मराठी भाषेतील अभारतीय शब्द्
(सध्या इथे प्रमाणभाषा,बोलीभाषा, शब्द, नवशब्दनिर्मिती, शुद्धलेखन अशा विषयांवर चर्चा चालू आहे, त्या अनुषंगाने)
***************************************************
अभारतीय शब्द
"लौकिकदृष्ट्या भारत स्वतंत्र होऊन पन्नास वर्षे उलटली.आम्ही स्वतंत्र झालेले दिसत असलो तरी मानसिकरीत्या मात्र अरबी, फ़ारसी आणि इंग्रजी शब्दांचा विळखा मराठीच्या गळ्याभोवती करकचून आवळला गेला आहे.तो परावलंबित्वाचा विळखा सोडविणे आजही अपल्याला जड जात आहे.कित्येकांना तर तो प्रेयसीचा विळखा वाटतो आहे.आमच्या भाषेविषयीच्या न्यूनगंडाने आम्हाला पछाडले आहे.आमची मने इतकी मारली गेली आहेत की आम्हाला स्वत्वाचाच विसर पडत चालला आहे.आमच्या भाषेतील परकीय शब्द म्हणजे आमच्या तत्कालीन राजांच्या पराजयाची प्रतीकचिन्हे आहेत याची आम्हांला जाणीवच नाही.स्वातंत्र्यानंतर आपण इंग्रज लोकांचे पुतळे हालवले तसेच हे परकीय शब्द मराठी भाषेतून घालवून देणे हे आपले कर्तव्य आहे.
आपल्या मराठी भाषेचे वय आज निदान तेराशे वर्षांचे असेल. तिच्या बालपणी रूपगुणसंपन्न संस्कृत भाषेचे सकस दूध पिऊन या भाषेला चांगले बाळसे आले होते. विवेकसिंधू,ज्ञानेश्वरी,असे तेजस्वी ग्रंथ निर्माण करण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी होते.(म्हणजे पुरेसे शब्द भांडार होते).
तेराव्या शतकात अल्लाउद्दिन खिलजीने आक्रमण केले. रामदेवरायाचा पराभव झाला.मग धर्माच्या हातात हात घालून अरबी पारशी संस्कृतीचा अभिमान बाळगणार्या यवनांनी वर्चस्व स्थापण्यास प्रारंभ केला.देवगिरीचे दौलताबाद झाले. काही देवळांच्या मशिदी झाल्या.पुढे पाचशे वर्षांत शेकडों पारशी ,अरबी शब्द मराठी भाषेत घुसले. उजळ माथ्याने वावरू लागले.
’शुद्ध आणि अशुद्ध’ या शब्दांसाठी’सही आणि गलत’ असे शब्द वापरावे म्हणून सम्राट अकबराने "शुद्धो सहीह इत्युक्तो ह्यशुद्धो गलत: स्मृत:।” असा प्रचार करावयास लावला. त्याच्याच कृपेने आज मराठी माणसाच्या तोंडून शुद्ध ,अशुद्ध या शब्दांसाठी सही,गलत हे शब्द चटकन निघतात.
त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात यावनी भाषेला उत्तेजन न मिळता संस्कृत भाषेस मिळाले, तेव्हा काही यावनी शब्द मराठीतून उणावले.
पुढे पेशवाईत मराठ्यांनी अटकेपार ध्वज लावले.पण यवनांचे ठायी जे भाषाप्रेम होते, स्वाभिमान होता तसा मराठी मनास दुर्दैवाने शिवला नाही. *(पेशवेकालीन मराठीतील उताराखाली दिला आहे...यनावाला) साहित्यिकांनीही मराठीच्या मुखावर अरबी, पारशी शब्दांचा लेप चढवून तिला लोकांपुढे आणले.पण त्यामुळे विवेकसिंधूसारख्या ग्रंथात सापडणार्या मराठीच्या तेजस्वी रूपावर काजळी फ़ासली गेली."
......(अभारतीय शब्दकोष: संकलक -- रामदासस्वामी सोनार.मनोरमा प्रकाशन १९९७ ,या पुस्त्तकाच्या प्रस्तावनेतील काही भाग.)
..........................................................................................................................
(पेशवे कालीन मराठीतील हा उतारा "मराठी साहित्य व व्याकरणःले.मोरेश्वर सखाराम मोने.श्रीमंत होळकर सरकार ग्रंथमाला,पुस्त्क २९ वे,या पुस्तकातून घेतला आहे.)
"अर्जदास्त अर्जदार बंदगी बंदेनबाज अलेकं सलाम साहेबांच्या सेवेसी वंदे शरीराकार जीवाजी शेखदार बुधाजी कारकून प्रगणे शरीराबाद किल्ले कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालो तो प्रगणे मजकुरी येऊन सरकारकाम करावयास लागलो तों प्रगणे मजकूरचे जमेदार दंभाजी शेट्ये व कामाजी महाजन व मनीराम देशमुख व ममताई देशपांडीण व क्रोधाजी नाइकवाडी ऐसे हरामजादे फ़ार आहेत ते सरकारकामाचा कयास चालू देत नाहीत रंभाजी शेट्ट्या कचेरीत येऊन जोम धरून बसतो मनीराम देशमुख आपले काम परभारे करून घेतो ममताई देशपांडीण इणे तमाम प्रगणा जेरदस्त केला क्रोधाजी नाइकवाडी याणे तमाम तफ़रका केला."
.........................................................................................................................................................
"सरकार दरबारात फ़ारसी भाषा सुरू झाली.कागदपत्रेही फ़ारसीत राहू लागली.’अर्जदाराच्या फ़िर्यादी काजी’पुढे जाऊन त्यांचा ’फ़ैसला” किंवा ’इन्साफ़” होऊ लागला .अग्रवादी,पश्चिमवादी, व्यवहार इ. पूर्वापर संज्ञा नाहीशा झाल्या.त्यांच्या जागा मुसलमानी शब्दांनी घेतल्या.प्रमाणांकरिता साक्षी होत त्या गोही झाल्या.अधिकार्यांचे मोकदम झाले,वार्षिकवेतनाच्या जागी सालिना मुशाहिरा मिळण्याचा सिलसिला पडला.राजसभेत बसणाईत होते ते दरबारी झाले झंझुमल, अनुभीम,राईक पाईक,मांडलिक, राऊत अशा पदव्या ऐकू न येता जमादार,हवलदार,शिल्लेदार,सरदार असे हुद्दे नव्याने ऐकू येऊ लागले."
(महाराष्ट्र-सारस्वत, वि.ल.भावे. भाग-१ पृ.१९१)
.............................................................................................................................................................
अभारतीय शब्दकोशकारांच्या टोकाच्या भूमिकेशी मी सहमत नाही. तरी:
"बाबत, अजिबात,नजाकत, मेहेरबानी, हकनाक,शिरजोर,शहानिशा, हमखास,बिलकुल,अलबत, हालत, इज्जत.."
असले शब्द मराठी लेखनात मला विशोभित दिसतात. पुढील काही प्रश्न विचारावेसे वाटतात:
- आरामशीर घेऊन सुखदायक विसरण्यात काय लाभ आहे?
- इभ्रत शब्द वापरल्याने प्रतिष्ठा वाढते काय?
