मनोभावे देशदर्शन - अरुणाचल प्रदेश

ग्रंथपरिचय
मनोभावे देशदर्शन- अरुणाचल प्रदेश
मनोभावे देशदर्शन- अरुणाचल प्रदेश

पुण्यातील अप्पा बळवंत चौकात गेलो आणि दुचाकी पार्क करताना सहज वर लक्ष गेलं तर युनिक लॊन्ड्री नामक एका दुकानात फलकावर राजहंस प्रकाशनाच्या 'मनोभावे देशदर्शन- अरुणाचल प्रदेश' या पुस्तकाची जाहीरात दिसली. नुकतीच आर्मीतील कर्नल असलेल्या चुलतभावाची बदली अरुणाचल प्रदेशला झाली होती. त्यामुळे अरुणाचल प्रदेश हा शब्द नुकताच कानावर पडला होता. शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकामुळे हा प्रदेश भारताच्या ईशान्य टोकाला आहे हे माहित होतं अन्यथा तो प्रदेश मला चांदोबा मासिकातल्या गोष्टीतला काल्पनिक प्रदेशच वाटला असता.हल्ली लॊन्ड्रीत पण परिटघडीची पुस्तक मिळतात वाटत असे मनाशी पुटपुटत लॊन्ड्रीत पुस्तकाची चौकशी केली.पुस्तक उघडून त्याचा वास घेतला. गुळगुळीत मुखपृष्ट गालाशी घासून पाहिल. मस्तच वाटल.मी पुस्तक अगदी मनोभावे विकत घेतलं.

ज्ञानप्रबोधिनीचे प्राचार्य विवेक पोंक्षे यांचे प्रास्ताविक वाचले आन लॊन्ड्रीचा पुस्तकाशी असलेला संबंध उलगडला. दस्तुरखुद्द लेखक शशिधर भावे हेच लॊन्ड्रीचे मालक. जुन्याकाळातील लॉन्ड्री व्यावसायिक. प्रा पोंक्षे हे विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून गेली वीस वर्षे त्या भागात दीर्घ भेटी देउन शिक्षणाचे कार्य करतात.अनेक गैरसमजांचे निवारण प्रस्तावनेतच होते. नेफा ही शिवणकामाशी संबंधीत असलेली संज्ञा हा लष्कराच्या संबंधीत भूभाग आहे असे आश्चर्यमिश्रित कुतुहल कुठेतरी स्मरणात होते. तो भाग म्हणजेच आताचा अरुणाचल प्रदेश अशी ज्ञानात भर पडली. अरुणाचल प्रदेश या नावाला इंदिरा गांधीं च्या पसंतीचे शिक्कामोर्तब आहे. भारतातील बहुविध संस्कृतीत या भागाची मुख्य प्रवाहाशी असलेली सांस्कृतिक नाळ ज्या अज्ञानातुन वा अज्ञानापोटी असलेल्या गैरसमजुतीतुन तुटते ती नाळ जोडण्याचे काम या पुस्तकात होते.या राज्यात फिरण्यासाठी आजही इनरलाईन परमीट लागते. याची खंत लेखकाने व्यक्त केली आहे.ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या भोवती असलेल्या मेघालय, त्रिपुरा,मिझोराम, मणिपूर, नागालॆंड व अरुणाचल प्रदेश या सेव्हन सिस्टर्स च्या प्रदेशात भाव्यांनी आपल्या सहका-यांसोबत भटकंती केली. त्याच्या साक्षेपी नोंदी करत गेले आन या पुस्तकाचा जन्म झाला.भारतात काश्मीरपेक्षा सुंदर प्रदेश कुठला असे कुणी विचारल्यास अरुणाचल प्रदेशाचे नाव खुशाल सांगावे असे लेखक म्हणतो.
प्रवासवर्णन, नकाशा, फोटो, व परिशिष्ट अशा मुख्य टप्प्यात विभागण्यापुर्वी तेथील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, व सामाजिक पार्श्वभुमि पुस्तकात तयार केली आहे. मनोभावे देशदर्शनासाठी अशी मनोभुमी तयार असणे गरजेचे आहे. अरुणाचल प्रदेश निवांत पहाण्यासाठी पुस्तकात तो भाग सात मार्गात विभागला आहे.प्रत्येक मार्गाचे वर्णन टप्प्या टप्प्याने केले आहे.सगळ्याची सुरुवात गुवाहटी पासून आहे. arunachal
पहिला मार्ग- गुवाहटी - तेजपूर - रंगपाडा - भालुकपोंग तिपी येथील आर्किड अनुसंधान केंद्र - रुपा- बोमदिला - दिरांगचा बौध्दविहार. कालचक्र गोम्पा आणि गरमपाण्याचे झरे पहात सेलापास, तवांगचा प्राचीन बौद्धविहार सुमारे ४३६ किमी चा प्रवास.

