगदी एकनाथांनीसुद्धा "संस्कृत देवापासून तर मराठी काय चोरापासून झाली?" असा संतप्त प्रश्न केला होता.
या ठिकाणी दीवार चित्रपटातला अमिताभ आणि शशीकपूर यांच्यातला संवाद आठवतो.
"मेरे पास पैसा है, बंगला है, गाडी है, शौहरत है तुम्हारे पास क्या है?"
या अमिताभच्या प्रश्नावर शशी कपूरने दिलेल्या "मेरे पास मां है" या उत्तराला आपण सफरचंदे आणि संत्रे यांची तुलना असेच म्हणणार का?
विनायक
*गीतारहस्य लिहिताना लोकमान्य टिळकांनी विनोबांजवळ एकही मराठी गीताटीका न वाचल्याची कबुली ही मी याच प्रकाराचे उदाहरण मानतो.
ह्यावरून आठवले
छान. ऑबेजेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगचा फंडे इकडे अगदी चपखल बसतात नाही.
ह्या भांड्यांवरून मराठी अभ्यास परिषदेच्या भाषा आणि जीवन ह्या त्रैमासिक पत्रिकेच्या दिवाळी २००८ अंकातले
१. स्वयंपाकघरातील हरवलेले शब्द
२. हद्दपार शब्द
हे लेख आठवले. आवर्जून वाचावेसे आहेत.
नाही
एकाच 'अर्था'चे दोन भब्द एखाद्या भाषेत असत नाहीत, असल्यास त्यातील एक लोप पावतो असे वाचल्याचे स्मरते (बहुदा फ्रंटलाईन). त्यावेळी ही ते पटले होते.
सामान्यतः समानार्थी समजले जाणारे शब्द १. एकाच वस्तूची (वेगवेगळ्या अर्थाची) विशेषणे असल्याचे किंवा २. एकाच संकल्पनेच्या वेगवेगळ्या छटा दर्शवणारे असल्याचे दिसते.
भाषाशास्त्र म्हणते !
दोन वेगवेगळ्या रुपांना एकच अर्थ असतो तेव्हा समानर्थता होते. हा समानार्थ सांकल्पनिक अर्थाच्या दृष्टीनेच असतो.
उदा. शिक्षक , गुरुजी, मास्तर, अध्यापक, हे शब्द सांकल्पनिक अर्थाच्या पातळीवर समान अर्थ व्यक्त करतात. परंतु त्याचे गुणदर्शक आणि शैलीगत अर्थ वेगवेगळे असतात.
मनुष्य- मानव- माणूस
स्त्री- पत्नी- मंडळी- कुटूंब-धर्मपत्नी- बायको
माता-आई-माय-माऊली-जन्मदात्री
भाषाशास्त्र मानते की, एकाच शब्दरुपाला अनेक अर्थ असतात. हे अनेक अर्थ त्याच्या सोबत येणार्या शब्दामुळे येतात. त्या शब्दाचे साहचर्य त्याच्या रुपात बदल घडवून आणते.
साल -(वर्ष) - साल (झाडाची)
खोली ( खोलपणा)- खोली ( राहण्याची )
कोणत्याही शब्दाचा अर्थ परंपरेने पुढे आलेला असतो. त्या त्या भाषेत शब्दामधे जाणवणारे अर्थ आणि त्याच्या संकल्पनेची क्षेत्रे वेगवेगळी असतात . त्याचबरोबर शब्दांचा अर्थ तेथील समाज आणि संस्कृतीवरही अवलंबून असतो . असे असले तरी भाषाविज्ञानाच्या पातळीवर
समानार्थी शब्दांचे रुप स्पष्ट होत नाही. म्हणून धनंजयचा मुद्दा अधिक पटणारा आहे !
-दिलीप बिरुटे
एक शब्द वेगळ्या भाषा
साल -(वर्ष) - साल (झाडाची)
यामधील साल (वर्ष ) हा अरबी/फारसी शब्द आहे तर साल (झाडाची) हा मराठी. तसेच दुसरे उदाहरण "काम"या शब्दाचे. मराठीमध्ये "काम" हा शब्द "कार्य"या अर्थाने आणि संस्कृतातल्या "काम क्रोध मद मोह मत्सर" यातील काम यापेक्षा वेगळ्या अर्थाने वापरतो. "कार्य" या अर्थाने वापर हा अरबी/फारसीतून आला आहे असे वाटते. आपला जुना शब्द म्हणजे काज. म्हणूनच कामकाज अर्थात् काम म्हणजे काज असा (बाजारहाट. जमाराशि, खर्चवेच याप्रमाणेच) अर्थ सांगणारा समास असावा असे वाटते.
चूकभूल द्यावी ध्यावी.
विनायक
काज़
काज़ हा शब्द अरबीत काज़े या अर्थानेच आला आहे असे दिसते आहे. हिंदीतला काज हा संस्कृतोद्भव असून त्याचे अर्थ कार्य, हेतु, व्यवसाय आदी आहेत, असे शब्दकोश सांगतो.--वाचक्नवी.
देशी
श्री. टग्या
आपली देशी शब्दाची व्याख्या समजून घ्यायला आवडेल. माझे मत असे:
'काज' हा देशी शब्द नसून 'कार्य'वरून उद्भवलेला तद्भव शब्द असावा असे वाटते.
ज्ञानेश्वर "जेव्हा देशियेचे लावण्य | हिरोनि आणिले तारुण्य" असे लिहितात तेव्हा त्यांना देशी म्हणजे प्राकृत (संस्कृत शब्दांचा अपभ्रंश झालेल्या शब्दांसहित) असे अपेक्षित असावे. म्हणजे जसेच्या तसे आलेले संस्कृत (किंवा आता अरबी/फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज) शब्द वगळून जे शब्द आहेत त्यांना देशी म्हणायला हरकत नाही. परकीय शब्दांचे अपभ्रंश झालेले शब्द जसे तिकीट, हपीस वगैरे शब्द देशी समजायला हरकत नाही.
विनायक
समानार्थी
अवांतर आणि उशिरा प्रतिसाद.
कुठल्यातरी दोन विद्वानांमधील संवाद म्हणून हा वाचला होता.
प्रश्न: भाषेत एकाच अर्थाचे अनेक शब्द का असतात?
उत्तर: कारण मूर्ख लोक भाषेचा वापर करतात. ते वेगवेगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत असे समजतात.
प्रश्न: एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ का असतात?
उत्तर: कारण चतुर लोक भाषेचा वापर करतात. ते तोच शब्द वेगळ्या अर्थाने वापरला आहे असे भासवतात.