- बेत असताना इरादा शब्द वापरण्याचा संकल्प कशाला?
- बडतर्फ़ शब्दामुळे पदभ्रष्ट शब्द पदच्युत झाला नाही काय?
- मतलब लिहिण्यात काय अर्थ आहे? कोणता हेतू आहे?
- मनाईमुळे प्रतिबंधाला अटकाव होतो असे वाटत नाही काय?
- मर्दुमकी शब्द वापरण्यात शौर्य ते कोणते आणि पराक्रम कसला?
- शरम शब्द वापरताना लाज कशी वाटत नाही?
- प्रतिदिनी दररोज शब्द वाचावा लागतो हे मराठी माणसाचे दुदैव नव्हे काय?
- शुद्ध मराठी शब्द विपुल असताना मुबलक शब्द का वापरावा?
- बिलकुल शब्दाची तिळमात्र आवश्यकता नाही हे तुम्हाला पटत नाही काय?
- *************************************************************************************************************************
Comments
बहुतेक असहमत
वर दिलेल्या शब्दजोड्यांमध्ये अर्थच्छटांचा फरक आहे.
मऊ उशा लावलेली खुर्ची आरामशीर असते (तशी ओढूनताणून सुखदायकही असते - कारण सुख देते).
एखदा रम्य देखावा डोळ्यांना सुखदायक असतो, पण आरामशीर नसतो खास.
(आरामशीर आणि सुखदायक दोन्ही शब्द संस्कृतोद्भव आहेत! "शीर" प्रत्ययाशी भांडायचे तर हवेशीर सुद्धा काढून टाका. )
"आजच्या जेवणासाठी स्वंपाकाचा बेत काय आहे?" याचे उत्तर "गुळाची पोळी, तिळाचे कूट..." असे येऊ शकते.
"आज जेवायचा काय इरादा आहे?" हा प्रश्नच जरा विचित्र वाटतो, पण उत्तर "गुळाची पोळी" हे उत्तर नव्हेच. त्यावरून "बेत" आणि "इरादा" शब्दांच्या अर्थच्छटांमधील फरक लक्षात यावा. ("बेता"मध्ये ठरवलेल्या कामाचे बरेच तपशील आखलेले असतात. इराद्यात एक साधारण दिशेचा निश्चय इतकाच अर्थ सांगायचा असतो.)
"बडतर्फ" शब्दाच्या ध्वनीत एका प्रकारचा धसमुसळेमणा आहे. त्यामुळे एक विशिष्ट अर्थच्छटा लक्षात येते. मला तर लाथा घालून हाकलले असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते. एखाद्या लांबलचक सुनावणीनंतर अधिकारी पदभ्रष्ट व्हावा; पण साहेबाने रागावून, जरब दाखवून, जाब विचारून, तडकाफडकी सरकारी नोकराला बडतर्फच करावे.
मतलबी मनुष्य एका विशिष्ट प्रकारची लबाडी करतो आणि आपला मतलब साधतो. आपला "अर्थ" साधत नाही. हा मतलब सोज्ज्वळ हेतू नसतो, पाताळयंत्री हेतूच असतो.
"दररोज" शब्द मुद्दामून घालवून बोजड "प्रतिदिनी" शब्दच वाचावा लागला तर हे कमनशिबी मराठी वाचकाचे दुदैव होय. मराठीमध्ये रुळलेल्या शब्दांची संख्या विपुल आहे, अर्थच्छटांची उपलब्धता मुबलक आहे. फाजील शुद्धाशुद्धतेचे फालतू वर्गीकरण करून मराठी शब्दभांडाराची दौलत का घटवावी? ही श्रीमंती कोणी बळेच तिळमात्र कमी केली तर मराठी भाषेवर प्रेम करणार्यांनी असला जुलूम बिलकुल सहन करू नये.
सहमत
धनंजय रावांशी सहमत. त्यांनी उदाहरणे खूपच छान दिली आहेत.
त्यांच्या प्रतिसादाला एक छोटीशी पुरवणी. असे म्हटले जाते, की 'समानार्थी शब्द' असे काही अस्तित्त्वातच नसते. जेव्हा आपल्याला वाटते की एका भाषेतले दोन शब्द समानार्थी आहेत, तेव्हा त्यात अर्थच्छटेचा फरक असतोच असतो. नाहीतर एकाच अर्थाचे दहा शब्द कोणी का जमवेल? आता असे समजा की आपण ज्या अर्थाने मराठीत अमूक शब्द वापरतो त्याच अर्थाने तमूक हा शब्द फारसीत वापरला जात असेल, तर आपण जेव्हा फारसीकडून 'तमूक' हा शब्द मराठीत आणू, तेव्हा त्याच्या अर्थच्छटेत आपसूक फरक पडणारच.
राधिका
धनंजयरावांशी सहमत
धनंजयरावांशी सहमत आहे. शब्दांमध्ये अर्थछटांचा फरक तर आहेच त्याचबरोबर या शब्दांचे (माझ्या मर्यादित निरीक्षणानुसार व माहितीनुसार - येथे नुसार हा प्रत्ययही अनुसार प्रमाणे हिंदी-फारसी असा आहे का?) लेखी स्वरुपातच वापरले जाणारे व बोलीभाषेत रुळलेले असे वर्गीकरणही स्पष्ट दिसेल.
सुखदायक, पदभ्रष्ट, प्रतिबंध, शौर्य, प्रतिदिनी हे शब्द केवळ भाषणांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्येच वाचल्याचे आठवते. दैनंदिन/दररोजच्या बोलण्यात मी अजिबात ऐकलेले नाहीत.
उदा. घरात आलेल्या पाहुण्याला 'जरा आरामशीर टेकून बसा म्हणजे रिलॅक्स वाटेल' हे वाक्य अनेकदा ऐकले आहे. यात सुखदायक हा शब्द वापरणे शक्य नसावे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मनातले
धनंजयरावांचा मुद्देसूद, नेमका प्रतिसाद आवडला. राधिका ह्यांनी म्हटल्याप्रमाणे "..'समानार्थी शब्द' असे काही अस्तित्त्वातच नसते" हे खरेच.
हेच
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत...
परकीय संस्कृती
जेव्हा परकीय संस्कृती एखाद्या संस्कृतीवर आक्रमण करते तेव्हा केवळ शब्दांवर आक्रमण होते असे नाही तर रीती-रिवाज, खानपान, राहणी, वस्त्रे अशा अनेक गोष्टी बदलतात, नव्या गोष्टी येतात. धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे या गोष्टी मिळत्याजुळत्या असल्या तरी त्यात अर्थछटेचा फरक असतो.
सिंहासन, आसन, बैठक यांच्यापेक्षा खुर्ची वेगळी दिसते आणि खुर्ची म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते आसनाचे नाही.
तबक म्हटले की ताट, थाळी, ताटली हे सर्व ध्यानात न येता पानसुपारीसाठी वापरली जाणारी सपाट बशी डोळ्यासमोर उभी राहते.
समजा, अरबी फारशी संस्कृती येण्यापूर्वी भारतीय संस्कृती कागद, बदाम, मनुका, तबला, नगारे, तबक वापरतच नसेल तर? (फक्त शब्द नाही, वस्तूही) नवी संस्कृती, नवे शब्दही आणते. त्याला प्रतिशब्द प्रत्येक भाषेत असतातच असे नाही. या नव्या शब्दांसह वापरले जाणारे, जवळीक साधणारे इतर शब्दही भाषेत शिरकाव करतात.