दुसरा मार्ग- गुवाहटी- इटानगर- झीरो- दापोरिजा हा सुमारे ५५० किमी चा प्रवास

तिसरा मार्ग- गुवाहटीवहुन ४३९ किमी दिबुगड ला येउन फेरीने पलीकडे जाउन ७० किमी वर पासीघाटला जाता येते.सुमारे ५०९ किमी चे अंतर तिथून जेनग्गिंग व यिंगकियांग हे साहसी ट्रेक करता येतात.

चौथा मार्ग- तिस-या मार्गाप्रमाणे दिब्रुगड तेथुन फेरीने पलीकडे जाउन बसने मालिनीठाण व पुढे अलॊंग .हा प्रवास ५५० किमी. तिथुन मेचुका घाटी दोन दिवस पदयात्रेने गाठता येते.

पाचवा मार्ग - गुवाहटीहून तिनसुकिया ला यावे. तेथुन फेरीने पलीकडे जाउन बसने रोईंग ला यावे तेथुन मायुदिया- अनिनी हा ७७२ किमी चा प्रवास.

सहावा मार्ग- गुवाहटी - तिनसुकिया- परशुरामकुंड - वॊलॊंग हा ७६५ किमी चा प्रवास. तिथुन डोंगला २० किमी पदयात्रा.

सातवा मार्ग- गुवाहटी- तिनसुकिया - मार्गारेटा- मिआओ- नामधापा हा ६१० किमी चा प्रवास.
स्थान महात्म्य सांगताना पौराणिक संदर्भ ऐतिहासिक संदर्भ प्राकृतिक संदर्भ असे विविध संदर्भ रोचक करुन सांगितले आहेत.उदा. दिबांग जिल्ह्यातील महाभारतकालीन भीष्मकनगर, लोहित जिल्ह्यातील कुंभमेळ्यासारखा धार्मिक मकरसंक्रांत उत्सव होणारे परशुराम कुंड .
परिशिष्टांमध्ये इनर लाईन परमीट देणा-या कार्यालयाचे पत्ते, माहिती केंद्रे, उत्सव सहली, महत्वाचे सण व उत्सव, हेलिकॊप्टर सेवा, भौगोलिक अंतरे व लागणारा वेळ , अरुणाचल प्रदेश पर्यटन निगम च्या सहली, खाजगी कंपन्यांच्या सहली. अरुणाचलातील ट्रेकींग रुटस, मासेमारी, ट्रॆव्हेल एजंट चे पत्ते व फोन नं , स्थानिक बोली भाषेतील उपयुक्त शब्द व वाक्ये अशी सर्व माहिती संकलित आहे.सदर पुस्तक म्हणजे केवळ वाटाड्या नाही तर तुमच्या प्रवासी स्वातंत्र्याचा अवकाश अबाधित ठेउन तुमच्याशी संवाद साधणारा प्रवासातील सोबती आहे.
पुस्तकाचे नांव- मनोभावे देशदर्शन- अरुणाचल प्रदेश
लेखक - शशीधर भावे
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, १०२५ सदाशिव पेठ, पुणे फोन 020 24473459 Email- rajhans1@pn2.vsnl.net.in
पृष्ठे - ८९ + ४ कृष्ण धवल फोटो
मूल्य- ७५/-

Comments

उत्तम

सुंदर परिचय. अरूणाचल प्रदेशात जाण्याचा योग आला नाही पण जवळच्या गंगटोक, सिलिगुडी वगैरे प्रदेशात गेलो आहे. तिथल्या सृष्टीसौंदर्याचे वर्णन करायला शब्द (आणि छायाचित्रे) अपुरी पडतात. परत यावेसे वाटत नाही. करियर, नोकरी वगैरेंवर लाथ मारून तिथेच रहावेसे वाटते.
साधारणपणे पहाडी प्रदेशातील लोकांमध्ये मनाचा मोकळेपणा अधिक जाणवतो असा अनुभव आला आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

पुस्तकाची ओळख

धन्यवाद, पुस्तकाची ओळख आवडली.

+१

हेच म्हणतो !

हम्म्म्...

मस्त ओळख

वा! मस्त छोटेखानी ओळख.. मात्र मला आवडली ती पुस्तक निवडायची हि पद्धतः

पुस्तक उघडून त्याचा वास घेतला. गुळगुळीत मुखपृष्ट गालाशी घासून पाहिल. मस्तच वाटल.मी पुस्तक अगदी मनोभावे विकत घेतलं

मला देखील छान वासाची पुस्तकं लगेच घ्यावीशी वाटतात :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

छान ओळख

छान ओळख.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

श्री. शशीधर भावे

माझा पुर्वांचलाशी संबंध जोडण्यात श्री भावंचा सिंहाचा वाटा आहे. सुनिल देवधर यांच्या भाषणाच्या कार्यक्रमात माझी भावेंची ओळख झाली आणि ती वाढतच हेली. ७५ वय असलेले श्री भावे यांचा उत्साह तरुणांना लाजविल असा आहे. या वयात ही त्यांनी समवयस्क मित्रांना घेउन अनेक सफरी केल्या आहेत आणि करत आहेत. त्यांचा आदर्श घेउनच मी पुढील वाटचाल करित आहे.

विश्वास कल्याणकर

 
^ वर