शब्दांच्या अर्थछटा वेगळ्या असण्याबद्दल सहमत आहेच.
नाही.......
यनावाला, तुमच्या विधानाशी असहमत असण्याचे वाईट वाटते. मला हे शब्द बिलकुल विशोभित वाटत नाहीत. हे शब्द मराठी भाषेत हवेच आहेत. त्यांना कृपया बडतर्फ करु नये. ते वापरण्यात शरम कायेकी? आपल्या मराठी भाषेत एवढे मुबलक अभारतीय शब्द आहेत ही नवीन माहिती आज तुमच्यामुळेच समजली. त्याबद्दल धन्यवाद. परंतु मला असे वाटते की असे नवीन शब्द मराठी भाषेत दररोज यावेत. त्याने मराठीची इभ्रत कमी न होता वाढेलच!
(अस्वस्थ)सौरभदा
==================
सर्व आयांनी जर आपापल्या मुलांना लहानपणीच योग्य शिकवण दिली, तर जगात युद्धं कशाला होतील? सर्व संस्कृती आयांच्याच हातात नसते काय?
की विसरला की काय
परंतु मला असे वाटते की असे नवीन शब्द मराठी भाषेत दररोज यावेत. त्याने मराठीची इभ्रत कमी न होता वाढेलच!
सहमत आहे.
की विसरला की काय?
की म्हणजे?
की चा काय संदर्भ आहे. तोदेखील बाहेरुन आला का? नशीब कुलुप लावलेले नव्हते नाहीतर या की-नेही ते उघडले नसते. ह. घ्या.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रतिसाद
वरील प्रतिसादांशी सहमत.
धनंजय यांचा प्रतिसाद आवडला.
जसे दोन संस्कृती जवळ येतात, तेव्हा प्रियाली यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे भाषाच नव्हे तर अनेक गोष्टीं बदलतात. मराठीत रुळलेले अनेक शब्द आजच्या मराठीचेच झाले आहेत आता यात दुजाभाव करायला नको.
आता यनावाला सरांचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.
सहमत
धनंजय यांच्या प्रतिसादानंतर काही लिहीण्यासारखे उरलेले नाही. मला वाटते विशोभित ही संकल्पना सापेक्ष असावी. मला काढून टाका
याच्या जागी निस्सारण हा संस्कृतोत्भव शब्द बराच विशोभित वाटतो.
एक शंका : इथे विरोध अभारतीय शब्दांना आहे असे वाटते. म्हणजे गुजराथी, तमिळ वगैरे चालतील का? आणि उर्दूचे काय? कारण आता उर्दू भारतीय भाषा आहे.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
फक्त निसा:रण?
अहो मला उर्ध्वश्रेणीकरण म्हणजे काय तेही कळत नाही. त्रिशंकूसारखे काहीतरी हवेत लटकलेले वाटते.
यनासरांशी या चर्चेत मी असहमत आहे पण मला शेवटची निळी वाक्ये आवडली. तशी शाब्दिक कोडी टाका की.
-राजीव.
प्रतीकचिन्हे
मराठीवर अरबी, फारसी, इंग्रजी भाषेचे आक्रमण झाले असे समजले तरी भाषेतील परकीय शब्द म्हणजे आमच्या तत्कालीन राजांच्या पराजयाची प्रतीकचिन्हे मला वाटत नाहीत हे नमूद करावेसे वाटते. इंग्रजीचे आक्रमण होणे म्हणजे शासनकर्ते इंग्रज असणे प्राप्त आहे. इंग्रजांचे भारतात खर्या अर्थाने पहिले शासन प्लासीच्या लढाईनंतर आले समजू. त्या लढाईत सिराज-उद्दौला विरुद्ध इंग्रजांना मदत करण्यात हिंदू जनता आणि हिंदू व्यापारी यांचा मोठा सहभाग होता. शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो हे समजून कार्यभाग साधणारे तत्कालीन आमचे लोकही परकीय शब्द आपल्या तोंडी रुजु करण्यात तितकेच कारणीभूत आहेत. याचप्रमाणे मोघलांना मदत करणार्या सर्व एतद्देशीय जनतेलाही दोष देत बसावे लागेल. आर्य बाहेरुन संस्कृत किंवा संस्कृत सदृष भाषा घेऊन आले असे समजणारे संस्कृतनेही एतद्देशीयांच्या भाषेवर आक्रमण केले असे समजून चालले तर त्यात गैर वाटू नये. इतिहासाच्या उखाळ्यापाखाळ्या काढत गेले तर नको तितक्या विपरीत गोष्टी समोर येतात. तेव्हा अशा गोष्टींना दोष देत बसण्यात फारसा अर्थ वाटत नाही.
शब्दांच्या अर्थच्छटा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
'अभारतीय शब्द 'या चर्चाप्रस्तावात मांडलेल्या विचारांशी अनेकजण असहमत असतील याची कल्पना होतीच.पण मला जे पटते ते मी मांडले.
माझ्या एका प्रश्नातील शब्दांविषयी काही चुकीचा समज निर्माण झाला असे श्री.धनंजय यांच्या प्रतिसादातून दिसते. मूळ प्रश्नात काही संदिग्धता असावी.
श्री.धनंज लिहितातः"...जेवणाचा काय बेत आहे?" ..याचे उत्तर"गुळपोळी" असे असू शकते..."जेवायचा काय इरादा आहे" हा प्रश्न विचित्र वाटतो. "
हे खरेच आहे.
मूळ प्रश्न असा आहे:"बेत असताना इरादा शब्द वापरण्याचा संकल्प कशाला? " याचा अर्थ असा:
"बेत (हा शुद्ध मराठी शब्द उपलब्ध) असताना इरादा (हा परकीय) शब्द वापरण्याचा संकल्प(मनोदय, इच्छा) कशाला?"
दोन अथवा तीन समानार्थी शब्द् एकाच प्रश्नात वापरण्याचा प्रयत्न केला. तो तितकासा यशस्वी झाला नाही असे दिसते.असो.
२/ सुखदायक शब्दावरून दायक प्रत्ययाचा अर्थ समजतो. त्यातून लाभदायक, फलदायक, गुणदायक असे शब्द निर्माण करण्याची क्षमता येऊ शकते.
३/ जेत्यांची भाषा श्रेष्ठ मानून त्यावेळच्या पारतंत्र्यातील मराठी जनतेने,आपले मूळ मराठी शब्द टाकून त्याजागी परकीय भाषेतील शब्द् स्वीकारले.अनेक शतकांच्या
वापराने त्यांना विवक्षित अर्थच्छटा प्राप्त झाल्या.ते मराठी शब्द विसरले गेले नसते तर त्यांनाही अशा छ्टा लागल्याच असत्या. आता ओळख विसरल्याने
आपल्याच भाषेतील शब्द आपल्याला विचित्र वाटू लागले आहेत्
तुमचा मनोदय समजला, पण उत्तर बहुधा स्पष्ट नव्हते
तुमच्या लेखातील वाक्यांची तार्किक घडण अशी होती :
- - -
गृहीतक १ : [अ] शब्द वापरून अर्थ ध्वनित करायचा आहे, हे आणि हेच शब्द वापरायचे प्रयोजन आहे, पण [आ] शब्दांना काही उपलक्षणेसुद्धा आहेत.
गृहीतक २ : शब्दांच्या मूलस्रोताच्या अनुसार स्वाभिमान आणि दास्यत्व ही उपलक्षणे आहेत.
गृहीतक ३ (अशी अनेक वाक्ये तुम्ही उदाहरण म्हणून दिली आहेत) : /क्ष/ या नेमक्या एकाच अर्थाचे दोन-तीन शब्द उपलब्ध आहेत : 'ज्ञ' आणि 'य' (संकृतोद्भव), आणि 'ज़' (अरबी-फारसी-उद्भव)
गृहीतक ४ (निरीक्षणातून) : लोकांत 'ज़' वापरात दिसतो.
निष्कर्ष १ (गृ १अ,३ पासून): 'ज्ञ'/'य'/'ज़' पैकी कुठलातरी कुठलाही एक पर्याय उपलब्ध असला, तरी शब्द वापरण्याचे एकमेव प्रयोजन पूर्ण होते.
निष्कर्ष २ (गृ १आ आणि नि १ पासून) : अशा परिस्थितीत शब्दाच्या उपलक्षणांमुळे 'ज्ञ'/'य'/'ज़' पैकी कुठला निवडायचा ते ठरते.
निष्कर्ष ३ (गृ २ आणि नि २ पासून) : स्वाभिमान हे उपलक्षण अंगीकारलेले लोक 'ज्ञ'/'य' निवडतील, दास्यत्व अंगीकारलेले लोक 'ज़' निवडतील.
निष्कर्ष ४ (गृ ४ आणि नि ३ पासून) : 'ज़' वापरात दिसल्यामुळे असे म्हणता येते की लोकांनी दास्यत्व अंगीकारलेले आहे.
सल्ला १ : स्वाभिमान अंगीकारला आहे असे दाखवण्यासाठी 'ज़' निवडू नये, आणि 'ज्ञ'/'य' पैकी एक निवडावा.
- - -
तुम्हाला अशी खंत वाटते की "गृहीतक ३" (समनार्थी शब्द) म्हणून तुम्ही अनेक उदाहरणे दिली आहेत, त्यांच्यात खरोखरचे समानार्थी शब्द शोधून तुम्ही द्यायला हवे होते. तशी खंत वाटून घेऊ नये. माझे सोदहारण म्हणणे आहे, की असे कुठलेच शब्द तुम्हाला सापडणार नाहीत. राधिका आणि अन्य प्रतिसादकर्त्यांनी तसे थेट म्हटले आहे - "समानार्थी शब्द असे काहीच नसतात."
तुम्हाला असे वाटते की त्याच अर्थच्छटा असलेले मराठी शब्द विसरले गेले आहेत. असतीलही असे शब्द. पण तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत - बेत, संकल्प, वगैरे - ते विसरले गेलेले नाहीत. त्यांच्या विशिष्ट अर्थच्छटांसाठी ते वापरात आहेतच. ते शब्द जर अरबी-फारसी-उद्भव शब्दांच्या जागी त्या वेगळ्या अर्थच्छटेसाठी वापरण्याचा अट्टाहास केला, तर त्यांची हल्लीच्या वापरातली अर्थच्छटा पोरकी होईल.
प्रियाली आणि अन्य प्रतिसादकर्त्यांनी यांनी तुमचे "गृहीतक २" (दास्यभाव) अमान्य केले आहे. (मलाही ते अमान्य आहेच, पण मी त्याविषयी युक्तिवाद न देण्याचे कारण पुढीलप्रमाणे -)
तुमच्या वरील प्रतिसादातील "३/ जेत्यांची भाषा श्रेष्ठ..." वगैरे भावुक मुद्दे विवेकाने सिद्धासिद्ध होण्याची फारशी शक्यता नाही. इंग्रजीत अनेक भाषांतील कामसू शब्द वापरात आहेत, असे निदर्शनास आणता "दास्याच्या निर्लज्जपणे भारतीयांनी आपले शब्द इंग्रजीला चोरू दिले" असा भावुक आक्रोश कोणी करू शकेल. "दास्य आहे" हे गृहीतक खोलवर रुजले असेल तर "मराठ्यांवर मोंगलांनी राज्य केले" आणि "मराठ्यांनी अटकेपार झेंडा नेला" त्या दोन्ही उलट टोकांच्या घटनांमध्ये त्या व्यक्तीला भाषिक दास्यभावाचाच पुरावा दिसेल. उलटसुलट कसेही निरीक्षण झाल्यानंतर जे प्रमेय जसेच्या तसे राहाते, ते तर्काच्या पलीकडचे आहे.
उपयुक्ततावादी विवेकाने गृहीतक ३ (समानार्थी शब्द) रद्द केले, तर अस्मिताभंगाच्या भावुक वादात (म्हणजे दास्यभावाबद्दलचे गृहीतक २ खरे की खोटे या वादात) पडायची गरज राहात नाही. म्हणून मी फक्त "समानार्थी शब्दांच्या याद्यां"मधला दुष्ट तर्क दाखवला, तेवढ्यानेही सर्व निष्कर्ष बाद होतात, आणि मराठीची चिवट शब्दसंपदा छाटू बघणार्या सल्ल्याची सुरी बोथट होते.
"दायक" शब्दाबद्दलचा तुमचा मुद्दा समजला नाही. "शीर" प्रत्यय वापरात आल्यास "आरामशीर", "हवेशीर", "वक्तशीर", "मजेशीर" ... असे अनेक शब्द निर्माण करण्याची क्षमता निर्माण होते.
यनावालांशी सहमत
या विषयावर मी यनावालांशी सहमत आहे. म्हणजे असे की अनेक अरबी/फारसी परकीय शब्द मराठीत आले आहेत आणि ते इतके रुळले आहेत की ते परकीय आहेत हेच लक्षात येत नाहीत. मी ज्ञानेश्वरीचा थोडासा अभ्यास केला असल्याने मला जुने शब्द कुठले आणि परकीय रूढ शब्द कुठले हे जाणवते. उदाहरणेच सांगायची झाली तर काही सामासिक शब्द बघूया. बाजारहाट - हाट हा देशी शब्द बाजार परकीय, बाजार म्हणजे हाट असा अर्थ सांगणारा समास आहे. ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी वेश्येला "हाटभेटीचे कलत्र" असा शब्द आहे त्यावरूनच पुढे "बाजारबसवी" असा शब्द आला असावा काय? तसेच खर्चवेच हा दुसरा. खर्च म्हणजे वेच. जमाराशि हा तिसरा. जमा म्हणजे राशि. मुक्काम या अर्थी ज्ञानेश्वर "पेणा" शब्द वापरतात. "पाहेचा पेणा वाटवधा" - (पहाटेच्या मुक्कामाची जागा वाटमारी करणार्या लोकांची वसती असलेली आहे असा अर्थ). वजन या अर्थी ज्ञानेश्वर "तुक" असा शब्द वापरतात. अनेक संस्कृत शब्दांऐवजीसुद्धा ज्ञानेश्वर देशी शब्द वापरतात. उदा. पर्यंत ऐवजी वेरी शब्द (तयाचा वेलु गेला गगनावेरी) . असे अनेक देशी शब्द ज्ञानेश्वरीत आढळतील. आज आपण हे शब्द वापरणार नाही, पण हे निदान माहिती असणे आवश्यक आहे असे वाटते.
आता परकीय शब्दांना पराजयाचे प्रतीक मानावे की नाही, शतकानुशतके रूढ असलेले शब्द काढून त्याजागी प्रतिशब्द रूढ करावेत की नाहीत याबद्दल निरनिराळी मते असू शकतात. सावरकरांचे मत हे शब्द पराजयाची प्रतीके आहेत, त्यामुळे ते अवश्य काढून त्याजागी प्रतिशब्द रूढ करावेत असे होते आणि त्यांनी आपल्या प्रतिभेने असे असंख्य शब्द सुचवून रूढ केले. मला वाटते याबाबतीत सावरकरांनी संस्कृतप्रधान शब्दांचा अतिरेक केला. त्या ऐवजी ज्ञानेश्वरीतून जुनेच रूढ असलेले शब्द वापरात आणले असते तर लोकांचा विरोध कमी झाला असता. दुसरे असे की हे परकीय शब्द शहरातले लोक जास्त वापरतात. खेड्यातून अजूनही ज्ञानेश्वरीचा प्रभाव असल्याने देशी शब्द लोक जास्त वापरतात.
विनायक
ह्म्म्म्
माझ्या माहितीप्रमाणे 'हाट' या शब्दाच्या मुळाशी 'हट्ट' हा संस्कृत शब्द आहे. चुकले असल्यास दुरुस्ती करावी.
राधिका
यात काही 'तुक' नाही
माझ्यामते यात काही 'तुक' नाही. खेड्यातले लोक देशी किंवा परकीय शब्द असा विचार करत असतील असे वाटत नाही. अनेक परकीय शब्द जे ग्रामीण भागात वापरले जातात शहरी भाषेतून हद्दपार झाले आहेत. खूप दाखले देता येतील. किंबहुना शहरी मराठी भाषा ही जास्त संस्कृतप्रचुर आहे असे वाटते.
अपभ्रंश
हाट हा प्राकृत शब्द आहे असे यनावालांनी मला व्यनितून कळवले आहे. संस्कृत "हट्ट" शब्दाचा अपभ्रंश पण असू शकतो. असा आणखी एक शब्द म्हणजे "सोकासनी" संस्कृत "सुखासनी" चा अपभ्रंश.
विनायक
रुळलेले शब्द हे मराठीच मानायला हवे
मराठी भाषा जसजशी विकसित होत गेली तसतसा तिने इतर भाषांपासून शब्दसाठा घेतलेला आहे. आणि या सर्व रुळलेल्या शब्दांचाही मराठी ला बाळसे येण्यात मोठा वाटा आहे. मराठीत जर फक्त संस्कृतआधारीत शब्द ठेवायचे झाल्यास (संस्कृत शब्द हे परकीय नाहित पण वेगळ्या भाषेचे ठरतात.) तर मराठी भाषेची संस्कृतच होईल. संस्कृतला ही मराठीचे निर्विवाद पितृत्व देता येत नाही. म्हणून मराठी भाषेत रुळलेले मुरलेले शब्द परकीय म्हणून टाळण्याऐवजी त्यांना स्विकारून मराठीच्या कक्षा रुंदावायला हव्या. उदा. पूढील शब्द मराठी नाहित असे म्हणून कसे चालेल. पेन, पेपर, कॉम्प्युटर,रेल्वे,बस,ड्रेस,रिबीन,रोड,गॅस,ट्रक,मोटर ही यादी अमर्याद आहे. या सर्वांना वगळायचे ठरवले तर मराठी उरेल का त्यापेक्षा ती उरलेली भाषा आपल्याला पूरेल का.
ता.क.१ ऑक्सफोर्ड ने कृष्ण, कढी हे शब्द इंग्रजी म्हणून शब्दकोशात सामील केले आहेत.
ता. क.२मराठीत परकीय भाषेतील शब्द येतांना कधीकधी अगदी विरूद्ध अर्थ घेऊन येतात. उदा. राजीनामा या अरबी शब्दाचा अर्थ मी तयार आहे (राजी) असा करार करून देणे असा आहे आता मात्र हा मी नोकरी करण्यास तयार नाही अशा अर्थाने वापरला जातो.(सं.भाषेचे ज्ञान,गंमती-शांता शेळके).
"राजी" नामा
परकीय भाषेतील शब्द येतांना कधीकधी अगदी विरूद्ध अर्थ घेऊन येतात. उदा. राजीनामा या अरबी शब्दाचा अर्थ मी तयार आहे (राजी) असा करार करून देणे असा आहे आता मात्र हा मी नोकरी करण्यास तयार नाही अशा अर्थाने वापरला जातो.(सं.भाषेचे ज्ञान,गंमती-शांता शेळके).
मूळ उर्दू/फार्सी शब्द "राझी" (झबल्यातला झ! किंवा पापाराझी मधला राझी ;-) ) असा असावा : (संदर्भ : "ये जो दुष्मन हैं ऐसे , दोनो राझी हों कैसे , एक को मनाऊं तो , दूजा छूट जाता है") हाच शब्द मराठीत येतो तेव्हा "राजी" होऊन येतो (ज जंगलातला/जगातला ) पहा : "कोल्हा काकडीला राजी !")
अपसमज
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री बाबासाहेब जगताप लिहितात:
"पेन, पेपर, कॉम्प्युटर,रेल्वे,बस,ड्रेस,रिबीन,रोड,गॅस,ट्रक,मोटर ही यादी अमर्याद आहे. या सर्वांना वगळले तर उरलेली भाषा आपल्याला पुरेल काय?"
तसेच प्रियाली म्हणतातः"अरबी फारसी संस्कृती येण्यापूर्वी भारयीय संस्कृतीचा बदाम,पिस्ते,...तबक अशा वस्तूंशी परिचयच नव्हता. तेव्हा त्या शब्दांचे काय करायचे?"(असे काहीसे.)
....हे सर्व चुकीच्या समजातून लिहिले गेले आहे. जी वस्तुनामे मराठीत नाहीत, तसेच ज्या संकल्पना, ज्या भावभावना व्यक्त करण्यासाठी मराठीत शब्द नाहीत त्यासाठी अन्य भाषांतील शब्द वापरण्यास कोणताच विरोध नाही. किंबहुना असे शब्द मराठीने आत्मसात करायलाच हवेत. तरच तिचा विकास होईल हे स्पष्टच आहे. मग विरोध कशाला आहे?
"जी गोष्ट अभिव्यक्त करण्यासाठी आपल्या भाषेत मराठी मूळाचे समर्पक आणि समर्थ शब्द आहेत ते डावलून, फारसी/ अरबी/इंग्रजी ही राज्यकर्त्यांची/ प्रगत लोकांची भाषा म्हणून त्यातील शब्द वापरायचे याला विरोध आहे.
भाषेची अभिवृद्धी व्हायला हवी, त्यासाठी नवनवीन शब्द भाषेत यायला हवे याविषयी दुमत नाही. मात्र ज्या शब्दांची मुळे भारतीय शब्दांच्या मुळांहून अगदीच भिन्न आहेत असे पुषळसे शब्द जर मराठीत आले तर या भाषेची नव शब्द निर्माण करण्याची सृजनशक्ती क्षीण होईल.डॉ.रघुवीर यांनी पारिभाष्क कोशांची निर्मिती केली संस्कृत भाषेच्या आधारावर. अनेक नवनवीन शब्द निर्माण करण्याची क्षमता संस्कृत भाषेत आहे.
काय हरकत आहे?
म्हणजे फारसी, अरबी, इंग्रजी वगैरे परभाषीय लोक इथे येऊन ज्या दिवशी राज्य करू लागले त्याआदल्या दिवशी आपले पूर्वज अशा शब्दांऐवजी जे कोठले देशी शब्द वापरत होते, ते आज माहीत नसले तरी शोधून काढून वापरू लागायचे की काय?
बाजार ऐवजी हाट, मुक्काम ऐवजी पेणा, जमा ऐवजी राशि, खर्च ऐवजी वेच, वजन ऐवजी तुक, पर्यंत ऐवजी वेरी असे शब्द वापरायला काय हरकत आहे? निदान शुद्ध मराठी तरी आहेत, संस्कृत, अरबी, फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज, हिंदी अशा भाषांमधून आलेले नाहीत. मराठी जिवंत भाषा आहे संस्कृतप्रमाणे मृत नाही अशी विचारसरणी असलेल्यांनी तरी हा विचार करायला हरकत नाही.
विनायक
टिकले नाहीत कारण टिकवले नाहीत
आज मराठी भाषेच्या प्रेमाने, मराठी टिकवण्या आणि वाढवण्यासाठी मनोगत, उपक्रम वगैरे सारखी संकेतस्थळे तयार झाली आहेत, मराठी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत तसेच प्रयत्न केले तर जुने, पण शुद्ध मराठी शब्दही रूढ होतील आणि मला स्वतःला ते संस्कृत प्रतिशब्दांपेक्षा जास्त आवडतील.
विनायक
अप्सराप्रश्न
'अभारतीय शब्दांना विरोध' हेच जर तत्त्व असेल, तर संस्कृत शब्द तरी कशाला योजायचे?
या अप्सराप्रश्नाचे उत्तर ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आम्ही सुखाने 'जाण्याची नोंद' करू. जर मराठी चोवीस क्यारट शुद्धच हवी तर मग संस्कृतची भेसळ कशी काय चालते?
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
समानार्थी शब्द
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
समानार्थी शब्द
श्री. चित्तरंजन, श्री. धनंजय आणि राधिका यांचे म्हणणे आहे की" समानार्थी शब्द असे काही नसतेच."
हे त्यांचे वैयक्तिक मत असावे. या मताचे आणखीही काहीजण असतील. पण
" समानार्थी शब्द असे काही नसतेच." हा मराठी भाषाशास्त्रातील बहुमान्य सिद्धांत नसावा. माझ्या वाचनात तरी नाही. आपण आता एक व्याख्या करू:
व्याख्या:.."एखाद्या विधानातील ’अ’ या शब्दाच्या जागी ’ब’ हा शब्द योजला तरी त्या विधानाचा मूळ अर्थ अबाधित राहात असेल तर ’अ’ आणि ’ब’ हे परस्परांचे समानार्थी शब्द होत."
या व्याख्येला अनुसरून पुढील जोड्या समानार्थी शब्दांच्या आहेत:
१.युवक,तरुण. २. सुगंध, सुवास. ३. ओळख, परिचय ४.यौवन, तारुण्य. ५.सुमन, कुसुम
६.सागर, समुद्र.
शिवाय या व्यतिरिक्त अजून आणखी, अनेक जोड्या आहेत.
वाक्ये:
*१.जरी वास नसे तिळ यांस तरी तुम्हांस अर्पिली सुमने। कुस्करू नका ही सुमने।
.............................,,..........................| कुस्करू नका ही कुसुमे।
*२.देवदत्त धनुर्विद्येत प्रवीण आहे.
..............,,... निपुण आहे.
*३.अपरिचित व्यक्तीवर सहसा विश्वास ठेऊ नये.
अनोळखी .......................,,.......नये.
*४.नभा आच्छादित करी मेघमाला।
नभा..........,,.....जलदमाला।
*५.घनदाट वनात श्वापदे असतात.
घनदाट अरण्यात श्वापदे असतात.
***********************************************************************
नि:सत्त्व समानार्थी शब्दांचा बुजबुजाट
समानार्थी शब्द नसतात हा भाषाविज्ञानातले बर्यापैकी मान्य निरीक्षण आहे. (संदर्भ शोधून पुढे देईन - बहुधा प्रा. अशोक केळकरांचा निबंध असावा. तोवर त्यांनी "ओतप्रोत/काठोकाठ/शिगोशीग" शब्दांमधील अर्थछटांचा फरक सांगणारे हे संपादकीय वाचावे. भाषा आणि जीवन, प्रथम संपादकीय)
वरील शब्दजोड्यांत अर्थभेद राहिलेला नाही, हा संस्कृत भाषेच्या बोलीभाषेतून झालेल्या पतनाचा भग्नावशेष आहे. आजही आपल्या मनात आपण त्या खिंडारांनाच भव्य वास्तू समजतो - याला गतानुगतिक दास्यभाव माना!
"जल"ऐवजी पादपूरणार्थ "उदक" (वरती जाणारे अर्घ्य पाणी), "पानीय" (पिण्यायोग्य पाणी) हे शब्द समानार्थी समजून हेळसांड करून कवी वापरू लागले. संस्कृत भाषेतला जिवंतपणा नेमका केव्हा नाहिसा होऊ लागला होता, तो काळ ओळखायचे हे लक्षण मानावे. मराठीचेही इतक्या लवकर तसे आपण होऊ देऊ नये.
"सुमन" शब्दाने वाचकाच्या मनात चांगल्या मनाचा गर्भित अर्थ ध्वनित व्हावा, असा विचार मनात आल्याशिवाय निष्काळजीपणे मात्रा मोजून सुमन/कुसुम योजणार्या कवीला शब्दांबद्दल विशेष प्रेम नसावे.
"फुलाच्या मध्ये स्त्रीकेसर आणि पुंकेसर असतात" असे म्हणण्याऐवजी तांत्रिक पुस्तकात "कुसुमाच्या मध्ये महिलाकेसर आणि बुवाकेसर असतात" तर ते पुस्तक मी बहुधा विकत घेणार नाही.
बैल तरुण असू शकतो, बैल युवक असू शकत नाही.
आधुनिक मराठीत "वेगवान" हा दुय्यम अर्थ आणि पुराण मराठीत "पाणी देणारा" हा दुय्यम अर्थ प्रकाशित करायचा नसेल, तरी "ढग"ऐवजी कोणी "जलद" शब्द वापरत असेल, तर त्याच्याविषयी "गटणे-बाज पोपटपंची" म्हणून वाचकाने खुशाल हसावे. "मेघ" शब्द भरून आलेल्या आभाळातल्या पावसाने डबडबलेल्या ढगाला म्हटले तर ठीक, "भुरभुरीत कपसासारखे पांढरे मेघ..." असे म्हणणे हास्यास्पद आहे.
ओळख अधिक जिव्हाळ्याची असते, परिचय अधिक औपचारिक असतो. माझी आई बहुधा म्हणेल "धनंजयची मला चांगली ओळख आहे - तो असे-तसे वाईट वागणार नाही." ज्या दिवशी "धनंजयचा मला चांगला परिचय आहे..." तेव्हा ती मनाने मला दुरावली हे मी समजून घ्यावे.
अरण्य हे वनापेक्षा घनदाट असले तर बरे. ("जलददाट" किंवा "ढगदाट" नसल्यास बरे.)
संस्कृतात शब्दांना समानार्थी मानल्यामुळे त्या भाषेत आता बहुपदरी अर्थवैविध्याचे नुकसान होते. भारदस्त वाटणार्या ढोबळ अर्थ असलेल्या वृत्तबद्ध रचना होतात, अशा अर्थाचा व्यंग्यपूर्ण समीक्षालेख मी अन्यत्र लिहिला आहे : झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)
त्यात अतिरेकी उदाहरण म्हणून वृत्तात बसण्यासाठी "सरस्वती"ऐवजी "हिरण्यगर्भयोषिता" असा शब्द लिहिला आहे. हे असले नेमकेपणा घालवलेले लेखन मराठीत न होवो, अशी खटपट आपण केली पाहिजे.
किंचित असहमत.
तरुण म्हणजे नवीन, कोवळा, ताजा, अल्पवयीन. तरुण आहे रात्र अजुनी...(युवक आहे रात्र अजुनी?) युवा म्हणजे तरुण वयाचा.
त्याचे वय अजून तरुण आहे(युवक आहे?) संस्कृतमध्ये युवा आहे, 'युवक' आहे की नाही, नक्की माहीत नाही. तरुण हे विशेषणही आहे, युवक?
सुवास=चांगले राहाणे, चांगले वस्त्र इ.इ. सुगंधात या छटा आहेत?
अरण्य(जंगल), वन आणि रान ह्या शब्दांच्या अर्थच्छटा वेगळ्या आहेत. पुण्यात एक एरंडवन आहे, त्याला एरंडारण्य म्हणता येईल?
गायरान, वनवास, वनभोजन, केळीचे वन, दंडकारण्य, सुंदरबन ह्यात वापरलेल्या शब्दांत अर्थाची वेगवेगळी झलक दिसून येत नाही?
दिलेल्या उदाहरणांत, घनदाट हे विशेषण न वापरता पाहिले तर वन आणि अरण्य यात काहीतरी फरक आहे असे जाणवेल.
जलद म्हणजे पाणी देणारा; प्रत्येक मेघ पाणी देत नाही. मेघाडंबर(संस्कृत) वरून मराठीत आलेला मेघडंबरी(छत, घुमट).
याला जलदडंबर म्हणता येईल?
सुमन=चांगले मन, गहू. कुसुम=?
प्रवीण=प्रगत: वीणायाम् । पुढे कुठल्याही कलेत प्रगत असेल त्याला प्रवीण म्हणू लागले, पण मुळात निपुण आणि प्रवीण यांचे अर्थ भिन्न.
--वाचक्नवी
तरुण आणि युवक
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
दोन शब्द जर समानार्थी असतील तर ते एकाच जातीचे (नामे, विशेषणे इ.) असणे आवश्यक आहे. {तरुण, युवक} या जोडीत युवक हे नाम आहे. तरुण हा शब्द विषेषण तसेच नाम म्हणूनही वापरतात.[ अनेक विशेषणे नामे म्हणून वापरली जातात."गरीब गरीब कारण गरीबाचा बाप गरीब." यात निळे गरीब नामे आहेत.]
{तरुण, युवक} जोडीत दोन्ही नामे हवीत. म्हणून या जोडीत तरुण हे नाम आहे. "तरुण आहे रात्र.." यात तरुण हे विशेषण आहे.तरुणी असे नाम असते तर त्याजागी युवती हे समानार्थी नाम घालता आले असते..
सर्वसमावेशक दृष्टीकोन
यनावालांचा चर्चाप्रस्ताव आणि त्यावरील प्रतिसाद पाहून आणखी एक गोष्ट सुचते. यनावालांना वाटते की परदेशी शब्दाऐवजी देशी शब्द संस्कृत/संस्कृतोद्भव/देशी शब्द वापरावेत. त्यांच्या विरोधी पक्षास वाटते, की प्रचलित परदेशी शब्दाऐवजी ओढून ताणून संस्कृत/संस्कृतोद्भव/देशी शब्द वापरू नये. मग इथे "जो जे वांछिल तो ते बोलो" असा दृष्टीकोन बाळगायला काय हरकत आहे ? जर संस्कृत/संस्कृतोद्भव/देशी शब्दांच्या पुरस्कर्त्यांनी त्यांना हवे तसे शब्द प्रचलित केले तर हळुहळू जनमानसात ते रूळतीलच . उदाहरणार्थ , "विदा" हा शब्द आणि मराठी आंतरजालीय जन. हा शब्द आता या लोकांमधे रुळलाच की. माझ्या माहितीप्रमाणे , आंतरजालीय वावराच्या आधी हा शब्द सामान्य संभाषणातला नव्हता. पण इथल्या संभाषाणापुरता आता तो बनला आहे. पण म्हणून कुणी "डेटा" हा शब्द वापरला तर त्याला टप्पल कशाला मारावी ? उद्या जर कुणी नवे वाक्प्रचार रुळवत असेल तर मला त्याबद्द्ल कुतुहलच वाटते. नवे शब्द/वाक्प्रचार येतात , जुन्यांचा वापर थांबतो , कधीकधी जुने शब्द पुनर्जन्मही घेतात. भाषा प्रवाही आहे/असावी याचा अर्थच हा नव्हे काय ?
हे
माझ्या मते हे होतेच आहे. पहिली गोष्ट मराठीतील सर्व संकेतस्थळांच्या सदस्यांची संख्या आणि मराठी वापरणार्यांची संख्या यात खूप मोठा फरक आहे. इथे शब्द रूढ झाला याचा अर्थ सगळीकडे झाला असे नव्हे. तुम्ही शब्द तयार करा अथवा करू नका, पब्लिक त्यांना पटेल, रुचेल, आवडेल तेच वापरणार.
इथे मला एक प्रश्न पडतो. कुठल्याही भाषेला मारून मुटकून एखादे वळण देण्याचा प्रयत्न आजपर्यंत यशस्वी झाला आहे का? भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि इतर (सामाजिक, आर्थिक वगैरे) बर्याच घटकांवर अवलंबून आहे. फक्त प्रतिशब्द तयार करून भाषेचे स्वरूप बदलता येईल असे वाटत नाही. (आणि ते चांगलेच आहे.)
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
म्हणजे
कुठल्याही भाषेला मारून मुटकून एखादे वळण देण्याचा प्रयत्न आजपर्यंत यशस्वी झाला आहे का
म्हणजे काहीसे सोशल इंजिनियरींग सारखे काय ? ;-)
Complex systems such as societies and economies tend to obey the laws of chaos theory; the short and long-term effects of changes are unpredictable by even the most brilliant economists and sociologists....It is a laudable goal to improve society, but it should be done through gradual change, not "revolution".
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
१९८४
१९८४ सारखे पोलीस स्टेट असेल तर होऊ शकेल कदाचित. इथे ऑरवेलसाहेबांना परत एकदा दंडवत. भाषेतील विशिष्ट शब्द वापरायला बंदी केली म्हणजे लोक हळूहळू त्या भावना, इच्छा विसरून जातील ही कल्पना अंगावर काटा आणणारी आहे.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
प्रतिसाद लिहिताना १०%.......
चांगली आयडीया आहे.....
भावना आणि अस्मिता
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चर्चा तर्काधिष्ठित असावी.त्यात भावनेला, अस्मितेला महत्त्व नसावे. श्री.धनंजय यांनी व्य. नि. पाठवून मला समजावले आहे. त्यांनी लिहिले आहे:
"उपयोगी वस्तूंमध्ये, कल्पनांमध्ये स्वदेशी/परकीय असा मूलभूत भेद करण्यात मनुष्यांचे सुख कित्येकदा कमी होते"
मला हे पूर्णतया मान्य आहे.माझ्या चर्चाप्रस्तावाचा बहुतांश भाग पुस्तकातील उतारे आहेत. "लेखकाच्या टोकाच्या भूमिकेशी मी सहमत नाही."
असेही मी लिहिले आहे.
तरी सुद्धा "भाषेविषयीच्या न्यूनगंडाने आम्हाला पछाडले आहे. ...आम्हाला स्वत्वाचाच विसर पडला आहे..परकीय शब्द म्हणजे आमच्या
तत्कालीन राजांच्या पराजयाची प्रतीक चिन्हे ..." ही अस्मिता दर्शक वाक्ये गाळायला हवी होती हे आता पुनर्विचार केल्यावर पटते.
"इतिहासातील घटनांची भूतकलीन मढी उकरून काढू नये" या अर्थाचे प्रियाली यांनी लिहिले आहे, तेही पटते.
....मात्र मराठी लेखनात परकीय शब्द मला विशोभित दिसतात हे खरे .मग ते कितीही रुळलेले असोत.
ते अभारतीय आहेत,परकी आक्रमकांचे आहेत,आमच्या तत्कालीन राजांच्या पराभवाची प्रतीक चिह्ने आहेत
म्हणून ते अप्रिय आहेत असे नव्हे,
तर त्या शब्दांची व्युत्पत्ती,त्यांचे शुद्धलेखन, व्याकरण, त्यांचे सामासिक शब्द, संधी,
त्यांना लागणारे उपसर्ग आणि प्रत्यय या सर्व गोष्टी मराठी शब्दांच्या व्याकरणाहून सर्वस्वी भिन्न आहेत.
आपण ते देवनागरीत लिहितो एव्हढेच. मराठी शब्दांशी त्यांचे अन्य कोणतेच साधर्म्य नाही. त्या शब्दांपासून नवीन शब्द
घटित करता येत नाहीत.
(मला तरी नाहीत. ते सहजतेने वापरता येत नाहीत.जे सांगायचे ते अभिव्यक्त झाले नाही अशी शंका येते. काहीतरी चुकते आहे असे वाटते.)
मराठी भाषेच्या अभिवृद्धीला ते मारक आहेत. म्हणून मला असे अभारतीय शब्द अप्रिय वाटतात.
अर्थात हे केवळ व्यक्तिगत कारणासाठी नव्हे तर मराठी भाषेच्या प्रकृतीशी ते विसंगत आहेत म्हणून.
त्यात अस्मितेचा आणि भावनेचा लवलेशही नाही.
मग ठीक आहे
असे असल्यास ठीक आहे.
अर्थात या सर्व गोष्टी मराठी व्याकरणातल्याच आहेत, आणि भिन्न नाहीत असे माझे मत आहे.
व्युत्पत्ती - या शब्दांना व्युत्पत्ती आहे. मराठी शब्दांची विशेष अशी व्युत्पत्ती काय आहे? ("अमुक शब्दाची व्युत्पत्ती मराठीच्या व्याकरणानुसार आहे" हे वाक्य विचित्र आहे. संस्कृतात "व्याकरण" आणि "निरुक्त"=ज्याला मराठीत व्युत्पत्ती म्हणतात, ही दोन वेगवेगळी शास्त्रे आहेत. मराठीतही व्याकरण आणि व्युत्पत्ती यांचे "नियम" वेगवेगळे आहेत. व्युत्पत्तीचे "अवश्यनियम" असे काही नसतातच. पानीय->पाणी हे असे ठीक असले म्हणून करणीय->करणी असा बनवणारा कुठलाच नियम नसतो.)
शुद्धलेखन - नेहमीचेच मराठीतले नियम वापरायचे, म्हणजे अंत्य ई-ऊ दीर्घ, वगैरे.
व्याकरण - या शब्दांना मराठीमध्ये तीन लिंगांपैकी एक लिंग असते, त्याप्रमाणे वाक्यातील क्रियापदे वगैरे चालवायची, दोन वचनांपैकी एक वचन असते. विभक्ती बनवण्यापूर्वी नेहमीसारखेच सामान्यरूप बनवावे. माळ->माळे-ने सारखे शरम->शरमे-ने. कर्ता-कर्म वगैरे वाक्यरचना नेहमीचीच असते.
सामासिक शब्द नेहमीसारखेच असतात. रूढ फोड खास वेगळी नसली तर षष्ठी तत्पुरुष म्हणून सोडवायचे असतात. शक्यतोवर लोकांना समजावेत म्हणून नवीन समास षष्ठी तत्पुरुष बनवलेले बरे (हे संस्कृतोद्भव शब्दांसाठी तितकेच खरे आहे.) फडाचा नवीस = फडनवीस
विशेषणांनी कर्मधारय करावा : मर्द+मराठा = मर्दमराठा इत्याची
संधी : नेहमीचेच
हात+दे = हाद्दे; तसेच
खत+दे = खद्दे
बाई+इथे = विकल्पाने बाईयिथे/बाईथे; तसे शाई+इथे = विकल्पाने शाईयिथे/शाईथे
वगैरे
उपसर्ग आणि प्रत्यय :
मराठी उपसर्गांची यादी कुठे मिळेल? माझ्या मते त्यांना मराठी उपसर्गच लागतात. मराठीतले नेहमीचे प्रत्यय निश्चित लागतात.
"प्रयोगशरणा वैयाकरणा:" आणि भाषेला लोकप्रमाण मानणार्या पाणिनी-पतंजली वगैरेंच्या मताने मराठीत विचार केला तर "सभ्य मराठी लोक ती भाषा बोलतात पण ते मराठी व्याकरणाहून भिन्न आहे" या वाक्यात अंतर्गत विरोध दिसतो. (व्याकरण हे कुठल्याही वैज्ञानिक नियमाप्रमाणे, म्हणजे निरीक्षणाने ठरवायचे असते.) मराठी लोक बोलतात त्यापेक्षा वेगळे मराठी व्याकरण असे काय आहे?
देवनागरीत लिहिण्याचा मुद्दा असंबद्ध आहे. माझ्या पणजोबांनी पत्रे मोडीत लिहिली, पण भाषा मराठीच होती. आणि महादेवी वर्मा बाई देवनागरीत लिहितात, पण त्यांची भाषा मराठी नाही. देवनागरी लिखाणाचा आणि मराठी असण्या-नसण्याचा व्यवस्थित परस्परसंबध नाही.